Skip to main content

टप्पा

दर थोड्या वर्षांनी असा एक टप्पा येतो, जेव्हा पुस्तकं, माहिती, माणसं, घटना आणि आपण यांच्यातले संबंध एखाद्या गजबजलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यासारखे किंवा सकाळी साडेनवाच्या सुमारास वाहणार्‍या दादर स्टेशनमधल्या मिडल ब्रिजसारखे असतात. चहू बाजूंनी अंगावर गोष्टी आदळत असतात. आपण दोन्ही हातांनी, पायांनी, डोळ्यांनी, तोंडानं, कानांनी, मेंदूनं - सगळ्या शरीरामनासकट - गोष्टी परतवत-स्वीकारत-शोषत-परावर्तित करत असतो. बाहेरून पाहणार्‍याची नजर एखाद्या पाश्चात्त्य जगातल्या निरीक्षकानं भारतीय केऑसकडे पाहावी तशी. 'इट रिअली फंक्शन्स!' अशा आश्चर्यासह विस्फारलेली. वरकरणी दिसणार्‍या बेशिस्तीनं भांबावलेली.

पण आपण बेखबर.

आपल्यात आणि जगात एक धुंदावणारी लय सांधलेली असते. कप्पेकरण आणि चर्वितचर्वण आणि प्रक्रिया आणि मतनिश्चिती यांसारख्या रवंथ करण्याजोग्या, श्वास टाकून-मागे रेलून शांतपणे करण्याच्या गोष्टी मुकाट मागे ओळ करून संथ झुलत उभ्या असतात. रंगमंचाच्या पुढच्या भागात मात्र लयबद्ध वेगवान हालचाल आकारत असते.

या टप्प्यात मजेमजेशीर गोष्टी घडतात. दीर्घकालीन आणि जवळचे मित्र मिळून जातात. अगदी जिवाजवळचे नाही - पण जवळचे म्हणता यावेत असे, आणि ज्यांना दीर्घ काळानंतर भेटल्यावरही आपला चेहरा उगाच उजळून निघतो असेही मित्र याच काळात भेटत जातात. पुढच्या निवांत काळासाठी आठवणींची बेगमी होण्याचा हा टप्पा. या काळात एखादा तरी नवा विक्षिप्त छंद जडतो. त्याच्या काठाकाठानं काही मुलखावेगळ्या गोष्टी डोक्यात साचून येतात. खास आपली म्हणावी अशी एखादी आचरट आणि क्रिएटिव थेरी जन्माला येते. एरवीचे छंद आणि दिनक्रम आणि व्यवस्था गप बॅकफूटला जातात आणि नव्या बाहुल्यांसाठी भातुकलीत आपसुख जागा तयार होत जाते. यातच एक लखलखतं तीव्र प्रेमप्रकरण घडतं हे सांगायला नकोच. या काळात ऐकलेल्या सगळ्या गाण्यांची, पाहिलेल्या सिनेमे-नाटकं-सिर्यलींची, वाचलेल्या पुस्तकांची आणि लिहिलेल्या सुरस गोष्टी-कवितांची गुंफणी या प्रेमाच्या माणसाभोवती होते आणि हे गोफ आपल्या माइन्ड पॅलेसच्या तळघरात सुखरूप रवाना होतात. या सगळ्या गोष्टींना त्या त्या काळाचा आणि माणसांचा एक विवक्षित तीव्र गंध असतो. पुढे जेव्हा कधी तळघरात शिरणं होतं, तेव्हा तो गंध क्षणार्धात आपल्याला ऍपरेट करतो आणि अल्लाद त्या दिवसांत नेऊन सोडतो...

हा टप्पा ओसरत जातो, तो वाजत गाजत नव्हे. मुंबईतला पाऊस जसा टप्प्याटप्प्यानं आणि माघारीची चाहूल लागू न देता, कुशल राजकारणी माघार घेत अंतर्धान पावतो, तसाच हा टप्पा काढता पाय घेतो. करण्याजोगी असंख्य कामं नाहीत, कुणाला 'नाही' म्हणायमधली पंचाईत भेडसावत नाही आणि आजूबाजूला थबक-थबक साचलेलं रूटिन असूनही आपल्याला फारसा कंटाळाही येत नाही हे जाणवतं, तोवर आपण चक्क नियमितपणे व्यायामही करायला लागलेले असतो आणि जागरणं टाळायलाही. मग फिल्मी पद्धतीत मागेबिगे वळूनबिळून पाहताना 'आपण असे वागलो?' असा एक नवाच कौतुकमिश्रित अचंबा दाटत राहतो आणि आपण पुन्हा थोडेथोडे बनचुके-शिस्तबद्ध-शिष्टाचारी आणि सभ्यबिभ्य होत वाट काटत राहतो.

पुढच्या वळणावर कुणीतरी 'भॉ' करीलच अशा सुप्त लबाड अपेक्षेसकट.

बादवे, शास्त्रीय संगीतात टप्प्याचं वर्णन कसं करतात ठाऊके? 'टप्पा की विशेषता है इसमें लिए जानेवाले ऊर्जावान तान और असमान लयबद्ध लहज़े...' द्या टाळी!

(पूर्वप्रकाशित. ;-))

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

जयदीप चिपलकट्टी Mon, 28/09/2015 - 20:36

> कप्पेकरण आणि चर्वितचर्वण आणि प्रक्रिया आणि मतनिश्चिती यांसारख्या रवंथ करण्याजोग्या, श्वास टाकून-मागे रेलून शांतपणे करण्याच्या गोष्टी मुकाट मागे ओळ करून संथ झुलत उभ्या असतात. रंगमंचाच्या पुढच्या भागात मात्र लयबद्ध वेगवान हालचाल आकारत असते.

सावधान. रात्र वैऱ्याची आहे.

मेघना भुस्कुटे Mon, 28/09/2015 - 21:47

In reply to by जयदीप चिपलकट्टी

कुणासाठी? ;-)

राजन बापट Thu, 01/10/2015 - 21:06

In reply to by मेघना भुस्कुटे

>>.... शांतपणे करण्याच्या गोष्टी मुकाट मागे ओळ करून संथ झुलत उभ्या असतात. रंगमंचाच्या पुढच्या भागात मात्र लयबद्ध वेगवान हालचाल आकारत असते.

"श्री गणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामण हरी.."ची आठवण.

पिवळा डांबिस Mon, 28/09/2015 - 22:06

अर्थात मेघनाच्या लिखाणाचे आम्ही पूर्वीपासूनच फॅन आहोत...

मागेबिगे वळूनबिळून पाहताना 'आपण असे वागलो?' असा एक नवाच कौतुकमिश्रित अचंबा दाटत राहतो

एक साधी गोष्ट.
दोन आठवड्यांपूर्वी नंदन माझ्याकडे आला होता. नेहमीप्रमाणे मैफिल जमवली आणि शिवासच्या साथीने गप्पा सुरू झाल्या...
मध्येच कधीतरी जेवण झालं, एक बाटली संपली म्हणून दुसरी फोडली,गप्पा चालूच.
आमच्या गप्पा म्हणजे काय अगदी जागतिक अर्थ-राजकारणापासून ते ऐसी अक्षरेच्या सभासदांपर्यंत पसरलेल्या असतात! ;)
वेळेचं भान राहिलं नाही. शेवटी माझे सासरे, बहुदा पाणी पिण्यासाठी, त्यांच्या खोलीतून आले आणि आम्हांला पहाताच 'गुड मॉर्निंग' म्हणाले!
तेंव्हा घड्याळाकडे पाहिलं आणि, "अरे नंद्या, तीन वाजून गेले!!!"
:)
पूर्वी मी असा पार्ट्या-गप्पांमध्ये जागत असे पण आता वयानुसार बारा-साडेबारा वाजले की शरीर आवरतं घ्यायच्या आंतरिक सूचना द्यायला लागतं..
किंबहुना बर्‍याच वर्षांनी हा असा आगोचरेपणा केला! नंतर माझं मलाच नवल वाटलं!

आपण पुन्हा थोडेथोडे बनचुके-शिस्तबद्ध-शिष्टाचारी आणि सभ्यबिभ्य होत वाट काटत राहतो.

हे बाकी कठीण आहे.
कारण आता या वीकेंडला मी नंदनकडे जातोय!!
;)

अस्वल Mon, 28/09/2015 - 23:46

बाप रे! म्हणजे, चांगल्या अर्थाने बाप रे!
इतक्या कमी शब्दांत बरंच काही मांडलं आहे! मित्रमंडळी, खास ग्रूप्स, उगाच जागवलेल्या रात्री, सामूहिक मूर्खपणा, नसते उद्योग आणि "आयला, तेव्हा काही करायचो आपण" वालं फीलिंग शिवाय बरंच काही.
का कोण जाणे, पण हे वाचून मला पु.लंच्या "चाळशी" ह्या लेखाची आठवण आली :-B

राही Tue, 29/09/2015 - 00:58

टप्पा झाला. आता धृपद-धमाराची धमाल पखवाजी केव्हा?
गौरीची उपमा चोरून : सुंदर, जड गालिचा हळुवारपणे अंथरता अंथरता दुसर्‍या टोकाकडून गुंडाळण्याची वेळ येऊन ठेपते.

अंतराआनंद Tue, 29/09/2015 - 10:15

फारच सुंदर आणि

आपल्यात आणि जगात एक धुंदावणारी लय सांधलेली असते. कप्पेकरण आणि चर्वितचर्वण आणि प्रक्रिया आणि मतनिश्चिती यांसारख्या रवंथ करण्याजोग्या, श्वास टाकून-मागे रेलून शांतपणे करण्याच्या गोष्टी मुकाट मागे ओळ करून संथ झुलत उभ्या असतात. रंगमंचाच्या पुढच्या भागात मात्र लयबद्ध वेगवान हालचाल आकारत असते.

हे तर थोरच.

असे अनेक टप्पे आठवून एक आवंढा आला. अगदी जवळचा म्हणजे मुलगी सहा महिन्यांची असताना मी, नवरा आणि आमचं एक मित्र जोडपं असे सगळे रायगडला गेलो होतो तो. मुलगी रात्रीही माझ्याशिवाय आजीकडे न रडता राहू शकत होती पण आजीलाच माझं जाणं पटत नव्ह्तं. त्यामुळे मनात अपराधी भावनाही होती. पण तिथे रात्री फिरताना, कसलीही पूर्वतयारी न करता गेल्यानं पुढ्यात आलेलं पोहे आम्लेट खाताना आणि जागत गप्पा मारताना ते अपराधीपण पुसलं गेलं. आल्यावर "काही त्रास दिला नाही हिने" हे ऐकत मुलीला जवळ घेतलं तेव्हा जी काही माया दाटून आली की बस्स.
असंच मध्येच कधी कधी गाण्याच्या मैफिलीलाही जायचो, "क्स्काय बुवा ही.. " कडे दुर्लक्ष करत.

तो टप्पा आपणहूनच पुढील धकाधकीत हळूहळू आपसूकच विरघळून गेला. पण शुची म्हणते तसं वरचेवर असे टप्पे येतच रहातात.

सुंदरच लिहील आहेस. शेवटही छान केलायस.

मेघना भुस्कुटे Tue, 29/09/2015 - 11:15

ढेरेशास्त्री आणि अंतरा, आभार.

अंतरा, हे अगदीच नॉर्मल आहे! (यावरून आठवलेलं ठार अवांतर: 'घरी आल्यावर दाराला कुलूप असलेलं आवडत नाही, आई घरात हवी'छाप ओशट तक्रारी करणार्‍या लोकांचा आसपास भरणा होता. त्यावर मी आणि माझी एक समसुखी मैत्रीण दात काढून हसत असू. कारण आम्हांला कुलुपं लावून बाहेर पडायची नि कुलुपं काढून घरात शिरायची, आईबाप नसलेल्या घरात निवांत वाट्टेल ते उद्योग करायची सवय.) माझ्या एका मित्राची सध्याची तक्रार उलटीच. त्याची बायको त्यांच्या ताज्या लेकाला सोडून घराबाहेर पाऊल टाकायला तयार नाही. मुलाचं प्रेमबिम-लळाबिळा त्यालाही खूपच आहे. पण हे असं पुरतं घरकोंबडं होणं बिचार्‍याला काही केल्या झेपत नाहीय.

बाकी या स्फुटाबद्दलः मला मुद्दामहून करून पाहायचं होतं ते असं की, शक्यतोवर निराळ्या उपमा आणि संज्ञा वापरायच्या. शहरी - तथाकथित वगैरे आधुनिक - न रुळलेल्या. तरी हे १०० टक्के शक्य होत नाही. आपल्याला मोहक वाटणार्‍या, आपल्या सवयीच्या, क्लिशेड् म्हणाव्यात अशा काही पारंपरिक गोष्टी त्यात हट्टानं डोकावतातच, हा धडा.

मनीषा Tue, 29/09/2015 - 17:18

टप्प्या टप्प्याने उलगडत जाणारा लेख आवडला.

असे अनेक टप्पे आले, गेले. काही अचानक संपले , काही नको तिततके लांबले.
त्यामुळेच आयुष्याला गती मिळाली .
सध्या ठाय लयीत आयुष्य चालू आहे. पण तरी ती चांगली का वाईट हे ठरवायची उसंत मिळत नाहीये.

राही Wed, 30/09/2015 - 11:52

In reply to by मनीषा

ठाय लय जपणं अवघडच.
काही लोक अगदी सुपर फास्ट एक्सप्रेस किंवा नॉन स्टॉप १८ तास विमानातून धावत असतानाही ठाय लय पकडून असतात. विलंबित धा धिन धिन धा असलं तरी समेवर चुकत नाहीत. त्यांना दंडवत.

घनु Wed, 30/09/2015 - 12:37

छान लिहिलं आहे.
सध्याच्या टप्प्यात बर्‍याच गोष्टी नव्याने समजल्या, स्वतःची ओळख नव्याने झाली असं म्हणायला हरकत नाही म्हणून आयुष्यातल्या ह्या टप्प्याचे विशेष आभार! :)

राजन बापट Thu, 01/10/2015 - 20:58

लिखाण आवडलं.
अ‍ॅपरेट या क्रियापदाचा वापर मराठीमधे पहिल्यांदा वाचला. तो वाचताना मौज वाटली. त्या वापरामुळे हे मराठी लिखाण वाचताना एकदम क्षणभर रोलिंगबाईंच्या पुस्तकांमधे अ‍ॅपरेट झाल्याचा भास झाला ;)