संक्रांती आणि पतंगबाज

निरभ्र आकाश, थंडगार झुळझुळ वाहणारे वारे, आणखीन काय पाहिजे पतंग उडविण्यासाठी. देशातल्या इतर भागांप्रमाणे महाराष्ट्रात हि संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविल्या जातात.

आम्हा दिल्लीकरांचे मात्र सर्वच इतरांपेक्षा वेगळे असते. इथे उन्हाळ्याच्या सुट्या आणि पावसाळा म्हणजे पतंग उडविण्याचा मौसम. या मौसमात अधिकांश वेळ आकाशात ढग असतात. कधीही अचानक पाऊस सुरु होतो, पतंग आणि मांजा दोन्ही खराब होतात. तर कधी अचानक सुसाट वारे वाहू लागतात. अश्या वेळी उस्ताद पतंगबाज्यांच्या मोठ्या-मोठ्या पतांगाही आकाशात तग धरू शकत नाही, जमिनीवर निष्प्राण होऊन पाडतात. कधी-कधी एकदम घुम्म मौसम. नाममात्र वारही नाही. अश्या घुम्म वेळी छोट्या-मोठ्या पतंगांना आकाशात उड्डाण भरणे अशक्यच. अश्या पावसाळी मौसमात उस्ताद पतंगबाजाच तग धरू शकतात. इथे पतंग पेच लढविण्यासाठीच उडवितात. पतंगबाजाचा D-Day अर्थात १५ ऑगस्टला तर सतत ‘आई बो काटा’ हि विजयी आरोळी सकाळपासूनच वातावरणात दुमदुमू लागते.

माझे बालपण जुन्या दिल्लीतच गेले. १९८०च्या पूर्वी आम्ही ज्या वाड्यात भाड्यावर राहायचो तो पूर्वाभिमुख होता. मध्ये बेडा (आंगण) आणि तिन्ही बाजूला बांधकाम. भलीमोठी गच्ची होती. पावसाळ्यात वारे हि पूर्वेचे असतात. त्यामुळे भरपूर पतंगा लुटायला मिळायच्या. पतंगा विकत घेण्याची गरज पडत नसे. या शिवाय गच्चीच्या मागे काबुली गेटची सरकारी शाळा होती. शाळेच्या गच्चीवरच्या पतंगा हि आमच्या नशिबी.

काबुली गेट वरून आठवले. पूर्वी शाळेच्या जागी मैदान होते व पुढे काबुली दरवाजा . पण १८५७च्या क्रांतीत, अंग्रेजांच्या तोफांच्या मार्याने हा दरवाजा नष्ट झाला. इथे भयंकर युद्ध झाले होते. हजारोंच्या संख्येने दोन्ही पक्षांचे सैनिक आणि अधिकारी शहीद झाले होते. काहींच्या मते आज हि अमावस्येच्या घुप्प रात्रीत घोड्यांच्या टापांचे आवाज आणि सैनिकांचे विव्हळणे ऐकू येतात. आमच्या राहत्या खोलीची खिडकी शाळेच्या बाजूला होती. कधी हि काही ऐकू आले नाही. फक्त हिवाळी रात्रीत शाळेची इमारत माकडांची झोपण्याची जागा होत असेल. त्यांच्या माकड चेष्टांमुळे (अर्थात तोडफोड, दंगा-मस्ती) लोकांना असे भास होत असावे. असो.

मोठे पतंगबाज शर्त(पण) लाऊनच पेच लढवितात. किमान ७०-८० गज पतंग उंच उडल्यावरच पेच लागत असे. अशी कटून आलेली पतंग लुटायला मिळाली कि किमान १०० गज मांजा मुफ्त मिळत असे. आमच्या सारख्यांच्या पूर्ण सीजन साठी पुरेसा असे. हा मांजा अत्यंत मजबूत हि असायचा. नेहमीच बोटे कापल्या जायची. तरीही त्या साठी दररोज संध्याकाळी आकाशात टक लाऊन पाहत असू, कुठे उंच आकाशात तरंगत जाणारी कटलेली पतंग दिसते आहे का?

दिल्लीत पतंग उडविणे हि जिगरीचे काम. पतंग उडविण्यासाठी पहिले पतंगाचे कन्ने बांधावे लागतात. नंतर कन्न्याला मांजा बांधताना एक गाढ मारावी लागते. हीच ती कमजोर कडी. जवळ-जवळ घरे असल्यामुळे एकाच वेळी आकाश्यात भरपूर पतंगा उडताना दिसतात. पतंग उडविणार्या पतंगबाज्यांची नजर बाज पक्षी सारखीच असते. पतंगबाजांची आकाशात उडत असलेली पतंग, बाज पक्षी प्रमाणे खाली घेप घेणार आणि नुकत्याच आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न करणार्या पतंगाचे कन्ने कापणार हे ठरलेलेच. अश्यावेळी संधी साधून, चौफेर पाहून, ५-१० सेकंदात पतंग आकाशात ४०-५० गज उंच उडवावी लागत असे. एकदा कि पतंग ५०-६० गज उंच उडाली कि मग चिंता नसे.

मी पेच लढविण्याचा एकच नियम पाळीत असे. दुसर्याला पेच साठी लालच देणे. पण स्वत: त्याच्या जाळ्यात अडकायचे नाही. पेच लागताना ज्या दिशेला वारा वाहतो आहे, ठीक मध्य भागी पतंग ठेवायची, मग मांजा थोडा कमजोर असेल तरी हि ९०% दुसर्यांची पतंग कापण्यात यश मिळणारच. पेच लागताना जर पतंग वार्याच्या दिशेला नसेल तर ९०% टक्के पतंग कापल्या जाईलच. अर्थातच नेहमीच हे जमत असे नाही. शिवाय दुसर्याचा मांजा जास्त मजबूत आणि पतंग मोठी असेल तर त्याचा फायदा त्याला मिळणारच.

दिल्लीचे पतंगबाज देशात मशहूर आहेतच. पण गुजरातचे पतंगबाज हि काही कमी नाही. दिल्लीकर पतंगबाज्यांशी टक्कर घेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. संक्रांतीच्या दिवशी तिथे हि दिल्ली सारखेच पेच लढविल्या जातात. पण आपले मुंबईकर मात्र पतंगबाजीत फिसड्डीच. गज्जू भाई सहज त्यांच्या पतंगा कापतात. एक नवखा पतंगबाज गुजराती उस्तादकडून पतंगबाजीचे धडे घेऊन मुंबईत आला आणि इथल्या भल्या-भल्या पतंगबाज्यांच्या पतंगा त्यांनी सहजच कापल्या. आता मुंबईच्या आकाशात त्याच्याच पतंगाचे एकछत्र राज्य आहे. असो.

सर्व पतंगबाज्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान!
लहानपणी पतंग उडवणं शिकायचे ४-५ निष्फळ प्रयत्न केलेत. जमलं नाही. ज्यांना उडवता येतो त्यांच्याबद्दल हेवा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

स्मृतिरंजनात्मक लेख उत्तम आहे....

पण मला एक तपशीलाची शंका विचारावीशी वाटते. तुमचे आतापर्यंतचे सर्व आयुष्य दिल्लीमध्ये - तेहि जुन्या - गेले असे दिसते. त्या दृष्टीने तुम्ही पक्के दिल्लीकरच म्हणायला हवेत - वेशेषकरून आमच्या सारख्यांच्या तुलनेत जे बदली होऊन दिल्लीत काही वर्षांसाठी आलेच तरी नव्या दिल्लीतील सरकारी क्वार्टर्समध्ये अथवा डिफेन्स कॉलनी, ग्रेटर कैलाश, लाजपतनगर, हौज खास अशा नव्या वस्त्यांमध्ये राहतात. त्यांचा जुन्या दिल्लीशी फार थोडा परिचय असतो. (नाही म्हणायला पहाडगंज भागात जुनी मराठी कुटुंबे राहतात असा समज आहे.) त्यामुळे दिल्लीचे तुमचे ज्ञान आमच्यापेक्षा निश्चितच अधिक असणार.

तुम्ही आपले घर 'काबुली गेट'च्या भागामध्ये होते असे लिहिले आहे आणि ह्या गेटपाशी १८५७ मध्ये मोठी धुमश्चक्री झाल्याचाहि उल्लेख तुम्ही केला आहे. ह्या माहितीचा दुरुस्तपणाबद्दल मला थोडी शंका आहे. माझ्या माहितीनुसार ही धुमश्चक्री जुन्या ब्रिटिश सिविल लाइन्स आणि काश्मिरी गेटच्या परिसरात झाली. हे गेट उत्तर-पश्चिम दिशेला होते. काबुली गेट म्हणजे सध्या 'खूनी दरवाजा' ह्या नावाने ओळखले जाणारे गेट, जे दर्यागंज रस्त्यावर उभे आहे. शेरशाह सूरच्या दिवसात सध्याची 'जुनी दिल्ली - शहाजहानाबाद' अस्तित्वातच नव्हती आणि सर्व वस्ती सध्याच्या 'जुन्या दिल्ली'च्या दक्षिणेस होती. तेव्हाचा काबूलकडे जाणारा रस्ता ह्या गेटमधून उत्तरेकडे जात असे आणि त्यामुळे त्याला 'काबुली गेट' असे म्हणत असत. हे नावच आता वापरात नाही. त्याचेच पुढचे नाव 'खूनी दरवाजा' हे सध्या वापरात आहे. (हे नाव अशामुळे पडले की बंडाच्या शेवटी बहादुर शाह झफरला हुमायूनच्या कबरीमधून बाहेर काढून लाल किल्ल्यात पाठवण्याच्या कामगिरीवर मेजर हॉडसन गेला असता बरोबरच्या दोन शाहजाद्यांना ह्या गेटच्या बाहेरच स्वत:च्या हाताने गोळ्या घालून मारून टाकले.)

ह्याबद्दल काही अधिक स्पष्टीकरण मिळाल्यास हवे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेख. लहानपणी पतंग उडवायचो. पण पेच लावायला थोडा घाबरायचो. आपली पतंग गेली तर निराशा होईल या भीतीने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0