दोन स्पेशल-नक्कीच स्पेशल!

ह्या वेळचा स्वातंत्र्यदिन सोमवारी आला. शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे लागोपाठ कमीतकमी ३ दिवस सुट्टी. गेल्या weekendला आंबोली/गोवा करून आलो होतो. एकूण होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीच विचार करून घरीच राहिलो. सोमवारी संध्याकाळी जितेंद्र जोशी आणि गिरिजा ओक यांचे सध्या गाजत असलेले ‘दोन स्पेशल’ हे नाटक पहावे असे ठरवेले होते. शनिवारी दुपारी सहज करता करता स्टार माझावर प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे बोलत असताना दिसले. रेंगाळलो. ते बोलत होते त्यांच्या नाटकाबद्दल-संगीत संशयकल्लोळ. असेही समजले त्या नाटकाचे प्रयोग लंडनमध्ये Peacock Theater मध्ये होणार आहेत, जी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.

बोलता बोलता गाडी घसरली ती मराठी नाटकांच्या सद्यस्थितीकडे. प्रशांत दामले त्याबद्दल अगदी पोटतिडकीने बोलत होता. या ना त्या कारणामुळे मराठी नाटक पाहणे हे लोकांच्या यादीत सर्वात शेवटी असते असे तो म्हणाला. ते मला देखील पटले. मी नाटकवेडा असून देखील, आणि पूर्वी कितीतरी नाटकं पाहत असून देखील, ते माझ्याबाबतीत खरे झाले होते. मी गेली सात-आठ महिने नाटक पहिलेच नव्हते(जानेवारीत पाहिलेले unSEEN). का? चांगली नाटकं आली नव्हती? तसे काही नाही. कित्येक चांगली नाटके आली होती.उदा. महेश एलकुंचवार यांचे वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी असे दोन लागोपाठ नाट्यप्रयोग असलेले नाटक मध्यंतरी लागले होते, आणि जे मला पाहायची जबर इच्छा होती. पण नाही गेलो. माझ्या बाबतीत तरी सध्या प्रश्न असा आहे की रस्त्यावर असलेली वाहतूक, आणि परत सुट्टीच्या दिवशीपण त्यात अडकण्याची भीती आणि जवळपास नसलेले नाट्यगृहे. पिंपळे सौदागर भागात, जेथे मी राहतो, तेथे, गेल्या काही वर्षात, एक सोडून, तीन-तीन सिनेमागृहे उभी राहिली आहेत. पण नाट्यगृह एकही नाही. औंध मध्ये आहे, पण तेथे नाटकं होतच नाही. दुसरे नाट्यगृह जवळ असलेले आहे ते चिंचवड मध्ये.

असो, थोडे विषयांतर झाले. मी लिहायालो बसलो आहे ते कालच ‘दोन स्पेशल’ नाटकाबद्दल. नाटक बेतले आहे ते प्रसिद्ध लेखक ह. मो. मराठे यांच्या एका ‘न्युज स्टोरी’ ह्या कथेवर. मराठे हे मुंबईत पत्रकार म्हणूनही काम करत. त्यांच्या लेखनावर आधारित आलेले हे दुसरे नाटक. पहिले म्हणजे ‘निष्पर्ण वृक्षाखाली भर दुपारी’. ह्या नाटकाला १६ पुरस्कार मिळाले आहेत. आणि तसे हे काही महिन्यांपूर्वी आलेले नाटक, अगदी नवीन नव्हते.

नाटक घडते ते एका वृत्तपत्राच्या कार्यालयात. उपसंपादकाची कार्यनिष्ठा, आणि प्रेम ह्यातील आंदोलने दाखवणारे नाटक. मला आवडले ते नाटकाचे अतिशय वास्तवादी नेपथ्य, आणि पार्श्वसंगीत. वृत्तपत्र कार्यालय आणि तेथे रात्री चालणारे काम, आणि आजूबाजूला होत असणारे आवाज ह्या मुळे ते वातावरण अतिशय छान निर्माण केले गेले आहे. नाटकाचा पहिला भाग छान. त्यात आणखीन मला आवडलेला म्हणजे पहिलाच प्रसंग. नव्या उमेदवाराला कामावर ठेवून घेण्याचा प्रसंग. छानच वठला आहे. वृत्तपत्तव्यवसायातील, पत्रकारितेमधील वेगवेगळया पैलूंची प्रेक्षकांना थोडीफार ओळख होते. मी फार पूर्वी Institute of Typographical Research मध्ये काम करायचो. आमचे वृत्तपत्रांसाठी लागणारे सॉफ्टवेअर आम्ही तयार करत होतो. त्यावेळेस page setting, columns, fonts, typography, page design वगैरे गोष्टींची ओळख झाली होती. त्या सर्वांची आठवण झाली.

आता हा नायकाचा पेचप्रसंग(वर थोडासा उल्लेख केला आहे, पण बाकीची माहिती हवी असेल तर नाटक पहा!) कसा सोडवला जाणार, काय होणार असा विचार करता करता, मध्यंतरानंतर, मात्र निराशा होते. नाटक नेहमीच्या वळणावर जाते. नायकाला असणारा पेचप्रसंग सोडवण्यासाठी, वरवर कारण म्हणून दुसऱ्या महत्वाच्या बातमीला प्राधान्य दिले जाते, पण मूळ मुद्दा असा, की नायकाने, आपली तत्वनिष्ठा सोडली असेच दिसते. आणि तेथेच नाटक संपते. त्यामुळे हे ‘दोन स्पेशल’ नाटक खरंच स्पेशल आहे का आपणच ठरवायचे आहे. अगदी परवाच पुण्यात बालेवाडीत एका चालू असलेल्या इमारतीचे काही बांधकाम पडून बरेच लोक दगावले, त्या प्रसंगाची आणि त्यावेळी वृत्तपत्र-विश्वात काय काय झाले असेल नसेल याचा अंदाज करता आला. नाटक आहे १९८९ मधील, आणि अजूनही असे प्रसंग होतात, आणि परिस्थिती विशेष बदलली नाही हेच जाणवते.

नाटकाला बऱ्यापैकी गर्दी होती, अगदी नाटक सुरु होई पर्यंत तिकीट विक्री चालू होती. नाटकाची तिकीट मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पहिल्या २० रांगांसाठी, ३०० रुपये, आणि नंतर २५०…त्याखाली काही नाही. चित्रपटांची तिकिटे ह्या पेक्षा नक्कीच कामी आहेत. अर्थात त्याला कारणही आहे. तिकिटांची किमंत हा ही मुद्दा नाटकांनाकडे प्रेक्षक न वळण्याचे एक महत्वाचे कारण आहे, त्याचा विचार व्हावा.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नावाने काही अंदाज आला नाही पण नाटकमिमांसा आवडली.दामलेनेही मुद्दे मांडले होते.एक खरा मुद्दा सांगायला सर्वचजण कचरतात तो म्हणजे भिकार सवयींचे प्रेक्षक.घाण करून ठेवणे,खुर्चा तोडणे आहेच.
ह.मो. आवडतात.एक माणूस एक दिवस पुस्तक छान होते.( nine lives - william darlymple ही असेच आहे.)मत व्यक्त न करता आहे ते सादर करणे.हाच मुद्दा स्पेशलमध्ये असावा.त्या कार्यक्षेत्राची ओळख करून देणे.पुस्तकाऐवजी नाटक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>भिकार सवयींचे प्रेक्षक.घाण करून ठेवणे,खुर्चा तोडणे आहेच.
अगदी बरोबर. तसेच वारंवार विनंती करूनही मोबाईल सायलेंट न करणे, तसेच त्यावर नाटक सुरु असताना बोलणे, आणि प्रेक्षकांचा तसेच कलाकारांचा रसभंग करणे इत्यादी प्रकार सर्रास होत असतात. लहान मुलांना या नाटकाला आणू नये असी सूचना होती, तसेच निवेदन देखील करण्यात आले होते. नाटक सुरु असताना एक पोरगं रडायला लागला(तेही ४-५ रांगेतून). जितेंद्र भडकला त्यांच्यावर. तरी देखील ते उठून बाहेर गेले नाहीत. आता काय म्हणावे!?

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

नाटकाचा प्रेक्षक,कलाकार दुसरीकडे वळण्याला टिव्हिमालिका कारण आहेतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0