Skip to main content

पल्प फिक्शन

सगळेच दिवे,पेटतात विझतात
सगळेच खांब, हलतात पडतात.

डोक्यावर चंद्र,बेताल गातो
पारावर कावळा, टोचून खातो.

आगीची गुढी,आगीची काठी
नैवेद्याला,राखेची वाटी.

तहान तहान,शरीर बेभान
अलगद ऑरगॅझम,गादी परेशान.

इथली मुक्ती,तिथली मुक्ती
प्रवचन पेग,संध्याकाळी सक्ती

काँक्रीटचं जंगल,जंगलातलं तळं
काठापाशी रांगतंय, बेवारशी जुळं.

आपलेच दात,आपलेच ओठ
चराचराला मधाचं बोट.

कोण म्हणतं वाया,कोण म्हणतं शिल्लक
सापाचा मूड,गारुडी कफल्लक.

आडवा डोंगर,तिरके पाय
शिखराचं लक्षण,समजत नाय.

सुसाटते गाडी,रस्त्याला ताप
माडीवरलं सत्य,उगीचच पाप.

नवरा बायको,खासमखास
उरलेली भांडी,घासून टाक.

केकाटतं पोर,जिवाला घोर
उगीच म्हणायचं,नाचतो मोर.

मसणात जगा,कविता करा
ढेकूण मारा,'वध' म्हणा.

आयच्यान सांगतो,शेणाचं लक
एरवी विष्ठा विचार? व्हॉट द फक!

नगरीनिरंजन Thu, 09/02/2012 - 14:43

काँक्रीटचं जंगल,जंगलातलं तळं
काठापाशी रांगतंय, बेवारशी जुळं.

केकाटतं पोर,जिवाला घोर
उगीच म्हणायचं,नाचतो मोर.

या विशेष भिडल्या.

ऋषिकेश Thu, 09/02/2012 - 16:11

वा! बर्‍याचशा द्विपदी जमून आल्यात

ऐसीवर स्वागत

धनंजय Mon, 13/02/2012 - 07:34

छान.

पण हे कडवे वेगळे का?
> नवरा बायको,खासमखास
> उरलेली भांडी,घासून टाक.

उत्पल Tue, 14/02/2012 - 08:24

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार...

धनंजय, ते कडवं तसं इतर कडव्यांपेक्षा थेट असलं तरी त्यातला 'भाव' इतर कडव्यांसारखाच आहे... :)

क्षिप्रा Tue, 14/02/2012 - 10:46

मस्त द्विपदी आहेत सगळ्या!
हे विशेष!
केकाटतं पोर,जिवाला घोर
उगीच म्हणायचं,नाचतो मोर.

मसणात जगा,कविता करा
ढेकूण मारा,'वध' म्हणा.

रुची Tue, 14/02/2012 - 14:11

कविता खूप आवडली. भावनांशी पूर्ण् तः संंमत! खूप दिवसांनी एक छान कविता वाचण्यात आली.
आडवा डोंगर,तिरके पाय
शिखराचं लक्षण,समजत नाय.
हे फक्त नीटसं समजलं नाही.

उत्पल Wed, 15/02/2012 - 08:27

In reply to by रुची

धन्यवाद रुची....

शिखर नक्की कुठे आहे, किती दूर आहे या अर्थी 'शिखराचं लक्षण'...