कोर्टटिपा..

कोर्टरूम या बॉलिवूडमधल्या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर "कटहरे में खडा रेह के" अनेक भल्याबुर्‍या लोकांच्या आयुष्याचे फैसले होत असतात. काहीवेळा बाइज्जत बरी तर काहीवेळा मिलॉर्डच्या पेनाचं निब मोडून कांडकं पाडलं जातं.

मुळात सिनेमात असल्याने केस कोर्टात झटपट उभी राहून झरझर चालते..

भिंतीवरची गांधीजी, गांधारी बनून हातात तराजू धरुन ताटकळणारी न्यायदेवता आणि सईदजाफरीछाप न्यायाधीश हे निकाल लावण्यासाठी पूर्ण सक्षम आहेतच.. पण तरीही.. फार्फार सिनेमे डोळ्यांची निरांजने करुन बघितल्यानंतर मला असं वाटलं की बॉलीकोर्टात काम करणारे वकील, न्यायाधीश, साक्षीदार, आणि अगदी गुन्हेगारांनाही जर मीही काही कळकळीच्या सूचना केल्या तर कोर्टाच्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी दीर्घकालीन उपयोगाचं ठरेल.

सर्वांना मिळूनच टिपा देतोय.

१. कोर्टात कितीही बारक्या गुन्ह्यात तुम्ही फसलेले असाल तरी "कधीच मात न खाणारा", "गेली अनेक वर्षं एकही केस न हरलेला", "शहरातला एक नंबरचा" असा वकील कधीही घेऊ नये. तो नेहमी हरतो.

२. गेली दहापंधरा वर्षं वकिली सोडलेला भणंग व्यसनी वकील किंवा नव्याने एलेल्बी केलेला तरुण तडफदार देखणा वकील निवडावा. हे जिंकतात.

३. सरकारी वकील घेऊ नये. हे हरण्यासाठी पैसे घेतात.

४. वकील म्हणून जी व्यक्ती निवडाल ती व्यक्ती पूर्वी कधीतरी सध्याच्या खटल्यातील आरोपीच्या कृष्णकृत्यांचा थेट बळी ठरलेली असली तर फार प्राधान्य द्या अशा व्यक्तीला. आरोपीकडून आपल्या तरुण तडफदार वकिलावर किंवा त्याच्या आयाबहिणींवर थेट अत्याचार झालेला नसला तर मग निदान पलीकडच्या पार्टीच्या अजिंक्य वकीलाकडून ज्याच्या वडिलांना बदनाम करुन तुरुंगात पाठवले गेले आहे असा तरुण उत्तम.

वाक्यं कॉम्प्लिकेटेड पडलं असावं. उदाहरणं घेऊन अधिक स्पष्ट करु.

-तुम्ही फिर्यादी आहात.

-प्रलयनाथ या शहरातल्या डॉनवर खटला चालू आहे.

-ठकराल हा शहरातला अजिंक्य वकील आहे. (हा तुम्हाला लाभणार नाही कारण तो प्रलयनाथचा डिफॉल्ट वकील असेल.)

अशा परिस्थितीत तुमच्यासाठी खालील सर्व कँडिडेटस् वकील म्हणून उत्तम आहेत:

अ. प्रलयनाथची स्वभावाने चांगली,भांगेत तुळस अशी मुलगी.
ब. ठकरालची सत्याची बाजू बळकट धरणारी तरुण देखणी वकील पोरगी
क. पंधरा वर्षांपूर्वी ठकरालकडून स्वतःच्या वडिलांची/ बहिणीची केस लढवताना हार खाऊन अज्ञातवासात गेलेला एक दारुडा
ड. प्रलयनाथने बलात्कार केलेली एखादी तरुणी.

यापैकी कोणी एकजण तरी पेशाने वकील असतंच. त्याची काळजी नसावी.

४. सत्यपक्षाच्या वकीलांसाठी एक महत्वाची सूचना. तुमचा साक्षीदार मुंबईतच रहात असला आणि केस मुंबई हायकोर्टात चालू असली तरी कोर्टाला जाण्याचा रस्ता नेहमीच जंगलातून जातो हे लक्षात घ्या. वाटेत निर्मनुष्य घाटही लागत असतात हे लक्षात घेऊन साक्षीदाराला आपल्या विश्वासू अब्दुलचाचांसोबत एकटेच रिक्षाने कोर्टात यायला न सांगता शक्यतो स्वतःबरोबर कोर्टात घेऊन या. कोर्ट दहा वाजता उघडत असेल तर आठापासूनच लोकल ट्रेन किंवा ब्येस्टची बस अशा सार्वजनिक आणि गर्दीने भरलेल्या वाहनाने कोर्टात येऊन वाट पहात बसा. म्हणजे तुमचा साक्षीदार कोर्टात न पोचल्याने "अदालत का वक्त बरबाद" होण्याची किंवा "तारीख पे तारीख" असं भाषण झोडून पाळणा लांबवावा तशी वेळ लांबवण्याची वेळ येणार नाही. शिवाय अब्दुलचाचांचा जीवही वाचेल.

५. सत्यपक्षाच्या वकीलांनो: तुम्ही एक कार्डिअ‍ॅक सर्जन अँब्युलन्ससहित आणि सॉर्बिट्रेटच्या गोळ्यांची बाटली इतकी सोय कोर्टमधेच करुन ठेवावी अशी एक सूचना आहे. त्यामुळे आरोपी आणि त्याचे वकील यांना योग्यवेळी येणार्‍या हृ.वि.झ. वर तातडीने उपाय करता येईल.

६. सत्यपक्षाच्या वकीलांनो: तुम्ही स्वतः जातीने एक रक्ताने लडबडलेलं हत्यार प्लॅस्टिक पिशवीत घालून सोबत बाळगावं. "खुनाचं हत्यार सापडलं आहे मिलॉर्ड.." असं सनसनीखेज विधान करुन उल्लेखित हत्यार वर करुन दाखवल्यास आरोपी किंवा त्याचे दहा वर्षं अजिंक्य असलेले काबिल वकील यांपैकी एकजण घामाने डबडबून "हे हत्यार मी वापरलंच नव्हतं.." असं ओरडून जीभ चावण्याची बरीच शक्यता असते. मग तुम्हाला "दॅट्स ऑल मिलॉर्ड.." म्हणून बसता येईल.

७. सत्यपक्षाच्या साक्षीदारांनो. तुम्ही साक्ष देण्यासाठी कोर्टात पोचाल तेव्हा जबरदस्त खिळखिळ्या आणि काळ्यानिळ्या अवस्थेत असाल. तेव्हा तिथे पोचताक्षणीच कटहर्‍यात घुसा. झटपट शपथ घ्या आणि आरोपीकडे थेट बोट दाखवून तो दोषी आहे हे पहिलं वाक्यं म्हणा. होतं काय की तुम्ही आलेले असता मरायच्या टेकीला. अशात मग तुम्ही प्रेमाची आणि देशभक्तीची भाषणं आधी करत बसलात तर नेमकं प्रत्यक्ष आरोपीचं नाव घेण्याच्या क्षणीच तुमची दातखीळ बसेल आणि डोळे मिटतील.. मग आरोपी बाइज्जत बरी होईल. एवढा मार खाऊन कोर्टात पोचलात ना? मग ते ठरवलेलं काम पूर्ण करुन टाकत जा.

८. कोर्टातील पोलीसहो: घोंगडी किंवा बुरखा घेऊन कोणालाही कोर्टात बसू देऊ नका. अशी व्यक्ती उपरिनिर्दिष्ट साक्षीदाराच्या सत्यकथनाच्या ऐनक्षणी घोंगडी फेकून देते आणि आत लपवलेल्या पिस्तुलाने साक्षीदाराच्या कपाळी गोळी घालते. आधीच काळजी घ्या. मुंबईतल्या उकाड्यात मरायला घोंगडी लागतेय कशाला?

९. असत्यपक्षाचे साक्षीदारहो.. (भ्रष्ट पोलीस, पैसे खाऊन खोटा मेडिकल रिपोर्ट देणारे डॉक्टर इ.इ.) तुम्ही खोटी साक्ष देताय हे लक्षात ठेवा. अशा वेळी पांचट विनोद आणि ओव्हरअ‍ॅक्टिंग कटाक्षाने टाळा. अतिउत्साह हा तर अशावेळी शत्रूच. तुम्हाला सत्यपक्षाचा वकील जेवढा प्रश्न विचारेल तेवढंच उत्तर द्या.. अघळपघळ बोलाल तर शब्दात अडकाल किंवा मग "आपको जो सवाल पूछा जाये, सिर्फ उसीका जवाब दिजीए मिस्टर नारंग." असं कडाडलेलं ऐकून घ्यावं लागेल. शिवाय तुम्ही भ्रष्ट अधिकारी आहात, त्यामुळे तुमची पोरगी सत्यपक्षाला सामील आहे हे आधीच ओळखून ठेवा. ती कार्टी तुम्हाला शंभर टक्के तोंडघशी पाडणार.

१०. दोन्ही पक्षांचे वकीलहो: समोरच्या वकीलाच्या तिसर्‍या किंवा चौथ्या प्रश्नाला "ऑब्जेक्शन" न घेतल्यास फाऊल धरतात. तेव्हा ही वेळ चुकवू नये. काही सुचलं नाही तर "काबिल वकील अ‍ॅडव्होकेट ठकराल मेरे विटनेस को गुमराह करने की कोशिश कर रहे है" वगैरे म्हणता येईल.

११. किमान चार ते पाच विरोधी साक्षीदारांच्या साक्षीनंतर आपल्या अशिलाचा चेहरा वितळलेल्या मेणासारखा पडत चालला असला तरी आपण मंद आश्वासक स्मित करत आपल्याला काहीही प्रश्न विचारायचे नाहीत असं म्हणत रहावं. पुरेसा तणाव निर्माण झाल्यावर मग शेवटच्या साक्षीदाराला फाडावा.

सर्वात शेवटचं आणि महत्वाचं. सर्व पार्टीजना जी काही डायलॉगबाजी करायची आहे आणि सामाजिक संदेश द्यायचे आहेत ते कोर्टरुमच्या आत देऊन संपवा. कारण हा शेवटचा सीन असणार आहे. केस जिंकून पुढच्या सीनमधेच हिरो हिरॉईन सार्‍या जगाला कोलून थेट गाण्यात शिरुन फ्रीझ होणार आहेत. तस्मात कोणताही आशयघन मुद्दा मांडायला मिलॉर्डच्या निकालानंतर अवसर राहणार नाही..

................

field_vote: 
4.166665
Your rating: None Average: 4.2 (6 votes)

प्रतिक्रिया

देखणा वकील, जंगलातून जाणारा रस्ता व नंतरचे सर्व पॉईण्ट्स धमाल आहेत, जबरी आवडले ते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि, तुमच्या मुद्द्यांकडे लक्ष देऊन इथे कोणाला आर्ट फिल्म्स बनवायची आहे का उच्चभ्रू समीक्षकांना इंप्रेस करायचं आहे? तुम्ही उगाच विदेशी फिल्मा पाहून आमच्या 'मातीतल्या' फिल्लमवाल्यांना कैच्याकै सूचना देऊ नका. आणि हो, मुद्दा क्रमांक चार दोनदा घालण्याचं कारण काय? चांगले डझनभर मुद्दे द्यायचे सोडून ११ आकडा मारूतीला इंप्रेस करण्यासाठी का?

असो. फार शाईन मारली. आता खरी प्रतिक्रिया .... देखणा वकील, जंगलाचा रस्ता, अब्दुलचाचा, "मुंबईतल्या उकाड्यात मरायला लागणारी घोंगडी" वगैरे मुद्दे महानच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे सुकून से वाचेन असं ठरवलं होतं त्याचं चीज झालं. सगळ्या सूचना एकापेक्षा एक अव्वल आहेत. या चौदा भाषांत भाषांतर करून हिंदी सिनेमातल्या प्रत्येक न्यायालयात फ्रेम करून लावण्याचा नियम केला जावा अशी मी बॉलिवु़डला सूचना करेन.

४. वकील म्हणून जी व्यक्ती निवडाल ती व्यक्ती पूर्वी कधीतरी सध्याच्या खटल्यातील आरोपीच्या कृष्णकृत्यांचा थेट बळी ठरलेली असली तर फार प्राधान्य द्या अशा व्यक्तीला
६. सत्यपक्षाच्या वकीलांनो: तुम्ही स्वतः जातीने एक रक्ताने लडबडलेलं हत्यार प्लॅस्टिक पिशवीत घालून सोबत बाळगावं.

एवढा मार खाऊन कोर्टात पोचलात ना? मग ते ठरवलेलं काम पूर्ण करुन टाकत जा.

हे मस्तच. मात्र

कोर्ट दहा वाजता उघडत असेल तर आठापासूनच लोकल ट्रेन किंवा ब्येस्टची बस अशा सार्वजनिक आणि गर्दीने भरलेल्या वाहनाने कोर्टात येऊन वाट पहात बसा.

हे पटलं नाही. ट्रेनमधून लोंबकळताना हाताला बिडीचा चटका लागला तर साक्षीदार ट्रेनमधून पडून मरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला म्हणतात अभ्यास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धागा वर आलेला असला तरीही या लेखनास 'सोटा' लावता येणार नाही असं लक्षात आल्यामुळे घोर निराशा झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अफलातून सेन्स ऑफ ह्यूमर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि राँक्स अँज युज्वल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

बॉलीवूडच्या उसवलेल्या कोर्-टा ला लावलेल्या टिपा आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

धागा वर काढीत आहे. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

च्यायला! मी का नव्हता वाचला हा धागा? हिटोहिट आहे हा. पण एक मात्र आहे. तुम्हीही माझ्यासारखे 'दामिनी'मुळे प्रभावित आहात हां गवि. आपण अभ्यास थोऽऽडा वाढवायला पायजेलाय. बाकीही अभ्यासू लोकांना आवाहन....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मिलॉर्ड जर जाड भिंगाचा असेल तर, तो ऑर्डर्,ऑर्डर असे ओरडून जो हातोडा आपटतो, त्या टेबलावर दिवाळीतल्या केपच्या टिकल्या पसरुन ठेवा, म्हणजे कोर्टात क्षणार्धात 'ऑर्डर' प्रस्थापित होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो ऑर्डर्,ऑर्डर असे ओरडून जो हातोडा आपटतो,

लहानपणी चांभारा कडे गेल्यावर जेव्हा तो चप्पल/बूट शिवून झाल्यावर त्या चुकांवर (छोटे खिळे) किंवा शिलाईवर हतोडीने ठोकायचा तेव्हा वाटायचं, अरे हा इथे काय करतोय ह्याला कोर्टात बसवा मिलॉर्ड च्या खुर्चीवर, चांगलीच आपटतोय की हातोडी. (कारण बॉलिवूड सिनेमात मिलॉर्ड च काम फक्त ऑर्डर ऑर्डर म्हणत हतोडा मरायचं एवढंच असतं.. मग आमचे चांभार भाऊ का नकोत तिथे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छानच की.
ते जुन्या सिनेम्यात ताज़िराते हिंद, दफा ४२०, सजाए मौत ऐकायला मजा यायची. आता भारतीय दंडविधान धारा ४२० वगैरे अगदी बुळबुळीत वाटतं. तसंच कुठल्याही वकीलाने समोरच्या वकीलाला 'मेरे फाज़िल दोस्त' आणि 'मेरे काबिल दोस्त' असं एकदा तरी म्हटलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा ROFL हा धागा नव्हता वाचला. वर काढल्याबद्दल, थँक्स मेघना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धमाल धागा आहे. प्रचंड अभ्यास वाक्यावाक्यातून कळतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याही नजरेतून सुटला होता हा धागा!
धमाल आहे.
टीप क्र. १ लाच फुटलो.
आणि नंतर मग हळूहळू टीप क्र. ११ पर्यंत पाताळविजयमचा राक्षस झालो!!!
ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि नंतर मग हळूहळू टीप क्र. ११ पर्यंत पाताळविजयमचा राक्षस झालो!!!

आता समजलं ना लोकांना तुम्ही एरवी कसा त्रास देता ते! Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जबरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0