राव सांगता...

सकाळचे जेमतेम नऊ वाजत होते. परंतु सूर्य ३१ मार्चला तडफेने देयके मंजूर करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या (अथवा महापालिका अथवा अन्य 'खाण्या'सारख्या खात्यातल्या) कारकुनासारखा झटून कामाला लागला होता. डांबराचा काळेपणा त्याकडे पाहताच थेट मस्तकाला भिडत होता.
देवळात लगबग सुरू होती. फुलांचा, धुपाचा, तेलाचा, नारळांचा असे संमिश्र वास दरवळत होते.
देवळाबाहेर आधुनिक (तंग, अपुरे) कपडे घालून ती तरुणी उभी होती. दोन्ही हातांचे तिने नमस्कारासारखे काहीतरी केले होते. मस्तकावरचे केस अनैसर्गिक रंगात रंगवलेले होते. रंगाने भरलेल्या पिंपात कोल्ह्याऐवजी कोंबडी पडली असती तर काय झाले असते याची कल्पना तिच्या डोक्याकडे पाहून यायला हरकत नव्हती. तिची पादत्राणे जवळच पडली होती, जी पायातून काढताच तिची उंची झपकन कमी झाली होती.
भरल्या पोटाने ('त्या'च्या पोटाचे घनफळ त्याने यत्नपूर्वक कमी केले होते, त्यामुळे हे वर्णन खरे झाले) आणि तृप्त व समाधानी नजरेने 'तो' तिथे अवतीर्ण झाला. त्या तरुणीच्या पाठमोऱ्या देहाला 'त्या'ने अनिवार अनिच्छेने न्याहाळले. डोक्यावरचा तो प्रकार पाहताच 'त्या'च्या नजरेला काहीतरी अनिश्चिततेने स्पर्श केला. मुखदर्शन करावे म्हणून 'तो' पुढे येऊ लागला.
नाकाने सावध केल्यामुळे त्या तरुणीने आपले डोळे खाडकन उघडले. 'त्या'च्याकडे बघताच तिने घाईघाईत पायात पादत्राणे चढवली (किंबहुना, त्या पादत्राणांवर ती चढली) आणि एक नमस्कारवजा सलाम देवाच्या दिशेने उडवला आणि लगबगीने पळ काढला.
'त्या'ची मान बगळ्यासारखी लांब होतीच. ती 'त्या'ने आता कावळ्यासारखी वळवून घेतली आणि या सर्व घडामोडी नजरेत साठवून घेतल्या.
राव सांगतां देव कुणाला
शहाजोग जो शहामृगासम
पत्ता चुकल्यासारखा 'तो' वडाच्या झाडाखाली जाऊन उभा राहिला. काहीतरी घडले होते. एरवी पादत्राणांवर चढण्याचे त्या तरुणीचे प्रयत्न हे 'त्या'ला करमणुकीला दोन आठवडे पुरले असते. पण आज तो डोक्यावरचा प्रकार... अशा रंगाचे केस... अलीकडे हे फार होऊ लागले होते. उगा एवढ्यातेवढ्या कारणावरून डोहात धोंडे पडायला लागले होते.
उन्हाच्या झळा आता जाणवू लागल्या होत्या. पण 'त्या'च्या डोहातल्या तरंगांची लांबी वाढतच चालली होती. आणि त्यांचा खर्जभरला आवाज 'त्या'चा गाभारा भरू लागला होता. निश्चय करून 'तो' सावलीतून बाहेर पडला आणि स्वच्छ कौतुकरहित नजरेने इकडेतिकडे पहात चालू लागला.
प्रयत्नपूर्वक ढकलूनसुद्धा तो काळाकरडा पडदा 'त्या'च्या मनावर पांघरूण घालायला धडपडत होता. सूर्य आग भाजत होता.
स्वतःलाच मी निघतो जाळायास
जळताना पाहून तरी तू हास
पाण्यातून बाहेर आलेल्या म्हशीने गदगदा शरीर हलवावे तसे 'त्या'ने डोके हलवले. स्वतःच्या वेदना कुरवाळाव्याश्या वाटतात तेव्हा आपल्या स्वतःची कविता कधीच वापरायची नसते, त्याने जखमेवर मीठच नव्हे तर अगदी लाल मिरचीची जळालेली फोडणी पडते हे 'त्या'ला चांगलेच माहीत झाले होते. दुसऱ्या कुणाची कविता घेतली की 'आस्वाद', 'समीक्षा', 'रसग्रहण' असल्या चिठ्ठ्या डकवून ती जीवघेणी कळ सुसह्य करता येते हेही 'त्या'ला कळून चुकले होते.
बोंबील तळलों सुके उन्हांत
आणि होतसे हड्डी नरम
समाधानाने 'त्या'ने डोके हलवले. आणि निर्विकारपणे 'तो' पुन्हा रस्ता तुडवू लागला. त्या काळ्या पडद्याने उन्हाचा कडाका बराच सौम्य करत आणला होता. अंधाऱ्या चित्रपटगृहात पडद्यावर खेळ सुरू व्हावा तशी 'त्या'च्या मनःपटलावर खेळ सुरू झाला. 'त्या'ला इंग्लंडमधले दिवस आठवले...
सततचा अंधार... रिपरिपणारा पाऊस... हाडे कडकावणारी थंडी... एथेलचा सहवास... घरातली शेकोटी (त्या शेकोटीला 'फायरप्लेस' म्हणायचे कृष्णाकाठी जन्मलेल्या आणि वाढलेल्या 'त्या'ला कळूनही वळत नव्हते)... जगण्यासाठी पैसा लागतो आणि तो कितीही कमावला तरी अपुरा पडतो. इथे तर 'त्या'ला जगण्याचे अंतिम ध्येयच मिळून गेले होते एथेलच्या उबेत...
छान शेकतें जगणें येथें
जगणाऱ्यांच्या हे अंगाला
संथ लयीत चालणाऱ्या दरबारीच्या आलापीची रेकॉर्ड मध्येच अडकावी, पण ती अशा कुशलतेने की ऐकणाराने "ही तिहाई... हा चक्रधार..." अशी तिनाच्या पाढ्याची उजळणी चालू ठेवावी, तशी तीच तीच दृश्ये पुनःपुन्हा 'त्या'ला एकाच वेळी आश्वस्त करत आणि लालूच दाखवत राहिली.
तापत्या उन्हाने जवळजवळ द्रवरूपाला पोचलेल्या डांबराच्या एका काळ्या तकतकीत पृष्ठभागावर 'त्या'चा पाय पडला आणि ते काळे विष 'त्या'च्या मस्तकापर्यंत पोचले. चित्रकथी खाडकन बंद पडली. एक तीक्ष्ण चमक 'त्या'च्या छातीत चिद्घनचपलेसारखी लकाकून गेली. "हे नाही नाही नाही काहीच माझे" अशी 'त्या'ची अवस्था झाली.
निदान ढेकर करपट आणूं
द्या तुमच्या त्या शहामृगाला
सकाळच्या खाण्याची कडवट आंबूस चव बऱ्याचशा हवेला स्वतःबरोबर ओढत 'त्या'च्या घशाबाहेर पडली. उपाहारगृहातले पदार्थ किती शिळे असतात ते पैसे मोजून खाणाऱ्या गिऱ्हाईकाला कळत नाही, तर 'त्या'ला कुठून कळणार?
घनफळ कमी केले असले तरी पोट हे सतत भरत रहावे लागते एवढे मात्र 'त्या'ला कळले. आपला पाय त्याने चिकट डांबरावरून जिवाच्या कराराने सोडवून घेतला. कडेच्या मातीत पाय घोळवत 'त्या'ने आपल्या बसकट, गेंगाण्या आवाजात हळी घातली, "गरीबाल.ऽऽ भिक्षा घाली वे माँय.ऽऽऽ".
हळूहळू त्याच्या छातीवरच्या पिकल्या केसांवर लाळ गळू लागली.

* या ओळी मर्ढेकरांच्या आहेत.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

कळले न कळलेच्या सीमारेषेवर. त्रिखंडातल्या प्रवासाचा आढावा असावा का?
मरढेकर आवडतात. पण 'ढेकर' आवडलाच असे नाही. शैली आवडली.
आणि ओह. चित्रकथी. व्यंकटेश माडगूळकरांची मिताक्षरी बहुलाशयी अप्रतिम दीर्घकथा. रंकाळ्यावरचा शेवट झकासच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कडका आयटम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0