शिवराज्याचा राज्यव्यवहारकोश - भाग १.

कित्येक शतके लुप्त झालेला प्राचीन हिंदु पद्धतीमधील राज्याभिषेक समारंभ शिवाजीमहाराजांनी पुनरुज्जीवित केला आणि परकीय मूळ असलेल्या राजकीय वर्चस्वाला आह्वान दिले. सांस्कृतिक पातळीवर असेच करण्यासाठी परक्या शासकांबरोबर आलेल्या फारसी-उर्दू भाषांचे मराठीवरील आक्रमण थांबवून पुन: ह्या देशातील मूळच्या अशा मराठी भाषेला राज्यकारभारात योग्य स्थान देण्याचे त्यांनी ठरविले.

राज्याभिषेककालापर्यंत खरोखरच येथील जनतेची स्वत:ची मराठी भाषा फारसी-उर्दूच्या आक्रमणाखाली गुदमरून गेल्यासारखी दिसत होती. १४व्या शतकाच्या प्रारंभाला देवगिरीचे यादवांचे राज्य नष्ट झाले आणि खिलजी सल्तनतीचे अंमल सुरू झाला. शासक आपली भाषाहि आपल्याबरोबर आणतो ह्या नियमास धरून फरसी-अरबी शब्दांचे मराठीवरील आक्रमण तेव्हापासून सुरू झाले. १७व्या शतकापर्यंत प्रामुख्याने गद्य लेखनामध्ये हे आक्रमण जाणवण्या-खुपण्याइतपत वाढले होते. पद्य लेखनामध्ये ते त्यामानाने कमी दृग्गोचर होते कारण तत्कालीन पद्यलेखन हे सर्व धार्मिक-आध्यात्मिक स्वरूपाचे असल्याने त्याची परंपरा ही प्राचीन भारतीय दर्शने, पुराणे आणि रामायण-महाभारतासारख्या काव्यामधून आलेली होती. गद्य लेखन हे सरकारी कामकाज, महसूल गोळा करणे अशा हेतूने होत असल्याने शासकांच्या भाषेचा प्रभाव तेथे अधिक लक्षात येण्याजोगा होता. हा परकीय प्रभाव पुढील दोन उतार्‍यांच्या तुलनेतून स्पष्ट दिसतो. पहिला उतारा महानुभावांच्या ’लीळाचरित्र’ ह्या ग्रन्थातून घेतला आहे. ह्याचा काल १३व्या शतकाचा मध्य.

Lilacharitra
Lilacaritra

दुसरा उतारा इ.स. १७०० च्या पुढेमागे परशुरामपंत प्रतिनिधीने गोव्याच्या ’विजरई’ ला -Viceroy - पाठविलेल्या एका पत्रामधून घेतला आहे. पत्रामध्ये गोवेकरांच्या एका वर्तणुकीबद्दल नापसंती दर्शविली आहे. उतार्‍यातील वाक्यरचना आणि विभक्तिप्रत्यय वगळता येथे मराठी अभावानेच दिसते आहे.

Farsi

ही परिस्थिति बदलण्यासाठी आणि मराठीला तिचे नैसर्गिक स्वरूप मिळवून देण्यासाठी आणि राज्यकारभारातील फारसीचा अतोनात प्रसार ताब्यात आणण्याच्या दृष्टीने पाऊल म्हणून शिवाजीराजांनी आपला दक्षिण प्रान्तातील अधिकारी आणि तंजावरनिवासी रघुनाथ नारायण हणमंते ह्यांना फारसीच्या जागी देशी शब्द सुचविणारा ’राज्यव्यवहारकोश’ रचण्यास सांगितले. लगोलग कामाला लागून रघुनाथपंतांनी असा कोश रचून तो राजापुढे १६७८ च्या सुमारास सादर केला . ह्या साठी संस्कृत भाषेचा आधार घेण्यात आला आणि फारसी शब्दांच्या जागी समानार्थी संस्कृत शब्द सुचविण्यात आले.

१७व्या शतकात राजाचे कुटुंब, राज्यकारभार कसा चालत असे, राजसभेमध्ये शिष्टाचार कसा असे, राज्यातील शासकीय आणि सैनिकी अधिकारी कोण होते येथेपासून सुरुवात करून वापरातील शस्त्रे, अंगावरचे दागिने, राज्याचा अर्थव्यवहार, महसूल आकारणी, नाणी, व्यापार-उदीम, कापडचोपड आणि कपडे, मादक पेये, धूम्रपान, तांबूलद्रव्ये, सुगंधी तेले अशा आर्थिक आणि सामाजिक विचाराच्या दृष्टीने मनोरंजक आणि उद्बोधक वाटतील अशा वस्तूंचे उल्लेख येथे मूळ फारसी/उर्दू शब्द आणि त्यांच्यासाठी सुचविलेला संस्कृत शब्द ह्या मार्गाने मिळतात. असे सुमारे १३८० शब्द १० गटांमध्ये - अमरकोशाची भाषा उचलून त्यांना ’वर्ग’ असे नाव दिले आहे- आपणास येथे दिसतात.

ह्या कोशाच्या एकमेकापासून कमीअधिक प्रमाणात भिन्न अशा अनेक प्रती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मिळाल्या आहेत. त्यापैकी कोल्हापूरहून का.ना. साने ह्यांनी मिळालेली प्रत १९२५ साली भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रकाशित केलेल्या ’शिवचरित्रप्रदीप’ ह्या ग्रंथामध्ये छापलेली आहे. ह्या प्रतीचे वैशिष्टय असे की मुख्य कोशापलीकडे तिच्यामध्ये ८४ संस्कृत श्लोकांचा उपोद्घात आणि अखेरीस ५ श्लोकांचा उपसंहार आहे, जो अन्य प्रतींमध्ये नाही. उपसंहारामध्ये कोशाच्या निर्मितीविषयी अधिक माहिती आहे. पुढील लेखन ह्या प्रतीवर आधारलेले आहे.

कोशातच अनेक ठिकाणी म्हटल्याप्रमाणे त्याची निर्मिति ही रघुनाथपंतांनी केली आहे. उपोद्घातामध्ये पुढील श्लोक दिसतात.

कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थं यवनवचनैर्लुप्तसरणीम्।
नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्।
नियुक्तोऽभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ॥८१॥
सोऽयं शिवच्छत्रपतेरनुज्ञां मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि।
अमात्यवर्यो रघुनाथनामा करोति राज्यव्यवहारकोशम् ॥८२॥

सूर्यवंशाचा जणू तुराच अशा राजश्रेष्ठ शिवछत्रपतीने पृथ्वीवर म्लेच्छांचा समूळ उच्छेद केल्यानंतर यवनोक्तींनी झाकोळलेल्या देवभाषेला राज्यव्यवहारासाठी वाढविण्याच्या हेतूने एका विद्वानाला नियुक्त केले. ८१.
तो मी अमात्य रघुनाथ शिवछत्रपतीची आज्ञा मस्तकी धारण करून राज्यव्यवहारकोश करीत आहे. ८२.

प्रत्येक वर्गाच्या अखेरीस पुढील प्रकारचा समारोप आहे:

इति श्रीशिवच्छत्रपतिप्रियामात्येन नारायणाध्वरिसूनुना रघुनाथपण्डितेन शिवराजनियोगत: कृते राजव्यवहारकोशे पण्यवर्गो दशम: समाप्त:॥
(शिवछत्रपतीचा प्रिय अमात्य, नारायणाचा पुत्र अशा रघुनाथपंडिताने शिवाजीराजाच्या आदेशावरून केलेल्या राजव्यवहारकोशामध्ये पण्यवर्ग हा दहावा वर्ग समाप्त झाला.)

ह्याउलट उपसंहारामध्ये पुढील दोन श्लोकांमध्ये असे लिहिले आहे:

व्यासान्वयाब्धिचन्द्रेण लक्ष्मणव्याससूनुना।
कोशोऽयं ढुंढिराजेन रघुनाथमुदे कृत:॥१॥
यथामति विचार्यैव नामान्यर्थानुसारत:।
विहितानि मयाकार्यमार्यैरत्र मनो मनाक्॥२॥

(व्यासकुल हा सागर, त्यातून उत्पन्न झालेल्या चन्द्रासारखा असलेल्या, लक्ष्मण व्यासाचा पुत्र, अशा ढुंढिराजाने रघुनाथाच्या संतोषासाठी हा कोश केला. १.
बुद्धीने विचार करून अर्थानुसारी शब्द मी येथे योजिले आहेत. आर्य विद्वानांनी ह्याकडे थोडे लक्ष द्यावे. २.)

हे सर्व श्लोक एकत्रितपणे विचारात घेतले तर असे म्हणता येते की रघुनाथपंडिताला हे कार्य मिळाले. तो स्वत: तंजावरचा निवासी असून त्याच्याकडे शिवराज्यापैकी दक्षिणभागाचे शासन हे प्रमुख कार्य होते. पूर्ण कोश स्वत: करणे त्याला शक्य नसणार म्हणून त्याने ढुंढिराज नावाच्या परिचित विद्वानाला हे कार्य सोपविले. कोशनिर्मितीमध्ये असा दोघांचाहि काही वाटा आहे. ढुंढिराजाने शब्द गोळा करणे असे पहिले काम केले आणि दोघांनी मिळून त्याला हे अखेरचे स्वरूप दिले. (प्रख्यात पंडितकवि रघुनाथपंडित, नलदमयंतीस्वयंवराचा कवि आणि रघुनाथपंत अमात्य हे एक का दोन, ढुंढिराज व्यास कोण होता असे बरेच काही लिहिण्याजोगे आहे पण विस्तारभयास्तव ते येथे न लिहिता त्याचा नुसता उल्लेख करतो.)

ह्यापुढे प्रत्यक्ष कोशाचा धावता आढावा घेऊ. संस्कृत पंडितप्रथेला धरून शिवजन्मामागे ईश्वरी प्रेरणा आहे असे सुचविणारे, कोशकार्याची आवश्यकता काय आणि ते करण्यास रघुनाथपंडित कसा सर्वथैव पात्र आहे ह्याचे वर्णन करणारे आणि अतिशयोक्तीने भरलेले ८४ श्लोक उपोद्घातामध्ये आहेत. त्यांचा सारांश असा:

यवनाक्रान्त आणि त्यामुळे त्रस्त अशी पृथ्वी ब्रह्मदेवाकडे ’माझी यवनांपासून सोडवणूक कर’ असे सांगण्यासाठी गेली. हे कार्य करण्यास विष्णु अधिक योग्य आहे असे सांगून ब्रह्मदेव तिला बरोबर घेऊन विष्णूकडे गेला. आपल्यापेक्षाहि शंकराने हे कार्य केल्यास उत्तम होईल असे म्हणून सर्वजण कैलासावर शंकराकडे गेले. तेथे शंकर ’परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥’ असे तूच पूर्वी सांगितले होतेस अशी विष्णूला आठवण करून देतो आणि म्हणतो:

निहता भवता हरे पुरा ये पौलस्त्यमुखा: सुखाय भूमे:।
अहितान्पुनरेव जन्मभाजो जहि तान्प्राप्तनराकृतिस्त्वमेव॥४६॥
येषां कलौ दुर्नयमेव सोढुं बुद्धावतार: कलितो मयाऽभूत्।
तेषां विनाशं स्फुटमेव कर्तुमसाम्प्रतं मे मनुषे यदीत्थम्॥४७॥
उपायमप्यत्र वदामि भूमिमवाप्य मन्नामनिगूढभाव:।
साहाय्यमंशेन पुनर्भवान्या लब्ध्वापि त्तानाशु सुखेन हन्या:॥४८॥

हे हरे, पूर्वी भूतलावर सुख आणण्यासाठी तू रावणादींचा वध केलास. आता पुन: जन्म घेतलेल्या त्या शत्रूंना मनुष्यरूपाने तू नष्ट कर. ४६.
’ज्यांचा दुष्टपणा सहन करण्यासाठी मी कलियुगामध्ये बुद्धावतार धारण केला होता त्यांचा विनाश करण्यासाठी मी मनुष्यरूप धारण करणे अयोग्य आहे’ असे जर तुला वाटत असेल...४७.
...तर त्यावर मी उपाय सांगतो. गुप्तपणे माझे नाव धारण करून तू धरणीवर अवतीर्ण हो आणि सहजपणे त्यांचे हनन कर. ह्यामध्ये भवानीचेहि साहाय्य अंशत: तुला मिळेल. ४८.

विष्णूस असा आदेश दिल्यावर शंकर पुढे सांगतो...

अस्ति प्रशस्तविभवो भुवि भानुवंशे विख्यातभोसलकुलामृतसिन्धुचन्द्र:।
श्रीशाहवर्मनृपतिर्विधिपार्वतीशश्रीशा हवि: क्रतुषु नित्यमदन्ति यस्य ॥४९॥
तस्य प्रिया भूपतिभर्तुरार्या रूपेण संतर्जितकामभार्या।
साध्वी जिजूर्नाम सुलक्षणास्ते पत्नी दिलीपस्य सुदक्षिणेव॥५०॥
त्वं शाहपृथ्वीपतिवीरपत्न्यामस्यां समासाद्य मनुष्यजन्म।
म्लेच्छापहत्या सुखमाचरय्य भूमे: पुन: स्थापय वर्णधर्मान्॥५१॥
पार्थं प्रति प्राक्तव धर्महानौ सृजेयमात्मानमिति प्रतिज्ञा।
जगत्सु गीतैव तदत्र कार्षी: कार्येऽधुना माधव मा विचारम्॥ ५२॥

अर्थ - विख्यात भोसले कुलरूपी सागरातून वर आलेला चन्द्रच जणू असा शाहाजी नावाचा कीर्तिमान् राजा आहे ज्याचा यज्ञातील हवि ब्रह्मदेव, शिव आणि विष्णु नित्य ग्रहण करतात. त्याची प्रिय आणि दिलीपाची सुदक्षिणा असावी अशी जिजू नावाची सुलक्षणा रूपवती भार्या आहे. ४९-५०.
तिच्यापासून मनुष्यरूपाने जन्म घेऊन तू म्लेच्छविनाश करून पृथ्वीवर पुन: सुखसमाधान आण आणि वर्णाश्रमधर्माची पुन:स्थापना कर. ५१.
धर्महानि झाली असता मी पुन: जन्म घेऊन उतरेन असे तूच पूर्वी गीतेमध्ये सांगितले आहेस. तेव्हा आता अधिक विचार न करता तू हे कार्य अंगावर घे. ५२.

आदेशाप्रमाणे स्वत: श्रीविष्णूने ’शिव’ ह्या नावाने पृथ्वीवर जन्म घेतला आणि भवानीचा अंश असलेल्या जिजाबाईच्या पाठिंब्याने म्लेच्छांचा संहार केला.

क्रमेण जित्वा स दिशश्चतस्रो राजा शिवच्छत्रपति: प्रतापात्।
नि:शेषयन्म्लेच्छगणं समस्तं पाति स्म पृथ्वीं परिपूर्णकाम:॥६५॥

सर्व म्लेच्छगणांचा आपल्या पराक्रमाने नि:शेष करणारा परिपूर्णकाम राजा शिवछत्रपति चारी दिशा क्रमाने जिंकून सर्व पृथ्वीचे रक्षण करू लागला.

तदनंतर...

कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थंयवनवचनैर्लुप्तसरणीम्।
नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्।
नियुक्तोऽभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ॥८१॥
सोऽयं शिवच्छत्रपतेरनुज्ञां मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि।
अमात्यवर्यो रघुनाथनामा करोति राजव्यवहारकोषम् ॥८२॥

अर्थ - सूर्यवंशाचा जणू तुराच अशा राजश्रेष्ठ शिवछत्रपतीने पृथ्वीवर म्लेच्छांचा समूळ उच्छेद केल्यानंतर यवनोक्तींनी झाकोळलेल्या देवभाषेला राज्यव्यवहारासाठी वाढविण्याच्या हेतूने एका विद्वानाला नियुक्त केले. ८१.
तो मी अमात्य रघुनाथ शिवछत्रपतीची आज्ञा मस्तकी धारण करून राज्यव्यवहारकोष करीत आहे. ८२.

आपल्या ह्या कोशकार्याची कुचेष्टाहि होऊ शकेल असे वाटून रघुनाथपंडित उपोद्घाताच्या अखेरीस सांगतो:

विपश्चित्संमतस्यास्य किं स्यादज्ञविडम्बनै:।
रोचते किं क्रमेलाय मधुरं कदलीफलम् ॥८४॥

विद्वन्मान्य अशा ह्या कार्याची अडाण्यांनी कुचेष्टा केली म्हणून काय बिघडते? उंटाला गोड केळ्याची चव कोठे कळते? ८४.

ह्यापुढे १० वर्गांमध्ये मिळून १३८० फारसी-उर्दू शब्दांना संस्कृत भाषेतील शब्द समानार्थी शब्द सुचविण्यात आलेले आहेत. कोशाचे १० वर्ग असे: १) राज्यवर्ग २) कार्यस्थानवर्ग ३) भोग्यवर्ग ४) शस्त्रवर्ग ५) चतुरंगवर्ग ६) सामन्तवर्ग ७) दुर्गवर्ग ८) लेखनवर्ग ९) जनपदवर्ग १०) पण्यवर्ग . ह्यापुढे ह्या लेखामध्ये कोशामधील कोणताहि शब्द दाखवितांना प्रथम राज्यव्यवहारकोशाने सुचविलेला पर्याय आणि नंतर कंसात मूळ फारसी शब्द अशी रचना ठेवली आहे.

हा राज्यव्यवहार पुष्कळसा पूर्वीच्या मुस्लिम पद्धतीमधून घेतला आहे. राज्याच्या कारभाराचे १८ कारखानेआणि १२ महाल असे विभाजन तेथूनच घेतले आहे, मात्र ते जसेच्या तसे ह्या कोशामध्ये उतरलेले नाही. कसे ते लवकरच दिसून येईल.

राज्याच्या १८ कारखान्यांची मुस्लिम राजवटीतील नावे आणि त्यांच्या कामाचे विषय असे- i) खजिना - कोशागार ii) जवाहिरखाना - रत्ने, दागिने iii) अंबरखाना - धान्यसाठा iv) शर्बतखाना - औषधे v) तोफखाना - तोफा, बंदुका इत्यादि vi) दफ्तरखाना - राज्यविषयक कागदपत्रे vii) जामदारखाना - वस्त्रप्रावरणे ह्यांची व्यवस्था viii) जिरातखाना - शस्त्रे, चिलखत, टोप इत्यादि ix) मुतबकखाना - पाकसाधना, रसोई इत्यादि, x) फीलखाना -हत्ती आणि त्यांचे सामान xi) उष्टारखाना - उंट आणि त्यांचे सामान xii) नगारखाना - नौबत, ढोल, शिंगे इत्यादि xiii) तालिमखाना - मल्लशाळा, xiv) फरासखाना तंबू, राहुटया, जाजमे इत्यादींची व्यवस्था, xv) आबदारखाना - पाणी अन्य पेयांची व्यवस्था xvi) शिकारखाना - पाळीव प्राणी (वाघ, सिंह इत्यादि) xvii) दारू खाना - तोफा-बंदुकांसाठी दारूगोळा xviii) शहदखाना - सफाई खाते.

१२ महाल असे: i) पोते - व्यय, ii) सौदागर - व्यापार उदीम, iii) पालखी, iv) कोठी, v) इमारत, vi) वहिली - रथशाळा, vii) पागा - अश्वदल, viii) सेरी - सुखसोयी, ix) दरुनी - अन्त:पुर, x) थट्टी - गाईम्हशींचा तबेला, xi) टांकसाळ, xii) सबीना - संरक्षक.

ह्या कारखाना आणि महालांपैकी कशाकशाची नोंद राज्यव्यवहारकोशामध्ये घेतली गेली आहे ते आता पाहू.

कारखान्यांपैकी कोशागार (खजिना), रत्नशाला (जवाहिरखाना) आणि वसनागार (जामदारखाना) ह्यांमधील वस्तु आणि तेथील अधिकार्‍यांची नावे ही क्रमाने वर्ग २ - कार्यस्थानवर्ग येथे मिळतात. पाकालय (मुतबकखाना). जलस्थान (आबदारखाना), सुधास्थान (शरबतखाना), पक्षिशाला (शिकारखाना), आस्तरणक (फरासखाना) हे कारखाने वर्ग ३-भोग्यवर्ग येथे आहेत. शस्त्रागार (जिरातखाना), अग्निचूर्णक (दारूखाना) आणि मल्लशाला (तालिमखाना) हे वर्ग ४ - शस्त्रवर्ग येथे आहेत. गजशाला (फीलखाना, ह्यामध्येच मन्दुरा - घोड्यांची पागा ह्या महालाचाहि समावेश केला आहे), रथशाला (वहिलीमहाल), उष्ट्रशाला (शुतुर्खाना म्हणजेच उष्टारखाना), वाद्यशाला (आलंखाना म्हणजेच नगारखाना) इतक्यांचा समावेश वर्ग ५ - चतुरंगवर्ग केला आहे. वर्ग ६ - सामन्तवर्गामध्ये सैनिकांचे प्रकार, अधिकार्‍यांची नावे. सैन्याची हालचाल आणि मुक्काम अशा सैन्याशी संबंधित शब्द आहेत. वर्ग ७ - दुर्गवर्गामध्ये प्रथम दुर्ग-किल्ले ह्यांच्याशी संबंधित परिभाषा दर्शवून त्यानंतर संभारगृह (अंबारखाना) हा कारखाना, इमारत हा महाल आणि अखेरीस मलस्थान (तारतखाना किंवा शहदखाना ह्यांच्याशी संबंधित श्ब्द दर्शविले आहेत. कोशातील सर्वात मोठा वर्ग म्हणजे वर्ग ८ - लेखनवर्ग. ह्यामध्ये लेख्यशाला (दफ्तरखाना) हा कारखाना, व्यय (वेतनादि खर्च) हा महाल आणि त्यानंतर पत्रव्यवहारात, वाटाघाटींमध्ये, राजसभेमध्ये, शिष्टव्यवहारामध्ये, कर्जव्यवहार आणि दोन पक्षांमधील आर्थिक विवादामध्ये वापरायचे अनेक फारसी शब्द आणि त्यांना प्रतिशब्द दिले आहेत. वर्ग ९ - जनपदवर्ग ह्यामध्ये नाना देशविभाग, त्यांचे अधिकारी, जमिनीचे महसूलासाठी प्रकार, महसूलाशी संबंधित शब्द, वजनेमापे, अशा गोष्टी दिसतात. अखेर वर्ग १० - पण्यवर्ग येथे उत्पादनाच्या आणि विक्रीच्या वस्तु आणि ते निर्माण करणारे ह्यांची नावे दिसतात.

(क्रमश:. पुढील भागामध्ये काही रंजक आणि लक्षणीय शब्द.)

आधार:
१) राज्यव्यवहारकोश - सं. का.ना.साने, शिवचरित्र प्रदीप, पृ.१३७ पासून पुढे.
२) Administrative System of the Marathas by Surendranath Sen पृ. ५९-६१

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त! मराठेशाही या ना त्या मार्गे १८१८ पर्यंत जिवंत होती हे धरता यातले किती शब्द तत्कालीन सरकारी कामकाजात रुळले?

आणि पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बर्रेच रुळले. किमान सातारकरांच्या पत्रांमध्ये तरी अनेकच.

पण याचा डीटेल स्टडी झाला पाहिजे, तसा कुठे झाला असल्याचे मला माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेखाबद्दल अनेक धन्यवाद. बाकी या कोशाचा परिणाम तितका साकल्याने चिरंजीव झाला नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे. राजवाड्यांनी नमुन्यादाखल एक राज्याभिषेकपूर्व, एक राज्याभिषेकोत्तर आणि एक १७२८ सालचे अशी तीन पत्रे काढून त्यांमधील अरबी-फारसी शब्दांचे % कसे क्रमाक्रमाने घटत गेले हे दाखवलेय पण केवळ ३ डजंट अ डेटासेट मेक. शिवाय पेशवे उत्तरेत गेल्यावर त्यांच्या पत्रव्यवहारात अनेक फारसी शब्द घुसले असेही वाचल्याचे स्मरते, उदा. हिंगणे दफ्तर. तुलनेने पटवर्धन आणि सातारचे छत्रपती यांची पत्रे मात्र एकदम फारसीरहित असलेली दिसून येतात.

सभासद बखर लिहिणारा कृष्णाजी अनंत सभासद हा महाराजांच्या दरबारी होता. दरबारच्या सदस्यांना 'मजालिस' असे म्हणायचे. त्याकरिता राज्यव्यवहारकोशात सभासद असा शब्द दिलेला आहे. त्याचाच परिणाम सभासदावरही झालेला दिसतो.

अजून एक शंका म्हणजे, महाराजांनी राज्याभिषेक पुनरुज्जीवित केला म्हणजे नेमके काय केले? विजयनगरचा शेवटचा राजा श्रीरंगरायलु अगदी १६५६ सालापर्यंत अ‍ॅक्टिव्ह होता. त्याचा राज्याभिषेक कशा पद्धतीने झाला आणि त्यानंतर (१६५६ नंतर) फक्त १८ वर्षांनी झालेला महाराजांचा राज्याभिषेक कशा पद्धतीने झाला? झालंच तर या रजपुतांचे राज्याभिषेक कसे व्हायचे? त्यांच्याशी ताडून पाहता गागाभट्टांनी लिहिलेल्या राज्याभिषेकप्रयोगात काय साम्य वा फरक दिसतात? गागाभट्टकृत ग्रंथातला विधी वेदोक्त आहे. बाकीचे राजे पुराणोक्त विधी करायचे असे म्हणायला काही पुरावा आहे का?

मला असे वाटते की राज्याभिषेकाचे कर्मकांड मेलेले नसावे, फक्त महाराजांच्या रूपाने त्याला खरा अर्थ प्राप्त झाल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले असावे. विधी अ‍ॅज़ सच महाराजांनी पुनरुज्जीवित केला असे वाटत नाही, परंतु गागाकृत ग्रंथ पाहिला पाहिजे मगच या तर्काबद्दल निश्चितपणे बोलता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद. माहितीपूर्ण, सुरस लेख. १९-२०व्या शतकात राष्ट्रप्रेमाची भावना महाराष्ट्रात उचंबळू लागल्यावर हा कोश अनेकांनी छापला. उर्दू-फार्सी शब्दांजागी संस्कृत शब्द रूढ व्हावेत, असाच बर्‍याच प्रकाशकांचा/संपादकांचा हेतू होता. पण एका अनामिक प्रकाशकाने मात्र, इंग्रजी राज्याला विरोध करण्यासाठी हिंदू-मुसलमानांना एकत्र येण्याची गरज आहे आणि म्हणून आपण संस्कृत शब्दांच्या बरोबरीने 'यवनी' शब्दही मराठीत प्रचलित करूया असे म्हणून हा कोश छापवला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण एका अनामिक प्रकाशकाने मात्र, इंग्रजी राज्याला विरोध करण्यासाठी हिंदू-मुसलमानांना एकत्र येण्याची गरज आहे आणि म्हणून आपण संस्कृत शब्दांच्या बरोबरीने 'यवनी' शब्दही मराठीत प्रचलित करूया असे म्हणून हा कोश छापवला!

याबद्दल अधिक माहिती मिळेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्रीशिवाजी छापखाना, पुणे येथे शके १८०२ मध्ये छापलेले पुस्तक. प्रकाशकाचे नाव दिलेले नाही. मला पुणे मराठी ग्रंथालयात वाचायला मिळाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक धन्यवाद, अता हे पाहणे आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या अनामिक प्रकाशकास माझ्याकडून एक कडक सलाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेख आणि प्रतिसाद दोन्ही माहितीपूर्ण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<अजून एक शंका म्हणजे, महाराजांनी राज्याभिषेक पुनरुज्जीवित केला म्हणजे नेमके काय केले? विजयनगरचा शेवटचा राजा श्रीरंगरायलु अगदी १६५६ सालापर्यंत अ‍ॅक्टिव्ह होता. त्याचा राज्याभिषेक कशा पद्धतीने झाला आणि त्यानंतर (१६५६ नंतर) फक्त १८ वर्षांनी झालेला महाराजांचा राज्याभिषेक कशा पद्धतीने झाला? झालंच तर या रजपुतांचे राज्याभिषेक कसे व्हायचे? त्यांच्याशी ताडून पाहता गागाभट्टांनी लिहिलेल्या राज्याभिषेकप्रयोगात काय साम्य वा फरक दिसतात? गागाभट्टकृत ग्रंथातला विधी वेदोक्त आहे. बाकीचे राजे पुराणोक्त विधी करायचे असे म्हणायला काही पुरावा आहे का?>

'राज्याभिषेक' ह्या विधीला - आणि अन्य संस्कृतींमधील तत्सम विधींना - एक विशेष अर्थ असतो. तसे पाहू गेल्यास ज्याच्याकडे पुरेसे सैनिकी सामर्थ्य आणि सत्तेखाली पुरेसा प्रदेश आहे असा कोणीहि बलिष्ठ 'मी तुमचा राजा आहे' अशी घोषणा करून स्वघोषित राजा होऊ शकतो पण त्याच्या स्वघोषित राजेपणाला वैधानिक अधिष्ठान - legitimacy - नसते. अशा वैधानिक अधिष्ठानास 'नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते मृगै:| विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेन्द्रता' एवढे पुरेसे नसते. अशा स्वघोषित राजाविरुद्ध कोणी उठाव केला तर त्याने राजद्रोहाचा अपराध केला असे म्हणता येणार नाही. इंग्लिश इतिहासामध्ये ज्याला Bill of Attainder म्हणतात ते त्या उठाव करणार्‍याच्याविरुद्ध लागू होणार नाही. ह्यासाठी प्राचीन काळापासून 'राज्याभिषेक' नावाचा विधि करूनच कोणी सत्ताधीश 'राजा' ह्या पदवीला पोहोचत असे आणि तदनंतर त्याचे एकेकाळचे सहकारी, सामाजिक दृष्ट्या त्याला आपला समान मानणारे भाऊबंद राजकीय पातळीवर त्याच्या एक पायरी खाली जात. अशा राजाला 'अभिषिक्त राजा' असे मानत, जसा इंग्लंडमध्ये Anointed King असतो. (दोहोंचा अर्थ एकच आहे. भारतात पवित्र जलाने हे anointing केले जाते तर इंग्लंडमध्ये पवित्र तेलाने इतकाच फरक.) असा अभिषिक्त राजा अन्य कोणा सत्ताधीशाचे मांडलिकत्व मानत नाही. साहजिकच असा राजा व्हायचे असले तर त्या राजाचे त्याचे एकेकाळचे सहकारी, सामाजिक दृष्ट्या त्याला आपला समान मानणारे भाऊबंद अशांची स्पष्ट वा गर्भित अनुमति हवी.

राजाने राज्याभिषेक करून घेण्याचा एक अन्य लाभ होता. राजाचे मन्त्री, सेनापति अशा अधिकार्‍यांना त्यांचे अधिकार राजा अभिषिक्त आहे ह्या विचारापासून प्राप्त होत. अन्यथा अशा मन्त्र्यांच्या वा सेनाधिकार्‍यांच्या आज्ञा इतरांनी न मानण्याची शक्यता होती.

गागाभट्टाने तयार केलेल्या 'शिवराज्याभिषेकप्रयोगा'ची एकुलती एक उर्वरित प्रत बिकानेर दरबारच्या संग्रहामध्ये उपलब्ध होती. ती मिळवून वा.सी.बेन्द्रे ह्यांनी १९६० साली इंग्रजी प्रस्तावनेसह ती प्रकाशित केली. त्यामध्ये लिहिल्याप्रमाणे असा राज्याभिषेक केला जाणे आवश्यक आहे असे गागाभट्टाचे मत होते कारण त्याशिवाय अन्य तालेवार मराठा देशमुख, पाटील - उदा. जावळीचे चन्द्रराव मोरे - शिवाजीचे श्रेष्ठत्व मानायला तयार झाले नसते. ब्राह्मण सरकारकून आणि मन्त्री आपल्या ब्राह्मण्याच्या अधिकारातून स्वतःला शिवाजीहूनहि सामाजिक पातळीवर श्रेष्ठ मानण्याची शक्यता होती. अशा सर्व शक्यता नष्ट करण्याच्या हेतूने शिवाजीने राज्याभिषेक करवून घेणे आवशयक आहे असे गागाभट्टाने पटवून दिले आणि स्वतः असा वेदोक्त विधि तयार केला असे वा.सी.बेन्द्रे प्रस्तावनेमध्ये लिहितात.

असे राज्याभिषेकविधि अथर्ववेदाच्या गोपथब्राह्मणामध्ये, विष्णुधर्मोत्तरपुराणात, वसिष्ठसंहितेमध्ये, हेमाद्रिकृत चतुर्वर्गचिन्तामणि ह्या ग्रन्थात उपलब्ध आहेत. गागाभट्टाचे कुटुंब मूळचे पैठणचे. त्याच्या चारपाच पिढया काशीमध्ये मान्यवर विद्वान म्हणून मानल्या गेल्या होत्या आणि गागाभट्टालाहि तसाच मान भारतभर होता. त्याने शिवराज्याभिषेकासाठी ८ दिवस चालणारा राज्याभिषेकविधि तयार केला आणि तदनुसार ६ जून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला अभिषेक, सिंहासनारोहण आणि राजदर्शन हे विधि होऊन राज्याभिषेक संपन्न झाला.

वा.सी.बेंद्रेंच्या प्रस्तावनेमध्ये अन्य कोणी राजपूत इत्यादि राजांनी असा विधि घडवून आणल्याचे लिहिलेले नाही. वर म्हटल्याप्रमाणे असा विधी करवून घेण्याला अन्य समपातळीच्या भाऊबंदांची स्पष्ट वा गर्भित संमति आवश्यक असते. राजपूतांमध्ये कोणा एकाने असा विधि स्वतःसाठी करवून घेणे मान्य झाले असते असे वाटत नाही. तसेहि पाहता बहुतेक राजपूतांनी दिल्लीचे स्वामित्व मान्य केलेले असल्याने त्यांचा 'राज्याभिषेक' उपहासाचा विषय ठरला असता. नंतरच्या जमान्यात ब्रिटिश सम्राटाचे मांडलिकत्व त्यांनी कबूल केले. तेव्हापासून राजपूत आणि अन्य मांडलिक संस्थानांमध्ये राज्याला वारस मान्य करतांना throne ऐवजी gaddi आणि king ऐवजी prince असेच शब्द वापरत असत हे लक्षात येते. त्यांना आपल्या नावांमागे HH (His Highness), HEH (His Exalted Highness) (हैदराबादचा निझाम) ही अक्षरे लावण्याची मुभा होती, मात्र HM (His Majesty) हे वापरायला बंदी होती.

अलीकडील काळातील मला माहीत असलेली दोन उदाहरणे देतो. मध्यपूर्वेमध्ये सौदी घराण्यात 'राजे' - Kings - असतात. ओमानचे सुलतान काबूस ह्यांचीहि स्वतःला 'राजा' हा किताब घ्यायची इच्छा होती. ओमानमध्ये जुन्या काळापासून प्रमुख सत्ताधारी 'इमाम' आणि अलीकडे 'सुलतान' म्हणून ओळखला जातो. सुलतान काबूस ह्यांनी स्वतःला 'राजा' असे म्हणवून घ्यायला अन्य अरब राज्यांचा विरोध असल्याने ते अजून 'सुलतान'च राहिले आहेत. विल्यम पहिला (Wilhelm I) १८ जानेवारी १८७१ ह्या दिवशी जर्मन सम्राट - Emperor of Germany - म्हणून घोषित झाला. राणी विक्टोरियाला ह्याचे वैषम्य वाटल्याने १८७७ मध्ये तिलाहि हिंदुस्थानची सम्राज्ञी म्हणून घोषित करण्यात आले. (तरीहि इंग्लंडपुरती ती राणीच राहिली, सम्राज्ञी झाली नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डीटेल स्पष्टीकरणाबद्दल अनेक धन्यवाद. राज्याभिषेकाची आवश्यकता होती याबद्दल कसलेच दुमत नाही. रजपूत आणि बाकी उदाहरणांबद्दलही स्थितोऽस्मि गतसन्देह:, परन्तु विजयनगरचे काय? त्यांचा राज्याभिषेकविधीही अशाच थाटाचा असला पाहिजे असे वाटते. असो. बाकी काही असले तरी गागाभट्टांनी जवळजवळ नव्यानेच हा विधी मांडला म्हटले तरी चालेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Emperor of Germany ह्याची लैच मज्जाय. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात जर्मनी काही एक देश नव्हता. (तसा इटालीही नव्हता, पण ते सध्या जाउ देत.) आज ज्याला जर्मनी म्हणतात त्या भूभागात अनेक सरदार घराणी होती. काही घराण्यांचे आसपासच्या भूभांगवरही थोडेसे ओव्हरलॅप होते. म्हंजे ऑस्ट्रिया वगैरे. बहुतेक घराणी holy roman empire च्या काळाशी नाते सांगणारी होती. त्यांच्या काळात हे सरदार झाले होते. विजयनगरच्या अधिपत्याखाली कसे अनेकानेक 'नायक ' स्थानिक सामंत असत, तसेच. म्हैसूर मदुरैचे नायक त्यातल्या त्यात फेमस.नंतर स्वतंत्र झालेले.) असे शेकडो सरदार जमिनदार. त्यांचय हाताखालचे छोटे छोटे प्रदेश. काहिंचे तर अगदि आपली गढी आणि तयच्या आसपासचा इलुसा भूभाग इतकेच नियंत्रण असेही होते. पण ह्यांना आपल्या वंशाचा अस एकदम अभिमान वगैरे होता. मोठ्या घराण्य्चे म्हणून. (काही चित्रप्टांत असल्या हुच्चभ्रुंच्या अभिमानाचे मिश्किल वर्णन असते; तेच हे. "आम्ही" राजे; असा उल्लेख करणारी मंडळी.)
ह्यापैकी त्यातल्या त्यात सर्वात बलाढ्य सरदार घराणे म्हणजे प्रशियाचे. १८१५ मध्ये नेपोलियनशी पंगा घेत वाटर्लूत ब्रिटिशांना मदत करत निर्णायक भूमिका निभावणार्‍या लोकांशी ह्यांचे नाते. प्रशिया हा जर्मनीतला सर्वात संघटित व मोठा प्रांत. ह्यांनी एकेक करत इतर प्रांत ताब्यात घ्यायला सुरुवात केली. जर्मनीचे ते फेमस एकीकरण वगैरे सुरु झाले. मग बिस्मार्क वगैरे मुत्सद्दी मंडळीही त्यात आलीच. प्रशियन राजघराणे आता de facto मालक झालेच होते आज जर्मनी म्हणता येइल अशा भागाचे. म्हणजे अप्रत्यक्ष राजे.पण त्यांना Emperor of Germany अशी पदवी दिलयस इतर जुनी मातब्बर घराणी दुखावतील म्हणून एकानं पर्याय सुचवला -- ह्यांना emperor of Germans अशी अप्दवी द्यावी. म्हणजे... "जर्मन जनतेचे हृदयसम्राट " ह्या अर्थाने. पण बहुतेक ऐसीवरचया गब्बर सिंगाचं भूत प्रशियन राजघराण्यात शिरलं असावं. त्यांनी असल्या भिकार बिरुदापेक्षा आमचं खास राखीव दर्जेदार प्रशियन बिरुदच आम्हाला प्रिय आहे. दळभद्री 'मासेस'चं , 'फडतुसां'चं राजेपण आम्हाला नको; अशी भूमिका घेतली. आता आली का पंचाइत ? त्यांचे मंत्री त्यांअन लै समजावू लागले की सायबा, असं नका करुसा. अशानं बाकिचेबी आपल्या बरुबरित यितिल. आपल्याला कैतरी भारी भारी टायटल लावाला पायजेलाय का नाय ? पण राजघराणे बधेना.
Emperor of Germany इतर लोक मान्य करणार नाहित; आणि emperor of Germans राजघराण्याला पटणार नाही अशी स्थिती आली. पण तेवढ्यात एका मंत्र्यात बिरबलाचा आत्मा शिरला असावा. तो म्हटला दोन्ही बिरुदं सोडून द्या. german emperor हे बिरुद कसं वआटतय ?
हे मात्र दोन्ही पार्ट्यांना मान्य झालं. कारण जर्मन वंशाचा, कीम्वा जर्मना भाषेत बोलणरा सम्राट हे त्या राजघराण्याला चालण्यासारखं होतं. ह्यात फडतूसांचा उल्लेख नव्हता. आणि उर्वरित घराण्यांनाही हे मान्य होतं कारण ह्यात संपूर्ण जर्मनीवरचे एकमेव सम्राट (Emperor of Germany) असा अर्थ नव्हता. कसं बसं तोडीपाणी झालं, मांडावली झाली आणि जर्मन एकीकरण झालं.

ह्यानंतर सर्व व्यवस्थेवर मजबूत पकड बसल्याने म्हणा किम्वा प्रत्यक्ष ताबा मिळाल्याने म्हणा Emperor of Germany हा किताब राजघराण्याने योग्य वेळ मिळताच आणि ताकद वाढताच घीउन दाखवला.

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर माहितीपूर्ण लेख आणि तसेच तोलामोलाचे प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अख्ख्या धाग्यालाच (प्रतिसादांसकट) माहितीपूर्ण श्रेणी द्यावी लागेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!