किरण राव, संतोष महाडिक आणि गेंड्याची कातडी

एका व्हॉट्सअॅप ग्रूपवर एक फॉरवर्ड आला. तो वाचून मी नेहेमीची खवचट प्रतिक्रिया दिली. "ईऽऽऽ, हे वाचून मला उलटी आली." तिथे एका मैत्रिणीने या प्रतिक्रियेचं आणखी स्पष्टीकरण मागितलं. तिला लिहिलेलं इमेल.

वृषाली,

सौ. किरण अमीर खान म्हणतात की देशात असहिष्णूता वाढली आहे. मी माझ्या दोन्ही मुलाना सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडून जायचा विचार करत आहे. शहीद कर्नल संतोष महाडिक साहेब यांच्या वीरपत्नी म्हणतात की देशाच्या सुरक्षिततेसाठी मी माझ्या दोन्ही मुलांना सैन्यात भरती करायचे ठरविले आहे. आणी आम्ही कडवे हिंदुस्तानी आमिर खानच्या चित्रपटांवर उड्या मारतो पण शहीद कर्नल संतोष महाडिक साहेबांना श्रध्दांजलि वहाण्यासाठी दोन मिनीट स्तब्ध उभे तरी राहीलो आहोत का ??????????? झिणझिण्या येतात ना डोक्यात पण आपण इतके कसे गेंड्याच्या कातडीचे बनलो ... .... बघा करा विचार (हात जोडणारं चित्र)

या परिच्छेदातला वैचारिक गोंधळ पाहता लिहायला कुठून सुरुवात करायची असा प्रश्न माझ्यासमोर पडला.

पहिल्याच वाक्यात, किरण राव हिचा उल्लेख सौ. किरण अमीर (आमीर नव्हे) खान असा केला आहे. किरण रावचा 'धोबी घाट' ज्यांनी बघितला आहे, समजून घेण्याचा प्रयत्नतरी केला आहे त्यांना ही बाई म्हणजे इतरांच्या बुद्धीने विचार करणारी व्यक्ती नाही हे लक्षात येईल. तिला फार मतं आहेत असंही नाही. ती गोंधळलेली आहे, गोंधळलेलं असणं हे सद्यकालाचं विवक्षित लक्षण आहे.

गोंधळलेलं असणं म्हणजे नक्की काय? आजूबाजूला बराच गलका, आवाज असतो. कोणाची मांडणी योग्य, कोणाचं मत ग्राह्य, हे सहज ठरवता येत नाही. हा गलका फक्त स्पीकर्सच्या भिंती लावणाऱ्यांमुळे आहे असं नाही. मतामतांचा चिकार गलका आहे. आपण सतत कनेक्टेड असतो, व्हॉट्सअॅपवर, फेसबुकवर, इतर फोरम्सवर कोणीतरी, काहीतरी सतत म्हणत असतात. लोक कचाकचा भांडत असतात, लोक भरमसाठ जोक्स पाठवत असतात, त्यांतले सगळेच विनोदी असतात असंही नाही, कोणी कुठे "याच्याबद्दल तुम्हाला चाड नाही तर तुम्ही माणूसच नाही" असं पेट्रनाईझ करू बघतात. हा वैचारिक गलकाही आपल्या बाजूला आहे. (गोंधळाबाबत चांगला लेख - कल्लोळाला आकळताना)

'धोबीघाट'मध्ये असा गलका करणारी आणि न करणारीही माणसं दिसतात. त्यातून फार काही म्हणायचं आहे, काही कथा सांगायची आहे असं नाही. माणसं ही अशी असतात, एवढंच दाखवण्याचा प्रयत्न आहे. चित्रपट फार परिपूर्ण किंवा थोर आहे असंही नाही. पण हेच चित्रपटाचं बलस्थान आहे. किरण राव फार आरडाओरडा करून बोलणारी नाही. चित्रपट ही तिची भाषा आहे असं मानलं तर ती तिला जे दिसलं तेवढं सावकाश, हळूवार मांडते. आपल्याला जे समजलं, भावलं तेवढं आपण घ्यावं. पुढे जावं.

म्हणूनच ही बाई संवेदनशील, प्रयोगशील आणि हुशारही आहे हे लक्षात येतं. थोडक्यात, या बाईला स्वतःचं अस्तित्व आहे. सुपरस्टार आमीर खानची बायको अशी तिची कचकडी प्रतिमा नाही. (मला आमीर खान कचकड्याचा वाटतो, पण तो भाग निराळा.) किरण राव स्वतःचं नाव किरण राव असं लावते (पेपरांमध्ये तिचं नाव तसंच छापून येतं, मी तिचा पासपोर्ट बघितलेला नाही.) तिचं नाव बदलण्याचा अधिकार हा मेसेज लिहिणाऱ्या व्यक्तीला कोणी दिला?

किरण राव भले कोणीतरी आहे, पण कोणीही/काहीही नसणाऱ्या व्यक्तिचंही नाव मनमानी बदलण्याचा अधिकार कोणाकडे आहे? आपण आपलं नाव कसं लावावं याचा निर्णय फक्त आपला असतो, इतरांचा नाही. वृषाली, तू तुझं नाव सौ वृषाली (नवऱ्याचं आडनाव) लावावंस का वृषाली (जन्मापासूनचं आडनाव) लावावंस का वृषाली (जोड आडनाव) असं लावावंस हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे, इतर कोणाचाही नाही.

कोणीही आपल्या नावामागे सौ. लावावं हे मला व्यक्तिगतरित्या पटत नाही. सौभाग्यवती या शब्दाचा शब्दशः अर्थ जननक्षम स्त्री. रुजलेला अर्थ सधवा स्त्री. बाईची ओळख फक्त जननक्षमता किंवा नवरा या गोष्टींवरून ठरावी का? दोन हजार वर्षांपूर्वी हे ठीकच होतं. तेव्हा बहुदा बाईला वस्तू समजण्याचीच पद्धत होती. आज आपण स्वतःही स्वतःला वस्तू समजतो का? पण पुन्हा, मला व्यक्तिस्वातंत्र्य मान्य आहे. अर्थ समजून न घेता किंवा परंपरा आवडते म्हणून किंवा काही इलाज नाही म्हणून, कोणत्याही कारणासाठी एखाद्या 'सधवा' बाईने स्वतःच्या नावामागे सौ. लावायचं ठरवलं तर त्याबद्दल मला आक्षेप घेण्याची सोय नाही; मी ते मान्य केलं पाहिजे. करते.

---

आता मुद्दा, आमीर खान नक्की काय म्हणाला? (संदर्भ - फर्स्टपोस्ट)
"Kiran and I have lived all our lives in India. For the first time, she said, should we move out of India? That’s a disastrous and big statement for Kiran to make to me. She fears for her child. She fears about what the atmosphere around us will be. She feels scared to open the newspapers every day. That does indicate that there is a sense of growing disquiet,” he said at an Indian Express awards function on Sunday.

किरण रावच्या चित्रपटात नक्की काय, कसं मांडलेलं आहे तो संदर्भ इथे पुन्हा उपयुक्त ठरावा. चित्रपटातल्या अभिव्यक्तीमध्ये आक्रस्ताळेपणा सोडाच, चवीपुरताही आक्रमकपणा नसलेल्या बाईला म्हणावंसं वाटतं की, असहिष्णुता वाढत असलेल्या वातावरणात माझी मुलं असू नयेत असं मला वाटतं. आमीर खानला ही गोष्ट धक्कादायक वाटते (कारण किरण राव अशी टोकाची वाटणारी विधानं करणाऱ्यातली नसावी.)

आपल्यापैकी अनेक लोक देश सोडून बाहेर गेले आहेत. असहिष्णुता हा विचार किती लोकांच्या डोक्यात, देश सोडताना होता? देश सोडण्याआधी किती काळ आपण या गोष्टींचा विचार करत होतो, जरा आठवून बघा. आज ठरवलं आणि उद्या निघाले एवढं सोपं होतं का? दुसऱ्या बाजूने बघायचं तर भारताबाहेर राहणाऱ्या किती स्त्रियांना भारतात परत जाऊन रहावंसं वाटतं.

(मला व्यक्तिशः काही फरक पडत नाही, कारण मी तशी जाड कातडीची आहे. पटलं नाही, राग आला तर ते बोलून दाखवायला, कटूपणा घ्यायला मला त्रास होत नाही. पण तेवढी जाड कातडी नसणाऱ्या स्त्रियांना शिट्टी मारणारे, गर्दीचा फायदा घेऊन हात लावणारे, भोचक चौकशा करणारे, परंपरा आणि रूढींच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करणारे नातेवाईक आणि ओळखीचे यांची "भीती" वाटत नाही का?)

---

किरण राव- आमीर खान विधानाची तुलना संतोष महाडिक यांच्या कुटुंबाशी का करायची? दोन माणसं सारखी असत नाहीत. सैन्य, लढाई या गोष्टी (मला व्यक्तिशः युद्ध, हिंसा साफ अमान्य का असेना) व्यवहाराच्या, उपयुक्त, गरजेच्या आहेत हे मला मान्यच आहे. संतोष महाडिक यांना कमी लेखण्याचं कारणच नाही. पण त्यांना अथवा त्यांच्या पत्नीला सिनेमा बनवता येतो का? कोणत्याही देशाला सतत युद्ध्यमान राहायचं असतं का? प्रत्यक्ष सैन्यात असणाऱ्या लोकांनाही सतत युद्ध हवं असतं का? नाही. संवेदनशील माणसांना कोणाशीही भांडण झालं तरी थोडा त्रास होतो. मग युद्ध ही किती टोकाची घटना आहे!

जर सतत युद्ध नको असेल तर समाज आणि व्यक्ती म्हणून आनंदात राहण्यासाठी माणसांना आधी अन्न-वस्त्र-निवारा, पुढे सडक-बिजली-पानी आणि पुढे क्रीडा-कला-करमणूक या गोष्टींची गरज असते. किरण राव (इथे मुद्दामच आमीर खानचा उल्लेख केलेला नाही आणि हे मुद्दाम लिहावंसं वाटलं.) या तिसऱ्या गटातल्या गरजा भागवणाऱ्यांमधली आहे. परिपूर्ण समाजात सगळ्या प्रकारचे लोक असतात; त्यांतल्या दोन लोकांची तुलना करून कोणाला लहान-मोठं बनवण्याची गरज नाही. एरवी प्लंबरचं काम आपल्याला करीयर म्हणून नको असतं, पण प्लंबरशिवाय आपलं आयुष्य किती कष्टप्रद असेल? तोटी उघडल्यावर पाणी येण्याजागी घरच्याच विहीरीवर पाणी भरण्याची कल्पना करून पहा. म्हणून प्लंबर थोर आणि कलाकार हीन, किंवा प्लंबर थोर आणि सैनिक हीन असं म्हणणार का?

महाडिकांची पत्नी आणि किरण राव यांची तुलना करणाऱ्यांना मला प्रश्न विचारावासा वाटतो, देशात दिवसात कितीतरी बलात्कार होतात, म्हणून तुम्ही शय्यासुख मिळवतच नाही का? या दोन गोष्टींचा परस्परांशी काहीही संबंध नाही. लोक उपाशी मरतात, लोक देशासाठी मरतात, लोक गुन्हेगार बनतात, तुरुंगात कैद्यांना वाईट वर्तणूक मिळते, समाजात गरीब, अशिक्षित लोकांना नीट वागवत नाहीत म्हणून आपल्यापैकी कोण स्वतः सुखसोयींचा त्याग करतं? एक महात्मा होऊन गेला, जो लोकांना पुरेशी वस्त्रं मिळत नाहीत म्हणून संपूर्ण शरीर झाकणारा वेष सोडून पंचा गुंडाळूनच जगला. बाकी कोणी आहे का स्वतःच्या सुखावर पाणी सोडणारे?

सर्वसामान्यांनी असं काही करावं अशी अपेक्षाच नसते. म्हणूनच मोहनदास गांधी महात्मा ठरतो. पण म्हणून सर्वसामान्य लोकांना इतरांप्रती असणारी कणव, आपुलकीची भावना कमी दर्जाची नसते. आपली मुलं असहिष्णू वातावरणात राहून स्वतः असहिष्णू बनू नयेत, असं किरण रावला वाटत असेल तर त्या भावनेबद्दल मला सहानुभूती आहे. ही सहानुभूती करुणा नाही, तर सह-अनुभूती आहे. (मलाही आक्रस्ताळ्या लोकांमध्ये फार वेळ घालवला की माझा आक्रस्ताळेपणा वाढेल अशी भीती वाटते. म्हणूनच मी भडक, आक्रमक भगव्यांबरोबर फार वेळ घालवत नाही.) विजय तेंडूलकर म्हणाले होते, मोदींना मी गोळ्या घालेन. या वाक्याचा अर्थ शब्दशः घ्यायचा नसतो. त्या माणसाच्या भावना फार तीव्र होत्या एवढंच.

आणि त्या मेसेजमधलं पेट्रनायझेशन! लोकांना काही चाड नाही असं म्हणणाऱ्या व्यक्तीला स्वतःला कितपत चाड आहे? आणि तिला किती चाड आहे हा ही प्रश्न महत्त्वाचा नाही. लोकांनी अमुकतमुक गोष्टच करावी, कारण ती थोर गोष्ट आहे असे निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? जसं माझं नाव काय हे ठरवण्याचा अधिकार मला आहे, तसं काय कपडे घालावेत, काय बोलावं, काय भावना असाव्यात हे ठरवण्याचा अधिकार मला आहे. ते माझं अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे.

अर्थातच हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असले तर्कहीन, पेट्रनायझिंग, दुसऱ्यांना खुजे ठरवणारे, लोकांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करणारे भडकाऊ संदेश लिहिणाऱ्यांनाही आहे. पण असे मेसेजेस बघून मला (माझ्या मूडनुसार) कधी उलटी येते, कधी माझ्या समाजातले लोक असे असण्याबद्दल वाईट वाटतं.

पण ही नकारात्मक भावना फार काळ टिकली नाही. "ही असंच काहीतरी बोलते", असं लेबल लावून टाकण्यापलिकडे तू मला विचारलंस, "तू असं का म्हणालीस?" मतं पटली नाहीत तरीही संवाद सुरू ठेवण्याची तुझी इच्छा आहे. म्हणून माझ्या आक्रमक भूमिकेचा, "हे वाचून मला उलटी आली", याचा मला पुनर्विचार करावासा वाटला, त्याबद्दल तुझे आभार. आपली मतं कदाचित जुळणार नाहीत, कदाचित काही प्रमाणात जुळतील, पण हा संवाद सुरू असावा असं जरूर वाटतं.

अदिती

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

हे लोक उघड मोठ्या माध्यमातून बोलतात म्हणून कळलं तरी यांना काय म्हणायचे आहे.आपणही बरेच धीट आहोत पण मंच नसल्याने इथे संस्थळावर विरोधी अथवा टीकात्मक लिहू शकतो.वाटसपमध्ये फक्त विहिरीतले डराँव डराँव किंवा ढकलपत्र.या आमिर,सलमान मंडळींना आइसिसच्या धमक्या येत असतील त्याचाही परिणाम असू शकतो.आइसिसचा त्यांच्या अनुनयांना सरळसरळ सल्ला आहे-"जिथे असाल तिथे 'काम' चालू करा."त्यांचा रोष पत्करण्यापेक्षा देशवासीय बदकांचा कलकलाट ऐकणे सुसह्य असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्लोळाला आकळताना या लेखाला अतिशय व्यक्तीगत पुरवणी शोभावा असा लेख आहे. शाब्बास गं पठ्ठे! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जोपर्यंत, वाचाळवीर, आगलाव्या सदस्यांच्या मूर्ख्,बेताल वक्तव्यांवर भाजपा वा मोदी स्पष्ट भूमिका घेत नाहीत, तोपर्यंत हा असहिष्णुतेचा वाद असाच चालू रहाणार, बहुतेक वाढणारही. अशी आणि अशीच वक्तव्ये शोधून, ती मुद्दामहून हायलाईट करणार्‍या मिडियाला तरी कोणी बोलू शकणार आहे का ?
देश वर येण्याचे सोडाच, आता सर्वांच्याच हातात सोशल मिडिया आल्याने, सगळ्याच चर्चांना सोसायटीच्या 'अ‍ॅन्युअल जनरल बॉडी मिटिंग' चे स्वरुप आले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमिर नक्की 'तसं' म्हणाला याचा ढळढळीत पुरावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कळकळ समजली पोचली. पण काही अर्थ नाही.
मी या ढकलपत्र पाठवण्यार्^यांना शहाणपणा शिकवणं सोडून दिलय. निव्वळ मूर्ख्पणा अस्तोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदी सरकारला येऊन दीड वर्ष झाले तरीही देशात एखाद मोठा दंगा झाला नाही. काही लोकांना फार निराशा झाली. (UPA सरकार होती तेंव्हा चांगली सहिष्णुता होती दरवर्षी कुठे न कुठे दंगे होत राहायचे) मग काय करणार 'असहिष्णुता' सुरु झाली. बाकी आमीर खानची मजबुरी आहे, फिल्मस् कुणाचा पैसा लागतो, खाडी देश्यात आणि पाकिस्तान मध्ये फिल्म वितरण करताना कुणाचा आशीर्वाद लागतो? काय करणार आका म्हणेल तसे म्हणावे लागते. 'सत्यमेव जयते' हेच खर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी. मोदी आल्यापासून मुसलमान इतके घाबरले आहेत की त्यांची टापच नाही दंगली करायची. आणि दुसरे कुणी दंगली करतच नाहीत भारतात. बाकी बडे बडे शहरों मे छोटे छोटे हादसे तो होतेहीच है.
- २६ नोव्हेंबर २०१५.
(कुणी तरी खवचट म्हणा हं. नाही तर मला असुरक्षित वाटू लागेल ऐसीवर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्ही फक्त बातम्या वाचता आणि बातम्यांचं विश्लेषण वाचत नाही असं वाटतं.

सहसा दंगे भाजपाच्या राजवटीत होत नाहीत, दंगे झाले की पुढे भाजपा (जनरल हिंदुत्ववादी) सत्तेवर येतात, त्यांच्या मतांचा टक्का वाढतो. दंगली झाल्या नाहीत तर भाजपाला राजकीय नुकसात होतं, असं विश्लेषण तीन-चार दशकांच्या विदेतून मांडलं गेलेलं आहे. (दुवा) बिहारच्या निवडणुकांमध्ये पुन्हा तेच दिसलं.

बाकी दंगली म्हणजेच असहिष्णुता आणि बाकी काय वाट्टेल ते झालं तरी चालेल, कोणी मोहम्मद अकलाखला लोकांनी निव्वळ संशयापोटी ठार मारला, काश्मीर, इशान्येतली परिस्थिती सुधारलेली नाही, फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना अस्पृश्यासारखं वागवलं जात आहे, आसामचे राज्यपाल भडकाऊ विधानं करत आहेत, स्वतःला सामान्य म्हणवणारे लोक "तुम्हाला भारत आवडत नाही तर सिरीयात जा" असं म्हणत त्यासोबत भरचौकात लोकांना फाशी दिल्याची चित्रं फिरवत आहेत याला तुम्ही बहुदा सहिष्णुता म्हणत असाल. तेही शक्य आहेच म्हणा, विज्ञान ज्यांना नॉर्मल समजतं त्या समलैंगिकांना तुम्ही विकृत समजता; उपलब्ध माहितीकडे सोयीस्कर डोळेझाक करता, कदाचित विकृतीला प्रकृती समजणं हे तुमच्यासाठी नॉर्मलही असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पटाईत साहेबांच्या मुद्द्याच्या गाभ्याशी सहमत. असहिष्णुता वाढत चाललेली आहे हे न पटणारे आहे. असहिष्णुता वाढत चाललेली आहे असा आरडाओरडा मात्र वाढत चाललेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<खवचट मोड>सहमत आहे. बलात्कार वाढले नसून त्याच्या बातम्या वाढल्या आहेत याच्यासारखंच हे आर्ग्युमेंट आहे. खवचट मोड>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुमची Godwin's law खरा ठरवण्याच्या च्या दिशेने प्रगति चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.
गलका आणि आक्रस्ताळेपणाबद्दल चांगलं वक्तव्य आलेलं आहे. एकूणात, लेखाशी सहमत.
माझ्यामते गुंतागुंतीच्या वास्तवाबरोबर पराकोटीचा,टोकाचा लागलेला सूर हा देखील गोंधळाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. आणि हा सूर एकाच बाजूने लागतो असं म्हणता येत नाही.
आता चालू घटनेबद्दल : काही काही शब्दांवर इतका खल होतो की त्या शब्दांचे अर्थ चावून चावून चोथा झाल्यासारखे निरर्थक होतात. सेक्युलर या शब्दाबरोबरच सहिष्णुता/टॉलरन्स या शब्दाचंही आता असं बनलं आहे असं दिसतं. असहिष्णुतेचं इतर अनेक गोष्टींप्रमाणेच क्रमाक्रमाने बदलणारं चित्र आहे. सव्वाशे कोटी लोकांचा खंडप्राय देश अचानक असहिष्णु झाला असं नसतं."अरे शाहरातलं प्रदूषण वाढल्यासारखं वाटतंय" किंवा "हल्ली ट्राफिक भयंकरच झालेला आहे" अशी विधानं आपण अधूनमधून करतो. तसं "हल्ली इनटॉलरन्स वाढल्यासारखाच झालाय" असं वाटणं नि तसं म्हणणं यात इतका गहजब करण्यासारखं काय आहे? "देशात अमुक अमुक अनिष्ट प्रकार वाढलाय तर कधीकधी अगदी नको वाटतं" असं आपण म्हणतो की. बरं ते म्हणाली किरण राव आणि "हे असं वाटणं खूप संकटप्राय आहे, पण तसं काही आपण करणार नाही" हे म्हणणारा आमीर खान. तरी "पाकिस्तानला नाहीतर आयसीसमधे जा" अशी आईबहिणीवरून शिव्या देत सुनावणी होणार आमीर खानला. म्हणजे हे असहिष्णुपणाचंच, विषारी आहे इतकंच नव्हे तर तर्कविसंगतही आहे.

सरतेशेवटी : भारत खरोखरच असहिष्णु आहे का ? किंवा बनत चाललेला आहे का याबद्दलची चर्चा, लोकांची मतंमतांतरं होणं ही माझ्यामते एक प्रकृतीस्वास्थ्याची गोष्ट आहे. तंत्रज्ञानाने एकमेकाना जोडण्याआधीच्या काळाच्या तुलनेत, आर्थिक सुधारणांच्या आधीच्या काळाच्या तुलनेत, आता, यापुढे अधिकाधिक लोकांना व्यासपीठ मिळणं ही स्वागतार्ह घटना आहे. समाजाचं झालेलं ध्रुवीकरण या मोठमोठ्याने चाललेल्या महाचर्चेत प्रतिबिंबित होतं आहे. वेगवेगळ्या वर्तुळात चाललेल्या या चर्चांची पातळी सगळीकडे सारखी नसणारच. परंतु दोन परस्परविरोधी पक्षांनी येऊन बोलत राहाणं महत्त्वाचं, योग्य आहे. कोट्यावधी माणसं बोलायला लागल्यावर गलका आणि पर्यायाने गोंधळ होणार. परंतु मुस्कटदाबी, घुसमट, लोकांचे आवाज दाबले जाण्याच्या काळापेक्षा हा गोंधळ बरोबर आणि प्रगतीचं लक्षण असणारा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

दुसर्‍या परिच्छेदाशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

विचार करायला लावणारा लेख. शेवटच्या काही ओळी विशेष आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते दोघे लाखो रूपये टॅक्स भरतात,त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट होते.आणि त्यांच्यावर टिका करणारे
आम्ही,आपले काय योगदान आहे देशासाठी? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

गलका शांत झाला हे वाचुन ही अपेक्षा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार छान वाटलं. अलिकडेच माझ्यावरही असाच उलटीचा प्रसंग आला. मग देशाचा अर्थ काय हे लिहिलं होतं. आवडला लेख.
संवाद सुरू ठेवावा हे मलाही वाटतंच मित्रमैत्रिणींच्या बाबत. तरीही कसंसं होतंच पोटात...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखीका स्वतःच प्रचंड गोंधळलेल्या वाटत आहेत.
येवढा मोठा लेख पाडूनही त्यांना उलटी यावी असे काही घडल्याचे जाणवले नाही.

देशावरती, संस्कृतीवरती काही समतोल किंवा पाठराखण करणारे वाचनात आले, की ताबडतोब 'मला उलटी आली', 'कीव आली अमक्या तमक्याच्या बुद्धीची' असली विधाने फेकली की आपण फार मोठे विचारवंत, हटके विचार करणारे, निधर्मी, समतोल वृत्तीचे वैग्रे वैग्रे आहोत असे दर्शवत येते असे आजकालच्या नवविचारजंताना वाटू लागले आहे. अर्थात त्यांच्या अशा बोलण्याची आम्हाला तर किव देखील येत नाही पण उगा बेडूक आणि बैलाची गोष्ट आठवते.

मागे पुढे चार-आठ लेझीमवाले असले की मग तर ह्यांच्या मिरवणूकीचा धिंगाणा बघायलाच नको. जो देश आपण सोडलेला आहे, जिथे राहून आपला विकास होईल वा काही भले होईल ह्याची आपल्याला खात्री नव्हती, ज्याच्याकडे आपण पाठ फिरवलेली आहे आणि सठीसहामाही आपण जिथे फक्त हिरवा माज दाखवायला जातो, परत गेल्यावरती जिथल्या 'हायजेनीक' अनुभवांवर लिहायला कारणे शोधतो त्या देशात काय चालू आहे आणि कोण त्या देशाविषयी काय बोलतो आहे ह्यात मुळात रस दाखवण्याचे कारणच काय? आम्ही भारतीय आमचे आम्ही बघू की. तुम्हाला आम्ही 'तारणहार वाचवा...' अशी साद घालायला आलोय का काय?

आमचा देश, आमचे देशवासी, आमचा धर्म-संस्कृती जे आहे आणि जसे आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. ह्या अभिमानामुळे उद्या आम्ही खड्ड्यात जाऊ असे तुम्हाला वाटत असले तरी आमची हरकत नाही. आम्ही आनंदाने खड्ड्यात जाऊ.

महत्त्वाचे :-

म्हणूनच मोहनदास गांधी महात्मा ठरतो.

सदर व्यक्ती राजकारण आणि विशिष्ठ फायद्यांसाठी काही लोकांकडून महात्मा ठरवली गेली असे आमचे प्रांजळ मत आहे. काही लोकं म्हणजे देश नव्हे.

धन्यवाद.
देशभक्त परा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

मेलास तू आता. तिरडी उचलायला येऊ का? येतेच ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>परत गेल्यावरती जिथल्या 'हायजेनीक' अनुभवांवर लिहायला कारणे शोधतो ...

शिवाय तिकडे ज्या भागात राहतो तिथल्या भागाचा 'अनहायजेनिक भारत' बनवतो असेही निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुमचा नक्की आक्षेप काय आणि कशाबद्दल आहे हे समजलं नाही.

शिवाय तिकडे ज्या भागात राहतो तिथल्या भागाचा 'अनहायजेनिक भारत' बनवतो असेही निरीक्षण आहे.

त्यासाठी सध्या मला कष्ट करावे लागत नाहीत. सध्या आहे त्या देशात डॉनल्डकाका ट्रंप, रिककाका पेरी आणि टेडमामा क्रूझ असे भल्लेभल्ले लोक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.