हडळीचा आशिक

हडळीचा आशिक
जपानमध्ये हितोशी नावाचा एक माणूस रहायचा. तो एका पाषाणरह्रद्यी बाईच्या प्रेमात पडला. तिला राजी करायला त्याने भलते कष्ट उपसले. ती म्हणजे त्याला सर्वस्व वाटायची. तिच्या वाचून त्याला स्वतःचे आयुष्य फोलफोल वाटायचे. शेवटी एकदाची ती बया त्याच्यावर प्रसन्न झाली. त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. पण हाय! नेमक्या त्याच दिवशी, आपण एका असाध्य रोगाने ग्रस्त आहोत, आपण काही फार दिवस जगणार नाही, हे तिच्या लक्षात आले. तरी आपला हिरो तिच्याशी लग्न करतो. तिचे शेवटचे दिवस सुखात जावेत म्हणून आटापिटा करतो. पण, मृत्यू शय्येवर असताना मात्र हि बया त्याला म्हणते,
“ मला एक वचन द्या. माझ्या नंतर तुम्ही कुन्नाकुन्नाच्या म्हणून प्रेमात पडणार नाहीत! आणि तुम्ही तसे काही केलेच, तर मी दररोज रात्री तुम्हाला छळेन. पछाडून सोडेन.”
एवढे पवित्र शब्द बोलून, बयेने कायमचे डोळे मिटले.मग काय! पुढे कित्येक महिने हितोशी बाईमाणसाला टाळायचा. दूरदूर राहायचा. पण नशीब ते नशीबच! त्याच्या जीवनात परत प्रेमाचा बहर आला. चैतन्य सळसळू लागले. त्याने लग्नाची तयारी सुरु केली.
..... आणि तेव्हाच त्याच्या मृत बायकोच्या हडळीने आपला शब्द खरा करायला सुरुवात केली. ती रात्रीबेरात्री त्याला छळू लागली. नाही नाही ते प्रश्न विचारून पिडू लागली . ‘तू....तू.... फसवलेस मला!’ म्हणून त्रागा त्रागा करू लागली.
त्यावर हितोशी शांतसमजूतदारपणे तिला उत्तर द्यायचा, “ मी वर्षानुवर्षे तुझे आराधन केले. माझे सर्वस्व तुला देऊ केले. तू मात्र मला झिडकारत गेलीस. मृत्यू पंथाला लागल्यावर माझ्याशी लग्न केलेस. ते हि ठीक. पण आता परत आयुष्याने मला सौख्य उपभोगण्याची,आनंदाने जगण्याची संधी दिली आहे तर , ती मी का घेऊ नये?”
पण हडळीला असली कारणं ऐकण्यात विंट्रेस नव्हता. दररात्री ती त्याचा छळ मांडायची. आली कि, त्याने दिवसभरात काय काय केले, ते डिटेलवार सांगायची. अगदी त्याने आपल्या भावी पत्नी बरोबर काय हितगुज केले, तिला कशी मिठी मारली, कसे तिचे चुंबन घेतले इत्यादी इत्यादी. बिचारा हितोशी हैराण होऊन गेला. संध्याकाळ झाली कि त्याला हिव भरल्यासारखे व्हायचे. रात्रीची झोप तर पार उडून गेली!
शेवटी तो झेनगुरु बाशो यांच्याकडे गेला.
बाशोंनी सगळी कथा शांतपणे ऐकली. म्हणाले, “हडळ भारी चतुर आहे. वादच नाही!”
“ अहो, पण मी भारी परेशान झालोय! त्या हडळीला अगदी बारीकसारीक सगळ्या गोष्टी माहित असतात. तिच्यामुळे, माझे माझ्या भावी पत्नी बरोबरचे संबंध बिघडायची पाळी आलीय. तिच्या बरोबर साधं बोलायचीही मला भीती वाटतेय. तिच्या बरोबरच्या एकांतात तर मला अगदी चोरटया सारखं वाटतंय!”
“ काळजी करू नकोस. तुझी या हडळी पासून जरूर सुटका होईल!” बाशो आश्वस्तपणे म्हणाले.
त्या रात्री हडळ अवतरली.तिने तोंड उघडायच्या आधीच हितोशी म्हणाला, “ तू फार हुशार, चतुर आहेस. चल आज आपण एक पैज लावू. तू सदासर्वकाळ माझ्यावर नजर ठेवून असतेस. बरोबर? तर आज मी जे काही केले दिवसभरात, त्या बद्दल तुला एक प्रश्न विचारतो. जर तू बरोबर उत्तर दिलेस, तर मी माझ्या भावी पत्नीचा तत्काळ त्याग करीन. एवढेच नव्हे, तर पुन्हा चुकूनही दुसऱ्या बायकोचा विचारही करणार नाही. पण तुझे उत्तर चुकले, तर तू मात्र कधीही परत इथे फिरकायचे नाहीस. अन जर आलीसच, तर तू कायमची या अंध:कारात भरकटत राहशील. अंतराळातील देव तुला शाप देतील!”’
“एकदम मान्य!” हडळ अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाली.
“आज दुपारी मी एका वाण्याच्या दुकानात गेल्तो. तिथल्या गव्हाच्या पोत्यातून मी मूठभर गहू हातात घेतले!”
“होय, पाहिलेय मी ते!” हडळ म्हणाली.
“तर माझा प्रश्न: माझ्या मुठीत गव्हाचे नेमके किती दाणे होते?”
आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देणे कदापि शक्य नाही, हे त्या हडळीस कळून चुकले. काहीतरी चुकीचे पचकलो, तर कायमचे अंध:कारात भटकावे लागेल, हि भीती होतीच! म्हणून तिने तिथून कायमचा काढता पाय घेतला.
दोन दिवसांनी हितोशी बाशोंकडे गेला. म्हणाला, “मी तुमचे आभार मानायला आलोय!”
बाशो म्हणाले, “ तुझ्या अनुभवाने तुला जे धडे शिकवलेत, ते कायम लक्षात ठेव. एक : हडळ परतपरत येत राहिली, कारण तू तिला घाबरत होतास. घाबरू नकोस. असल्या शापांपासून मुक्त व्हायचे असेल, तर एकच कर – दुर्लक्ष! आपण विचार करत गेलो कि शाप माजत जातात! विचार थांबव, शाप मरून जातील! दोन: हडळीने तुझ्या अपराधभावाचा गैरफायदा घेतला. जेव्हा जेव्हा आपल्याला अपराधी वाटू लागते, तेव्हा तेव्हा आपल्याही नकळत आपण स्वतःला शिक्षेस पात्र ठरवत जातो. मला अमुकतमुक साठी शिक्षा मिळाली पाहिजे, असे आपणच ठरवत जातो. हे स्वतःशी कधीही होऊ देऊ नकोस! आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे, जर खरेच कुणाचे कुणावर प्रेम असेल, तर ती व्यक्ती अशा भ्रामक अटी, बंधनं घालित नाही! जर खरेच प्रेम जाणून घ्यायचे असेल तर, आधी दोघांनी परस्परांचे अस्तित्व आणि स्वातंत्र्य उमजून घेतले पाहिजे! प्रेमातले ते पहिले पाऊल! मग पुढे संदेह रहात नाही! प्रेमात उणेपण येत नाही!”
[ झेन परंपरेतील बाशोंच्या कथा! हि कथा मला Paulo Cohlo च्या पुस्तकातही वाचायला मिळाली. दुर्दैवाने पुस्तकाचे नेमके नाव आता आठवत नाहीये. कुणा बहुगुणी ऐसीकरास सुगावा लागल्यास धागा टाकावा.]

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

मस्त.!
पण मला झेन तत्वज्ञानाविषयी काहीच माहिती नाहीं, मला याविषयी काही माहिती द्याल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक वेडा संशोधक....

गोश्ट छान आहे, आणि तुमची शैली पण मस्त !!!!
अजून लेखन येउ दया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोश्ट छान आहे, आणि तुमची शैली पण मस्त !!!!
अजून लेखन येउ दया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी दोघांनी परस्परांचे अस्तित्व आणि स्वातंत्र्य उमजून घेतले पाहिजे! प्रेमातले ते पहिले पाऊल! मग पुढे संदेह रहात नाही! प्रेमात उणेपण येत नाही!”

सर्वात अवघड आहे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही गोष्ट, जालावर कुठेतरी वाचल्यासारखी वाटतीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालच ही मुलाखत वाचली त्याची आठवण झाली. विशेषतः हा भाग -
Why your brain loves procrastination
Procrastination, they've realized, appears to be a coping mechanism. When people procrastinate, they're avoiding emotionally unpleasant tasks and instead doing something that provides a temporary mood boost. The procrastination itself then causes shame and guilt — which in turn leads people to procrastinate even further, creating a vicious cycle.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.