दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१६

नमस्कार,

गेल्या चार वर्षांची परंपरा पाळत यंदाही ’ऐसी अक्षरे’च्या दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी ’ऐसी अक्षरे’च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.

इथे दर्जेदार लेखन प्रकाशित व्हावं, नवीन वाचक-लेखकांना संस्थळाबद्दल जिव्हाळा निर्माण व्हावा, त्यातून लेखन-वाचन संस्कृतीमध्ये, लहानशी का होईना, भर पडावी असा प्रयत्न नेहेमीच केला जातो. दिवाळी अंक हा या प्रयत्नांचाच एक वैशिष्ट्यपूर्ण भाग. गेल्या अंकांत सरस लिखाण आलं, तसंच - किंबहुना त्याहूनही सरस - लिखाण यंदाच्या दिवाळी अंकात यावं अशी आमची इच्छा आहे. उत्कृष्ट दर्जाचं लिखाण करणं सोपं नाही, त्यासाठी लेखकांना कष्ट करावे लागतात. वाचकांच्या केवळ प्रतिसादांतूनच त्या कष्टाचं चीज करण्याची या माध्यमाची शक्ती आहे खरी. पण आमच्या मते तेवढं पुरेसं नाही. त्यामुळे याही दिवाळी अंकातल्या लेखनासाठी काहीतरी मानधन देण्याची इच्छा आहे.

दिवाळी अंकासाठी येणाऱ्या लेखनापैकी सगळंच्या सगळं अंकात समाविष्ट करणं दुर्दैवानं शक्य नसतं. एखादा लेख घ्यायचा की नाही हा निर्णय लिखाणाच्या दर्जावर तर अवलंबून असतोच. पण त्या प्रकारचं आलेलं इतर लेखन, एकंदरीत अंकासाठी आलेल्या लेखांची संख्या, अंकाचं आर्थिक अंदाजपत्रक हेही निर्णायक घटक असतात. लिखाण आमच्या हाती कधी येतं हेही महत्त्वाचं ठरतं. या सगळ्या गोष्टींमुळे काही चांगलं लेखनही नाकारलं जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राग मानू नये ही विनंती. काही लेख काही कारणानं ’ऐसी’च्या दिवाळी अंकात घेणं शक्य नसेल, तर लेखकापाशी तो लेख दुसऱ्या अंकात पाठवण्याचा रस्ता खुला असला पाहिजे, तितका वेळ त्याच्यापाशी उरला पाहिजे - यावरही आमचा कटाक्ष असतो. म्हणून साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१६ ठेवलेली आहे. तुमचं लिखाण आमच्या हाती जितक्या लवकर पोचेल, तितका जास्त वेळ आम्हांला मिळेल. स्वीकृतीचा निर्णय घ्यायला, संस्करण करायला, शक्य झाल्यास लेखासाठी अनुरूप रेखाचित्रं-छायाचित्रं मिळवायला हा वेळ अतिशय मोलाचा आहे. तेव्हा ही तारीख कसोशीने पाळावी ही आग्रहाची विनंती.

दिवाळी अंक अधिकाधिक वाचकांना आपलासा वाटावा असा आमचा प्रयत्न दर वर्षीच असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे अंकात नेहेमीच्या लेखनाप्रमाणेच घनगंभीर(!) माहितीपूर्ण लेखन असावंच; शिवाय उत्तम दर्जाचं ललित लेखन, विनोदी लेखन, व्यक्तिचित्रं, समीक्षा, नवीन विषयांची ओळख करून देणारं, निरनिराळ्या शैलींमधलं आणि घाटांमधलं, प्रयोगशील लेखनही असावं, असं मनापासून वाटतं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लेखनाचं, माध्यमसंबंधी - घाटासंबंधी - शैलीसंबंधी प्रयोगांचं, आणि हो, रेखाटनांचं आणि छायाचित्रांचंही स्वागत आहे. सदस्यांनी काढलेले आणि त्यांना आवडलेले फोटो, चित्रं, व्यंगचित्रं दिवाळी अंकात सामील करायला आम्ही उत्सुक आहोत. आपल्या अंकावर छापील अंकांवर असणारी पृष्ठमर्यादा नाही, हा आपल्या पथ्यावर पडणारा भाग. त्यामुळे तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणाऱ्या चित्रफिती, संवादफिती, संगीत, चलच्चित्रं, एकाहून अनेक शे‌वटांच्या शक्यता प्रत्यक्षात आणणारं ललित... अशा सगळ्याच प्रकारच्या साहित्याचं मन:पूर्वक स्वागत आहे.

शब्दांच्या जोडीला छायाचित्रं, रेखाचित्रं, रंगचित्रं असावीत, अशी इच्छा आहे; पण आपण चित्रकार / छायाचित्रकार नाही, म्हणून घोडं अडतं, अशी अडचण असेल तर मनमोकळेपणानं संपर्क साधा. समजा, लिखाण पूर्ण झालेलं नसलं, तरीही विषयाबाबत थोडी पूर्वकल्पना दिलीत, तर चित्रांचा अंदाजअंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल. लेख व कथांसाठी चित्रं रेखाटण्याची ज्यांची इच्छा असेल, अशा रेखाटनकारांना, चित्रकारांना आणि छायाचित्रकारांनाही आम्ही आग्रहाचं आमंत्रण देत आहोत.

आता अंकाच्या ’विशेष संकल्पने’बद्दल. दिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असा आमचा प्रयत्न असतो. मात्र अंकाचा आवाका त्या संकल्पनेपुरताच मर्यादित असत नाही. अंकातील काही भाग ह्या विषयाला दिला जाईल. उर्वरित अंकात सर्व प्रकारचं आणि विषयांचं साहित्य असेलच.

यंदाची विशेष संकल्पना आहे ’नातीगोती’. त्याबद्दल खाली विस्तारानं लिहितो आहोत.

दिवाळी अंकासाठी भरपूर आणि विविध लेखन पाठवा. खास संकल्पनेबद्दल लिहा, पण संकल्पनाबाह्यही लिहा. तेव्हा विषयाचं बंधन आहे असं कृपया समजू नका. तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो आहोत.

कालमर्यादा - १५ सप्टेंबर २०१६
लिखाण 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोपाने पाठवावं.

लेखन लवकरात लवकर पाठवावं ही विनंती.

***

विशेष संकल्पना:

ऐसी दिवाळी अंकांच्या आत्तापर्यंतच्या विशेष संकल्पनांचा आढावा घेतला तर थोडे जडजंबाल विषय झाले आहेत हे आमच्या लक्षात आलं. माध्यमं, कलाव्यवहार, चळवळी आणि गेल्या वर्षीची नव्वदोत्तरी. ऐसीकरांना या विषयांवर वाचायला आनंद झाला तरी अनेकांना या विषयांमध्ये प्रत्यक्ष पहिल्या हातची माहिती असेलच असं नाही. किंबहुना नसेलच. मग आपण ऐसीकरांपासून दूर जात आहोत का? असा विचार व्यवस्थापकांच्या मनात आला. मग त्यावर उपाय म्हणून ज्या विषयावर वैचारिक, गंभीर, विनोदी, आणि विविध पैलूंना उजाळा देत लिहिता येईल आणि तरीही वाचकांना तो जवळचा, जिव्हाळ्याचा वाटेल असा 'नातीगोती' हा विषय निवडला आहे.

कुटुंबातली नाती बव्हंशी जनुकीय असतात. पण नात्यांच्या ज्या गुंतवळ्यात आपण सापडलेलो असतो त्यातल्या काहीच निरगाठी कुटुंबात असतात. कुटुंब म्हणजे जर एखादा रेणू असेल तर नातं म्हणजे त्या अणूंना एकत्र ठेवू न ठेवू शकणारं बल. हे बल कुटुंबियांबरोबरच नाही, तर इतरत्रही कार्यरत असू शकतं. नातं म्हणजे जोडणी. आपण कुणाशीतरी, कशाशीतरी बांधले गेलो आहोत याची जाणीव, जबाबदारी आणि त्यातून येणारी देवाणघेवाण. नातं माणसांचं असू शकतं. तसंच नातं संघटनांशी असू शकतं. काही वेळा ते तत्त्वांशी असतं. किंवा नातं हे अन्नाशी असू शकतं. आणि सर्वात शेवटी विचार केला तरी सर्वात महत्त्वाचं नातं हे स्वतःशी असतं. नात्यांबद्दल आणि त्या बलांच्या ताण्याबाण्यावर कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं आणि प्रबंध लिहिलेले आहेत. नाती सुधरावी कशी यासाठी सेल्फहेल्पी पुस्तकं आहेत. नाती बिघडण्याने जे परिणाम होतात ते दुरुस्त करत मानसशास्त्रज्ञांचे तांडे आपलं पोट भरतात. या सगळ्या नाही, तरी यातल्या काही पैलूंचा धांडोळा घेण्यासाठी नातीगोती हा विषय घेतलेला आहे.

या विषयाचा एक मुख्य फायदा असा आहे की हा पुरेसा व्यापक आणि क्लिष्ट असला तरी तो प्रत्येकाच्या रोजमर्राच्या जीवनाला स्पर्शून जातो. प्रत्येकानेच आपल्या वेगवेगळ्या नात्यांमध्ये गुंतण्या किंवा न गुंतण्याच्या प्रयत्नात आयुष्य घालवलेलं असतं. म्हणून नातीगोती हा सर्वांनाच जिव्हाळ्याचा विषय आहे.

तुमच्या आयुष्यातलं महत्त्वाचं नातं, किंवा एखाद्या नातेवाइकाचं व्यक्तिचित्रण, नात्यांच्या गुंतवळ्यात पाय अडकल्याची जाणीव, त्यातून सुटकेचा प्रयत्न किंवा त्यांत गुंतत जाण्यातलं सुख, कुटुंबापलिकडे असलेलं एखाद्या संस्थेशी नातं, नव्या जगात तुटणारी आणि जोडली जाणारी नाती.... अशा अनेकविध विषयांवर तुम्हाला लिहिता येईल.

या दिवाळी अंकासाठी ऐसीकरांकडून उदंड आणि दर्जेदार लेखन येवो ही सदिच्छा.

प्रतिक्रिया

लिहिणार नक्की!

विषय फार आवडला. निदान वा.मा. व प्रतिक्रियांचा सहभाग असेलच

निव्वळ फायद्यासाठीचे संबंध म्हणजे नातीगोती ही सोपी व्याख्या आहे. बघूया अंकातील दवणीय लेख काय म्हणतात ते! अंक वाचायची उत्सुकता आहे ब्वॉ!

कसमे वादे प्यार वफ़ा सब बाते हैं, बातों का क्या?
कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं, नातों का क्या?

या पातळीवर पोचलेला दिसताय...

बादवे, ऐसीअक्षरेवाल्यांनी 'दवणे' हा विषय घेतला तरी त्यावर बिनदवणीय लिहिणारे लोक शोधतील.

बादवे, ऐसीअक्षरेवाल्यांनी 'दवणे' हा विषय घेतला तरी त्यावर बिनदवणीय लिहिणारे लोक शोधतील.

त्यामुळेच अंकाची उत्सुकता आहे.

अतिशहाण्याच्या शैलीत निरनिराळी संस्थळं, त्यावरच्या सदस्यांची आपसांतली नाती ह्याबद्दल गाळीव इतिहासी लेख वाचायला मला आवडेल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसी दिवाळी अंकांच्या आत्तापर्यंतच्या विशेष संकल्पनांचा आढावा घेतला तर थोडे जडजंबाल विषय झाले आहेत हे आमच्या लक्षात आलं

हे नक्की असेच झाले होते की कुठलाही विषय असला तरी त्याला जडजंबाल करायचे ही ऐसी विशेषांकांची खासीयत आहे?

ऐसीचा हाही अंक वाचनीय असेलच ..

********
इथे फुलांना म‌र‌ण‌ ज‌न्म‌ता - द‌ग‌डांना प‌ण‌ चिरंजिविता |
बोरी बाभ‌ळी उगाच‌ ज‌ग‌ती - चंद‌न‌ माथी कुठार‌ |
अज‌ब‌ तुझे स‌र‌कार‌ ...

विषय आवडला. नव्वदोत्तरी सारखे सरकारी विषय जालीय माध्यमांवर नसलेलेच उत्तम !

दिवाळी अंकासाठी लेखन कोठे पाठवावे ? कोणत्या इमेल वर पाठवावे ? कोणी मार्गदर्शन करील काय ?

दिवाळी अंकासाठी लेखन राजेश घासकडवी ह्यांना आणि/किंवा मला व्यक्तिगत निरोपातून पाठवावे. इमेल करायचं असल्यास व्यनितून इमेल पत्ता कळवते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखन पाठविल्यानंतर पोच आणि पसंती / नापसंती कळवण्यात येईल काय?

हो आणि हो.

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)