विषय सर्वथा...! (निमित्त : 'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट')
विषय सर्वथा...!
(निमित्त : 'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट')
'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट' ह्या कथेचा अंकातला दुवा
प्रत्येक साहित्यकृतीची जन्मकथा आणि लेखनप्रक्रिया वेगळी असते आणि मनाच्या वावरात कथाबीज कुठे गवसलं, रुजलं, अंकुरलं आणि त्याचा विकास कसा झाला ही प्रक्रिया दर वेळी आठवतेच असं नाही. परंतु काही साहित्यकृतींच्या बाबतीत मात्र काही गोष्टी ठळकपणे आठवतात. जसं की, 'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट' ह्या कथेची जन्मकथा.
माझ्या बाबतीत कथा (खरं तर कोणतंही लिखाण) आधी लिहिली आणि शीर्षक नंतर दिलं असं सहसा घडत नाही. किंबहुना नेमकं शीर्षक सुचेपर्यंत लिखाणाचा हवा असलेला ओघ मला सापडता सापडत नाही. चाचपडायला होतं. त्यातही काही वेळा असंदेखील घडतं, की मुळात जुळलेलं शीर्षक, हे लिहिणं सुरू केल्यानंतर मध्येच तितकं समर्पक वाटेनासं होतं. मग विचारप्रक्रियेत आणखी वेगळं शीर्षक जुळतं आणि ते पक्कं ठरलं की त्यानुसार कथा पुन्हा पहिल्यापासून लिहावी लागते. त्यामुळे शीर्षक सुचणं ही माझ्यासाठी अत्यंत मर्मवेधक अशी सखोल प्रक्रिया असते, जी त्या कथाद्रव्याभोवती जमा झालेल्या आशयद्रव्याचा परिपाक अशा स्वरूपाची असते. मला शीर्षक हे कथादेहाची शेंडी अशा स्वरूपात हवं असतं, की जिला धरून तो देह उचलला / उकलला जावा. तर शीर्षकाबद्दलची माझी प्रक्रिया एवढी जटील आहे. मनात खूप घुसळण होऊन ते अवतरतं. अर्थातच ते माझं मलाच सुचावं लागतं. परंतु ह्या कथेच्या बाबतीत मात्र जरा वेगळं घडलं. ते असं, की हे शीर्षक मुळात मला सुचलं नव्हतं. त्याचा उगम माझा मित्र युसुफ शेख ह्याने मला सुचवलेल्या दोन शब्दांमध्ये होता. जे शब्द होते 'पिठाची पुची'.
आता जरी 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी'मध्ये ह्या शब्दाचा जाहीर आणि सामुदायिक गजर होत असला तरी ही कथा १९८५ साली - म्हणजे ३० वर्षांपूर्वी - लिहिली, तेव्हा हे शीर्षक असलेली कथा प्रकाशित होणं जवळपास अशक्य होतं. त्यामुळे हे शीर्षक बदलणं मला अनिवार्य वाटलं. शिवाय युसुफने सुचवलेल्या त्या शीर्षकातून मला जाणवलेला अनुस्यूत अर्थ वाचकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणं माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं. त्यासाठीदेखील शीर्षकात समर्पक बदल करायलाच हवा होता. साहजिकच कल्पकतेचा कस लावण्यासाठी पूर्ण वाव होता. थोडक्यात काय, तर युसुफने सुचवलेल्या दोन शब्दांमध्ये कथाबीज असल्याचं मला जाणवलं होतं, जे माझ्या बाबतीत तरी सहसा घडत नाही. पण युसुफच्या बाबतीत ते घडलं ह्याचं कारण आमचा रॅपो हे होतं. त्यामुळे ह्यापुढची प्रक्रिया सांगण्यापूर्वी युसुफ आणि माझ्यातील अंडरस्टँडिंगबद्दल लिहितो.
युसुफ हा मला माझ्या नोकरीच्या ठिकाणी म्हणजे 'बँक ऑफ इंडिया'च्या बॉम्बे ऑफीसमध्ये भेटलेल्या मोजक्या मित्रांपैकी एक. त्याचा-माझा परिचय वाढला तो दोघांनाही असलेल्या साहित्याच्या ओढीतून. युसुफचं शालेय शिक्षण हे कराड-ढेबेवाडीजवळील काळगावमध्ये झालेलं, पण तिथे असतानादेखील तो 'सत्यकथा' हे तेव्हाचं आघाडीचं वाङ्मयीन मासिक वाचायचा. नंतर तो मुंबईला आला आणि नायगाव इथे राहायला लागला. साहजिकच तो वेळ मिळाला की साहित्याच्या ओढीमुळे 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया'मध्ये जायला लागला. तिथे मनोहर ओक, तुलसी परब, नामदेव ढसाळ, राजा ढाले असे तेव्हाचे 'हट के' लिखाण करणारे लोक आणि 'लघु-अनियतकालिकं' ह्यांच्याशी त्याची ओळख झाली. सांगायचंच तर, नामदेव ढसाळच्या 'गोलपिठा' ह्या पहिल्याच कवितासंग्रहाच्या प्रकाशनसमारंभाला युसुफ हजर होता. स्वतः युसुफदेखील त्याच्या अत्यंत सुंदर हस्ताक्षरामध्ये मिताक्षरी कविता करत असे. त्या कुठे-कुठे प्रकाशितदेखील होत होत्या. परंतु त्याच्या लिखाणाचा वेग तसा फारसा नव्हता. त्याचं वाचन मात्र सतत चालू असायचं. मराठी आणि इंग्रजी, दोन्ही.
आमच्या ग्रुपमध्ये साहित्य-संस्कृतीवर सतत गप्पागोष्टी व्हायच्या. हेमंत कर्णिक, विश्वास पाटणकर, गोपाळ आजगावकर, सुधीर प्रधान हे माझे कॉलेजच्या दिवसांपासूनचे साहित्यप्रेमी मित्रदेखील माझ्यामागोमाग नेमके बँक ऑफ इंडियातच लागले होते आणि त्या काळात बँकामध्ये आजच्याइतकं कामदेखील नसे. त्यामुळे दिवसभरात आम्ही नाश्ता, जेवण आणि किमान दोन वेळा चहा पिण्यासाठी एकत्र भेटत असू. भेटलो की सहसा 'शिळोप्याच्या' नव्हे, तर साहित्य, संस्कृती, समाजकारण, राजकारण अशा क्षेत्रांमधील अनेक विषयांवर अटीतटीने, हमरीतुमरीवर येत गप्पा व्हायच्या. त्यात आमच्या वयानुसार लैंगिकता / स्त्रीपुरुष संबंध हा विषय अधनंमधनं अर्थातच असायचा. आणि त्यावर बोलतानादेखील खुसखुशीत असलं तरी सपक नव्हे; तर आपल्या परीने तात्त्विक, मौलिक, मार्मिक बोलण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असायचा.
जसं की एकदा - 'दोन माणसांची मनं जुळली असता शरीरं जुळली, तर त्यात समाजाला आक्षेपार्ह काय वाटावं?' ह्यावर जोरजोरात चर्चा होऊन बहुमताने ठराव पास होण्याच्या पायरीवर असताना कुणीतरी विचारलं, की "समजा एखादी स्त्री - मन जुळणं तर सोडूनच द्या, पण ते काय असतं हे कळायच्या आधीच - शरीरं जुळवायला तयार असली, तर तुम्ही तयार होणार का नाही?" हा प्रश्न समोर आल्यावर मनं जुळायचा उदात्त हेतू लटका / फोल असल्याचं जाणवून त्या चर्चेतली हवाच निघून गेली, आणि मग 'ह्या बायका साल्या, मनं जुळल्याशिवाय शारीरिक संबंधांना तयार होत नाहीत' ह्या पूर्वापार पुरुषी अडचणीकडे चर्चा वळली. असो. तर हा एक मासला झाला, एवढंच.
तर आमच्या ह्या गप्पांमध्ये काही वेळा एकमेकांवर एवढ्या तावातावाने तुटून पडलं जायचं, की ह्या गप्पासत्रांचे जे श्रोते असायचे त्यांना वाटायचं - आता हे भांडणारे एकमेकांचं पुन्हा तोंड पाहणार नाहीत. परंतु दोन-चार तासांनी सगळं टोळकं पुन्हा जमायचं आणि वाद-संवाद पुन्हा नव्याने सुरू व्हायचा. संध्याकाळीदेखील गाड्यांची गर्दी कमी होईपर्यंत फोर्टातील वेगवेगळ्या ठिकाणी भटकण्याकडे आमचा कल असायचा. त्यात बाहेरचे मित्रदेखील असायचे. वैचारिक धुमाकूळ चालायचा.
आमच्यातील बहुतेक जण मुंबईत वाढलेले असले, तरी युसुफचं बालपण कराडला आणि विश्वासचं बालपण दापोलीला गेलेलं होतं; ते आम्हां हेलरहित मुंबईकरांना गुंगवून टाकायचे. हा युसुफ तेव्हा 'श्याम मनोहर, विलास सारंग आणि अनिल डांगे' ह्या तीन आघाडीच्या कथाकारांच्या कथांवर बारकाईने लक्ष्य ठेवून असायचा. ह्यांच्या कथा तेव्हा 'सत्यकथे'मध्ये धडाधड छापून येत असत. त्यावर जोरजोरात चर्चा चालायची. हे तीनही कथाकार माझेदेखील कॉलेजच्या दिवसांपासून आवडते होते. त्यामुळे आमच्या गप्पांमध्ये मराठी नवकथेचा विषय हटकून असायचा. मी तेव्हा कविता लिहायचो. माझी प्रत्येक कविता आणखी कुणी वाचली न वाचली, तरी युसुफ आवर्जून वाचायचा. त्यात काही सूचनादेखील करायचा. कॉलेजच्या आसपासच्या वर्षांमध्ये लिहिलेल्या 'हौशी' स्वरूपाच्या कवितांचा माझा जो एकमेव संग्रह आहे, त्यातील कवितांची निवड युसुफनेच केली होती.
नंतर मी कवितांबाबत असमाधान वाटून कथा लिहायला लागलो. तेव्हादेखील त्यातलं आशय-विषयांचं वेगळेपण युसुफला बरोबर जाणवत होतं. आमच्या रॅपोविषयीचा उल्लेख सुरुवातीला केला आहेच. तर त्यामुळे शहरी ते ग्रामीण पातळीवरच्या लैंगिक दांभिकतेतून उद्भवणार्या मनोगंडांबद्दल आमच्यात बर्याचदा बोलणं व्हायचं. दरम्यान युसुफला प्रमोशन मिळून तो बिहारमधील भागलपूर येथे गेला. बँकेतील बहुतांश लोक तेव्हा बिहारसारख्या राज्यात बदली झाली, की जणू नरकात जावं लागतंय अशा सुरात बोलायचे. युसुफचा खाक्याच वेगळा होता. तो राजकीयदृष्ट्या पहिल्यापासूनच सजग होता. त्यामुळे बिहारसारख्या राजनीतिपटू वातावरणात तो मस्त रमला. शिवाय त्याच्या ग्रामीण पिंडालादेखील बिहार, परका तर सोडूनच द्या, पण जवळचा वाटला होता. त्यात त्याचं कुटुंब इथे मुंबईतच होतं आणि हा पठ्ठ्या तिकडे एकटा सडाफटिंग. वर्षातून दोन-चार वेळा तो आला, की आमच्या अर्थातच गाठीभेटी होत आणि आतल्या गोटातल्या गप्पा. त्यावर तो एकदा मला म्हणाला की, "बाबा, तुझ्या स्टाइलमध्ये 'पिठाची पुची' ह्यावर एक कथा लिही." ह्याउप्पर तो मला एका शब्दाने बोलला नाही. पण मला त्यातली आच/गोम नेमकी जाणवल्यासारखं वाटलं आणि ऐकताक्षणी डोक्यात ते बीज रुजलं.
मुळात मला हे जाणवलं, की कथेचा नायक हस्तमैथुनासाठी पिठातून योनी काढतो असं दाखवणं शक्य असलं; तरी तंतोतंत ह्या शीर्षकाची कथा लिहिली, तर ती प्रकाशित करणं जवळपास अशक्यप्राय आहे आणि ह्याचं कारण आहे - ते स्वतःसकट बहुतेकांच्या मनात असलेली भाषेच्या वापराविषयीची भीती - किंवा भीडभाड म्हणू या हवं तर. कारण बोला किंवा बोलू नका, लैंगिक व्यवहार तर अनंत काळापासून सुरू आहेतच आणि असणारही आहेत. लैंगिक व्यवहार हे एक कालातीत / त्रिकालाबाधित सत्य आहे. भीती आहे ती त्यांच्या उच्चाराची, जी 'पिठाची पुची' ह्या युसुफसूचित शब्दांतून अधोरेखित झाली होती. तर ह्यातून कथा सुचायच्या सुरुवातीलाच एक अर्थपूर्ण परिमाण हाती आलं. भाषेची भीती आणि हा भाषाभीरुतेचा मुद्दा लैंगिक उल्लेखांच्या संकोचाच्या मुळाशी असल्याने तो कानामागून येऊन तिखट होऊन बसला. मग काळाच्या ओघात ह्या विषयाशी निगडित असं आशयद्रव्य हळूहळू जमा होऊ लागलं. अर्थात आशयद्रव्य जमा होण्याचा क्रम प्रत्यक्ष घडणकाळातदेखील सलग / रेषीय नोंदवला जाणं शक्य नसतं. कारण बर्याचदा लिहिण्याच्या ओघात काळाशी जी कसरत सुरू असते, त्या प्रक्रियेतून तो साकारत असतो. तरीही अंदाजाने आणि आठवतं त्यानुसार असं म्हणता येईल, की ज्या अर्थी युसुफने हे शीर्षक नोकरीनिमित्त परगावी गेलेला असताना आणलं होतं, त्या अर्थी नोकरीनिमित्त कुटुंबापासून दूर परगावी गेलेला एकटा राहणारा नायक हा तिथूनच सुचला असणार.
आता पुढचा महत्त्वाचा धागा होता तो भाषाभीरुतेसंबंधी आशयद्रव्याची जुळवाजुळव होण्याचा. मी ज्या बैठ्या चाळींच्या वस्तीत राहतो होतो, त्या आठ चाळींमध्ये सुमारे नव्वद टक्के बिर्हाडं ही ब्राह्मणांची होती आणि आसपासची कुडाच्या झोपड्यांची जी बकाल वस्ती होती, त्यामध्ये बव्हशांने भरणा होता तो कोकणी, मालवणी गिरणीकामगारांचा. त्यांच्या तोंडात सातत्याने लैंगिक उल्लेखांशी निगडित शिव्या असत, ज्या मी जिथे राहत होतो त्या ब्राह्मण वस्तीत खूपच क्वचित / तुरळक दिल्या जात. शिव्या देणं हे चुकीचं आहे असा संस्कारदेखील आमच्या भटवाडीतील घराघरांतून केला जाई. त्यातून भेंडी-गवारी ह्या भाज्यांचे उच्चार आवेशाने करून त्या भाज्यांना शिव्यांपर्यंत पोहोचवणे अशा पळवाटा काढलेल्या जाणवायच्या. 'रूट कनाल' केलेल्या ह्या शिव्यांची मजल आयचा घो, बापाचा ढोल, मग हळूहळू आजीचा तंबोरा, आजीच्या दुर्वा इथपर्यंत जायची. त्यातल्या त्यात 'आयला / च्यायला' हे सरसकट उच्चारले जायचे. पण एखादा कुणी त्यादेखील आईवरून दिलेल्या शिव्या असल्याची जाणीव करून द्यायचा. तर एकुणात काय, आसपासच्या वातावरणात - आणि पर्यायाने त्या संस्कारांमध्ये वाढलेल्या मनात - भाषिक सोवळंओवळं होतं. माझ्या घरात आई तर शिव्या देणं शक्यच नव्हतं, पण वडीलदेखील - एरवी लैंगिक विषयांवर मोकळेपणे बोलणारे होते तरी - फार तर 'शष्प' हा शब्द उच्चारत; पण त्यांच्या तोंडून 'झाट / शाट' हे शब्ददेखील मी कधीही ऐकले नव्हते. आमच्या वस्तीतले वडीलधारे एकूणातच कमी शिव्या देणारे / सहसा अर्वाच्य न बोलणारे होते. त्यामुळे होळीला मोठी मंडळी जेव्हा 'आकाशातून पडली बाटली आणि अमुकतमुकची गांड फाटली' अशा हाळ्या देत, तेव्हा त्या ऐकताना मोठं अप्रूप वाटत असे.
पण माझा वावर हा आमच्या वस्तीपुरता सीमित नव्हता. मी आसपासच्या बकाल, मालवणीबहुल वस्त्यांमध्ये वावरत असे. शिवाय बांद्रा प्लॉट ही मुस्लीम वस्ती. तेथील हिजड्यांचा सवतासुभा - येथेदेखील बऱ्याचदा जाणंयेणं असायचं. तिथे जी भाषा ऐकू यायची, त्या पार्श्वभूमीवर आमच्या वस्तीतील भाषेला भिणं मला साहजिकच जाणवलेलं - खरं तर खटकलेलं - होतं आणि माझ्या जाणिवेमध्ये शिरलेलं होतं. त्यातून गणेश आणि नारभट ही पात्रं मनामध्ये घडवली गेली. ही पात्रं आमच्या वस्तीतील कुणी रेडीमेड विशिष्ट व्यक्ती नव्हत्या. तर ती तेथील संबंधित वातावरणातून घडवलेली प्रातिनिधिक स्वरूपाची व्यक्तिमत्त्वं होती. किंबहुना ह्या कथेतील बहुतांश भाग हा घडलेला नव्हता, तर पात्रांप्रमाणेच प्रसंगदेखील 'लैंगिकतेसंबंधातील भाषाभीरुता' ह्या सूत्राच्या अनुषंगाने कल्पनेतून साकारलेले होते.
त्या काळात अनेक बायका मला अशा सोज्ज्वळ चेहेऱ्याने वावरताना दिसत, की त्यांना जणू लैंगिक संबंध न ठेवताच मुलं व्हायची किमया देवदयेने अवगत झालेली आहे, असं वाटावं. आणि मला बिथरायला व्हायचं. हे असले स्त्रीपुरुष आपापसांत तरी लैंगिक बाबतीत मोकळेपणे बोलत असतील का ह्याविषयी मी आजही साशंक होतो आणि मला आतून कुठेतरी वाटतं, की ह्या सगळ्या तथाकथित मर्यादशील वागण्याबोलण्याचा ह्यांच्या लैंगिक व्यवहारांवर - आणि परिणामी मानसिकतेवर - निश्चितच काहीतरी अनिष्ट परिणाम होत असेल. गणेशच्या बाबतीत तो परगावी एकटा पडला असताना हे अनिष्ट परिणाम उफाळून येणं मला शक्य वाटलं. मग ती दबलेली-बुजलेली लैंगिकता चाळवली जाण्यातून सुगंधा हे पात्र सुचलं आणि तिला बघून मनात मिटक्या मारताना पिठाबद्दल जाणवलेल्या लैंगिक भावनेतून त्याच्या हातून साकारली जाणारी योनी सुचली! तिला तो मनातल्या मनातदेखील पुची असं म्हणून धजत नाही. त्याला ''योनी' हे कसं देवीसारखं वाटतं' आणि तिथेच त्याचं सगळं बिनसतं. आपल्या मनातील नकोनकोशी, पण तरीही झुगारता न येणारी, घुसमट त्याला अस्वस्थ करते. त्या तिरीमिरीत तो पत्र लिहितो आणि त्याला कोंडलेली वाफ बाहेर सोडायची वाट सापडते.
तर अशा रीतीने 'पिठाची पुची' ह्या थेट शीर्षकाने कथा लिहायला खुद्द माझंच मन धजावेना; त्यातून माझ्या डोक्यात लैंगिकता आणि भाषिक सोवळेओवळेपणा ह्यांतील संबंध नव्याने अधोरेखित झाला आणि त्या अनुषंगाने ही कथा रचली गेली. युसुफने सुचवलेल्या शीर्षकात ह्या कथानकाचा मागमूसदेखील नव्हता.
एकंदरीत काय, तर युसुफच्या शीर्षकामुळे मला लैंगिकता ह्या विषयावर कथावस्तू उभारण्याचं सुचलं; पण त्यातून जाणवलेल्या भाषिक भीतीमुळे त्या कथावस्तूचा रोख बदलला. त्यामुळेच आपल्या मुलामध्ये अशी भाषाभीरूता येऊन त्याचं मन भरकटू नये अशा विचाराने, त्याच्यावर असे कोंदट संस्कार होऊ नयेत ह्यासाठी, कथेचा नायक मनाचा हिय्या करून बायकोला पत्र लिहितो खरा; पण त्याच्या मनात असलेले शब्द, 'पु पु पुच्चीतला', स्वतःच्या बायकोला लिहिलेल्या खाजगी पत्रातही लिहायची हिंमत काही त्याला होत नाही; तो 'पु पु पिठातली' असं लिहितो. आणि त्यानुसार कथेचं शीर्षक अवतरलं, ते 'पु पु पिठातली (उर्फ भाषाभीरूची गोष्ट)' असं.
---
कथेची जडणघडण सर्वसाधारणपणे अशी आहे. आता मुळात प्रश्न असा आहे, की ही कथा मला लिहावीशीच का वाटली? ह्याचं कारण असं होतं, की लैंगिक कोंडमारा / कुचंबणा ह्यांमुळे मेटाकुटीला आलेली, रुळावरून गाडी घसरलेली अनेक माणसं मला आसपास दिसत होती आणि हेदेखील जाणवत होतं, की ह्या माणसांच्या दुरवस्थेचं कारण लैंगिकतेमध्ये आहे हे बहुतेकांना उमगतच नाहीये. त्या काळात माध्यमांचा उगम झालेला नव्हता आणि वर्तमानपत्रांतूनदेखील ह्या विषयावर फार तर 'ताईचा सल्ला' वगैरे सदरांमध्ये जो काही तुरळक मजकूर येत असेल तेवढाच सेक्सशी संबंधित मजकूर असायचा! त्यामुळेच हा विषय वाचकांच्या समोर आणणं मला अत्यंत गरजेचं वाटलं.
शीर्षकामध्येच 'भाषाभीरूची गोष्ट' असा स्पष्ट उल्लेख करूनही ह्या कथेमध्ये भाषेची भीती / सोवळेओवळेपणा ह्यावर ठेवलेला रोख वाचकांपर्यंत कितपत पोचेल ह्याबाबत मी काहीसा साशंक होतो आणि एका भिक्षुकाचा मुलगा पिठातून योनी तयार करतो व तिच्याशी रमतो, हे वाचक कसं घेतील हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. त्यामुळे मी ही कथा सर्वप्रथम माझ्या वडिलांनाच दाखवली.
माझे वडील हे जरी साहित्याचे वाचक नव्हते, तरी भाषेचे - विशेषतः संस्कृतचे - व्यासंगी होते. त्यांनी वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षापर्यंत पाठशाळेमध्ये संस्कृतचं रीतसर अध्ययन केलेलं होतं. ते वैय्याकरणी / काव्यतीर्थ होते. ह्या पार्श्वभूमीवर ते सनातनी / कर्मठ असतील असा ग्रह साधारणपणे होऊ शकतो. परंतु प्रत्यक्षात ते तसे अजिबात नव्हते. ते माझ्याशी कुठच्याही विषयावर आडपडदा न ठेवता बोलायचे. लैंगिकतेवर चर्चेबाबत ते खूपच मोकळे होते. मला त्यांनी लहानपणी गांधीजींचं कामजीवन वाचून दाखवलं होतं. मात्र ते अचकटविचकट कधीही बोलत नसत. माझ्या अंदाजानुसार त्यांच्या जाणिवेमध्ये संस्कृत साहित्यातून जो शृंगाररस पाझरला होता, तेवढ्या मर्यादेमध्ये ते बोलत. माझ्या लिहिण्यात (माझ्या मते) जी काही संयत लैंगिकता येते, तिचं श्रेय माझ्या वडिलांनी माझ्याबरोबर साधलेल्या मोकळ्या संवादालादेखील जातं.
माझे वडील आणि नारभट यांच्यामध्ये एक साम्य होतं. ते म्हणजे माझ्या वडिलांनीदेखील 'शष्प'सोडून कोणतीही शिवी / अपशब्द उच्चारल्याचं मला तरी आठवत नाही. साहजिकच 'पु पु'मधील लैंगिक उल्लेख त्यांना आक्षेपार्ह वाटले नाहीत. पण मला वाटलं होतं, की ते त्यातील भाषिक भागाबद्दल काहीतरी बोलतील. तसं ते काही बोलले नाहीत. ते म्हणाले, की "ही नवकथा आहे, त्यामुळे त्यातलं मला काही कळत नाही, पण तू पिठातून मात्र बरोबर काढलं आहेस." माझ्यासाठी ही प्रतिक्रिया जरी अपेक्षेनुसार नव्हती, तरी वाईटही नव्हती. किमान एका भिक्षुकाच्या मुलाने असं वागणं आणि पिठातून योनी काढणं हे त्यांना हिडीस तरी वाटलं नव्हतं. पण त्यातून माझ्या कथेचा रोख दृष्टीआड होईल की काय, अशी शक्यता माझ्या मनात बळावली. नंतर ती कथा 'स्पंदन' नावाच्या दिवाळी अंकात स्वीकारली गेली, तेव्हादेखील त्यात जी रेखाटनं काढली गेली त्यांमध्ये देवळावरची पताका आणि योनी हेच घटक ठळकपणे रेखाटले गेले होते. विशेषतः योनीचं चित्र इतकं डोळ्यात भरत होतं की मलाच थोडं अस्वस्थ व्हायला झालं. पण विचार केल्यावर मला पटलं, की ह्यातील लैंगिकता आणि भाषिक भीतीचं अंतःसूत्र चित्रामध्ये आणणं हे तसं अवघडच होतं. साहजिकच माझी भिस्त आता होती, ती चोखंदळ वाचकांवरच. मात्र नंतर ही कथा आवडलेले - नावडलेले आजवर जे कुणी भेटले, त्यांच्या बोलण्यातून 'लैंगिकता आणि भाषा' हा मुद्दा क्वचितच कधी आला असेल!
आणि अलीकडलीच गोष्ट. तपशिलात थोडं उन्नीस-बीस होत असूही शकेल. पण घडलं ते असं, की मुंबई विद्यापीठामध्ये झालेल्या एका चर्चासत्रामध्ये मराठीतील एका नामवंत कवयित्री, समीक्षक वगैरे असणाऱ्या प्राध्यापिकेने मराठीतील काव्यात्म साहित्यावर बोलताना, महानगरी साहित्यावर कोरडे ओढताना 'त्यात लैंगिकता असल्याने ते लक्ष्य वेधून घेतं' असा मुद्दा मांडला आणि त्यासंबंधात तोंडसुख घेताना मराठीतील एका लेखिकेच्या जोडीने माझ्या कथांचीदेखील उद्धारगत केली; ज्यावरून फेसबुकवर त्यांची भरपूर खिल्ली उडवण्यात आली. ते मला कसंसंच वाटलं आणि मी मग ती चर्चा तात्त्विक अंगाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. कारण मला एकुणातच व्यक्तीपेक्षा संबंधित घटित आणि त्यातून डोकावणारी वृत्ती / प्रवृत्ती अधिक महत्त्वाची वाटते. माझ्या कथांबद्दल असे लैंगिकतेशी निगडित भलेबुरे ताशेरे हे मी अधनंमधनं ऐकत असतोच. ह्याआधीही आणखी एका समीक्षकांनी माझ्या एका कथासंग्रहाबद्दल लिहिताना, त्यातील लैंगिकतेविषयी नापसंती व्यक्त करून "मुलं झोपल्यावर वाचायला ह्या कथा पालकांनी हरकत नाही!" असा गमतीशीर सल्लादेखील पुस्ती म्हणून जोडला होता. त्यामुळे मला त्या प्राध्यापिकाताईंच्या वक्तव्यामध्ये आपल्या वाचकांच्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व सापडल्यासारखं वाटलं. शेवटी प्रत्येकाची अभिरुची, धारणा ही त्याच्यावर कुटुंबातून, समाजातून झालेल्या संस्कारांशी निगडित असते. तेव्हा ह्यानिमित्ताने आपल्या वातावरणाचा लैंगिकतेविषयीचा झाडा घेणं अधिक कामाचं ठरेल.
विज्ञान जसं तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ, पुरावाधिष्ठित संशोधन करत असतं; तशीच भाषादेखील नेणिवेच्या पातळीवर आकलनकार्य करतच असते. प्रत्येक भाषेत अशी उदाहरणं सापडतील. मराठीपुरतं बोलायचं तर Time आणि Space ह्या दोन्ही संज्ञांसाठी 'अवकाश' हा शब्द योजला जाणं हे मला आइनस्टाइनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताशी समांतर वाटतं आणि माझ्या अंदाजाने ते आइनस्टाइनपूर्व काळापासून कदाचित / बहुधा संस्कृतमधून चालत आलेलं असावं. आपल्या विषयाच्या संदर्भात बोलायचं, तर 'काम' हा शब्द घ्या. तो आपल्या भाषेत Sex आणि Work ह्या दोन्ही अर्थी योजला जातो. तसाच मराठीतील 'विषय' हा शब्द. ज्या भाषेमध्ये 'विषय' हा एकच शब्द Subject आणि Sex ह्या दोन्ही अर्थी योजला जाण्याची जाण होती; त्या भाषेत -
'सुसंगती सदा घडो,
सुनजवाक्य कानी पडो,
कलंक मतीचा झडो,
विषय सर्वथा नावडो'
यासारखं खुळचट आणि गुळमट कवन रुजावं ही गोष्ट मला लैंगिकतेबाबतचं इथलं वातावरण समजून घेण्याच्या दृष्टीने लक्षणीय गोष्ट वाटते.
त्यामुळेच तर परदेशी साहित्य, फ्रॉइड, र. धों. कर्वे, साहित्यशास्त्र (रससिद्धांत) वगैरेंची ओळख असतानादेखील त्या प्राध्यापिका विद्यापीठीय पातळीवरील चर्चासत्रामध्ये - एखाद्या दुकानाच्या पायरीवर - किंवा त्यांना ग्रामीण हवं तर झाडाच्या पारावर बसून - गावगप्पा कराव्यात तशा - 'सेक्स'सारख्या मूलगामी प्रेरणेवर बोलू धजल्या ह्याचं मला फारसं काही वाटलं नाही. त्याही असल्या दांभिक वातावरणाच्या बळी असल्यामुळे त्यांचं असं बोलणं मी जरा अधिक गंभीरपणे आणि समंजसपणे घेतलं. एवढंच, की आपल्या साहित्याची ही स्थिती मला काहीशी चिंताजनक वाटते.
एखाद्या लेखनाच्या साहित्यातील 'लैंगिकते'विषयी साधकबाधक बोलायला काहीच हरकत नाही. किंबहुना समीक्षेने त्याची दखल घ्यावीच. पण जीवनामध्ये थेट आपल्या जन्मापासून असलेलं लैंगिकतेचं स्थान मान्य असेल, तर जीवनाचं प्रतिबिंब साहित्यात उमटतं हे लक्ष्यात घेता लैंगिक उल्लेखांनाच 'अब्रह्मण्यम' ठरवणं हा दांभिकतेचा कळस झाला. माझ्या ज्या प्रकाशित कथा आहेत, त्यांत लैंगिकतेवर रोख असलेल्या कथा किती आहेत, अशा संख्याशास्त्रीय विचारापासून खरंतर सुरुवात करायला हवी. त्यानंतर जो लैंगिक भाग आहे, त्याचा गुणात्मक विचार व्हायला हवा, वगैरे वगैरे.
वि. स. खांडेकरांची 'ययाति' वयात येताना वाचल्यानेदेखील असेल कदाचित, पण मी पिवळी पुस्तकं तर सोडूनच द्या, पण काकोडकर वगैरे लेखकदेखील फारसे कधी वाचलेले नाहीत. (नाही म्हणायला 'श्यामा' ही कादंबरी तिच्यावर झालेल्या खटल्यामुळे चाळली होती, तेवढंच माझं काकोडकरांचं वाचन असावं बहुदा), बाकी माझ्या तरुण वयात 'ब्लू फिल्म' बघितल्या जायच्या, त्यांच्या वाटेलादेखील मी आपणहून चुकूनही गेलो नाही. आता ह्या नव्या जमान्यात मात्र ज्यांना 'पॉर्न' म्हटलं जातं; अशा चित्रफिती, फोटो विविध माध्यमांधून सामोरे येत असतात. ते क्वचित डोळ्यांसमोरून जातात. तर त्यावरून माझा ग्रह असा झाला आहे, की 'जे मनातील कामभावनेला चाळवतं, खतपाणी घालतं, आंजारतं-गोंजारतं ते म्हणजे पॉर्न'. नैसर्गिक कामभावनेविषयी विचाराला प्रवृत्त करेल असं त्यात काही न दिसल्याने व्यक्तिशः मला जरी त्यात फारसा रस वाटत नसला, तरी आणखी कुणाला त्यात रस वाटण्यात मला तरी काहीही आक्षेपार्ह / वावगं वाटत नाही. किंबहुना जाणीवनेणिवेत, कळतनकळत सतत खदखदती असलेली, तात्पुरती तृप्त होणारी आणि पुन्हा ’ये रे माझ्या मागल्या’ म्हणत चाळवणारी कामवासना विचारात घेता पॉर्न पाहिलं जाणं हे अटळच आहे. आणि पॉर्न तर सोडूनच द्या, पण आपलं अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीमध्ये दर्शकांना / प्रेक्षकांना गुंतवण्यासाठी, गुंगवण्यासाठी, त्यांच्या मनातील कामवासना आणि हिंसाचार ह्यांना चाळवण्याचा प्रयत्न जाहिरात, चित्रपट, टीव्ही अशी माध्यमं सतत करतच असतात. ती आता आपल्या कुटुंबात / घरात राजरोस शिरलेली आहेत. तर अशा वेळी काही कलाकृती ह्या लैंगिकतेवर विचार करायला लावणाऱ्या असणे हे समाजमनाच्या संतुलित आणि निरामय वाढीसाठी आवश्यक आहे.
'वाचकावर घडणारा परिणाम हा लेखकाच्या नियंत्रणाबाहेर असल्याने तो त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही', असा वैधानिक इशारा देऊन मला असं स्पष्ट करावंसं वाटतं, की मी लिहीत असताना वाचकांच्या मनातील कामभावनेला चाळवणारी कामोद्दीपक (erotic) स्वरूपाची वर्णनं सहसा करत नाही. तर लैंगिक गंड / बारकावे वाचकांना जाणवावेत असा माझा रोख असतो. ह्या प्रक्रियेत लैंगिकतेच्या काही अस्पर्श, हळव्या भागांना स्पर्श होणं हे ओघानेच घडतं, आणि माझ्या मते वाचकांना नेमकं तेच खटकतं. हा मुद्दा स्पष्ट करणारी 'पु पु पिठातली (उर्फ भाषाभीरूची गोष्ट)' ही कथा मला माझ्या तथाकथित आक्षेपार्ह लैंगिक कथांची अर्ककथा वाटते. 'कामोत्तेजक म्हणजे पॉर्न' असं ढोबळपणाने म्हटलं तर ही कथा मला अजिबात कामोत्तेजक वाटत नाही, तर कामोत्तेजनेच्या मुळाशी जाणारी - म्हणजे पॉर्नवरचा उतारा स्वरूपाची वाटते!
नैसर्गिक प्रेरणा आणि सामाजिक धारणा ह्यांमध्ये कामवासनेची होणारी ओढाताण विचारात घेता तथाकथित विकृती ही मानवी मनाची प्रकृती होणं हे दिवसेंदिवस अटळ होत चाललं आहे. तेव्हा पॉर्न हे वाढतच जाणार आणि त्याला निर्बंध घालायची कल्पना ही अव्यवहार्य अशा अर्थी खुळचट ठरणार. त्यासाठी 'विषय सर्वथा नावडो'सारखी भंकस शिकवण झुगारून देऊन थेट आपल्या स्वतःच्या मनापासून आसपासच्या कामव्यवहाराकडे डोळसपणे पाहता यायला हवं. त्यामुळेच वात्स्यायनाचं कामसूत्र किंवा खजुराहोची मैथुनशिल्पं वगैरेंचा दाखला देऊन कोणे एके काळी आपली संस्कृती लैंगिकतेच्या बाबतीत कशी निकोप होती आणि इंग्रजांनी तिला दांभिक केलं वगैरे अन्वयांमध्ये मला तरी कधीही स्वारस्य वाटलेलं नाही.
माझ्या जाणत्या वयापासून आसपास दिसणारा समाज निरखणं-पारखणं-जोखणं; आणि त्याची पाळंमुळं-संस्कृती शोधायची झाल्यास, मला ज्ञात असलेल्या माहितीचा माझ्या कल्पनाशक्तीने जो अन्योन्य संबंध लागेल तो अर्थ लावणं, एवढंच मला महत्त्वाचं वाटतं. ह्या धारणेनुसार मला असं दिसतं, की आपल्या आसपासच्या अनेकांची जीवनं ही कामवासनेने उद्ध्वस्त / निकामी होत आहेत आणि ह्याची पाळंमुळं आपण सेक्स ह्या विषयावर जो 'अळीमिळी गुपचिळी' स्वरूपाचा व्यवहार करतो, त्यामध्ये खोलवर पसरलेली आहेत. आपल्या आर्थिक आणि लैंगिक व्यवहारांबद्दल आपण सहसा बोलत नाही. कारण आपल्याला ते एकूणच जोखमीचं, आपमतलबाला धक्का पोहोचवणारं वाटतं. हे विषय टाळले, की आपण गुपचूप अनिर्बंध वागायला मोकळे असतो. ते ठीकच आहे. पण त्यामुळेच कुणी सेक्सबद्दल काही वर्मावर बोट ठेवणारं बोलू लागला की त्याची बदनामी करण्याकडे किंवा त्याला अनुल्लेखाने मारण्याकडे आपला कल असतो. हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत, कारण लैंगिक उल्लेखांना बदनाम करणं हे सत्याकडे पाठ फिरवून जगण्यासारखं आहे. आणि अनुल्लेखाने मारणं ही शेवटी तात्पुरती मलमपट्टीच असते, जी सेक्सच्या बाबतीत ती मुळीच कामाची नाही. सेक्सवर खुलेआम मोकळेपणानं बोलणं हाच ह्या, आयुष्यात खर्या तर महत्त्वाच्या, पण आकाराने टीचभर असलेल्या, विषयाचं नियमन करण्याचा राजमार्ग आहे. त्याबद्दल सामाजिक पातळीवर जेवढा मोकळेपणा येईल, तेवढा विकृतीचा संभव कमी होईल. म्हणूनच वैयक्तिक जीवनात भले अवघड असेल, पण साहित्यात तरी लैंगिकतेचे अनेक पैलू, बारकावे, गंड ह्यांना स्थान मिळालं पाहिजे. आचारविचारांतील कामव्यवहाराला नागडंउघडं करणं हे मला साहित्याचं एक महत्त्वाचं प्रयोजन वाटतं.
-- तर आता ह्या टिपणानंतर 'पु पु पिठातली'कडे 'एका भाषाभीरू समाजाची गोष्ट' म्हणून पाहिलं जाईल ही (कदाचित भाबडीही असणारी) आशा!