गझल गायक 'सुधाकर पांडुरंग कदम'

मौजे आर्णी जिल्हा यवतमाळ येथील कुणी 'सुधाकर पांडुरंग कदम' गझल गायकी करत असावेत. सुधाकर कदम नावाने त्यांनी मराठी विकिपीडियावर स्वतः विषयी स्वतः लेख लिहिला. विकिपीडियावर स्वतः विषयी स्वतः लेखन करणे उचीत समजले जात नाही, मुख्य म्हणजे बर्‍याच केसेस मध्ये ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निश्चित करणे कठीण जाते. तसेच काहीसे सुधाकर कदम यांच्या विषयीच्या लेखाबाबत झाले आहे आंतरजालावर इतरत्रसुद्धा त्यांनी स्वतःबद्दल स्वतः मोठ्या प्रमाणावर लिहिले असणार त्यामुळे स्वतंत्र संदर्भ शोधणे कठिण जात आहे. एकीकडे छोट्या गावांमधील गतीविधींची शहरी माध्यमांकडून दखल कमी घेतली जाऊन मूळ नोंदी कमी पडतात मग संदर्भांच्या अभावी ज्ञानकोशीय दखल घ्यावी अथवा नाही असा प्रश्न पडतो.

शिवाय सुधाकर कदम यांचा लेख जाहीरात वजा असल्यामूळे तुर्तास मराठी विकिपीडियावर राहतो की नाही माहित नाही म्हणून ऐसीवर खाली मजकुर स्थानांतरीत करीत आहे. ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबद्दल कुणास खात्री असल्यास सुधाकर पांडुरंग कदम यांच्या बद्दल अधिक माहिती द्यावी. ज्यांना एखादा मजकुर ज्ञानकोशीय शैलीत कसा बदलवायचा आहे त्यावर प्रॅक्टीस करावयाची असल्यास उदाहरण म्हणून हा लेख आणि मजकुर पुढेचालून उपयूक्त ठरावा. हा धागा विकिप्रकल्पांसाठी असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.

माझी मराठी गझल - गायकी : सुधाकर कदम

मराठी गझल - गायकीला तशीकोणतीही परंपरा नाही . माझ्याअगोदर मराठी गझल , गझलसारखी गाण्याचा फारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझलगायन हे माझ्यासाठी आव्हान होते . मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली . तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली . माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहंदी हसन , फरीदा खानम , गुलामअली व आपले जगजितसिंग हयांच्या गायकीवरून तयार झाला आहे . त्या काळात यवतमाळ सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका व कॅसेट सुद्धा मिळत नव्हत्या . पाकिस्तान रेडिओवरून जेवढे काही ऐकायला मिळायचे त्यावरून मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो . पुढे स्व . सुरेश भटांनी मला मेहंदी हसन व फरीदा खानमच्या कॅसेट दिल्या . हळूहळू गुलामअली , जगजितसिंग , बेगम अख्तर यांच्या कॅसेट जमा करून माझा गझल गायकीचाअभ्यास सुरू झाला . मराठी गझल गायची म्हणजे वरील मंडळीचे नुसते अंधानुकरण करून भागणार नव्हते , तर प्रत्येकाची गझल गाण्याची पद्धत, बंदिशीची बांधणी, शब्दानुरूप वेगवेगळया स्वरगुच्छांची पखरण, शब्द फेक , शेर सादर करण्याची पद्धत , श्रोत्यांना आपलेसे करण्याची हातोटी , सादरीकरणातील जोरकसपणा व हळुवारपणातील बारकावे , या सगळयाला साजेसे व्यक्तिमत्व आणि योग्य साथीदारांची योग्य संगत म्हणजेच गझल गायकीची रंगत होय . हया सगळया बाबी कठोर साधना व आत्मपरीक्षण करून मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला . तेव्हा कोठे मला महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही रसिकांकडून प्रचंड दाद मिळत गेली . पहिल्याच बैठकीत सादर केलेल्या गझलेला व सुरावटीला दाद मिळवणे यात सारे काही आले . असे मला वाटते . माझी स्वत : ची वेगळी अशी गायनशैली तयार व्हावी म्हणून आवडत असूनही मराठीतील लोकप्रिय व प्रसिद्ध गायकांची भावगीते , नाट्यगीते मी अभ्यासली नाहीत . वारंवार ऐकली सुद्धा नाहीत . 1958 मध्ये मी तबला शिकायला सुरूवात केली . वडील आदरणीय पांडुरंगजी कदम हे वारकरी संप्रदायाचे विदर्भातील प्रसिद्ध गायक व हार्मोनियम वादक . गायनाचे व हार्मोनियम वादनाचे प्रारंभिक धडे त्यांनीच गिरवून घेतले . यवतमाळलाच शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू असतांना 1965 मध्ये ' शिवरंजन ' ऑर्केस्ट्रामध्ये संगीत संयोजन , एकॉर्डियन वादन व गायन असे अनेक व्याप सांभाळता सांभाळता चाली बसविण्याचा छंद जडला . लहान मुलांसाठी बालगीते विद्यार्थ्यांसाठी समुहगीते , नाटकांसाठी नाट्यगीते अशा विविध प्रकारच्या गाण्यांना स्वरबद्ध करीत गेलो . ऑर्केस्ट्राच्या प्रत्येक कार्यक्रमात मी स्वरबद्ध केलेले एकतरी प्रेमगीत किंवा भक्तिगीत सादर केल्या जात असे . ऑर्केस्ट्राच्या 10 वर्षाच्या कालावधीत एकॉर्डियन , हार्मोनियम , तबला , मेंडोलिन , आर्गन , गिटार व इतर तालवाद्य हाताळता प्राविण्य मिळत गेले . त्यासाठी या दहा वर्षातील दिवसाचे रोज दहा ते बारा तास ऑर्केस्ट्राच्या खोलीतच सतत रियाज करावा लागला . याचा फायदा म्हणजे मी आकाशवाणी नागपूरची स्वरपरीक्षा उत्तीर्ण होऊन आकाशवाणीचा मान्यताप्राप्त गायक व मेंडोलिन वादक झालो . त्या काळात आकाशवाणी कलावंत म्हणून मिरवण्यात मजा यायची . 1972 मध्ये यवतमाळ जिल्हयातील आर्णी या वीस हजार लोकवस्तीच्या गावात इच्छा नसतांनाही आर्थिक तडजोडीसाठी संगीत शिक्षक म्हणून रूजू झालो . तेथे सरोद व संतूर वाद्ये आणून मनसोक्त रियाज केला . काही सरोदवादनाचे तर काही संतूरवादनाचे जाहीर कार्यक्रमही केले . या वेळी गायन की वादन अशा द्विधा मनस्थितीत असतांना स्व . छोटा गंधर्व व स्व . जितेंद्र अभिषेकी यांनी मला मोलाचे मार्गदर्शन करून गायन कायम ठेवले . जितेंद्र अभिषेकी यांचा स्वत : चा असा बाज होता तर छोटा गंधर्व यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व होते . गायनातील मुर्च्छना पद्धतीबद्दल शास्त्रीय ज्ञान विशारदच्या परीक्षेच्या वेळी माहीत झाले होते . प्रात्यक्षिकाचे धडे मात्र स्वत : छोटा गंधर्वांनी मला दिले . याचा उपयोग मला गझल गाताना नेहमीच होत गेला . माझ्या गझल - गायकीवर या दोन थोर कलावंतांचे फार मोठे ऋण आहे . यवतमाळचे कवी मित्र शंकर बडे यांनी लिहीलेली - ' आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाही आम्ही घरोघरी अन् आम्हास गाव नाही ' ही 1975 मध्ये स्वरबद्ध केलेली माझी पहिली गझल होय . नागपूरच्या विदर्भ साहित्य संगीत विभागाच्या उदघाटनप्रसंगी माझा कार्यक्रम गडकरी सभागृहात झाला . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कविवर्य सुरेश भट होते . या कार्यक्रमात वरील गझल ऐकून त्यांनी त्यांच्या काही गझला मला स्वरबद्ध करायला दिल्या . आर्णी मुक्कामी त्या स्वरबद्ध करून दुस - या नागपूर वारीत त्यांना ऐकविल्या . त्यांना आवडल्या व आमची कुंडली जुळली . दोघेही मनस्वी स्वभावाचे असल्यामुळे मनाने ही एकत्र आलो 1980 पासून आम्ही दोघांनी एकत्र कार्यक्रम करायला सुरूवात केली . सुरूवातीला ते काही गझला त्यांच्या पद्धतीने ऐकवायचे . मध्यंतरानंतर मी हार्मोनियम व तबल्याची साथ घेऊन स्वरबद्ध गझल ऐकवायचो . 1980 ते 1982 या दोन वर्षात गझल व गझल - गायकी लोकापर्यंत पोचविण्याकरीता आम्ही दोघे प्रसंगी पदराला खार लावून महाराष्ट्रभर ' वणवणलो ' हळुहळू माझा पूर्णपणे तीन तासांचा फक्त मराठी गझल गायनाचा कार्यक्रम तयार झाला . या कार्यक्रमाला ' अशी गावी मराठी गझल ' हे शीर्षक सुरेश भटांनीच दिले . विदर्भ , मराठवाडा , दक्षीण महाराष्ट्र असा प्रवास करत करत 15 जुलै 1982 ला पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहातील कार्यक्रमाने ' अशी गावी मराठी गझल ' चा झेंडा पुण्यात रोवला . या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गाण्याचा तीन तासांचा कार्यक्रम करणारा एकही गायक महाराष्ट्रात नव्हता , ' अशी गावी मराठी गझल ' हामराठी गझलगायनाचा महाराष्ट्रातील पहिला कार्यक्रम होता याचा पुरावे म्हणजे त्यावेळच्या वर्तमानपत्रातील बातम्या . म . सा . प . च्या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण व आकाशवाणी पुणे केंद्राने निमंत्रितांसमोरील कार्यक्रमाचे एक तासाचे केलेले ध्वनिमुद्रण . या कार्यक्रमाचे निवेदन स्वत : सुरेश भटांनी केले होते .
या कार्यक्रमाला रमण रणदिवे , प्रदीप निफाडकर , अनिल कांबळे , संगीता जोशी , वगैरे त्यावेळच्या नवोदित व आताच्या प्रस्थापित गझलकारांसोबतच ' सोबत ' कार ग . वा . बेहरेसारख्या अनेक मान्यवर व्यक्ति उपस्थित होत्या . पुण्यातील रमण रणदिवे , प्रदिप निफाडकर , व अनिल कांबळे यांच्या गझला कार्यक्रमामधून सर्वप्रथम मी गायिल्या . गझलगायनाच्या कार्यक्रमात गझलांची निवड अतिशय महत्वाची असते . गझलांचा मतला जर श्रोत्यांच्या हृदयात घुसणारा असला तर पुढील शेर ते मनापासून ऐकतात . तसेच गझलची बंदिश तयार करतानाही अनेक अवधाने ठेवावी लागतात . गझलचे शब्द व भाव स्पष्टपणे श्रोत्यांपर्यंत पोचतील अशी बंदिश व गायकीची पद्धत असायला हवी . तसेच एखाद्या शेरातील विशिष्ट शब्द खुलवायचा असेल तर त्याला स्वरांची वेगळी ट्रिटमेंट द्यावी लागते . नुसत्या बंदिशीने हे कामभागत नाही . खरे तर बंदिश तयार करणे हा शब्दप्रयोगच माझ्या दृष्ट्रीने चुकीचा आहे . गझल वाचता वाचता आतल्या आत खळबळ सुरू होवून एखादी सुरावट उफाळून बाहेर येते . ती खरी बंदिश होय . ती आपली नसते पण आपण फक्त माध्यम असतो . आलेल्या चाली आणि बांधलेल्या चाली यातील तफावत आत्मपरीक्षण केल्यास लक्षात येते . तसेच जाणकार श्रोतेही काही प्रमाणात ओळखू शकतात . शेराची सजावट मात्र अविर्भाव , तिरोभाव आणि मुर्च्छना पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारे करता येते . पण त्यासाठी शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करणे आवश्यक ठरते . बंदिश बांधतांनाही याचा उपयोग होतो . शब्द आणि स्वर दोन्हीही दमदार असतील तर दाद हमखास मिळतेच . उदाहरणेच द्यायची झाली तर अनेक देता येतील पण जागेअभावी काही मोजकी उदाहरणे देत आहे . आर्णी ( जि. यवतमाळ ) मुक्कामी माझे घरी सुरेश भटांना ' ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची , तापलेल्या अधीर पाण्याची ' ही गझल सुचली . लगेच मला देऊन चाल बसवायला सांगितले . मी हार्मोनियम घेऊन बसलो . गझल वाचता वाचता भुपाळीचे स्वर मनात रूंजी घालायला लागले . बंदिश तयार झाली . पण त्यातील ' अधीर ' या शब्दाला दिलेली सुरावट मनात ठसत नव्हती अख्खी रात्र जागून झाल्यानंतर भुपाळीत नसलेला ' शुद्ध निषाद ' सहाय्याला आला व ' अधीर ' ला आधार देता झाला ; . तेव्हा कुठे समाधान झाले . रात्रभराची माझी तगमग सुरेश भट बघत होते . पण बोलले काहीच नाही . सकाळी मात्र मनापासून दाद देऊन त्यांनी माझा रात्रभरचा शीण घालविला . पुढे प्रत्येक कार्यक्रमात या गझलेने दाद घेतली . ' हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही ' , ' या फुलांनी छेडली रानात गाणी ' , ' मी असा त्या बासरीचा सूर होतो ' , ' दिशा गातात गीते श्रावणाची ' अशा अनेक उत्तमोत्तम रचना आम्ही एकत्र असताना तयार झाल्या . कार्यक्रमात गझल गाताना एखाद्या शब्दाला स्वरांनी कुरवाळण्याची किंवा शब्दार्थ नेमकेपणाने श्रोत्यांना कळावा म्हणून काही तरी वेगळे करण्याची उर्मी ऐनवेळी दाटून येते . अशा वेळी जर योग्य प्रकारचे स्वर लावल्या गेले तर तो शब्द परिणाम कारक ठरतो . ' कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता . यातील ' वेगळा ' या शब्दाचा वेगळेपणा दाखविण्यासाठी मूळ बंदिश ' कल्याण ' थाटातील असूनही मी ' कोमल रिषभा ' चा प्रयोग करून ' वेगळे ' पण सिद्ध करून रसिकांची दाद घ्यायचो .
ऐका तर गझल : हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही :

तसेच उ . रा . गिरीच्या ' या एकलेपणाचा छेडीत मी पियानो ' या गझल मधील ' तिमीरात हरवलेली निद्रा अनाथ माझी ' या ओळीतील ' हरवलेली ' या शब्दाला स्वरांद्वारे ' हरविल्याचा ' आभास निर्माण करण्याचा माझा प्रयत्न नेहमी दाद घ्यायचा . या गझलेची मूळ बंदिश ' मालकंस ' रागात आहे . दुसरी ओळ आहे ' ओठास भैरवीच्या दंशून जा स्वरांनो ' यातील ' भैरवी ' शब्दाला ' भैरवी ' तच नेऊन पुन्हा ' मालकंसा ' त येणे म्हणजे तयारीचे काम . पण याचा जो काही ' परिणाम ' ऐकणा - यांवर होतो तो कायम लक्षात राहणारा असतो .
ऐका तर गझल : या एकलेपणाचा छेडीत मी पियानो :

1975 पासून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर जवळ जवळ हजार कार्यक्रम मी केले . भटांच्या साठ टक्के गझला स्वरबद्ध करून गायिलो . सोबतच विदर्भातील श्रीकृष्ण राऊत , उ . रा . गिरी , ललित सोनोने , शंकर बडे , गंगाधर पुसतकर , अनिल पाटील , पश्चिम महाराष्ट्रातील संगीता जोशी , प्रदीप निफाडकर , इलाही जमादार , अनिल कांबळे , म . भा . चव्हाण , रमण रणदिवे , सतीश डुंबरे , मंगेश पाडगांवकर , सदानंद डबीर , [[मनोहर रणपिसे]], ए.के.. शेख, घनश्याम धेंडे, दिलीप पांढरपट्टे , शिवाजी जवरे , प्रमोद खराडे ते समीर चव्हाण पर्यंतच्या जुन्या नव्या गझलकारांच्या रचना मी स्वरबद्ध केल्या आहेत . माझा गझलगायकीचा वारसा माझ्या कन्या कु . भैरवी व कु . रेणू समर्थपणे चालवित आहेत . प्रसिद्धी माध्यमे व कॅसेट कंपन्या मला आर्णीसारख्या लहानशा गावात वास्तव्य असल्यामुळे वश झाल्या नाहीत . तसेच स्वाभिमानी स्वभावामुळे लाळघोटेपणा व पायचाटूपणाही जमला नाही . त्यामुळे ख - या अर्थाने मराठी गझलगायकीची सुरूवात करून आणि शेकडो कार्यक्रम करूनही आजच्या पिढीला मी अपरिचित आहे . पण माझ्या जवळचा मराठी गझलांच्या बंदिशीचा खजिना पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे . यात वाद नाही . सध्या मी पुण्यात स्थायिक झालो असून माझ्यापरीने मराठी गझलगायकी करिता जे काही करता येईल ते करण्याच्या प्रयत्नात आहे . माझ्या बंदिशींवर आधारित ' सरगम तुझयाचसाठी ' हा मराठी गझलांचा कार्यक्रम माझ्या मुली महाराष्ट्रभर करीत आहे . गझलगायकी शिकणा - या नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून , बंदिशींवर सतत नवीन प्रयोग करीत आहे . मराठी गझल माझा प्राण आहे . ' गेला जरी फुलांचा हंगाम दूर देशी आयुष्य राहिलेले जाळून मोहरू या ' असे म्हणून माझी मराठी गझलगायकीची साधना सुरूच ठेवणार आहे . बस !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुधाकर कदम नावाने त्यांनी मराठी विकिपीडियावर स्वतः विषयी स्वतः लेख लिहिला

मला पण हे करायचं आहे. मी अस्वल ह्या नावाने समजा स्वतःविषयी एक लेख लिहिला आणि त्यात १००% सत्य मांडलं, तर तो लेख विकीवर राहील काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला पण हे करायचं आहे. मी अस्वल ह्या नावाने समजा स्वतःविषयी एक लेख लिहिला आणि त्यात १००% सत्य मांडलं, तर तो लेख विकीवर राहील काय?

Sad प्रथमतः मनमोकळे पणाने मनातील विचार मांडण्यासाठी आभार. लेखन विकिवर राहण्यासाठी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता हा एक मह्त्वाचा क्रायटेरीया आहे. विकिपीडियावर (मुख्यलेख नामविश्वात) स्वतः विषयी स्वतः लेखन करणे सहसा प्रशस्त समजले जात नाही. लेखाचे विकिकरण होईस्तोवर हितसंघर्ष आणि लेखन औचीत्य विषयक संदेश लेखावर आणि सदस्य चर्चा पानावर लावले जातात आणि ते स्पृहणीय ठरत नाही.

सुधाकर कदम यांचे लेखन वगळण्यासाठी नॉमीनेट झाल्यामुळे आणि त्यांच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेस दुजोरा न मिळाल्यास वगळले जाण्याची शक्यता आहे म्हणूनच ते येथे नकलवले आहे.

हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे; एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही.

तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत असते.

असे का ?

मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. हितसंघर्ष किंवा हितसंबंध असलेल्या लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते.

खालील चित्रातील लेखन चक्र अभ्यासावे. ज्ञानकोशात माहिती डायरेक्टली पहिल्या स्ट्रोक मध्ये येणे तसे अभिप्रेत नाही. (अपवाद सर्वत्र असतात तसे येथेही आहेत) माहितीची दखल इतर माध्यमांनी प्रथमतः घ्यावयास हवी सहसा त्याचा पिअर रिव्ह्यू व्हावयास आणि स्वतःसोडून इतर कुणी त्याची ज्ञानकोशीय नोंद घ्यावयास हवी.


मराठी विकिपीडियावर एक प्रश्न विचारला गेला होता ""आपण आपली स्वत:ची माहीती का नाही देऊ शकत ?"" प्रश्न आणि त्याचे उत्तर माहिती साठी खाली देत आहे.

{{एक नागरीक}}
'''संदीप .... .....''' (पुर्ण नाव वगळले आहे) ([[मे १६]], [[इ.स. १९९२]]; [[बीड]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा [[मराठी]] [[एक नागरीक]] असून [[भारतीय एक विद्यार्थी|भारतीय एक विद्यार्थी]]
माझे शिक्षण श्री जालिँदर विद्यालय मध्ये झाले. मी कोणी नेता नाही की काही नाही. मला फक्त कविता लिहायला आवडत. तुम्ही म्हणाल येथे फक्त नेत्याची माहीती असते. आपली का नाही देऊ शकत आपण पण हिँन्दुस्थानी आहोत आपल्याला अधिकार आहे. चला देशासाठी काही चागल करुया.

:नमस्कार, संदीप
::एक नवागत सदस्य या नात्याने आपल्या शंके करता आपण मदतकेंद्र निवडले असते तर बरे झाले असते, कारण मदत केंद्रावरील उपलब्ध केलेल्या सहाय्यावर बेतून पुढे सहाय्य पानांची रचना करणे बरे पडते. असो आपल्या शंकेचे उत्तर खालील प्रमाणे,

::विकिपीडिया सर्वसाधारण वेबसाइट नाही. एक ज्ञानकोश आहे.ज्ञानकोशात केवळ नेत्यांसाठी नाही, '''विश्वकोशीय उल्लेखनीयता असलेल्या कोणत्याही 'अबकड' व्यक्ती अथवा गोष्टीची दखल घेतली जाऊ शकते. पण ज्ञानकोशीय विश्वासार्हता पाळण्याच्या दृष्टीने येथे काही संकेतांचे पालन केले जाते.

* (काही अपवाद वगळता) सहसा इतर जगाने इतर माध्यमातून एखाद्या व्यक्ती/घटना/गोष्टीची दखल घेऊन झाल्याच्या नंतर त्यातील सुसंबद्ध ज्ञानकोशीय माहिती तेवढी संदर्भासहीत ज्ञानकोश स्विकारत असतात. कोणत्याही विषय नसण्याचे बंधन नाही म्हणून विकिपीडिया मुक्त म्हणविला जातो परंतु ज्ञानकोशीय मर्यादांच्या परिघातच. या बद्दल बरेच संकेत आहेत. आपण सावकाश पणे येथील सर्व संकेतांशी अभ्यस्त होउ शकता.

*विकिपीडियावर माहितीची विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने स्वत:चे अथवा स्वत:बद्दल लेखन करणे करवून घेणे अभिप्रेत नसते.

* आपल्या कविता आणि ज्ञानकोशाच्या परिघा बाहेरील इतर गोष्टी जसे की देशा साठी वगैरे करण्यास इंटरनेटवर इतरत्र बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या कडून देशा साठी काही चांगले कार्य अवश्य होउ द्या. आपण नेतेच झाले पाहिजे असे नाही कोणत्याही क्षेत्रात नावारूपाला या.इतर लोकांनी स्वत:हून आपली ज्ञानकोशात दखल घ्यावी एवढे मोठे व्हा.त्या करिता आपणास शूभेच्छा.

* नावारुपाला आणेल हा उद्देश खूप आवश्यक नसेल तर, वर नमुद केल्या प्रमाणे स्वत: विषयीच्या माहितीस खूपसे महत्व देण्याचे टाळले तर आपण विकिपीडियावरील ज्ञानकोशात ज्ञानकोशीय माहितीची भर घालणे हे सुद्धा चांगले कार्यच आहे.हेही लक्षात घेता येइल

* मराठी विकिपीडियावरील वावरा करीता येथील सहाय्य पानांचे वाचन करा. १) विपी:परिचय , २) विकिपीडिया काय नव्हे ३) विकिपीडिया:मर्यादा#.विश्वकोश संकल्पना, ४) विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी हे सुद्धा अवश्य पहावे.

:: पुनश्च आपले मराठी विकिपीडियात स्वागत.

lekhan chakra

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मी अस्वल ह्या नावाने समजा स्वतःविषयी एक लेख लिहिला आणि त्यात १००% सत्य मांडलं, तर तो लेख विकीवर राहील काय?

जरूर लिहा आणि तुमचा अनुभव इथे आम्हाला सांगा...
मलाही पिवळ्या डांबिसाबद्दल बरंच काही लिहायचं आहे!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

सर्वप्रथम हा विशेष लेख येथे प्रकाशित केल्याबद्दल या संकेतस्थळाच्या संचालकांचे आभार..
हा लेख सुधाकर कदम यांनी स्वतः स्वतःच्या नावे प्रसिद्ध केला असल्याचे वर म्हटले गेले आहे. अर्थात यात चूक आपली नाही...
विकिपीडिया या ज्ञानकोशावर गजलगंधर्व सुधाकर कदम यांच्या विषयी माहिती उपलब्ध असावी, या उद्देशाने विकी वर सदर पेज मी तयार केले होते. विकीच्या वापराबाबत फारशी माहिती नसल्यामुळे मी सुधाकर कदम यांची परवानगी घेऊन त्यांच्याच नावाने हे पेज सुरू केले होते. नंतर याबाबत काही मित्रांनी खुलासा केल्यावर आमची चूक आम्हाला समजली... मात्र हा धागा विकीसोबत कायमचा जोडला गेला.. तेव्हा कृपया याबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नये, ही विनंती...

- जनार्दन केशव म्हात्रे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वप्रथम हा विशेष लेख येथे प्रकाशित केल्याबद्दल या संकेतस्थळाच्या संचालकांचे आभार..
हा लेख सुधाकर कदम यांनी स्वतः स्वतःच्या नावे प्रसिद्ध केला असल्याचे वर म्हटले गेले आहे. अर्थात यात चूक आपली नाही...
विकिपीडिया या ज्ञानकोशावर गजलगंधर्व सुधाकर कदम यांच्या विषयी माहिती उपलब्ध असावी, या उद्देशाने विकी वर सदर पेज मी तयार केले होते. विकीच्या वापराबाबत फारशी माहिती नसल्यामुळे मी सुधाकर कदम यांची परवानगी घेऊन त्यांच्याच नावाने हे पेज सुरू केले होते. नंतर याबाबत काही मित्रांनी खुलासा केल्यावर आमची चूक आम्हाला समजली... मात्र हा धागा विकीसोबत कायमचा जोडला गेला.. तेव्हा कृपया याबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नये, ही विनंती...

- जनार्दन केशव म्हात्रे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0