लग्न - एक नसतं लचांड

मधुरा एरवी तशी ठीकठाक असते, पण एखादी गोष्ट डोक्यात घेतली की तिला ती सहजपणे काढून टाकता येत नाही. त्यात तिला जर कशाचा सात्विक संताप आलेला असेल तर तिचं डोकं प्रेशर कूकरसारखं होतं. धुमसत्या वाफेचं प्रेशर वाढत जातं. मग मधूनच एकदम शिटी वाजल्यासारखा आवाज लागतो. अशा तीनचार शिट्ट्या झाल्या की तिच्या नकळत गॅस बंद करून सगळी वाफ शांतपणे काढून टाकावी लागते. वेळेतच हे नाही केलं तर कधी स्फोट होईल ते सांगता येत नाही.

गेली काही मिनिटं लग्नं म्हणजे कशी बोअर, वैताग असतात याबद्दल वाफ फुरफुरत होती.
"पण आईने मला न विचारत हो म्हटलंच कसं? तेही मी साडी नेसून येईन असं कबूल केलं!" एक शिटी वाजली.
"तुला चांगली दिसते साडी." मी किंचित गॅस बारीक करण्याचा प्रयत्न केला.
"मला वैताग येतो ते लोढणं बाळगण्याचा."
"अगं, लोकांशी संबंध ठेवायचे तर असा थोडा वैताग सहन करायला लागतो. त्यात विशेष काय!" थोडा वेळ ‘समाजात राहायचं तर दुनियादारी कशी करावी लागते’ वगैरे बोलल्यावर मी म्हटलं,
"मी जमेल तसं एंजॉय करण्याचा प्रयत्न करतो. थोडी हिरवळ बघायची, जेवण हाणायचं, वधूवरांना हाय म्हणून परत जायचं. त्यात काय?"
"हो, पुरुषांचं ठीक असतं. तुम्ही कपडे काय घातले आहेत, कामाला हातभार लावता आहात की नाही वगैरेकडे कोणी लक्ष देत नाही. बायकांना जास्त त्रास होतो." झालं. ही स्त्री-पुरुष तुलनेची एक मोठ्ठी शिटी वाजली. आता गॅस बंदच करायला हवा हे लक्षात आलं.
"बरं, मीपण येईन तिथे. मी जाणार नव्हतो.... पण आता..."
तिचा आवाज किंचित निवळला. तेवढ्यासाठी माझी एक दुपार वाया घालवण्याची तयारी होती.

माणसं लग्न का करतात? स्मिताच्या लग्नाला जाताना मला हा गहन प्रश्न पुन्हा एकदा पडला. रोहन म्हणाला होता "शादी याने की दिल्ली के लड्डू - जो खाये वो पछताये, जो न खाये वो पछताये. मानसशास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर..." रोहन मानसशास्त्राविषयी बोलायला लागला की मी एक ट्रिक करतो. जवळ कुठचाही इतर आवाज चालू असेल तर त्याकडे लक्ष देतो. मग त्याच्या बोलण्याकडे, मग पुन्हा त्या आवाजाकडे. हळूहळू माझ्या डोक्यात एक प्रचंड गोंधळ होतो, आणि कान माझ्याविरुद्ध बंड करून उठतात. ही अवस्था फार छान असते. त्यामुळे ऐकू येतंही आणि नाहीही.

जगातले पंच्याण्णव टक्के लोक लग्न करतातच. काही जण तर एकदा हौस भागली नाही म्हणून दोनदा, तीनदा करतात. मला ते नेहमी प्रचंड आशावादी लोक वाटलेले आहेत. निदान या वेळेलातरी काहीतरी वेगळा अनुभव येईल... स्टॉक मार्केट चढत असताना ज्यांना तो कायम चढत राहील असं वाटणारे लोक याच कॅटेगरीतले. गेल्या वेळी फुगा फुटला आणि स्टॉक आपटले, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे म्हणणारे. एक लग्न मोडल्यानंतर पुन्हा किती वर्षांनी नवीन लग्न करतात यावरून त्यांची स्मरणशक्ती किती पक्की आहे हेही कळतं.

पूर्वीच्या काळी बायकांना पैसे मिळवण्याची परवानगी नव्हती, आणि पुरुषांना लग्नाशिवायची मुलं बाळगण्याची परवानगी नव्हती. आणि तसंही सगळेच लग्न करायचे. मग काय, करूया आपणही. हा, आता इतरही कारणं असतात, म्हणजे आपलं नातं जाहीर केलं की ते जास्त पक्कं होतं वगैरे पण मला मनापासून वाटतं की खरं कारण वेगळंच असावं. लग्न हा एक संसर्गजन्य रोग आहे, जांभईसारखा. मात्र जांभया पटापट पसरतात तर लग्नाची लागण आईवडलांकडून झाल्यावर ते जंतू बराच काळ सुप्तपणे आपल्या मनात राहातात. विशिष्ट वय झालं की त्यांची झपाट्याने वाढ होते. आणि मग एके दिवशी अचानक हॉल बुक करणं, लोकांना पत्रिका पाठवणं आणि लग्नासाठी एकदाच घालून मग कपाटात ठेवून देण्याचा पोशाख विकत घेईपर्यंत पाळी जाते.

असे विद्रोही विचार करत असतानाच मी लग्नाच्या हॉलपर्यंत पोचलो. मग अचानक आठवल्याप्रमाणे स्मृतीच्या फायलींमध्ये शोधाशोध केली. शेवटी वाकून नमस्कार करणं आणि अवघडलेली मिठी मारणं यांच्यामध्ये सापडलं - माझं ठेवणीतलं, फारसं कृत्रिम वाटणार नाही असं हसू. ते ओठांवर लावलं, ऑन ऑफ व्यवस्थित होतंय ना याची टेस्ट घेतली आणि मी आत शिरलो.

हॉलमध्ये शिरल्याशिरल्या सनईच्या आवाजाने आसमंत व्यापून टाकला. आत लोकांच्या पसाऱ्यातून एक काकासदृश गृहस्थ पुढे आले आणि म्हणाले "यायायाया. सुस्वागतम, सुस्वागतम." मी त्यांना निश्चित ओळखलं नाही, पण लहानपणी स्मिताच्या घरी येणारे एक काका होते. ते झोपलेले असताना त्यांच्या टकलावर आम्ही ऑइलपेंट लावलेला होता. त्यांच्यासारखेच ते दिसत होते. फेट्यामुळे मात्र त्यांचं टक्कल झाकलं गेलं होतं. मला त्यांनी ओळखू नये म्हणून मी नमस्काराने शक्य तितका चेहेरा झाकण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने त्यांनी मला खेचतच नेऊन एका रांगेत उभं केलं. "फेटा घ्या बांधून. यायायाया. सुस्वागतम" असं म्हणत ते दुसऱ्याच कोणाच्या स्वागतासाठी रुजू झाले.

मी चष्म्याच्या काड्या कानाला टोचवणारा फेटा सावरत आसपास बघितलं. वधूवर आपल्या लग्नाच्या साक्षीसाठी मांडलेल्या अग्निकुंडाशेजारी बसून घाम गाळत होते. घाम वाढवण्यासाठी भटजी अधूनमधून त्या कुंडात तूप टाकून आग अधिकच भडकवत होते. आसपास बिनएसीच्या हॉलमध्ये बिलकुल न झेपणाऱ्या साड्या, दागिने, सफारी, सूट, शेरवान्या वगैरे घातलेले लोक आनंदाच्या माहौलाचा लुत्फ लुटवत होते. पोरांची स्टेजच्या वरखाली पकडापकडी सुरू होती.

आसपासच्या लोकांना मी ठेवणीतलं नुकतंच पॉलिश केलेलं हसू काढून दाखवलं. एके काळी लांबचे असलेले काही मित्र अचानक जवळचे असल्यासारखे लहानपणीच्या रम्य आठवणींना उजाळा देऊन गेले. मीदेखील माफक बोललो, पण मला प्रचंड कंटाळा आला होता. नंतर थोड्या वेळाने मधुरा आली. तिच्या चेहेऱ्यावर निषेधाचा भाव स्पष्ट दिसत होता. तिच्याबरोबर थोड्या गप्पा मारल्या, पण स्मिता तिची जवळची मैत्रीण आणि माझी तशी लांबचीच. त्यामुळे तिच्याभोवती मला माहीत नसलेल्या मैत्रिणी गोळा झाल्या. त्यांतल्या कोणीच बिनलग्नाळलेल्या नव्हत्या, म्हणून मी लांबच झालो.

जेवण शक्य तितक्या पटकन आटपून वधूवरांना भेटण्याच्या लायनीत उभा राहिलो, आणि त्यांच्यापर्यंत पोचलो. एव्हाना त्यांच्या ठेवणीतल्या हास्याचा स्टार्च केव्हाच गेला होता, आणि आता ते चुरगळलेल्या कपड्यासारखं झालं होतं. संध्याकाळपर्यंत त्याचं पोतेरं होणार हे मी ताडलं. मधुरा लाइनमध्ये चिकार लांब मागे होती. मी हॉलमधून कलटी मारली.

दुसऱ्या दिवशी मधुराला भेटलो तेव्हा तिची प्रेशरकूकरऐवजी शँपेनची फसफसती बाटली झाली होती. माझा मूड मात्र थोडा फिलॉसॉफिकल होता.
"लोक लग्न का करतात?" इति मी.
"लोक यडपट असतात म्हणून?"
"नाही, मला म्हणायचं होतं की असला कटकटीचा आणि प्रचंड खर्चाचा विधी का करतात ते?"
"लोक यडपट असतात म्हणून?" फसफसती शँपेन अजूनही वाहातच होती.
"माझी थियरी थोडी वेगळी आहे. एक उदाहरण सांगतो. जैन लोकांच्यात भिक्षू होण्यासाठी एक मोठा समारंभ असतो. त्यात भिक्षू होण्याची इच्छा असणाऱ्याचं टक्कल करावं लागतं. हे साधं वस्तऱ्याने करत नाहीत, तर सर्व केस एकेक करून उपटून टाकून करतात. डोकं सुजून येतं आणि प्रचंड दुखतं."
"बरं, मग?"
"भिक्षू होण्यापूर्वी हे त्या माणसाला माहिती असतं. त्यामुळे त्याची तेवढी निष्ठा असल्याशिवाय तो या भानगडीत पडतच नाही. आणि मुख्य म्हणजे त्यानंतर भिक्षूपद सोडण्यासाठी लाख वेळा विचार करतो. कारण त्याने या वर्तुळात सामील होण्यासाठी इतके हाल सहन केलेले असतात की त्यातून बाहेर पडणं म्हणजे स्वतःची एवढी प्रचंड चूक झाली हे कबूल करण्यासारखं असतं. लग्नसमारंभाचीही तीच स्टोरी.."
"आणि हे सगळं केस उपटण्यावरून सुचतंय तुला"
"हो."
"हॅ. मला काय सांगतोयस केस उपटण्याच्या वेदनांबद्दल? तू वॅक्सिंग, थ्रेडिंग केलंयस का कधी?"

शँपेन संपायच्या आतच मी तिचा ग्लास भरला, आणि मुकाट्याने माझाही उचलला.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

त्यानंतर भिक्षूपद सोडण्यासाठी लाख वेळा विचार करतो. कारण त्याने या वर्तुळात सामील होण्यासाठी इतके हाल सहन केलेले असतात की त्यातून बाहेर पडणं म्हणजे स्वतःची एवढी प्रचंड चूक झाली हे कबूल करण्यासारखं असतं. लग्नसमारंभाचीही तीच स्टोरी.."

.
__/\__ शॉल्लेट!!!

________________________

एकेक पंचेस मस्त जमलेत.
नीरीक्षणे मार्मिक आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पूर्वीच्या काळी बायकांना पैसे मिळवण्याची परवानगी नव्हती, आणि पुरुषांना लग्नाशिवायची मुलं बाळगण्याची परवानगी नव्हती. आणि तसंही सगळेच लग्न करायचे. मग काय, करूया आपणही. हा, आता इतरही कारणं असतात, म्हणजे आपलं नातं जाहीर केलं की ते जास्त पक्कं होतं वगैरे पण मला मनापासून वाटतं की खरं कारण वेगळंच असावं. लग्न हा एक संसर्गजन्य रोग आहे, जांभईसारखा. मात्र जांभया पटापट पसरतात तर लग्नाची लागण आईवडलांकडून झाल्यावर ते जंतू बराच काळ सुप्तपणे आपल्या मनात राहातात. विशिष्ट वय झालं की त्यांची झपाट्याने वाढ होते. आणि मग एके दिवशी अचानक हॉल बुक करणं, लोकांना पत्रिका पाठवणं आणि लग्नासाठी एकदाच घालून मग कपाटात ठेवून देण्याचा पोशाख विकत घेईपर्यंत पाळी जाते.

काय त‌र‌ त‌त्व‌द्न्यान‌ Smile
निवांत‌वेळी कॉफीचे घुट‌के घेत‌ आरामात‌ वाच‌त‌ ब‌साय‌ला म‌स्त‌ आहे लेख‌

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोगस लेख!
लग्न ही एक कालबाह्य संस्था आहे हे मान्य, पण तिची तुलना केस उपटून काढण्याशी करणं हे थिल्लर आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख‌काला आयत्यावेळी केस उप‌टाय‌चं उदाह‌र‌ण‌च आठ‌व‌लं असेल ओ, चालाय‌चंच‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम‌च्या वेळेस‌, लिव इन‌, न‌व्ह‌तं. नाहीत‌र‌, ल‌ग्न‌ क‌र‌ण्याआधी, न‌क्कीच‌ तो अनुभ‌व‌ घेत‌ला अस‌ता.
बाकी ल‌ग्न‌ क‌र‌णं/ न क‌र‌णं आणि ल‌ग्न‌ क‌शा प‌द्ध‌तीने क‌र‌णं, या दोन‌ मुद्यांपैकी क‌शाचं वेटेज जास्त‌, यांत लेख गंड‌लेला वाट‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

जवळ कुठचाही इतर आवाज चालू असेल तर त्याकडे लक्ष देतो. मग त्याच्या बोलण्याकडे, मग पुन्हा त्या आवाजाकडे. हळूहळू माझ्या डोक्यात एक प्रचंड गोंधळ होतो, आणि कान माझ्याविरुद्ध बंड करून उठतात. ही अवस्था फार छान असते. त्यामुळे ऐकू येतंही आणि नाहीही.

हाय‌ला! म‌ला वाटाय‌चं मी एक‌टाच किती हुष्षार ज्याला ही आय‌डिया सुच‌लीये. मी निय‌मित‌प‌णे हे क‌र‌तो. Blum 3
म‌स्त खुस‌खुशीत लेख. ज‌ब‌र‌द‌स्त पंचेस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************