#तिलाबरंबोलतंकरा

सोशल मिडीया, इंटरनेट - दि. १३ ऑक्टोबर रोजी दोन महत्त्वाच्या बातम्या आल्यावरही एका स्त्री सदस्येने आपल्या अडाणीपणाच्या कोषातच राहायचं ठरवल्याची बातमी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. महामहीम बॉब डिलन (लोकसत्ताकारांच्या मते बॉब डायलन) यांच्याबद्दल प्रेमाचा उमाळा आल्यावर आदूबाळ यांनी डिलनच्या एका गाण्याचं भाषांतर करून ऐसी अक्षरेच्या खरडफळ्यावर लावलं होतं. ही बातमी सदर सदस्येपर्यंत पोहोचूनही त्यांनी दिवसभर यूट्यूबवर 'कोक स्टुडिओ - पाकिस्तान'ची दोन गाणी ऐकली. आमच्याकडे असणाऱ्या तज्ज्ञ गणितज्ञांच्या मतानुसार, एका दिवसात ही दोन गाणी किमान १० आणि कमाल १०३ वेळा ऐकून होतील. एवढा वेळ इंटरनेट आणि यूट्यूब उपलब्ध असूनही सदर सदस्येने बॉब डिलनच्या कोणत्या गाण्याचं भाषांतर केलं गेलं, ह्याचा शोध घेतला गेला नाही.

दुसरी महत्त्वाची बातमी फेसबुकवरून आली आहे. सदर सदस्येच्या एका फेसबुक मित्राने दारीओ फोंच्या (ह्यांची बातमी दैनिक पुढारीमध्ये छापलेली नाही.) नाटकाबद्दल तब्बल २१४ अकारविल्हे वापरून प्रतिक्रिया लिहिली. ही बातमी दिसूनही सदर सदस्येने ती प्रतिक्रिया लाईक केली नाहीच, आणि वर 'फोंच्या कादंबऱ्यांना नोबेल पुरस्कार मिळायला हवा होता' अशा अर्थाचा, १४४ अकारविल्हे वापरून दीर्घनिबंधही लिहिला नाही.

ह्या संदर्भात सदर सदस्येशी संपर्क केला असता, "मला ज्या विषयातलं काहीही माहीत नाही त्याबद्दल मी काही बोलत नाही आणि मुहूर्त आहे म्हणून बोलून टाकणार नाही", अशी निपटनिरंजनी प्रतिक्रिया मिळाली. सदर सदस्येला आपल्या अडाणीपणाच्या कोषातच रमायचं आहे आणि तिला सोशल मिडीयावर प्रसिद्ध होण्याची इच्छा नाही हे प्रतिक्रियेवरून हे स्पष्टच आहे. तेव्हा तिच्यावर काही मनोवैज्ञानिक इलाज लवकरात लवकर व्हावेत अशी मागणी सोशल मिडीयावर होत आहे. (#तिलाबरंबोलतंकरा)

मात्र सखोल प्रयत्न करूनही ही सदस्या स्त्रीवादी आहे का नाही, ह्याबद्दल आमच्या वार्ताहरांस काहीही माहिती मिळाली नाही.

(अमूर्तप्रेरणा एक आणि दोन)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माझ्या मते सदर सदस्येचं वर्तन हे अनेक पातळ्यांवर लांच्छनास्पद आहे. एकतर बॉब डिलनसारख्या नोबेल लॉरिएटबद्दल बातमी देण्याचेही कष्ट न घेणं हे घृणास्पद आहे. 'वॉर अॅंड पीस' ही कादंबरी थोर आहे हे म्हणण्यासाठी ती वाचावी थोडीच लागते? आणि बॉब डिलनचं कौतुक करण्यासाठी तर तेवढेही कष्ट करावे लागत नाहीत. 'हाऊ मेनी रोड्स.... ब्लोइंग इन द विंड' हे गाणं एकदा ऐकलं की कुठचीही व्यक्ती 'बॉब डिलन - अहाहा' म्हणू शकते. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आदूबाळांनी तेही काम भाषांतर करून सोप्पं करून टाकलेलं आहे.

डारियो फोचा मामला थोडा कॉंप्लिकेटेड आहे. पण तसाही तो विनोदी लेखक होता हे विकीपीडियावर जाऊन पाहिलं की कळतं. मग श्रद्धांजली एवढं म्हणून झालं की 'आमचे पुलं जर इटालीत जन्माला आले असते तर त्यांनाही नोबेल मिळालं असतं' अशासारखी विधानं करता येतात. तेवढे कष्ट न घेता नुसतं श्रद्धांजली म्हणून 'मला माहित्ये बर्का तो कोण होता ते' असं दाखवण्याचा क्षीण प्रयत्नही न केल्याबद्दल लांच्छनास्पदपणाचा डोस डब्बल होतो.

लेखनातली साटल्याची मात्रा जरा जास्तच वाढलेली दिसते.

मुख्य बातम्या दोन होत्या - आदूबाळने खरडफळ्यावर भाषांतर लिहिलं आणि फेसबुकवर मित्राने २१४ कॅरॅक्टर्स वापरून प्रतिक्रिया लिहिली. जगात कुठेही, काहीही का होईना, आपल्या गोतावळ्यातल्या दोघांनी काही लिहिलं आणि त्यावरही ही सदस्या ढिम्म हलली नाही, म्हणजे तिच्यातच काही दोष असणार, असा विनोद होता. किंवा काल तो विनोदी होता. Tongue

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बॉब डिलन नाई ओ बाबा धिल्लन

बाबा धिल्लन कोण?

आम्हाला एक पूनम धिल्लन माहिती आहे.

Poonam Dhillon

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

ती पॅन्सी डिलॉन आहे. पॅन्सी डिलॉन वेगळी आणि बाबा धिल्लन वेगळा Wink