डॉन ऑफ जस्टीस - नेमकं खटकतंय काय?

******पुढे स्पोइलर्स आहेत******

‘बॅटमॅन वि सुपरमॅन – डॉन ऑफ जस्टीस’ गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाल्यापासून त्याबद्दल मिश्र प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. काहीजण अगदी चित्रपट अगदी सुमार दर्जाचा आहे असं म्हणतायत तर बहुतांशी लोकांचं चित्रपट बरा असला तरी अपेक्षा पूर्ण करत नाही असं म्हणणं आहे. काहींनी एक गल्लाभरू बॉलीवूडपटाची उपमा या चित्रपटाला दिलीये. आधीच नकारात्मक प्रतिक्रिया वाचल्या/ऐकल्यामुळे पाहावा की नाही याबद्दल साशंकच होतो. पण तरी राहवत नव्हतं म्हणून बघितला. खरं म्हणजे जितका वाईट म्हणून याची प्रतिमा समिक्षकांद्वारे तयार करण्यात आलेली आहे ती तितकीशी खरी नाही असं वाटतं. मनोरंजन करण्यात डॉन ऑफ जस्टीस बऱ्याच अंशी यशस्वी ठरतो. पण तो मनाला भावत नाही. सुपरमॅनचं ठीक आहे पण नोलनचा बॅटमॅन ज्यांच्या मनात भरून राहिलाय त्यांना झॅक स्नायडरचा बॅटमॅन पटत नाही किंवा कदाचित समजत नाही.

डीसी कॉमिक्सच्या बॅटमॅनचे ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ३ भाग जेव्हा आले तेव्हाच अनेक लोकांना त्याने भुरळ घातलेली. ख्रिश्चन बेलने साकारलेला ब्रूस वेन , एका अतिश्रीमंत घराण्यातला साधारण मुलगा. लहानपणी आईवडील गमावलेला. अनाथ. आल्फ्रेड नावाच्या प्रामाणिक नोकरासोबत राहणारा. लहानपणापासून वटवाघळांची भीती मनात बसलेला, स्वत:च्या मानसिक अस्वस्थतेशी झुंजणारा , भूतकाळाशी सतत बांधला गेलेला ब्रूस भीतीवर मात करण्यासाठी त्या भीतीला कवटाळतो आणि स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवून बॅटमॅन असे नाव धारण करून आपल्या गोथम शहराचे रक्षण करण्यासाठी सरसावतो ही संकल्पनाच ग्रेट होती. इतर सुपरहिरोप्रमाणे कोणतीही जादुई अथवा अमानवी शक्ती नसताना तो बॅटमॅनचा मुखवटा घालून एकटा शत्रूविरुद्ध लढतो केवळ आपल्या परिश्रम ,बुद्धी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने. कोणत्याही चमत्काराशिवाय,एक माणूस म्हणून. तोही अनेक बाबतीत कमकुवत असलेला सामान्य माणूस. तुमच्याआमच्यासारखा एक. आल्फ्रेड आणि लुशियस फॉक्स नावाच्या सहाय्यकाच्या मदतीने तो आपली जबाबदारी पार पाडतो. शहरचा पोलिसप्रमुख गॉर्डनचा तो मित्र असतो. पण फक्त याच गोष्टी नव्हत्या की ज्यामुळे लोकांना बॅटमॅन भावला. त्या पात्रामध्ये अजून बरंच काही होतं.
पिढ्यानपिढ्या पुरेल इतकी संपत्ती असताना सुखासीन,आरामदायी जीवनाचा त्याग करण्याची इच्छाशक्ती होती, लोकांचा माणुसकीवरील विश्वास कायम राहावा म्हणून न केलेल्या गुन्ह्यांचा आळ स्वत:वर घेऊन वाईटपणा घेण्याची हिम्मत होती , शत्रूंना जीवनदान देण्याची दयाबुद्धी होती , आपल्याहून प्रबळ शत्रूकडून आपला संपूर्ण पराभव झालेला असताना मरणाच्या खड्ड्यातून वर येऊन नव्याने सुरुवात करून पुन्हा झेप घ्यायची धमक होती. मुळात पराभवातून महानतेकडे झेप घेणारी माणसे लोकांना सर्वात जास्त भावतात. मग बॅटमॅन लोकांना पसंत न पडता तरच नवल.

तिन्ही चित्रपटांत अगदी छोट्या छोट्या प्रसंगांतदेखील अनेक मोठे संदेश होते.सुंदर संवाद होते. अनेक प्रसंग खऱ्या आयुष्यात प्रेरणादायी ठरतील असे होते. बॅटमॅन ट्रायोलॉजी पाहून अनेकजणांना वैयक्तिक आयुष्यात प्रेरणा मिळाल्याचीही उदाहरणे आहेत.

याविरुद्ध सुपरमॅन हा कितीही शक्तिशाली आणि महान असला तरी तो शेवटी परग्रहवासी आणि त्याच्याकडे असलेल्या अमानवी शक्ती त्याला आपसूक मिळालेल्या.त्यामुळे अनेक लोकांना बॅटमॅन जितक्या जवळचा वाटला तितका सुपरमॅन कधीच वाटला नाही. ज्याला कधीच काही होऊ शकत नाही अशा सुपरमॅनची कहाणी जाणण्यापेक्षा मृत्यूची पूर्ण शक्यता असतानाही शक्तीनिशी लढणाऱ्या हाडामांसाच्या मनुष्याची कहाणी जाणून घेणे त्यांनी पसंत केले. पण तरीही अक्ख्या पृथ्वीवर राज्य करण्याची क्षमता असतानादेखील आपल्या शक्तींचा दुरुपयोग न करण्याची आणि मानवहितासाठी वापरण्याची सद्सद्विवेकबुद्धी असणाऱ्या सुपरमॅनबद्दल लोकांच्या मनात नेहमीच आदर होता,आहे.

दोघेही वाईट प्रवृत्तींविरुद्ध लढणारेच आहेत. दोघेही चांगलेच आहेत. पण दोन चांगल्या प्रवृत्तींमध्येदेखील लढाई होऊ शकते. त्यांच्यातही मतभेद असू शकतात. याच धर्तीवर हा चित्रपट आला आणि लोकांची उत्सुकता ताणली गेली. दोघांमध्ये जिंकणार कोण? सर्वशक्तिमान सुपरमॅन की मर्त्य बॅटमॅन?

पण मग मेख इथेच आहे. मुळात या लढाईत कोणा एकाचा विजय होईल ही शक्यता ट्रेलर पाहताच संपुष्टात आलेली असते आणि प्रत्यक्ष चित्रपटात घडतंही तेच. एक प्रसंग वगळता यात दोघांची मरेस्तोवर आमनेसामने लढाई अजिबात होत नाही. अंतिम लढाई ही त्या दोघांची नसतेच. ती कधीच झाली नसती. त्यात दोघांची लढाई होणार म्हटलं की चित्रपट पाहायला सुरुवात करण्याआधी बॅटमॅन म्हणून आपल्या डोळ्यासमोर तरळत असतो तो नोलनने उभा केलेला , ख्रिश्चन बेलने साकारलेला बॅटमॅन. मग नकळत आल्फ्रेड, गोर्डन, फॉक्स ही माणसे आपल्याला दिसू लागतात. आपण डीओजे पाहायला जाताना आपल्या मनात बॅटमॅन ट्रायोलॉजीचे भागच मनात असतात. पण मग कळतं की हा बॅटमॅन तो नाहीच आहे. हा वेगळा असतो. डीओजे मधला बॅटमॅन हा सुरुवातीपासूनच आक्रमक दाखवलाय. आणि काही प्रसंगी तो हिंसक आणि क्रूरही वाटतो. अथक प्रयत्नांनंतर जेव्हा तो सुपरमॅनला पराभूत करण्यात यशस्वी ठरतो त्यावेळी तर त्याच्यात संचारलेला राक्षस अक्षरश: बघवत नाही. सुपरमॅन हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे याच भावनेतून तो सतत विचार करताना दिसतो. बॅटमॅनबद्दलच्या आपल्या मनातल्या प्रतिमेला बसलेला हा धक्का खूप मोठा असतो. अर्थात बेन अॅफ्लेक ही भूमिका साकारताना कमी पडलाय असं अजिबात नाही. उलट त्याने ख्रिश्चन बेलच्या बॅटमॅनची नक्कल केली नाही हे चांगलंच झालं. कदाचित तो समजताना माझीच थोडीशी गफलत झाली असावी.

पण या एकमेव लढाईनंतर मात्र हे दोघे एकत्र येतात आणि आपला खरा शत्रू लेक्स ल्युथर आणि त्याने निर्माण केलेला राक्षस डूम्सडे याच्याविरोधात दंड थोपटतात आणि लढतात. या कामात त्यांना वंडरवूमन (या पात्राविषयी जास्त माहिती नाही त्यामुळे जास्त लिहित नाही) मदत करते.

हे असंच काहीतरी होणार आहे याचा अंदाज सुरुवातीपासूनच यायला लागतो. डूम्सडे चे आगमन धक्कादायक असले तरी बसलेला धक्का रिश्टर स्केलवर थोडा कमीच पडतो.

एका अर्थाने एकमेकांच्या विरोधात असलेल्या दोन चांगल्या प्रवृत्ती एकमेकांचा जीव न घेता अखेर मानवजातीच्या रक्षणासाठी एकत्र येतात ही आनंदाची बाब. पण हे होताना “मार्था” या नावाचा केलेला वापर अगदीच बाळबोध वाटतो. दोघे एकत्र येण्यासाठी अजून ठोस आणि शक्तिशाली कारण असतं तर तो प्रसंग अधिक प्रभावी होऊ शकला असता असं वाटून जातं. सुरुवातीपासून आक्रमक असणारा ब्रूस शेवटी मात्र सामंजस्याची भूमिका घेतो ही गोष्ट मात्र तेवढीच सुखावून जाते हे पण खरंच.

बॅटमॅन ट्रायोलॉजीमध्ये आल्फ्रेड-ब्रूस जोडीला खूप वाव आहे. त्यांच्यामधलं नातं तीन भागांमध्ये छान खुलत गेलंय. एकापेक्षा जास्त सुपरहिरो पात्रे असल्यामुळे इथे त्या नात्याला फारसा वाव नसणार हे जरी मानलं तरी आल्फ्रेड-ब्रूसचं गणित इथे थोडंसं चुकल्यासारखंच वाटतं. मायकल केनने साकारलेल्या आल्फ्रेडची आठवण सतत येत राहते.

लेक्स लुथरची भूमिका केलेल्या जेसी आयझेनबर्गची भूमिका चांगली आहे पण उगाच त्यात शाहरुख खान टाईप बोलण्याची झलक दिसून येते. वैयाक्तिक्दृष्ट्या बेन अॅफ्लेक आणि हेन्री कॅवेल दोघेही मला आवडले. आल्फ्रेड म्हणजे जेरेमी आयर्नस आणि वंडरवूमन गाल गडोट(शेवटचे काही प्रसंग वगळता) यांना मात्र फारसा वाव नाही. आणि इतरांनाही नाही.
खटकलेल्या गोष्टींपैकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पार्श्वसंगीत. त्यात मात्र चित्रपट खूपच कमी पडलाय. अंगावर रोमांच आणणाऱ्या बॅटमॅन ट्रायोलॉजीच्या पार्श्वसंगीताची धून अजूनही कानात घुमत असताना इथे मात्र अगदी भ्रमनिरास होतो. इतक्या मोठ्या चित्रपटाची निर्मिती करताना पार्श्वसंगीताकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष व्हावं हे पटत नाही.

तरीही डीओजे हा सुमार चित्रपटांच्या यादीतला नाही असं मला वाटलं. अनेक प्रसंग खूप चांगले आहेत. कथा संथ असली तरी अगदीच रटाळ नाही. अनेक संवाददेखील अर्थपूर्ण आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा बॅटमॅन सुपरमॅनला “डू यु ब्लीड?” असं विचारतो आणि सुपरमॅन उत्तर न देता निघून गेल्यावर भेदक आवाजात तो “यु विल!!” म्हणतो तो प्रसंग. किंवा “People hate what they don’t understand” हे वाक्य.

एकंदरीत सिनेमा मला मनोरंजक वाटला पण तरीही जितकी अपेक्षा केलेली तितकी मजा नाही आली. काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. असो. अनेकांनी आगामी जस्टीस लीग या चित्रपटाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी हा घाट घातला गेल्याचंही म्हटलंय. असेलही. निदान शेवटच्या काही वाक्यांवरून तरी असं वाटतंय. वाट पहायला हरकत नाही.

पण डीसी कॉमिक्सच्या या दोन गुणी सुपरहिरोजना पुन्हा एकमेकांविरुद्ध लढण्याची बुद्धी न होवो हीच इच्छा आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

अतिशय फडतुस कारणावरुन दोन भाउ- सॉरी सुपर हिरो एकमेकांच्या विरोधी बनतात अन नंतर एकत्र येतात. ते कमी की काय अत्यंत गचाळ रटाळ अ‍ॅक्शन ज्यात स्पेशल इफेक्टच्या नादात काय घडत आहे पडद्यावर याचेही आकलन होत नाही.. अन कडी म्हणजे नोलानची दिग्दर्शन स्टाइल मारायचा केलेला फुटकळ अट्टहास. हे कमी की काय म्हणून सुपरम्यानला आत्मघाती हल्लेखोर बनवणे इज टोटल बुलशीट. त्यापेक्षा बॅटमेन वर्सेस आयर्नमेन या दोन प्लेबॉय व्यापार्‍यांच्यात सामना मस्त रंगला असता. असो...

तरीही मला काही ड्वयलोक आवडले.. (हिंदी डब वर्शन)जसे की दुनिया का सबसे बडा झुट.. ताकत मासुम होती हय. अगर इश्वर सर्वशक्तीमान है तो वोह दयालु नही है अगर दयालु है तो शक्तीमान नही है. व्हिलननेच मज्या आणली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

टुकार आहे चित्रपट...

पैशे वाया गेले..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0