व्हर्जन

कोड करता करता कंटाळून सुमितने घड्याळात पाहिलं. पावणेचार. आजूबाजूला त्याने एक नजर टाकली. एक-दोघांना खुणेनंच “येतो का?” म्हणून विचारलं. पण नाही. एकटाच कॉफी घेण्यासाठी तो मशिनजवळ आला. बटन दाबून ‘मग’ भरेपर्यंत एकटक तिकडे पाहत राहिला. कॉफी आणि बिस्किटं घेऊन वळला आणि एकदम हबकलाच.

“आयला ही तीच की काय ? का तिच्यासारखी दिसतेय फक्त ?” त्याला प्रश्न पडला. पण तीच असणार. कारण ती पण तितकीच हबकलेली. गोंधळल्यासारखी पाहत होती. काहीतरी आठवल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. सुमितने मुकाट्याने मान वळवली. इकडेतिकडे न बघता तडक तो डेस्कवर जाऊन बसला. आयुष्यात पहिल्यांदा त्याला इतकं अवघडल्यासारखं झालं. नकळत तो अस्वस्थ झाला.कामात काही लक्ष लागेना. पोर्टलवर त्याने नवीनच आलेल्या लोकांची यादी पाहिली. आकांक्षा. अरे होय की. तीच ही.

“कुठून उगवली ही बया इथे ? माझ्याच नशिबात असले घोळ का लिहून ठेवलेत कोण जाणे. आता हिला पण इकडेच यायचं होतं. याच शहरात याच ऑफिसमध्ये. माझी इतकी चांगली इमेज आहे इथे. हिनं लोकांना जुनं काहीबाही सांगून बिघडवली तर ? क्षणात माझ्याकडे बघणाऱ्या नजरा बदलतील.” सुमित विचारात पडला.
-----------------------------------
कॉलेजमध्ये होताच तो तसा. एकदम फेमस. पण वेगळ्या अर्थाने. कॉलेजच्या बाहेर , कॅन्टीनमध्ये कुचाळक्या करत बस, भांडणे कर , मिटव असल्या प्रकारात नेहमी आघाडीवर. मित्रांसोबत कट्ट्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची चेष्टा करणं, कॉमेंट पास करणं, त्यांना नावं पाडणं तर त्याचा आवडता उद्योग होता. कॉलेजमधली बरीच पोर-पोरी बाहेरची आणि हा मात्र तिथलाच स्थानिक. त्याच्या खूप ओळखी असतील असं सर्वांना वाटायचं. उगाच परक्या शहरात येऊन नसत्या भानगडी कशाला म्हणून त्याच्या आणि त्याच्या मित्रांच्या नादाला जास्त कोणी लागत नव्हतं. त्यामुळे हा जास्तच सोकावलेला. आपण इथले राजा, आपल्याला कोण अडवणार? असं त्याला वाटायचं. अभ्यासात तसा बरा, त्यामुळे कसातरी पास होत तिसऱ्या वर्षापर्यंत पोहोचलेला.

आणि नुकतीच कॉलेजात आलेली ती. आकांक्षा इनामदार. फर्स्ट इयर. दिसायला एक नंबर. सोडून कसं चालेल? तिला पण तो चिडवायला लागला. येताजाता कॉमेंट टाकून काहीबाही नावं पाडायला लागला. एकदा तर रॅगिंग घ्यायचा प्रयत्न केला. पण ती ऐकून घेणाऱ्यातली नव्हती. शाळेपासूनच एकदम डॅशिंग , फटकळ, बिनधास्त म्हणूनच प्रसिध्द होती ती. कुणाशीही सहज पंगा घेऊ शकणारी. अभ्यासापासून खेळात सगळीकडे पुढे असणारी. असल्या गोष्टी खपवून कधीच घेतल्या नसत्या तिने. त्यामुळे तिने विरोध केलाच. आधी शांत वॉर्नींग , मग वाद , शब्दाला शब्द असं होत होत एक दिवस प्रकरण हमरीतुमरीपर्यंत पोचलं. त्यानं शिव्या दिल्या आणि तिने त्याच्या खाडखाड दोन-चार कानाखाली हाणल्या. तिचं पाहताच बाकीच्या एक-दोन पोरींनीही हात साफ करून घेतले. एकीने अतिउत्साह दाखवून लगेच पोलिसांना फोन केला. झालं. अक्ख्या कॉलेजभर हे प्रकरण गाजलं. त्याला एक रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढावी लागली. कॉलेजच्या संचालकांनी प्रकरण कसबसं मिटवलं. पण चर्चा झालीच. सुमितला आकांक्षाची, इतर मुलींची कान पकडून माफी मागावी लागली. वर घरी आल्यावर नातेवाईक, शेजाऱ्यांमध्ये बदनामी झाली , घरच्यांची नाराजी झेलावी लागली ते वेगळंच. त्याच्या मनात प्रचंड राग होता याबद्दल. तिला धडा शिकवायचाच असं त्यानं ठरवून टाकलेलं. पण काही महिन्यांनी त्याच्या बाबांची पुण्याला बदली झाली आणि त्याचा त्या शहराशी संबंध संपला.

पण शहर बदललं आणि त्याचबरोबर स्वभावपण. वयाबरोबर बरीच सुधारणा झाली. पुण्यात त्याला नवीन मित्र मिळाले. यावेळी चांगले मिळाले. हळूहळू तो हे सगळं विसरला. थोडा प्रगल्भ झाला. नोकरीपण मिळाली. चांगली मल्टीनॅशनल कंपनीत. मुळात हुशार, स्मार्ट, असल्यामुळं तिथं तो लोकप्रिय होता.त्यात आपला आवाज चांगला आहे हे गवसलेल त्याला. त्यामुळे गाणीही म्हणायचा, छान गिटार वाजवायचा. अर्थात स्वभावात पूर्ण बदल झाला नव्हता. लोकांची इथेही खेचायचा. मुलींची चेष्टा-मस्करी पण करायचा. पण प्रमाणात. लोकांना हसवायचा. सगळ्यांचा लाडका झालेला.
-----------------------------------
आणि आता ही पुन्हा इथे. “हिने ते जर सांगितलं सर्वांना तर छी-थू होईल आपली इकडे. सगळ्यांच्या मनातून उतरू आपण. इतक्या मुश्किलीनं त्या सगळ्या प्रकारामधून बाहेर आलोय. पुन्हा तेच व्हायला नको. काय करावं? ” सुमितला काहीच सुचेनासं झालं.

तिच्याशी एकदा बोलून पाहू असा विचार त्याने केला. म्हणजे “झाल्या प्रकारची आणखीन एकदा माफी मागून तिला त्याबद्दल इथे काही न सांगून पाहिलं तर? काय म्हणेल ती? आणि तिच्या मनात अजूनही राग असेल तर? इतक्या वर्षांत म्हणजे निदान ६-७ तरी झाली असतील, आपण बदललोय पण ती बदलली असेल का? ”

तीन-चार दिवस असेच गेले. तिनेही त्याच्या तिथे असण्याची फारशी दखल घेतली नव्हती हे त्याला जाणवलं. अर्थात या गोष्टीचं थोडं बरंच वाटलं त्याला. पण याबद्दल बोलायला हवं अस वाटणं कमी नव्हतं झालं.

“एक्सक्युज मी !!!”

आवाज ऐकताच त्याने मान वळवून पाहिलं. तीच होती. त्याला घामच फुटला. काहीच न बोलता तो फक्त बघत राहिला.
“मागच्या प्रोजेक्टची फाईल तुमच्याकडून घ्यायला सांगितली आहे. मेल करणार का?”

“हो करतो.”

ती निघूनपण गेली. “आयला, इतकं घाबरायला काय झालंय आपल्याला? इतके फट्टू थोडीच आहोत आपण!! आता तर बोलायलाच हवं. काही कुणाचं घोडं मारलेलं नाही आपण इतकं भ्यायला.” त्यानं मनाशी पक्कं केलं. रात्री विचार करून दुसऱ्या दिवशी आधी झाल्या प्रकारची पुन्हा माफी आणि मग त्याचा उल्लेख न करण्याची विनंती अशी रूपरेषा ठरवली.

-----------------------------------
“एक्सक्युज मी!! मला थोडं बोलायचंय” त्यानं धीर करून तिच्या डेस्कवर जाऊन विचारलं.

“हं, बोल.” ती स्क्रीनकडे बघत शांतपणे म्हणाली.

“इथे नको. कॉफीमशीन जवळ जायचं का ? किंवा कॅन्टीनमध्ये?”

“का? काय झालंय?”

“माझ्यासाठी हे बोलणं महत्वाचं आहे. प्लीज. गैरसमज नकोत.” तो.

“कसले गैरसमज? बरं दहा मिनटं थांब. आलेच.”

“हे बघ, कॉलेजमध्ये जे काही झालं त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी. यावेळी अगदी मनापासून सॉरी. त्यावेळी मी उडाणटप्पू , मवाली वगैरे असेन. होतोच. स्वत:च्याच मस्तीत असायचो. त्यामुळंच असा वागलो. पण विशीतला सुमित आणि आताचा सुमित, फरक आहे. ते सगळं मी आता विसरलोय. माझ्या परीनं सुधारलोय किंवा सुधारतोय म्हण. इथे सर्वांचं माझ्याबद्दल चांगलं मत आहे. सगळेच माझे चांगले मित्र-मैत्रिणी आहेत. तुझ्या मनात माझ्याबद्दल कदाचित अजूनही राग असेल. पण आता ते सर्व उगाळण्यात काही अर्थ नाही असं वाटतं. बस, त्या मॅटरबद्दल तू इथे प्लीज कुणापाशी बोलू नकोस हेच सांगायचं होतं.”, कॅन्टीनमध्ये तिच्यासमोर धीर करून तो बोलला.

“ओके. ठीकाय. नाही सांगणार”, क्षणभर विचार करून तिने उत्तर दिलं.

“थॅंक्स!!! निघतो.”

“एक मिनिट!! मी एक बोलू का?”

त्याच्या उत्तराची वाट न पाहता ती बोलायला लागली.

“ऐक. मला खरोखर तू पुन्हा भेटशील याची जराही कल्पना नव्हती. कुठून असणार. ते कॉलेजचं प्रकरण पूर्णपणे विसरलेले मी. तू खिजगणतीत पण नव्हतास. पण पहिल्यांदा इथं तुला बघितलं आणि सगळं आठवून तुझा प्रचंड राग आला. सगळ्यांना तुझं खरं रूप सांगून तुला पुन्हा धडा शिकवायचा असंच ठरवलेलं मी. पण इथे एकूणच सगळ्यांकडून तुझ्याबद्दल चांगलं ऐकलं. त्यामुळं याबाबत पुन्हा विचार केला. मग वाटलं, काय संबंध मला राग येण्याचा? तू माझ्या आधीपासून इथे काम करतोयस. आणि तुलाही कदाचित माझ्यापेक्षा जास्ती राग आला असेलच की मला पाहिल्यावर? तसं पाहायला गेलं तर त्या प्रसंगामुळं माझं काहीच नुकसान झालं नव्हतं. उलट कॉलेजात सगळ्यांची लाडकी झाले मी. नुकसान तुझंच झालेलं.”

“हो आणि कदाचित त्यामुळंच आज मी इथे आहे.” तो.

“एक्झॅ‍क्टली. मग विनाकारण पुन्हा तेच उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही असं वाटून गेलं. तू इथे आज तुझ्या मेहनतीने आहेस. सगळ्यांचा आवडता आहेस. तुझ्या जुन्या इमेजच्या आधारे इथे तुझा न्यायनिवाडा करण्याचा मला अजिबात हक्क नाही. का म्हणून करावी मी तुझी बदनामी? आणि जरी अगदी प्रयत्न केलाच तर तो माझ्यावरच उलटण्याची जास्ती शक्यता आहे. त्यामुळे असं काही मी करेन हे मनातून काढून टाक. कारण शेवटी अठरा वर्षांची आकांक्षा आणि आताची आकांक्षा यांच्यातपण थोडातरी फरक असायलाच हवा. नाही का?”

“नक्कीच. पुन्हा एकदा धन्यवाद.”

“आणखी एक. जसा त्यावेळी तू मवाली वगैरे होतास. तशी मीपण थोडी आक्रस्ताळी, हट्टी होते. कदाचित ती गोष्ट मी इतकी ताणायला नको होती असं आता वाटतं. तुझी गावात खूप बदनामी झाली त्यामुळं. असो. जर काही राग असेल मनात तर काढून टाक. आय एम सॉरी. पण आता हा विषय पुन्हा नको.”

तो फक्त हसला आणि निघाला.

वयाबरोबर दोघांचीही व्हर्जन्स अपडेट झालेली पाहून त्याला बरं वाटलं.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दोन वर्षांचा बाँड लिहून घेतलेला असतो ना कंपनीने?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.
___
असं होऊ शकतं का की एखादं नवं व्हर्जन अपलोड झालय पण फॉल्टी आहे असे काही दिवसात कळल्याने रोलबॅक झालय? <डोळे मिचकवण्याची स्मायली कल्पावी>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा कदाचित

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधी सरळ कथा.. अजून टोकदार करता आली असती. नाट्य कमी पडलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0