जंटलमन्स गेम - ६ - वर्ल्ड सिरीज

१९७५ चा फेव्रुवारी महिना....

माईक डेनेसच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघा अ‍ॅशेस सिरीजसाठी ऑस्ट्रेलियात आला होता. पाचपैकी चार टेस्ट्स जिंकून ऑस्ट्रेलियाने सिरीज जिंकली होतीच पण त्याहीपेक्षा त्यांनी इंग्लंडचे अक्षरश: हाल केले होते! याला कारणीभूत होते ते स्ट्रेस फॅक्चरमधून सावरुन पुन्हा ऑस्ट्रेलियन संघात परतलेला डेनिस लिली आणि पायाचं हाड मोडलेल्या अवस्थेत टेस्ट पदार्पण केल्यामुळे पार निष्प्रभ ठरलेला परंतु आता पूर्ण सावरलेला जेफ्री रॉबर्ट थॉमसन! लिली आणि थॉमसन यांना तोंड देताना इंग्लिश बॅट्समनची जी काही द्यनिय अवस्था झाली होती त्याला तोड नव्हती! थॉमसनने ३३ तर लिलीने २४ विकेट्स घेतल्या होत्या, परंतु त्यापेक्षाही खरी दहशत बसली होती त्यांचे शॉर्टपीच बॉल खेळताना अनेक इंग्लिश बॅट्समन जखमी झाल्यामुळे!

पण...

ऑस्ट्रेलियासाठी इतकी अप्रतिम कामगिरी करुनही लिली-थॉमसनच काय, पण इतर खेळाडूंच्या वाट्याला फारसं काहीच येत नव्हतं!

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये प्रोफेशनल क्रिकेट नावाचा काही प्रकारच नव्हता!

अ‍ॅशेस सिरीजमध्ये विक्रमी संख्येने प्रेक्षकांची हजेरी असल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला भरपूर आर्थिक कमाई झालेली होती! साहजिकच बोर्डाकडून आपल्याला जास्तं प्रमाणात पैसे मिळावेत अशी खेळाडूंची रास्तं अपेक्षा होती. परंतु....

खेळाडूंच्या हाती पडले ते ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या कमाईच्या २% पैसे!
ते सुद्धा सगळ्या संघाला मिळून!

मेलबर्नच्या शेवटच्या टेस्टच्या आधी ऑस्ट्रेलियन खेळाडू बंडाच्या आणि असहकाराच्या पवित्र्यात होते! योग्य तो मोबदला न दिल्यास संप पुकारण्याची आणि सहाव्या टेस्टमध्ये न खेळण्याची त्यांनी धमकी दिली! त्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा सेक्रेटरी अ‍ॅलन बार्न्स 'द ऑस्ट्रेलियन' ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,

"There are 500,000 cricketers who would love to play for Australia for nothing!"

बार्न्सच्या या पवित्र्याने खेळाडू चांगलेच भडकलेले होते. कॅप्टन इयन चॅपल टॉससाठी बाहेर पडला तो रागातच! नेमका त्याच वेळेला बार्न्स ऑस्ट्रेलियन ड्रेसिंगरुममध्ये आला होता! टॉस उरकून चॅपल परतला तेव्हा....

भडकलेल्या इयन रेडपाथने बार्न्सची गचांडी धरुन त्याला भिंतीवर दाबून धरलं होतं!

"You bloody idiot!" रेडपाथ बार्न्सला धमकावत म्हणाला, "Of course 500,000 people would play for nothing, but how bloody good would they be?”

अर्थात रेडपाथच्या धमकावणीचा काहीही परिणाम होणार नाही याची चॅपलला पूर्ण कल्पना होती!

१५ मार्च १८७७ च्य पहिल्या टेस्टपासून आतापर्यंत सर्व मॅचेसमध्ये खेळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची गणना हौशी (अ‍ॅमॅच्युअर्स) म्हणूनच केली जात असे! आपली नोकरी - व्यवसाय सांभाळून फावल्या वेळात क्रिकेट खेळावं आणि नोकरीतून रजा घेऊन दौर्‍यांवर जावं हा वर्षानुवर्षांचा प्रघात होता आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची अपेक्षाही तीच होती! क्रिकेट हे आर्थिक प्राप्तीचं साधन नव्हतंच! दौर्‍यावर गेल्यामुळे अनेक खेळाडूंना नोकर्‍या गमवाव्या लागल्याची आणि नोकरी गमावण्याच्या भीतीने अनेक खेळाडूंनी दीर्घ मुदतीचे दौरे टाळल्याची कित्येक उदाहरणं होती!

१९७१ च्या अ‍ॅशेस सिरीजच्या शेवटच्या टेस्टमध्ये बिल लॉरीच्या जागी इयन चॅपलची कॅप्टन म्हणून नेमणूक करण्यात आली. या सिरीजमध्येच डेनिस लिली, रॉडनी मार्श, ग्रेग चॅपल यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु क्रिकेटच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासाठी सर्वस्व पणाला लावणार्‍या खेळाडूंच्या हाती काहीच येत नव्हतं! डेनिस लिलीच्या पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरवरील उपचाराचा खर्च उचलण्यासही ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने असमर्थता दर्शवली होती!

१९७१ मध्ये कॅप्टन म्हणून नेमणूक झाल्यापासून इयन चॅपलने क्रिकेटपटूंना आर्थिक मोबदला मिळावा म्हणून त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडे पाठपुरावा सुरु केला होता. त्याकाळी खेळाडूंची संघटना नसल्याने कॅप्टन या नात्याने आपल्या सहकार्‍यांना योग्य तो आर्थिक मोबदला मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे अशी त्याची भावना होती. मात्रं दरवेळी बोर्डाकडून नकारघंटाच वाजवण्यात येत होती!. क्रिकेटपटूंनी आपापली नोकरी-व्यवसाय सांभाळूनच क्रिकेट खेळावं या मानसिकतेतून बोर्डाचे अधिकारी बाहेर येण्यास तयार नव्हते!

या सगळ्यांमध्ये सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वं होतं.... डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन!

खरंतर इयन चॅपलला सर्वात जास्तं आशा ब्रॅडमनकडूनच होती. १९३० च्या इंग्लंड दौर्‍यावर असताना ब्रॅडमनने लंडनच्या 'द स्टार' या वृत्तपत्रासाठी दौर्‍याचं वार्तांकन करणारं पुस्तक लिहीण्याचा करार केला होता. हे पुस्तक 'द स्टार' मध्येच लेखरुपाने प्रसिद्धही झालं होतं. परंतु ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांच्या मताप्रमाणे ब्रॅडमनने हे पुस्तक लिहून त्याच्याशी असलेल्या कराराचं उल्लंघन केलं होतं! या करारान्वये दौर्‍यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना क्रिकेटवर लिहीण्यास मनाई करण्यात आली होती! ब्रॅडमनला कराराचा भंग केल्याबद्दल ५० पौंडांचा दंड करण्यात आला!

१९३१ मध्ये लँकेशायर लीगमधील अ‍ॅक्रींग्टन क्लबने ब्रॅडमनला प्रोफेशनल खेळाडू म्हणून वार्षिक १००० पौंडांची ऑफर दिली! जागतिक मंदीच्या (ग्रेट डिप्रेशन) त्या काळात ही ऑफर अत्यंत आकर्षक अशीच होती आणि ब्रॅडमन अत्यंत गंभीरपणे अ‍ॅक्रींग्टनकडून खेळण्याच्या विचारात होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांना हे कळताच त्यांनी नेमका खोडा घातला! लँकेशायर लीगमध्ये खेळल्यास ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट संघात ब्रॅडमनची निवड केली जाणार असं त्यांनी ब्रॅडमनला ठणकावलं! ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या दृष्टीने ब्रॅडमनसारखा बॅट्समन गमावणं म्हणजे कुर्‍हाडीवर पाय मारण्यासारखं होतं. परंतु सामान्य लोकांची सहानुभूती मात्रं ब्रॅडमनलाच होती! ग्रेट डिप्रेशनसारख्या काळात मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेणं हे सामान्यं ऑस्ट्रेलियन माणसाच्या दृष्टीने योग्यंच होतं! त्यातच त्याकाळी ब्रॅडमनला नोकरीही नव्हती!

ब्रॅडमन चांगलाच पेचात सापडला!
काय निर्णय घ्यावा हे त्याला समजेना!

अखेरीस सिडनीच्या तीन बिझनेसमननी यातून मार्ग काढला!

ब्रॅडमनबरोबर दोन वर्षांसाठी घसघशीत रकमेचा करार करण्याची त्यांनी तयारी दर्शवली! या करारान्वये ब्रॅडमनला अ‍ॅक्रींग्टनकडून मिळणार्‍या वार्षिक १००० पौंडाइतकी नाही तरी बर्‍यापैकी आर्थिक प्राप्ती होणार होतीच, पण तो ऑस्ट्रेलियाकडून टेस्टही खेळू शकणार होता! त्याच्या बदल्यात ब्रॅडमन असोसिएटेड न्यूजच्या 'द टेलिग्राफ' आणि 'सिडनी सन' साठी वार्तांकन, रेडीओवर क्रिकेटसंबंधीत प्रोग्रॅम्स आणि एफ जे पामर अ‍ॅन्ड सन्स या पुरुषांच्या कपड्याच्या रिटेल चेनचं प्रमोशन करणार होता!

या करारातून एक निराळंच प्रकरण उद्भवलं!

१९३२ मध्ये डग्लस जार्डीनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आला होता (कुप्रसिद्ध बॉडीलाईन). या सिरीजमधील पहिल्या टेस्टपूर्वी ब्रॅडमनचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांशी जोरदार वाद झाला! ब्रॅडमनच्या करारानुसार असोसिएटेड न्यूजसाठी मॅचच वार्तांकन करणं त्याच्यावर बंधनकारक होतं. मात्रं क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्याप्रमाणे व्यावसायिक पत्रकार असलेल्या जॅक फिंगल्टनव्यतिरिक्त इतर कोणालाही वार्तांकन करण्याचा हक्क नव्हता!

ब्रॅडमनला मात्रं हे मंजूर नव्हतं!

त्याच्यादृष्टीने हा प्रतिष्ठेचा आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे पैशांचा प्रश्न होता! कोणत्याही परिस्थितीत वार्तांकन करण्याबाबत तो ठाम होता! भले त्यासाठी प्रत्यक्षं मॅच खेळण्यावर पाणी सोडावं लागलं तरीही!

पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव झाल्यावर असोसिएटेड न्यूजच्या प्रमुख अधिकार्‍याने अखेर ब्रॅडमनची या करारातून मुक्तता केली!

....या इतिहासाची पूर्ण कल्पना असल्याने ब्रॅडमनचा आपल्याला पाठींबा मिळेल, किमानपक्षी सहानुभूतीपूर्वक तो आपल्या मागण्यांचा विचार करेल अशी इयन चॅपलची रास्तं अपेक्षा होती!

परंतु, लवकरच चॅपलचा भ्रमनिरास झाला!
ब्रॅडमनने त्याच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या!

चॅपल म्हणतो,
“You couldn’t have an argument with Bradman! You listened to his opinion and you agreed with it. If you didn’t agree with it, that was the end of the conversation! Everytime I stressed on the financial side of the argument, Bradman’s response was 'No son, we cannot do that'!”

ब्रॅडमनचा हा पवित्रा पाहून त्याच्याविषयी आपल्या आजोबांकडून - व्हिक्टर रिचर्ड्सनकडून ऐकलेल्या अनेक गोष्टी चॅपलला आठवल्या....

ब्रॅडमन पैशाच्या बाबतीत चिक्कू असल्याचं अनेकांचं मत होतं! इतकंच नव्हे तर आपल्या सहकार्‍यांमध्ये तो फारसा मिसळतही नसे! कमालीचा एकलकोंडा म्हणूनच तो प्रसिद्धं होता! १९३० च्या दौर्‍यात लीड्सला ३३४ रन्सची अप्रतिम इनिंग्ज खेळल्याबद्दल ब्रॅडमनला एका ऑस्ट्रेलियन बिझनेसमनकडून १००० पौंडांचा चेक देण्यात आला होता. परंतु ब्रॅडमनने आपल्या सहकार्‍यांपैकी एकालाही साधं ड्रिंकही ऑफर केलं नव्हतं!

१९६६ मध्ये रिचर्ड्सनच्या घरी एका पार्टीनंतर चॅपल आपल्या आजोबांचा निरोप घेण्यासाठी गेला असताना रिचर्ड्सन ब्रॅडमनशी बोलत असलेला त्याला आढळला. रिचर्ड्सनचा जवळचा मित्रं आणि पत्रकारितेतला सहकारी आणि भूतपूर्व इंग्लिश कॅप्टन आर्थर गिलिगन याची एमसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्याबद्दल रिचर्ड्सनजवळ आनंद व्यक्तं करताना ब्रॅडमन म्हणाला,

"Congratulate your mate for his success on my behalf!"

“Good thing they don’t work on the Australian system.” रिचर्ड्सन उत्तरला!

“Why’s that Vic?” ब्रॅडमनने आश्चर्याने विचारलं.

“In England the president is picked by his friends. If they had that system in Australia, you’d never get a vote, you cunt!” रिचर्ड्सनने सुनावलं!

आपल्या आजोबांचं निरीक्षण अचूक असल्याचं चॅपलचं अनुभवाअंती मत झालं! आर्थिक प्राप्तीबद्दल नकार मिळाल्यावरही ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये ब्रॅडमनचं स्थान इतकं मोठं होतं, की आपण काहीही करु शकत नाही याबद्दल चॅपलला पक्की खात्री पटली होती!

१९७४ मध्ये अनेक कंपन्यांनी कडक धोरण अवलंबल्यामुळे तर क्रिकेट खेळाडूंची अवस्था अधिकच बिकट झाली होती. बहुसंख्य कंपन्यांनी क्रिकेट खेळाडूंच्या दीर्घ मुदतीच्या दौर्‍यांवर जाण्यामुळे गैरहजर असण्याला आक्षेप घेत त्यांना नोकरीवर न ठेवण्याचं धोरण पत्करलं होतं! परिणामी क्रिकेटचा मोसम वगळता खेळाडूंची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होणार होती! क्रिकेटमधूनही त्यांना काहीच आर्थिक प्राप्ती होत नसल्याने १९७५ च्या अ‍ॅशेस मालिकेत खेळाडूंनी संपाची धमकी देऊनही काहीच उपयोग झाला नाही!

१९७५ मध्ये इंग्लंडच्या दौर्‍यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचं वर्णन करताना पत्रकारांनी दोन इन्शुरन्स सेल्समन (डेनिस लिली आणि गॅरी गिल्मोर), दोन अकौंटंट्स (रॉस एडवर्ड्स आणि रिक मॅकॉस्कर), आर्कीटेक्ट (मॅक्स वॉकर), दोन शाळामास्तर (पॉल शिहान आणि रॉडनी मार्श), ट्रेनिंग इंजीनिअर (ग्रेग चॅपल), रियल इस्टेट एजंट (डग वॉल्टर्स), पत्रकार (अ‍ॅश्ली मॅलेट), तंबाखू विक्रेता (अ‍ॅलन टर्नर) आणि सिगरेट सेल्समन (इयन चॅपल!) अशा शब्दांत केलं होतं! मात्रं अँटीक डीलर (इयन रेडपाथ) आर्थिक कारणांमुळे दौर्‍यावर गेला नव्हता!

अर्थात ही परिस्थिती केवळ ऑस्ट्रेलियातच होती असं नाही!
वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनाही एकेका पैशासाठी क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांशी संघर्ष करावा लागत होता!

कॅप्टन क्लाईव्ह लॉईड म्हणतो,
"WICB was ready to give 3% of gate money to players. We wanted atleast 3.5%! We had to negociate hard with the WICB for getting that half percent extra!"

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या या धोरणामुळे आणि कंपन्यांच्या पवित्र्यामुळे अनेक खेळाडू क्रिकेटला कायमचा रामराम ठोकून आपापल्या व्यवसायात लक्षं केंद्रीत करण्याच्या विचारात होते. पॉल शिहान, बॉब कौपर यांनी करियरच्या अर्ध्यावरच क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. इयन रेडपाथ, अ‍ॅश्ली मॅलेटही त्याच मार्गावर होते! खुद्दं इयन चॅपलही कमीतकमी दौर्‍यांवर जाण्याच्या निर्णयाला आला होता!

परंतु....

नियतीला काही वेगळंच मंजूर होतं!

१९७० पर्यंत ऑस्ट्रेलियात बर्‍यापैकी टीव्हीचा प्रसार झाला होता. परंतु ऑस्ट्रेलियात प्रदर्शित होणारे बहुसंख्य कार्यक्रम हे बाहेरुन, विशेषतः अमेरीकेतून आयात केले जात होते. त्यातूनच १९७० मध्ये "TV: Make it Australian" या कल्पनेचा उदय झाला. १९७३ मध्ये ऑस्ट्रेलियन सरकारने कोटा पद्धती अंमलात आणली! टीव्हीवरुन खेळांचं प्रसारण होत असलं तरी खर्‍या अर्थाने प्रेक्षकांची रुची वाढली ती १९७५ मध्ये कलर टीव्ही आल्यावर! ऑस्ट्रेलियात होणारं खेळांचं प्रसारण हे Make it Australian या सरकारी धोरणाला अनुसरुनच होतं. परंतु प्रत्यक्षात मैदानावर सामने पाहण्यास प्रेक्षक येणार नाहीत या भीतीमुळे टीव्हीवर वेगवेगळ्या खेळांच्या प्रसारणाला अधिकार्‍यांचा विरोध होता!
खेळ, त्यातील व्यावसायिकता, आक्रमक मार्केटींग, स्पॉन्सरशीप आणि सर्वात महत्वांचं म्हणजे टीव्हीच्या माध्यमातून मिळणारा प्रेक्षकवर्ग आणि प्रसार याचं आकलन कोणत्याही खेळाच्या संघटनांच्या अधिकार्‍यांकडे नव्हती!

ऑस्ट्रेलियात एकच माणूस असा होता ज्याच्याकडे ही दूरदृष्टी होती!
आणि ते साध्यं करण्याची आर्थिक क्षमतादेखील!

डॉन ब्रॅड्मनला १९३२ मध्ये असोसिएटेड न्यूजच्या करारातून मुक्तं करुन अ‍ॅशेसमध्ये खेळण्याची परवानगी देणार्‍या रॉबर्ट क्लाईड पॅकरचा नातू...

केरी पॅकर!

१९७४ मध्ये केरीच्या वडिलांचं, सर फ्रँक पॅकरचं निधन झाल्यावर केरीने चॅनल नाईन या टीव्ही नेटवर्कची सूत्रं आपल्या हाती घेतली. त्याकाळी चॅनल नाईनची लोकप्रियता यथातथाच होती. आक्रमक स्वभावाच्या केरीने ही परिस्थिती बदलण्याचा चंग बांधला. ऑस्ट्रेलियात दिवसेदिवस लोकप्रिय होत असलेल्या गोल्फ आणि क्रिकेटच्या खेळाचा त्यासाठी उपयोग करुन घेण्याचं त्याने ठरवलं!

सर्वप्रथम त्याने ऑस्ट्रेलियन ओपन गोल्फ स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्कं मिळवले! हे हक्कं मिळताच लाखो डॉलर्स खर्च करुन पॅकरने सिडनीच्या ऑस्ट्रेलियन गोल्फ क्लबची सुधारणा केली! सुप्रसिद्ध ऑस्ट्रेलियन गोल्फर जॅक निकोलस याच्यावर पॅकरने या गोल्फ क्लबची जबाबदारी सोपवली! इतकंच नव्हे तर या स्पर्धेत खेळण्यासाठी आणि त्यासाठीच्या काही जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणून काम करण्यासाठीही त्याने निकोलसला राजी केलं!

परंतु पॅकरला खरी आस होती ती क्रिकेटची!

१९७६ मध्ये पॅकरने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला १९७६-७७ च्या आणि पुढच्या दोन वर्षांतील क्रिकेट मॅचेसचं चॅनल नाईनवरुन प्रसारण करण्यासाठी चोवीस लाख डॉलर्सची ऑफर दिली! ही रक्कम ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या तत्कालीन काँट्रॅक्टच्या तब्बल दहापट होती! व्यावसायिक दृष्टी असलेल्या कोणत्याही संघटनेने पॅकरची ऑफर हसतहसत स्वीकारली असती! पण....

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पॅकरशी करार करण्यास नकार दिला!

वीस वर्षांपासून क्रिकेटचं प्रसारण करणार्‍या ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन या सरकारी चॅनलला केवळ २ लाख १० हजार डॉलर्समध्ये हे काँट्रॅक्ट देण्यात आलं!

पॅकरचं माथं भडकलं!
खासकरुन ज्या पद्धतीने त्याची ऑफर धुडकावण्यात आली होती ते त्याल अपमानास्पद वाटलं होतं!

त्याच सुमाराला पॅकरची गाठ जॉन कॉर्नेल आणि ऑस्टीन रॉबर्ट्सनशी पडली! ऑस्टीन रॉबर्ट्सन भूतपूर्व ऑस्ट्रेलियन रुल्स फुटबॉल खेळाडू होता. निवृत्तीनंतर अनेक क्रिकेट खेळाडूंचा एजंट म्हणून तो काम पाहत होता. जॉन कॉर्नेलची गाठ घेऊन त्याच्या क्लायंट्सपैकी एक असलेल्या एका क्रिकेट खेळाडूच्या डोक्यातून आलेली एक योजना रॉबर्ट्सनने त्याच्यापुढे मांडली होती. पॅकरचं क्रिकेटप्रेम आणि चॅनल नाईन याच्या क्षमतेची पूर्ण कल्पना असलेल्या कॉर्नेलने रॉबर्ट्सनसह पॅकरची भेट घेऊन ही कल्पना त्याच्यासमोर मांडण्याची रॉबर्ट्सनला सूचना दिली.

ही योजना होती ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये प्रदर्शनीय सामने (एक्झीबिशन मॅचेस) खेळवून चॅनल नाईनवरुन प्रसारित करण्याची! या सामन्यांच्या निमित्ताने खेळाडूंना आर्थिक लाभ होणार होता! पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पॅकरच्या चॅनल नाईनवरुन क्रिकेटचं प्रसारण करता येणार होतं!

ऑस्टीन रॉबर्टसनला ज्याने हे सुचवलं होतं तो खेळाडू म्हणजे डेनिस लिली!
.... आणि लिलीचा बोलविता धनी, जो या कल्पनेचा जनक होता तो म्हणजे इयन चॅपल!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मॅचेसच्या प्रसारणाचे हक्क देण्यास नकार दिल्यावर पॅकर जिद्दीला पेटला! कोणत्याही परिस्थितीत चॅनल नाईनवरुन क्रिकेटचं प्रसारण करण्याचा त्याने चंग बांधला होता! ऑस्ट्रेलियाच्या १९७७ च्या दौर्‍यातील सामन्यांचं ऑस्ट्रेलियात प्रसारण करण्याची त्याने इंग्लंडच्या टेस्ट आणि कौंटी बोर्डाला १६ लाख डॉलर्सची ऑफर दिली! दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पॅकरची ऑफर न स्वीकारता ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टींक कॉर्पोरेशनच्या २ लाख १० हजार डॉलर्सच्या ऑफरचा स्वीकार करण्याची इंग्लिश क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांना सूचना दिली!

पॅकरला ही बातमी कळताच त्याने इंग्लिश टेस्ट आणि कौंटी बोर्डाला पूर्वी दिलेली १६ लाख डॉलर्सची ऑफर रद्द केली, आणि दुप्पट रकमेची ऑफर दिली!

३२ लाख डॉलर्स!

ही ऑफर नाकारणं इंग्लंड क्रिकेट बोर्डाला शक्यंच नव्हतं!
चॅनल नाईनला या मॅचेसच्या प्रसारणाचे हक्कं मिळाले!

केरी पॅकरची ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला पाहण्यास मिळालेली ही पहिली चुणूक होती!

जॉन कॉर्नेल आणि ऑस्टीन रॉबर्ट्सनने मांडलेली योजना पॅकरने लगेच उचलून धरली! भव्यतेची आवड असलेल्या आणि प्रस्थापित ऑस्ट्रेलियन बोर्डाला धडा शिकवण्यासाठी इरेला पेटलेल्या पॅकरने त्या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचा निर्णय घेतला! रॉबर्ट्सनच्या मूळ योजनेप्रमाणे केवळ ऑस्ट्रेलियन खेळाडूंपुरते हे सामने मर्यादीत न ठेवता, ऑस्ट्रेलिया विरुद्ध जागतिक क्रिकेट संघात संपूर्ण सिरीज खेळवण्याची योजना त्याने पुढे आणली!

वर्ल्ड सिरीज क्रिकेट!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटची कल्पना पॅकरने उचलून धरल्यावर कॉर्नेल आणि रॉबर्टसन यांनी इयन चॅपलची गाठ घेतली. १९७६ च्या जानेवारीत वेस्ट इंडीज विरुद्धच्या सिरीजनंतर चॅपल रिटायर झाला होता. केवळ काही प्रदर्शनीय मॅचेस न खेळवता संपूर्ण सिरीज खेळवण्याच्या पॅकरच्या कल्पनेला चॅपलने अर्थातच ताबडतोब होकार दिला! इतकंच करुन चॅपल थांबला नाही तर ऑस्ट्रेलियन संघातील काही खेळाडूंची यादीही त्याने पॅकरला दिली! बोर्डाच्या अडेलतट्टूपणाला वैतागलेले हे खेळाडू निश्चितपणे पॅकरशी करार करतील याबद्द्ल चॅपलला खात्री होती!

चॅपलकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंची यादी मिळाल्यावर पॅकरने कॉर्नेल, रॉबर्टसन आणि खुद्द चॅपल यांच्यावर त्या खेळाडूंशी करार करण्याची जबाबदारी सोपवली! ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बरोबरीने इतर देशातील खेळाडूंनाही करारबद्ध करण्यासाठी पॅकरच्या हालचाली सुरु होत्याच. सुदैवाने यासाठी अगदी योग्य माणूस पॅकरला मिळाला, तो म्हणजे इंग्लंडचा कॅप्टन टोनी ग्रेग! ग्रेगने स्वतः पॅकरशी करार केलाच, पण इंग्लंड, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, दक्षिण आफ्रीका या देशांतील खेळाडूंशी करार करताना पॅकरचा एजंट म्हणूनही भूमिका निभावली!

१९७७ च्या मार्चपर्यंत ऑस्ट्रेलिया आणि जगभरातील सुमारे पंचवीस खेळाडूंनी पॅकरशी करार केला होता!
ते देखील अत्यंत गुप्तपणे! कोणालाही पत्ता लागू न देता!
तोपर्यंत केवळ कागदावरच असलेल्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटसाठी!
ग्राऊंडचा, मॅचेसच्या वेळापत्रकाचा पत्ता नसताना आणि स्पर्धेची रुपरेषाही ठरलेली नसताना!

जगभरातले खेळाडू आपापल्या क्रिकेट बोर्डाच्या कारभाराला आणि बोर्डांकडून मिळणार्‍या तुटपुंज्या आर्थिक मोबदल्याला किती वैतागले होते याचं हे द्योतकच नव्हतं काय?

केरी पॅकर म्हणतो,
Every single player who was approached, signed and played!

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पॅकरच्या करारांबद्दल किती गुप्तता राखली होती हे सांगताना गॅरी कोझीयर म्हणतो,
"I noticed Austin Robertson handing out brown envelopes to others. I was told he was handing out a few theatre tickets and I didn't suspect anything because he always looked after the boys. He was close to a number of players, obviously a lot closer than I understood at the time. I didn't have any hint that it wasn't him just organising something for the boys to go to that night."

१९७७ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अ‍ॅशेस सिरीजसाठी इंग्लंडच्या दौर्‍यावर गेला. या दौर्‍यावर जाणार्‍या १७ खेळाडूंपैकी १३ जण पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटशी करारबद्ध झालेले होते!

कोझीयर म्हणतो,
"It was incredible really. In 1977, I flew over to England with the players and that was the flight on which Rodney Marsh broke the world beer drinking record. Three-quarters of the players on that flight had signed these sensational Packer contracts and they were all as drunk as you could imagine. But the secret still didn't get out. I sat beside Hookesy on the flight over and I had been best man at his wedding and not even he breathed a word of it to me!"

ऑस्ट्रेलियाच्या संघातील बहुतेक सर्व प्रमुख खेळाडू पॅकरशी करारबद्ध झालेले होते. इतकंच नव्हे तर एकही टेस्टमध्ये न खेळलेले पण शेफिल्ड शील्डमध्ये खेळलेल्या काही खेळाडूंनाही पॅकरच्या वर्ल्ड सिरीजची ऑफर देण्यात आलेली होती. मात्रं ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौर्‍यातील टेस्ट संघात असलेल्या चार खेळाडूंना ते टेस्टमध्ये बर्‍यापैकी यशस्वी झालेले असूनही यातून वगळण्यात आलं होतं! यामागचं कारण अर्थातच इयन चॅपल! ऑस्ट्रेलियन खेळाडूंची निवड पॅकरने चॅपलवर सोपवली होती आणि चॅपलच्या मते हे चार खेळाडू वर्ल्ड सिरीज मध्ये खेळण्याच्या लायकीचे नव्हते!

हे चार खेळाडू म्हणजे गॅरी कोझीयर, क्रेग सर्जंट, जेफ डिमॉक आणि किम ह्यूज!

इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे वन डे आणि टेस्ट सुरू होण्यापूर्वी अनेक कौंटी संघांशी सामने होते. सरे आणि केंटशी झालेले सामने ड्रॉ झाल्यावर ससेक्सविरुद्ध ७ ते १० मेच्या दरम्यान ऑस्ट्रेलियाची मॅच होती. परंतु खराब हवामानामुळे फारच थोडा वेळ खेळ झाला होता. या मॅचमधल्या तिसर्‍या दिवशी पावसामुळे खेळच झाला नाही. सर्व खेळाडू पॅव्हेलियनमध्ये आराम करत असतानाच अनावधानाने एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराला वर्ल्ड सिरीज क्रिकेटचा वास लागला!

९ मे!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटची सनसनाटी बातमी इंग्लंडभर पसरली!
.... आणि अवघ्या काही तासात जगभर पसरली!

क्रिकेटजगतात एकच हलकल्लोळ उडाला!

इंग्लिश पत्रकारांनी, एमसीसीच्या अधिकार्‍यांनी आणि प्रेक्षकांनीही वर्ल्ड सिरीज क्रिकेटवर टीकेची झोड उठवली! सर्वात मोठं लक्ष्यं होतं ते म्हणजे इंग्लिश कॅप्टन टोनी ग्रेग! जगभरातील खेळाडूंना पॅकरशी करारबद्ध करण्यात ग्रेगने महत्वाची भूमिका बजावल्याचं उघड झाल्यावर ग्रेगवर प्रचंड मोठ्या प्रमाणात आगपाखड करण्यात आली! इतकंच नव्हे तर एमसीसीच्या अधिकार्‍यांनी ग्रेगची कॅप्टनपदावरुन हकालपट्टीही केली! एमसीसीच्या ढुढ्ढाचार्यांनी वर्ल्ड सिरीज क्रिकेटची संभावना करताना नाव दिलं

पॅकर सर्कस!

ऑस्ट्रेलियन संघात आता पॅकरशी करार केलेले आणि करार न केलेले असे दोन गट निर्माण झाले. वर्ल्ड सिरीज क्रिकेटची बातमी जाहीर होताच आता गुप्तता बाळगण्याचं काहीच कारण उरलं नव्हतं!

गॅरी कोझीयर म्हणतो,
"All of a sudden we had two Australian teams on one tour. At one stage in England I was waiting in a bar for my teammates to come downstairs, but because everyone was up the street with Packer, they never came. It was a strange feeling. There were times when we were there to play for Australia and some blokes were off at a meeting about something else!"

मे महिन्याच्या अखेरीस केरी पॅकर इंग्लंडमध्ये अवतरला!

इंग्लंडला येण्याचा पॅकरचा हेतू हा क्रिकेटच्या धुरिणांची भेट घेऊन आपली योजना त्यांच्या गळी उतरवणं! क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने आपली संकल्पना योग्यं असल्याची पॅकरची पक्की खात्री होती. परंतु इंग्लिश ढुढ्ढाचार्यांशी मुकाबला करणं इतकं सोपं नाही याची त्याला पूर्ण कल्पना होती. क्रिकेट जगतातील मान्यवरांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे हे बिझनेसमन असलेल्या पॅकरला कोणी सांगण्याची आवश्यकता नव्हती! इंग्लंडला येताच त्याने अत्यंत चाणाक्षपणे वर्ल्ड सिरीज क्रिकेटसाठी कन्सल्टंट म्हणून एका ज्येष्ठ खेळाडूची नेमणूक केली.

रिची बेनॉ!

इंग्लंडला आल्यावर डेव्हीड फ्रॉस्टच्या टीव्हीवरील कार्यक्रमात जिम लेकर आणि रॉबिन मार्लर यांच्याशी झालेल्या चर्चेत पॅकरने अत्यंत ठामपणे वर्ल्ड सिरीज क्रिकेटची संकल्पना सर्वांपुढे मांडली! पॅकरच्या आक्रमक आणि आत्मविश्वासाने भरलेल्या वक्तव्याचा अनेकांवर सकारात्मक परिणाम झाला. सुरवातीला अत्यंत संशयाने पॅकर आणि वर्ल्ड सिरीज क्रिकेटकडे पाहणार्‍यांचं मत काही प्रमाणात बदलण्यात त्याला यश आलं होतं!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटवरुन उठलेल्या सगळ्या वादळात आतापर्यंत आयसीसीची भूमिका केवळ बघ्याची होती. हा प्रश्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आणि पॅकर यांच्यामधील आहे अशीच आयसीसीची धारणा होती. परंतु एकंदर प्रकरणाची व्याप्ती ध्यानात आल्यावर आणि विशेषतः रिची बेनॉसारख्या खेळाडूचा वर्ल्ड सिरीजला असलेला पाठिंबा पाहून आयसीसीच्या पदाधिकार्‍यांनी पॅकरशी चर्चेची भूमिका स्वीकारली.

२३ जूनला आयसीसीचे अधिकारी, पॅकर, बेनॉ यांच्यात लॉर्ड्सवर मिटींग झाली. सुमारे दीड तासाच्या या मिटींगमध्ये दोन्ही बाजू सामोपचाराच्या तयारीत असतानाच पॅकरने एक मागणी केली....

१९७८-७९ च्या मोसमानंतर ऑस्ट्रेलियात होणार्‍या क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क चॅनल नाईनला मिळावे!

पॅकरची ही मागणी मान्यं करणं आयसीसीच्या आवाक्याबाहेरचं होतं. आयसीसीच्या अधिकार्‍यांनी पॅकरला हे समजावण्याचा पुष्कळ प्रयत्नं केला. परंतु ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आणि ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन यांच्या लालफितीच्या कारभारामुळे अ‍ॅशेस सिरीजच्या प्रसारणाचे हक्क मिळवण्यासाठी आपल्याला दुप्पट किंमत मोजावी लागल्याचं पॅकर विसरला नव्हता! प्रसारणाचे हक्क मिळावेत म्हणून तो ठाम अडून बसला! आयसीसीच्या अधिकार्‍यांनी असमर्थता दर्शवताच तो मिटींगमधून धुमसत बाहेर पडला! बाहेर येताच त्याने जाहीर केलं,

"Had I got those TV rights I was prepared to withdraw from the scene and leave the running of cricket to the board. I will take no steps now to help anyone. It's every man for himself and the devil take the hindmost!"

ऑस्ट्रेलियन संघाचा मॅनेजर लेन मॅडॉक आणि त्याचा सहाय्यक नॉर्म मॅकमोहन यांनी पॅकरशी करार केलेल्या खेळाडूंकडे स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्तं केली होती. वर्ल्ड सिरीज क्रिकेटच्या या वादळाचा व्हायचा तो परिणाम झालाच! इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ३-० असा पराभव करत अ‍ॅशेस सिरीज जिंकली!

आयसीसीने आता पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटला नेस्तनाबूत करण्याचं धोरण अवलंबलं!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटच्या मॅचेसना फर्स्ट क्लासचा दर्जा देण्यात येणार नाही असं आयसीसीने जाहीर केलं! इतकंच नव्हे तर पॅकरशी करारबद्ध असलेल्या एकाही खेळाडूला टेस्ट, वन डे आणि इंग्लिश कौंटीसकट इतर कोणत्याही फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये खेळण्यावर आयसीसीने बंदी घालण्याचा निर्णय घेतला!

पॅकरशी करार केलेल्या खेळाडूंपैकी जेफ थॉमसन आणि अल्विन कालीचरण या दोघांचा आधीच फोर आयपी या रेडीओ स्टेशनशी करार झाला होता. या करारान्वये दोघांनाही क्वीन्सलँडचं प्रतिनिधीत्वं करणं बंधनकारक होतं! ही भानगड ध्यानात येताच थॉमसन आणि कालीचरणचा मॅनेजर डेव्हीड लॉर्डने पॅकरशी झालेला दोघांचाही करार रद्दं करवून घेतला!

पॅकरशी करार केलेल्या अनेक खेळाडूंवर आयसीसीच्या निर्णयाने आधीच दडपण आलं होतं. त्यातच थॉमसन आणि कालीचरणच्या प्रकरणाची भर पडली. अनेक खेळाडू आपल्या भविष्याचा विचार करुन पॅकरशी केलेला करार रद्द करण्याच्या निर्णयाप्रत आले होते!

परंतु हार मानेल तो केरी पॅकर कसला?

सर्वात प्रथम खेळाडूंची गाठ घेऊन आपण त्यांच्या पाठीशी उभे असल्याचा त्याने खेळाडूंना दिलासा दिला. प्रत्यक्षं सामने सुरू होण्यापूर्वीच खेळाडूंना त्यांच्या करारात नमूद केल्याप्रमाणे पैसे अ‍ॅडव्हान्स देण्यात येतील असं सांगून त्याने खेळाडूंना आश्वस्तं केलं! इतकंच नव्हे तर खेळाडूंना ताबडतोब पैशाचा पहिला हप्ता मिळेल याचीही त्याने व्यवस्था केली! पाठोपाठ कोणालाही परस्पर वर्ल्ड सिरीज क्रिकेटशी केलेला करार रद्दं करता येणार नाही अशी त्याने ऑस्ट्रेलियन कोर्टातून ऑर्डर मिळवली!

मायकेल होल्डींग म्हणतो,
"First time in my entire life, I saw $20000 in my bank account book! I pushed it back to the cashier and asked to check again! I have never ever had that sort of money in my account! Thats when I realized.. this is for real!"

इतकंच करुन पॅकर थांबला नाही!

इंग्लंड क्रिकेट बोर्डाविरुद्ध टोनी ग्रेग, माईक प्रॉक्टर आणि जॉन स्नो यांनी कोर्टात दाखल केलेल्या खटल्यात त्याने तिघांना पूर्ण पाठींबा दिला!

२६ सप्टेंबर १९७७ ला लंडनच्या कोर्टात हा खटला सुरु झाला. तब्बल सात आठवडे दोन्ही बाजूंचे वाद-प्रतिवाद झाले. बोर्डाच्या दाव्याप्रमाणे खेळाडूंनी गुप्तपणे करार करणं हे इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकाराचं उल्लंघन होतं. खेळाडूंच्या मताप्रमाणे व्यावसायिक खेळाडूंना आर्थिक प्राप्तीसाठी योग्य वाटेल त्या स्पर्धेत खेळण्याचा पूर्ण हक्कं होता! खेळाडूंनी गुप्तपणे करार करुन गोपनियतेच्या नियमाचा भंग केला असं बोर्डाने प्रतिपादन केलं. याचा प्रतिवाद करताना करार करताना गुप्तता पाळली नसती तर बोर्डाच्या अधिकार्‍यांनी खेळाडूंना करार करण्यास मज्जाव केला असता असं खेळाडूंनी ठणकावलं!

जज्ज क्रिस्तोफर स्लेड या निर्णयाचा निकाल देताना म्हणाले,
"Professional cricketers need to make a living and the ICC should not stand in their way just because its own interests might be damaged. The ICC might have stretched the concept of loyalty too far. Players could not be criticized for entering the contracts in secrecy as the authorities would deny the players the opportunity to enjoy the advantages offered by World Series Cricket!"

इंग्लिश क्रिकेट बोर्डालाच काय पण आयसीसीलाही हादरा बसला! या निकालामुळे वर्ल्ड सिरीज क्रिकेटमधील खेळाडूंवर अधिकृतपणे निर्बंध घालणं आयसीसी आणि कोणत्याही देशाच्या क्रिकेट बोर्डाला अशक्यं होऊन बसलं!

मात्रं कौंटी संघांना या निर्णयामुळे आनंदच झाला होता!
पॅकरशी करारबद्ध असले तरीही खेळाडू कौंटी खेळू शकणार होते!

दरम्यान वेस्ट इंडीजचा कॅप्टन क्लाईव्ह लॉईडचा सिडनी गॅझेटमध्ये इंटरव्ह्यू छापून आला. लॉईड म्हणाला,
"It is nothing personal! It is clearly earning a more comfortable source of income!"

क्रिकेटचा खेळ हौशी न राहता खेळाडूंच्या चरितार्थाचं साधन झाला होता हेच लॉईडच्या या वक्तव्यातून सूचीत होत होतं!

रिची बेनॉने पॅकरसाठी कन्सल्टंट पदाची जबाबदारी स्वीकारतानाच एका माणसापासून सावध राहण्याचा त्याला सल्ला दिला होता तो म्हणजे डॉन ब्रॅडमन! ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये ब्रॅडमनचं स्थान वादातीत होतं!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची अद्यापही पॅकरशी तडजोड करण्याची तयारी नव्हती!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटच्या सामन्यांना फर्स्ट क्लास दर्जा देण्याचं आयसीसीने आधीच नाकारलं होतं. आता कॉपीराईट कायद्याचा आधार घेत ऑस्ट्रेलियन संघाला 'ऑस्ट्रेलिया' असं नाव वापरण्यास मनाई करण्याचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने दावा लावला! इतकंच नाही तर पॅकरच्या सामन्यांना 'टेस्ट' म्हणून संबोधण्यासही ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या पाठिंब्याने आक्षेप घेतला! क्रिकेटचे अधिकृत नियम वापरण्यासही वर्ल्ड सिरीज क्रिकेटला एमसीसीची मालकी असल्याकारणाने कॉपीराईट कायद्यान्वये मनाई करण्यात आली!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा हा दावा कोर्टाने मान्यं केला!

इतकं करुनही समाधान न झालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मेलबर्न, सिडनी, पर्थ, ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड यापैकी कोणतंही प्रमुख स्टेडीयम पॅकरला मिळणार नाही याचीही चोख व्यवस्था केली! इतकी सगळी खबरदारी घेतल्यावर वर्ल्ड सिरीज क्रिकेट सुरु होण्यापूर्वीच बारगळणार याबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला खात्री झाली होती!

परंतु केरी पॅकरच्या डिक्शनरीत अशक्यं नावाचा शब्दंच नव्हता!

वर्ल्ड सिरीज साठीचे नियम आणि एकूणच खेळाची रुपरेषा ठरवण्याचं काम रिची बेनॉवर सोपवण्यात आलं. बंपर्सच्या संख्येवर असलेलं नियंत्रण हटवण्यात आलं! पाच दिवसांच्या मॅचेसचं 'सुपरटेस्ट' असं बारसं करण्यात आलं आणि ऑस्ट्रेलियन संघाला WSC Australian XI असं नामाभिधान प्राप्तं झालं! सुपरटेस्टच्या जोडीला असलेल्या वन डे स्पर्धेला इंटरनॅशनल कप असं नाव देण्यात आलं!

मुख्यं अडचण होती ती मैदानांची!

पॅकरने वर्ल्ड सिरीजच्या सामन्यांसाठी मेलबर्नचं व्हीएफएल पार्क आणि अ‍ॅडलेडचं फुटबॉल पार्क ही दोन ऑस्ट्रेलियन रुल्स फुटबॉल स्टेडीयम, पर्थचं ग्लॉस्टर पार्क हे चक्कं जॉगींगसाठी वापरलं जाणारं मैदान आणि सिडनी शोग्राऊंड लीजवर घेतली होती! यापैकी एकाही मैदानावर पीच किंवा खेळपट्टी नव्हती! कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या नाकावर टिच्चून १९७७-७८ च्या मोसमात वर्ल्ड सिरीज क्रिकेटचे सामने घेण्याचा पॅकरचा अट्टाहास होता! परंतु पीच नसेल तर खेळणार कशावर?

ब्रिस्बेनच्या गॅब्बा मैदानाचा क्युरेटर आणि ग्राऊंड्समन असलेल्या जॉन मेलीची पॅकरने आधीच वर्ल्ड सिरीज क्रिकेटसाठी भरपूर पैसे देऊन नेमणूक केली होती. इतक्या कमी कालावधीत प्रत्यक्षं मैदानात पीच तयार करणं अशक्यं असल्याची कल्पना असलेल्या मेलीच्या सुपिक डोक्यातून एक भन्नाट कल्पना बाहेर पडली...

प्रत्येक मैदानाला लागून मेलीने ग्रीनहाऊस (हॉटहाऊस) उभारलं. या ग्रीनहाऊसमध्ये कसदार मातीत त्याने गवत वाढवलं! योग्यं त्या प्रमाणात गवत वाढताच ही माती क्रेनच्या सहाय्याने मैदानाच्या मध्यभागी समप्रमाणात पसरणात आली! योग्य त्या प्रमाणात पाणी दिल्यावर आणि काळजीपूर्वक मशागत करुन यातून उभं राहीली ती क्रिकेटची खेळपट्टी!

ड्रॉप इन पीच!

(जॉन मेलीची ही अभिनव कल्पना आज जगभर वापरली जाते!).

वर्ल्ड सिरीज क्रिकेटचे सामने हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध जागतिक संघात व्हावे अशी पॅकरची मूळ योजना होती. परंतु वेस्ट इंडीजचे इतके खेळाडू वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये सहभागी झाले, की वेस्ट इंडीजचा पूर्ण संघ उभारणं शक्यं झालं होतं! अर्थात वेस्ट इंडीज संघातले खेळाडू जागतिक संघाकडूनही खेळत होतेच!

ग्रेग चॅपल म्हणतो,
"One feeling each and every player had was for the world series cricket to suceed, it would suceed on the field and the quality of the cricket has to be good! And the feeling amongst the players was we were representing our country as we ever would!"

जास्तीत जास्तं प्रेक्षकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने पॅकरने मार्केटींगचा भर दिला होता तो फास्ट बॉलर्स आणि त्यांच्या रफ-टफ प्रतिमेवर! डेनिस लिली, मायकेल होल्डींग, अँडी रॉबर्ट्स आणि इम्रान खान हे मुख्यतः वर्ल्ड सिरीजच्या जाहिरातींमधून झळकत होते!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटची तयारी सुरु असतानाच भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आला होता. वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत संघात निवड न करण्याबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे अधिकारी ठाम होते. त्यांना ब्रॅडमनचा अर्थातच पाठिंबा होता. पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंबद्दल बोलताना ब्रॅडमन म्हणाला,

"The players who had joined hands with World Series Cricket had backstabbed Australian Cricket and Australian public!"

ऑस्ट्रेलियन संघात वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये खेळण्यास प्रतिबंध करण्यात आलेला जेफ थॉमसन वगळता कोणीही अनुभवी खेळाडू नव्हता. यावर तोडगा म्हणून दहा वर्षांपूर्वी रिटायर झालेल्या बॉबी सिंप्सनला पुन्हा पाचारण करण्यात आलं होतं! वर्ल्ड सिरीज क्रिकेटमधून इयन चॅपलने डावललेल्या किम ह्यूज, क्रेग सार्जंट, गॅरी कोझीयर यांचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला होता!

सिंप्सन म्हणतो,
"I got call from Australian Board through Freddie Bennett. Finally I met with Fred and Bradman. He illustrated his comeback in 1946 at 40 years of age. I would not argue with Bradman and just said yes!"

दुसरीकडे पॅकरशी करारबद्ध झालेल्या रे ब्राईट आणि रिची रॉबिन्सन यांना ग्रेड क्रिकेटमध्ये खेळण्यासही मनाई करण्यात आली! वर्ल्ड् सिरीजमध्ये खेळण्याची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने ब्राईटला फूट्स्कॅरी टेक्नीकल कॉलेजसाठी तर रॉबिन्सनला नॉर्थ अल्फींग्टन क्लबसाठी खेळण्याचा मार्ग पत्करावा लागला!

इयन चॅपलने भारत - ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीजवर टीकेची झोड उठवली. चॅपल म्हणाला,
"How can the series between visiting Indian team and Australian Cricket Board XI be called a test series? The quality of the cricket there is not going to be even upto first class level!"
२ डिसेंबर १९७७!

भारताची ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत संघाविरुद्ध पहिली टेस्ट मॅच ब्रिस्बेनला सुरु झाली!

त्याच दिवशी मेलबर्नच्या व्हीएफएल पार्कवर ऑस्ट्रेलियन संघ आणि वेस्ट इंडीयन संघामध्ये वर्ल्ड सिरीजची पहिली सुपरटेस्ट सुरु झाली!

ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत संघाच्या भारताविरुद्धच्या मॅचच्या दिवशीच वर्ल्ड सिरीज क्रिकेटची सुरवात करण्याचा पॅकरचा अट्टाहास होता. आपल्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटला अधिकृत संघाच्या टेस्ट सामन्यांपेक्षा प्रेक्षकांचा जास्तं प्रतिसाद लाभेल अशी पॅकरची अपेक्षा होती. पण पॅकरचा हा डाव त्याच्यावरच उलटला!

७९००० प्रेक्षकांची क्षमता असलेल्या व्हीएफएल स्टेडीयमवर जेमतेम २००० प्रेक्षक हजर होते!

ऑस्ट्रेलियातील बहुसंख्य प्रेक्षकांची सुरवातीला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत सामन्यांना सहानुभूती होती. अर्थात यात महत्वाचा वाटा वर्ल्ड सिरीज क्रिकेट आणि पॅकरला खलनायक ठरवणार्‍या वृत्तपत्रांतील वार्तांकनाचाही होताच! ऑस्ट्रेलियातील बहुसंख्य पत्रकारांचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला पाठिंबा होता! याचा एकत्रित परिणाम म्हणून भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट सिरीजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता!

पहिल्या सुपरटेस्टमध्ये वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाचा ३ विकेट्सनी पराभव केला!

दुसरी सुपरटेस्टही नेमकी भारत - ऑस्ट्रेलिया सिरीजच्या दुसर्‍या टेस्टबरोबरच सुरु झाली!

पहिल्याच इनिंग्जमध्ये अँडी रॉबर्ट्सचा तुफान वेगाने आलेला बॉल अपेक्षेपेक्षा जास्तं उसळला...
डेव्हीड हूक्सने पूल् करण्याचा पवित्रा घेतला...
परंतु..
हूक्सचा अंदाज चुकून बॉल त्याच्या जबड्यावर आदळला!
त्याचा जबडा खिळखिळा झाला!

हूक्स रिटायर हर्ट होऊन परत फिरत असतानाच एका महत्वपूर्ण गोष्टीच्या क्रिकेटमधील पदार्पणाची बीजं रोवली गेली!

हेल्मेट!

तिसरी सुपरटेस्ट सुरु झाली ती भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसर्‍या टेस्टच्या दुसर्‍या दिवशी - ३१ डिसेंबरला. अधिकृत टेस्टला न गेलेले प्रेक्षक तरी आपल्या सुपरटेस्टसाठी येतील या अपेक्षेने पॅकरने ही मॅच एक दिवस उशिरा ठेवली होती. परंतु अधिकृत टेस्ट क्रिकेटच्या तुलनेत मिळणारा प्रतिसाद अगदीच कमी होता!

वेस्ट इंडीजने पहिली सुपरटेस्ट सिरीज २ - १ अशी जिंकली!

टेस्ट क्रिकेटच्या तुलनेत बाल्यावस्थेत असूनही वन डे ला मिळणारी लोकप्रियता पॅकरच्या चाणाक्षं नजरेने अचूक हेरला होता. दोन सुपरटेस्ट्सच्या दरम्यानच्या कालावधीत इंटरनॅशनल कपच्या वन डे मॅचेस पेरण्याची त्याने दक्षता घेतली होती. अर्थात वन डे लाही सुरवातीला प्रतिसाद अल्पच होता, परंतु सुपरटेस्ट्सच्या तुलनेत परिस्थिती बरी होती!

वन डे पूर्वीच्या एका प्रॅक्टीस मॅचमध्येच टोनी ग्रेग आणि इयन चॅपल यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली!

इयन चॅपल आणि जागतिक संघाचा कॅप्टन असलेल्या टोनी ग्रेगने मॅच सुरु होण्यापूर्वीच बंपर्स न टाकण्याचं मान्यं केलं होतं. फ्लडलाईट्समध्ये प्रथमच मॅच होत असल्याने बंपर धोकादायक ठरण्याची शक्यता होती. परंतु रिक मॅकॉस्कर आणि इयन चॅपल आरामात बॅटींग करत असलेले पाहून ग्रेगने चॅपलला दोन बंपर्स टाकले! भडकलेल्या चॅपलने त्याला फ्लडलाईट्स बंद करण्याची धमकी दिली!

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजमधल्या पहिल्या तीन सुपरटेस्ट्सच्या सिरीजनंतर दुसरी सिरीज होती ती ऑस्ट्रेलिया आणि जागतिक संघांतील सुपरटेस्टची! जागतिक संघाने सिडनीची पहिली सुपरटेस्ट जिंकल्यावर पर्थच्या ग्लॉस्टर पार्कच्या दुसर्‍या सुपरटेस्टमध्ये पुन्हा एकदा ग्रेग आणि चॅपलची खडाजंगी झाली!

डेव्हीड हूक्सला झालेल्या दुखापतीनंतर हेल्मेटच्या निर्मितीला वेग आला होता. जागतिक संघाच्या पहिल्या इनिंग्जमध्ये टोनी ग्रेग बॅटींगला आला ते अगदी प्राथमिक स्वरुपाचं हेल्मेट घालूनच!

डेनिस लिली समोर ते हेल्मेट म्हणेज बैलासमोर लाल फडकं!
त्याने ताबडतोब त्या हेल्मेटचा टार्गेट प्रॅक्टीस म्हणून वापर करण्यास सुरवात केली!
लिलीचा बंपर ग्रेगच्या हेल्मेटवर आपटला!

ग्रेगच्या सुदैवाने त्याला दुखापत झाली नसली तरी लिलीने आपल्या डोक्याकडे बोट दाखवून आपला इरादा जाहीर केला!

लिलीचे पुढचे पाच बॉल ओळीने बंपर होते!
अर्थात टोनी ग्रेगला त्यामुळे काहीच फरक पडला नाही!

ग्रेग आणि पाठोपाठ इम्रान खानही आऊट होऊन परतल्यावर रिटायर हर्ट झालेला गॉर्डन ग्रिनीज पुन्हा बॅटींगला आला. ग्रिनीजचा रनर म्हणून ग्रेग आल्याबरोबर चॅपलने त्याला हेल्मेट घालून येण्याची सूचना दिली!

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंग्जमध्ये अँडी रॉबर्ट्सचा बॉल हातावर शेकल्याने चॅपलची करंगळी फ्रॅक्चर झाली! हुक आणि पूल मारण्यात पटाईत असलेल्या चॅपलने रॉबर्ट्स, इम्रान, वेन डॅनियल यांचे शॉर्टपीच बॉल डेड बॅटने डिफेन्सिव पद्धतीने खेळण्याचं धोरण अवलंबलं. ग्रेग बॉलिंगला येताच त्यानेही चॅपलला अपेक्षेप्रमाणे बंपर टाकलाच! यावेळी मात्रं चॅपलने जोरदार हूक करत बाऊंड्री वसूल केली!

पण एवढ्यावर गप्प बसला तर तो चॅपल कसला..
“Mate, I might not be able to hook good bowling, but I can hook your shit!”

उत्तरादाखल ग्रेगने टाकलेला पुढचा बंपरही चॅपलने लगेच हुक केला! दोघांमधली बोलाचाली बराच वेळ सुरु होती. भडकलेला ग्रेग शेवटी म्हणाला,

"I will smash a bottle over your fucking head!"

अंपायर गॅरी ड्युप्रॉझेलने दोघांना खेळावर लक्षं केंद्रीत करण्याची ताकीद दिली. परंतु तरीही दोघांची एकमेकाला उद्देशून बडबड बराच वेळ सुरु होती!

डेरेक अंडरवूड म्हणतो,
“There was a lot going on between Tony and Ian, and it was a lot to do with Greigy being the senior figure.”

चॅपलला पॅकर आणि ग्रेग यांच्यातली वाढती जवळीक सहन होत नव्हती! ग्रेगला पॅकर विनाकारण महत्वं देतो आहे असं चॅपलचं मत होतं! आपल्या मनातली ही मळमळ व्यक्तं करताना तो म्हणतो,

“The problem I had with him was that he was off earning money by doing ads while the rest of his team was training… he held his place in the superb team and he did not deserve to.”

टोनी ग्रेगने मात्रं स्पष्टंपणे दोघांमधली परिस्थिती मांडली.
“I didn’t like him and he didn’t like me. As simple as that!”

जागतिक संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची सुपरटेस्टची सिरीज २ - १ अशी जिंकली!
वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या मोसमाची सांगता झाली ती इंटरनॅशनल कपच्या फायनलने!

वास्तविक कोणत्याही पूर्वतयारीविना इतक्या कमी कालावधीत पिच तयार करण्यापासून ते सामन्यांचं आयोजन करणं हेच मुळात वर्ल्ड सिरीजच्या दृष्टीने अभिमानास्पद होतं! परंतु पॅकरला अपेक्षित असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मात्रं तुलनेने कमी मिळाला होता. त्यातल्यात्यात वन डे मॅचेसना आणि त्यातही डे-नाईट मॅचेसना बर्‍यापैकी प्रेक्षक हजर होते!

चाणाक्षं पॅकरच्या नजरेतून ही गोष्ट सुटणं शक्यंच नव्हतं!

मेलबर्नच्या व्हीएफएल पार्कवर झालेल्या डे-नाईट मॅचच्या दरम्यान घडलेल्या एका प्रसंगातून पॅकरची वर्ल्ड सिरीज लोकप्रिय करण्यासाठी कोणत्या थराला जाण्याची तयारी होती हे दिसून आलं!

मेलबर्न सिटी कौन्सिलच्या नियमाप्रमाणे रात्री साडेदहा वाजता मैदानावरील फ्लडलाईट्स बंद करणं बंधनकारक होतं! हा नियम पाळण्याच्या अटीवरच पॅकरला फ्लडलाईट्स वापरण्याची सिटी कौन्सिलने परवानगी दिली होती! या नियमाच्या अंमलबजावणीबाबत सिटी कौन्सिलचे अधिकारी इतके आग्रही होते की मॅचच्या दरम्यान आपला एक अधिकारी त्यांनी ग्राऊंडवर बसवला होता!

टोनी ग्रेग आणि केरी पॅकर दोघंही मॅच पाहण्यास हजर होते. रात्री साडेदहाच्या आत मॅच संपणं शक्यं नाही हे ग्रेगच्या ध्यानात आलं होतं! या दोघांच्या जोडीला वर्ल्ड सिरीज क्रिकेटचा चीफ एक्झीक्युटीव्ह अँड्र्यू कॅरो तिथे होता. त्यांच्यापासून काही अंतरावरच नियमाची अंमलबजावणी होते की नाही हे यावर नजर ठेवण्यासाठी हजर असलेला सिटी कौन्सिलचा अधिकारी बिउअरचे घुटके घेत बसला होता! विरुद्ध बाजूला असलेल्या मोठ्या घड्याळावर त्याची नजर होती!

रात्री नऊच्या सुमाराला कॅरोने पॅकरला गाठून लाईट्स बंद करण्याच्या नियमाबद्दल विचारणा केली.

"Kerry, we are not going to make it by 10.30! We have to switch the lights off!"

सिटी कौन्सिलच्या नियमामुळे अर्धवट अवस्थेत बंद करावी लागली तर त्याचे काय परिणाम होतील हे पॅकरच्या एका क्षणात ध्यानात आलं. वर्ल्ड सिरीजच्या पुढच्या मॅचेसना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणं या मॅचच्या यशस्वी आयोजनावर अवलंबून होतं हे बिझनेसमन असलेल्या पॅकरला कोणी मुद्दाम सांगण्याची गरज नव्हती!

"Fix it Andrew! Just fix it!" पॅकर उत्तरला!

कॅरो गोंधळून गेला! नेमकं काय करावं हे त्याला कळेना! पाच मिनीटांनी त्याने पुन्हा पॅकरला विचारणा केल्यावर पॅकरने पुन्हा पहिलंच उत्तर दिलं.

"Fix it Andrew!"

नेमकं काय फिक्स करायचं या विचारात कॅरो मागे वळत असतानाच पॅकर म्हणाला,

"Stop the clock!"

कॅरोच काय पण हा संवाद ऐकत असलेला टोनी ग्रेगही ते ऐकून उडालाच! घड्याळ कसं थांबवणार?
तेवढ्यात पॅकर म्हणाला,

"Slow the clock!"

पॅकरच्या सूचनेप्रमणे कॅरोने अखेर दर अर्ध्या तासाला पाच मिनीटं या हिशोबात घड्याळ स्लो करवलं!
'साडेदहा' ची डेडलाईन गाठण्यापूर्वी मॅच संपण्यास तेवढा वेळ पुरेसा होता!

टोनी ग्रेग म्हणतो,
"That for me was an example of incredible atrophy! Who would have thought that? That was Kerry at his best!"

शेवटच्या बॉलवर सिक्स मारुन वेन डॅनियलने वेस्ट इंडी़जला मॅच जिंकून दिली!
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी मैदानावर धाव घेतली! पहिल्या मोसमात सर्वात जास्तं प्रेक्षक या मॅचला उपस्थित होते!

ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत संघाने भारताविरुद्धची सिरीज ३ - २ अशी जिंकली!
वर्ल्ड सिरीजच्या तुलने प्रेक्षकांचा आणि वृत्तपत्रांचाही पाठिंबा याच सिरीजला मिळाला होता!
वर्ल्ड सिरीजवर मात केल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे अधिकारी समाधानी होते

परंतु केरी पॅकर ही काय चीज आहे हे अजून त्यांना कळलं नव्हतं!

भारताविरुद्धची सिरीज संपल्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर गेला.

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने आयसीसीमध्ये केवळ एकीच्या भावनेतून वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने होकार दिला होता. लंडनच्या कोर्टात इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाला पराभव पत्करावा लागल्यानंतरही ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पॅकरशी करारबद्ध खेळाडूंना भारताविरुद्धच्या सिरीजमध्ये आणि वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर निवडलं नव्हतं. इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांनीही आपल्या धोरणाला पाठींबा द्यावा अशी ऑस्ट्रेलियाची अपेक्षा होती, परंतु वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाला वर्ल्ड सिरीज आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या साठमारीत पडण्याची मुळीच इच्छा नव्हती! वर्ल्ड सिरीजमधील खेळाडूंची निवड न केल्यास टेस्ट मॅचेसना प्रेक्षक मिळणार नाहीत हे बोर्डाच्या अधिकार्‍यांच्या ध्यानात आलं होतं. त्यामुळे वर्ल्ड सिरीज क्रिकेटमधील खेळाडूंची निवड करण्यास त्यांना अनमान नव्हता! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ग्रिनीज, रिचर्ड्स, लॉईड, डेरेक मरे, रॉबर्ट्स, गार्नर हे ६ खेळाडू वर्ल्ड् सिरीज खेळलेले होते!

पोर्ट ऑफ स्पेनची पहिली टेस्ट वेस्ट इंडीजने आरामात जिंकली. बॉबी सिंप्सनच्या सूचनेवरुन व्हाईसकॅप्टन म्हणून जेफ थॉमसनची नेमणूक केली गेली होती. परंतु प्रत्यक्ष दौर्‍यावर मात्रं सिंप्सनचे १९६० च्या दशकातले बचावात्मक डावपेच आक्रमक स्वभावाच्या थॉमसनला फारसे मानवणारे नव्हते! त्यामुळे पहिल्या मॅचपासूनच दोघांमधील वादावादीला प्रारंभ झाला होता! याचा परिणाम साहजिकच थॉमसनच्या बॉलिंगवर दिसून आला होता.

ब्रिजटाऊनच्या दुसर्‍या टेस्टमध्ये अधिकृत टेस्ट मॅचमध्ये एक गोष्ट सर्वप्रथम वापरण्यात आली ती म्हणजे हेल्मेट! ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंग्जमध्ये ग्रॅहॅम यालप हा टेस्टमध्ये हेल्मेट वापरणारा पहिला बॅट्समन! हेल्मेटची आवश्यकता आणि उपयुक्तता वर्ल्ड सिरीज मध्ये आधीच सिद्ध झाली होती. वेस्ट इंडी़ज प्रेक्षकांनी मात्रं यालपच्या त्या हेल्मेटवर शिव्यांचा भडीमार केला!

या टेस्टमध्ये जेफ थॉमसनचा रुद्रावतार वेस्ट इंडीजला पाहण्यास मिळाला! वेस्ट इंडीजच्या पहिल्या इनिंग्जमध्ये तुफानी वेगाने बॉलिंग करत थॉमसनने ६ विकेट्स काढल्या! थॉमसनचा तो स्पेल इतका धोकादायक होता की व्हिव्हीयन रिचर्ड्ससारख्या बॅट्समनलाही बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला होता!

लॉईड म्हणतो,
"It was bloody quick! Fastes I had faced in my entire career! He was faster than our own fellows!"

लक्षात घ्या, हे क्लाईव्ह लॉईड म्हणतोय! वेस्ट इंडीजमध्ये ज्या काळात प्रत्येक देशातून एकापेक्षा एक तुफान वेगाने बॉलिंग करणारे फास्ट बॉलर्स येत होते त्या वेस्ट इंडीजचा कॅप्ट्न असलेल्या लॉईडचं हे मत असेल तर थॉमसनचे बॉल काय वेगात येत असतील याची कल्पनाच केलेली बरी!

परंतु थॉमसनच्या या तुफानी बॉलिंगनंतरही ऑस्ट्रेलियाला पराभव टाळता आला नाही! दुसर्‍या इनिंग्जमध्ये थॉमसन आणि बॉबी सिंप्सन यांच्यात फिल्ड प्लेसमेंटवरुन चांगलाच वाद झाला होता! आक्रमक स्वभावाचा थॉमसन सिम्प्सनच्या बचावात्मक डावपेचांना इतका वैतागला की त्याने ६ ओव्हर्सनंतर पुन्हा बॉलिंग करण्यास नकार दिला! ग्रिनीज आणि हेन्सने १३१ रन्सची पार्टनरशीप करत वेस्ट इंडीजला आरामात मॅच जिंकून दिली!

दुसरी टेस्ट संपल्यावर आणखीन एक सनसनाटी बातमी बाहेर आली!
डेस्मंड हेन्स, कॉलिन क्रॉफ्ट आणि रिचर्ड ऑस्टीन यांनी वर्ल्ड सिरीज क्रिकेटशी करार केला होता.
हे तिघंही जण इतर सहा जणांबरोबर दुसर्‍या टेस्टमध्ये खेळले होते!

तिसर्‍या टेस्टच्या आधी एक वाद उभा राहिला!

डेस्मंड हेन्स, कॉलिन क्रॉफ्ट आणि रिचर्ड ऑस्टीन या तिघांनाही तिसर्‍या टेस्टसाठीच्या संघातून वगळण्यात आलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजनंतर येणार्‍या भारतीय दौर्‍यावर जाण्याच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी करुन घेण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा वेस्ट इंडी़ज क्रिकेट बोर्डाने जाहीर केलं! मात्रं कॅप्टन क्लाईव्ह लॉईडने बोर्डाचा हा दावा साफ फेटाळून लावला. वर्ल्ड सिरीज क्रिकेटशी करार केल्यावरुनच तिघांना डच्चू देण्यात आल्याचा त्याने बोर्डावर आरोप केला! इतकंच करुन लॉईड थांबला नाही तर त्याने कॅप्टनपदाचा राजीनामा दिला आणि ग्रिनीज, रिचर्ड्स, रॉबर्ट्स, गार्नर आणि मरे हे देखिल टेस्टमध्ये खेळणार नाहीत असं जाहीर केलं!

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने आक्रमक पवित्रा घेत वर्ल्ड सिरीज क्रिकेटशी संबंधीत कोणाचीही सिरीजमधल्या उरलेल्या टेस्टमध्ये निवड केली जाणार नाही असं जाहीर केलं! परिणामी तिसर्‍या टेस्टमध्ये पहिल्या दोन टेस्टमध्ये खेळलेले अल्विन कालीचरण आणि डेरेक पेरी हे दोघंच खेळाडू उरले होते! सहा नवीन खेळाडूंना टेस्टमध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली!

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचा हा निर्णय बूमरँगप्रमाणे त्यांच्यावरच उलटला!

लॉईड, रिचर्ड्स, ग्रिनीज, हेन्स, रॉबर्ट्स, गार्नर यासारख्या खेळाडूंविना खेळल्या जात असलेल्या क्रिकेटमध्ये सामान्य प्रेक्षकांना फारसा रस उरला नव्हता. परिणामी उरलेल्या तीनही टेस्टमध्ये आणि वन डे सिरीजमध्ये प्रेक्षकांची संख्या चांगलीच रोडावली! त्यातच पाचव्या टेस्टच्या पाचव्या दिवशी व्हॅनबर्न होल्डरला आऊट देण्यात आल्यावर मैदानावर हजर असलेल्या तीन हजार प्रेक्षकांनी मैदानात धाव घेत हुल्लडबाजीला सुरवात केल्यामुळे ही मॅच ड्रॉ झाल्याचं जाहीर करावं लागलं!

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा ऑस्ट्रेलियाला पूर्ण पाठींबा होता! १९७८ च्या इंग्लिश मोसमात वर्ल्ड सिरीजशी संबंधीत असलेल्या टोनी ग्रेग, अ‍ॅलन नॉट, डेरेक अंडरवूड आणि बॉब वूल्मर यांना इंग्लंडच्या संघातून वगळण्यात आल्म होतं! मात्रं जवळपास सगळ्या कौंटी संघांनी पॅकरच्या खेळाडूंची आपल्या संघात निवड केली होतीच! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याला आक्षेप घेण्याचा विचार केला होता, परंतु आदल्या वर्षीच कोर्ट केसमध्ये अडीच लाख पौंडाचा दंड बसल्याने हात पोळलेल्या इंग्लंड बोर्डाने तो विचार रद्द केला!

वेस्ट इंडीजप्रमाणे पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डानेही सुरवातीला पॅकरशी करार केलेल्या खेळाडूंची निवड न करण्याचा पवित्रा घेतला होता. पाकिस्तानच्या खेळाडूंपैकी झहीर अब्बास, आसिफ इक्बाल, मुश्ताक महंमद, माजिद खान, इमरान खान, सर्फराज नवाज, जावेद मियांदाद हे वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये खेळले होते! परंतु पाकिस्तानच्या अधिकाधीक खेळाडूंनी पॅकरशी करार केल्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नरमाईची भूमिका स्वीकारली!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटच्या पहिल्या मोसमातील अपयशाने खचून न जाता केरी पॅकर ते अपयश धुवून काढण्याच्या मागे लागला! मार्केटींगच्या तंत्राचा अत्यंत आक्रमक आणि पुरेपूर वापर करत वर्ल्ड सिरीज क्रिकेटची आणि त्यातील सहभागी खेळाडूंची आणि सामन्यांची जास्तीत जास्तं प्रसिद्धी करण्याचं त्याने तंत्रं अवलंबलं! क्रिकेट प्रेक्षक म्हणून अद्याप उपेक्षीत असलेल्या स्त्रिया आणि लहान मुलांना टार्गेट करुन त्यांच्यासाठी त्याने खास जाहिराती बनवून घेतल्या!

परंतु या सगळ्यानेही पॅकरचं समाधान झालं नव्हतं!

सिडनीच्या 'मोजो' या अ‍ॅड एजन्सीकडून लिली, रॉडनी मार्श, इयन आणि ग्रेग चॅपल यांच्या कामगिरीचं वर्णन करणारी आणि सामान्यं ऑस्ट्रेलियन प्रेक्षकाच्या भावनांना हात घालणारी एक मिनीटाची गीतवजा जाहिरात त्याने तयार करुन घेतली! अ‍ॅलन जॉन्स्टन आणि अ‍ॅलन मॉरीस यांच्या लेखणीतून उतरलेली आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये अजरामर झालेलं हे जाहिरातरुपी गीत म्हणजेच...

C'mon Aussie C'mon !!

दरम्यान जास्तीत जास्तं खेळाडूंना वर्ल्ड सिरीज क्रिकेटशी करारबद्ध करण्याचं पॅकरचं सत्रं सुरूच होतं! पाकिस्तान, दक्षिण आफ्रीका आणि वेस्ट इंडीजच्या अनेक खेळाडूंनी पॅकरशी करार केले होते. एकाही भारतीय खेळाडूने मात्रं अद्यापही वर्ल्ड सिरीजशी करार केला नव्हता! १९७७-७८ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियात असताना इयन चॅपलने सुनिल गावस्कर आणि बिशनसिंग बेदी यांना वर्ल्ड सिरीज क्रिकेटशी करारबद्ध करण्याच्या दृष्टीने बरेच प्रयत्नं केले होते, परंतु दोघांनीही चॅपलला ठाम नकार दिला होता! टोनी ग्रेगने १९७८ मध्ये गावस्करशी केलेली बोलणीही निष्फळच ठरली होती! ग्रेगने गुंडाप्पा विश्वनाथलाही वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये खेळण्याची ऑफर दिली होती, पण गावस्कर आणि बेदीप्रमाणेच विश्वनाथनेही नकार दिला!

पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटशी करार केलेल्या खेळाडूंची संख्या एव्हाना ५० च्या वर गेली होती! शेफील्ड शील्डमध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या आणि रिटायर झालेल्या अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आणि वेगवेगळ्या देशांतील खेळाडूंचा त्यात समावेश होता! पॅकरच्या या पवित्र्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला टेस्ट क्रिकेट खेळण्याच्या क्षमतेचे तरुण खेळाडू मिळणं मुष्कील झालं होतं! सिडनीच्या ग्रेड क्रिकेटमध्ये खेळणार्‍या एका खेळाडूने न्यू साऊथ वेल्सच्या सिलेक्टर्सचं लक्षं वेधून घेतलं होतं. आपल्या पहिल्या तीनपैकी दोन मॅचेसमध्ये त्याने शतक झळकावलं होतं. सिडनीच्या एका क्लबविरुद्ध खेळताना त्याने तिसरं शतक झळकावताच सिलेक्टर्सनी त्याची न्यू साऊथ वेल्सच्या संघात निवड केली!

दुसर्‍याच दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये तो तरुण बॅट्समन वर्ल्ड सिरीज क्रिकेटशी करारबद्ध असल्याचं जाहीर करुन पॅकरने न्यू साऊथ वेल्सच्या सिलेक्टर्सची हवा काढून घेतली!

(हा तरुण खेळाडू म्हणजे पुढे ऑस्ट्रेलियासाठी टेस्ट खेळलेला आणि यथावकाश दक्षिण आफ्रीकेचा कॅप्टन झालेला केपलर वेसल्स!)

वर्ल्ड सिरीज क्रिकेटच्या पहिल्या मोसमापासून न्यूझीलंड क्रिकेटचा प्रेसिडेंट असलेल्या वॉल्टर हॅडलीने पॅकरशी तडजोड करण्याची भूमिका घेतली होती. वॉल्टर हॅडलीच्या मुलाने - रिचर्ड हॅडलीने पॅकरशी केलेल्या कराराला त्याने पाठींबाच दिला होता! इतकंच नव्हे तर पॅकरला न्यूझीलंडचा दौरा करण्याचंही त्याने आमंत्रण दिलं! वॉल्टर हॅडलीच्या आमंत्रणावरुन १९७८ च्या नोव्हेंबर महिन्यात वर्ल्ड सिरीज क्रिकेटने न्यूझीलंडचा दौरा केला!

या दौर्‍यात चार दिवसांची एक मॅच, तीन दिवसांची एक मॅच आणि ७ वन डे खेळवण्यात येणार होत्या. परंतु तीन दिवसांच्या मॅचचा पहिला दिवस पावसाने वाया गेल्यामुळे मग दोन दिवसांत दोन वन डे खेळवण्यात आल्याने वन डे मॅचेसची संख्या एकूण नऊ झाली! ऑकलंड आणि जोडीला न्यू प्लायमाऊथ, हेस्टींग्ज, लोअर हट, टुरांगा, वांग्नूई अशा लहान शहरांत वर्ल्ड सिरीजच्या या मॅचेसना ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांपेक्षा जोरदार प्रतिसाद लाभला!

न्यूझीलंडच्या दौर्‍यावरुन परतलेल्या वर्ल्ड सिरीजच्या खेळाडूंमधून पॅकरने वर्ल्ड सिरीज कॅव्हेलिअर्स या चौथ्या संघाची उभारणी केली! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि जागतिक संघात समावेश न झालेल्या खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला होता! रिटायर झालेले खेळाडू आणि उदयोन्मुख खेळाडूंचा या संघात मुख्यतः भरणा होता. दक्षिण आफ्रीकेचा ऑलराऊंडर एडी बार्लोकडे या संघाचं नेतृत्वं सोपवण्यात आलं. बार्लोच्या या कॅव्हेलिअर्स संघात रोहन कन्हाय, डेनिस एमिस, डग वॉल्टर्स, इयन रेडपाथ, मुश्ताक महंमद, गॅरी गिल्मोर, ग्रॅहॅम मॅकेंझी या बुजुर्ग खेळाडूंच्या जोडीला ट्रेव्हर चॅपल, वेन डॅनियल, मार्टीन केन्ट, केपलर वेसल्स या तरुण खेळाडूंचा समावेश होता! ऑस्ट्रेलियाच्या लहान-लहान शहरांमध्ये दौरा करुन ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि जागतिक संघाविरुद्ध कॅव्हेलिअर्सनी मॅचेस खेळाव्यात अशी पॅकरची योजना होती!

एकीकडे हे सर्व सुरु असतानाच न्यू साऊथ वेल्सच्या सरकारशी पॅकरच्या वाटाघाटी सुरु होत्या. वर्ल्ड सिरीज क्रिकेटवरील बंदी उठवून सिडनीच्या मैदानात आपल्याला मॅचेस आयोजित करण्याची परवानगी मिळावी म्हणून पॅकरचे प्रयत्नं सुरु होते! ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पॅकरला निकराचा विरोध केला! या वादात बोर्डाच्या बाजूने शब्दं टाकावा यासाठी डॉन ब्रॅडमनलाही भरीला घालण्याचा बोर्डाच्या अधिकार्‍यांनी बराच प्रयत्नं केला. परंतु ब्रॅडमनने या वादात पडण्यास नकार दिला! ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची वेस्ट इंडीजमध्ये झालेला पराभव पाहिल्यावर पॅकरशी तडजोड करणं हेच ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या दृष्टीने भल्याचं आहे या निष्कर्षाप्रत ब्रॅडमन आला होता!

बर्‍याच वाटाघाटींनंतर पॅकरच्या प्रयत्नांना अखेर यश आलं!

न्यू साऊथ वेल्स सरकारचा अध्यक्षं नेव्हील व्रान याने वर्ल्ड सिरीज क्रिकेटवरची बंदी उठवली!
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर मॅचेस खेळवण्याचा पॅकरचा मार्ग सुकर झाला!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटवरची बंदी उठवूनच व्रान थांबला नाही तर सिडनीच्या मैदानावर नुकतेच बसवण्यात आलेल्या फ्लडलाईट्सचा वापर करण्यासही त्याने पॅकरला परवानगी दिली!

न्यू साऊथ वेल्स पाठोपाठ क्वीन्सलँडच्या सरकारशीही पॅकरची बोलणी यशस्वी झाली! वर्ल्ड सिरीज क्रिकेटचे सामने ब्रिस्बेनच्या गॅब्बा मैदानावर घेण्याची पॅकरला परवानगी मिळाली!. यातून योग्य तो बोध घेत दक्षिण ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनने अ‍ॅडलेडला वर्ल्ड सिरीजचे सामने खेळवण्याची पॅकरला ऑफर दिली. परंतु पॅकरने नकार दिला! वर्ल्ड सिरीजच्या सामन्यांसाठी त्याने मुख्यतः सिडनी - मेलबर्नच्या प्रेक्षकांवर लक्षं केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला! अ‍ॅडलेड आणि पर्थला पूर्णपणे वगळण्यात आलं!

१९७७-७८ च्या पहिल्या मोसमात डे-नाईट मॅचेसना जास्तं प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याचं पॅकरच्या नजरेने हेरलं होतंच. याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने १९७८-७९ च्या मोसमात जास्तीत जास्तं मॅचेस डे-नाईट खेळवण्याच्या दृष्टीने त्याने पावलं उचलली! इंटरनॅशनल कपच्या वन डे स्पर्धेचे जास्तीत जास्तं सामने डे-नाईट खेळवण्याचा पॅकरने आधीच निर्णय घेतला होता! या स्पर्धेचा विजेता ठरवण्यासाठी पाच वन डेची फायनल सिरीज खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला! सर्वात धमाल केली ते बेनॉच्या सुपिक डोक्यातून बाहेर पडलेल्या सुपरटेस्ट मधील बदलामुळे!

पारंपारिक पाच दिवसांच्या टेस्ट मॅचच्या कल्पनेत बदल करुन चार दिवसांची डे-नाईट सुपरटेस्ट खेळवण्याची कल्पना बेनॉने मांडली!

सुपरटेस्ट्सच्या कार्यक्रमातही बदल करण्यात आला! पूर्वीप्रमाणे तीन मॅचेसच्या दोन सिरीज खेळवण्याला फाटा देण्यात आला. त्याऐवजी प्राथमिक फेरीत प्रत्येक संघाच्या इतर दोन संघांशी मॅचेस खेळवण्यात येणार होत्या. प्राथमिक फेरीअखेर जो संघ सर्वात वरच्या स्थानावर असेल तो फायनलमध्ये जाणार होता. उरलेले दोन संघ सेमीफायनलमध्ये भिडणार होते! सेमीफायनलमध्ये विजेता ठरलेला संघ फायनलमध्ये खेळणार होता!

वर्ल्ड सिरीज क्रिकेट लोकप्रिय होण्यासाठी जास्तीत जास्तं वन डे मॅचेसची आवश्यकता असल्याचं पॅकरचं मत होतं. पहिल्या मोसमात डे-नाईट मॅचेसमध्ये नेहमीच्या लाल बॉलऐवजी पिवळ्या रंगाचा बॉल वापरण्यात आला होता. आता त्याच्याऐवजी पांढरा बॉल वापरण्याच्या निर्णय घेण्यात आला! इतकंच नव्हे तर पारंपारिक पांढर्‍या रंगाच्या कपड्यांऐवजी रंगीत कपड्यांचा वापर करण्याचा आणि त्यावर वेगवेगळ्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या आणखीन एका कल्पनेचा जन्म झाला!

पॅकरच्या या सर्व कल्पनांचा आणि आक्रमक मार्केटींगचा कितपत उपयोग होणार होता?

१९७८-७९ च्या मोसमातच माईक ब्रिअर्लीच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ अ‍ॅशेस सिरीजसाठी ऑस्ट्रेलियात आला होता. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सिरीजनंतर बॉबी सिंप्सन रिटायर झाला होता. जेफ थॉमसननेही ऑस्ट्रेलियन क्रिकेटला रामराम ठोकून वर्ल्ड सिरीजची कास धरली होती! पॅकरशी संबधीत असलेल्या खे़ळाडूंची निवड न करण्याबाबत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड ठाम होतं. कॅप्टनपदाची माळ पडली ग्रॅहम यालपच्या गळ्यात! स्वतः यालप, किम ह्यूज, गॅरी कोझीयर आणि पीटर टूही हे चौघंजण वगळता यालपच्या संघातील बहुसंख्य खेळाडू अननुभवी आणि तरुण होते! ब्रिअर्लीच्या अनुभवी संघापुढे त्यांचा निभाव लागणं कठीणच होतं!

इयन बोथम म्हणतो,
"We bumped into Aussie boys who had gone to World Series Cricket at the airport. They wish us luck whole heartedly! I thought to myself, boy! There must be some friction here!"

खुद्दं ग्रॅहॅम यालपलाही आपल्याला कॅप्टन केलं जाईल याची अपेक्षा नव्हती! तो म्हणतो,

"The pressure on me from the Australian Cricket Board, Australian cricket loving public, my friends and team members was enormous, intense and unbearable!"

बॉब विलीस म्हणतो,
"His strings were pulled by Bob Parish and Ray Steel brigade! The public face of Australian Official cricket has to be a kindly one and they chose Graham for that face!"

२८ नोव्हेंबर १९७८!
सिडनी क्रिकेट ग्राऊंड!
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडी़ज यांच्यात इंटरनॅशनल कपची पहिली डे-नाईट वन डे मॅच!

सुमारे ५२००० प्रेक्षकांची क्षमता असलेलं सिडनीचं स्टेडीयम गच्चं भरलं होतं!
४४३७७ प्रेक्षक वर्ल्ड सिरीज क्रिकेटच्या या पहिल्याच वन डे मॅचला हजर होते!
त्यात स्त्रिया आणि मुलांची संख्या लक्षणीय होती!
पॅकरच्या आक्रमक मार्केटींगचा योग्य तो परिणाम झाला होता!
वर्ल्ड सिरीज क्रिकेटच्या लोकप्रियतेची चढती कमान सुरु झाली होती!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या दृष्टीने ही धोक्याची सूचना होती!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटची लोकप्रियता दिवसेदिवस वाढत चालली होती. पॅकरच्या मार्केटींग तंत्राचा यात महत्वाचा वाटा होताच! त्याचबरोबर बहुसंख्य मॅचेस डे-नाईट असल्याचाही मोठा फायदा झाला! वन डे क्रिकेटची लोकप्रियता खर्‍या अर्थाने वाढीस लागली! त्यातच डे-नाईट मॅचेसमध्ये लवकरच रंगीत कपड्यांचा वापर करण्यास सुरवात झाल्यावर प्रेक्षकांचं आकर्षण अधिकच वाढलं!

रॉडनी मार्श म्हणाला,
"We are bloody back! The bastards love us!"

परंतु या सगळ्यापेक्षाही महत्वाची बाब होती ती म्हणजे वर्ल्ड सिरीजमध्ये खेळलं जाणारं क्रिकेट हे अत्यंत उच्च दर्जाचं आणि खर्‍या अर्थाने खेळाडूंच्या क्षमतेची परिक्षा पाहणारं होतं! अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असल्याने वन डे तसेच सुपरटेस्टसमधील बॅट आणि बॉल यांच्यातला मुकाबला अत्यंत अटीतटीचा होता!

.... आणि दुसर्‍या बाजूला अ‍ॅशेस सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तरुण संघाची वाताहात होत होती!
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला ५ - १ असं रगडून काढत अ‍ॅशेस जिंकल्या!

अ‍ॅशेसमधील दारुण पराभवानंतर पत्रकारांच्या निष्ठाही ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटकडे वळल्या! अ‍ॅशेस मधील पराभव जिव्हारी लागलेल्या पत्रकारांनी वर्ल्ड सिरीज क्रिकेटमधील प्रमुख ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या संघात परत बोलवण्याची मागणी केली! प्रेक्षकांचा पाठींबा वर्ल्ड सिरीजलाच होता! सिडनीच्या मैदानावर झालेल्या सुपरटेस्टच्या फायनलला तीन दिवसांत सुमारे ४५ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती! काही दिवसांनीच सिडनीलाच झालेल्या अ‍ॅशेस सिरीजमधल्या शेवटच्या टेस्टला चार दिवसात जेमतेम २० हजार प्रेक्षक हजर होते!

सुपरटेस्टची सिरीज सुरु असतानाच कॅव्हेलिअर्स संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि जागतिक संघाविरुद्ध अनेक लहान - मोठ्या शहरांमध्ये कॅव्हेलिअर्सच्या मॅचेस झाल्या. सहसा उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहण्यास मिळत नसलेल्या लहान शहरांतील प्रेक्षकांपर्यंत वर्ल्ड सिरीज क्रिकेट नेण्याची पॅकरची ही योजन संपूर्ण यशस्वी झाली होती! कॅव्हेलियर्सच्या या दौर्‍यालाही प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला!

सुपरटेस्टच्या या फायनलमध्ये पुन्हा एकदा इयन चॅपल आणि टोनी ग्रेग यांच्यात वाद उफाळला!

टोनी ग्रेगच्या नेतृत्वात खेळणार्‍या जागतिक संघाला फायनल जिंकण्यासाठी अवघ्या दोन रन्सची आवश्यकता होती. क्रीजवर असलेले बॅट्समन होते बॅरी रिचर्ड्स आणि इम्रान खान! त्यांना विजयी रन काढण्याची संधी मिळू नये म्हणून इयन चॅपलने बॉल हाती घेतला आणि लेगस्टंपच्या बाहेर चार वाईड जातील या हेतूने बॉल टाकला! जागतिक संघाने अर्थातच मॅच जिंकली पण चॅपलच्या या अखिलाडूवृत्तीचं त्याला गालबोट लागलंच! इतकंच करुन चॅपल थांबला नाही, तर मॅच संपल्यावर टोनी ग्रेगशी शेकहँड करण्यासही त्याने नकार दिला! प्रेझेंटेशन सुरु असताना तो बेदरकारपणे चिरुट फुंकत उभा होता!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला आर्थिक चणचण भासू लागली होती!

यातून मार्ग काढण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने घाईघाईत पाकिस्तानविरुद्ध दोन टेस्टची सिरीज खेळवण्याचा निर्णय घेतला. वर्ल्ड सिरीज क्रिकेटचा मोसम संपल्यावर निदान आतातरी प्रेक्षक टेस्टमॅचेसना येतील अशी बोर्डाच्या अधिकार्‍यांची अपेक्षा होती! परंतु यातून आणखीनच एक भानगड निर्माण झाली, ती म्हणजे पाकिस्तानने वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये खेळलेल्या इमरान, जावेद मियांदाद प्रभृतींची आपल्या संघात निवड केली! ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांनी वर्ल्ड सिरीजमधल्या खेळाडूंना वगळण्याची पाकिस्तानी बोर्डाला सूचना केली पण पाकिस्तान बोर्डाने ती धुडकावून लावली! प्रेक्षकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे आर्थिक प्राप्तीचा हेतू साध्य झाला नाही तो नाहीच!

दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांनी पॅकरची गाठ घेऊन वर्ल्ड सिरीज क्रिकेटची एक सिरीज वेस्ट इंडीजमध्ये खेळवण्याची त्याला विनंती केली! पॅकरशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंविना कालीचरणच्या नेतृत्वाखाली भारताच्या दौर्‍यावर गेलेल्या वेस्ट इंडीज संघाच्या पदरी ० - १ असा पराभव पडला होता. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेलं होतं. वर्ल्ड सिरीज मध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना वगळून खेळले गेलेले सामने पाहण्यास प्रेक्षक स्टेडीयमकडे फिरकणार नाहीत याचा त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये अनुभव आला होताच! वेस्ट इंडीजच्या प्रेक्षकांना पुन्हा स्टेडीयमकडे खेचून आणण्यासाठी वेस्ट इंडीजमध्ये वर्ल्ड सिरीजचे सामने खेळवणं हा रामबाण उपाय होता!

पॅकर एका पायावर तयार होता!

इयन चॅपलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड सिरीज संघाने १९७९ च्या फेब्रुवारीत वेस्ट इंडीजला प्रस्थान केलं! या दौर्‍यासाठी सुपरटेस्ट डे-नाईट न खेळवता पूर्वीप्रमाणे पाच दिवस खेळवण्यात आल्या. वेस्ट इंडीजमध्ये फ्लडलाईट्सची व्यवस्था नसल्याने वन डे मॅचेसही दिवसाच खेळवण्यात येणार होत्या! एकूण ५ सुपरटेस्टस आणि १२ वन डे असा या दौर्‍याचा भरगच्चं कार्यक्रम होता! वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने बहुतेक सर्व प्रमुख मैदानं - सबिना पार्क (किंगस्टन, जमेका), केन्सिंग्टन ओव्हल (ब्रिजटाऊन, बार्बाडोस), क्वीन्स पार्क ओव्हल (पोर्ट ऑफ स्पेन्, त्रिनिदाद), बोरुडा (जॉर्जटाऊन, गयाना), अँटीगा रिक्रिएशन ग्राऊंड (सेंट जॉन्स, अँटीगा), विंडसर पार्क (रोसेऊ, डोमिनिका) या सिरीजसाठी उपलब्धं करुन दिली होती!

सुपरटेस्टची सिरीज १ - १ अशी बरोबरीत सुटली. वन डे सिरीजमध्ये मात्रं वेस्ट इंडीजच्या संघाने ८ - २ असं निर्विवाद वर्चस्वं मिळवलं! क्रिकेट खेळाच्या दृष्टीने ही संपूर्ण सिरीज अत्यंत अटीतटीची आणि उच्च दर्जाची झालं हे वेगळं सांगायला नकोच! एक अत्यंत उत्कृष्ट बॅट्समन म्हणून ग्रेग चॅपलला या सिरीजनंतरच मान्यता मिळाली! या सिरीजमध्ये त्याने ४ शतकं झळकावली!

वेस्ट इंडीजमध्ये ही सिरीज सुरु असताना ऑस्ट्रेलियात काय हालचाली सुरु होत्या?

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आर्थिक दृष्ट्या पार रसातळाला जाऊन पोहोचलं होतं. पॅकरच्या आर्थिक साम्राज्याशी मुकाबला करणं त्यांना दिवसेदिवस जड जात होतं! न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरीया या दोन्ही राज्यांच्या क्रिकेट संघटनांचा आर्थिक तोटाच पाच लाख डॉलर्सवर जाऊन पोहोचला होता! त्यातच बोर्डाच्या अधिकार्‍यांना ध़डकी भरवणारी आणखीन एक बातमी आली....

पाकिस्तान आणि इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी पॅकरशी करार केले होते!
इंग्लिश आणि पाकिस्तानी खेळाडूंची संख्या त्यांचे स्वतंत्र संघ उभारता येतील इतकी वाढली होती!

ही बातमी येऊन धडकते न धडकते तोच अजून एक बातमी आली ती म्हणजे वर्ल्ड सिरीजच्या येऊ घातलेल्या इंग्लंडच्या दौर्‍याची!

त्यावेळी कोणालाही कल्पना नसली तरी पॅकरलाही बर्‍याच प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागलेलं होतं! आणखीन किती काळ आपल्याला वर्ल्ड सिरीज क्रिकेट सुरु ठेवता येईल याची त्यालाही शंका वाटत होती!

आतापर्यंत आपण घेतलेली ताठर भूमिका कायम टिकवता येणार नाही याची एव्हाना दोन्ही बाजूंना कल्पना आली होती. ऑस्ट्रेलियन वर्ल्ड सिरीज संघाचा वेस्ट इंडीज दौरा सुरु असतानाच १९७९ च्या मार्च महिन्यात पॅकर आणि ऑस्ट्रेलियन बोर्डाचा अध्यक्ष बॉब पॅरीश यांनी ही कोंडी फोडण्यासाठी चर्चेला सुरवात केली! सुमारे दोन आठवडे चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्यानंतर अखेर दोन्ही बाजूंनी तडजोडीस मान्यता देण्यात आली!

३० मार्च १९७९!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा अध्यक्षं बॉब पॅरीश आणि केरी पॅकर यांनी अखेर समेट झाल्याचं जाहीर केलं!

चॅनल नाईनला पुढची तीन वर्ष ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या क्रिकेटच्या प्रसारणाचे हक्क मिळाले होते!
जोडीला संपूर्ण ऑस्ट्रेलियाभर क्रिकेटचं प्रमोशन आणि मार्केटींग करण्याचं दहा वर्षांचं काँट्रॅक्ट!
केरी पॅकरचा हा निर्विवाद विजय होता!

ऑस्ट्रेलियात या निर्णयाचं उत्साहाने स्वागत करण्यात आलं!

इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने मात्रं ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयावर सडकून टीका केली! पॅकरविरुद्धच्या या वादाच्या कालावधीत इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने आर्थिक दृष्ट्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला शक्यं ती मदत केली होती. वर्ल्ड सिरीज मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची निवड न करुन इंग्लंडने त्यांना नैतिक पाठींबाही दिला होता. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने परस्पर पॅकरशी तह केल्यामुळे आयसीसी आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाची ऑस्ट्रेलियाने आपल्याशी दगाबाजी केल्याची भावना झाली नसती तरच नवलं!

विस्डेनने १९८० च्या आपल्या एडीशनमध्ये नमूद केलं,
The feeling in many quarters was that when the Australian Board first found Packer at their throats, the rest of the cricket world supported them to the hilt; even to the extent of highly expensive court cases which cricket could ill afford. Now, when it suited Australia, they had brushed their friends aside to meet their own ends.

वेस्ट इंडी़जच्या दौर्‍यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा या तडजोडीत काहीच सहभाग नव्हता. या घडामोडींनी त्यांच्यामध्ये अस्वस्थतेची भावना पसरली होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून आकसाने आणि सूडबुद्धीने कारवाई होण्याची तसेच आपल्या करीयरच्या भवितव्याची रास्तं भीती अनेक तरूण खेळाडूंच्या मनात निर्माण झाली!

१३ एप्रिल १९७९ ला ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजमध्ये खेळवण्यात आलेल्या वन डे मॅचबरोबरच वर्ल्ड सिरीज क्रिकेटची सांगता झाली!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आपल्या भविष्याची सतावत असलेली चिंता अनाठायी नव्हती असं किमान सुरवातीला तरी दिसून येत होतं! १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपसाठी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळलेल्या एकाही ऑस्ट्रेलियन खेळाडूचा समावेश करण्यात आला नाही! पाठोपाठ १९७९ मध्येच भारताच्या दौर्‍यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघातही वर्ल्ड सिरीजमधील एकाही खेळाडूचा समावेश नव्हता!

या दोन्ही दौर्‍यांवर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता किम ह्यूज!

इयन चॅपलचा मुळात किम ह्यूजच्या क्रिकेटमधील क्षमतेवरच आक्षेप होता! उत्तम बॅट्समन असलेल्या ह्यूजला चॅपलने वर्ल्ड सिरीज पासून त्याने कटाक्षाने दूर ठेवलं होतं. ह्यूजला कॅप्टन करणं तर त्याला पचनी पडणं शक्यंच नव्हतं! ह्यूजच्या अननुभवी संघाला वर्ल्ड कप मध्ये अपयशंच आलं होतं. भारताच्या दौर्‍यावर बॅट्समन म्हणून स्वत: हूज यशस्वी झालेला असूनही इतरांची अपेक्षीत साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाला टेस्ट सिरीजमध्ये ० - २ असा पराभव पत्करावा लागला होता.

इयन चॅपलने ह्यूजवर टीकेची झोड उठवली! ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळवण्याचीही ह्यूजची लायकी नाही असं त्याने वक्तंव्य केलं! चॅपलच्या या सततच्या टीकेकडे ह्यूजने तसं दुर्लक्षं केलं असलं तरी सामान्यं ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या नजरेत हूजची 'ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा माणूस' अशी प्रतिमा निर्माण झाली होती!

(इयन चॅपलची ह्यूजवर अनाठायी टीका करण्याची हौस ह्यूज क्रिकेटमधून रिटायर झाल्यावरही भागलेली नाही!)

१९७९-१९८० मध्ये भारताविरुद्धच्या मालिकेनंतर घाईघाईतच इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा आखण्यात आला. ही सिरीज अ‍ॅशेस म्हणून ओळखली न जाता साधी टेस्ट सिरीज म्हणून ओळखली गेली. त्याचवेळी वेस्ट इंडीजचा संघही ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आला होता. वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये सहभागी असलेल्या ग्रेग चॅपलसह सर्व खेळाडूंचं या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झालं! वर्ल्ड सिरीज क्रिकेटशी संबंधीत नसलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील फारच थोडे खेळाडू पुढे ऑस्ट्रेलियन संघात टिकले आणि यशस्वी झाले. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे किम ह्यूज, ग्रॅहॅम वूड आणि अ‍ॅलन बॉर्डर!

वर्ल्ड सिरीजमधून योग्य तो धडा घेत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या तीन - तीन टेस्ट मॅचेसच्या सिरीजच्या दरम्यान वन डे मॅचेसची ट्रँग्युलर सिरीज खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने या सिरिजला नाव दिलं वर्ल्ड सिरीज! ही वन डे सिरीज चांगलीच यशस्वी ठरली! प्रेक्षकांचा जोरदार पाठींबा लाभल्याने आर्थिक गर्तेतून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला बाहेर काढण्यास आणि पॅकरलाही नुकसान बर्‍याच प्रमाणात भरुन काढण्यात या सिरीजचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला!

पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये खेळलेल्या बहुसंख्य खेळाडूंचं एका बाबतीत एकमत होतं ते म्हणजे वर्ल्ड सिरी़जदरम्यान खेळलं गेलेलं क्रिकेट हे त्यांच्या करीयरमधलं सर्वात उच्च दर्जाचं आणि क्षमतेचा पुरेपूर कस पाहणारं क्रि़केट होतं!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटचा जागतिक क्रिकेटवर दूरगामी परिणाम झाला!

खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट, ड्रॉप इन पीचेस, फ्लडलाईट्समध्ये खेळलं जाणारं डे-नाईट क्रिकेट, खेळाडूंचे विविधरंगी कपडे, पांढरे बॉल या सर्व गोष्टी वर्ल्ड सिरीज क्रिकेटमधूनच पुढे आल्या. या सगळ्याबरोबरच आणखीन एक महत्वाची गोष्ट वर्ल्ड सिरीजमुळे जगभर लोकप्रियतेच्या शिखरावर गेली..

वन डे क्रिकेट!

१९७० मध्ये वन डे खेळण्यास सुरवात झाली असली आणि १९७५ मध्ये वन डे चा वर्ल्डकप झालेला असला तरी वर्ल्ड सिरीज क्रिकेटपूर्वी वन डे मॅचेस अगदी तुटपुंज्या स्वरुपात आणि प्रमाणातच होत असंत! बहुतेकदा वन डे क्रिकेटही टेस्ट क्रिकेटप्रमाणेच संथ आणि मंदपणे खेळलं जाई (आठवा १९७५ च्या वर्ल्डकपमध्ये गावस्करच्या १७४ बॉल्समध्ये ३६ रन्स!) ! वर्ल्ड सिरीज क्रिकेटने मात्रं हे चित्रं पार बदलून टाकलं! वन डे क्रिकेट हे आक्रमक खेळता येऊ शकतं आणि तसंच खेळणं अपेक्षित आहे हे जगभराच्या प्रेक्षकांच्या मनावर ठसलं!

सर्वात महत्वाची गोष्टं घडून आली ती म्हणजे...

क्रिकेटमधून हौशी (अमॅच्युअर) खेळाडू हा प्रकार कायमचा अस्तंगत झाला! केवळ इंग्लंडच्या कौंटी लीगमध्येच अस्तित्वात असलेला प्रोफेशनल खेळाडू आता जगभर गेला! पूर्वीप्रमाणे तुटपुंज्या पैशावर खेळाडूंची बोळवण करता येणार नाही हा धडा जगभरातील क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीला मिळाला! क्रिकेट हे इतर व्यवसायांप्रमाणेच खेळाडूंच्या चरितार्थाच साधन (प्रोफेशन) आहे आणि त्या बदल्यात खेळाडूंना योग्यं तो आर्थिक मोबदला देणं अत्यावश्यंक आहे हे सर्वांच्याच ध्यानात आलं!

मुख्य म्हणजे खेळाडूंना आपली किंमत समजून चुकली!

क्रिकेटच्या खेळाबरोबरच जाहिराती आणि वेगवेगळ्या ब्रँड्सचं प्रमोशन यातून खेळाडूंना आर्थिक प्राप्ती होऊ लागली! त्यांच्या आर्थिक प्राप्तीचा स्तर उंचावला!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटचाच साधारणतः आधुनिक अवतार म्हणता येईल अशा आयपीएल बद्दल केरी पॅकरचं मत ऐकणं निश्चितच मनोरंजक ठरलं असतं, पण ते होणं नव्हतं! क्रिकेटला घराघरांत पोहोचवणारा आणि आधुनिक बनवणारा केरी पॅकर २६ डिसेंबर २००५ लाच काळाच्या पडद्याआड गेला!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Dear Spartacus,

This is one of the best series on cricket and otherwise I have come across on the internet. The writing is very detailed and the information, very well researched. Each article takes the reader through complete history of the game, the incident and the various players and officials involved.

I am really enjoying reading this series and wish it never ends.

Keep writing.

Warm Regards,

Amit Arun Pethe

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0