जंटलमन्स गेम - ७ - The Barnacle & The Tortoise

१९५३ चा जून महिना....

लिंडसे हॅसेटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ अ‍ॅशेस सिरीजसाठी इंग्लंडच्या दौर्‍यावर आला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्वतः हॅसेट, आर्थर मॉरीस, नील हार्वे, कॉलिन मॅक्डोनाल्ड, ग्रॅहॅम होल असे बॅट्समन होते! डॉन टॅलनसारखा गाजलेला विकेटकीपर होता. रॉन आर्चर, डग रिंग, रिची बेनॉ, अ‍ॅलन डेव्हीडसन यांच्यासारखे ऑलराऊंडर्स संघात होते! त्याखेरीज फास्ट आणि स्पिन बॉलिंग सारख्याच परिणामकारकपणे टाकू शकणारा बिल जॉन्स्टनसारखा हरहुन्नरी बॉलरही होता! परंतु इंग्लंडला ज्यांची खरी धास्ती वाटत होती ते दोघे म्हणजे....

रेमंड रसेल लिंडवॉल आणि कीथ रॉस मिलर!

क्रिकेटच्या इतिहासातील अत्यंत लयबद्ध आणि सुरेल रनअप असलेला बॉलर म्हणजे रे लिंडवॉल! आणि तितकाच धोकादायक आणि खतरनाक! आणि कीथ मिलर म्हणजे ज्याच्यासाठी कोणत्याही कॅप्टनने (आणि बायकांनी!) जीव टाकावा असा ऑलराऊंडर! यापूर्वीच्या तिन्ही अ‍ॅशेस सिरीजमध्ये (१९४६-४७, १९४८, १९५०-५१) लिंडवॉल - मिलर यांनी इंग्लंडला पूर्णपणे उध्वस्तं केलं होतं! इतर कोणाही ऑस्ट्रेलियन खेळाडूपेक्षा या दोघांचीही इंग्लिश खेळाडू आणि प्रेक्षकांनाही दहशत होती!

लेन हटनचा इंग्लंड संघही ऑस्ट्रेलियाइतकाच उत्तम होता. स्वतः हटन, रेग सिंप्सन, डेनिस कॉम्प्टन, टॉम ग्रेव्हनी, पीटर मे, बिल एड्रीच, विली वॉटसन असे बॅट्समन, गॉडफ्रे इव्हान्ससारखा विकेटकीपर, ब्रायन स्टेथम, फ्रेडी ट्रूमन, अ‍ॅलेक बेडसर हे फास्ट बॉलर्स, जिम लेकर, टोनी लॉक, जॉनी वॉर्डल हे स्पिनर्स, फ्रेडी ब्राऊनसारखा ऑलराऊंडर असे एकसे एक खेळाडू इंग्लंड्च्या संघात होते!

.... आणि ट्रेव्हर बेली होता!

नॉटींगहॅमच्या ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये अ‍ॅलेक बेडसरने प्रत्येक इनिंग्जमध्ये ७ अशा ऑस्ट्रेलियाच्या चौदा विकेट्स घेतल्या होत्या! चौथ्या इनिंग्जमध्ये २२९ रन्सचं लक्ष्यं असलेल्या इंग्लंडने तिसर्‍या दिवसाअखेर ४२ / १ अशी मजल मारली होती, परंतु पावसामुळे शेवटच्या दिवशी टी टाईमपर्यंत खेळच होऊ न शकल्याने अखेर मॅच ड्रॉ झाली!

दुसरी टेस्ट होती लॉर्ड्सला!

रेगी सिंप्सनच्या जागी विली वॉटसनची इंग्लंड संघात निवड करण्यात आली होती. वॉटसनखेरीज पीटर मे आणि रॉय टॅटर्सेलच्या ऐवजी फ्रेडी ब्राऊन आणि ब्रायन स्टॅथम यांचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला होता. डॉन टॅलनच्या पायाला दुखापत झाल्याने त्याच्याऐवजी गिल्बर्ट लँगलीची वर्णी लागली होती. रिची बेनॉच्या जोडीला जॅक हिल ऐवजी लेगस्पिनर डग रिंगची निवड झाली होती.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंग्जमध्ये ३४५ मजल मारली ती मुख्यतः हार्वे (५९), डेव्हीड्सन (७६) आणि लागोपाठ दुसरं शतक झळकावणारा हॅसेट (१०४) यांच्या फटकेबाजीमुळे! इंग्लंडच्या पहिल्या इनिंग्जमध्ये डेव्हीडसनने लिंडवॉलच्या बॉलवर डॉन केन्यनचा कॅच घेतल्यामुळे सुरवातीलाच हादरा बसला होता. परंतु हटन (१४५), ग्रेव्हनी (७८) आणि कॉम्प्टन (५७) आणि खाली फ्रेडी ब्राऊन - जॉनी वॉर्डल यांच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने पहिल्या इनिंग्जमध्ये २६ रन्सचा लीड घेतला!

ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये स्टॅथमने हॅसेटला झटपट गुंडाळत ऑस्ट्रेलियाला हादरवलं. परंतु मॉरीस (८९) आणि कीथ मिलर यांनी १६५ रन्सची पार्टनरशीप करत पुन्हा मॅच ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवली! मॉरीस परतल्यावर हार्वे (२१) बरोबर मिलरने ५९ रन्स फटकावल्या. परंतु बेडसरने हार्वेची दांडी उडवल्यावर पाठोपाठच जॉनी वॉर्डलच्या बॉलवर मिलरही बोल्ड झाला! १४ बाऊंड्री आणि वॉर्डललाच चढवलेल्या सिक्सच्या जोरावर मिलरने १०९ रन्स फटकावल्या!

मिलरपाठोपाठ बेनॉ परतल्यावर होल आणि डेव्हीड्सन यांनी ४८ रन्स फटकावल्या, परंतु खरी धमाल केली ती लिंडवॉलने! डेव्हीडसन, होल आणि रिंग परतल्यावर लँगली आणि बिल जॉन्स्टनच्या साथीने अवघ्या पाऊण तासात त्याने ६८ रन्स फटकावल्या! त्यात लिंडवॉलचा वाटा होता ५०! त्यात ८ बाऊंड्री आणि दोन दणदणीत सिक्सचा समावेश होता! त्याच्या या आतषबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने ३६८ पर्यंत मजल मारली होती! इंग्लंडसमोर चौथ्या इनिंग्जमध्ये ३४३ रन्सचं लक्ष्यं होतं!

इंग्लंडला पहिलाच हादरा दिला तो अर्थात लिंडवॉलनेच! स्लिपमध्ये हॅसेटने केन्यनचा कॅच घेतला. आणखीन दोन ओव्हर्सनंतर लिंडवॉलच्याच बॉलवर होलने हटनचा कॅच घेतला! लागोपाठच्या या दोन धक्क्यांतून इंग्लंड सावरण्यापूर्वीच बिल जॉन्स्टनच्या बॉलवर लँगलीने टॉम ग्रेव्हनीचा कॅच घेतला! इंग्लंड्च्या नशिबाने लेगस्पिनर रिंगच्या बॉलवर विली वॉटसनचा कॅच बेनॉच्या हातातून सुटला! चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची अवस्था होती २० / ३!

पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी फक्तं ७ विकेट्स हव्या होत्या! इंग्लंडच्या पहिल्या इनिंग्जमध्ये नेमक्या याच ७ विकेट्स अवघ्या दीड तासात आणि ८१ रन्समध्ये उडाल्या होत्या, त्यामुळे लंचपर्यंत किंवा फारतर टी टाईमपर्यंत ऑस्ट्रेलिया इंग्लंडला गुंडाळून मॅच जिंकेल असा बहुतेक पत्रकारांचा आणि प्रेक्षकांचाही अंदाज होता! पहिल्या चार दिवसात मोठ्या संख्येने हजर असलेल्या प्रेक्षकांनी पाचव्या दिवसाकडे त्यामुळे पाठ फिरवली होती!

कॉम्प्टन आणि वॉटसन यांनी सावधपणे खेळण्यास सुरवात केली. लिंडवॉल आणि जॉन्स्टन यांच्या दिवसाच्या पहिल्या स्पेलमधल्या बारा ओव्हर्स दोघांनी कमालीच्या काळजीपूर्वक खेळून काढल्या. त्यात वॉटसनची ही पहिलीच अ‍ॅशेस टेस्ट असल्याने तो अधिकच सावध होता! हे दोघं लिंडवॉल आणि जॉन्स्टनला दाद देत नाहीत हे पाहिल्यावर हॅसेटने बॅट्समनच्या जवळ क्लोज इन फिल्डर्स उभे केले आणि बेनॉ आणि रिंग या दोघा लेगस्पिनर्सना त्यांच्यावर सोडलं! डावखुर्‍या वॉटसनच्या ऑफस्टंपबाहेर तयार झालेल्या 'रफ'चा त्याला फायदा उठवायचा होता!

रिंगच्या अचूक टप्प्यावर पडलेल्या प्रत्येक बॉलला वॉटसन सावधपणे खेळून काढत होता. दुसर्‍या बाजूने बेनॉला मात्रं रिंगप्रमाणे अचूकता राखता येत नव्हती. डेनिस कॉम्प्टनने एका ओव्हरमध्ये त्याला मिड-ऑफ ते कव्हरच्या दरम्यान तीन बाऊंड्री तडकावल्यावर हॅसेटने बेनॉच्या जागी पुन्हा जॉन्स्टनला आणलं! लिंडवॉलच्या जोडीने फास्ट बॉलिंग करणार्‍या जॉन्स्टनने रिंगबरोबर स्पिन टाकण्यास सुरवात केली! रिंगचा अचूक टप्प्यावर पडलेल्या एका बॉलवर वॉटसन चकला! त्याच्या पॅडला लागून बॉल स्टंपच्या दिशेने घरंगळला, पण स्टंपपासून अवघ्या सहा इंचावर असलेल्या बॉलला आपलं फुटबॉलमधलं कौशल्यं पणाला लावत वॉटसनने स्टंपपासून दूर लाथाडलं!

(वॉटसन क्रिकेटइतकाच उत्कृष्ट फुटबॉलही खेळत असे! इंग्लंडसाठी आंतरराष्टीय स्तरावर क्रिकेट आणि फुटबॉल खेळलेल्या मोजक्या खेळाडूंपैकी तो एक होता!)

सकाळपासून सुमारे दीड तास झाल्यावर ड्रिंक्सची वेळ झाली होती. ऑस्ट्रेलियाचा बारावा खेळाडू असलेला रॉन आर्चर ड्रिंक्स घेऊन बाऊंड्रीच्या दिशेने येत होता. परंतु हॅसेटला मात्रं इंग्लंडच्या बॅट्समनना प्रेशरमधून जराही मोकळीक देण्याची इच्छा नव्हती! हाताच्या एका इशार्‍यासरशी त्याने आर्चरला परत जाण्याची खूण केली! हॅसेटचा हा निर्णय अचूक ठरला! बिल जॉन्स्टनचा एक बॉल गुडलेंग्थवर पडला आणि जेमतेम सहा इंचावरुन स्टंपच्या दिशेने झेपावला आणि कॉम्प्टनच्या पॅडवर आदळला! कॉम्प्टनच काय, खुद्दं डॉन ब्रॅडमन किंवा डब्ल्यू जी ग्रेसलाही या बॉलचा मुकाबला करणं अशक्यं होतं! इंग्लंड ७३ / ४!

कॉम्प्टन बाद झाल्यावर खेळायला आला ट्रेव्हर बेली!

१९४८ मध्ये बेलीने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वेस्ट इंडीजविरुद्धच्या ८२ रन्स वगळता त्याची इतर तीन अर्धशतकं आणि एकमेव शतक हे दुबळ्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रीकेविरुद्ध होतं! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा टेस्टमधल्या ९ इनिंग्जमध्ये त्याचा सर्वोच्च स्कोर होता १५! ९ इनिंग्जमध्ये मिळून त्याने एकूण ५५ रन्स काढल्या होत्या!

.... परंतु बेली ही काय चीज आहे याची तोपर्यंत कोणालाच कल्पना नव्हती!

प्रत्येक बॉल पडला की तो फ्रंटफूटवर पुढे येत होता. आधी पॅड आणि त्याला चिकटून पाठोपाठ बॅट!
बॉल बॅटला किंवा क्वचित पॅडला लागून जागच्याजागी खाली पडत होता!
ऑफस्टंपच्या लाईनच्या बाहेर असलेला प्रत्येक बॉल तो सोडून देत होता!
लॉर्ड्सच्या विकेटवर बाऊंस नसल्याने बंपरचा काहीही उपयोग होत नव्हता!

रन्स काढण्याचं कोणतंही दडपण त्याच्यावर नव्हतं! इंग्लंड मॅच जिंकू शकत नाही हे त्याने बॅटींगला येण्यापूर्वीच मनाशी पक्कं ठरवून टाकलं होतं! अगदीच हाफ व्हॉली असेल तरच गोष्ट वेगळी!

दुसर्‍या बाजूने वॉटसन कमालीच्या थंड डोक्याने आणि आरामात खेळत होता. रिंग, बेनॉ, जॉन्स्टन यांनी लावलेल्या क्लोज इन फिल्डर्सचा त्याच्यावर काही परिणाम झालेला नव्हता. बॉलचा टप्पा किंचितसा जरी चुकला तरी तो फटकावून काढण्याचा मार्ग त्याने पत्करला होता. परिणामी हॅसेटला त्याच्याभोवती असलेले फिल्डर्स एकेक करुन काढून घ्यावे लागले होते! कीथ मिलरच्या अचूक टप्प्यावरच्या आणि तुफान वेगाने आलेल्या चार ओव्हर्स वॉटसन आणि बेली दोघांनी कमालीच्या सावधपणे खेळून काढल्या! त्या चार ओव्हर्समध्ये अवघी १ रन निघाली, पण वॉटसन किंवा बेली दोघांपैकी एकालाही आऊट करणं त्यालाही जमलं नाही! इंग्लंड ११६ / ४!

एव्हाना इंग्लिश बॅट्समन ऑस्ट्रेलियाचा मुकाबला करत असल्याची बातमी लंडनभर पसरल्यामुळे लॉर्ड्सवर गर्दी वाढू लागली होती. लंचनंतरही डेव्हीडसन - जॉन्स्टन - रिंग - बेनॉ यांचा प्रत्येक बॉल फ्रंटफूटवर पॅड - बॅट एकत्रं ठेवत ब्लॉक करण्याचा बेलीचा कारभार सुखेनैव सुरु होता! दुसर्‍या बाजूला वॉटसन मिळालेल्या प्रत्येक खराब बॉलचा समाचार घेत होता! अखेर सुमारे तासाभराने नवीन बॉल उपलब्धं होताच हॅसेटने तो ताबडतोब घेतला!

दिवसभराच्या खेळातला खरा कसोटीचा क्षण आता होता!
नवीन बॉल हाती असलेले लिंडवॉल आणि मिलर विरुद्ध वॉटसन आणि बेली!

लिंडवॉल आणि मिलरने जीव खाऊन बॉलिंगला सुरवात केली. एव्हाना वॉटसनची नजर बसली होती. कमालीच्या सावधपणे तो दोघांनाही खेळून काढत होता! दुसर्‍या बाजूला बेलीचं फ्रंटफूटवर पॅड - बॅट चं तंत्रं भलतंच यशस्वी ठरत होतं! पाच ओव्हर्समध्ये केवळ पाच रन्स निघाल्या, परंतु वॉटसन - बेली ही जोडी अद्यापही अभेद्यं होती! अखेर लिंडवॉलचा अचूक टप्प्यावरुन उसळलेला एक बॉल बेलीच्या हातावर आदळल्यावर तो डॉक्टरकडून उपचार करुन घेत असताना हॅसेटने ड्रिंक्स आणण्याची आर्चरला खूण केली!

लिंडवॉल - मिलरच्या पुढच्या पाच ओव्हर्सही वॉटसन आणि बेली दोघांनी कमालीच्या सावधपणे खेळून काढल्या! दरम्यान पुन्हा एकदा लिंडवॉलच्या बॉलवर बेलीच्या हाताची बोटं सडकून निघाली! परंतु त्याला कसलीच पर्वा नव्हती! कोणत्याही परिस्थितीत आऊट व्हायचं नाही ही एकच गोष्टं त्याच्या डोक्यात पक्की बसलेली होती! प्रखर निर्धाराने आणि जिद्दीने तो खेळत होता! लिंडवॉल - मिलर आणि त्यांच्यापाठोपाठ डेव्हीडसन - जॉन्स्टन यांना ठामपणे तोंड देत दोघांनीही दुपारच्या सेशनचा उरलेला वेळ खेळून काढला! इंग्लंड १९२ / ४! टी टाईम!

टेस्ट वाचवण्यासाठी इंग्लंडला केवळ दोन तास खेळून काढावे लागणार होते!

टी टाईमनंतर पुन्हा एकदा वॉटसन - बेली विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही झुंज सुरु झाली! वॉटसन एव्हाना शतकाच्या जवळ येऊन पोहोचला होता. बेनॉला लागोपाठ दोन चौकार मारल्यावर त्याने नव्वदीत प्रवेश केला. इंग्लंडने २०० चा टप्पा ओलांडल्यावर वॉटसनने बेलीला विचारलं,

"Another hundred odd runs for the victory Trevor! Should we go for it?"

उत्तरादाखल बेलीने त्याच्याकडे पाठ फिरवली आणि नॉनस्ट्रायकर एन्डची वाट धरली!

हॅसेटने मिलर आणि डेव्हीडसन यांच्या हाती बॉल सोपवला! दहा ओव्हर्सच्या तुफानी बॉलिंगनंतरही वॉटसन आणि बेली अद्यापही क्रीजवर होते! हॅसेट लिंडवॉलला आणेल अशी दोघांनाच काय पण पॅव्हेलियनमध्ये कमालीच्या टेन्शनमध्ये असलेल्या हटनलाही अपेक्षा होती! पण हॅसेटचा विचार वेगळा होता! वॉटसन आणि बेली या दोघांनंतर ब्राऊन, इव्हान्स, वॉर्डल, बेडसर, स्टॅथम यांना झटपट गुंडाळण्यासाठी लिंडवॉल ताजातवाना असणं त्याच्यादृष्टीने आवश्यंक होतं! परंतु आधी वॉटसन किंवा बेलीपैकी कोणीतरी आऊट तर व्हायला हवं!

वॉटसन आणि बेली दोघंही मिलर - डेव्हीड्सनला दाद देत नाहीत हे पाहिल्यावर हॅसेट बेनॉ आणि रिंगच्या स्पिनकडे वळला. एव्हाना वॉटसन शतकाच्या उंबरठ्यावर होता. रिंगचा मिडल स्टंपवरचा बॉल वॉटसनेने स्वीप केला. स्क्वेअरलेगला असलेल्या बेनॉच्या डोक्यावरुन बॉल बाऊंड्रीकडे गेला....


विली वॉटसन

टाळ्यांचा कडकडाट झाला!
लॉर्ड्सवरच्या यच्चयावत प्रेक्षकांनी उभं राहून वॉटसनला मानवंदना दिली!
एका पराभवातून इंग्लंडला जवळपास वाचवण्याबद्दलं हे आभारप्रदर्शनचं होतं जणूं!

रिंगच्या पुढच्या ओव्हरमध्ये वॉटसनने पुन्हा त्याला बेनोच्या डोक्यावरुन फटकावलं! त्याच ओव्हरचा शेवटचा बॉल खेळताना मात्रं वॉटसनच्या बॅटची कट् लागून पॅड्वरुन उडालेला बॉल शॉर्टलेगला असलेल्या होलच्या हातात गेला!
सुमारे पावणेसहा तासांत १०९ रन्स केल्यावर अखेर विली वॉटसन आऊट झाला!

ट्रेव्हर बेलीबरोबर त्याने १६३ रन्सची पार्टनरशीप केली होती!
महत्वाचं म्हणजे वॉटसन आणि बेली यांनी चार तास खेळून काढले होते!
ऑस्ट्रेलियाच्या हाती अद्यापही चाळीस मिनीटं होती!

वॉटसन पॅव्हेलियनमध्ये परतला पण ड्रेसिंगरुममध्ये न जाता त्याने वाट धरली ती ड्रेसिंगरुमच्याच मागे असलेल्या बाथरुमची! तिथल्या एका टेबलवर तो आरामात पहुडलेला असतानाच पत्रकार जॉन अरलॉटची त्याच्याशी गाठ पडली.

"Oh, bloody well played Willie!" अरलॉटने त्याचं अभिनंदन केलं!

"Thanks; wish I could have stayed!" वॉटसन उत्तरला!

वॉटसन आऊट झाल्यावर खेळायला आलेल्या फ्रेडी ब्राऊनने आक्रमक पवित्रा घेत रिंगचा प्रत्येक बॉल मैदानाबाहेरच फटकावण्याच्या आवेशात बॅट फिरवण्यास सुरवात केली! ब्राऊनचा हा पवित्रा आत्मघातकी होता! लागोपाठ दोन वेळा अ‍ॅक्रॉस द लाईन खेळत त्याने रिंगला मिडविकेटवरुन बाऊंड्री तडकावल्या! प्रत्येक वेळी ब्राऊनने शॉट मारला की नकारात्मक मान हलवत बेली त्याचा निषेध करत होता! परंतु ब्राऊनच लक्षं होतंच कुठे?

एव्हाना लेन हटनही वॉटसन आणि अरलॉट यांच्याबरोबर बाथरुममध्येच येऊन बसला होता! हटनला इतकं टेन्शन आलं होतं की खेळ पाहणं त्याला असह्यं झालं होतं! वॉटसनला आऊट करण्यात यश आल्याने आणि फ्रेडी ब्राऊनचा पवित्रा पाहता त्याची विकेट मिळण्याची शक्यता ध्यानात घेत लिंडवॉलला बॉलिंगला आणण्याची उर्मी दाबत हॅसेटने रिंगची बॉलिंग सुरु ठेवली! पण ब्राऊनऐवजी रिंगच्या गळाला लागला तो बेली! कव्हर्समध्ये रिची बेनॉने त्याचा कॅच घेतला! तब्बल सव्वाचार तास ऑस्ट्रेलियन बॉलिंगचा समर्थपणे मुकाबला करत बेलीने ७१ रन्स काढल्या होत्या!

बेली बाथरुममध्ये आला तेव्हा तो कमालीचा दमला होता! वॉटसनची आणि त्याची नजरानजर होताच दोघांनी समाधानाने मान हलवली! एका अफलातून पार्टनरशीपमधल्या आपल्या जोडीदाराला दिलेली समाधानाची पावती होती! परंतु अद्यापही ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकण्याची संधी होती! त्यातच फ्रेडी ब्राऊन...

""Sorry Skip!" खिन्न सुरात दिलगीरी व्यक्तं करत बेली उद्गारला! आऊट झाल्यामुळे आपण फार मोठा गुन्हा केला आहे असंच जणू त्याला वाटत असावं!, "Silly shot - straight to cover!"

"How long?' हटनने कापर्‍या स्वरात विचारलं.

"Half an hour!"

"Has he brought Ray on?"

"No!"

जसजसा वेळ जात होता तशी बाथरुममधल्या टेन्शनमध्ये अधिकच भर पडत होती! त्यातच फ्रेडी ब्राऊच्या बॅटींगमुळे क्षणाक्षणाला प्रत्येकाचा श्वास रोखला जात होता! बेली परतल्यावर खेळायला आलेल्या गॉडफ्रे इव्हान्सने त्याला बॉल ब्लॉ़क करण्याबाबत दरडावलं होतं, पण ब्राऊनने कोणाचं ऐकलं तर आणखीन काय पाहिजे होतं? शेवटी सगळ्यांना वाटत असलेली भीती अखेर खरी ठरली! बेनॉच्या बॉलवर होलने स्लिपमध्ये त्याचा कॅच घेतला!

अद्याप शेवटच्या ओव्हरचे ४ बॉल बाकी होते!
ऑस्ट्रेलियाला ३ विकेट्स हव्या होत्या!
बाकी असलेले बॅट्समन होते वॉर्डल, बेडसर आणि स्टेथम!

जॉनी वॉर्डलने कोणतीही रिस्क न घेता चारही बॉल खेळून काढले! टेस्ट वाचवण्यात इंग्लंडला यश आलं होतं! दिवसभरात ऑस्ट्रेलियाला फक्तं चार विकेट्स मिळाल्या होत्या! त्यादेखील लिंडवॉल, मिलर, डेव्हीडसन, जॉन्स्टन, बेनॉ, रिंग असे बॉलर्स असताना!

इंग्लंडच्या या यशाचे मानकरी होते अर्थात विली वॉटसन आणि ट्रेव्हर बेली!
तब्बल चार तास दोघांनी ऑस्ट्रेलियन बॉलर्सना दाद न देत खेळून काढले होते!
अ‍ॅशेस सिरीजमध्ये अद्यापही ० - ० अशी बरोबरी होती!
इंग्लंडला पिछाडीवर पडण्यापासून दोघांनी वाचवलं होतं!

सर्वात महत्वाची गोष्टं म्हणजे डिफेन्सिव पद्धतीने बॅटींग करुन मॅच वाचवता येते आणि प्रतिस्पर्धी बॉलर्स आणि फिल्डर्सना दमवता येतं ही गोष्टं ट्रेव्हर बेलीच्या डोक्यात फिट् बसली!

ऑस्ट्रेलियाचं दुर्दैवं!

ओल्ड ट्रॅफर्डवरची तिसरी टेस्टही पावसामुळे फुकट गेली! दोन्ही संघांची पहिली इनिंग्ज संपेपर्यंतच पाचव्या दिवसचा टी टाईम उजाडल्यावर मॅचचं काय होणार हे स्पष्टं होतं! बेडसर, वॉर्डल आणि जिम लेकर यांनी दुसर्‍या इनिंग्जमध्ये ऑस्ट्रेलियाची अवस्था ३५ / ८ अशी केल्यानंतरही मॅच ड्रॉ झाली! इंग्लंडच्या पहिल्या इनिंग्जमधे बेलीने लॉर्ड्सचाच कित्ता गिरवत दोन तासांत २७ रन्स काढल्या होत्या!

चौथी टेस्ट झाली हेडींग्लीच्या लीड्सच्या मैदानात!

मॅचच्या आधी दोन दिवस पावसामुळे लीड्सचं पीच कमालीचं धोकादायक झालेलं असणार याबद्दल हॅसेट आणि हटन दोघांनाही पक्की खात्री होती! दोघांपैकी कोणाचीही या विकेटवर बॅटींगची तयारी नव्हती! हॅसेटने टॉस जिंकल्यावर हटनच्या चेहर्‍यावर प्रेतवत अवकळा पसरली! हटनची भीती अर्थातच खरी ठरली! हॅसेटने इंग्लंड्ला बॅटींगसाठी पाचारण केलं!

रे लिंडवॉलने दुसर्‍याच बॉलवर हटनचा मिडलस्टंप उडवल्यावर लीड्सवर सन्नाटा पसरला होता. बिल एड्रीच आणि ग्रेव्हनी यांनी बचावात्मक धोरण स्वीकारलं. सुमारे दीड तासात १० रन्स काढल्यावर मिलरने एड्रीचला एलबीड्ब्ल्यू केलं! कॉम्प्टन शून्यावर परतल्यावर ग्रेव्हनीची जोडी जमली ती विली वॉटसनशी! सुमारे अडीच तास दोघांनी कमालीच्या सावधपणे ऑस्ट्रेलियन बॉलिंग खेळून काढली! एरवी आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रेव्हनीने पावणेचार तासात ५५ रन्स काढल्यावर मिलरच्या बॉलवर बेनॉने त्याचा कॅच घेतला! ग्रेव्हनी परतल्यावर थोड्याच वेळात वॉटसनही परतला! पावणेतीन तासात त्याने २४ रन्स काढल्या होत्या! पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोर होता १४२ / ७!

दुसर्‍या दिवशी गॉडफ्रे इव्हान्स आणि टोनी लॉक यांनी सुमारे तासभर खेळून काढला, पण लॉकची दांडी उडवत डेव्हीडसनने १६७ मध्ये इंग्लंडची इनिंग्ज संपवली! १६७ रन्स काढण्यासाठी इंग्लंडने तब्बल ११० ओव्हर्स घेतल्या होत्या!

हॅसेट (३७), हार्वे (७१), होल (५३) आणि आर्चर (३१) यांच्या आकमक फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या दिवसाअखेरीस पहिल्या इनिंग्जमध्ये २६६ रन्स काढल्या! तिसर्‍या दिवशी इंग्लंडला खिंडीत पकडण्यासाठी हॅसेटचे हात शिवशिवत होते, पण पावसामुळे टी टाईमपर्यंत खेळच होऊ शकला नाही! इंग्लंडच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये हॅसेट आणि बिल एड्रीच यांनी ५७ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप रचली. दिवसाच्या अखेरीला रिमझिम पडणार्‍या पावसामुळे बॉलची चकाकी जात असल्याने हॅसेटने मॅच थांबवण्याची अंपायर्सना विनंती केली! हटनची मात्रं या गोष्टीला मान्यता नव्हती! अंपायर्सनी हटनचीच बाजू घेतल्यावर हॅसेटचा नाईलाच झाला खरा, पण हटनचा हा अट्टाहास त्यालाच महागात पडला! रॉन आर्चरचा पुढच्या बॉलवरच विकेटकीपर लँगलीने त्याचा कॅच घेतला! हटन परतल्यावर जेमतेम दहा मिनीटांत पावसामुळे खेळ थांबवणं भागच पडलं!

चौथा दिवस मॅचचा रेस्ट डे होता. पाचव्या दिवशी सकाळीही पावसामुळे लंचपूर्वी खेळ सुरूच होऊ शकला नाही! परंतु लंचनंतरच्या दुसर्‍याच ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का बसला! ढगाळ वातावरणात लिंडवॉलचा तुफान वेगात आलेला बॉल ग्रेव्हनीला दिसलाच नाही आणि त्याची दांडी उडाली!

एड्रीच आणि कॉम्प्टन यांनी ७७ रन्सची पार्टनरशीप करत इंग्लंडची इनिंग्ज सावरली. लिंडवॉल, मिलर आणि रॉन आर्चर यांच्या शॉर्टपीच बॉल्सचा मुकाबला करणंं अनेकदा त्यांना कठीण जात होतं, परंतु दोघंही सावधपणे खेळत होते. अखेर लिंडवॉलच्या बॉलवर जिम डी करीने एड्रीचचा कॅच घेतल्यावर ही जोडी फुटली. चार तासात एड्रीचने ६४ रन्स काढल्या होत्या! कॉम्प्टनबरोबरच्या त्याच्या पार्टनरशीपमुळे पहिल्या इनिंग्जचा लीड भरुन काढण्यात इंग्लंडला यश आलं होतं.

इंग्लंडच्या दृष्टीने आता जास्तीत जास्तं काळ बॅटींग करणं हे महत्वाचं ठरणार होतं! त्याचबरोबर शक्यं तितक्या रन्सचा लीड मिळवणं आवश्यंक होतं!

एड्रीच परतल्यावर कॉम्प्टनच्या जोडीला आला विली वॉटसन! कॉम्प्टन - वॉटसन यांनी सुमारे सव्वातास खेळून काढला. परंतु लॉर्ड्सप्रमाणे सफाईदारपणे खेळणं वॉटसनला जमत नव्हतं. त्यातच कॉम्प्टनने अर्धशतक पूर्ण केल्यावर लिंडवॉलचा बंपर खेळताना त्याच्या डाव्या हातावर आदळला! वेदना बाजूला सारत कॉम्प्टन पुढे खेळत राहिला खरा, पण मिलरच्या बॉलवर डेव्हीडसनने गलीमध्ये वॉटसनचा कॅच घेतल्यामुळे ही जोडी फुटली! पुढच्याच बॉलवर स्लिपमध्ये डी कॉर्कीने रेगी सिम्प्सनचा कॅच घेतल्याने इंग्लंडची अवस्था १७१ / ५ अशी झाली!

कीथ मिलर हॅटट्रीकवर होता!....आणि खेळायला आला ट्रेव्हर बेली!

बेलीने फ्रंटफूटवर पॅड - बॅटने बॉल डिफेंड करत मिलरची हॅटट्रीक हुकवली! दिवसाचा खेळ संपला तेव्हा कॉम्प्टन ६० आणि बेली ४ रन्सवर नॉटआऊट होते!

पाचव्या दिवशी सकाळी खेळ सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडला एक धक्का बसला. डेनिस कॉम्प्टनच्या हाताचं दुखणं बळावलं होतं! हॉस्पिटलमध्ये जाऊन आणि शक्यं ते सर्व उपचार करुनही त्याला डाव्या हाताने बॅट धरणं अशक्यं होऊन बसलं होतं! इंग्लंडकडे केवळ ७२ रन्सचा लीड होता आणि अद्याप पाचवा संपूर्ण दिवस बाकी होता! त्यातच पावसाची दूरान्वयेही शक्यता दिसत नव्हती!

कॉम्प्टन बॅटींगला येणं शक्यं नसल्याने बेलीबरोबर मैदानात उतरला तो गॉडफ्रे इव्हान्स! पण पाचव्याच ओव्हरमध्ये मिलरच्या बंपरवर लिंडवॉलने इव्हान्सचा कॅच घेतला! कॉम्प्टनला हाताच्या दुखण्यातून सावरुन बॅटींगला जाण्यास पुरेसा अवधी मिळेल का याची काळजी लागली होती! इंग्लंडची ही गोची हॅसेटच्या नेमकी ध्यानात आली होती! लिंडवॉल - मिलर यांनी इंग्लंडला गुंडाळण्याचा दृष्टीने निकराचा हल्ला चढवला!

परंतु ट्रेव्हर बेली नामक धोंड मार्गातून बाजूला हटत नव्हती!

त्यातच बेलीच्या जोडीला आणखीन एक इंग्लिश 'बॅट्समन' ऑस्ट्रेलियासमोर उभा ठाकला...
जिम लेकर!

सुमारे दोन तास लिंडवॉल, मिलर, डेव्हीडसन, आर्चर, बेनॉ यांना ठामपणे खेळून काढत लेकरने ४८ रन्स फटकावल्या! इंग्लंडच्या २२० रन्स झालेल्या असताना हॅसेटने नवीन बॉल घेतला, पण लेकरने लिंडवॉलला कव्हर ड्राईव्ह आणि कटच्या बाऊंड्री मारत त्याच्यावर अनपेक्षितपणे प्रतिहल्ला चढवला! लेकरच्या या पराक्रमामुळे दोन तास वेळ तर गेलाच, पण इंग्लंडने २३८ पर्यंत मजल मारली! लेकर - बेली यांनी ५६ रन्सची पार्टनरशीप केली होती त्यात बेलीच्या रन्स होत्या ९!

लेकरची फटकेबाजी सुरु असताना फ्रंटफूटवर येऊन बॉल ब्लॉक करण्याचं बेलीचं व्रत मनोभावे सुरू होतं!
त्यातच लिंडवॉल आणि विशेषतः मिलरची लय बिघडवण्यासाठी त्याने आणखीन एक उद्योग आरंभला..
मिलरने बॉल टा़कण्याचा पवित्रा घेऊन रनअपला सुरवात केली, की बेलीचं पॅड् किंवा हॅंडग्लोव्ह्जना काही ना काहीतरी 'प्रॉब्लेम' झाल्याचं नाटक करुन त्याला मध्येच थांबवू लागला! तीन - चार वेळा हा प्रकार झाल्यावर बेलीची नाटकं चाणाक्षं मिलरच्या ध्यानात आली! वैतागलेल्या मिलरने बेलीच्या डोक्याच्या दिशेने एक बीमर टाकला! स्टेडीयममध्ये हजर असलेल्या प्रेक्षकांनी मिलरची हुर्यो उडवण्यास सुरवात केली! या प्रकरणाचा निषेध म्हणून भडकलेल्या मिलरने मैदानातच बैठक मारली! बेलीला नेमकं तेच हवं होतं! या सगळ्या प्रकरणात जास्तीत जास्तं वेळ फु़कट घालवण्याचाच त्याचा हेतू होता!

मिलर म्हणतो,
"I was riled by his continual wasting of time playing around with his gloves and generally behaving irritatingly!"

लंचच्या जेमतेम काही मिनीटं आधी आकाशात सूर्य तळपत असतानाही बेलीने अंपायर्सकडे चक्कं 'बॅड लाईट' साठी अपिल केलं! आश्चर्यचकीत झालेल्या हॅसेटला काय होतं आहे हेच कळेना! दोन्ही अंपायर्सना आपापसात चर्चा करुन लाईटबद्दल निर्णय घेण्यासाठी लागलेल्या वेळामुळे लिंडवॉलला लंचपूर्वी शेवटच्या ओव्हरला सुरवात करता येणार नव्हती!

बेलीचा तोच हेतू होता!

लंचनंतर अखेर डेव्हीडसनच्या बॉलवर बेनॉने लेकरचा कॅच घेतला! लेकरनंतर आलेल्या कॉम्प्टनने अर्धा तास खेळून काढला खरा, पण त्याला जेमतेम बॅट पकडणं जमत होतं! लिंडवॉलने अखेर त्याला एलबीडब्ल्यू केलं! पावणेपाच तास खेळून काढत कॉम्प्टनने ६१ रन्स काढल्या!

कॉम्प्टन परतल्यावरही इंग्लंडची इनिंग्ज गुंडाळण्याचा ऑस्ट्रेलियाचा मनसुबा यशस्वी होऊ शकला नाही! आता जास्तीतजास्तं वेळ खेळून काढणं महत्वाचं होतं! कॉम्प्टननंतर आलेल्या लॉकने चाळीस मिनीटं खेळून काढली. मिलरच्या बॉलवर स्लिपमध्ये मॉरीसने त्याचा कॅच घेतला. शेवटचा बॅट्समन अ‍ॅलेक बेडसर खेळायला आल्यावरही बेलीच्या खेळात काहीच फरक पडला नाही! फ्रंटफूटवर पॅड - बॅटने बॉल खेळून काढण्यात त्याला असामान्यं आनंद मिळत असावा! अखेर डेव्हीडसनच्या बॉलवर स्लिपमध्ये होलने कॅच घेतल्यावर हा बाजीप्रभू धारातिर्थी पडला!

सव्वाचार तासात बेलीने ३८ रन्स काढल्या होत्या!

बीबीसीच्या कॉमेंटेटर्सनी बेलीच्या या खेळाचं अचूक वर्णन केल!
द बेली ब्लॉक!

कॉम्प्टन, एड्रीच, बेली आणि लेकर यांच्यामुळे इंग्लंडने दुसर्‍या इनिंग्जमध्ये तब्बल पावणेदहा तासात १७७ ओव्हर्स खेळून काढल्या होत्या! ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकण्यासाठी चौथ्या इनिंग्जमध्ये अवघ्या दोन तासात १७७ रन्स काढण्याचं आव्हान होतं!

हटनने बेडसरच्या जोडीला नवीन बॉल ठेवला तो टोनी लॉकच्या हाती! आर्थर मॉरीसने लॉकवर सुरवातीलाच हल्ला चढवला! परंतु लॉकचा बॉल ड्राईव्ह करण्याच्या नादात हॅसेटची दांडी उडाली! हॅसेट परतल्यावर आलेल्या होलच्या साथीने मॉरीसने २७ रन्स जोडल्या. चाळीस मिनीटात मॉरीसने ३८ रन्स फटकावल्या होत्या. तो धोकादायक ठरणार अशी चिन्हं दिसत असतानाच लॉकच्या बॉलवर इव्हान्सने त्याला बेमालूमपणे स्टंप केलं! ऑस्ट्रेलिया ५४ / २!

मॉरीस परतल्यावर खेळायला आलेल्या नील हार्वेनेही आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली! होल आणि हार्वे यांनी अवघ्या अर्ध्या तासात ५७ रन्स फटकावल्यावर बेडसरच्या बॉलवर हार्वे (३४) एलबीडब्ल्यू झाला! हार्वे परतल्यावर मिलर येईल अशी बहुतेक सर्वांना अपेक्षा होती, कारण त्या परिस्थितीत फटकेबाज मिलरपेक्षा योग्य बॅट्समन ऑस्ट्रेलियाला शोधून सापडला नसता! परंतु बेलीच्या 'उद्योगां'नी मिलर इतका भडकलेला होता की त्याने बॅटींगला जाण्याचं साफ नाकारलं! शेवटी होलच्या जोडीला मैदानात उतरला तो अ‍ॅलन डेव्हीडसन!

ऑस्ट्रेलियाला अद्याप पाऊण तासात ६६ रन्सची आवश्यकता होती!
आतापर्यंतची फटकेबाजी पाहता ते मॅच जिंकणार यात कोणालाच शंका वाटत नव्हती!

आतापर्यंत हटनने बेलीला बॉलिंगला आणलं नव्हतं! दिवसभर बॅटींग करुन दमलेला असल्याने त्याला थोडाफार आराम देण्याचा हटनचा हेतू होता! परंतु आता त्याचा नाईलाज झाला होता. हटनने बॉलिंग टाकतोस का अशी विचारणा करताच बेली लगेच उत्तरला,

"Give me the ball!"

बेलीच्या सूचनेवरुन हटनने ऑफला तीन आणि लेगला सहा फिल्डर्स लावले. लेगला असलेल्या सहापैकी चार फिल्डर्स कॅच घेण्याच्या आणि बाऊंड्री अड्वण्याच्या दुहेरी हेतूने बाऊंड्रीवर होते! उरलेले दोन फिल्डर्स एक रन काढण्यापासून बॅट्समनना रोखण्यासाठी मिडविकेट आणि स्क्वेअरलेगला होते! अशी फिल्डींग लावल्यावर बेलीने राऊंड द विकेट बॉलिंगला सुरवात केली! लेगस्टंपच्या सहा इंच बाहेर!

निगेटीव्ह बॉलिंगची ही परिसीमा होती! त्यातच आणखीन वेळ काढण्याच्या दृष्टीने बेलीने आपला रनअप नेहमीपेक्षा जवळपास दुप्पटीने वाढवला! प्रत्येक बॉल टाकल्यावर बागेत फिरावं अशा थाटात तो आपल्या बॉलिंग मार्कच्या दिशेने जात होता! कोणतीही घाई त्याला नव्हती! त्यातच त्याच्या बुटाच्या लेसचा अचानक प्रॉब्लेम होण्यास सुरवात झाली!

बेलीच्या या निगेटीव्ह बॉलिंगला वैतागलेल्या होलने त्याचा बॉल स्क्वेअरलेगला उचलला, परंतु तो पडला स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर असलेल्या टॉम ग्रेव्हनीच्या हाती! होल अशारितीने आऊट झाल्यावरही डी कॉर्कीने बेडसरला हूकची सिक्स मारली, परंतु शेवटी ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकण्यासाठी ३० रन्सची आवश्यकता असताना अखेर निर्धारीत वेळ संपली!

शेवटच्या पाऊण तासात इंग्लंडने केवळ १२ ओव्हर्स बॉलिंग केली होती! त्यातल्या सहा ओव्हर्स बेलीच्या होत्या! सहा ओव्हर्स टाकण्यासाठी त्याने मोजून ३० मिनीटं घेतली होती!

ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि पत्रकारांनी बेलीवर टीकेची झोड उठवली! इंग्लिश वृत्तपत्रांनी मात्रं त्याने इंग्लंडचा पराभव टाळला याचं कौतुक करताना त्याच्या निगेटीव्ह बॉलिंगकडे मात्रं सोईस्करपणे काणाडोळा केला! खुद्दं बेलीला मात्रं टीकेची किंचीतही पर्वा नव्हती! त्याच्या दृष्टीने मॅच वाचवणं किंवा जिंकण्याला सर्वोच्चं महत्वं होतं! बाकी सर्व गोष्टी गौण होत्या!

ओव्हलच्या मैदानातली पाचवी टेस्ट इंग्लंडने जिंकून १९ वर्षांनी अ‍ॅशेस पुन्हा पटकावल्या!
वॉटसन आणि 'द बेली ब्लॉक'चा त्यात सिंहाचा वाटा होता!

१९५३ च्या या अ‍ॅशेस सिरीजपूर्वी बेली एक आक्रमक आणि फटकेबाज बॅट्समन आणि उत्तम मिडीयम पेस बॉलर म्हणून ओळखला जात होता. इंग्लंडच्या कौंटी स्पर्धेत त्याने एकदा लंचपूर्वी शतक फटकावलं होतं! पण या अ‍ॅशेस सिरीजनंतर स्वतः बेलीही आपल्या फ्रंटफूटवरच्या डिफेन्स्विव्ह बॅटींगच्या इतक्या प्रेमात पडला की पुढे त्याने तेच तंत्रं आत्मसात करुन परिणामकारक रितीने वापरलं!

१९५४-५५ मध्ये पुन्हा एकदा बेलीची ऑस्ट्रेलियाशी गाठ पडली!

ब्रिस्बेनच्या पहिल्या टेस्टमध्ये त्याने साडेचार तासात ८८ रन्स काढल्या होत्या! सिडनीच्या दुसर्‍या टेस्टमध्ये तो साफ अपयशी ठरला, परंतु मेलबर्नला पुन्हा त्याने ऑस्ट्रेलियाला 'बेली ब्लॉक' चा प्रसाद दिला! पहिल्या इनिंग्जमध्ये ३० रन्ससाठी दोन तास घेतल्यावर दुसर्‍या इनिंग्जमध्ये २४ रन्ससाठी त्याने अडीच तास ऑस्ट्रेलियाचा अंत पाहीला! अ‍ॅडलेडलाही अडीच तासात त्याने ३८ रन्स काढल्या! सिडनीच्या पाचव्या टेस्टमध्ये साडेतीन तासात ७२ रन्स काढत बेलीने ऑस्ट्रेलियाची दमछाक केली!

या टेस्टच्या वेळेला बेलीच्या दिलदारपणाची एक झलक पाहण्यास मिळाली. रे लिडवॉलच्या ९९ विकेट्स झालेल्या होत्या. दुखापतीमुळे लिंडवॉलच्या करीयरबद्दल प्रश्नंचिन्हं उभं राहिलं होतं! बेली आणि जॉनी वॉर्डल खेळत असताना वॉर्डल त्याला म्हणाला,

"Trevor, Ray is on 99 wickets. Lets give him 100th! He may not play again! Its either you or me?"

"I will do it!" बेली म्हणाला!

लिंडवॉलच्या पुढच्याच ओव्हरमध्ये एरवी खमकेपणाने खेळणार्‍या बेलीने स्टंपवर पडलेला पहिलाच बॉल मुद्दाम सोडून दिला आणि तो बोल्ड झाला!

१९५७ मध्ये दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर दरबानच्या टेस्ट्मध्ये पीटर रिचर्ड्सनबरोबर ओपनिंगला आलेल्या बेलीने आणखीन एक पराक्रम गाजवला! पूर्ण सेशन बॅटींग करुन कमीत कमी रन्स काढण्याचा! लंचपूर्वीच्या पहिल्या सेशनमध्ये त्याने केवळ ८ रन्स काढल्या! पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो ७१ वर नॉटआऊट होता! अखेर नील अ‍ॅडॉकच्या बॉलवर हेडली कीथने त्याचा कॅच घेतला तेव्हा त्याने साडेसहा तासात ८० रन्स काढल्या होत्या!

परंतु बेलीने कहर केला तो १९५८ च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये!

ब्रिस्बेनच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन पीटर मे याने टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय त्याच्या अंगाशी आला! डेव्हीडसन, बेनॉ आणि इयन मॅक्कीफ यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत इंग्लंडला १३४ मध्ये गुंडाळलं! इंग्लंडतर्फे थोडाफार प्रतिकार केला तो पीटर मे (२६) आणि दोन तासात २७ रन्स काढणारा बेली यांनीच! अर्थात ऑस्ट्रेलियाचीही परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती! पहिल्या इनिंग्जमध्ये इंग्लंडप्रमाणेच ऑस्ट्रेलियाही जेमतेम १८६ पर्यंतच मजल मारू शकली होती! पीटर लोडर (४), बेली (३) आणि लेकर (२) यांनी ऑस्ट्रेलियाचा लीड ५० पर्यंतच राखण्यात यश मिळवलं होतं!

इंग्लंडच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये पीटर रिचर्ड्सन आणि क्लेमंड मिल्टन यांनी तासाभरात सुमारे २८ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर बेनॉने आपल्याच बॉलवर रिचर्ड्सनचा कॅच घेतला. पहिल्या इनिंग्जमध्ये इंग्लंडची घसरगुंडी उडलेली होती. दुसर्‍या इनिंग्जमध्येही रिचर्ड्सन लवकर परतल्याने तेच होण्याचा धोका संभवत होता. इंग्लंडची घसरण होणं टाळायचं असेल तर एकच उपाय कॅप्टन पीटर मे याला दिसत होता...

ट्रेव्हर बेली!

बेली खेळायला येऊन जेमतेम पंधरा मिनीटं होतात तोच डेव्हीडसनच्या बॉलवर विकेटकीपर वॉली ग्राऊटने मिल्टनचा कॅच घेतला! इंग्लंड ३४ / २!

मिल्टनच्या जागी खेळायला आलेल्या टॉम ग्रेव्हनीने कोणतीही रिस्क न घेता आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड घालत केवळ बचावावरच भर दिला! अगदीच हाफ व्हॉली पडली तरच ग्रेव्हनी रन्स काढण्याचा प्रयत्नं करताना दिसत होता! आणि बेली?

फ्रंटफूट्वर पॅड - बॅट एकत्रं ठेवत त्याचा तो कुप्रसिद्ध डिफेन्सिव शॉट!

दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ६६ ओव्हर्समध्ये ९२ / २ अशी मजल मारलेली होती! ग्रेव्हनी ३३ तर बेली २७ रन्सवर खेळत होते! दोघांनी ५८ रन्सची पार्टनरशीप रचली होती! खरंतर विकेट बॅटींगला पूर्णपणे अनुकूल होती! ऑस्ट्रेलियाची बॉलिंग अचूक असली तरी डेव्हीडसन, मॅक्कीफ, बेनॉ, केन मकाय, लिंड्से क्लाईन यांच्यापैकी एकाचीही बॉलिंग खेळणं ग्रेव्हनी किंवा बेली यांना त्रासदायक ठरत नव्हतं. परंतु दोघांनी किंचीतही आक्रमक खेळण्याचा विचारही केला नव्हता!

चौथ्या दिवशी सकाळी नील हार्वेच्या डायरेक्ट थ्रो मुळे ग्रेव्हनी रनआऊट झाला. पावणेचार तासात आणि १६९ बॉलचा सामना करत ग्रेव्हनीने ३६ रन्स काढल्या होत्या! ग्रेव्हनीपाठोपाठ बेनॉच्या बॉलवर पीटर मे एलबीडब्ल्यू झाल्यामुळे इंग्लंडची अवस्था झाली १०२ / ४!

पीटर मे च्या जागी खेळायला आलेला कॉलिन कौड्री कोणतीही रिस्क न घेता आरामात खेळत होता. दरम्यान दुसर्‍या बाजूने ऑस्ट्रेलियन बॉलर्स आणि प्रेक्षकांचाही अंत पाहण्याचं काम बेली इमानेइतबारे पार पाडत होता! एकवेळ तर अशी आली होती की सुमारे तासाभरात बेलीने एकही रन काढलेली नव्हती! बेलीच्या खेळाने वैतागून प्रेक्षकांतून एकजण ओरडला,

“Bloody Bailey, stop crawling, let’s see some cricket.”

बेली ढिम्म!
मैदानावर हजर असलेल्या आठ हजार प्रेक्षकांचा अंत पाहण्याचं त्याचं काम पूर्ववत सुरुच होतं!

लंचनंतरही बेली आणि कौड्री यांची कमालीची मंदगतीने सुरू असलेली पार्टनरशीप सुरु राहिली! सुमारे अडीच तासात दोघांनी ५१ रन्स जोडल्या होत्या. कौड्री आरामात खेळत होता, तर बेली प्रत्येक बॉल काळजीपूर्वक डिफेंड करत होता! हे दोघं आणखीन कित्येक तास बॅटींग करणार असं वाटत असतानाच....

मॅक्कीफच्या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा कौड्रीचा प्रयत्न फसला आणि स्लिपच्या दिशेने त्याचा कॅच उडाला. लिंड्से क्लाईनने पुढे डाईव्ह मारत कॅच घेतला खरा, पण कौड्री आणि अनेक प्रेक्षकांच्या मते क्लाईनने कॅच घेण्यापूर्वी बॉलचा टप्पा पडला होता आणि त्याने हाफव्हॉलीवर बॉल उचलला होता! अंपायर मेल मॅकइनेस आणि कोल हॉय यांनी आपापसात चर्चा करुन कौड्री बाद असल्याचा निर्णय दिला! अंपायरच्या या निर्णयावर अनेक प्रेक्षक आणि पत्रकारही नाखूशच दिसत होते!

प्रेसबॉक्समध्ये असलेल्या एका पत्रकाराने दुपारी तीनच्या सुमाराला जॅक फिंगल्टनला विचारलं,
"How long it had been since Bailey scored?"

"At twenty past two!" फिंगल्टन काही बोलण्यापूर्वी जॉर्ज डकवर्थ उद्गारला!

"Today or yesterday?" जांभई देत त्या पत्रकाराने विचारलं!

अखेर एकदाचा तो क्षण आला!
बेनॉच्या बॉलवर स्क्वेअरलेगला एक रन काढत बेलीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं!
तब्बल सहा तास आणि ३६२ बॉलचा सामना करत बेलीने ही मजल मारली होती!
फर्स्ट क्लास क्रिकेटमधलं हे सर्वात कूर्मगती अर्धशतक होतं!

डेव्हीडसनने इव्हान्सला एलबीडब्ल्यू केल्यावर लॉकने अर्धा तास बेलीला साथ दिली! मॅक्कीफच्या बॉलवर लॉकची दांडी उडाल्यावर मैदानात उतरलेल्या जिम लेकरने ३७ मिनीटं खेळून काढली! एका बाजूने बेली अगदी व्रतस्थपणे बॉल मागून बॉल डिफेंड करत असताना लेकरने जिम बर्कच्या एका ओव्हरमध्ये १० रन्स फटकावल्यामुळे इंग्लंडच्या इनिंग्जमध्ये थोडं चैतन्यं आलं! बेनॉच्या बॉलवर लेकर बोल्ड झाल्यावर मॅक्डोनाल्डने स्टॅथमचा कॅच घेतला. अखेरचा बॅट्समन पीटर लोडर खेळायला आला तेव्हा दिवसाचा खेळ संपण्यास अवघी दहा मिनीटं शिल्लक होती! बेली ही दहा मिनीटं आरामात खेळून पाचव्या दिवशी पुन्हा बॅटींगला येणार अशी सर्वांची अपेक्षा होती...

पण केन मकायचा बॉलिंगला येताच अगदी अनपेक्षीतपणे बेली क्रीज मधून पुढे सरसावला...
आणि बॉलची लाईन चुकल्यामुळे बोल्ड झाला!
अखेर एकदाचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला!

तब्बल साडेसात तास बॅटींग करत आणि ४२७ बॉलचा सामना करत बेलीने ६८ रन्स काढल्या होत्या! त्यात चक्कं चार बाऊंड्री होत्या! त्याला पडलेल्या ४२७ बॉलपैकी केवळ ४० बॉलवर त्याने रन्स काढल्या होत्या! उरलेले ३८७ बॉल त्याने ब्लॉक केले होते किंवा सोडून दिले होते!

बेलीच्या या इनिंग्जनंतर ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी त्याला एकमुखाने नाव दिलं..
Barnacle!

दिवसभरात इंग्लंडने केवळ १०६ रन्स काढल्या होत्या! अर्थात बेलीच्या या इनिंग्जचा काहीही उपयोग होण्यासारखा नव्हता! ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या १४७ रन्स नॉर्मन ओनिलच्या ७१ रन्सच्या फटकेबाज इनिंग्जमुळे आरामात काढल्या! परंतु बेलीच्या पावलावर पाऊल टाकत ऑस्ट्रेलियाचा ओपनर जिम बर्क सव्वाचार तासात २८ रन्स काढून नॉटआऊट राहीला!

मेलबर्नच्या दुसर्‍या टेस्टमध्येही बेलीने अडीच तासात ४८ रन्स काढल्या, परंतु या दोन इनिंग्जचा अपवाद वगळता बाकीच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या सुदैवाने त्याला फारसं काही करता आलं नाही! मेलबर्नच्या शेवटच्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंग्जमधे लिंडवॉलने त्याला खातंही खोलण्याची संधी न देता पॅव्हेलियनची वाट दाखवली!
हीच बेलीची शेवटची टेस्ट ठरली!

फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वात कूर्मगती अर्धशतक झऴकावण्याचा बेलीचा विक्रम आजही अबाधित आहे!

एक मात्रं निश्चित, चिकट बॅटींगमुळे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध निगेटीव्ह बॉलिंग केल्यामुळे बेली कितीही बदनाम झाला असला, तरी तो इंग्लंडसाठी खेळलेल्या सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर्सपैकी एक होता! १९५४ मध्ये वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर जमेकाच्या टेस्टमध्ये बेडसरच्या अनुपस्थितीत बॉलिंग ओपन करताना त्याने वॉरेल, वीक्स, वॉलकॉट या तीन डब्ल्यूंसह खेळणार्‍या वेस्ट इंडीजच्या ३४ रन्समध्ये ७ विकेट्स काढल्या होत्या! गॅरी सोबर्सची ही पहिलीच टेस्ट होती! इंग्लंडच्या पहिल्या इनिंग्जमध्ये सोबर्सची पहिली विकेट होता ट्रेव्हर बेली!

बॉलर्स, फिल्डर्स आणि प्रेक्षकांचाही अंत पाहणार्‍या कमालीच्या कूर्मगती बॅटींगचं त्याने पुढे कायम समर्थन केलं! अशी इनिंग्ज खेळायला जास्तं एकाग्रता लागते आणि अशा इनिंग्ज खेळणं अत्यावश्यक आहे असं त्याचं ठाम मत होतं!


आपल्या आवडत्या शॉटचं 'ज्ञान'दान करताना बेली!

कीथ मिलर म्हणतो,
“Trevor was such a pain if you were playing against him – a damned nuisance in fact. You knew that if you could get this bloke out of the way, the chances were that you would win. All too frequently Ray Lindwall and I would find the task beyond us and it got under our skin! His frontfoot lunge with pad and bat togethere in the prod sometimes haunted my dreams!”

बेलीच्या 'Win at all cost' मानसिकतेचं डग इन्सोलने नेमक्या शब्दांत वर्णन केलं आहे! इन्सोल म्हणतो,

"Trevor Bailey would be the first player selected for your 'All Time Bloody Minded XI' to be captained obviously by Douglas Jardine!"

१९५८ मध्ये बेलीचं करीयर अंतिम टप्प्यात आलेलं असतानाच त्याच्यापेक्षाही वरचढ पराक्रम एका पाकिस्तानी बॅट्समनने गाजवला!

हनिफ महंमद!

ब्रिजटाऊन बार्बाडोसच्या टेस्टमध्ये वेस्ट इंडीजचा कॅप्टन जेरी अलेक्झांडरने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. कॉनरेड हंट (१४२), एव्हर्टन वीक्स (१९७) आणि कॉली स्मिथ (७८) यांनी पाकिस्तानी बॉलिंगची मनसोक्तं धुलाई करत पहिल्या ५७९ / ९ अशा स्कोरवर अलेक्झांडरने वेस्ट इंडीजची इनिंग्ज डिक्लेयर केली!

पाकिस्तानच्या पहिल्या इनिंग्जमध्ये हनिफ आणि इम्तियाज अहमद यांनी ३५ रन्सची पार्टनरशीप केल्यावर रॉय गिलख्रिस्टने इम्तियाजला एलबीडब्ल्यू पकडलं! पाठोपाठ एरिक अ‍ॅटकिन्सनच्या बॉलवर हनिफ बोल्ड झाल्यावर पाकिस्तानची घसरगुंडी उडाली! रॉय गिलख्रिस्टच्या समोर कोणीही उभं राहू शकलं नाही! भडक डोक्याच्या गिलख्रिस्टला बॅट्समनला जाणिवपूर्वक बीमर टाकण्याची वाईट खोड होती! त्याच्या अशाच एका बीमरमधून इम्तियाज अहमद जेमतेम बचावला होता. हनिफ (१७), इम्तियाज (२०) आणि मथायस (१७) यांच्याव्यतिरिक्त कोणीच प्रतिकार करु शकलं नाही! गिलख्रिस्ट (४) आणि कॉली स्मिथ (३) यांनी अवघ्या १०६ रन्समध्ये पाकिस्तानचा खिमा केला!

पहिल्या इनिंग्जमध्ये ४७३ रन्सचा लीड घेतल्यावर जेरी अलेक्झांडरने पाकिस्तानवर फॉलोऑन लादला!
पुढे काय वाढून ठेवलं आहे याची त्याला किंचीतशी तरी कल्पना होती का?

हनिफ आणि इम्तियाज अहमद यांनी पाकिस्तानला १५२ रन्सची ओपनिंग करुन दिली. इम्तियाज (९१) शतक झळकावणार असं वाटत असतानाच गिलख्रिस्टने त्याला एलबीडब्ल्यू केलं! इम्तियाज परतल्यावर अलिमुद्दीन (३७), सईद अहमद (६५), थोरला भाऊ वझीर महंमद (३५) या प्रत्येकाबरोबर शतकी पार्टनरशीप करुन हनिफने वेस्ट इंडीजच्या बॉलर्स आणि फिल्डर्सच्या तोंडाला अक्षरशः फेस आणला! अखेर डेनिस अ‍ॅटकिन्सनच्या बॉलवर जेरी अलेक्झांडरने हनिफचा कॅच घेतल्यावर वेस्ट इंडीजने सुटकेचा नि:श्वास सोडला असावा!

तब्बल ९७० मिनीटं - १६ तास १० मिनीटं बॅटींग करत हनिफने ३३७ रन्स काढल्या!
त्यात केवळ २४ बाऊंड्री होत्या!

बार्बाडोसच्या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उभं राहून त्याला मानवंदना दिली!
एका अप्रतिम खेळीची ती पावती होती!


मॅरेथॉन इनिंग्जनंतर आऊट होऊन परत येत असलेला हनिफ

हनिफ म्हणतो,
"I was amazed to find reaching for reserves of energy and concentration I never thought I had! It had to be done, so I did it!”

गिलख्रिस्ट, स्मिथ, आल्फ व्हॅलेंटाईन, सोबर्स, वॉलकॉट यांनी तब्बल ३१९ ओव्हर्स बॉलींग केली होती!
मॅच ड्रॉ झाली हे वेगळं सांगायला नकोच!
टेस्ट क्रिकेट आणि एकूणच फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वात लांबलचक इनिंग्ज!

ट्रेव्हर बेलीला निश्चितच हनिफच्या या इनिंग्जचा अभिमान वाटला असावा!

अर्थात हनिफची ती त्रिशतकी इनिंग्ज ही मॅच वाचवण्याच्याच दृष्टीने खेळलेली होती. १९६७ मध्ये पुन्हा एकदा लॉर्ड्सला मॅच वाचवताना तो तब्बल नऊ तासांत ५५६ बॉलमध्ये १८७ रन्स काढून नॉटआऊट होता! यावेळी हनिफला साडेतीन तासात ७६ रन्स काढणार्‍या आसिफ इक्बालने तेवढाच तोलामोलाचा सपोर्ट दिला होता!

पण….

हनिफसारखी लांबलचक आणि बेलीसारखी कंटाळवाणी इनिंग्ज खेळण्याचा पराक्रम एखाद्या बॅट्समनने एकाच इनिंग्जमध्ये करुन दाखवला तर?

माईक ब्रिअर्लीचा इंग्लिश संघ आणि लाहोरचे दुर्दैवी प्रेक्षक यांच्या नशिबी १९७७ च्या डिसेंबरमध्ये हे भोग लिहीलेले होते! यावेळचा कलाकार होता पाकिस्तानसाठी टेस्टमध्ये पहिलं शतक झळकवणार्‍या नजर महंमदचा मुलगा..

मुदस्सर नजर!

बॅटींगला पूर्णपणे अनुकूल असलेल्या विकेटवर वासिम बारीने टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर सादिक महंमद आणि मुदस्सर ओपनिंगला आले. मुदस्सरचं तंत्रं अगदी सोपं होतं. ऑफस्टंपच्या लाईनच्या किंचीतही बाहेर बॉल पडला तर त्याचा पहिला पवित्रा होता तो बॉल सोडून देण्याचा! बॉल सोडून देणं अगदीच शक्यं नसलं तर फ्रंटफूटवर प्रथम पॅड आणि त्याला लागून पाठोपाठ बॅट अशा बचावाच्या 'शास्त्रोक्त' पद्धतीने तो बॉल ब्लॉक करत होता. मॅचपूर्वी नमाज पढताना ट्रेव्हर बेलीने बहुधा त्याला ‘दृष्टांत’ दिला असावा! रन्स काढण्यात त्याला कोणताही इंट्रेस्ट दिसत नव्ह्ता! आता बॉल डिफेंड करतानाच एज लागून तो बाऊंड्रीच्या दिशेने वगैरे गेलाच तर त्यात त्याचा दोष नव्हता! दिवसाचा खेळ संपला तेव्हा पावणेसहा तासात ५२ रन्स काढून मुदस्सर नॉटआऊट होता! लंचनंतर त्याच्या जोडीला असलेला हरुन रशीद ८४ वर पोहोचला होता!

दुसर्‍या दिवशी सकाळीही मुदस्सरच्या बचावात्मक पवित्र्यात काहीही बदल झाला नव्हता! अगदी हाफ व्हॉलीही डिफेंड करण्याचं त्याने तंत्र अवलंबलं होतं! लंचनंतर नव्वदीच्या जवळ येऊन ठेपल्यावर तर तो आणखीनच (कसं शक्यं आहे?) कूर्मगतीने खेळू लागला! लंच ते टी पर्यंतच्या पावणेदोन - दोन तासात त्याने मोजून ११ रन्स काढल्या होत्या!

मुदस्सर ९९ वर पोहोचला तेव्हा प्रेक्षकांची सहनशक्ती अखेर संपली! मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानावर धावून आले! स्टँडमधील प्रेक्षकांनी हाताला लागेल ती वस्तू मैदानात भिरकावण्याचं सत्रं आरंभलं होतं! त्यातच पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे परिस्थिती अधिकच चिघळली! भडकलेल्या प्रेक्षकांनी पोलिसांवरच हल्ला चढवलावर तुटपुंज्या पोलिसांनी मैदानावरुन धूम ठोकली! वासिम बारीने लाऊडस्पीकरवरुन प्रेक्षकांना शांत होण्याचं आवाहन केल्यावर दंगेखोर प्रेक्षकांनीच जेमतेम अर्ध्या तासात मैदानातील एकूण एक दगड आणि इतर वस्तू हटवून मैदान रिकामं केल्यावर मॅच पुन्हा सुरु झाली!

अखेर एकदाचा तो क्षण आला...

जॉन लिव्हरचा बॉल मुद्स्सरने कट् केला...
५५७ मिनीटांत ४१९ बॉल्सचा सामना करत मुदस्सरने अखेर शतक पूर्ण केलं!
त्यात १० बाऊंड्रीचा समावेश होता!

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातलं हे सर्वात कूर्मगतीने काढलेलं शतक होतं!

शतक पूर्ण केल्यावर मुदस्सरने लिव्हरच्या पुढच्या ओव्हरमध्ये लागोपाठ दोन बाऊंड्री मारल्या!
त्या दोन बाऊंड्री म्हणजे प्रेक्षकांच्या आणि इंग्लिश बॉलर्सच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार होता!

जेफ मिलरने स्वतःच्याच बॉलवर मुदस्सरचा कॅच घेतल्यावर प्रेक्षकांची आणि इंग्लंडची एकदाची मुदस्सरच्या तावडीतून सुटका झाली! जवळपास दहा तास - ५९१ मिनीटांत ४४९ बॉल्समध्ये मुदस्सरने ११४ रन्स काढल्या होत्या!

मुदस्सरच्या या कूर्मगती बॅटींगमुळे जेफ बॉयकॉटला भयंकर राग आला असावा! संथपणे बॅटींग करणं आणि प्रेक्षकांनाच काय पण अंपायरलाही झोप आणणं ही त्याची खासियत होती! मुदस्सरची ही इनिंग्ज म्हणजे आपल्या चरण्याच्या राखीव कुरणावर आक्रमण आहे आणि याचा मुकाबला केलाच पाहिजे याच निश्चयाने आणि मुदस्सरपेक्षाही स्लो खेळण्याच्या तयारीनेच तो बहुधा बॅटींगला उतरला असावा...

बॉयकॉटविषयी बोलताना डिकी बर्ड एकदा म्हणाला होता,
"Whenever he's batting and I am umpiring, I needed to remind myself.. Stay awake Dickie! Stay awake! Don't let Boycs sleep you!"

मुदस्सरचा सर्वात कूर्मगती शतक काढण्याचा विक्रम मोडण्याच्या जिद्दीनेच बॉयकॉट खेळत असावा! पण अखेर इक्बाल कासिमच्या एका अप्रतिम बॉलवर बॉयकॉटची दांडी उडाली! पावणेसहा तासात २६७ बॉलमध्ये बॉयकॉटने ६३ रन्स काढल्या होत्या! त्यात चक्कं सात बाऊंड्री होत्या!

मुदस्सरच्या या इनिंग्जवर ट्रेव्हर बेलीची प्रतिक्रीया काय होती?
बीबीसीच्या 'टेस्ट मॅच स्पेशल' मध्ये मुदस्सरच्या इनिंग्जबद्दल बोलताना तो म्हणाला,

"It was a wonderful innings!"

मुदस्सरचा टेस्टमधला सर्वात कूर्मगती शतकाचा विक्रम आजही अबाधित आहे! अपवादात्मक परिस्थिती वगळता ज्या वेगाने आजकाल टेस्ट क्रिकेट खेळलं जातं, ते पाहता तो मोडला जाण्याची शक्यता फारच कमी आहे! अर्थात हनिफ काय किंवा मुदस्सर काय, दोघांनी केवळ डिफेन्सिव पद्धतीने खेळण्याची कास कधीच धरली नाही! इंग्लंडविरुद्धच्या कूर्मगती शतकानंतर मुदस्सरवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली होती! त्याचा परिणाम म्हणून पुढे त्याने बर्‍यापैकी आक्रमक धोरण स्वीकारलं होतं. हनिफ तर पुढे सुनिल गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनी शब्दशः गाजवलेल्या 'लिटील मास्टर' या बिरुदावलीचा आद्य मानकरी! ट्रेव्हर बेलीच्या 'फ्रंटफूट पॅड-बॅट-ब्लॉक!' या पंथाचे अनुयायी म्हणून त्यांची गणना करणं हे अन्यायकारकच ठरेल!

केरी पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटनंतर जागतिक क्रिकेटची परिभषा एकूणच बदलली. वन डे क्रिकेटला जगभरात अफाट लोकप्रियता लाभली. आक्रमक आणि आकर्षक खेळण्याला बहुतेक सर्व खेळाडू प्राधान्य देऊ लागले. टेस्ट क्रिकेटही पूर्वीच्या तुलनेत हळूहळू काही प्रमाणात का होईना पण गतिमान होत होतं! अशा परिस्थितीत 'द बेली ब्लॉक'चा वारसा चालवणारा बॅट्समन येणार तरी कसा आणि कोणत्या देशातून?

पण.... अखेर तो आलाच! तो देखिल इंग्लंडमधूनच!

ऑस्ट्रेलियातले प्रेक्षक आजही ज्याचं नाव घेतल्यावर चवताळून उठतात असा हा महाभाग....
क्रिस्तोफर जेम्स 'क्रिस' टावरे!

केंटसाठी काऊंटी आणि वन डे स्पर्धेत खेळणारा टावरे हा खरंतर एक आक्रमक आणि आकर्षक बॅट्समन होता. खासकरुन कव्हर ड्राईव्ह आणि कटवर त्याची चांगलीच हुकूमत होती. जिलेट कप स्पर्धेत अनेक वन डे मॅचेसमधून त्याने महत्वपूर्ण फटकेबाज इनिंग्ज खेळल्या होत्या. मूळचा मिडल ऑर्डर बॅट्समन असूनही अनेकदा केंटसाठी ओपनिंगला आलेल्या टावरेची फर्स्ट क्लास मॅचेसमधली कामगिरीही उत्तम होती.

पण टेस्ट मधला टावरे आणि इंग्लंडच्या काऊंटी आणि वन डे मधला टावरे यांच्यात डॉ. जेकेल आणि मि. हाईड यांच्याइतका फरक होता!

१९८० मध्ये ट्रेंट ब्रिजला वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्याच टेस्टमध्ये टावरे बॅटींगला आला तेव्हा दुसर्‍या होता बॉयकॉट! पण पहिल्या टेस्टमध्ये टावरेच्या हाती फारसं काही लागलं नाही. जेमतेम दीड तासात १३ रन्स केल्यावर जोएल गार्नरने त्याची दांडी उडवली!.

दुसर्‍या टेस्टमध्ये इयन बोथमने टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतल्यावर गूचने सुरवातीपासूनच रुद्रावतार धारण करत रॉबर्ट्स, होल्डींग, गार्नर्, क्रॉफ्ट यांच्या आक्रमक बॉलिंगवर आक्रमकपणे प्रतिहल्ला चढवला होता! बॉयकॉट परतल्यावरही गूचचा आक्रमकपणा किंचीतही कमी झाला नाही! साडेतीन तासात १६५ बॉलमध्ये १२३ रन्स फटकावल्यावर होल्डींगच्या बॉलवर एलबीडब्ल्यू होऊन गूच परतला तेव्हा इंग्लंडचा स्कोर होता१६५ / २! बॉयकॉट आऊट झाल्यावर निघालेल्या १४० रन्समधल्या ११४ रन्स एकट्या गूचच्या होत्या!

उरलेल्या २६ होत्या क्रिस टावरेच्या!
तीन तास बॅटींग करुन काढलेल्या!

गूच नंतर बॉब वूल्मर आणि माईक गॅटींग आऊट झाले तरी टावरे आपला एका बाजूला विकेटवर उभा होता! अखेर टी टाईमनंतर मायकेल होल्डींगच्या बॉलवर स्लिपमध्ये ग्रिनीजने त्याचा कॅच घेतला तेव्हा पाच तास बॅटींग करुन टावरेने ४२ रन्स काढल्या होत्या!

टावरेच्या अदाकारीची ही सुरवात होती!

१९८१ च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये ओल्ड ट्रॅफर्डच्या पाचव्या टेस्टमध्ये माईक ब्रिअर्लीने टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर डेनिस लिली, टेरी आल्डरमन आणि माईक व्हिटनी यांच्या बॉलिंगपुढे इंग्लंडची दाणादाण उडाली! गूच (१०), बॉयकॉट (१०), गावर (२३), ब्रिअर्ली (२) हे एकापाठोपाठ एक परतल्याने इंग्लंडची अवस्था ६२ / ४ अशी झाली होती! माईक गॅटींगने आक्रमक पवित्रा घेत झटपट ३२ रन्स फटकावल्या, पण लिलीच्या बॉलवर बॉर्डरने त्याचा कॅच घेतला. पुढच्याच बॉलवर बोथमही परतला! अ‍ॅलन नॉटने तासाभरात १३ रन्स काढल्यावर आल्डरमनच्या बॉलवर बॉर्डरने त्याचा कॅच घेतला! जॉन एंबुरीही परतल्यावर इंग्लंडचा स्कोर झाला १३७ / ८!

एका बाजूला इंग्लंडची अशी ससेहोलपट उडालेली असताना दुसर्‍या बाजूला एक बॅट्समन मात्रं विकेटवर मुक्काम ठोकून उभा होता...क्रिस टावरे!

लिली, आल्डरमन, व्हिटनी आणि रे ब्राईट यांचा मुकाबला करत टावरे अर्धशतकाच्या जवळ आला होता! अठ्ठावीस वर्षांपूर्वी ट्रेव्हर बेलीने यशस्वीपणे वापरलेलं बॅटींगचं तंत्रच त्याने अंमलात आणलं होतं!

फ्रंटफूटवर पॅड - बॅट एकत्रं ठेवत बॉल ब्लॉक करणं किंवा सोडून देणं!
ट्रेव्हर बेली निदान हाफ व्हॉलीतरी किमान एक रनसाठी खेळत होता...पण टावरेला ते देखील मंजूर नव्हतं!
हाफ व्हॉलीही डेड बॅटने ब्लॉक करण्यात त्याला अपरिमित आनंद होत असावा!

त्याची आणखीन एक करामत और होती!
दरवेळी बॉल खेळून झाला की तो लेगसाईडला एक फेरी मारुन येत असे! अनेकदा तर स्क्वेअरलेग अंपायर पर्यंत!

बॉब विलीस म्हणतो,
“When he strolls away towards square-leg…it is like an act of thanksgiving that the previous ball has been through!”

पॉल अ‍ॅलट खेळायला आल्यावर अगदी अनपेक्षीतपणे टावरेने लिली - आल्डरमन यांच्या दोन ओव्हरमध्ये कव्हर ड्राईव्हच्या चार बाऊंड्री ठोकल्या! यातला एकही शॉट हाफ व्हॉलीवर मारलेला नव्हता! गुडलेंग्थवर पडलेले बॉल 'ऑन द अप' म्हणतात अशा पद्धतीने त्याने फटकारले होते!

लिली आणि आल्डरमन पार चक्रावले!
याला अचानक काय झालं? आणि नेमके हेच बॉल का? ते देखील गुडलेंग्थवर पडलेले?
गेल्या साडेतीन तासात हाफ व्हॉली देखील ब्लॉक करणार्‍या टावरेने अचानक असा पवित्रा का घ्यावा?

ब्रायन क्लोज बीबीसी रेडीओवरुन कॉमेंट्री करताना म्हणाला,
"He's been out there so long, he must be batting by memory!"

चार बाऊंड्री मारल्यावर बहुधा टावरेचं समाधान झालं असावं! पुन्हा हाफ व्हॉली ब्लॉक करण्याचा आणि प्रत्येक बॉलनंतर स्क्वेअरलेगपर्यंत चक्कर मारण्याचा आपला उद्योग त्याने पुन्हा सुरु केला! पॉल अ‍ॅलटच्या साथीने ३८ रन्स जोडल्यावर अखेर माईक व्हिटनीच्या बॉलवर टेरी आल्डरमनने त्याचा कॅच घेतला! जवळपास पावणेपाच तासात त्याने ६९ रन्स काढल्या होत्या! त्यात ७ बाऊंड्री होत्या!

ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग्ज विलीस (४), अ‍ॅलट (३) आणि बोथम (२) यांनी १३० मध्ये गुंडाळली! मार्टीन केंट (५२) चा अपवाद वगळता इतर कोणालाही काहीच करता आलं नाही! इंग्लंडने १०१ रन्सचा लीड घेतला! दुसर्‍या इनिंग्जमध्ये टेरी आल्डरमनने गूचची दांडी उडवत इंग्लंडला पहिला धक्का दिला. आल्डरमन जोशात आणि जोरदार वेगात बॉलिंग करत होता! जोडीला हरहुन्नरी डेनिस लिली! परंतु या दोघांनाही स्वत:चं डोकं बडवून घेण्यास भाग पाडणारे दोन बॅट्समन विकेटवर होते..

जेफ बॉयकॉट आणि क्रिस टावरे!

एकट्या बॉयकॉट किंवा टावरेला बॅटींग करताना पाहणं हेच अति त्रासदायक असताना असताना दोघांना एकत्रं खेळताना पाहणं म्हणजे निव्वळ अत्याचार होता! मँचेस्टरच्या प्रेक्षकांच्या भाळी हेच लिहीलेलं होतं, त्याला कोण काय करणार? पुढचे अडीच तास प्रेक्षकांच्या दृष्टीने निव्वळ एखाद्या दु:स्वप्नासारखे होते!

अखेर आल्डरमनने बॉयकॉटला एलबीडब्ल्यू करुन प्रेक्षकांची सुटका केली! अडीच तासात बॉयकॉट - टावरे यांनी ७२ रन्सची पार्टनरशीप केली होती! बॉयकॉट परतल्यावर लिली आणि आल्डरमन यांनी गावर, गॅटींग आणि ब्रिअर्ली यांना झटपट गुंडाळल्यामुळे इंग्लंडची १०४ / ५ अशी अवस्था झाली होती. एका बाजूला टावरेने तंबू ठोकला होता! त्याच्या जोडीला आला बोथम!

बरोबर दोन तासांनी माईक व्हिटनीच्या बॉलवर रॉडनी मार्शने बोथमचा कॅच घेतला तेव्हा त्याने १०२ बॉलमध्ये १३ बाऊंड्री आणि सहा सिक्सच्या जोरावर ११८ रन्स फटकावत ऑस्ट्रेलियाची मॅच जिंकण्याची आशा पार धुळीला मिळवली होती! बोथम ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगच्या चिंध्या उडवत असताना टावरे मात्रं पूर्वीइतक्याच मनोभावे बॉलमागून बॉल ब्लॉ़क करत होता! बोथम - टावरे यांनी १५३ रन्सची पार्टनरशीप केली, त्यात टावरेचा वाटा होता २७!

मार्टीन केंटने आल्डरमनच्या बॉलवर टावरेचा कॅच घेतल्यावर ऑस्ट्रेलियाने सुटकेचा नि:श्वास सोडला!
सात तासात २८९ बॉलमध्ये टावरेने ७८ रन्स काढल्या! त्यात चक्कं ३ बाऊंड्री होत्या!

बोथमच्या दुसर्‍या इनिंग्जमधील शतकासाठी आजही ही मॅच ओळखली जाते, परंतु दोन्ही इनिंग्ज मिळून मॅचमध्ये सर्वात जास्तं - १४७ रन्स केल्या होत्या त्या क्रिस टावरेने! फक्तं त्यासाठी दोन्ही इनिंग्ज मिळून त्याने बारा तास बॅटींग केली होती!

अ‍ॅशेस सिरीजनंतर भारताच्या दौर्‍यावर आल्यावरही प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आणि प्रेक्षकांचा अंत पाहण्याचं टावरेचं पुण्यकर्म तितक्याच व्रतस्थपणे सुरु राहिलं!

मँचेस्टरच्या प्रेक्षकांप्रमाणेच बॉयकॉट आणि टावरे यां राहू - केतूंना एकत्रं बॅटींग करताना पाहण्याची ग्रहदशा मुंबईच्या पहिल्याच टेस्टमध्ये वानखेडेवरच्या प्रेक्षकांच्या कपाळी आली होती! तब्बल साडेतीन तास दोघांनी प्रेक्षकांचा अंत पाहत ९२ रन्स जोडल्यावर अखेर किर्ती आझादच्या बॉलवर श्रीकांतने बॉयकॉटचा कॅच घेतला! बॉयकॉट परतल्यावर इंग्लंडची घसरगुंडी उडालेली असताना टावरे एका बाजूला ठामपणे उभा होता! अखेर टी टाईमनंतर तासाभराने दिलीप दोशीच्या बॉलवर रवी शास्त्रीने त्याचा कॅच घेतला! पाच तासात टावरेने ५६ रन्स काढल्या! त्यात ५ बाऊंड्री होत्या! दुसर्‍या इनिंग्जमध्ये गावस्करने कपिलच्या बॉलवर खातं खोलण्यापूर्वीच त्याचा कॅच घेतल्याने सुदैवाने प्रेक्षकांच्या नशिबाला पुन्हा हे अत्याचार आले नाहीत!

बँगलोरच्या दुसर्‍या टेस्टमध्ये त्याने पहिल्या इनिंग्जमध्ये तीन तासात २२ रन्स काढल्या! गावस्करच्या १७२ रन्सच्या अप्रतिम इनिंग्जमुळे मॅच ड्रॉ होणार हे उघड होत! दुसर्‍या इनिंग्जमध्ये टावरेने ३१ रन्स काढल्या त्या दीड तासात! दिल्लीच्या तिसर्‍या टेस्टमध्ये मात्रं टावरे आक्रमक मूडमध्ये होता! साडेसात तासात १८ बाऊंड्रीसह त्याने १४९ रन्स काढल्या होत्या! त्याच्या इतर इनिंग्जच्या तुलनेत जवळपास निम्म्या वेळेत! कलकत्त्याच्या चौथ्या टेस्टमध्ये पहिल्या इनिंग्जमध्ये टावरेला कपिलने चकवलं, पण दुसर्‍या इनिंग्जमध्ये मात्रं २४ रन्स काढण्यासाठी दोन तास बॅटींग करत त्याने वचपा काढलाच! याच टेस्टमध्ये फिल्डींग करायच्या वेळेस गोल्फ खेळताना आढळल्यामुळे जेफ बॉयकॉटची इंग्लंडला रवानगी करण्यात आली होती!

परंतु टावरेच्या अत्याचाराचा खरा कहर झाला तो मद्रासच्या पाचव्या टेस्टमध्ये!

कीथ फ्लेचरने टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा घेतलेला आत्मघातकी निर्णय त्याच्या चांगलाच अंगाशी आला! वेंगसरकर (७१ रिटायर हर्ट), यशपाल शर्मा (१४०) आणि तब्बल पावणे अकरा तास बॅटींग करणारा विश्वनाथ (२२२) यांच्या बॅटींगच्या जोरावर गावस्करने ४८१/४ वर भारताची पहिली इनिंग्ज डिक्लेयर केली!

बॉयकॉटची इंग्लंड्ला परत रवानगी झाल्यामुळे फ्लेचरच्या समोर गूचबरोबर ओपनिंगला कोणाला पाठवायचं हा प्रश्नं होता! गावर, बोथम, गॅटींग, स्वत: फ्लेचर आणि बॉब टेलर कोणीही ओपनिंगला जाण्यास उत्सुक नव्हतं! अखेर ही माळ पडली ती टावरेच्या गळ्यात!

गूच आणि टावरे यांनी सावधपणे इंग्लंडच्या इनिंग्जची सुरवात केली. विकेटवर सेट झाल्यावर गूचने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. दुसर्‍या बाजूने टावरे प्रत्येक बॉल हा केवळ ब्लॉ़क करण्यासाठीच टाकलेला आहे या उदात्त हेतूने खेळत होता! दरवेळी बॉल खेळून झाला की स्क्वेअरलेगला फेरी होत होतीच! तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गूच आणि टावरे यांनी १४४ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप रचली होती! गूच ११७ रन्सवर नॉट आऊट होता आणि टावरे २६!

फरक इतकाच होता की दोघांनीही साडेतीन तास बॅटींग केली होती!

चौथ्या दिवशी सकाळी पहिल्या अर्ध्या तासातच गूच (१२३) आणि फ्लेचर (३) परतल्यावर टावरेने अधिकच एकाग्रपणे आणि काळजीपूर्वक खेळण्यास सुरवात केली! रन्स काढण्याचा कोणताही प्रयत्नं तो करत नव्हता! आलेला प्रत्येक बॉल हा ब्लॉक करणं किंवा सोडून देणं हे एकमेव इतिकर्तव्य असल्याच्या थाटात त्याची बॅटींग सुरु होती!

अखेरीस लंचनंतर दोशीच्या बॉलवर त्याची कट लागली आणि स्लिपमध्ये गावस्करने कॅच घेतला!
मद्रासच्या प्रेक्षकांची एकदाची टावरेच्या तावडीतून सुटका झाली!

साडेपाच तासात २४० बॉलमध्ये त्याने ३५ रन्स काढल्या होत्या! त्यात चक्कं ३ बाऊंड्री होत्या!
टावरेच्या दुर्दैवाने ट्रेव्हर बेलीचा 'विक्रम' मोडण्याची त्याची संधी हुकली होती!

इंग्लिश पत्रकार अ‍ॅलन मॅसी टावरेच्या या इनिंग्जचं वर्णन करताना म्हणतो,
"He appeared to bat under the impression that scoring runsseemed a disagreeable, even vulgar, distraction from the pure task of surviving!"
Then he had this habit – vexing in the extreme – of sauntering halfway to square leg between deliveries, ensuring that, in every bleedin’ respect, the game would proceed at a sub-funeral pace for as long as he was at the wicket!"

टावरेच्या या 'अप्रतिम' खेळीने त्याला सार्थ नाव पडलं!
The Tortoise!


आवडत्या शॉटची प्रॅ़क्टीस करताना टावरे!

१९८२ च्या इंग्लिश मोसमात पुन्हा टावरेची भारताशी गाठ पडली!

लॉर्ड्सच्या पहिल्या टेस्टवर दोन्ही इनिंग्जमध्ये त्याला फारसं काही करता आलं नाही. परंतु ओल्ड ट्रॅफर्डच्या दुसर्‍या टेस्टमध्ये ५७ रन्स काढण्यासाठी त्याने चार तास खाल्लेच! याच टेस्टमध्ये पहिल्या इनिंग्जमध्ये संदीप पाटीलने बॉब विलीसच्या एका ओव्हरमध्ये ६ बाऊंड्री ठोकल्या होत्या!

(१९८३ च्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पुन्हा विलीसला फटकावून काढत मॅच जिंकून परतल्यावर संदीप म्हणाला,

"च्यायला सुन्या, विलीस अजून सुधारला नाही रे!")

ओव्हलच्या तिसर्‍या टेस्ट चौथ्या दिवसाअखेरीस इंग्लंडने दुसर्‍या इनिंग्जमध्ये ३० / १ अशी मजल मारलेली होती. पहिल्या इनिंग्जमध्ये १८४ रन्सचा लीड घेतल्यावर शेवटच्या दिवशी दुसर्‍या इनिंग्जमध्ये फटकेबाजी करुन इंग्लंड भारताला किमान दोन सेशन्स बॅटींग करण्यास भाग पाडेल आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेल अशी बहुतेकांची अपेक्षा होती! पण इंग्लंड्चा कॅप्टन बॉब विलीसच्या मनालाही हा विचार शिवला नाही! लॉर्ड्सची पहिली टेस्ट जिंकल्यावर आणि दुसरी टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे तिसरी टेस्ट ड्रॉ झाली तरी इंग्लंड सिरीज जिंकणार हे निश्चित होतं!

आपल्या निर्णयाचं समर्थन करताना विलीस नंतर म्हणाला,
"This was a Test match, not a bun fight!"

प्रेक्षकांच्या दुर्दैवाने अ‍ॅलन लॅम्बच्या जोडीला नॉट आऊट असलेला दुसरा बॅट्समन होता क्रिस टावरे!
कॅप्टननेच असा ब्लँक चेक दिल्यावर मग काय विचारता?
बॉल ब्लॉक करण्याचं आणि स्क्वेअरलेगला फेरी मारण्याचं व्रत तो मनोभावे पार पाडत राहिला!

मैदानावर जेमतेम हजारभर प्रेक्षक उपस्थित होते. टावरेच्या बॅटींगला.. खरंतर ब्लॉकींगला वैतागलेल्या प्रेक्षकांमधून "boring, boring, boring" अशी दाद मिळत होती! अर्थात टावरेवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता! लंचपर्यंत तो जेमतेम ३० वर पोहोचला होता! लंचनंतर दिलीप दोशीने लॅम्बची दांडी उडवल्यावरही त्याला कसलीही घाई दिसत नव्हती! अचानक...

दिलीप दोशीचा बॉल खेळून झाल्यावर टावरे स्क्वेअरलेगच्या दिशेने आपल्या 'फेरी' वर गेला. पुढचा बॉल खेळण्यासाठी तो पुन्हा क्रीजच्या दिशेने येत असतानाच प्रेक्षकांमधून एक पंधरा वर्षांचा मुलगा धावत मैदानात आला! नेमका काय प्रकार आहे हे कोणाच्याही ध्यानात येण्यापूर्वीच तो पीचजवळ पोहोचलासुद्धा! तिथे पोहोचताच त्याने हातात असलेली एक वस्तू चक्कं क्रीजशेजारीच मांडली...

खुर्ची!

सगळेजण आSS वासून पाहत असतानाच टावरेला उद्देशून तो उद्गारला,
"This is for you! Sit here and relax! Don't get tired walking to square leg!"

डेव्हीड गावरसकट सगळे खो खो हसत सुटले!
अर्थात टावरेवर त्याचा काडीचाही परिणाम झाला नाही तो भाग वेगळा!

भारतापाठोपाठ पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर आला होता. एजबॅस्टनच्या पहिल्या टेस्टमध्ये सव्वाचार तासात ५४ रन्स काढत टावरेने त्यांची योग्य ती 'खातिरदारी' केली होतीच! परंतु त्याची खरी 'करामत' दिसून आली ती लॉर्ड्सच्या दुसर्‍या टेस्टमध्ये!

मोहसीन खानच्या २०० रन्सच्या जोरावर पहिल्या इनिंग्जमध्ये पाकिस्तानने ४२८ रन्स काढल्या. पावसामुळे दुसर्‍या दिवसाचे चार तास फुकट गेल्यावर इम्रानने इनिंग्ज डिक्लेयर करुन इंग्लंडला अचूक खिंडीत गाठलं! अब्दुल कादीर (४), सर्फराज नवाज (३) आणि स्वतः इम्रान (२) यांनी इंग्लडला २२७ मध्ये गुंडाळल्यावर इम्रानने इंग्लंडवर फॉलोऑन लादला!

परंतु तो टावरेला विसरला असावा!

इम्रान आणि सर्फराजच्या पहिल्या दहा ओव्हर्स टावरे आणि त्याच्याबरोबर ओपनिंगला आलेला डेरेक रँडॉल यांनी अत्यंत सावधपणे खेळून काढल्या. ढगाळ वातावरणात बॉल चांगलाच स्विंग आणि सीम होत होता. चाणाक्षं इम्रानच्या नजरेतून हे सुटणं शक्यंच नव्हतं! या ढगाळ वातावरणाचा फायदा घेण्याच्या हेतूने त्याने बॉल ठेवला तो टेस्टमधलं सर्वात कूर्मगती शतक झळकवणार्‍या मुदस्सर नजरच्या हाती!

इम्रानचा हा निर्णय कमालीचा यशस्वी ठरला! मुदस्सरच्या इनकटरवर रँडॉल बोल्ड झाला! आणखीन दोन बॉलनंतर त्याने लॅम्बला एलबीडब्ल्यू केलं! त्याच्ता दुसर्‍या ओव्हरमध्ये वासिम बारीने गावरचा कॅच घेतला! अवघ्या सहा बॉलमध्ये मुदस्सरने इंग्लंडची अवस्था ९ / ३ अशी करुन टाकली!

मुदस्सरचा हा धुमाकूळ दुसर्‍या बाजूने टावरे अगदी संन्यस्तं वृत्तीने पाहत होता!

गावरच्या जागी बोथम बॅटींगला आल्यावरही त्याचं केवळ विकेटवर टिकाव धरण्याचं कार्य पूर्वीइतक्याच प्रामाणिकपणे सुरु राहीलं! अद्याप त्याने एकही रन काढलेली नव्हती! किंबहुना रन काढण्यात त्याला इंट्रेस्टच नव्हता! कोणत्याही परिस्थितीत आऊट व्हायचं नाही हे एकमेव ध्येय त्याने उराशी बाळगलं असावं!

तासाभरापेक्षा जास्त वेळाने - ६७ व्या मिनीटाला अखेर त्याने आपली पहिली रन काढली!

दिवसभरात अनेक वेळा पाऊस आणि बॅड लाईटमुळे खेळात व्यत्यय येत होता. परंतु टावरेच्या अभेद्य बचावावर त्याचा काहीही परिणाम झालेला नव्हता! अखेर बॅड लाईटमुळेच शेवटी दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्याने तीन तासांत २४ रन्स काढल्या होत्या! बोथम त्याच्यापेक्षा तासभर कमी वेळात ५५ वर पोहोचला होता!

शेवटच्या दिवशी इम्रान आणि सर्फराजने आठ ओव्हर्स टाकल्यावर इम्रानने मुदस्सरच्या हाती बॉल सोपवला. पुन्हा एकदा ही चाल यशस्वी ठरली! मुदस्सरचा बॉल हूक करण्याच्या नादात बोथम सर्फराजच्या हातात सापडला! आणखीन जेमतेम वीस मिनीटांनी मुदस्सरने गॅटींगलाही गुंडाळलं! वासिम बारीने त्याचा कॅच घेतला. इंग्लंड १३२ / ५!

आणि टावरे?

आदल्या दिवशी २४ वर नॉटआऊट असलेला टावरे अद्यापही २४ वरच होता!
सकाळी खेळ सुरु झाल्यापासून तासाभरात त्याने एकही रन काढली नव्हती! मोजून ७० मिनीटं!

त्याच्या खात्यावर आणखीन एका विक्रमाची नोंद झाली!
एकाच इनिंगमध्ये दोन वेगवेगळ्या वेळी तासाभरात एकही रन न काढण्याच विक्रम!

डेरेक प्रिंगल खेळायला आल्यावर अखेर टावरेने मुदस्सरला कव्हर ड्राईव्हची बाऊंड्री मारत सकाळपासूनची पहिली रन काढली! इंग्लंडची इनिंग्ज गुंडाळण्याच्या हेतूने इम्रानने निकराचा हल्ला चढवला. परंतु प्रिंगलने मुदस्सर, सर्फराज, कादीर आणि स्वतः इम्रान यांचा सावधपणे मुकाबला करत तासाभरापेक्षा जास्तं वेळ टावरेला साथ दिली. टावरे आणि प्रिंगल यांनी ३९ रन्सची पार्टनरशीप केली.

दरम्यान...

तब्बल ३५२ मिनीटं आणि २३६ बॉल खेळल्यावर टावरेने अर्धशतक पूर्ण केलं!
फर्स्ट क्लास क्रिकेतमधलं दुसर्‍या क्रमांमाचं कूर्मगती अर्धशतक!
ट्रेव्हर बेलीचा 'विक्रम' मात्रं फक्तं पाच मिनीटांसाठी पुन्हा एकदा त्याच्या हातून निसटला होता!

अब्दुल कादीरने प्रिंगलला आणि मुदस्सरने इयन ग्रेगला गुंडाळल्यावर टावरेने अचानक आक्रमक पवित्रा घेतला! पुढच्या पाऊण तासात त्याने चार बाऊंड्री ठोकत ३० रन्स फटकावल्या! अखेर इम्रानच्या बॉलवर स्लिपमध्ये जावेद मियांदादने त्याचा कॅच घेतला तेव्हा इंग्लंडला इनिंग्जच्या पराभवातून वाचवण्यात तो यशस्वी झाला होता!

४०६ मिनीटात २७७ बॉलमध्ये टावरेने ८२ रन्स काढल्या! त्यात ६ बाऊंड्री होत्या!

टावरेची ही मॅरेथॉन इनिंग्ज इंग्लंडचा पराभव मात्रं टाळू शकली नाही! पाकिस्तानला विजयासाठी आवश्यक असलेल्या ७७ रन्स मोहसिन खान आणि जावेद मियांदादने झटपट फटकावून काढल्या!

१९८२ चा इंग्लिश मोसम संपल्यावर विलीसच्याच नेतृत्वात इंग्लंडने अ‍ॅशेस सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाची वाट धरली! टावरेचा हा पहिलाच ऑस्ट्रेलियन दौरा होता. या दौर्‍यावर येताना त्याने आपल्या बायकोला - व्हेनेसाला बरोबर आणलं होतं! तिला विमानप्रवासाची प्रचंड भीती वाटत असे! संपूर्ण दौर्‍यात प्रत्येक विमानप्रवासात तो सतत तिच्याशी काही ना काही बोलत तिचं लक्षं गुंतवून ठेवत होता!

बॉब विलीस म्हणतो,
"He clearly lives every moment with her on a plane and comes off the flight exhausted. Add to that the fact that he finds Test cricket a great mental strain and his state of mind can be readily imagined."

पर्थच्या पहिल्या टेस्टमध्येच टावरे ही काय चीज आहे याचा ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना 'अनुभव' आला!

ग्रेग चॅपलने टॉस जिंकून पर्थच्या विकेटचा फायदा उठवण्यासाठी फिल्डींगचा निर्णय घेतला. लिलीच्या बॉलवर जॉन डायसनने जेफ कूकचा कॅच घेतल्यावर चॅपलचा हा निर्णय योग्यं ठरण्याची चिन्हं दिसत होती, परंतु डेव्हीड गावरने चॅपलच्या या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. अडीच तासात ९८ बॉलमध्ये ९ बाऊंड्री ठोकत त्याने ७२ रन्स फटकावल्या! अखेर टेरी आल्डरमनच्या बॉलवर डायसननेच स्क्वेअरलेगला त्याचा अफलातून कॅच घेतला! दुसर्‍या विकेटसाठी त्याने ९५ रन्सची पार्टनरशीप केली होती!

त्यात क्रिस टावरेच्या १८ रन्स होत्या!

ऑस्ट्रेलियन बॉलर्स आणि फिल्डर्सना टावरे हा किती त्रासदायक प्रकार आहे याचा चांगला अनुभव होता. ओल्ड ट्रॅफर्डवरची दोन इनिंग्जमधली त्याची बारा तासाची बॅटींग ते विसरलेले नव्हते! त्याच्या कमालीच्या कूर्मगती बॅटींगला उद्देशून स्लेजिंगचं हत्यार त्यांनी उपसलं नसतं तरच नवल! प्रत्येक बॉलर आणि इतर फिल्डर्सनीही त्याची लय(?) बिघडवण्याचा बराच प्रयत्न करुन पाहिला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही!

कमालीच्या एकाग्रतेने बॉल ब्लॉक करण्याचं त्याचं व्रत सुरुच होतं!
दरवेळी बॉल खेळून झाल्यावर स्क्वेअरलेगला होणारी प्रदक्षिणाही चुकत नव्हतीच!

पण इतक्यावरच समाधान मानलं तर तो टावरे कसला?

पहिल्या दिवसाचा शेवटचा तासभर तो ६६ वर नॉटआऊट होता....आणि दुसर्‍या दिवसाचा पहिला अर्धा तासही! दीड तासाने अखेर जेव्हा त्याने पहिली रन काढली तेव्हा प्रेक्षकांनी उस्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला!

अखेरीस लंचपूर्वी जेमतेम दहा मिनीटं ब्रूस यार्डलीला स्वीप करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि लेग स्लिपमध्ये किम ह्यूजने त्याचा कॅच घेतला! पावणे आठ तासात ३३७ बॉलमध्ये त्याने ८९ रन्स काढल्या होत्या! त्यात ९ बाऊंड्री होत्या!

(याच मॅचच्या दरम्यान मैदानात धावून आलेल्या दंगेखोर प्रेक्षकांपैकी गॅरी डॉनिसनने टेरी आल्डरमनला मागून येऊन आवळण्याचा प्रयत्न केला होता! भडकलेल्या आल्डरमनने भर मैदानात त्याचा पाठलाग करुन त्याला खाली पाडलं खरं, पण त्या भानगडीत त्याचा स्वतःचा खांदा निखळला!)

इंग्लंडने पहिल्या इनिंग्जमध्ये ४११ रन्स केल्यावर ऑस्ट्रेलियाने तोडीस तोड जबाब देत ४२४ रन्स केल्या त्या मुख्यतः डायसन (५२), किम ह्यूज (६२), डेव्हीड हूक्स (५६), लॉसन (५०) आणि मुख्य म्हणजे ग्रेग चॅपल (११७) यांच्या फटकेबाजीमुळे! चौथ्या दिवशी लंचनंतर इंग्लंडच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये टावरेने आणखीन एक कारनामा केला....

आपली पहिली रन काढण्यासाठी त्याने तासाभरापेक्षा जास्तं - ६३ मिनीटं वेळ घेतला!
एकाच टेस्टच्या दोन इनिंग्जमध्ये तासभर एकही रन न काढण्याचा 'विक्रम' त्याच्या नावावर जमा झाला!
त्यातल्या त्यात पर्थच्या प्रेक्षकांचं सुदैव म्हणजे हा 'पराक्रम त्याने दोन वेगवेगळ्या इनिंग्जमध्ये गाजवला!

लॉर्डस् वर एकाच इनिंग्जमध्ये दोन वेळा हे पाहण्याचं दुर्भाग्य प्रेक्षकांच्या माथी आलं होतं!

टावरेच्या या पराक्रमाने तर तो ऑस्ट्रेलियन खेळाडूच काय, पण प्रेक्षकांच्याही तिरस्काराचा विषय ठरला! पुढच्या प्रत्येक टेस्टमध्ये तो खेळायला आल्याबरोबर प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवण्याचं सत्रं आरंभलं!

ब्रिस्बेनच्या दुसर्‍या टेस्टमध्ये पहिल्या इनिंग्जमध्ये आऊट होण्यापूर्वी त्याने पाऊण तासात १ रन काढली होती! परंतु दुसर्‍या इनिंग्जमध्ये १३ रन्ससाठी दोन तास बॅटींग करुन त्याने दणका दिलाच! अ‍ॅडलेडचे प्रेक्षक मात्रं खरोखरच सुदैवी ठरले! दोन्ही इनिंग्जमध्ये मिळून फक्तं वीस मिनीटात त्याला गाशा गुंडाळावा लागला होता!

चौथी टेस्ट होती ती मेलबर्नला!

या टेस्टमध्ये कूक आणि ग्रॅहॅम फौलर असे दोन ओपनिंग बॅट्समन असल्याने टावरेला वन डाऊन येण्याची संधी मिळाली. सुरवातीचा अर्धा - पाऊण तास सेट होण्यात घालवल्यावर आणि पहिल्या दोन तासात वीस रन्स काढल्यावर मग मात्रं त्याने अचानक रुद्रावतार धारण केला! कोणाच्या ध्यानीमनी नसताना थॉमसन, रॉडनी हॉग, लॉसन आणि विशेषतः ब्रूस यार्डली यांच्यावर अनपेक्षीत हल्ला चढवला! ऑस्ट्रेलियन बॉलर्स आणि फिल्डर्सच काय पण प्रेक्षक आणि खुद्दं इंग्लिश कॅप्टन बॉब विलीसलाही आश्चर्याचा धक्का बसला! जेफ थॉमसनच्या बॉलवर अखेर यार्डलीने त्याचा कॅच घेतला तेव्हा चार तासात त्याने १५ बाऊंड्रीसह ८९ रन्स फटकावल्या होत्या!

मनात आणलं तर आपणही आक्रमक खेळू शकतो हे बहुधा त्याला सिद्ध करायचं असावं!
एकच प्रॉब्लेम होता!
फक्तं या एका इनिंग्जपुरतंच आक्रमक खेळण्याचं त्याच्या मनाने घेतलं होतं!

याच टेस्टच्या शेवटच्या इनिंग्जमध्ये जिंकण्यासाठी २९२ रन्सचं लक्ष्यं असताना अ‍ॅलन बोर्डर आणि जेफ थॉमसन यांनी शेवटच्या विकेटसाठी ७० रन्सची पार्टनरशीप करुन इंग्लंडची हवा पार तंग करुन टाकली होती! अखेर बोथमच्या बॉलवर मिलरने थॉमसनचा कॅच घेतल्यावर अवघ्या ३ रन्सनी इंग्लंडने मॅच जिंकली!

सिडनीच्या शेवटच्या टेस्टमध्ये मात्रं टावरेच्या हाती फारसं काहीच न लागल्याने सिडनीच्या प्रेक्षकांची त्याच्या तावडीतून सुटका झाली!

ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांवर टावरेच्या पर्थच्या कूर्मगती बॅटींगचा इतका परिणाम झाला होता की त्याचं नुसतं नाव काढलं तरी अनेकांचा तीळपापड होत असे!

प्रसिद्ध क्रिकेट लेखक आणि समिक्षक गिडन हेग म्हणतो,
"Nearly 30 years since his only tour of Australia, mention of Tavaré still occasions winces and groans. Despite its continental lilt, his name translates into Australian as a very British brand of obduracy, that Trevor Baileyesque quality of making every ditch a last on!"

ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या सुदैवाने टावरे पुन्हा कधीच ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आला नाही!

१९८३ च्या इंग्लिश मोसमात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये त्याने ओव्हलवर पाच तासात शतक झळकावलं! लीड्सच्या दुसर्‍या टेस्टमध्येही त्याने पाच तासच बॅटींग केली पण रन्स काढल्या त्या फक्तं ६९! लॉर्ड्सला साडेतीन तासात अर्धशतक झळकावल्यावर मार्टीन क्रोने त्याची दांडी उडवली तेव्हा न्यूझीलंडचे खेळाडू आणि लॉर्ड्सवरचे प्रेक्षक, दोघांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला असावा!

१९८४ मध्ये श्रीलंकेचा संघ प्रथमच इंग्लंडच्या दौर्‍यावर आला होता. सिद्धार्थ वेट्टीमुनी (१९०), दुलिप मेंडीस (१११) आणि अर्जुना रणतुंगा (८४) यांच्यामुळे पहिल्या इनिंग्जमध्ये श्रीलंकेने ४९१ / ७ पर्यंत मजल मारली! अखेर तिसर्‍या दिवशी सकाळी तासभर खेळून काढल्यावर दुलिप मेंडीसने लंकेची इनिंग्ज डिक्लेयर केली!

ग्रॅहॅम फौलर आणि क्रिस ब्रॉड यांनी इंग्लंडला ४९ रन्सची ओपनिंग करुन दिली. लंचच्या ठोक्याला फौलर आऊट झाल्यावर लंचनंतर खेळायला आला टावरे! क्रिस ब्रॉड एका बाजूने कमालीच्या संथगतीने बॅटींग करत होता. जोडीला टावरे आल्यावर लॉर्ड्सवरच्या प्रेक्षकांचा वामकुक्षीचा मार्ग मोकळा झाला!

टावरेने त्यांना अजिबात निराश केलं नाही!
दोन तासांपेक्षा जास्तं वेळ खेळत ९५ बॉलमध्ये त्याने १४ रन्स काढल्या!

वास्तविक ना श्रीलंकेची बॉलिंग धोकादायक होती ना लॉर्ड्सची विकेट बॅटींगसाठी कठीण होती. परंतु टावरेला रन्स काढण्यात इंट्रेस्टच नव्हता! विकेटवर उभं राहणं आणि आऊट न होता खेळत राहणं हे आद्यकर्तव्यं आणि रन्स काढणं हे दुय्यम अशी मानसिकता असलेल्या बॅट्समनकडून कसली अपेक्षा करता येणार होती?

टावरेच्या या कामगिरीने मात्रं इंग्लंडच्या सिलेक्टर्सना त्याला संघात ठेवणं अशक्यं करुन टाकलं होतं!
अपेक्षेप्रमाणे त्यांनी त्याला डच्चू दिलाच!

पॉल डाऊनटन म्हणतो,
"Tavaré managed to bat himself out of the England side. It was his last Test for five years and he couldn't get it off the square!"

अनेक समिक्षकांच्या मते मात्रं टावरेवर होत असलेली टीका अनाठायी आहे. इंग्लडच्या संघात गूच, गावर, लॅम्ब, बोथम, गॅटींग असे सगळेच आक्रमक आणि फटकेबाज बॅट्समन असताना एका बाजूने कोणीतरी नांगर टाकून उभं राहण्याची (शीट अँकर) आवश्यकता होती. कौंटीत आणि वन डे स्पर्धेत आक्रमक फटकेबाजी करणार्‍या टावरेवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्याने ती इमानेइतबारे पार पाडली असं बहुतेक समिक्षकांचं मत आहे! इतर कोणत्याही बॅट्समनप्रमाणे सर्व शॉट्स खेळण्याची त्याची कुवत होती, फक्तं त्याला नेमून दिलेली भूमिका होती ती शीट अँकरची!

इयन बोथमने टावरेच्या बॅटींगचं पूर्णपणे समर्थन केलं आहे! आपल्या आत्मचरित्रात बोथम म्हणतो,
"He stuck to his task brilliantly and, no matter what his critics said, there were never any complaints from inside the dressing room."

एक मात्रं खरं....

टावरेचं बॅटींगचं तंत्रं, त्याचा डिफेन्स आणि तासन् तास एकाग्रपणे खेळण्याची क्षमता अफाट होती यात शंका नाही! इंग्लंडला अनेकदा त्याच्या या गुणांचा उपयोग झाला!

इंग्लिश पत्रकार सायमन ह्यूज म्हणतो,
"No-one who saw Chris Tavare bat will forget it in a hurry, even after therapy! If David Steele was the bank clerk who went to war, Tavare was the schoolteacher who took arms. Tall, angular and splayfooted, a thin moustache sketched on his top lip, he would walk to the crease like a stork approaching a watering hole full of crocs. Once there though, he began not to bat but to set, concrete drying under the sun. His principal movement was between the stumps and square leg, to where he would walk, gingerly, after every ball!"

ऑस्ट्रेलियातील बहुतेक पत्रकार आणि प्रेक्षकांची अगदी विरुद्ध भावना होती!

टावरेचं वर्णन करताना एका पत्रकाराने उद्गार काढले,
"He is the most extraordinary batsman to appear for England in the last 30 years, the motionless phenomenon..., That is Cris Tavare!"

ट्रेव्हर बेलीच्या 'द बेली ब्लॉक' चा खराखुरा वारसदार क्रिस टावरेच!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ह्या बेली आणि टावरेसारख्या फलंदाजांनीच टेस्ट क्रिकेटला मरणकळा आणली.
ख्रिस टावरेचा भारताच्या दौर्‍यावरचा खेळ पहाण्याचं दुर्भाग्य मला लाभलेलं आहे.
तेंव्हाही त्याला खच्चून शिव्या दिल्याचं अजून स्मरणात आहे.
एकदम भें*द भिकार*ट बॅट्समन होता! (योगयोगाने दोन्ही शब्दांत चो सायलंट आहे!!) Smile
साला आमचा वेळ फुकट! त्याबदल्यात अभ्यास केला असता, चार मार्क जास्त मिळाले असते तर तेही नाही!!!
साला नरकात जावो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमाला वाचतो आहे. दरवेळीच उत्तम लिखाण असं लिहिण्याची गरज वाटत नाही. इतर वाचकांचंही तसंच होत असावं बहुधा. तेव्हा तुम्ही जरूर लिहीत राहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0