Skip to main content

ऐसीवर लिखाण करण्यासाठी अॅप - 'भारदस्तक'

काय तुम्हाला ऐसीवर लिखाण करायला भीती वाटते? काय तुम्हाला आपला विषय किंवा मांडणी ऐसीसाठी पुरेशी भारदस्त नाही असं वाटतं? काय तुम्हाला तुमचं लिखाण वाचून चिंतातुर जंतूंसारखे समीक्षक त्यांच्या चष्म्याआडून आपल्या उंचावलेल्या भ्रुवांच्या मध्ये आठ्या घालतील आणि नाक उडवतील असं सारखं वाटत राहातं? काय अशा भीतींपोटी तुम्ही केवळ वाचनमात्र राहून लेख लिहिणं तर सोडाच, पण प्रतिसाद लिहायलाही कचरता?

चिंता करू नका! कविता करता येत नाही म्हणून येणारा प्रचंड मानसिक गंड यशस्वी रीतीने घालवणारा 'कवितक' प्रोग्राम तुम्हाला माहीत असेलच. तो लिहिणाऱ्या टीमनेच आता हा प्रश्न एक नवं अॅप तयार करून विचारजंती लिखाणाचा प्रश्न सोडवलेला आहे. त्याचं नाव आहे 'भारदस्तक'. ते वापरून आता तुम्ही चुटकीसरशी विद्वत्तापूर्ण लिखाण करू शकाल.

आता आपण भारदस्तक कसं चालतं ते पाहू. या अॅपच्या डेव्हलपमेंटमध्ये हातभार लावणाऱ्या मनोबाने खरडफळ्यावर ते कसं चालतं याचं काही टीझर दाखवलेलं आहेच. ते इथे प्रथम उद्धृत करतो.

कोणीतरी भाषेबद्दल प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर त्याने असं दिलं.

खरं तर ही भाषिक वैशिष्ट्य कालातीत कधीच नव्हती. भौगोलिक चौकटीप्रमाणेच समाज व काळाची बंधनं त्याला लागू होतीच. अर्वाचीन काळात वाढत्या शहरीकरणाबरोबर हे सुरु झालेलं असलं तरी आधुनिक काळात ह्याची वळणं ठळक झाली. लोकशाही व्यवस्था एकदा मान्य केली म्हटल्यावर व्यापक पातळीवर हे भाषिक लोकशाहीकरणाचे प्रभाव छाप सोडून जाणं साहजिक असतं. पूर्वीची अभिजनांची बोली आणि आता त्यांच्या सहवास आणि शिक्षणामार्फत आलेल्या संपर्कातून बहुजनांनीही तशीच उचललेली दिसते. त्यामुळे हे तसं सरळ रहात नाही. गुंतागुंतीचं होतं.

कुठच्याही प्रश्नाच्या उत्तरासाठी, किंवा उत्तराच्या आभासासाठी काही नियम पाळावे लागतात. मनोबाने त्यातले काही सांगितले आहेतच, मीही त्यात काहींची भर घालतो आहे.
१. कुठचाही प्रश्न किंवा परिस्थिती ही गुंतागुंतीची आहे हा निष्कर्ष काढायचा - तो आधीच जाहीर करायचा आणि नंतर त्याचं विवेचन करायचं की मनोबाने केल्याप्रमाणे आधी विवेचन करून नंतर तो निष्कर्ष काढायचा हे तुमच्या चवीवर अवलंबून आहे. पण इतक्या गुंतागुंतीचा विचार करणारा माणूस फारच भारी आहे असं अर्थातच वाचकाला वाटतं. (किंवा भारदस्तपणे म्हणायचं झालं तर 'वाचकाच्या मानसिक अवस्थेचं रूपांतर तुमच्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन जमिनीला समांतर होणारा न राहाता चढता कोन करणारा बनण्यात होतं.' भारदस्तपणासाठी साधी गोष्ट कठीण शब्दांत मांडण्याचं कसब अंगी बाणवावं लागतं.)
२. आता गुंतागुंत म्हटली की तुम्हाला त्या विषयाचे वेगवेगळे धागे इतर संदर्भांना कसे जोडलेले आहेत हे दाखवून द्यायला लागतं. त्यासाठी अभ्यास वगैरे फुटकळ गोष्टींची काहीच गरज नसते. साध्या म्हणी/वाक्प्रचार माहीत असले तरी चालतं. म्हणजे 'दर दहा मैलावर भाषा बदलते' हे चावून चोथा झालेलं सत्यच तुम्हाला भारदस्त शब्दांत मांडायचं असतं. म्हणून भौगोलिक, सामाजिक, कालानुरुप वगैरे बंधनं/बदलांचा उल्लेख अनिवार्य ठरतो. शहरीकरण, आधुनिक समाजव्यवस्था, अभिजन-बहुजन यांचं नातं वगैरे गोष्टींचा फक्त त्या विषयाशी जोडणारा उल्लेख करावा. किंबहुना या अॅपमध्ये अशा अनेक संलग्न विषयांची क्रॉस-रेफरन्स केलेली तयार यादीच आहे. तुम्हाला गुंतागुंतीचं प्रमाण किती शब्दांत सांगायचं आहे यानुसार तुम्ही कमी-अधिक धागे निर्माण करू शकता. या शब्दप्रयोगांच्या यादीचा काही भाग इथे देतो आहे.
- शहरीकरण
- खाउजा संस्कृती
- अस्मितांचा सपाटीकरणाशी होणारा संघर्ष
- भौगोलिक/सामाजिक/काळाच्या/चौकटी
- आधुनिकोत्तर काळाचा व्यवच्छेदक गुणधर्म
- अभिजनसंस्कृतीचा बहुजनसंस्कृतीवर होणारा परिणाम
- बहुजनसंस्कृतीचं अभिजनसंस्कृतीत होणारं अभिसरण
- बदलत्या मानवी मूल्यांचे संदर्भ
- भाषिक अभिव्यक्तीची गळचेपी
- व्यापक किंवा मॅक्रो पातळीवरून दिसणारं दृश्य (ज्याला इंग्लिशमध्ये बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात)
- कुठच्याही प्रथेचं संस्थीकरण (इन्स्टिट्यूशनलायझेशन)
- आधुनिकोत्तर मध्यमवर्गाच्या परिप्रेक्ष्यातून (परिप्रेक्ष्य हा शब्द एकदा तरी आलाच पाहिजे)
वगैरे वगैरे. या यादीत भर घालणारांना अॅप फुकटात डाउनलोड करता येईल.
३. विषय गुंतागुंतीचा आहे हे सांगून झाल्यावर नंतर पाळी येते ती नेमड्रॉपिंगची. म्हणजे आधी तुम्ही ही गुंतागुंत हॅंडल करू शकता हे सांगून वाचकाचा आदर मिळवला. आता पुढचा दणका द्यायचा तो म्हणजे या गुंतागुंतीबद्दल बोलणारे ज्ञानी विचारवंत तुम्ही कसे कोळून प्यायलेले आहेत हे दाखवण्याचा. त्यासाठी खरोखर तुम्ही ते वाचलेले असण्याची गरज नसते. आता आमच्या अॅपमध्ये एवढं ज्ञान कसं भरणार? त्यासाठी आम्ही अंडानी प्रॉडक्ट्सबरोबर पार्टनरशिप करून त्यांचा 'नेम ड्रॉप्पर' प्रोग्राम (जो आमच्याच टीमने लिहिला होता) तो अंतर्भूत केलेला आहे. पण आम्ही त्यात सुधारणा करून नुसतं विचारवंताचं नावच नाही, तर तुम्हाला त्याचं या विषयाशी साधारण संबंधित क्वोटही नेटवर शोधून टाकण्याची सोय केलेली आहे. एकदा तुम्ही तीनचार विद्वानांची विधानं टाकलीत की कुठचाही सामान्य वाचक त्या वैचारिक ओझ्याखाली दबून जातो, आणि मुकाट्याने तुम्ही पुढे जे काही लिहिलं आहे ते मान्य करतो.
४. मग त्यापुढे तुम्ही काहीही लिहिलं तरी फरक पडत नाही. फक्त तुमची वाक्यं कळायला पुरेशी कठीण, तांत्रिक शब्दांनी भरलेली आणि पुरेशी धूसर असायला हवी. म्हणजे 'सध्या बाजारात तुरीचा भाव दोनशे रुपये किलो आहे.' असं रोखठोक, तपासून बघता येण्याजोगं विधान करणं अब्रह्मण्यम. कारण त्यात तूरडाळ हा अत्यंत विशिष्ट पदार्थ आहे, आणि चक्क किमतीचा आकडा आहे. ते फारच विशिष्ट झालं. त्याऐवजी 'जीवनोपयोगी वस्तुंच्या किमतीत होणारे चढउतार ही नित्याचीच गोष्ट आहे.' असं काहीतरी म्हणायचं. आणि त्यापुढे कारणमीमांसा देताना म्हणायचं 'न्यूटनचा पहिला नियम सांगतो की कुठलीही गोष्ट अचल गोष्ट अचल राहाते आणि चल गोष्ट एकाच वेगाने चल राहाते - तोपर्यंत, जोपर्यंत तीवर कुठचेही बाह्य बल कार्यरत होत नाही. (तुमची वाक्यं इंग्रजी वाक्यांची भाषांतरं वाटणं हे तुमच्या मूळ इंग्लिश वाचनाची खात्री पटवून देतं. म्हणजे तुमच्यासमोर तो ग्रंथ उघडलेला आहे अशी वाचकांना खात्री पटते.) हाच नियम किमतींना लागू केला तर त्यावरून उघडच होतं की किमती बदलण्यात काही बाह्य बलं कार्यरत आहेत. आता ही बलं कुठची हे थोडं समजून घेऊ. डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार प्राण्यांमध्ये घडणारे बदल हे तत्कालीन परिस्थितीनुरुप, तिच्याशी सांगड घालणारे असतात. अर्थातच किमती बदलतात याचं कारण तत्कालीन सामाजिक, आर्थिक आणि नव्वदोत्तरीबरोबर मध्यमवर्गीयाला आलेली सूज या आणि यासारख्या इतर कारणांच्या परिणामांमध्ये दडलेलं आहे. ' यात तुम्हाला लक्षात आलं असेलच की अर्थशास्त्राच्या प्रश्नासाठी न्यूटन, डार्विन हे बिनअर्थशास्त्री वापरलेले आहेत. त्यामुळे कुठच्या अर्थशास्त्रज्ञाने तुमचं लिखाण वाचलं तरी त्यालाही त्यात काही चूक काढता येणार नाही.
५. तुम्ही पुढे मांडलेल्या विचारांमध्ये कितीही उघड चुका असल्या तरी एव्हाना तुमचा किल्ला इतका बळकट आहे की त्या दाखवणाऱ्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. आणि त्यासाठी तुम्ही अर्थातच भुवया अजून उंचावत 'तुमचा डार्विनचा अभ्यास पुरेसा नाही हे स्पष्ट होतं. कारण त्याचा उत्क्रांतीवाद मान्य होऊन शतक उलटून गेलं.' असं म्हणू शकता. त्रयस्थ वाचकाला यातलं कोणाचं बरोबर हेच समजू शकत नाही.
६. तुमच्या मांडणीत एक रडगाणं, आणि एक नॉस्टेल्जिया असायला लागतो. कारण तथाकथित विद्वान लोक हे वयस्कर असतात. त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या तरुणपणी केलेला असतो. तेव्हा चाळीसपन्नास वर्षांपूर्वी त्यांना दिसलेलं जग हे आत्तापेक्षा किती जास्त सुंदर होतं असा त्यांचा ठाम विश्वास असतो. त्यांचाच का, सर्वसाधारण लोकांचाही असतो. त्यामुळे ज्या वाचकांना तुमच्या धूसर विधानांपलिकडे काही अर्थ लागतो त्यांनाही तुमचं म्हणणं कुठच्या ना कुठच्या पातळीवर पटतंच.

असो. तुम्हाला हे अॅप कसं चालतं याची सर्वसाधारण कल्पना दिली. सगळंच इथे या लेखात सांगणं शक्य नाही. पण ही तत्त्वं समजून घेण्यासाठी तुम्हाला काही गृहपाठ देतो. जो कोणी उत्तम गृहपाठ करेल त्याला हे अॅप फुकट मिळेल.

- वर दिलेल्या उदाहरणांत काही बझवर्ड्स आलेले आहेत. तशा इतर बझवर्डांची यादी द्या. आमच्या यादीत नसलेले बझवर्ड्स दाखवून दिलेत तर तुम्हाला अॅप फुकट.
- 'पुण्यामध्ये ट्रॅफिक फार वाढलाय साला! च्यायला धड रस्ता क्रॉस करायची सोय राहिलेली नाही.' या अत्यंत अभारदस्त विधानाचं रूपांतर व्यापक स्वरूपाच्या मांडणीत आणि विश्लेषणात करा.
- पुणे ट्रॅफिक हा विषय सोडून इतर कुठचातरी विषय निवडा आणि त्याचं भारदस्तीकरण करा.
- या प्रकारच्या युक्त्या अनेक लेखक वापरतात. तशा लेखांचे दुवे देऊन कुठच्या कुठच्या युक्त्या वापरल्या आहेत हे दाखवून द्या. आम्हाला माहीत नसलेली युक्ती वापरलेली दाखवून दिलीत तर तुम्हाला अॅप फुकट.

Node read time
5 minutes

ललित लेखनाचा प्रकार

5 minutes

राजेश घासकडवी Mon, 08/08/2016 - 02:44

In reply to by जयदीप चिपलकट्टी

अशा लोकांसाठी 'अभारदस्तक' नावाचं अॅप लिहिता येईल. भारदस्तकमध्ये थोडेसे बदल केले तर हे उलटीकरण जमू शकेल. पण फार डिमांड नसणार अशा अॅपला.

राजेश घासकडवी Mon, 08/08/2016 - 07:03

In reply to by .शुचि.

इतका महत्त्वाचा शब्द कसा राहिला कोण जाणे. गुंतागुंत हा शब्द त्यामानाने सामान्य वाटतो. तेव्हा व्यामिश्र आलाच पाहिजे. अॅपच्या यादीत तो अॅडवला आहे. तुम्हाला अॅप डाउनलोड फुकट.

adam Thu, 21/12/2017 - 10:58

उद्बोधक समाजमनाचे कवडसे सदर लिखाणातून प्रतीत होतात. :)

.
.
अजून एक शैली म्हणजे socio-political बाबींवर सरसकटीकरण करत भाष्य करत हुशारी मिरवायची. पण वाक्य पुरेशी गोलगोल हवीत. म्हणजे घटनांचा उल्लेख योग्य असायला हवा. पण त्यातले निष्कर्ष कै च्या कै काढले तरी चालतील. आणि पुन्हा इतरत्र प्रतिसाद देताना सरसकटीकरणाचा स्वतःच धिक्कार करायचा. (खरं सांगायचं तर मी सुद्धा हे केलेलं आहे )
उदा --
२०१४ मध्ये घडणार्‍या घटनांबद्दल लिहायचय ?
२०१४ मध्ये प्रथमच गैर काँग्रेस , एकजिनसी सरकार पूर्णतः स्वबळावर स्थापित होत होतं. देशभर वातावरण ढवळून निघालं होतं.
२००६ बद्दल बोलायचय ?
हातची सत्ता वाजपेयींच्या काळात घालवून बसलेला क्लाँग्रेस आत्ता कुठे सत्तेवरची मांड पक्की करु लागला होता. इराक हल्ला होउन कोसळला होता आणि अफगाणिस्तानातलं युद्ध अजून थांबलं नव्हतं. म्हणून गणपतरावांना सिग्नल पकडल्यावर चिरीमिरी घेण्याइअवजी पोलिसानं पावती फाडली होती. जगातलं एकूण वातावर्णच एका अभिसरणातून जात होतं.
१९७५ बद्दल बोल्ताय ?
स्वातंत्र्याची एक पिढी उलतून जात असतानाही पुरेशी सुबत्ता आलेली नव्हती. समाजमन अस्वस्थ होतं. सदानंदला वर्गात प्रथम येणं भागच होतं आणि तो आलाही.
१९५५ बद्दल बोल्ताय ?
स्वातंत्र्याच्या आकांक्षांनी समाजमन भारुन गेलेलं होतं. डोळयत स्वप्नं होती. त्या स्वप्नांतच झोपून राहिल्यानं पक्या नापास झाला होता.
.
.
तुम्ही फक्त काळ सांगा, त्याच्या आसपास अशी भारी वाटणारी बक्कळ पेरता येतील.
.
.

geo-political भाष्यं करायचीत ? हवा तो देश निवडा. त्याच्या आसपासचे/शेजारचे देश बघा. आणि त्या देशावर नियंत्रण असलेली व्यक्ती त्या शेजारच्या देशांवर लक्ष ठेवून राहू शकते; असं ठोकून द्या. प्रत्येक देशाशेजारी कोणी ना कोनी शेजारी असणार किंवा त्याच्या जवळून एखादा जलमार्ग नैतर भूमार्ग जात असणारच. "त्याच्यावर लक्ष ठेवणं सोपं होइल" म्हणून द्यायचं ठोकून बिंधास्त.
.
ता.क.
आणि एखाद्या देशाविषयी, काळाविषयी बोलायचं नसेल, नुसत्या पिच्चरबद्दल बोलायचं असेल तर कसं बोलता येइल ह्याची टेम्प्लेट/उदाहरण म्हणून हा प्रतिसाद पहा -- http://aisiakshare.com/comment/163932#comment-163932 :)

चिमणराव Mon, 08/08/2016 - 09:25

#अभ्यास नसणाय्रांनी थोडे थांबावे.अॅपकारकांचा खात्यातला बॅलन्स वाढला की ते ग्राफ काढतील.टॅापआउट झाले की आता कोणी नुरले म्हणून अॅप फ्री करतील.तूर्तास आइस्क्रिमवडा छाप(वरून वडा आत आइस्क्रिम ) भाबडे प्रश्न विचारून सर्वांना कामाला लावावे आणि धाग्याचे ३-१३ वाजवावे.
# अॅपवापरकर्ते भ्या'तीदायक लिहू लागतील मग overdoing effect होईल वाचक आपल्या धाग्यावर येण्याचे बंद करतील तसं होऊ नये म्हणून-
* लेखना शेवटी उदा०- लिहितालिहाता सहज बाहेर पाहिलं इस्त्रिवाला उघडलाय. रस्ता ट्राफिक ओलांडून जाइपर्यंत दुकान बंद होण्या अगोदर कपडे इस्त्रिला देऊन येतो-वगैरे उल्लेख करून आपण सतत जडजडपुस्तकेच वाचत नाही सामान्यच आहोत सामान्य नगरातच राहातो हे आश्वस्त करावे. असल्या गोष्टी हिंदी सिनेमा हिरोंकडून शिकण्यासारख्या आहेत.
# जाताजाता मी म्हणतो ते शेवटचा शब्द नसून तुम्ही आणि इतरही भर घालू शकता असे सुचवणे गरजेचे आहे. थोडक्यात ब्याटन पास करावी.
ओवर टु Adduबाळ.

अबापट Mon, 08/08/2016 - 13:14

गुर्जी आपण थोर आहात . आपले चरणकमल ( अर्थात पादुका )यांचे छायाचित्र लटकावल्यास ते आमच्या संगणकाचा वॉल पेपर म्हणून ठेवू ...

हे एप थोर आहेच

तरीपण , ज्यांचा बाजार आता उठलाय अशांचे app डेव्हलप करून काय उपयोग ?

त्यापेक्षा काहीतरी जीवनावश्यक आणि जीवनोपयोगी app चा विचार करावा . त्याने आपल्या आम्हा शिष्याना वैचारिक लाभ जास्त होईल असा एक संशय आहे

आपद धर्म सारखे keywords वापरल्यास , भाषा जास्त विकासाभिमुख होणार नाही का ?

जास्त गृह पाठ म्हणून आमच्या पुण्याचेच माजी पर्यावरण आणि आता कसले तरी मंत्री असलेल्या गृहस्थांची कुठलीही भाषणे वाचा , अर्थ लावण्याचा प्रयत्न करा आणि तसेच गुळगुळीत बोलायला/लिहायला शिकवा . आमचा विकास नक्कीच होईल

चिंतातुर जंतू Mon, 08/08/2016 - 14:47

जुन्या पिढीच्या विद्वत्तापूर्ण लेखनाशी साधर्म्य साधण्यासाठी संस्कृतप्रचुर भाषा वापरावी. भारदस्त आणि अभिजात शब्दांची काही उदाहरणं : विवक्षित, नैष्ठिक, अनुल्लंघनीय वगैरे. वाक्यांशांची उदाहरणं : 'अमुकतमुक असा म्हणून गेला आहे' म्हणू नये; त्याला 'विवेचन' किंवा 'विश्लेषणात्मक विवेचन' म्हणावं. 'पृथगात्म' म्हणता आलं तर उत्तमच. 'क्षने य केलं' म्हणण्यापेक्षा 'सक्रिय सहभाग घेतला' म्हणावं. स्थूल-सूक्ष्म ह्यासारख्या शब्दांना मराठीत प्रतिशब्द असले तरीही आग्रहाने संस्कृत शब्द वापरावे. 'समोरासमोर' म्हणण्यापेक्षा 'आमुख' म्हणावं. 'पार्श्वभाग' म्हणावं (काय म्हणण्याऐवजी ते सुज्ञास सांगणे न लगे). आय होप यू गेट द आयडिआ.
संज्ञांच्या मांदियाळीतली काही उदाहरणं : संभाषित (डिसकोर्स), विधा (genre), परात्मभाव (alienation), उत्तर-वसाहतवाद (पोस्टकलोनियलिझम), झालंच तर लोकशाहीकरण, जागतिकीकरणोत्तर कालखंड वगैरे.
परदेशी तत्त्वज्ञ, लेखक वगैरेंची आणि संज्ञांची ज्यातत्यात पखरण करावीच (वर सांगितल्याप्रमाणे); पण त्यातही आपलं अन्योन्यत्व आधी अधोरेखित आणि मग लोकमान्य करावं. उदा. 'ही मांडणी तर सॉक्रेटिक झाली; पण विटगेन्श्टाइनपश्चात कालखंडात ती कालबाह्य झाली आहे' अशांसारखी विधानं करावीत.
ह्या एक्झॉटिक नेमड्रॉपिंगच्या वेळी नावं त्यांच्या मूळ भाषेतल्या उच्चारांप्रमाणे द्यावी; इंग्रजीप्रमाणे देऊ नयेत. उदा. वाद गरमागरम होऊ लागला तर प्रतिपक्षाला 'फाशिस्ट' म्हणावं; 'फॅसिस्ट' नाही.
वाक्यं पल्लेदार करून त्यात अर्धविरामासारखी विरामचिन्हं वापरावीत.

(द्याल ना आता तरी मला अ‍ॅप फ्रीमध्ये?)

राजेश घासकडवी Mon, 08/08/2016 - 19:01

In reply to by चिंतातुर जंतू

द्याल ना आता तरी मला अ‍ॅप फ्रीमध्ये?

तुम्हाला फ्री अॅप देऊ करणं हे म्हणजे बापाला समागम करायला शिकवण्यासारखं होईल! (संस्कृत शब्द वापरला की वाक्य कसं सोज्ज्वळ बनतं!) तेवढी आमची जुर्रतच नाही.

अबापट Mon, 08/08/2016 - 19:16

In reply to by राजेश घासकडवी

तीर्थरूप तीर्थरूप ... बाप नाही ... पुरेसे भारदस्त होण्यासाठी!! बापाला ...म्हणलं कि पुढचं वाक्य आपोआप पूर्ण होतं ... प्राकृत भाषेत

राजेश घासकडवी Tue, 09/08/2016 - 11:02

In reply to by अबापट

याला म्हणतात दोन्ही डगरींवर पाय ठेवणं. प्राकृत भाषेत लिहिणं रोखठोक असभ्य मानलं जात असलं तरी वाचकाच्या मनात त्या शब्दांचे तरंग उत्पन्न करणं हे कौशल्याचं काम आहे.

बॅटमॅन Tue, 09/08/2016 - 05:03

In reply to by चिंतातुर जंतू

आणि योग्य वेळेस 'रोचक' व 'उद्बोध(च?)क' या शब्दांचा खुबीने वापर करावा हे राहिलं की ओ.

(कुन्तलत्वग्विच्छेदक) बट्टमण्ण.

फारएण्ड Mon, 08/08/2016 - 19:26

भारदस्तक या बहुअर्थी शब्दालाच दोन मिनीटे थांबून त्याचा आस्वाद घेत खुर्चीमागे रेलून विचार करत राहिलो. एका अर्थाने वाचकाला भारदस्त करणारे, तर दुसर्‍या अर्थाने जोडाक्षरविरहीत->सुलभ(*)->भारदस्त या प्रवासाचा सुलभ->भारदस्त हा टप्पा किंवा उंबरा ओलांडायला साहाय्य करणारे, म्हणजे नवीन शब्दांचा भार घेउनही दस्तक पार करणारे याअर्थीही हे लागू पडते (**)(***).

पहिल्या शब्दातच इतका विचारमग्न झाल्याने, जसे पुढचे आकलन होईल तसे येथे ते विचार प्रकट करेन.

(*) - काहींचे लेखन या स्थितीमधे असे असते की तेथे त्या कंपनी चे नाव चपखल बसेल
(**) - येथे विचार व मराठी वाक्य एकमेकांशी फटकून आली आहेत. पण येथपर्यंत वाचक पोहोचण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे वाक्य दुरूस्त करत नाही
(***) - ते वरचे कंसातील दोन तारे वाले चिन्ह चित्रात्मक घेउन अर्थ काढत बसण्याचा प्रयत्न करू नये.
(****) - लेखक अभ्यासू असतो. लेख अभ्यासू कसा असेल असा प्रश्न पडू नये. कारण शब्द भारदस्त असणे महत्त्वाचे. अर्थ निघालाच पाहिजे असे नाही. 'धुंद धुंद आसमंत' सारख्या कवितांना सुद्धा छान छान प्रतिक्रिया येतात तशाच यालाही येतील.

मिलिन्द Tue, 09/08/2016 - 04:15

भारदस्तपणासाठी साधी गोष्ट कठीण शब्दांत मांडण्याचं कसब अंगी बाणवावं लागतं. : केवळ थोर!
आपले चरणकमल ( अर्थात पादुका )यांचे छायाचित्र लटकावल्यास ते आमच्या संगणकाचा वॉल पेपर म्हणून ठेवू ..." अधिकच थोर!
लोळ.

राजन बापट Fri, 12/08/2016 - 19:41

व्यामिश्र
प्रच्छन्न
आविष्कार
अभ्यागत
विदग्ध
अनभ्यस्त
विकारविलसितें
कर्तुमकर्तुम्
अभिधा
व्यंजना
लक्षणा
एकसमयावच्छेदेंकरून
कथात्म
काव्यात्म
शोकात्म
आत्मनिष्ठ
नैष्ठिक
प्रागैतिहासिक
नवता
परंपरा आणि नवता
चौथी नवता
परात्मता
पृथगात्मता
अनुशीलन
परिशीलन
कैवल्य
अकारविल्हे
प्राकार
गतानुगतिकता
आसक्त
अनासक्त
विमनस्क
नैष्कर्म्य
अपवादात्मक
परा
पश्यंती
मध्यमा
वैखरी
चक्षुर्वैसत्यम्
दस्तावेजीकरण
बराकीकरण
बिंदुगामी
शष्प
संवैधानिक
असंवैधानिक
वैधानिक
विद्यमान
अनुरक्त
प्रेरक
संप्रेरक
पैशाचिक
संघनन
और्ध्वदेहिक
अधोलोक
अधोलौकिक
कोषगत
विलक्षण
आस्थेवाईक
दैहिक
पारलौकिक
आरस्पानी
चक्रमेनिक्रमेण
क्रमशः
(क्रमशः)

राजन बापट Fri, 12/08/2016 - 20:43

In reply to by रुची

हुकूमशाही - किंवा विशेषतः कम्युनिस्ट व्यवस्थेमधे - समाजाच्या झालेल्या रेजिमेंटेशनचं वर्णन समाजाचं झालेलं बराकीकरण असं केलं जायचं. मार्स्किस्ट डिस्कोर्समधलं (एलियनेशन या संज्ञेच्या जोडीने येणारं) एक पेटंट प्रकरण.

रुची Mon, 15/08/2016 - 19:58

In reply to by राजन बापट

असं होय? मला वाटलं ट्रंपच्या भाषेत ओबामा अमेरिकेचं जे करतोय त्याला बराकीकरण म्हणतात! :-)

अमुक Tue, 16/08/2016 - 14:45

In reply to by राजन बापट

ते चक्रमेनिक्रमेण नसून चक्रनेमिक्रमेण आहे. चक्रनेमि = चाकाची धाव (rim).
मेघदूतातला श्लोक (४८) आहे.

अर्थात तो 'हुच्चभ्रू'प्रमाणे मुद्दामहून (उद्मेखून) उफराटा (वक्रोक्त) केला असेल तर हे खुस्पट (छिद्रान्वेषण) व्यर्थ व वरील (उपरिनिर्दिष्ट) सुधारणा (दोषमार्जन) बाद समजावे. ;)

अजो१२३ Fri, 27/01/2017 - 14:24

In reply to by राजन बापट

पाय कुठेत हो तुमचे? च्यायला आम्हाला तुमच्यासारखे १-२ गुरु मिळाले असते तर जिंदगी बन जाती. त्याचे अर्थ लिहायचं पण कुणीतरी व्हॉल्यूंटीअर करा राव.

नितिन थत्ते Tue, 16/08/2016 - 16:07

>>चक्रनेमि = चाकाची धाव (rim)

असं आहे का? मला वाटत होतं चक्र-नेमि-क्रम म्हणजे एखादी गोष्ट नेमाने घडणे.

बॅटमॅन Tue, 16/08/2016 - 17:40

In reply to by नितिन थत्ते

चाकाच्या गतीमुळे त्यावरील प्रत्येक पॉइंट त्याच पोझिशनला ठराविक काळाने येतो त्याला उद्देशून ही संज्ञा आहे.

१४टॅन Wed, 01/02/2017 - 17:09

हा अख्खाच लेख मला कायतरीच जास्त आवडलाय. सोशल मिडीयावर जे कवडे/ले-खंक प्रकार असतात त्यांच्याबद्दल पण काहीतरी अपेक्षित.
वानगीदाखल- http://satyawankamble.blogspot.in/2016/12/27.html