Skip to main content

उस्ताद बहाउद्दीन डागर यांच्याशी संवाद

संवाद नव्वदोत्तरी समकालीन

उस्ताद बहाउद्दीन डागर यांच्याशी संवाद

शब्दांकन - ऐसी अक्षरे


नव्वदोत्तर काळ आणि समकालीनता अधिक समजून घेण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या काही व्यक्तींसाठी आम्ही एक प्रश्नावली तयार केली होती. त्यांच्याशी बोली किंवा लेखी संवाद साधून त्या प्रश्नावलीची त्यांनी दिलेली उत्तरं आम्ही अंकासाठी संकलित केली आहेत.

उस्ताद बहाउद्दीन डागर भारतीय संगीतातल्या धृपद परंपरेतल्या सुप्रसिद्ध डागर घराण्याचे प्रतिनिधी आहेत. ते रुद्रवीणावादक आहेत.

'समकालीन' असं काही असतं का? तुमच्या मते कशाला समकालीन म्हणता यावं?

माझ्या मते समकालीन ही वस्तुतः सतत बदलत असणारी गोष्ट आहे. ते एखाद्या घराण्याचा भाग असणं त्यासाठी गरजेचं नाही. पण एखाद्या चौकटीमध्ये असो किंवा चौकटीशिवाय, तुमचं काम सतत उत्क्रांत होत राहणं मात्र गरजेचं आहे. ते एखाद्या विचारसरणीतून जन्माला आलेलं असलं पाहिजे आणि एखाद्या विचारसरणीचा विस्तार म्हणून होत असलं पाहिजे. तुमचं काम ज्यातून जन्म घेतं असं एक बीज त्याच्या मुळाशी असलं पाहिजे; अणि त्याचा विस्तार पुढे कसा होऊ शकेल ह्यासाठी, किंवा पुढे त्यात साचलेपण येऊ नये ह्यासाठी त्यामागे काही एक दृष्टी असली पाहिजे. शिवाय, काळाच्या कसोटीवर ते उतरणारं असलं पाहिजे. जे थोड्या काळानंतर कोसळतं त्या कामाला समकालीन म्हणता येणार नाही. उदाहरण द्यायचं झालं, तर कालिदासाचं लेखन समकालीन आहे. ते महान कलाकृतीचं उदाहरण आहे आणि नवोदितांसाठी त्याला आजही संदर्भमूल्य आहे. इथे कलेपासून कलाकाराला विलग करता येणं निव्वळ अशक्य आहे. पण त्याचवेळी हे लक्षात घेतलं पाहिजे की मर्यादा कलेला नसतात; केवळ कलाकारांना असतात. त्यामुळे जो वाईट पद्धतीनं कलेचा आविष्कार करतो तो कलाकार वाईट असतो.

माझी परंपराबद्ध पार्श्वभूमी पाहता ‘समकालीन’ हा शब्द अधिकच महत्त्वाचा होतो. जर माझं काम समकालीन होऊ शकलं नाही तर माझ्या संपूर्ण परंपरेचं अस्तित्त्वच गोठून जातं; म्हणजे मग माझ्या कलेची वाढ कोणत्या दिशेनं व्हावी ह्याचं अर्थनिर्णयन करण्यात आणि सद्यकालात आपलं अस्तित्व टिकवून धरण्यात ती अयशस्वी ठरते. थोडक्यात सांगायचं तर त्या घाटाचाच मृत्यू होतो! साधारणतः अश्या वेळी लोक काहीतरी पूर्णपणे वेगळं काम नवं म्हणून करतात आणि त्याला ‘समकालीन’ म्हणतात. पण पुन्हा ‘स्व’शी किंवा ‘इतरा’शी संवाद साधल्याशिवाय हे ‘समकालीनत्व’ साध्य करणं शक्य नाही. त्यासाठी उदाहरण म्हणून चित्रकार सैय्यद हैदर रझा आणि अकबर पदमसी ह्यांच्याकडे बघता येईल. त्यांनी भारतीय कला आणि संस्कृती समजून घेतली; आणि मग इतिहास, वर्तमान आणि भविष्य ह्यांची वीण स्वतःच्या अभिव्यक्तीमध्ये गुंफली. अनेक पैलूंमुळे हे शक्य झालं. आपण त्यांची कला समकालीन म्हणून बघतो. पण आपल्याला त्यांच्या कामात जे अर्थनिर्णयन दिसतं तिथवर पोहोचण्यामागे त्यांचा काही एक विचार आहे.


'नव्वदोत्तरी' वास्तव किंवा संवेदना आधीच्या वास्तवाहून किंवा संवेदनांहून वेगळ्या होत्या का? त्यात जर वेगळेपणा होता तर तो कशा प्रकारचा होता? एखादी कलाकृती समोर आल्यावर ती 'नव्वदोत्तरी' आहे हे ठरवायला ह्या वेगळेपणाचा कसा उपयोग होऊ शकेल?

पूर्वी विदेशी संस्कृतीशी व कलांशी आपला कमीत कमी संपर्क येई. त्यामुळे तेव्हा राष्ट्र म्हणून आपण बद्ध होतो. मग नव्वदच्या दशकात भारतीय अर्थकारणात उदारीकरण झालं; माझ्या अंदाजाने त्याचा परिणाम म्हणून भारतीय उपखंडात एक मोठा विस्फोट झाला : ‘पॉप कल्चर’, केबल टीव्ही आणि इंटरनेटची उपलब्धता ह्या सगळ्याकडे आणि सर्व कलामाध्यमांच्या व्यावसायिकीकरणाच्या दिशेने आपला प्रवास त्यातून सुरू झाला. त्यामुळे विविध प्रकारच्या कलाविष्कारांशी नि अभिव्यक्तींशी लोकांचा संपर्क होण्याची आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात विदेशी प्रभावही पडण्याची सोय झाली. असं सगळं आपल्या स्वतःच्याच देशात बघायला मिळणं आता शक्य झालं. परिणामी, ज्या पार्श्वभूमीमधून हे कलाविष्कार आले त्यांच्या आकलनाशिवायच काही लोक ह्या नव्या माध्यम/शैलीप्रकारांकडे वळले. काहींनी याकडे स्वतःचं कार्यक्षेत्र विस्तारण्याची संधी म्हणून पाहिलं खरं, पण बहुतेकांनी आपल्यातल्या त्रुटी ह्या खोट्या वास्तवाच्या भिंतीमागे दडवल्या. काहींनी तथाकथित बाजारात त्यांची उत्पादने विकण्यासाठीही याचा उपयोग केला. उदाहरणार्थ, या आर्थिक तेजीच्या काळात, बाजाराची मागणी पुरवण्यासाठी म्हणून अनेक प्रतिष्ठित चित्रकारांनी प्रचंड संख्येने चित्रं काढली नि ती प्रचंड किंमतींना विकली. मात्र, जेव्हा बाजारपेठ ह्या उत्पादनांनी भरून वाहू लागली तेव्हा मात्र ह्याच चित्रकारांना आपल्या मालासाठी रास्त किंमतही मिळाली नाही. त्याचप्रमाणे संगीतक्षेत्रातही बाजाराच्या मागणीच्या लहरींनुसार कलेच्या अटी आणि नियम फिरू लागले. आपल्या घाटाशी प्रामाणिक राहणारे, या नव्या माध्यमांमधल्या शक्यता धुंडाळून, आपल्या संचिताचा नव्या मार्गाने विचार करुन, त्यातून एका नव्या घाटाला जन्म देऊन आपल्या कलेला वृद्धिंगत करणारे कलाकार फार थोडे होते. प्रगतीच्या नव्या अर्थाला अनुसरताना स्थापत्यकलेमधल्या आणि चित्रकलेतल्या जुन्या विचारसरणींचा वेगाने र्‍हास होत गेला किंवा त्यांचं महत्त्व पूर्वीप्रमाणे राहिले नाही. अशा काळात आपल्या कलेला वृद्धिंगत करणाऱ्यांपैकी काही चित्रकार, स्थापत्यकार आणि संगीतकार जुने परंपरावादी होते, तर इतर काही सच्चे आधुनिक होते.

प्रत्येक कला एकतर खूप काळापूर्वी जन्माला आलेली आहे, किंवा तिच्यामागच्या विचारसरणीची मुळं भूतकाळात आहेत. नव्वदोत्तर काळात पूर्णपणे नवं असं काहीही जन्माला आलेलं नाही; त्यामुळे असं शुद्ध वर्गीकरण करणं पूर्णपणे शक्य नाही.


ही नवी संवेदना आणि वास्तव व्यक्त करण्यासाठी आधीची रुळलेली भाषा कमी पडली का? पडली असेल तर काही उदाहरणांनी ते स्पष्ट करता येईल का?

खर्‍या अर्थाने पाहिलं तर भाषा कधीच अपुरी नव्हती. भाषेत योग्य ते बदल करणं किंवा तिला शब्दशः अर्थाच्या पुढे घेऊन जाणं हा प्रश्न कायमचा आहे. आपल्या पारंपरिक कलाप्रकारांमध्ये लहानलहान बदल करत नव्या वाटा धुंडाळण्याचं काम आपण अजूनही करत असतो. उदा. ‘धृपद’मध्ये आजही ब्रजभाषा वापरत नव्या रचना केल्या जातात. ‘कुडीअट्टम’मध्ये अजूनही संस्कृत भाषेचं माध्यमच वापरलं जातं.


'नव्वदोत्तरी' वास्तव आणि संवेदना आताच्या काळातही वैध आहेत का? की आताचं वास्तव आणि संवेदना आणखी वेगळ्या आहेत? वेगळ्या असतील तर कशा?

कोणत्याही गोष्टीची वैधता काळानुसारच ठरत असते. आजच्या वास्तवाला आणि संवेदनांना आर्थिक मर्यादांच्या तालानुसार बदलणं भाग पडतं आहे. आपण त्याला किती महत्त्व द्यायचं हेच पाहणं अखेर गरजेचं आहे. मूल्यांचं आदानप्रदान करण्याच्या एकेकाळच्या आपल्या पद्धतीपेक्षा आजचं वास्तव बदलून ते आता ‘स्व’भोवती केंद्रित झालं आहे.

खऱ्या शिक्षणाचा अभाव, आपल्या कामाविषयीच्या चिकाटीचा अभाव आणि आपला आब राखण्यासाठी लागणाऱ्या चिकाटीचा अभाव यांमुळे लोक फक्त स्वतःचा विचार करू लागले आहेत, आणि आपला आर्थिक फायदा करून घेऊन त्यातून सुरक्षितता मिळवण्याचा विचार तेवढा करू लागले आहेत. पैसा महत्त्वाचा नाही असं मी म्हणत नाही. पण आपल्या विचारसरणीला, किंवा आपल्या कामाची काहीएक प्रतिष्ठा जपत उभारलेल्या आपल्या अस्तित्वालाच ज्यापायी आपण भिरकावून द्यावं, इतका काही पैसा महत्त्वाचा नाही. ह्यातून आपण आपली पुष्कळशी मूल्यं हरवून बसू. आणि त्यामुळे (कलेतलं आणि इतरही सगळ्या प्रकारचं) आपलं काम एकतर नष्ट होईल किंवा त्याचा दर्जा घसरून ते सुमार होईल. (ते होऊ नये म्हणून) आपलं वास्तव आणि आपल्या संवेदना यांच्यात समतोल साधण्याची जबाबदारी कलाकारावर आहे.


साहित्य, दृश्यकला, संगीत, नाटक, सिनेमा वगैरे कलांचा परस्परांशी संबंध असावा का? तो कसा असायला हवा? सध्याच्या काळात तो कसा आहे?

या सगळ्या कलाप्रकारांची वाढ होण्यासाठी त्यांच्यात परस्परसंबंध असला पाहिजे. ही नवीन कल्पना नाही; कलांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी, त्यांच्यात ताजेपणा आणि नावीन्य आणण्यासाठी प्रत्येक पिढी ही कल्पना राबवते. त्यातून कलांमध्ये नावीन्य, ताजेपण आलेलं आहे. पुनर्जन्म होण्याप्रमाणे ते आहे - जुन्याबरोबर नवं, नव्याचा एक भाग म्हणून जुनं आणि जुन्याचा नवा चेहेरा -असे सगळे हातात हात घेऊन नव्या अभिव्यक्तीला जन्म देतात.

आज हे फार थोड्या ठिकाणी शिल्लक आहे. द्वेष आणि व्यावसायिक ईर्ष्येने या परस्परसंबंधांचा बळी घेतला आहे. यातून कलांमधला संवाद नष्ट होत आहे. संवाद, वाद आणि सकारात्मक टीका ह्यांचा आधार सांस्कृतिक प्रगतीला समृद्ध करत असतो.


खालील गोष्टींशी कलेचा किंवा कलाकाराचा संबंध कसा असायला हवा? सध्याच्या काळात तो कसा आहे?
- सामाजिक वास्तव;
- बाजारपेठ;
- विचारसरणी;
- राजकारण.

माझ्या मते विचारसरणी आणि ठराविक विचारसरणीला समर्पित होणं हा कलेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक पिढीला तिच्या वास्तवासोबत, म्हणजे त्या-त्या काळात कलाक्षेत्रात काय सुरू आहे त्या वर्तमानासह राहावं लागतं. पण म्हणून तत्कालीन सामाजिक वास्तवाचा कलेला विळखा बसेल इतकंही महत्त्व त्याला देऊ नये, कारण कलाकार बंडखोर असावा लागतो. त्यामुळे तो प्रसंगी प्रवाहाविरोधात जातो आणि वास्तवात बदल घडवतो. कधी यातूनच नवीन काही जन्माला येतं. आपण ज्या समाजात राहतो त्याची स्थिती काय आहे ते आधी निश्चित करून मग त्या स्थितीचं दर्शन घडवणं ह्यात अंतर्भूत असतं. म्हणजे ते उत्क्रांत होण्याची गरज असते. उदाहरणार्थ, काही कलाकारांनी त्यांच्या अनुभवांचा आधार घेऊन साकारलेल्या काही कलाकृतींमधून महायुद्धपश्चात स्थितीचं दर्शन घडतं. म्हणजे, विशिष्ट काळातल्या घडामोडींविषयी भाष्य करण्याचा हेतू मुळात नसतानाही त्यांची कला अप्रत्यक्षपणे ते करते. मग ती त्या काळाकडे बघण्याची एक खिडकी ठरते. अशा कलाकृतींचा लोकांवर जो परिणाम झाला, आणि त्यातून मग समाजात जे बदल झाले त्यांच्या आधारावर मग ह्या विश्वाचा काही भाग आपण जोखू शकतो.

बाजार आणि अर्थकारण या कलेसाठी अतिशय बिनमहत्त्वाच्या गोष्टी आहेत. कलाकारांनी स्वतःला यांचा गुलाम बनवून घेऊ नये; अन्यथा त्यांच्या कृतींना कलेचा दर्जा प्राप्त होत नाही. कलेमागचा हेतू फक्त कला हाच असू शकतो. लोकांच्या गरजा भागवण्यासाठी कलेचा जन्म झालेला नाही. जगण्याच्या वरच्या स्तरावरची ती एक अवस्था आहे. कशाचा तरी शोध घेणाऱ्या वर्गाची ती अभिव्यक्ती आहे; तो सामूहिक प्रचार-प्रसार नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की बहुसंख्य लोकांनी काय बघावं किंवा कशाचा अनुभव घ्यावा हे आता बाजाराच्या लहरीनुसार ठरतं.

दुर्दैवाने राजकारणही कलेच्या अभिव्यक्तीवर निर्बंध घालत आहे. कलाकारांनी राजकारणापासून शक्य तितकं दूर राहणं हेच श्रेयस्कर.


ह्याच काळादरम्यान भारताबाहेरच्या कलाविष्कारांवर तिथल्या राजकीय वास्तवाचा परिणाम झालेला दिसतो का? भारतातल्या परिस्थितीशी ताडून पाहता त्याला समांतर किंवा त्याहून वेगळे परिणाम दिसतात का़?

होय, भारताबाहेरच्या राजकीय वास्तवानुसार तिथल्या कलेच्या परिप्रेक्ष्यात बदल झाले आहेत. दुर्दैवाने, राजकीय परिस्थितीमुळे कधीकधी अगदी वरच्या पातळीवरून कला आणि कलाव्यवहारांना कडक शिक्षा होते. आर्थिक फायद्याकडे डोळा ठेवून परदेशातून भारतातल्या राजकारणात काही वर्षांपूर्वी रस घेतला जाऊ लागला. त्यातून नव्वदच्या दशकात आपल्याकडे संगीताचे किंवा चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय महोत्सव होऊ लागले. यामागचा खरा हेतू मात्र त्यांच्या उत्पादनांसाठी नवी बाजारपेठ शोधणं हा होता. त्यातूनच मग भारतीय कला, चित्रपट आणि संस्कृतीदेखील भारताबाहेर पोहोचू लागली. त्यांतल्या कितींची तेवढी पात्रता होती हा भाग निराळा. कलेचं दस्तावेजीकरण, संशोधन आणि तिचा प्रसार या गोष्टींद्वारे भारताबाहेर कलेचं पुष्कळ प्रमाणात जतन होतं. कला आणि संस्कृती हे राष्ट्राचा विकास दर्शवणारे आधारस्तंभ आहेत हे त्यांना फार लवकर समजलेलं आहे. भारतात मात्र कलेच्या आणि संस्कृतीच्या प्रसारामध्ये राजकीय वास्तवाचा फारसा हातभार लागलेला नाही. सरकारी मदतीचं प्रमाण मर्यादितच राहिलं आहे.


ह्या काळात समाजाच्या नैतिकतेमध्ये बदल झाले का? कलाविष्कारावर त्याचा काय परिणाम झाला? नैतिकतेमधला किंवा त्यामुळे कलाविष्कारात झालेला हा बदल स्थानिक पातळीवर कितपत सीमित होता आणि जागतिक पातळीवर कितपत झाला?

अशा वातावरणात नैतिकतेमध्ये बदल होणं क्रमप्राप्त होतं. लोकांना तगून राहणं भाग होतं. कित्येक पिढ्यांनी करून ठेवलेलं काम अचानक लोकांसाठी अनावश्यक आणि समाजासाठी निरुपयोगी होऊन बसलं होतं. अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नोकरी करणं गरजेचं झालं; आणि त्यामुळे शैक्षणिक संस्थांमधून मिळणाऱ्या पदव्याही गरजेच्या झाल्या. परंपरावाद्यांना अशा परिस्थितीत तगून राहणं अतिशय कठीण गेलं. जिवंत राहता येण्यासाठी खोटं बोलता येणं लोकांच्या व्यवसायाचा एक भाग झाला. बऱ्याच जणांनी आपला व्यवसाय बदलणं श्रेयस्कर मानलं. या फुफाट्यातून फारच थोडे जण कसेबसे टिकले. पण कलेचं स्वरूपच असं असतं. वार झेलूनही टिकून राहण्याची शक्ती कलेत असते. पूर्वीच्या समाजात कला कमिशन केली जात असे, आता तिचा विक्रय जिथे होतो अशा नव्या समाजाचा उदय झाला आहे. स्वतःचा सामाजिक स्तर टिकवणं आणि स्वत:ला समाजात जिवंत ठेवणं ही जगण्याची मुख्य अंगं बनली आहेत. त्यात कला बहुतांश वेळेला बाजूला पडते. हे दुर्दैवी आहे, पण वास्तव आहे. मात्र, वर म्हटलं त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीसमोर न झुकणाऱ्या काही ठिणग्या नेहमीच दिसतात; तेवढा आशेचा किरण आजही आहे.


जागतिकीकरणानंतरच्या आजच्या 'सपाट जगा'त 'देशीवाद' ह्या संकल्पनेला काय मूल्य आहे?

आजच्या सपाट जगातही देशीवाद महत्त्वाचा आहे, कारण ठराविक प्रकारचं संगीत ठराविक भागातच जन्माला येतं. जसं ध्रुपद उत्तर भारतातून आलं आहे, तर कर्नाटक संगीत दाक्षिणेतून आलं आहे. ती कला जगात ज्यामुळे उठून दिसते ती तिची ओळख यामुळे राखली जाते. ती कला इतर कलाप्रकारांमध्ये मिसळून जाऊ नये यासाठी आणि त्यातून तिनं आपली खास आणि एकमेवाद्वितीय गुणवैशिष्ट्यं हरवू नयेत यासाठीही याची गरज आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेतून आलेला विचारही काही वेळा यातून जपला जातो. दार्जिलिंगचा चहा, तिरुपतीचे लाडू, भारतीय लघुचित्रं, भारतीय शास्त्रीय संगीत अशा गोष्टींचं भौगोलिक स्थानमहात्म्य अशा प्रकारे जतन करण्याची गरज बौद्धिक संपदा कायद्यांमधूनही भागताना दिसते.


कलाकार आणि समीक्षक ह्यांचा परस्परांशी संबंध कसा असायला हवा? सध्याच्या काळात तो कसा आहे?

समीक्षक फक्त टीका करण्यासाठी नसतात; तर त्यांनी कलेबद्दल वेगळी अंतर्दृष्टी देणं अपेक्षित असतं. समीक्षक म्हणजे अशी व्यक्ती जी कला समजावून सांगेल आणि त्यातल्या बारकाव्यांपर्यंतही आपल्याला नेऊन सोडेल. जर समीक्षकांचं कलेचं आकलन व्यवस्थित असेल आणि जर त्यांना कलेविषयी आपुलकीही वाटत असेल तर मग बघणाऱ्या, ऐकणाऱ्या, कलासक्त लोकांनाही ती कला एका वेगळ्याच पातळीवर आकळून येईल. पण समीक्षक जर समीक्षेकडे केवळ एक काम म्हणून बघत असतील आणि निव्वळ आपलं स्थान टिकवून ठेवण्याच्या मोहाला ते बळी पडत असतील, तर मग ते दुर्दैवाने काहीच साध्य करणार नाहीत. आणि कदाचित त्याहूनही वाईट म्हणजे, ते जर निकस कलाकृतीला उत्तेजनही देत असतील, तर मग जे टिकवून धरायला हवं त्याचीच हानीसुद्धा त्यातून होऊ शकते. कलेचा अन्वयार्थ रसिकांपर्यंत पोहोचावा यासाठी आणि त्या दोघांमध्ये संवाद घडावा यासाठी कलाकार समीक्षकांवर अवलंबून असतात. कलाकारांनी समीक्षकांना जर विकत घेतलं किंवा योग्य समीक्षा करण्यासाठी त्यांना लागणारं स्वातंत्र्य जर कलाकारांनी त्यांना दिलं नाही, तर त्याचा अर्थ आपली कला आणि आपलं भविष्य या दोन्हींचं नुकसान त्यांनी स्वत:वर ओढवून घेतलं आहे. दुर्दैवाने सध्या समीक्षा नीचतम पातळीला आलेली आहे. काही उत्तम समीक्षक आजही आहेत. पण धंदेवाईक मेळाव्यांविषयी छापून जसे पैसे मिळतात तसे पैसे कलाविषयक लिखाण छापून मिळत नाहीत, असं कारण देऊन वृत्तपत्रं त्यांची समीक्षा छापत नाहीत; किंवा, समीक्षकांना गप्प बसवण्यासाठी कलाकारच पडद्याआडून हालचाली करतात, आणि मग जे योग्य वाटतं ते लिहिण्याचा धीर समीक्षकांना होत नाही. काहीही का असेना, आपल्याला याचा त्रास पुढे भोगावा लागणार, कारण आजच्या लेखनातून लोकांना कलेबद्दल काहीही समजलेलं नसेल, आणि त्यामुळे आजच्या कलेचं प्रातिनिधित्व करायला भविष्यात काही शिल्लक उरणार नाही.

जागतिकीकरणाने कलेचं चित्र निराळ्याच पद्धतीने रंगवायला हवं होतं. जर कलाकार, समीक्षक आणि समाज म्हणून आपण कलेला महत्त्व दिलं नाही किंवा कशाला महत्त्व द्यावं हेच आपल्याला समजलं नाही तर मग सातत्यानं आपण काहीतरी गमावत राहू आणि मग लवकरच कला आणि संस्कृतीविषयी बोलणं ही गोष्टच भूतकाळात गडप होऊन बसेल.

माझ्या देशाला या बाबतीत किमान हजार वर्षांची परंपरा आहे. ही माझी ओळख आहे; अर्थकारण त्याची जागा घेऊ शकत नाही. आपली कला आणि आपल्या शैक्षणिक क्षमता या गोष्टी आपण आपली समृद्धी म्हणून मिरवल्या आहेत. (जगाला होणारं) आपलं सांस्कृतिक दर्शन हे आपलं सामर्थ्य होतं आणि राहील.


उस्ताद बहाउद्दीन मोहिउद्दीन डागर

विशेषांक प्रकार