फुसके बार – ०२ जानेवारी २०१६

फुसके बार – ०२ जानेवारी २०१६

१) शेअर बाजाराबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यानांमध्ये सांगितले जाणारे किस्से
चंद्रशेखर ठाकूर हे शेअर बाजाराबद्दलचे मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध तज्ज्ञ, त्यांच्या व्याख्यानांमधून ते अनेक किस्से सांगत उपस्थितांचे मनोरंजन करत उपयोगी माहितीदेखील सांगतात.

त्यांच्या एका व्याख्यानानिमित्त भोपाळला दिलेल्या भेटीच्या वेळचा एक किस्सा त्यांनी सांगितला. तेथे एका चहाच्या टपरीवाल्याकडे कोणत्या तरी बॅंकेच्या सौजन्याने असा फलक लावलेला पाहिला. त्यांनी त्याला त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला की त्या बॅंकेचे कर्ज केव्हाच फेडलेले आहे. मात्र माझ्याकडे उधारीवर पैसे मागणारे अनेकजण आहेत. त्यांना कटवण्यासाठी मी त्या फलकाचा आजही उपयोग करतो की माझ्यावरच कर्ज असताना मी तुला उधार कोठून देऊ?

अगदी सामान्यातली सामान्य व्यक्तीही कशी हुशार असू शकते याचे हे उदाहरण.

२) किल्लारीला झालेल्या भूकंपाच्या वेळची ही आठवण. माझ्या एका मित्राचा तेथे असलेला तीन फुटी जाडीच्या भिंती असलेला दगडी वाडा पाडून त्यांनी आधुनिक पद्धतीचा बंगला बांधला होता. त्याची वास्तुशांत केली आणि त्यानंतर एकाच महिन्यात भूकंप होऊन नव्याने बांधलेला हा बंगला जमीनदोस्त झाला.

ते या नैसर्गिक आपत्तीने खचले तर नाहीतच. उलट त्यानंतरही त्यांनी हिमतीने अनेक इमले बांधले. अशाच का इमल्याची गोष्ट कदाचित येत्या चार-पाच महिन्यात सविस्तार सांगू शकेन. त्या सुमारास त्यांनी हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाला जाईल.

३) आज माझ्या मित्राच्या एका पोस्टमध्ये त्यांच्या देशविदेशातील प्रवासाच्या भरगच्च कार्यक्रमातूनही ते त्यांची मिसळीची आवड कशी जपतात याबद्दल लिहिले आहे.

त्यावरून आठवले, फलटणला एके ठिकाणी (मला वाटते श्रीराम मिसळ) मिसळ खायला थांबलेलो असताना ज्यांना पहिल्या घासाचा आस्वाद घेतल्याक्षणीच त्यात मीठ किंवा साखर कमी आहे असे वाटते, त्यांच्यापैकी एकाने थोडे मीठ मागितले. तर मालक म्हणाला, काय राव, जरा दोन-तीन घास जाऊ दे पोटात, (नाकातून ओठावर आले की) मीठ बरोबर वाटेल. आता वेगळे मीठ घेतले तर नंतर खारट लागेल.

४) सोलापुरातल्या शेंगदाण्याच्या चटणीचे प्रस्थ जरा जास्तच झालेले आहे. अशा पदार्थांचे ब्रॅंडिंग होऊन उद्योजकांना त्याचा योग्य मोबदला मिळावा ही अपेक्षा रास्तच आहे.

मात्र, सध्या अशा चटणीला लाल रंग दिसण्याच्या ग्राहकांच्या हव्यासापोटी त्यात रंग घालणे, चटणीला तेल सुटल्यासारखे दिसावे म्हणून ती व्यवस्थित न कुटता त्यात थेट तेलच घालणे असेही प्रकार सर्रास चालू आहेत.

५) पुण्यात दरदिवसाआड पाणी येते. त्यामुळे पाण्याअभावी अनेक महाविद्यालयांमधल्या मुता-यांची अवस्था अतिशय गंभीर झालेली आहे.

त्यामुळे काही विद्यार्थी विशेषत: मुली शेजारच्या रेस्टॉरंट्समध्ये जाऊन त्या भयंकर वासापासून थोडीफार सुटका करून घेतात. हे विद्यार्थी यांचे एरवीचे नेहमीचे गि-हाइक असल्यामुळे अजून तरी रेस्टॉरंटमालकांच्या चेह-यावर आठ्या दिसत नाहीत.

पण हेच कायम राहिले तर लवकरच ‘एक कप कॉफीवर किंवा अमुक रकमेच्या बिलावर प्रसाधनगृहाचा वापर मोफत’ अशी पाटी दिसेल यात शंका नाही.

६) साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून येण्यापूर्वी श्रीपाल सबनीस हे फारसे परिचित नव्हते. निवडणुकीनंतर त्यांची ग्रंथसंपदा दाखवल्यावर एवढे लिहूनही ते आपल्याला माहित कसे नव्हते याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

आज पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना मात्र ते ज्या आवेशाने बोलत होते, त्यावरून त्यांचे नक्की काय बिनसलेले आहे हे कळायला मार्ग नव्हता. पंतप्रधानांच्या पाकिस्तानला अचानक दिलेल्या भेटीवरून बोलताना तर ते या विषयात किती कच्चे आहेत याचीच त्यांनी प्रचिती दिली. शिवाय मोदींना गोध्रा दंगलीबद्दल ते कलंकीत समजतात, त्यांच्या त्या मतात फरक पडलेला नाही असे ते म्हणाले. मात्र मोदींनी पंतप्रधान झाल्यावर जे चांगले काम केले आहे ते पाहणे महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.

याबाबत लोकसत्तातील वृत्त हे फारच मवाळपणे दिले आहे तर महाराष्ट्र टाइम्समधील वृत्तात त्यांचे प्रत्यक्ष शब्द दिले आहेत. नंतर टीव्हीवर पाहतानाही त्यांच्या भाषेतला आक्रमकपणा दिसला. या सर्वाची आवश्यकता होती का? की जाहिरपणे बोलताना ते असेच वाहवत जातात? आता त्यांच्या विधानांवरची प्रतिक्रिया देतानाही त्यांची यात काहीच चूक नाही असे ते आग्रहाने सांगत आहेत. पंतप्रधान मोदींचा वारंवार एकेरी उल्लेख करण्याबद्दलही त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नाही.

तेव्हा सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची ही त्यांची नेहमीचीच पद्धत आहे की काय हे त्यांच्या पुढील वक्तव्यांवरूनही कळू शकेल. मोदींना तत्वत:च नव्हे अगदी कडवा विरोध असला, बोलण्यात रांगडेपणा असला तरी समजू शकतो, मात्र आजची त्यांची वक्तव्ये साहित्य संमलनाध्यक्षपदाबरोबर जी जबाबदारी येते त्यादृष्टीने फार आश्वासक वाटत नाहीत हे निश्चित.

७) कट्यारपाठोपाठ नटसम्राटमध्येही लेखनाच्याबाबतीत भरपूर अभिव्यक्तिस्वातंत्र्य घेतलेले दिसते. तेव्हा पुन्हा एकदा मूळ नाटकाची या सिनेमाशी तुलना करू नका असे सांगायलाही मोकळे. आता बेलवलकरांचा एक मित्र दाखवावा लागणे म्हणजे तत्सम बदल दाखवणे याचे कारण आजच्या काळात त्यांच्या एकट्यावर सिनेमा बेतणे शक्य नव्हते हे आहे की काय असे वाटते.

बाकी या सिनेमाचे पैसे दुष्काळग्रस्तांना देणार आहेत, या एका कारणासाठी हा सिनेमा पाहण्याची गरज नाही.

हवे तसे अभिव्यक्तीस्वातंत्र्य घेणा-यांचे आम्ही काही देणे लागत नाही. मूळ नाटकातील बेलवलकरांच्या भुमिकेचे इतर पात्रांच्या मानाने असलेले वेटेज व या सिनेमातले वेटेज यांची तुलना करा, म्हणजे हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य कोणत्या थराला गेले अहे याची कल्पना येईल.

वर सिनेमा कसाही असो, त्या निमित्ताने नव्या पिढीला या नाटकाची व शिरवाडकरांच्या प्रतिभेची ओळख तरी होईल हा युक्तिवाद आहेच की.

यातला धोका असा की यापुढेही मागे गाजलेल्या कलाकृतींना नाना, विक्रम गोखले यांचा मुलामा देत अशीच तोडमोड करण्याचा परवाना या पब्लिकला मिळेल असे वाटते.

मी अजूनही वाट पाहतो आहे की त्याकाळातल्या या म्हाता-याचे वर्णन आजचा कोणी त्याच्या मेडिकल ‘कंडिशन’च्या आधारावर वा मानसशास्त्रीयदृष्ट्या करतो का? नाटकातल्या त्या काळातल्या पात्राचे वर्णन माझ्या लेखी भ्रमिष्ट असे होते व ते तेव्हाही अनेकांना आवडत नसे.

एखादे नाटक का गाजले असा नवीन पिढीला भविष्यात प्रश्न पडावा अशांपैकी नटसम्राट हे बोजड नाटक आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

महाराष्ट्र टाइम्समधील या सिनेमाच्या परीक्षणामध्ये मारलेल्या काही कोलांटउड्या:

“या नव्या व्यक्तिरेखा घेताना दिग्दर्शकाने विठोबा, राजा यांसारख्या काही मूळ संहितेत असलेल्या व्यक्तिरेखांची उंची कमी केली आहे. हा चित्रपट नाटकावर बेतला असला तरी तात्यासाहेबांनी लिहिलेला 'नटसम्राट' जसाच्या तसा मांडण्याचा दिग्दर्शकाचा अट्टहास नाही. पण नाट्यानुभवाशी बरोबरी साधण्याचा.. ती मानसिकता पकडण्याचा प्रामाणिक प्रयत्न यात केला आहे. चित्रपटासाठी आवश्यक वाटणारं स्वातंत्र्य घेत यात काही प्रसंग नव्याने दिसतात. पण काहीवेळा त्याची नेमकी गरज लक्षात येत नाही.”

यावरून काही अर्थबोध होतो का?

+++++++++++++

फुसके बार ही मालिका मी पोस्ट केलेल्या ठिकाणाहून हलवू नये अशी विनंती मी संपादकांना अनेकदा केलेली आहे. तरीही ते या पोस्ट्स हलवून फुसके बारच्या इतर पोस्टबरोबर एकाखाली एक अशा पद्धतीने जोडत आहेत. ज्यांची इच्छा आहे त्या वाचकांनाही या पोस्ट वाचण्यात रस राहणार नाही हेदेखील मी त्यांना कळवलेले आहे. शिवाय ही एक प्रकारची सेंसॉरशिप असल्याचेही मी त्यांना कळवले आहे. एकीकडे ते सांगतात की पोस्ट्सची प्रतवारी ते करत नाहीत आणि दुसरीकडे मात्र असा प्रकार चालू आहे.

परंतु संपादकांच्या द्ृष्टीने या पोस्ट्स म्हणजे निव्वळ खरडणे असल्यामुळे त्यांना वाचनव्हॅल्यु नाही. त्यामुळे त्यांना इतरत्र हलवून एकत्र करण्याशिवाय पर्याय नाही. आता पुन्हा या पोस्ट्स स्वतंत्रपणे पोस्टकेल्यास त्या अप्रकाशित करू असे त्यांनी सांगितले आहे.

या सर्व बाबतींमध्ये त्यांचा हक्क असल्यामुळे त्याबाबतीत मी काही करू शकत नाही. त्यामुळे या पोस्ट्स यापुढे आपल्यासमोर येऊ शकतील की नाही किंवा नक्की काय होईल, हे सांगता येत नाही.

त्याचप्रमाणे या हलवाहलवीला माझा विरोध असल्यामुळे (जरी त्याने काही फरक पडत नसला तरी) मी येथील कमेंट्सवर काही प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. तेव्हा वाचकांनी काही प्रतिक्रिया न देता हा मजकूर निव्वळ वाचला तरी ते माझ्या द्ृष्टीने पुरेसे आहे. तसेही अशा पद्धतीने अडगळीत टाकल्या गेलेल्या खरडलेल्या मजकुराकडेही वाचकांचे लक्ष जातेच याची संपादकांना खात्री आहे - आवडते की नाही हा मुद्दा भलताच.

field_vote: 
0
No votes yet