जंटलमन्स गेम - ४ - फायर इन बॅबिलॉन

१९७६ चा फेब्रुवारी महिना...

गयानामधल्या आपल्या घरी बसून तो विचारात बुडून गेला होता..

नुकताच अत्यंत दारूण पराभव त्याच्या पदरी पडला होता!
चाणाक्षपणे लावण्यात आलेल्या एका मोठ्या सापळ्यात सापडल्याने अक्षरशः वाताहात झाली होती..
काय करावं?
या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं?
आपल्या पराभवाला नेमकं कोण कारणीभूत ठरलं असावं?
आपले डावपेच चुकीचे ठरले! त्यांनी बरोबर आपली शिकार साधली!
एकदा!
फक्तं एकदाच! पुन्हा कधीही अशी संधीही कोणाला द्यायची नाही!
ज्या तंत्राचा वापर करुन त्यांनी आपला पराभव केला तेच तंत्रं आपण वापरलं तर कोणालाच आपल्यापुढे उभं राहणं जमणार नाही!
येस! ठरलं!

कोण होता तो माणूस?

क्लाईव्ह लॉईड!
वेस्ट इंडीजचा कॅप्टन!

१९७५ चा वर्ल्डकप जिंकल्यावर वेस्ट इंडी़ज ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेले होते. वर्ल्डकपमध्ये विजेत्या ठरलेल्या वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलियाने टेस्ट सिरीजमध्ये ५-१ असा फडशा पाडला होता! रॉय फ्रेड्रीक्सच्या १६९ रन्सच्या अफलातून इनिंग्जमुळे पर्थच्या टेस्टमध्ये मिळालेला एकमेव विजय वगळता वेस्ट इंडीजच्या नशिबी पराभवच आला होता! वेस्ट इंडीजच्या पराभवाला मुख्यतः कारणीभूत झाले होते ते ऑस्ट्रेलियाचे दोघे फास्ट बॉलर्स डेनिस कीथ लिली आणि जेफ्री रॉबर्ट थॉमसन! त्यांना तितकीच समर्थ साथ देणारे होते मॅक्स वॉकर आणि गॅरी गिल्मोर!

ऑस्ट्रेलियाप्रमाणेच आपणही किमान चार फास्ट बॉलर्सचा वापर केला तर इतर कोणी सोडाच, खुद्दं ऑस्ट्रेलियाही आपल्या समोर उभी राहू शकणार नाही हे चाणाक्षं लॉईडने अचूक ओळखलं! त्याकाळी वेस्ट इंडीज म्हणजे फास्ट बॉलर्सची खाणच! अ‍ॅंडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डींग, बर्नाड ज्युलियन, कीथ बॉईस हे वेस्ट इंडीजच्या संघात होतेच! लवकरच त्यांच्यात भर पडणार होती ती व्हॅनबर्न होल्डर, कॉलिन क्रॉफ्ट, जोएल गार्नर, सिल्व्हेस्टर क्लार्क आणि सगळ्या धोकादायक माल्कम मार्शल याची!

लॉईडच्या या तंत्राचा पहिला प्रयोग झाला तो भारतावर!

ब्रिजटाऊनच्या पहिल्या टेस्टमध्ये वेस्ट इंडीजने इनिंग्ज आणि ९७ रन्सनी भारताचा पराभव केला. पोर्ट ऑफ स्पेनची दुसरी टेस्ट ड्रॉ झाली असली तरी तिथेच झालेल्या तिसर्‍या टेस्टमध्ये मात्रं वेस्ट इंडीजला अनपेक्षीतरित्या पराभवाची चव चाखावी लागली! पहिल्या इनिंग्जमध्ये १३१ रन्सचा लीड घेतल्यावर लॉईडने भारतासमोर ४०३ रन्सचं टार्गेट ठेवलं तेव्हा आपले बॉलर्स भारताला सहज गुंडाळतील अशी त्याची अपेक्षा होती. परंतु सुनिल गावस्कर (१०२), मोहिंदर अमरनाथ (८५), गुंडाप्पा विश्वनाथ (११२) आणि ब्रिजेश पटेल (४९*) यांच्यामुळे भारताने त्यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड असलेलं टार्गेट गाठलं होतं!

लॉईडला हा पराभव जिव्हारी लागला नसता तरच नवल!

जमेकाच्या चौथ्या टेस्टमध्ये लॉईडने टॉस जिंकून फिल्डींग घेतली, पण हा निर्णय महागात पडणार अशी चिन्हं दिसू लागली होती! गावस्कर (६६) आणि अंशुमन गायकवाड यांनी १३६ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप रचल्यावर होल्डींगने गावस्करची दांडी उडवली. अमरनाथ (३९) आणि विश्वनाथ लवकर परतले तरी एका बाजूने ठामपणे खेळणारा गायकवाड आणि दिलीप वेंगसरकर सावधपणे खेळत असल्याचं पाहून लॉईडने एक वेगळाच पवित्रा घेतला.

आपल्या फास्ट बॉलर्सना अराऊंड द विकेट बॉलिंग करण्याची आणि बंपर्सचा वापर करण्याची त्याने सूचना केली!
परिणाम?

गायकवाड (८१*) आणि ब्रिजेश पटेल (१४*) दोघांनाही बॉल लागल्यामुळे रिटायर होऊन हॉस्पिटलची वाट धरावी लागली! वेंगसरकर (३९) आणि पाठोपाठ वेंकटराघवन आऊट झाल्यावर ३०६ / ६ वर बिशनसिंग बेदीने भारताची इनिंग्ज डिक्लेअर केली! गायकवाड आणि पटेल पुन्हा खेळायला येण्याची शक्यता नव्हती आणि होल्डींग, जुलियन, होल्डर आणि वेन डॅनियल यांच्यासमोर बळीचे बकरे म्हणून उभं राहण्याची चंद्रा आणि स्वतः बेदीची तयारी नव्हती!

वेस्ट इंडीजने पहिल्या इनिंग्जमध्ये ३९१ रन्स काढल्या. भारताच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये गावस्करच्या जोडीला वेंगसरकर सलामीला आला, परंतु मोहिंदर अमरनाथ वगळता मायकेल होल्डींगच्या आपटबारांपुढे उभं राहणं कोणालाच जमलं नाही! अमरनाथने मात्रं कमालीच्या धाडसी चिवटपणाने ६० रन्स काढल्या! त्यात होल्डींगला मारलेल्या हूकच्या तीन सिक्सचा समावेश होता!

अमरनाथ आणि पाठोपाठ वेंकट आऊट झाल्यावर केवळ १२ रन्सचा लीड असताना बेदीने भारताची इनिंग्ज डिक्लेअर केली! गायकवाड, ब्रिजेश पटेल, विश्वनाथ बॅटींग करण्यास असमर्थ होते! उरले होते स्वतः बेदी आणि चंद्रा! त्यांना वेस्ट इंडीजच्या तोफखान्यापुढे देण्यात काहीच अर्थ नव्हता! फ्रेड्रीक्स आणि रो यांनी केवळ २ ओव्हर्समध्ये आवश्यक त्या १३ रन्स काढून मॅच संपवली!

(दुसर्‍या इनिंग्जमध्ये मदनलालने पहिली ओव्हर टाकल्यावर दुसरी ओव्हर टाकणारा बॉलर होता दिलीप वेंगसरकर!)

चार फास्ट बॉलर्स आणि शॉर्टपीच बॉलिंगचा वापर करण्याचं आपलं तंत्रं यशस्वी ठरणार याबद्दल लॉईडच्या मनात कोणतीच शंका उरली नाही!

भारताविरुद्धची सिरीज संपल्यावर इंग्लंडच्या दौर्‍यावर लॉईड वेस्ट इंडीजच्या संघासह गेला तो चार फास्ट बॉलर्स आणि शॉर्टपीच बॉलिंगच्या तंत्राचा पुरेपूर वापर करण्याच्या इराद्यानेच!

लॉईडच्या संघातील खेळाडूंची नावंच कोणाच्याही छातीत धडकी भरवण्यास पुरेशी होती. स्वतः लॉईड, रॉय फ्रेड्रीक्स, गॉर्डन ग्रिनीज, अल्विन कालिचरण, लॉरेन्स रो आणि व्हिव्हियन रिचर्ड्स असे एकापेक्षा एक बॅट्समन वेस्ट इंडी़ज संघात होते. बॉलर्स तर त्यांच्याहूनही खतरनाक! अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डींग, व्हॅनबर्न होल्डर, बर्नाड जुलियन हे चौघे फास्ट बॉलर्स आणि त्यांच्या जोडीला कॉलिस किंगसारखा ऑलराऊंडर! त्याशिवाय तरूण वेन डॅनियल होताच! रफीक जुमादिन आणि पॅडमोर हे स्पिनर्स असले तरी त्यांना कितपत संधी मिळेल याबद्दल शंकाच होती. त्याविना डेरेक मरेसारखा विकेटकीपर होताच!

वेस्ट इंडीजच्या चार फास्ट बॉलर्सचा आणि त्यांच्या शॉर्टपीच बॉलिंगचा प्रसाद एमसीसी ११ विरुद्धच्या पहिल्याच तीन दिवसांच्या मॅचमध्ये इंग्लिश खेळाडूंना चाखण्यास मिळाला! मायकेल होल्डींगचा एक शॉर्टपीच बॉल डेनिस एमिसच्या डोक्यावर आदळला! एमिसच्या सुदैवाने मोठी दुखापत झाली नसली तरी त्याचा आत्मविश्वास मात्रं चांगलाच डळमळीत झाला होता! इतर अनेक बॅट्समननाही होल्डींग - रॉबर्ट्स - होल्डर यांनी 'शेकवून' काढलं होतं! प्रत्यक्षं टेस्ट सिरीजमध्ये इंग्लंडच्या बॅट्समननाही याच डावपेचांना आणि तुफानी बॉलिंगला सामोरं जावं लागणार याबद्दल कोणाच्याच मनात शंका उरली नव्हती!

इंग्लंडच्या सिलेक्टर्सचही नेमकं हेच मत पडलं! वेस्ट इंडीजच्या तुफानी बॉलिंगला तोंड द्यायचं असेल तर अत्यंत थंड डोक्याने खेळणारा, जिगरबाज आणि धाडसी खेळाडूच हवा या निष्कर्षाला सिलेक्टर्स आले होते!

... आणि त्यांना आठवण झाली ती ४५ वर्षांच्या ब्रायन क्लोजची!

पहिल्या टेस्टपूर्वी जवळपास सर्व वर्तमानपत्रांच्या रिपोर्टर्सनी वेस्ट इंडीजच्या तुलनेत इंग्लंडला जिंकण्याची अजिबात शक्यता नाही असं भाकीत वर्तवलं होतं. इंग्लिश खेळाडू त्यामुळे अर्थातच नाराज होते, पण सर्वात जास्तं कोणी वैतागलं असेल तर तो म्हणजे इंग्लंडचा कॅप्टन टोनी ग्रेग! प्रत्येक पत्रकारपरिषदेत आणि टीव्ही चॅनलवरच्या इंटरव्ह्यूमध्ये वेस्ट इंडीयन फास्ट बॉलर्सबद्दल आणि इंग्लंडला विजयाची अजिबात शक्यता नसल्याचं ऐकून ग्रेग इतका वैतागला की पहिल्या टेस्टच्या आदल्या दिवशी बीबीसीच्या स्पोर्ट्सनाईट या कार्यक्रमात मुलाखत देताना तो उद्गारला,

“I like to think that people are building these West Indians up, because I am not really sure they’re as good as everyone thinks they are! Sure, they’ve got a couple of fast bowlers, but … you must remember that (if) the West Indian get on top they are magnificent cricketers, but if they’re down, they grovel. And I intend, with the help of Closey and a few others, to make them grovel.”

टोनी ग्रेगच्या या वक्तव्याने गहजब झाला!

Grovel हा शब्दं वेस्ट इंडीयन खेळाडूच काय पण सामान्यं माणसाच्या दृष्टीनेही अत्यंत अपमानास्पद आहे! बहुसंख्य वेस्ट इंडीयन लोकांची पार्श्वभूमी ही गुलामगिरीची आहे. त्यांच्यादृष्टीने या शब्दाचा उल्लेख गुलामगिरीच्या पार्श्वभूमीची जाणूनबुजून हेटाळणी करणारा होता! त्यातच टोनी ग्रेग हा मूळचा दक्षिण आफ्रीकन! दक्षिण आफ्रीकेत असलेल्या वर्णद्वेषी (अपार्थाईड) व्यवस्थेमुळे दक्षिण आफ्रीकेवर १९७०-७१ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून तडीपार होण्याची वेळ आली होती. अशा परिस्थितीत टोनी ग्रेगने Grovel शब्दाचा जाहीर उल्लेख करण्याला वर्णद्वेषी रंग आला नसता तरच नवंल!

वेस्ट इंडीयन खेळाडूच काय, पण इंग्लंडमध्ये बर्‍याच मोठ्या संख्येने असलेल्या सामान्य वेस्ट इंडीयन लोकांमध्येही ग्रेगच्या या वक्तंवयाने असंतोष पसरला!

आणि वेस्ट इंडीयन खेळाडू?

कॅप्टन क्लाईव्ह लॉईडने ग्रेगवर वर्णभेदाचा उघड आरोप केला नाही तरी तो म्हणाला,
"The word 'grovel' is one guaranteed to raise the blood pressure of any black man. The fact they were used by a white South African made it even worse. We were angry and West Indians everywhere were angry. We resolved to show him and everyone else that the days for grovelling were over."

लॉईडने वर्णभेदाचा आरोप केला नाही तरी त्याच्या इतर सहकार्‍यांना मात्रं तसं वाटत नव्हतं!

गॉर्डन ग्रिनीजच्या मते ग्रेगसारख्या उच्चशिक्षीत आणि सुशिक्षीत माणसाने Grovel हा शब्दं चुकीने वापरला असण्याची शक्यंताच नव्हती!

रिचर्ड्सने चक्कं डिक्शनरी शोधून त्यात Grovel चा अर्थ शोधून काढला!
“In other words, he was going to have us down on our knees, begging for mercy!" रिचर्ड्स म्हणाला, "This was the greatest motivating speech the England Captain could have given to any West Indian team.”

मायकेल होल्डींग म्हणाला,
“Everybody took exception to the comment. We thought, ‘This guy needs to be put in his place.’… He was a white South African. It smacked of racism and apartheid. He got our backs up and made us more determined.”

आपलं वक्तंव्य हे वर्णद्वेषातून आलेलं नव्हतं हे ग्रेगने ठासून सांगितलं. अ‍ॅलन नॉट आणि बॉब विलीस या त्याच्या सहकार्‍यांनी ग्रेगला पाठिंबा दिला असला तरी इंग्लंड संघातील इतर खेळाडूंनाही ग्रेगच्या या वक्तव्यामुळे आणि विशेषतः Grovel या शब्दामुळे काय परिस्थिती उद्भवू शकते याची नेमकी कल्पना होती!

ऑफस्पीनर पॅट पोकॉकची पहिली रिअ‍ॅक्शन होती,
"You prat ...what have you done? You don't do that sort of thing, winding them up for no reason."

माईक ब्रिअर्ली म्हणाला,
"The words carried an especially tasteless and derogatory overtone."

खुद्दं टोनी ग्रेगच्या वडीलांनी त्याला फोन करुन त्याची चांगलीच हजेरी घेतली! फोनवर त्यांनी विचारलं,
"Do you possess a dictionary?"

आपल्या वक्तव्यामुळे इतका गहजब होईल याची ग्रेगला सुतराम कल्पना नव्हती! वर्णद्वेषाचा रंग मिळाल्यावर बहुधा त्याला सगळ्या गहजबाची नेमकी कल्पना आली असावी! आपल्या वक्तंव्याबद्दल त्याने जाहीर दिलगीरी व्यक्तं केली. इतकंच नव्हे तर लंडनमधल्या कृष्णवर्णीयांच्या रेडीओ चॅनलवर दिलेल्या मुलाखतीतही खेद व्यक्तं करताना तो म्हणाला,

"I'm a press-man's dream! If you talk to me long enough I will say something controversial. I am bound to offend someone and get myself into deep water. 'Grovel' was simply an instance of that!"

या खुलाशामुळे कोणाचंही समाधान झालं नाही!

लॉईड आपल्या सहकार्‍यांना इतकंच म्हणाला,
“I need not say anything more, our man on the television has just said it for us!”

या पार्श्वभूमीवर पहिली टेस्ट झाली ती ट्रेंट ब्रिजला!

टॉस जिंकून लॉईडने बॅटींग घेतल्यावर इंग्लिश खेळाडू फिल्डींगसाठी मैदानात उतरले. टोनी ग्रेगने मैदानात पाऊल टाकलं न् टाकलं तोच..

“gro-vel, gro-vel.” प्रेक्षकांमधील वेस्ट इंडीयन लोकांनी आरोळ्या ठोकल्या!

रॉय फ्रेड्रीक (४२) आणि गॉर्डन ग्रिनीज (२२) यांनी वेस्ट इंडीजला ३६ रन्सची सलामी दिली. रॉय फ्रेड्रीक्स एका बाजूने नेहमीप्रमाणे आक्रमक न खेळता खूपच स्लो खेळत होता. अर्थात त्याला फास्ट खेळण्याची आवश्यकताही नव्हती कारण माईक हेंड्रीकच्या बॉलवर जॉन एड्रीचने ग्रिनीजचा कॅच घेतल्यावर मैदानात उतरलेला व्हिव्हिअन रिचर्ड्स! पहिल्या बॉलपासून रिचर्ड्सने इंग्लिश बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली होती!

वेस्ट इंडीजने पहिल्या इनिंग्जमध्ये ४९४ रन्सची मजल मारली! त्यात रिचर्ड्सच्या २३२ रन्स होत्या! अल्विन कालिचरण (९७) बरोबर रिचर्ड्ने ३०३ रन्सची पार्टनरशीप केली! परंतु रिचर्ड्स आऊट झाल्यावर इतर कोणालाच फारसं काही करता आलं नाही! ४०८ / ३ वरुन वेस्ट इंडीजची इनिंग्ज ४९४ मध्ये आटपली ती मुख्यतः डेरेक अंडरवूड आणि क्रिस ओल्ड यांच्यामुळे!

बर्नाड जुलियनने पहिलीच टेस्ट खेळणार्‍या माईक ब्रिअर्लीची मिडल स्टंप उखडली तेव्हा इंग्लंडची एकही रन झालेली नव्हती. जॉन एड्रीच (३७) आणि डेव्हीड स्टील यांनी ९८ रन्सची पार्टनरशीप केल्यावर वेन डॅनियलने एड्रीच आणि ब्रायन क्लोज दोघांनाही गुंडाळलं. १०५ / ३ वरुन इंग्लंडला सावरलं ते स्टील आणि बॉब वूल्मर (८२) यांच्या १२१ रन्सच्या पार्टनरशीपमुळे! अखेर डॅनियलच्या बॉलवर अँडी रॉबर्ट्सने स्टीलचा (१०६) कॅच घेतला. इंग्लंड २२६ / ४!

स्टील आऊट झाल्यावर खेळायला आला टोनी ग्रेग!

अँडी रॉबर्ट्सचा पहिलाच बॉल सुसाटपणे ग्रेगच्या टोपीची कड घेऊन विकेटकीपर डेरेक मरेच्या हातात गेला!
प्रत्येक बॉलगणिक रॉबर्ट्स आणि होल्डींगचा वेग वाढत होता!
सहा बॉल ग्रेगने तग धरली...

पुढची सगळी ओव्हर बॉब वूल्मरने खेळून काढली. ग्रेग खेळायला आल्याचा इतका परिणाम वेस्ट इंडीयन बॉलर्सवर झाला होता, की तुफान वेगात आलेल्या होल्डींगचा बॉल डोक्यावर लागण्यापासून वूल्मर थोडक्यात बचावला!

पुढच्या ओव्हरचा पहिल्या बॉलवर स्ट्राईकवर पुन्हा टोनी ग्रेग!

रॉबर्ट्सचा तो इनस्विंगर तुफान वेगाने आत आला आणि पापणी लवण्यापूर्वी ग्रेगची स्टंप उडाली!
७ व्या बॉलला बोल्ड झालेल्या टोनी ग्रेगला खातंही खोलण्याची संधी मिळाली नाही!

इंग्लंडने ३३२ पर्यंत मजल मारल्यावर दुसर्‍या इनिंग्जमध्ये १७६ / ५ वर लॉईडने वेस्ट इंडीजची इनिंग्ज डिक्लेयर केली. ३३९ रन्सचं टार्गेट घेऊन खेळायला उतरलेल्या इंग्लंडची ब्रिअर्ली आणि स्टील आऊट झाल्यावर ५५ / २ अशी अवस्था झाली होती, परंतु जॉन एड्रीच (७६*) आणि ब्रायन क्लोज (३६*) यांनी १०१ रन्सची पार्टनरशीप रचल्यामुळे आणि पावसामुळे अखेर टेस्ट ड्रॉ झाली!

लॉर्ड्सच्या दुसर्‍या टेस्टपूर्वीच वेस्ट इंडीजला एक अनपेक्षीत धक्का बसला!
पोट बिघडल्यामुळे व्हिव्हीयन रिचर्ड्स लॉर्ड्सच्या दुसर्‍या टेस्टमध्ये खेळू शकणार नव्हता!

टॉस जिंकल्यावर टोनी ग्रेगने बॅटींग करण्याचा निर्णय घेतला खरा, पण बॅरी वूड आणि स्टील दोघांनाही रॉबर्ट्सने झटपट गुंडाळलं! ब्रिअर्ली (४०) आणि क्लोज (६०) यांनी ८४ रन्सची पार्टनरशीप करुन इंग्लंडला सावरलं, परंतु बॉब वूल्मर (३८) आणि डेरेक अंडरवूड (३१) यांच्याशिवाय इतर कोणीच फारसं काही करु शकलं नाही!

टोनी ग्रेगने ६ रन्स केल्यावर लॉईडने रॉबर्ट्सच्या बॉलवर त्याचा कॅच घेतला!

क्रिस ओल्डने वेस्ट इंडीजला पहिल्याच ओव्हरमध्ये हादरवलं. रॉय फ्रेड्रीक्सचा दुसर्‍याच बॉलवर हूक मारण्याचा प्रयत्नं लाँगलेगला जॉन स्नोच्या हातात सापडला! जॉन स्नोने लॅरी गोम्स आणि अल्विन कालीचरणला झटपट गुंडाळल्यामुळे वेस्ट इंडीजची अवस्था ४० / ३ अशी झाली! ग्रिनीज (८४) आणि लॉईड (५०) यांनी ९९ रन्सची पार्टनरशीप करुन वेस्ट इंडिजला सावरलं, परंतु डेरेक अंडरवूडच्या बॉलवर स्नो ने ग्रिनीजचा कॅच घेतल्यावर अंडरवूड आणि स्वतः स्नो यांच्यापुढे वेस्ट इंडीजची इनिंग्ज १८२ मध्ये आटपली!

६८ रन्सचा लीड घेतल्यावर इंग्लंडने दुसर्‍या इनिंग्जमध्ये २५४ रन्स फटकावल्या त्या मुख्यतः स्टील (६४), क्लोज (४६) आणि वूड (३०) यांच्यामुळे. टोनी ग्रेगने सिरीजमधल्या आतापर्यंतच्या आपल्या सर्वोच्च - २० रन्स काढल्या!

३२३ रन्सचं टार्गेट घेऊन उतरलेल्या वेस्ट इंडीजने पाचव्या दिवसाअखेरीस २४१ / ६ पर्यंत मजल मारली ती मुख्यत: रॉय फ्रेड्रीक्समुळे! १४ बाऊंड्री आणि अंडरवूडला मारलेल्या सिक्सच्या जोरावर फ्रेड्रीक्सने १३८ रन्स फटकावल्या! परंतु कालीचरण (३४) आणि लॉईड (३३) वगळता इतरांची त्याला साथ मिळाली नाही. अर्थात तिसरा संपूर्ण दिवस पावसामुळे फुकट गेल्याने मॅच ड्रॉ होणार हे जवळपास नक्कीं झालं होतंच!

तिसरी टेस्ट होती ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरला!

तिसर्‍या टेस्टच्या आधी टोनी ग्रेगने ब्रायन क्लोजची गाठ घेऊन जॉन एड्रीचबरोबर ओपनिंग्ला येण्याबद्दल विचारणा केली! वास्तविक आतापर्यंत मिडल ऑर्डरमध्ये खेळत असला तरी मूळचा ओपनर असलेला बॉब वूल्मर टीममध्ये असूनही टोनीने आपल्याला हा प्रश्न का विचारला असावा हे क्लोजला कळेना!

"You must be bloody crackers. I haven't opened the innings in a first-class match for several years!" क्लोज म्हणाला, "What's the matter with Bob Woolmer?"

"'We don't want him killed off!" ग्रेग उत्तरला, "There is a lot of Test cricket left in him!"

"Anything could happen with the new ball against West Indies!" क्लोज म्हणाला, "I had pulled the team out of trouble in the first two Tests at Trent Bridge and Lord's. It's stupid asking me to open the innings!"

अर्थात कोणत्याही परिस्थितीत संघहिताला कायम प्राधान्यं देणारा क्लोज सलामीला येणार याबद्दल टोनीला कोणतीही शंका नव्हती!

वेस्ट इंडीजने टॉस जिंकून बॅटींग घेतली खरी, परंतु गॉर्डन ग्रिनीज (१३४) आणि काही प्रमाणात कॉलिस किंग (३२) यांचा अपवाद वगळता कोणालाच फारसं काही करता आलं नाही! पहिलीच टेस्ट मॅच खेळणारा माईक सिल्व्ही (४) आणि डेरेक अंडरवूड (३) यांनी वेस्ट इंडीजला २११ मध्ये गुंडाळलं! अर्थात पहिल्याच दिवशी वेस्ट इंडीजला गुंडाळल्याचा आनंद इंग्लंडला फार काळ उपभोगता आला नाही! होल्डींग (५), रॉबर्ट्स (३) आणि डॅनियल (२) यांनी इंग्लंडचा ७१ रन्समध्ये खुर्दा उडवला! डेव्हीड स्टील (२०) वगळता इतर कोणालाही १० रन्ससुद्धा काढता आल्या नाही! वेन डॅनियलच्या यॉर्करवर ९ रन्स काढणार्‍या टोनी ग्रेगची मधली स्टंप उडाली होती!

पहिल्या इनिंग्जमधलं अपशय सलत असलेल्या वेस्ट इंडीजच्या बॅट्समननी इंग्लिश बॉलर्सवर सुरवातीपासूनच आक्रमक हल्ला चढवला! रॉय फ्रेड्रीक्स (५०) बरोबर ११६ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप करणार्‍या ग्रिनीजने रिचर्ड्सबरोबर १०८ रन्स फटकावल्या! पहिल्या इनिंग्जप्रमाणे दुसर्‍या इनिंग्जमध्येही ग्रिनीजने (१०१) शतक फटकावलं! ग्रिनीज आऊट झाल्यावर रिचर्ड्सने लॉईडबरोबर १३२ रन्सची पार्टनरशीप रचली! लॉर्ड्सच्या टेस्टमध्ये खेळू न शकलेल्या रिचर्ड्सने ती कसर भरुन काढत १३५ रन्स फटकावल्या! अखेर तिसर्‍या दिवशी दुपारी ४११ / ५ वर वेस्ट इंडीजची इनिंग्ज डिक्लेअर करत लॉईडने इंग्लंडला मॅच जिंकण्यासाठी ५२५ रन्सचं अशक्यंप्राय टार्गेट दिलं!

वेस्ट इंडीजच्या तोफखान्याचा मुकाबला करण्यास उतरले जॉन एड्रीच आणि ब्रायन क्लोज!

पुढची ८० मिनीटं - त्या ८० मिनीटांचा काळ हा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात भितीदायक काळ होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये!

तुफान वेगाने आणि शॉर्टपीचचा मुक्तं वापर करणारा २२ वर्षांचा तरूण फास्ट बॉलर मायकेल होल्डींग...
त्याच्या जोडीला पंचवीशीचा तितकाच खतरनाक अँडी रॉबर्ट्स...
अवघा विशीचा वेन डॅनियल...
आणि
त्यांच्या बाँबगोळ्यांचा मुकाबला करणारे..
३९ वर्षांचा जॉन एड्रीच आणि ४५ वर्षांचा ब्रायन क्लोज!

होल्डींगचे तुफान वेगाने उसळत असलेले बंपर्स एड्रीच बचावात्मक पद्धतीने खेळत होता, परंतु यॉर्कशायरचा खडूसपणा पुरेपूर अंगात मुरलेला आणि कमालिची धडाडी आणि जिगर असलेला ब्रायन क्लोज बिनदिक्कतपणे बॉलचा मारा सर्वांगावर घेत होता किंवा अगदी शेवटच्या क्षणी सोडून देत होता! डिफेन्सिव पद्धतीने बॉल खेळताना कॅच देणं क्लोजला मंजूर नव्हतं!

त्याकाळी एका ओव्हरमध्ये किती बंपर्स टाकावे यावर कोणतंही बंधन नव्हतं! होल्डींगच्या एका ओव्हरमध्ये त्याने क्लोजला लागोपाठ तीन तुफानी बंपर्स टाकले! प्रत्येक वेळी बॉलवर नजर ठेवत अगदी एक शतांश सेकंद आधी क्लोजने आपलं डोकं मागे घेतल्यामुळे मोठी दुखापत होण्याचा धोका टळला होता! बॉल लागला असता तर क्लोज भयानक जखमी झाला असता आणि कदाचित त्याच्या जीवावरही बेतलं असतं, कारण बॉल डोक्याच्या मागच्या बाजूस लागला असता!

रॉबर्ट्स, होल्डींग आणि डॅनियल यांनी टाकलेल्या १३ ओव्हर्सपैकी स्टंपला लागू शकतील असे केवळ १० बॉल होते!

बाकीचे सर्व बंपर्स!

मॅचनंतर क्लोज म्हणाला,
"That was the worst Test wicket, Old Trafford, at the time we played on! It was very dry. The groundsmen weren't allowed to use water while preparing wickets. Therefore the faster you bowled, the ball went through the top surface and lifted and did all kinds of things. I remember one Roberts ball pitched short of a length and nearly rolled along the floor."

दिवसाचा खेळ संपण्यास पाच ओव्हर्स बाकी असताना टोनी ग्रेगने गरज पडल्यास नाईटवॉचमन म्हणून जाण्याची तयारी करण्याची डेरेक अंडरवूडला सूचना केली, परंतु अंडरवूडने साफ नकार दिला! वन डाऊन येणारा डेव्हीड स्टील जखमी असल्यामुळे आणि अंडरवूडने नाईटवॉचमन म्हणून येण्यास नकार दिल्याने बॉब वूल्मर देवाचा धावा करत तयार होऊन बसला होता! आपल्या जागी वूल्मर तिसर्‍या क्रमांकावर खेळण्यास तयार आल्याबद्दल आभार मानताना स्टील म्हणाला,

"I would repay the favour one day!" स्टील वूल्मरला म्हणाला.
"I hope I live to see that day!" वूल्मर शांतपणे उत्तरला!

परंतु एड्रीच आणि क्लोज यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडीजला दाद दिली नाही! १३ ओव्हर्समध्ये त्यांनी २१ रन्स काढल्या! त्यात क्लोजची अवघी १ रन होती!

जोडीला अंगभर बॉल लागल्याच्या खुणा आणि अनेक बारीक-बारीक जखमा!

"You should see the state of the ball.." क्लोज थंडपणे आपल्या सहकार्‍यांना म्हणाला, "There's no shine on it. It's all on me."

मायकेल होल्डींगची ती भयानक ओव्हर

इंग्लिश वृत्तपत्रांनी बंपर्सच्या अतिरेकाबद्दल वेस्ट इंडीयन बॉलर्स आणि त्यांना आवर न घातल्याबद्दल लॉईडवर टीकेची झोड उठवली.

लॉईड म्हणाला,
"Our fellows got carried away. They knew they had only 80 minutes that night to make an impression and they went flat out, sacrificing accuracy for speed. They knew afterwards they had bowled badly."

एड्रीच आणि क्लोजनी दुसर्‍या दिवशी इंग्लंडला ५४ पर्यंत नेल्यावर डॅनियलने एड्रीचची दांडी उडवली! एव्हाना दुखापतीतून सावरलेला स्टील वन डाऊन आला खरा, पण तो जेमतेम सेटल होतो न होतो तोच रॉबर्ट्सने क्लोज आणि ज्याला वाचवण्यासाठी क्लोजला ओपनिंगला पाठवलं होतं तो बॉब वूल्मर यांना लागोपाठच्या बॉलवर पॅव्हेलियनची वाट दाखवली!


ब्रायन क्लोज - बोल्ड रॉबर्ट्स

फ्रँक हेसने रॉबर्ट्सची हॅटट्रीक हुकवली खरी पण हेस आणि स्टील यांनी आणखीन २० रन्स जोडल्यावर होल्डींगला हूक मारण्याचा स्टीलचा प्रयत्न फसला आणि रॉबर्ट्सने त्याचा कॅच घेतला!

स्टील परतल्यावर खेळायला आला टोनी ग्रेग!

रॉबर्ट्स आणि विशेषतः होल्डींग ग्रेगवर बंपर्सचा मारा करणार अशी स्वतः टोनी सकट सर्वांची अपेक्षा होती, परंतु होल्डींगने यॉर्करवर ग्रेगची दांडी उडवली!

रॉबर्ट्सने ६ तर होल्डींग - डॅनियलने २-२ विकेट्स घेतल्या!
इंग्लंडचा १२६ रन्समध्ये खिमा झाला!
तब्बल ४२५ रन्सनी वेस्ट इंडीजने मॅच जिंकली!

इंग्लंडच्या ड्रेसिंगरुममध्ये स्मशानशांतता पसरलेली होती! आपल्या सहकार्‍यांचं कोणत्या शब्दांत सांत्वन करावं हे टोनी ग्रेगला समजत नव्हतं! अर्थात तो स्वतःही मानसिकरित्या उध्वस्तं झाला होता.

“I’ve had enough, I can’t handle it anymore!” आपल्या जिवलग मित्राला, अ‍ॅलन नॉटला उद्देशून ग्रेग म्हणाला!

चौथ्या टेस्टच्या आधी इंग्लिश सिलेक्टर्सनी ब्रायन क्लोज - जॉन एड्रीज या दोघांनाही डच्चू दिला! वास्तविक पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये क्लोज आणि एड्रीचनी मोक्याच्या क्षणी उत्तम बॅटींग करत इंग्लंडला सावरलं होतं! तिसर्‍या टेस्टमधला दोघांचाही जिगरबाज साहसी खेळ कोणाच्याच स्मृतीतून पुसला जाणार नव्हता! परंतु इंग्लंडच्या सिलेक्टर्सना मात्रं नवीन खेळाडूंना संधी द्यायची होती! एड्रीच आणि क्लोजच्या जागी वर्णी लावण्यात आली ती क्रिस बाल्डर्स्टोन आणि पीटर विली यांची!

लीड्सच्या चौथ्या टेस्टमध्ये टॉस जिंकल्यावर लॉईडने बॅटींगचा निर्णय घेतला. ग्रिनीज (११५) आणि फ्रेड्रीक्स (१०९) यांनी १९२ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली! रिचर्ड्स (६०) आणि लॉरेन्स रो (५०) यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेत वेस्ट इंडीजला ४५० पर्यंत मजल मारुन दिली!

एड्रीच आणि क्लोज दोघांनाही ड्रॉप केल्यामुळे ओपनिंगची जबाबदारी आली ती बॉब वूल्मर आणि डेव्हीड स्टील यांच्यावर! परंतु होल्डींगने स्टीलची दांडी उडवत इंग्लंडला सुरवातीलाच हादरवलं! वूल्मर आणि फ्रँक हेसही झटपट आऊट झाल्यामुळे इंग्लंडची अवस्था ३२ / ३ अशी झाली! पहिल्याच टेस्टमध्ये खेळणार्‍या पीटर विलीने आक्रमक पवित्रा घेत ४० बॉलमध्ये ३६ रन्स फटकावल्या, परंतु अँडी रॉबर्ट्सने त्याला एलबीड्ब्ल्यू पकडलं! इंग्लंड ८० / ४!

विली आऊट झल्यावर खेळायला आला टोनी ग्रेग!
पहिल्या तीन टेस्ट्समध्ये ५ इनिंग्ज मिळून त्याला ३८ रन्स काढता आल्या होत्या!

ग्रेग खेळायला येताच रॉबर्ट्स आणि होल्डींगनी त्याच्यावर शॉर्टपीच बॉल्सचा मुक्तं वापर करत हल्ला चढवला! इतर कोणीही खेळाडू असता तर तो त्या हल्ल्याने हादरुन गेला असता! पण टोनी ग्रेग?

त्याने तितक्याच जोशात दोघांवर प्रतिहल्ला चढवला!

रॉबर्ट्स आणि होल्डींगचा प्रत्येक शॉर्टपीच बॉल हूक किंवा पूल मारण्याचं आणि फुल लेंग्थ बॉल पडल्यास ड्राईव्ह करण्याचं तंत्रं त्याने अवलंबलं होतं!
पण इतक्यावर भागलं नव्हतं!
होल्डींगच्या यॉर्करला तोंड देण्याचाही त्याने खास मार्ग शोधून काढला होता!

क्रीजच्या जवळपास दीड फूट पुढे त्याने गार्ड घेतला होता! होल्डींगचा यॉर्कर आला तर आणखीन पुढे सरसावत फुलटॉस खेळण्याचा त्याने सपाटा लावला!

क्रिस बाल्डेर्स्टोनसह ग्रेगने ८९ रन्सची पार्टनरशीप केली, परंतु ग्रेगची खरी जोडी जमली ती अ‍ॅलन नॉटबरोबर! वेस्ट इंडीजच्या बॉलर्सना यत्किंचीतही दाद न देता ग्रेग आणि नॉट यांनी १५२ रन्स फटकावल्यावर अखेर वेन डॅनियलच्या बॉलवर लॉईडने स्लीपमध्ये ग्रेगचा कॅच घेतला तेव्हा त्याने ११६ रन्स फटकावल्या होत्या! ग्रेग आऊट झाल्यावरही नॉटची फटकेबाजी सुरुच होती! सर्वात शेवटी ग्रेगप्रमाणेच ११६ रन्स काढून तो आऊट झाला तेव्हा इंग्लंडच्या ३८७ रन्स झाल्या होत्या!

वेस्ट इंडीजच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये मात्रं कॉलीस किंग (५८) वगळता कोणालाच काही करता आलं नाही! बॉब विलीसने ५ विकेट्स घेत वेस्ट इंडीजला १९६ मध्ये गुंडाळलं!

मॅच जिंकून सिरीजमध्ये १-१ अशी बरोबरी साधण्यासाठी इंग्लंडला २६० रन्सची आवश्यकता होती!

अँडी रॉबर्ट्सने स्टील, फ्रँक हेस आंणि बाल्डेर्स्टोन यांना झटपट गुंडाळल्यावर इंग्लंडची अवस्था २३ / ३ अशी झाली! बॉब वूल्मर आणि पीटर विली यांनी सावधपणे बॅटींग करत इंग्लंडला ८० पर्यंत नेलं, पण व्हॅनबर्न होल्डरने वूल्मर(३७) ला एलबीडब्ल्यू करुन ही पार्टनरशीप फोडली!

वूल्मर आऊट झाल्यावर खेळायला आला टोनी ग्रेग!

पहिल्या इनिंग्जप्रमाणे दुसर्‍या इनिंग्जमध्येही ग्रेगने आक्रमक पवित्रा घेत वेस्ट इंडीजच्या बॉलर्सवर हल्ला चढवला! होल्डींग - रॉबर्ट्स यांना फटकावून काढण्याचं तंत्रं त्याने अंमलात आणलं होतं! ग्रेग आणि विली यांनी ६० रन्सची पार्टनरशीप केल्यावर होल्डींगच्या बॉलवर रॉबर्ट्सने विली (४५) चा कॅच घेतला. इंग्लंड १४० / ५!
विली परतल्यावर इंग्लंडची इनिंग्ज कोसळली! अंडरवूड, नॉट, स्नो, विलीस, अ‍ॅलन वार्ड यांच्यापैकी कोणीही वेस्ट इंडीजसमोर उभं राहू शकलं नाही! टोनी ग्रेग एका बाजूने फटकेबाजी करत असताना दुसर्‍या बाजूने डॅनियल आणि होल्डींग यांनी इंग्लंडला २०४ मध्ये गुंडाळलं!

टोनी ग्रेग ७६ रन्स फटकावून नॉटआऊट राहिला, परंतु त्याला साथ देण्यास कोणीच उरलं नाही!
वेस्ट इंडीजने ५५ रन्सने मॅच जिंकून सिरीजमध्ये २-० अशी विजयी आघाडी घेतली!


रिचर्ड्स आणि होल्डींग विजयाचा आनंद घेताना!

पाचवी टेस्ट होती ओव्हलच्या मैदानात!

टेस्टच्या आदल्या दिवशी आपल्या सहकार्‍यांसह डिनर घेताना टोनी ग्रेग विनोदाने उद्गारला,
"We may not be able to out-bat or out-bowl them but we can at least out-field them!"

ग्रेगने गंमत म्हणून हे वक्तंव्य केलं होतं, पण आपल्या आणि सहकार्‍यांच्या नशिबात नेमकं तेच लिहीलेलं आहे याची पुसटशी तरी कल्पना त्याला होती का?

लॉईडने टॉस जिंकून बॅटींग घेतली, पण विलीसने ग्रिनीजला एलबीडब्ल्यू करुन वेस्ट इंडीजला सुरवातीलाच हादरवलं!

फ्रेड्रीक्स आणि रिचर्ड्स यांनी इंग्लिश बॉलींगवर तुफान हल्ला चढवला! विलीस, सिल्वी, अंडरवूड, ग्रेग, मिलर आणि पीटर विली यांना फटकावून काढत त्यांनी १५९ रन्सची पार्टनरशीप केल्यावर मिलरच्या बॉलवर बाल्डेर्स्टोनने फ्रेड्रीक्सचा कॅच घेतला. फ्रेड्रीक्स परतल्यावर रिचर्ड्ची जोडी जमली ती लॉरेन्स रोशी! रिचर्ड्स आणि रो यांनी १९१ रन्स फटकावल्या! पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडीजने ३७३ रन्स फटकावल्या होत्या!
रिचर्ड्स २०० रन्स फटकावून नॉटआऊट होता!

टेस्टमध्ये असलेल्या दोन अंपायर्सपैकी एक होता डिकी बर्ड! तो म्हणतो,
"Richards' innings was one of the best I've ever seen. It was just awesome. His range of shots was magnificent all around the wicket!"

रिचर्ड्सच्या २०० रन्स झाल्यावर प्रेक्षकांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेले वेस्ट इंडीयन मैदानावर धावून आले!

डिकी बर्ड म्हणतो,
"There were discarded rum bottles and Coke cans all over the pitch. The West Indies supporters were all good-natured though. One big West Indian chap came up to me and put his arm around me and called me 'Professor Dickie Bird: the professor of cricket'!"

दुसर्‍या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा सर्वांना एकाच गोष्टीची उत्सुकता होती!
रिचर्ड्स गॅरी सोबर्सचा ३६५ रन्सचा रेकॉर्ड मोडणार का?

रिचर्ड्स आणि लॉईड (८४) यांनी १७४ रन्सची पार्टनरशीप केल्यावर टोनी ग्रेगला मिडविकेटला अ‍ॅक्रॉस द लाईन सिक्स मारण्याचा रिचर्ड्सचा प्रयत्नं फसला आणि त्याचा ऑफस्टंप उडाला!

रिचर्ड्सने २९१ रन्स फटकावल्या होत्या!
त्यात ३८ बाऊंड्री होत्या!

रिचर्ड्स आऊट होऊन परतत असताना एका टीव्ही चॅनलच्या प्रतिनिधीनी त्याला जेमतेम बाऊंड्रीपार आल्यावर गाठून विचारलं,

"You were so close to 300. Couldn't you have played it differently?"
"I was not playing for records! I was playing for those people out there! To please them!"
जल्लोष करत असलेल्या वेस्ट इंडीयन प्रेक्षकांकडे निर्देष करत रिचर्ड्स उत्तरला!

माईक सिल्व्ही म्हणतो,
"Even to this day I can't work out why he got out. Tony Greig got him out somehow through a combination of bowled, caught and stumped. He had never looked like getting out and he was on course to beat Sobers' record. It was not a question of if but when?"

रिचर्ड्स - लॉईड आऊट झाल्यावरही कॉलिस किंग आणि डेरेक मरे यांनी ९३ रन्सची पार्टनरशीप करुन इंग्लंडची पार दमछाक करुन टाकली! अखेर ६८७ / ८ अशा स्कोअरवर लॉईडने वेस्ट इंडीजची इनिंग्ज डिक्लेअर केली!

वेस्ट इंडीजच्या इनिंग्जमधल्या १८३ ओव्हर्सपैकी ६१ ओव्हर्स टाकल्या होत्या त्या डेरेक अंडरवूडने!

माईक सिल्व्ही म्हणतो,
"I remember looking around while Derek Underwood was bowling. Derek looked terrible by that point and in the field he had the likes of David Steele, Bob Woolmer, Peter Willey and me. I don't think a bigger set of stiffs have fielded for England in a Test. I thought: `Well said, Greigy!'"

सिल्व्हीचा रोख होता तो अर्थात टोनी ग्रेगने मॅचच्या आदल्या दिवशी केलेल्या कॉमेंटवर!

ओव्हलचं पीच बॅटींगला पूर्णपणे अनुकूल होतं. इंग्लंडसमोर पहिलं उद्दीष्टं होतं ते फॉलोऑन वाचवण्याचं!

डेनिस एमिसची १४ महिन्यांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या संघात निवड करण्यात आली होती. पूर्वी फास्ट बॉलिंग सफाईदारपणे खेळण्यात अपयश आल्याने त्याला ड्रॉप करण्यात आलं होतं!

एमिस म्हणतो,
"Everybody had written me off against fast bowling. I'd had some problems and I was determined to try and put the record straight. My confidence had been low but I came back. It was an important innings for the team and myself."

एमिसने फास्ट बॉलर्सना खेळण्याचं एक नविन तंत्रं शोधून काढलं होतं. बॅकफूटवर आणि ऑफच्या दिशेने जाऊन लेगसाईडला बॉल फटकावाचा! परंतु यात एक धोका होता तो म्हणजे लेग स्टंप उडण्याचा!

बॉब वूल्मर लवकर परतल्यावर एमिस आणि स्टील (४४) यांनी १०० रन्सची पार्टनरशीप केली. स्टील आणि पाठोपाठ बाल्डेर्स्टोन आऊट झाल्यावर एमिसची जोडी जमली ती पीटर विलीशी! एमिस - विली यांनी १२८ रन्सची पार्टनरशीप केली! त्यात विलीचा वाटा होता ३३!

विली आऊट झाल्यावर खेळायला आला टोनी ग्रेग!

एमिस म्हणतो,
"The worst part was when Tony Greig came in. He got them going after the grovel remark. Before he came in they were bowling at a nice pace of about 85mph but when Tony came to the wicket it went up to about 90 and three bouncers and over!"

एव्हाना वेस्ट इंडीजने दुसरा नवीन बॉल घेतला होता.

“We are going to smash these buggers out of sight!” ग्रेग एमिसला म्हणाला,
“It’s nice out here, don’t upset them!” एमिस काकुळतीला येऊन उत्तरला!

ग्रेगने आक्रमक पवित्रा घेत होल्डींग आणि रॉबर्ट्स दोघांनाही कव्हर्समधून बाऊंड्रीपार फटकावलं. भडकलेल्या रॉबर्ट्सच्या तुफान वेगाने आलेल्या बंपर डोक्यात बसण्यापासून एमिस जेमतेम वाचला!

ग्रेगचा आक्रमक पवित्रा फारकाळ टिकला नाही!
मायकेल होल्डींगच्या यॉर्करने ग्रेगचा मिडल स्टंप उखडला गेला!
प्रेक्षकांत शेकड्यांनी हजर असलेल्या वेस्ट इंडीयन लोकांच्या उत्साहाला एकच उधाण आलं होतं!

नंतर त्याबद्दल बोलताना एमिस विनोदाने म्हणाला,
"It was the first time I have ever been pleased to see the England captain get his leg stump knocked out of the ground!”

ऑफला जाऊन अ‍ॅक्रॉस द लाईन खेळण्याचा एमिसचा अखेर अंदाच चुकला आणि होल्डींगने त्याचा लेगस्टंप उडवला! परंतु त्यापूर्वी एमिसने २०३ रन्स फटकावल्या होत्या!

सिल्व्ही म्हणतो,
"Dennis played a fantastic innings. They say he had been playing that innings in the nets for three months. Bob Willis told me he had spent months in the nets with the fast bowlers firing it in at him. He was a tremendous player off his legs and all he did was step right across his stumps and flick the ball away through the on side. It was brilliant!"

मायकेल होल्डींग म्हणतो,
"We were trying to hit his leg stump. He had this awkward stance and I kept bowling at leg stump but he would just glance it away. The only chances he gave were through the leg gully area but I didn't have a fielder there!"

एमिस परतल्यावरही अ‍ॅलन नॉट (५०) आणि जेफ मिलर (३६) यांनी इंग्लंडला ४०० च्या पार नेलं, परंतु फॉलोऑन टाळण्यासाठी आवश्यंक असलेल्या ४८८ रन्सपर्यंत पोहोचणं इंग्लंडला जमलं नाही. ४३५ मध्येच इंग्लंडची इनिंग्ज संपुष्टात आली!

मायकेल होल्डींगने ८ विकेट्स उडवल्या होत्या!

लॉईडने इंग्लंडला फॉलोऑन न देता पुन्हा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला! गॉर्डन ग्रिनीज आणि रॉय फ्रेड्रीक्स दोघांनी इंग्लिश बॉलिंगची मनसोक्तं धुलाई करत ३२ ओव्हर्समध्ये १८२ रन्स फटकावल्यावर चौथ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता लॉईडने वेस्ट इंडीजची इनिंग्ज डिक्लेअर केली! इंग्लंडला मॅच जिंकण्यासाठी ४२५ रन्सचं टार्गेट होतं!

लॉईडचा हा निर्णय म्हणजे एकतर भूतदयाच होती
किंवा
इंग्लंडच्या मेंढरांना रक्ताचा वास लागलेल्या मायकेल होल्डींगपुढे सोडणं ही क्रूरता!

टोनी ग्रेगच्या ध्यानात या निर्णयामागची लॉईडची भावना अचूक ध्यानात आली होती. इंग्लिश खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतत असताना ग्रेग हर्लेफोर्ड रोडच्या दिशेने असलेल्या स्टँडच्या दिशेने निघाला होता!
हा स्टँड वेस्ट इंडीयन प्रेक्षकांनी भरलेला होता!

दिलखुलासपणे हसत ग्रेग बाऊंड्रीपासून काही अंतरावर पोहोचला आणि त्याने खाली पडून दोन्ही हाता-पायांवर रांगण्यास सुरवात केली!

स्टँटमधल्या वेस्ट इंडीयन प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष झाला!
Grovel!

बीबीसीवर कॉमेंट्री करणारा टोनी कोझियर उस्फूर्तपणे उद्गारला,
“For three or four paces he has, in his own words, grovelled!”

दुसर्‍या दिवशी रांगणार्‍या टोनी ग्रेगचा फोटो झाडून सर्व वृत्तपत्रांतून झळकला!
खाली कॅप्शन होतं,
“Okay, so I’m grovelling now!”

अर्थात वेस्ट इंडीयन खेळाडूंवर मात्रं ग्रेगच्या रांगण्याचा काहीही परिणाम झाला नाही! पहिल्या इनिंग्जमध्ये ८ विकेट घेणार्‍या होल्डींगने दुसर्‍या इनिंग्जमध्येही ६ विकेट्स घेत इंग्लंडचा खिमा केला! डेव्हीड स्टील (४२) आणि अ‍ॅलन नॉट (५७) यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही होल्डींग आणि कंपनीपुढे उभं राहू शकलं नाही! इंग्लंडला २०३ मध्ये गुंडाळून वेस्ट इंडीजने २३१ रन्सनी मॅच जिंकली! टोनी ग्रेगने जेमतेम १ रन केल्यावर होल्डींगच्या यॉर्करवर त्याची ऑफस्टंप उडाली!

एमिस म्हणाला,
"As it was such a good strip we were confident of saving the match. Michael bowled very quickly and he was the Rolls Royce of fast bowlers when he was purring."

अंपायर डिकी बर्ड म्हणाला,
"I nicknamed him Whispering Death because I couldn't hear him when he was running in. It was the most fantastic piece of fast bowling I had ever seen!"

पहिल्या दोन टेस्ट ड्रॉ झाल्यावर उरलेल्या तिन्ही टेस्ट जिंकत वेस्ट इंडीजने ३-० अशी सिरीज जिंकली!
टोनी ग्रेगच्या वक्तव्यामुळे भडकलेल्या वेस्ट इंडीयन खेळाडूंनी इंग्लंडची दयनिय अवस्था केली होती! खासकरुन ग्रेगची! संपूर्ण सिरीजमध्ये सहावेळा ग्रेगचे स्टंप्स उडवले गेले होते!

लॉईड म्हणाला,
“Greig’s bravado and choice of phrase made him a marked man. Every time Greig came to the wicket, our bowler seemed to gain an extra few miles an hour from somewhere!”

अर्थात Grovel हा शब्दं वापरण्यामागे ग्रेगचा हेतू वर्णद्वेषाचा नव्हता हे पुढे खुद्दं मायकेल होल्डींगने ठासून सांगितलं!

क्रिकेटच्या इतिहासातील एका दिग्वीजयी संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती!

इंग्लंडच्या दौर्‍यानंतर वेस्ट इंडीजने पाकिस्तानविरुद्धची सिरीज जिंकली. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर एक नवीनच बाँब पडला!

पॅकर सर्कस!

वेस्ट इंडीजच्या बहुतेक सर्व खेळाडूंनी पॅकरशी करार केला होता. १९७९ च्या मोसमात वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघात पॅकर सर्कशीत समावेश असलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू नसले तरी वेस्ट इंडीजच्या संघात मात्रं पॅकरशी करारबद्ध असलेले खेळाडू होते! एकाही वेस्ट इंडीयन खेळाडूने खेळण्यास नकार दिला नाही असं वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने त्यामागे कारण दिलं! परंतु दोन टेस्ट्सनंतर खेळाडूंना दिल्या जाणार्‍या पैशावरुन वाद उद्भवल्याने लॉईड्सह बहुतेक सर्व प्रमुख खेळाडूंनी उरलेल्या तीन टेस्ट्सवर बहिष्कार टाकला! अर्थात अल्विन कालिचरणच्या नेतृत्वात खेळणार्‍या वेस्ट इंडीजने तरीही ऑस्ट्रेलियाला आरामात खडे चारले! परंतु १९७८-७९ च्या भारताच्या दौर्‍यात मात्रं आपल्या प्रमुख खेळाडूंविना खेळणार्‍या वेस्ट इंडीजच्या पदरी १-० असा पराभव आला!

१९७९ च्या वर्ल्डकपमध्ये मात्रं पॅकर सर्कशीतले सगळे खेळाडू परतले! रिचर्ड्स आणि कॉलिस किंगच्या झंझावाती पार्टनरशीपच्या जोरावर फायनलमध्ये इंग्लंडला आरामात खडे चारत वेस्ट इंडीजने लागोपाठ दुसर्‍यांदा वर्ल्ड्कप जिंकला! दरम्यान पॅकर सर्कशीचा वाद निपटल्यामुळे वेस्ट इंडी़जचे सर्व प्रमुख खेळाडू टेस्टमध्ये परतले. साहजिकच कालिचरणच्या जागी कॅप्टन म्हणून लॉईड परतला!

वर्ल्डकप जिंकल्यावर वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंडच्या दौर्‍यावर गेले!

सिडनीच्या पहिल्याच टेस्टमध्ये रिचर्ड्सने १४० रन्स फटकावल्या! पहिल्या इनिंग्जमध्ये १७३ रन्सचा लीड घेऊनही ग्रेग चॅपल (१२४) आणि किम ह्यूज (१३०) यांच्यामुळे वेस्ट इंडीजला ड्रॉ वर समाधान मानावं लागलं. परंतु मेलबर्नला १० विकेट्सनी आणि अ‍ॅडलेडला ४०८ रन्सनी ऑस्ट्रेलियाची धुलाई झाली!

ऑस्ट्रेलियात आरामात विजय मिळवल्यावर न्यूझीलंड्ला जाण्यापूर्वी जोएल गार्नर एका जाहिरातीत झळकला! गार्नरच्या तोंडी शब्दं होते,

"We've beat the Aussies, man, and now were gonna beat you!"

ऑस्ट्रेलियन दौर्‍यानंतर खरंतर वेस्ट इंडीयन खेळाडू थकले होते. त्यातच पाठदुखीमुळे रिचर्ड्स ऑस्ट्रेलियातून घरी - अँटीगाला परतला होता. परंतु तरीही वेस्ट इंडी़ज आरामात विजय मिळवणार याबद्दल कोणालाच शंका नव्हती!

न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यापासून वेस्ट इंडी़ज खेळाडू बर्‍याच बाबतीत नाराज होते. एअरपोर्टवर उतरल्यावर त्यांना स्वतःचं सगळं कीट बसमध्ये चढवावं लागलं होतं. (सामान्यतः यासाठी पोर्टर नेमला जातो). इतकंच नव्हे तर नेहमी उत्तम दर्जाच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जात असलेल्या खेळाडूंची यावेळी मात्रं लहानशा मॉटेल्समध्ये उतरण्याची व्यवस्था करण्यात आली होती! प्रत्यक्षात मैदानावर देण्यात आलेल्या खाण्या-पिण्याबद्दलही अनेक खेळाडूंनी तक्रारी केल्या होत्या!

न्यूझीलंडच्या बॅट्समनच्या मनात रॉबर्ट्स, होल्डींग, गार्नर आणि कॉलिन क्रॉफ्ट यांच्याबद्दल जबरदस्तं दहशत होती!

ब्रूस एडगर म्हणतो,
"You had to expect a lot of short-pitched bowling, intimidation, and not many opportunities to score! I got my mother to help sew up a chest pad, because you couldn't buy them, and I made my own thigh pad and reinforced it with extra foam. The challenge was beating the fear factor, so you could focus on playing as opposed to being scared."

एडगर आणि जेरेमी कोनी यांनी किल्बर्नी पार्कच्या मैदानाच्या कोपर्‍यात असलेल्या पायर्‍यांवर बॉलिंग मशिन उभं केलं आणि त्याच्यासमोर बॅटींगची प्रॅक्टीस करण्यास सुरवात केली! ६ फूट ९ इंच उंचीवरुन येणार्‍या गार्नरच्या बॉल्सना खेळणं सोपं जावं हा त्यामागे हेतू होता!

न्यूझीलंड कॅप्टन जेफ हॉवर्थच्या मते वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना देण्यात आलेल्या सुविधा, विशेषतः हॉटेल्स आणि खाणं हे निश्चितच खालच्या दर्जाचं होतं! हॉवर्थ म्हणाला,

"The accommodation and food could have been lot better. I could quite understand them being upset."

टेस्ट सिरीजपूर्वी झालेल्या एकमेव वन डे मध्ये न्यूझीलंडने अनपेक्षितपणे विजय मिळवला! अर्थात त्यावेळी या विजयाला कोणीही फारसं महत्वं दिलं नाही!

पहिली टेस्ट होती ती ड्युनेडीनला!

पहिल्या टेस्टपूर्वी अनेक वृत्तपत्रांतून ड्युनेडीनची विकेट स्पिनर्सना मदत करणारी आहे, या विकेटवर पहिल्या दिवसापासूनच बॉल टर्न होण्यास सुरवात होते वगैरे बातम्या येऊ लागल्या होत्या! वेस्ट इंडीजच्या चार फास्ट बॉलर्सवर तोड म्हणून मुद्दाम टर्निंग विकेट तयार केली आहे, या विकेटवर चार फास्ट बॉलर्स खेळवणं निव्वळ निरर्थक आहे असं झाडून सर्व रिपोर्टर्सनी ठासून सांगितलं होतं! त्यातच न्यूझीलंडने आपल्या स्क्वाडमध्ये एक्स्ट्रा स्पिनरची निवड केल्यामुळे तर जवळपास सर्वांचा या बातमीवर विश्वास बसला!

लॉईडसारखा अनुभवी आणि चाणाक्षं कॅप्टनही याला बळी पडला!

होल्डींग, गार्नर आणि क्रॉफ्ट यांच्या जोडीला वेस्ट इंडीजने ऑफ स्पिनर डेरेक पॅरीची संघात निवड केली!
अँडी रॉबर्ट्सला ड्रॉप करुन!

प्रत्यक्षं ग्राऊंडवर पोहोचल्यावर मात्रं वेस्ट इंडीजला आश्चर्याचा जबरदस्तं धक्का बसला!
ड्युनेडीनची विकेट हिरवीगार होती!
त्यावर भरपूर गवत होतं!
फास्ट बॉलर्सच्या दृष्टीने ही विकेट म्हणजे नंदनवन होतं!
आणि
वातावरण ढगाळ होतं! स्विंगला पूर्णपणे अनुकूल!

अशा परिस्थितीतही क्लाईव्ह लॉईडने टॉस जिंकल्यावर बॅटींग घेतली! आपले बॅट्समन न्यूझीलंडच्या बॉलर्सचा सहज मुकाबला करु शकतील हा लॉईडला विश्वास होता!

रिचर्ड हॅडलीच्या बॉलवर लान्स केर्न्सने ग्रिनीजचा कॅच घेतल्यावर वेस्ट इंडीजला पहिला धक्का बसला! त्यातच हॅडलीच्या बॉलवर लॉरेन्स रो आणि कालिचरण एलबीड्ब्ल्यू असल्याचा निर्णय अंपायर फ्रेड गुडॉलने दिल्याने वेस्ट इंडीजची अवस्था ४ / ३ अशी झाली!

डेस्मंड हेन्स आणि लॉईड (२४) यांनी वेस्ट इंडीजची इनिंग्ज सावरत ७२ पर्यंत नेली, परंतु पुन्हा हॅडलीच्याच बॉलवर लॉईड एलबीड्ब्ल्यू झाला! कॉलिस किंग (१४) आणि डेरेक पॅरी (१७) यांनी हेन्सला साथ देण्याचा प्रयत्नं केला, परंतु हॅड्ली, गॅरी ट्रप आणि लान्स केर्न्सनी वेस्ट इंडीजला १४० मध्ये गुंडाळलं! डेस्मंड हेन्स (५५) व्यतिरिक्तं कोणीच काही करु शकलं नाही!

वेस्ट इंडीजचे बहुतेक सर्व खेळाडू आणि मॅनेजर विली रॉड्रीग्ज अंपायर्सच्या निर्णयावर नाखूष होते. विशेषतः गुडॉलने दिलेल्या एलबीड्ब्ल्यू बद्दल. बॅट्समनच्या मते ते इतके फ्रंटफूटवर खेळत होते की एलबीड्ब्ल्यू देणं म्हणजे निव्वळ वेडेपणा होता!

जेफ हॉवर्थचं मत मात्रं अर्थातच वेगळं होतं. हॉवर्थ म्हणाला,
"They couldn't complain. If you walk in front of your stumps at Dunedin, you'll get given out!"

रिपोर्टर डेव्ह कॅमेरॉन म्हणाला,
"The umpiring was indifferent. The pitch at Dunedin kept low but West Indies thought they were getting too far forward for the umpires to be sure. Hadlee bowled straight and Goodall had to give them out!"

जॉन राईट (२१) आणि एडगर यांनी न्यूझीलंडला ४२ रन्सची सलामी दिली. मायकेल होल्डींगने राईटला बोल्ड केल्यावर एडगर आणि हॉवर्थ (३३) यांनी न्यूझीलंडला १०९ पर्यंत नेल्यावर डेरेक मरेने क्रॉफ्टच्या बॉलवर हॉवर्थचा कॅच घेतला. त्याच ओव्हरमध्ये क्रॉफ्टने जॉन पार्करची दांडी उडवली. पीटर वेब (५), कोनी (८) लवकर आऊट झाले, परंतु डेरेक पॅरीच्या बॉलवर एडगर (६६) एलबीडब्ल्यू झाल्यावर न्यूझीलंडला मोठा हादरा बसला! त्यातच वॉरन लीस (१८) रनआऊट झाला! न्यूझीलंड १६८ / ७!

रिचर्ड हॅडली (५१) आणि लान्स केर्न्स (३०) यांनी ६४ रन्सची फटकेबाज पार्टनरशीप करुन न्यूझीलंडला सावरलं. केर्न्सच्या १८ बॉलमधल्या ३० रन्समध्ये ३ सिक्स होत्या! केर्न्स परतल्यावर ट्रप आणि ब्रूकने हॅडलीबरोबर वेस्ट इंडीजला तोंड देण्याचा कसोशीने प्रयत्नं केला खरा, पण न्यूझीलंडला २४९ पर्यंतच मजल मारता आली!

पहिल्या इनिंग्जमध्ये १०९ रन्सनी मागे पडलेल्या वेस्ट इंडीजला पुन्हा हादरवलं ते हॅडलीने! ग्रिनीज आणि लॉरेन्स रोला त्याने एलबीड्ब्ल्यू पकडलं तेव्हा वेस्ट इंडीजच्या २१ रन्स झाल्या होत्या! त्यातच ट्रपच्या बॉलवर केर्न्सने कालिचरणचा आणि हॅडलीच्या बॉलवर लीसने लॉईडचा कॅच घेतल्याने वेस्ट इंडीजची अवस्था २९ / ४ अशी झाली!

डेस्मंड हेन्स आणि कॉलिस किंग (४१) यांनी ८८ रन्सची पार्टनरशीप करुन वेस्ट इंडीजला लीड मिळवून दिला. लान्स केर्न्सच्या बॉलवर स्टीव्ह ब्रूकने किंगचा कॅच घेतल्यावर विकेटकिपर डेरेक मरे (३०) आणि हेन्स यांनी ६३ रन्स काढल्या. ही पार्टनरशीप वेस्ट इंडीजला सावरणार असं वाटत असतानाच हॅडलीच्या बॉलवर मरे एलबीडब्ल्यू असल्याचा अंपायर गुडॉलने निर्णय दिला! अंपायरच्या निर्णयावर मरे इतका चकीत झाला होता की त्याला पॅव्हेलियनम मध्ये परतण्याची हेन्सला आठवण करुन द्यावी लागली!

मरे आऊट झाल्यावर हेन्सने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली, परंतु हॅडली आणि ट्रप यांनी शेवटच्या ४ विकेट्स उडवत वेस्ट इंडीजला २१२ मध्ये गुंडाळलं! डेस्मंड हेन्स सर्वात शेवटी आऊट झाला तो ३२३ बॉल्समध्ये १०५ रन्स करुन!

रिचर्ड हॅडलीने दोन्ही इनिंग्ज मिळून ११ विकेट्स घेतल्या!
त्यात ७ एलबीड्ब्ल्यू होते!

न्यूझीलंडला मॅच जिंकण्यासाठी केवळ १०४ रन्सची आवश्यकता होती!

होल्डींगच्या बॉलवर ग्रिनीजने स्लिपमध्ये एडगरचा कॅच घेतल्यावर न्यूझीलंडला पहिला हादरा बसला. दुसरा ओपनर जॉन राईटला होल्डींगच्या यॉर्करचा काहीच अंदाज न आल्याने त्याची दांडी उडाली! न्यूझीलंड २८ / २!

राईट आऊट झाल्यावर आला जॉन पार्कर!

मायकेल होल्डींगचा आऊटस्विंगर गुडलेंग्थवरुन अचूक उसळला...
आणि जॉन पार्करच्या ग्लोव्ह्जना चाटून स्लिपच्या दिशेने गेला!
डेरेक मरेने पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या ग्रिनीजच्या समोर डाईव्ह मारत कॅच घेतला!

वेस्ट इंडीजच्या एकूण एक सर्व खेळाडूंनी जोरदार अपील केलं!
जॉन पार्करने पॅव्हेलियनची वाट धरली होती तोच...

"नॉट आऊट!" अंपायर जॉन हेस्टीचा आवाज त्याच्या कानावर पडला!

वेस्ट इंडीयन खेळाडू अवाक् झाले!

कॉलिन क्रॉफ्ट म्हणतो,
"The ball didn't brush the glove - it tore the glove off. Deryck Murray took it in front of first slip. Parker was on his way to the pavilion when he was given not out."

होल्डींग सावकाशपणे चालत स्ट्राईकवर असलेल्या पार्करशेजारी जाऊन उभा राहिला..
क्षणभर..

दुसर्‍याच क्षणी त्याच्या उजव्या पायाची जबरदस्तं किक स्टंप्सवर बसली!
दोन स्टंप्स हवेत उडाले!

साऊथलँड टाईम्सचा फोटोग्राफर ओवेन जोन्सने नेमका तो क्षण कॅमेर्‍यात कैद केला!
क्रिकेटच्या इतिहासातला एक अप्रतिम फोटो!

जोन्स म्हणाला,
"When Parker hit the ball you could have heard it in the Octagon. I couldn't understand why he was given not out. Holding started down the pitch with huge strides, and he suddenly sped up and bang!"

अंपायर जॉन हेस्टी आणि फ्रेड गुडॉल, इतर वेस्ट इंडीयन खेळाडू, स्टँड्मधले प्रेक्षक, पॅव्हेलियनमधले न्यूझीलंडचे खेळाडू आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेला ग्लेन टर्नर सर्वजण वेड्यासारखे पाहत राहिले!

वॉरन लीस म्हणतो,
"It was a stunned sort of `did he really do that'?"

"And Parker's reaction was amazing – slowly taking off his gloves and putting them back on. Only someone who had played a lot of cricket professionally in England would've acted that nonchalantly."

मायकेल होल्डींगने नंतर त्या घटनेबद्द्ल बोलताना खेद व्यक्तं केला. Whispering Death या आपल्या आत्मचरित्रात होल्डींग म्हणतो,

"This was not cricket, and I didn't have to be part of it. I was on my way to the pavilion, quite prepared not to bowl again, when Clive Lloyd and Murray persuaded me back."

होल्डींगने लाथेने स्टंप्स उडवल्यावर अंपायर फ्रेड गुडॉलने लॉईडला आपल्या खेळाडूंच्या वर्तणूकीवर नियंत्रण ठेवण्याची सूचना दिली. गुडॉल लॉईडशी बोलत असतानाच...

"You're nothing but a pack of cheats." लॉरेन्स रोने सुनावलं!

कॉलिन क्रॉफ्ट म्हणतो,
"The photo of Holding is the best sports picture I've seen. He should have been signed up by Manchester United on the strength of it!"

क्रॉफ्ट आणि गार्नर यांनी हॉवर्थ, पार्कर, कोनी, वेब, लीस यांना एकापाठोपाठ एक पॅव्हेलियनची वाट दाखवल्याने न्यूझीलंडची अवस्था ५४ / ७ अशी झाली होती!

न्यूझीलंड ड्रेसिंगरुममध्ये स्टीव्हन ब्रूक कमालीचा नर्व्हस झाला होता! तो म्हणतो,

"The dressing-room was a good place to hide! I wished Warren Lees the best as he padded up. Then he came back in, hopping around!"

"Have you tripped over?" ब्रूसने विचारलं.
"No, I'm out!" लीस थंडपणे उत्तरला!

हॅडली आणि केर्न्स यांनी १९ रन्स काढल्या, परंतु गार्नरने हॅडलीचा मिडलस्टंप उडवला! केर्न्स आणि गॅरी ट्रप यांनी २७ रन्सची सर्वात मोठी पार्टनरशीप केली, परंतु मॅच जिंकण्यासाठी ४ रन्स बाकी असताना होल्डींगच्या बॉलवर मरेने केर्न्सचा कॅच घेतला! नेहमीप्रमाणे आक्रमक फटकेबाजी न करता केर्न्सने ४३ बॉलमध्ये १९ रन्स काढल्या होत्या!

अद्याप ४ रन्स बाकी होत्या!
गॅरी ट्रपच्या जोडीला आला शेवटचा बॅट्समन स्टीव्हन ब्रूक!

ब्रूक म्हणतो,
"They didn't have a gully or a backward point, and that's where a tailender scores a lot of runs,"

गॅरी ट्रप पिचच्या मध्यापर्यंत चालत आला आणि मोठ्याने ओरडला,

"Backward point!"
"Shut up!" ब्रूक खेकसला!

वेस्ट इंडीयने फिल्डर्सना आपला बेत कळू नये अशी ब्रूकची इच्छा होती! तो म्हणतो,

"It was where I intended to put it, and that's exactly what happened. We ran two and it tied the scores!"

ब्रूकच्या पॅडला बॉल लागून मिळालेल्या लेगबायने न्यूझीलंडचा विजय साकारला!

वेस्ट इंडीयन खेळाडू इतके चिडलेले होते की मॅच संपल्यावर प्रेझेंटेशनसाठी वेस्ट इंडीजचा केवळ एकच खेळाडू हजर होता तो म्हणजे डेस्मंड हेन्स! तो देखील आला होता मॅचमधला सर्वोत्कृष्ट बॅट्समन म्हणून बक्षीस स्वीकारण्यासाठी!

वेस्ट इंडीजचा मॅनेजर विली रॉड्रीग्जने होल्डींगवर कोणतीही कारवाई केली नाहीच, वर मॅच संपल्यावर झालेल्या पत्रंकार परिषदेत तो म्हणाला,

"We got two men out and they were not given! They were atrocious decisions!"

वेस्ट इंडीयन खेळाडू आणि मॅनेजर विली रॉड्रीग्जने अंपायर गुडॉल आणि हेस्टीला बदलण्याची मागणी केली! टेस्टमध्ये अंपायरींग करण्याची त्यांची कुवत नाही अशी प्रत्येकाची खात्री पटली होती! परंतु न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांनी ही मागणी फेटाळून लावली! वैयक्तीक कारणामुळे हेस्टीने दुसर्‍या टेस्टमधून माघार घेतल्यावर गुडॉलच्या जोडीला स्टीव्ह वूडवर्डची नेमणूक करण्यात आली!

दुसरी टेस्ट होती Most English city outside England अर्थात क्राईस्टचर्चला!

जेफ हॉवर्थने टॉस जिंकल्यावर फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरणाचा हॅडली, ट्रप आणि केर्न्स यांना फायदा मिळण्याचा हेतू होताच, त्याचबरोबर फास्ट बॉलर्सना पूर्णपणे अनुकूल परिस्थितीत होल्डींग, क्रॉफ्ट, गार्नर आणि पॅरीच्या जागी परतलेला अँडी रॉबर्ट्स यांच्याशी मुकाबला टाळण्याचाही त्याचा हेतू होता!

पहिल्याच ओव्हरमध्ये हॅडलीच्या बॉलवर स्लिपमध्ये जॉन पार्करने हेन्सचा कॅच घेतला तेव्हा वेस्ट इंडीजची केवळ १ रन झाली होती! ग्रिनीज आणि रो इनिंग्ज सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच लान्स केर्न्सने रो ला एलबीड्ब्ल्यू पकडलं! कॉलीस किंगला चौथ्या नंबरवर पाठवण्याची लॉईडची चाल साफ अपयशी ठरली! दुसर्‍याच बॉलला केर्न्सने त्याची दांडी उडवली! ग्रिनीज (९१) आणि कालिचरण (७५) यांनी २८ / ३ अशा अवस्थेतून १६२ रन्सची पार्टनरशीप करत वेस्ट इंडीजला १९० पर्यंत नेलं, पण गॅरी ट्रपच्या बॉलवर ब्रूकने ग्रिनीजचा कॅच घेतल्यावर हॅडली आणि केर्न्सपुढे वेस्ट इंडीजची इनिंग्ज २२८ मध्ये कोसळली!

ऑकवर्ड फ्रंट ऑन अ‍ॅक्शनने बॉलिंग करणार्‍या लान्स केर्न्सने ६ विकेट्स काढल्या!

कॉलिन क्रॉफ्टचा बॉल हातावर शेकल्यावर ब्रूस एडगर पॅव्हेलियन मध्ये परतला तेव्हा न्यूझीलंडच्या १४ रन्स झाल्या होत्या. क्रॉफ्टने जॉन राईटची आणि रॉबर्ट्सने वेबची दांडी उडवल्यावर एडगर पुन्हा खेळायला आला, पण होल्डींगच्या बॉलवर मरेने त्याचा कॅच घेतला! न्यूझीलंड ५३ / ३!

जॉन पार्कर (४२) आणि हॉवर्थ यांनी १२२ रन्सची पार्टनरशीप करुन न्यूझीलंडची इनिंग्ज सावरली.
अर्थात यात फ्रेड गुडॉलचा 'हातभार' होताच!

जोएल गार्नरचा एक शॉर्टपीच बॉल बचावात्मक पद्धतीने खेळण्याच्या पवित्र्यात असलेल्या हॉवर्थच्या ग्लोव्हजला लागून डेरेक मरेच्या हातात गेला! वेस्ट इंडीयन खेळाडूंनी साहजिकच उस्फूर्तपणे अपील केलं.

"नॉट आऊट!" अंपायर फ्रेड गुडॉल!

हॉवर्थ म्हणतो,
"I leant back to a short ball and got a thumb on it. It was one of those ones where everyone behind the wicket knew it was out but no one in front could tell. That was the straw that broke the camel's back for West Indies!"

अंपायर गुडॉल नंतर म्हणाला,
"I saw nothing and heard nothing but apparently there was a brush of the glove."

टी टाईमला दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्ये परतले तेव्हा हॉवर्थ ९९ वर नॉटआऊट होता!

टी नंतर हॉवर्थ आणि पार्कर क्रीजवर परतले.
दोन्ही अंपायर्सही मैदानावर आले.
परंतु वेस्ट इंडीयन खेळाडूंचा पत्ता नव्हता!

वेस्ट इंडीजचे खेळाडू आणि मॅनेजर रॉड्रीग्ज अंपायर्सच्या अनाकलनिय निर्णयांना इतके वैतागले होते की त्यांनी पुढे खेळावं की नाही हा निर्णय घेण्यासाठी चक्कं मतदान घेतलं!

यच्चयावत खेळाडू, खुद्दं मॅनेजर रॉड्रीग्ज आणि लॉईड यांचं मत पुढे खेळू नये असं पडलं!

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या एका सदस्याने अंपायर्स आणि न्यूझीलंडचे बॅट्समन ग्राऊंडवर पोहोचल्याची लॉईड आणि कंपनीला सूचना दिली.

"They can wait. We won't be joining them." लॉईड म्हणाला!

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष वॉल्टर हॅडली (रिचर्ड आणि डेलचा बाप) याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्नं केला.

"The boys have had enough. We're going home!" मॅनेजर रॉड्रीग्जने त्याला ऐकवलं!

अखेर मैदानात असलेल्या हॉवर्थने ड्रेसिंगरुममध्ये येऊन लॉईडची भेट घेतली.

"My batsmen would walk if they knew they had hit the ball!" हॉवर्थने लॉईडला आश्वासन दिलं!

अखेर लॉईड आपल्या सहकार्‍यांसह मैदानात उतरला!
टी टाईम संपल्यावर ११ मिनीटांनी!

मायकेल होल्डींगच्या मते हॉवर्थने स्वतःच्याच आश्वासनाला हरताळ फासला होता.
"In the first over Howarth stood his ground for yet another clear catch by Murray."

टी नंतर वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना मॅचमध्ये काहीच इंटरेस्ट उरलेला दिसत नव्हता! हॉवर्थच्या मते त्यांनी अनेकदा जाणूनबुजून कॅच सोडले! इतकंच नव्हे तर बाऊंड्रीच्या दिशेने जाणार्‍या बॉलचा पाठलाग करण्यासही ते फारसे उत्सुक दिसत नव्हते!

तिसर्‍या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने २८४ / ४ अशी मजल मारली होती!
जेफ हॉवर्थ १४१ रन्स काढून नॉट आऊट होता!

चौथा दिवस मॅचचा 'रेस्ट डे' होता.
वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रुममधलं आपलं सर्व सामानसुमान आवरुन हॉटेलचा रस्ता धरला!
पुन्हा ग्राऊंडवर येण्याचा त्यांचा कोणताही इरादा नव्हता!

हॉटेलवर आल्यावर रॉड्रीग्ज, लॉईड आणि एकूण एक खेळाडूंनी दौरा अर्धवट सोडून वेस्ट इंडीजला परतण्याचा निर्णय घेतला!

वेस्ट इंडीजचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये उतरले होते, नेमका त्याच हॉटेलमध्ये रिपोर्टर डेव्ह कॅमेरॉन उतरला होता. डेस्मंड हेन्सशी त्याची बर्‍यापैकी मैत्री झाली होती. संध्याकाळी सहज तो हेन्सच्या रुममध्ये डोकावला तेव्हा हेन्स आणि इतर बरेच खेळाडू फ्राईड चिकन खाताना त्याच्या दृष्टीस पडले! हेन्सने त्यालाही पार्टीत सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं!

"Why the party?" कॅमेरॉनने सहज हेन्सला विचारलं.
"Oh, we're going home!" हेन्स उत्तरला!

कॅमेरॉन उडालाच!

भानावर आल्यावर त्याने थेट वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष जेफ स्टॉलमेयरला फोन लावला! स्टॉलमेयर आपल्या घरी होता. कॅमेरॉनने थोडक्यात सगळा प्रकार कानावर घालून त्याची प्रतिक्रीया विचारली! स्टॉलमेयर उत्तरला,

"It won't happen! The manager will be told that they'll be carrying on!"

स्टॉलमेयरने ताबडतोब विली रॉड्रीग्जशी संपर्क साधून दौरा अर्धवट न सोडण्याची सूचना केली! रॉड्रीग्जने अंपायर्सच्या खराब कामगिरीचा आणि खेळाडूंच्या असंतोषाचा त्याच्यापुढे पाढा वाचला! परंतु दौरा अर्धवट सोडणं कोणत्याही परिस्थितीत शक्यं नाही असं स्टॉलमेयर आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांचं मत होतं!

लॉईड आणि इतर खेळाडूंना मैदानावर येण्यासाठी राजी करण्यास रॉड्रीग्जला किती प्रयास पडले असतील याची कल्पनाच केलेली बरी!

या सगळ्याचा कळसाध्याय गाठला गेला तो पाचव्या दिवशी!

मायकेल होल्डींगने हॉवर्थ (१४७) मिडल स्टंप उखडल्यावर गार्नरच्या बॉलवर लॉरेन्स रोने वॉरन लीसचा कॅच घेतला तेव्हा न्यूझीलंडचा स्कोर होता २९२ / ६. एका बाजूने जेरेमी कोनी खेळत होता. त्याच्या जोडीला आला रिचर्ड हॅडली!

कॉलिन क्रॉफ्टने तिसर्‍या दिवशी हॉवर्थ आणि कोनी दोघांवर बंपर्सचा मारा केला होता. त्याबद्दल प्रेक्षकांनी त्याची बरीच हुर्यो उडवली होती. पाचव्या दिवशीही तोच प्रकार सुरू राहिला! दरवेळी क्रॉफ्ट आपल्या बॉलिंग मार्ककडे परतत असताना त्याला उद्देशून प्रेक्षकांमधून शिव्यांचा भडीमार होत होता! अशातच....

क्रॉफ्टच्या एका बंपरवर हूक मारण्याचा हॅडलीने प्रयत्न केला....
परंतु हॅडलीला बॉलच्या वेगाचा अंदाज न आल्याने बॅटची एज लागून तो मरेच्या ग्लोव्हजमध्ये गेला!
वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी जोरदार अपील केलं.
परंतु...
पुन्हा एकदा अंपायर गुडॉलने ते अपिल फेटाळून लावलं!

क्रॉफ्ट भयानक वैतागला!
आपल्या बॉलिंग मार्ककडे परत जाताना त्याने 'फ'काराने सुरु होणार्‍या स्तुतिसुमनांचा गुडॉलवर वर्षाव केला!

त्यातच आणखीन एका गोष्टीची भर पडली!
पुढच्या ओव्हरमध्ये तो स्टंपपासून दूर - क्रीजच्या अगदी टोकाला जाऊन बॉल टाकण्याचं क्रॉफ्टने सत्रं आरंभलं!
हॅडलीवर त्याने बंपर्सचा मारा आरंभला!

क्रिकेटच्या नियमानुसार बॉल टाकताना नॉन स्ट्राईकर एंडला असलेल्या क्रीजच्या पुढे किंवा क्रीजच्या बाजूने बाहेर बॉलरचा पाय पडला तर तो नो बॉल दिला जातो. क्रॉफ्ट क्रीजच्या इतक्या टोकाला जाऊन बॉल टाकत होता की अखेर एका क्षणी त्याचा पाय क्रीजच्या कडेला असलेल्या रेषेला लागलाच!

"नो बॉल!" ताबडतोब गुडॉलने कॉल दिला!

वास्तविक क्रॉफ्टच्या पायाचा रेषेला फक्तं स्पर्श झालेला होता. त्याच्या पायाचा कोणताही भाग क्रीजच्या बाहेर गेला नव्हता तरीही गुडॉलने नो बॉल दिला होता!

क्रॉफ्टचं टाळकं सरकलं!
आपल्या बॉलिंग मार्कवर परत जाताना त्याने हाताने बेल्स उडवून दिल्या!

"Go back to teaching," क्रॉफ्टने गुडॉलला सुनावलं, "You don't know the rules!"

"Whatever you do, Fred, don't pick those up. I'll do it."
नॉन स्ट्रायकर जेरेमी कोनी म्हणाला आणि त्याने बेल्स उचलून अंपायरच्या हाती दिल्या!

पुढचा बॉल....
अंपायर गुडॉलच्याच्या ठीक मागून क्रॉफ्ट धावत आला...
आणि
शेवटच्या क्षणी हाताने अंपायरला धक्का देत त्याने बॉल टाकला!

अंपायर गुडॉल उजव्या बाजूला धडपडला!

गुडॉल आणि दुसरा अंपायर वूडवर्ड यांनी स्लीपमध्ये उभ्या असलेल्या लॉईडकडे येऊन त्याच्या खेळाडूंवर नियंत्रण ठेवण्याची त्याला सूचना दिली.

फ्रेड गुडॉल आणि कॉलिन क्रॉफ्ट यांच्यातल्या वादाचा व्हिडीओ

मात्रं सगळा प्रकार पाहून आणि दोन्ही अंपायर्स आपल्या दिशेने येत असतानाही लॉईड स्लिपमधल्या आपल्या जागेवरुन इंचभरही पुढे सरकला नाही!

"I've taken verbal abuse as an umpire but I've never been struck before!" अंपायर गुडॉल लॉईडला म्हणाला, "You sort this out now!"

लॉईड म्हणाला,
"I had a word with Crofty. This had happened once before with his close run-up. He'd knocked Bill Alley during a game for Lancashire. He ran in very straight then broke away."

कॉलिन क्रॉफ्ट आजतागायत आपण अंपायर गुडॉलला मुद्दाम धक्का दिल्याचं नाकारतो! तो म्हणतो,
"In the heat of the moment they thought I did it on purpose. I did not do it purposely. If Fred Goodall was in Hollywood, he'd have picked up an Oscar! I'm six foot six and 230 pounds. If I'd meant to hit him, he wouldn't have got up. It's crap that I barged him deliberately!"

जेफ हॉवर्थच्या मते मात्रं क्रॉफ्टने मुद्दामच हा प्रकार केला होता. हॉवर्थ म्हणतो,
"Croft tried to pretend he'd lost his run-up. It was disgraceful. He should have been banned for life. It was because it was 12,000 miles away in little old New Zealand that the authorities turned a blind eye."

ग्लेन टर्नर म्हणाला,
"It's physical assault, and there's no doubt it was deliberate! They thought Fred had it in for them. They were convinced the racist side of it was coming into the decision-making."

त्या क्षणापासून वेस्ट इंडीजच्या खेळाडूंचा मॅचमधला उरलासुरला रस संपून गेला होता! रिचर्ड हॅडलीने ९२ बॉलमध्ये आपलं पहिलंवहिलं शतक झळकावलं, पण तो नाखुशच होता!

हॅडली म्हणतो,
“It was a hollow feeling. The West Indies didn’t want to play. They wanted to go home, because of the decision making, or lack of them by the umpires. They bowled with short run-ups, made it too easy. When you score a hundred, you must feel like you worked for it. Didn’t feel it was too significant, although the book says it was a hundred, I will take it. But to me it was gifted”,

दुसर्‍या इनिंग्जमध्ये ग्रिनीज (९७), हेन्स (१२२), रो(१००) आणि किंग (१००) यांच्या फटकेबाजीमुळे अखेर मॅच ड्रॉ झाली असली तरी अंपायर गुडॉल आणि वेस्ट इंडीयन खेळाडूंमधला कडवटपणा कणभरही कमी झाला नाही!

वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी गुडॉल अंपायर असल्यास तिसर्‍या टेस्टमध्ये खेळण्यास ठाम नकार दिला! न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांनी कॉलिन क्रॉफ्टला वगळण्याची मागणी केली! अखेर क्रॉफ्ट तिसर्‍या टेस्ट्मध्ये खेळला, पण गुडॉल अंपायर नव्हता!

वुडवर्डच्या जोडीला दुसरा अंपायर आला तो जॉन हेस्टी!

वेस्ट इंडीजने तिसरी टेस्ट जिंकून सिरीजमध्ये १-१ अशी बरोबरी करण्यासाठी निकराचे प्रयत्नं केले! परंतु अखेर तिसरी टेस्ट ड्रॉ झाली! अर्थात यात ब्रुस एडगरच्या अत्यंत संयमी १२७ रन्सच्या जोडीला अंपायर हेस्टीचे काही वादग्रस्तं निर्णय कारणीभूत होतेच! वेस्ट इंडी़जचे चार खेळाडू तर अंपायर्सवर इतके वैतागले होते की शेवटच्या दिवशी लंचनंतर थेट एअरपोर्ट गाठून मायदेशी परतण्याचा त्यांनी निश्चय केला होता! मोठ्या मुश्कीलीने त्यांना परावृत्त करण्यात विली रॉड्रीग्जला यश आलं!

न्यूझीलंडने सिरीज १-० अशी जिंकली!

वेस्ट इंडीजला परत जाण्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये लॉईड उद्गारला,
"Our bowlers appealed umpteen times, But it got to the ridiculous stage when they weren't even appealing. They knew they wouldn't get the decision."

मॅनेजर विली रॉड्रीग्ज म्हणाला,
"I do not think the umpiring was biased, only incompetent! The West Indians had had to get batsmen out nine times before getting a decision! We were set up; that there was no way we could win a Test!"

वेस्ट इंडीजमध्ये परतल्यावर आणि राग काहीसा शांत झाल्यावर लॉईड म्हणाला,
"They were just bad umpires but we should not have behaved in that manner. I think if I'd had my time over again I'd have handled it differently. I regret it even until this day, that things went so far!"

वेस्ट इंडीजचा दौरा उरकल्यावर अंपायर गुडॉलने व्याख्यानांच्या निमित्ताने न्यूझीलंडचा दौरा केला होता! त्या दौर्‍यातील त्याची काही वक्तंव्य उघडपणे वर्णद्वेषातून आली होती असं अनेकांचं मत होतं! १९८७ च्या दौर्‍यावर कॅप्टन असलेल्या रिचर्ड्सने फ्रेड गुडॉलशी एक शब्दही बोलण्यास नकार दिला होता!

पुढची सुमारे चौदा-पंधरा वर्ष वेस्ट इंडीज टेस्टमध्ये अजिंक्य होते!

वन डे मध्ये मात्रं १९८३ च्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने त्यांना अनपेक्षित धक्का दिला!

१९८४ मध्ये लॉईडच्याच नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजची टीम इंग्लंडच्या दौर्‍यावर आली होती. वेस्ट इंडीजने पहिली टेस्ट जिंकल्यावर दुसर्‍या टेस्टमध्ये इंग्लिश कॅप्टन डेव्हीड गॉवरने इंग्लंडची इनिंग्ज डिक्लेयर करुन वेस्ट इंडीजला पाचव्या दिवशी चौथ्या इनिंग्जमध्ये ८० ओव्हर्समध्ये ३४२ रन्सचं टार्गेट दिलं होतं!

परिणाम?
वेस्ट इंडीजने ६६ ओव्हर्समध्ये ३४४ रन्स फटकावत मॅच जिंकली!
गॉर्ड्न ग्रिनीज २१२ रन्स फटकावून नॉट आऊट होता!
त्याच्या जोडीला ओता लॅरी गोम्स (९२*)!

वेस्ट इंडीजने उरलेल्या तीनही टेस्ट जिंकून इंग्लंडचा ५-० असा फडशा पाडला!
ब्लॅकवॉश!

लॉईड रिटायर झाल्यावर कॅप्टन म्हणून निवड झाली ती रिचर्ड्सची!

अर्थात वेस्ट इंडीज टेस्ट क्रिकेटचे अनभिषिक्त सम्राटच होते! १९८५-८६ च्या कॅरेबियनमधील सिरीजमध्ये त्यांनी पुन्हा एकदा इंग्लंडला ब्लॅकवॉशची चव चाखायला लावली! गार्नर आणि होल्डींग रिटायर झाल्यानंतरही मार्शल आणि त्याच्या जोडीला आलेले कर्टली अ‍ॅम्ब्रोज, कॉर्टनी वॉल्श, इयन बिशप यांनी वेस्ट इंडी़जचा दबदबा कायम ठेवला! १९९१ मध्ये रिचर्ड्स, ग्रिनीज, मार्शल आणि जेफ दुजाँ रिटायर झाल्यावर वेस्ट इंडीजचा पडता काळ सुरु झाला असला तरी कार्ल हूपर, जिमी अ‍ॅडम्स, फिल सिमन्स आणि मुख्य म्हणजे ब्रायन लारा यांनी वेस्ट इंडीजचं अजिंक्यपद कसंबसं शाबूत राखलं होतं!

मार्क टेलरच्या ऑस्ट्रेलियन संघाने अखेर १९९४-९५ मध्ये १५ वर्षांनी वेस्ट इंडीजवर २-१ असा विजय मिळवला!

वेस्ट इंडीज क्रिकेटच्या र्‍हासाची सुरवात झाली ती इथूनच!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वा! छान प्रदीर्घ लेखन!
मोठे लेखन असल्याने वाचायला व प्रतिसाद द्यायला वेळ लागतोय.
इतरांचेही तसेच होत असेल. तेव्हा तुम्ही तुमच्या सवडीने असेच लिहित रहा आम्ही सवडीने वाचतो आहोतच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रदीर्घ, आणि तपशीलवार लेखन. एका सीरिजमध्ये किती नाट्य घडतं याचं वर्णन छान आहे.

इतक्या कष्टाने लिहिलेल्या आणि उत्तम लेखनाबद्दल काही नकारार्थी बोलायला नको वाटतं. पण एक सूचना करतो - जवळपास प्रत्येक वाक्यानंतर स्वतंत्र परिच्छेद होणं हे रसभंग करणारं आहे. प्रत्येक वाक्यानंतर उद्गारचिन्ह लिहिल्यासारखं वाटतं. एवढी तांत्रिक सुधारणा केली तर लेखन खूपच अधिक वाचनीय होईल आणि त्याला जास्त न्याय मिळेल असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0