चक्का जाम

©®™मंगेश पंचाक्षरी, नासिक.
(कृपया पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)

सोमवार, 14 ऑगस्टची गोष्ट. ज्याची भीती होती तेच घडलं. आम्ही पुण्याहून कारने नाशिककडे येत होतो. नेहमीप्रमाणे नासिक फाटा ते चाकण या प्रवासास अडीच तास लागले. राजगुरू नगर येथे ट्राफिक जॅम होणं ही सर्दी होण्याइतकी नित्याची बाब आहे. तिथल्या छोट्याश्या पुलाला समांतर पूल बांधायला कोणत्याच सरकारला वेळ झाला नाहीये. तिथली वाहतूक देशाच्या प्रगती इतक्याच धीम्या गतीने होत असते. 'याचसाठी राजगुरू यांनी महान त्याग केला होता काय?' हा प्रश्न मला नेहमी पडतो. नासिक पुणे मार्गावरील गावातून इतकं अतिक्रमण झालं आहे की ते उठवण्या ऐवजी बायपास रस्ते बांधावे लागलेत. मुळात नासिक- पुणे मार्गात संगमनेरचा काहीच संबंध नाही तरीही काही स्वार्थी राजकारण्यांनी हा मार्ग संगमनेर मार्गे बांधून वर्षानुवर्ष जनतेचा वेळ, पेट्रोल आणि मनःस्ताप वाढवला आहे. हा रस्ता भगूरमार्गे असता तर बरंच अंतर वाचलं असतं. शिवाय थेट रेल्वे नसल्याने पुणे कायम नासिक पासून सहा तासाच्या अंतरावर नेऊन ठेवलं आहे.

आम्ही कसेबसे आळेफाट्यास पोहीचलो. हल्ली इथून नासिक पर्यंतचा रस्ता चांगला झाला आहे. त्यामुळे आम्ही जरा निवांत झालो होतो. इतक्यात पुनः गाड्यांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. 'आता काय झालं!' हे बघण्यासाठी आम्ही गाडीतून खाली उतरलो तर 'रस्ता रोको' झालेलं होतं. यास हल्ली 'चक्का जाम' हा उत्तर भारतीय शब्द वापरला जातो. जसं एखाद्या वाढीस हल्ली 'वधारणे' हा शब्द सर्रास वापरला जातो तसं. आता वाढणे आणि सुधारणे याची बेरीज करून वधारणे हा अशुद्ध गुजराथी शब्द मराठीत रूढ केला गेला आहे तसंच हे चक्काजाम प्रकरण आहे. आम्ही बघितलं तर इन-मीन 25 टोप्या (हल्ली पंचवीस डोके असं म्हणणं जीवावर येतं) रस्त्यावर आडवी माळ करून बसलेल्या होत्या. पांढरे चुरगळलेले कपडे, डोक्यावर गांधी टोपी, बाजूला श्रीमंती गाड्या, गळ्यात जाड सोन्याचे गोफ, बोटात अंगठ्या असे गरीब आंदोलक जमलेले होते. काही टोप्यांवर 'मी अमुक आहे ' असं त्यांच्या नेत्यांचं नाव होतं. काहींच्या टोप्यांवर कोणाचेच नाव नव्हते. 'तुम्ही कोण?' असं आम्ही त्यांना विचारलं तर ते काही त्यांना सांगता येईना. 'कोsहम' म्हणजे 'मी कोण आहे?' या साधु - संतांना पडलेल्या चिरंतन अध्यात्मिक प्रश्ना सारखाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. 'एवढीच गर्दी का बरं बुवा?' असं आम्ही एका कार्यकर्त्याला (?) विचारलं तर 'श्रावण चालू आहे मग इथं दिवसभर गाड्या अडवून संध्याकाळी त्याचा काय फायदा?' असा सवाल त्याने उलट आम्हालाच विचारला.

एव्हाना गाड्यांची रांग वाढत चालली होती. सर्वसामान्य जनतेला विनाकारण 'फाट्या'वर मारणाऱ्याना आवरण्यासाठी पोलिसांचा फौज'फाटा' आळे'फाटा' येथे दाखल झाला होता.तर आंदोलकांमध्ये 'फाटाफूट' होऊ नाही म्हणून एकजण कार्यकर्त्यांना बिसलेरी वाटत होता. 'शेतीमालाला भाव नाही, गरीब शेतकरी आत्महत्या करत आहेत, कर्जमाफी लै किचकट केली आहे' म्हणून रस्ता रोको केला आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. भूक लागली म्हणून आम्ही तिथल्या फळं विक्रेत्याकडे मोर्चा वळवला. त्यातल्या त्यात 'केळी' परवडतात म्हणून आम्ही भाव विचारला तर केळी पन्नास रुपये डझन होती. आमचा चेहरा बऱ्याच दिवसांत 'न' खाल्लेल्या टमाट्यासारखा लाल झाला. त्यांना शेती परवडत नव्हती आणि आम्हाला केळी परवडत नव्हती. पंधरा मिनिटातच तिथे पोहोचलेल्या पत्रकारांनी फोटो काढले. त्याबरोबर जमाव पांगला. आम्हीं दुसऱ्या दिवशीचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी 'तिरंगा' विकत घेतला आणि भुकेल्या पोटी घराकडे निघालो.

-©®™ मंगेश पंचाक्षरी, नासिक.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet