मुंबई अव्हेंजर्स - एक फसलेला प्रयत्न

गुन्हे/रहस्य/थरारकथा या साहित्यप्रकाराचे चाहते बऱ्यापैकी निर्ढावलेले असतात. इतर 'अभिजात' साहित्यप्रकाराकडे बहुतांश वेळेस निर्विकारपणे दुर्लक्ष करून ते आपली साधना चालू ठेवतात. आपला साहित्यप्रकार 'अभिजात' या सदरात मोडत नाही याचा खेद बाळगण्याची त्यांना गरज वाटत नाही.
'इतर साहित्यप्रकारांकडे दुर्लक्ष' एवढा भाग सोडला तर मीही या चाहत्यांमध्ये मोडतो.
रशियन राज्यक्रांतीने बाकी काय साध्य केले असेल ते असो, पाश्चिमात्य थरारकथा लेखकांना घाऊकीत खलनायक पुरवण्याचे काम रशिया आणि पूर्व युरोपमधील कम्युनिस्ट राजवटींनी अगदी नीट पार पाडले. मॅक्लीन, फ्लेमिंग, पॅटर्सन ते पुढे फोर्सिथ, आर्चर वगैरे मंडळींच्या बँक अकाउंटला त्याचा खूप फायदा झाला. पण त्या गाढव गॉर्बाचेव्हने शीतयुद्धाची (आणि सोव्हिएत महासंघाचीही) अखेर करून टाकली आणि या मंडळींच्या पोटावरच पाय आला. मग सद्दाम हुसेनला खलनायक करून फोर्सिथने 'फिस्ट ऑफ गॉड' पाडून बघितली, पण काही जमले नाही.
भारताच्या गुन्हेगारी विश्वाचे जागतिकीकरण १९९३च्या बाँबस्फोटांनी सुरू झाले. बाँबस्फोट भारतात नवीन नव्हते. १९७५मध्ये केंद्रीय मंत्री ललित नारायण मिश्र यांचा बाँबस्फोटात मृत्यू झाला. खटला अजून चालूच आहे. असो.
पण १९९३च्या बाँबस्फोटांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा आणि इथल्या गुन्हेगारीचा राक्षसविवाह लावून टाकला. या विवाहाची संतती थोडथोड्या काळाने आपल्या डोक्यावरच नव्हे तर सर्वांगावर मिरे-मिरची वाटत असते. पण भारताच्या पार्श्वभूमीवर एकादी गुन्हे/थरारकृती आतापर्यंत माझ्या तरी वाचनात आली नव्हती.
एस हुसेन झैदी या लेखकाने मुंबईच्या गुन्हेगारी विश्वावर खूपच अभ्यासपूर्ण आणि मोलाचे लिखाण केले आहे. त्याची 'डोंगरी टू दुबई', 'भायखळा टू बँकॉक' आणि 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' ही पुस्तके वाचून तर मी निहायत खूष झालो होतो. 'ब्लॅक फ्रायडे' वाचली नाही, पण त्यावरचा चित्रपट बघितला.
एकूण एस हुसेन झैदी या लेखकाची म्हणून 'मुंबई अव्हेंजर्स' मोठ्या अपेक्षेने हाती घेतली.
सुरुवात बरीचशी बाळबोध आहे, मुख्य पात्रे भारतीय, खलपात्रे पाकिस्तानी असा सोपा हिशेब आहे. सुरुवातीच्या वर्णनांतून आणि कथाप्रवासातून लेखकाला फोर्सिथ आणि हिगिन्सचे कॉकटेल करायचे आहे हे कळते. थोडा काळ ते जमतेही.
कथासूत्र असे - मुंबईत २६ नोव्हेंबरला घडवलेल्या बाँबस्फोट आणि हत्याकांडांना जबाबदार असलेली मंडळी मुक्तपणे जगत असतात. हे एका निवृत्त लेफ्टनंट जनरलला सहन होत नाही. रॉ या गुप्तचर संस्थेतल्या आपल्या मित्राला कौल लावून हा ले. ज. एक टोळी उभी करतो. ही टोळी जगभर हिंडून त्या जबाबदार मंडळींना मुक्ती देत हिंडते.
पण बघता बघता फोर्सिथ आणि हिगिन्सच्या कॉकटेल ऐवजी आपल्या वाट्याला मनमोहन देसाई - डेव्हिड धवन हे कॉकटेल येते. कथासूत्र ज्या ठरीव मार्गाने पुढे सरकते ते कालांतराने इतके सवयीचे होते की शेवटीशेवटी वाचन म्हणजे नजरेने पाने पुसणे एवढेच उरते. थोडक्यात, एकादा 'क' दर्जाचा हिंदी चित्रपट पाहत असल्यासारखी अवस्था होते. या 'कथानका'वर आधारित 'फँटम' हा हिंदी चित्रपट तयार झाल्याचे समजते. पण आता मी हुशार झालो आहे.
गंमत आहे. या प्रकारच्या लेखनामध्ये विषय आणि पार्श्वभूमी यांचे एवढे वैविध्य भारतात सहजी उपलब्ध असूनही इतका दुष्काळ? शँडलरच्या तोडीचे कुणी लिहावे अशी अपेक्षा अजिबात नाही. पण फोर्सिथ - हिगिन्स - फोर्ब्स - बाल्डाच्ची या मंडळींच्या पंक्तीत बसणारा एकही दृष्टोत्पत्तीस येऊ नये?
मा. हुसेन झैदी यांस नम्र विनंती. तुमच्या आधीच्या लिखाणांमधून जे भरमसाट क्रेडिट तुम्ही मिळवले होतेत त्यातले निम्मेअधिक या एका कादंबरीनेच नाहीसे केले आहे. आता आधीच्या पुस्तकांच्या जातकुळीतली पुस्तके लिहिली नाहीत तरी चालेल. उरलेले क्रेडिट तरी शाबूत ठेवा.
'मुंबई अव्हेंजर्स'बद्दल शिक्षा म्हणून झैदीसाहेबांना या वर्षी प्रदर्शित झालेले सगळे मराठी चित्रपट जबरदस्तीने दाखवावेत. त्यासाठी त्यांचे अपहरण करावे आणि ते काम ISIला द्यावे असा हिंस्त्र विचार मनात घोळत होता, पण जाणवले की पुस्तक वाचून मीही 'ISIचा एजंट ना, नळ स्टॉपला नाहीतर दीप बंगला चौकात मिळेल' असा विचार करू लागलो आहे! असो.
प्रकाशक - हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया
प्रथमावृत्ती - २०१५
किंमत - १९९ रु.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वेळीच चेतावणी दिल्याबद्दल बहुत आभार.

पण फोर्सिथ - हिगिन्स - फोर्ब्स - बाल्डाच्ची या मंडळींच्या पंक्तीत बसणारा एकही दृष्टोत्पत्तीस येऊ नये?

"सिक्स सस्पेक्ट्स" वाचून विकास स्वरूप आहे असं वाटलं होतं, पण त्याचं "अ‍ॅक्सिडेंटल अ‍ॅप्रेंटिस" वाचून कलपड झाला. अतिशय पुचाट रहस्य.

याबद्दल मागेही ऐसीवर लिहिलं होतं - मोहम्मद हनीफ या पाकिस्तानी लेखकाचं "A Case of Exploding Mangoes" नक्की वाचा. पुढच्या पुस्तकात (अ‍ॅलिस भट्टी) त्यानेही माती केलीच, पण अजून जीव आहे.

तसंच, तार्किन हॉल नावाच्या ब्रिट लेखकाची "विश पुरी" डिटेक्टिव सीरीज चांगली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हिहिहिहि... नजरेने पाने पुसणे!
मागे चौकसरावांचं एक परीक्षण वाचलं होतं मनोगतावर, त्यात करवंदं विकायला तिठ्यावर येणार्‍या आदिवासींची कल्पना करणार्‍या लेखकाबद्दल लडिवाळ शब्द होते. लेखक आणि पुस्तक विसरले.
(आता 'शोध' वाचत आहे. त्याबद्दल चौकसरावांचं मत काय आहे हे जाणून घ्यायला उत्सुक. कारण कल्पना भारी आहे. पण नॉन्सेन्स तपशिलांनी जीव काढलाय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

रशियन राज्यक्रांतीने बाकी काय साध्य केले असेल ते असो, पाश्चिमात्य थरारकथा लेखकांना घाऊकीत खलनायक पुरवण्याचे काम रशिया आणि पूर्व युरोपमधील कम्युनिस्ट राजवटींनी अगदी नीट पार पाडले.
खरं आहे.

थरारकथा लिहिण्यासाठी नाट्य आणि घटना यांचे मिश्रण जमावे लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0