Dead Man's Hand - 2

आधीचा भाग -

Dead Man's Hand - 2
-----------------------------------------------------------

"जयहिंद! मालवणी पोलीस स्टेशन, सब् इन्स्पेक्टर महाडीक बोलतोय..."

"साहेब, मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या उलट्या बाजूला एक मुलगी मरुन पडली आहे. तुम्ही लवकर या!"

महाडीक पुढे काही बोलण्यापूर्वीच फोन कट् झाला होता.

"च्यायला, पोलिसांना पूर्ण माहिती का देत नाहीत हे लोक? डिस्ट्रीक्ट, जीप काढा.. डिटेक्शनवाले कोणकोण आहेत बघा..."

सुमारे वीस मिनीटांत इन्स्पेक्टर घाटे, सब् इन्स्पेक्टर महाडीक, हेड कॉन्स्टेबल राणे आणि इतर चार शिपाई यांच्यासह सायरनचा आवाज करत पोलिस जीप मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या टोकाला येऊन थांबली. नेहमीपेक्षा उलट्या बाजूला असलेल्या खाजणवजा जागेत झालेल्या गर्दीमुळे नेमकी जागा शोधून काढण्यास पोलिसांना अजिबात श्रम पडले नाहीत. विरळ झाडीतून आणि खडकांवरुन पंधरा-वीस मिनीटं पायपीट केल्यावर अखेस पोलिस पार्टी त्या जागी येऊन पोहोचली.

आधीच शनिवार-रविवार आणि त्याला जोडूनच ख्रिसमसची सुट्टी आल्याने आजूबाजूला असलेली सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स ओसंडून वाहत होती. त्यातच वार्‍यासारखी ही बातमी पसरल्यामुळे नेहमीच्या बीचपेक्षा बाजूला असलेल्या या जागी एव्हाना बर्‍यापैकी गर्दी झाली होती. गर्दीतील जवळपास प्रत्येकजण तर्क-वितर्क लढवत हिरीरीने आपलं मत मांडत होता..

"नक्कीच आत्महत्या केली असणार! काय दु:ख होतं बिचारीला कोणास ठाऊक? वाईट झालं!"

"एवढ्या लहान वयात आत्महत्या? काहीतरीच काय? नक्कीच खुनाची भानगड असणार!"

"अ‍ॅक्सीडेंटही असू शकतो! कदाचित स्विमींगला गेली असेल आणि पाण्याचा अंदाज आला नसेल! अक्सा बीचवर असे प्रकार नेहमी होतात."

"मला तर वाटतं, बॉयफ्रेंडबरोबर आली असणार आणि मजा मारुन झाल्यावर त्यानेच टपकावली असणार."

"ते पहा पोलिस येत आहेत! आता नक्की काय ते कळेल!"

पोलिस आलेले पाहताच आतापर्यंत सुरु असलेली चर्चा एकदम थांबली. आतापर्यंत त्या मृतदेहाच्या जवळपासही फिरकण्याची कोणाची हिम्मत झाली नव्हती, पण पोलिस आलेले पाहताच सर्वजण एकदम पुढे सरसावले. पोलिस नेमकं काय करणार याची सर्वांनाच उत्कंठा होती, त्यामुळे मोक्याची जागा पटकावण्यासाठी आता रेटारेटीला सुरवात झाली.

"ओ! चला मागे व्हा सगळे! कोण ती सनी लीऑन नाचतेय का इथे?"

हातातील दंडुका परजत अस्सल पोलिसी आवाजात हेड कॉन्स्टेबल राणेंनी गर्दी मागे हटवण्यास सुरवात केली. त्यांच्या मदतीला दोन शिपाईही होते. राणेंचं हे काम सुरु असताना गर्दीकडे एक दृष्टीक्षेप टाकून घाटेंनी मृतदेहाचं निरीक्षण करण्यास सुरवात केली.

ती तरूणी सुमारे २४ - २५ वर्षांची असावी. गोरापान रंग आणि कोणीही एकदातरी वळून पाहवं असं रुप तिला लाभलं होतं. काळ्या रंगाचा स्कर्ट आणि पिवळ्या रंगाचा स्लिव्हलेस टॉप असा पेहराव तिच्या देहावर होता. मनगटावर घड्याळ होतं. परंतु सर्वात आश्चर्याची गोष्टं म्हणजे तिच्या पायात सँडल्स किंवा बूट नव्हते! अनवाणी अवस्थेत तिचा मृतदेह तिथे पडला होता. तिच्या एकंदर पेहरावावरुन ती उच्चभ्रू आणि सधन घरातली असावी असा अंदाज येत होता.

इन्स्पे. घाटेंनी समोर उभ्या असलेल्या गर्दीवरुन एक नजर फिरवली आणि विचारलं,

बॉडी सर्वात प्रथम कोणी पाहिली? आणि पोलिसांना फोन कोणी केला होता?"

पिनड्रॉप सायलेन्स!

अर्थात इन्स्पे. घाटेंना हे फारसं अनपेक्षित नव्हतंच. इतर वेळेस पोलिसांच्या नावाने बोटं मोडणारे लोक वेळ आली की 'उगाच कशाला नसती भानगड आपल्या मागे लावून घ्या?' या बेपर्वा वृत्तीने पोलिसांना मदत करायला पुढे येत नाहीत हे त्यांना अनुभवाने पक्कं माहीत होतं. केवळ एक खडा टाकून पाहवा म्हणून त्यांनी हा प्रश्नं केला होता.

एव्हाना पोलिस फोटोग्राफर आणि फिंगर प्रिंट एक्सपर्ट्स हजर झाले होते. दोन शिपायांनी त्यातल्या त्यात कोरड्या जागेवर पांढरा कपडा अंथरला आणि त्या तरुणीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून त्यावर ठेवला. पोलिस फोटोग्राफर्स आवश्यक त्या सर्व कोनातून मृतदेहाचे फोटो घेत असतानाच घाटेंनी प्राथमिक तपासणीला सुरवात केली होती. त्या तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता हे पोस्टमॉर्टेमनंतरच कळणार होतं, पण पुढील तपासाच्या दृष्टीने एखादा धागा मिळतो का हे पाहणं महत्वाचं होतं. पण घाटेंना फारसे प्रयास पडलेच नाहीत. तिच्या गळ्याभोवती असलेला तो काळपट निळसर वण तिच्या मृत्यूचा जिवंत पुरावा होता....

"या मुलीचा खून करण्यात आला आहे! बहुतेक दोरीने गळा आवळून हिला मारण्यात आलं आहे." सुमारे पंधरा-वीस मिनीटं बारकाईने मृतदेह तपासून झाल्यावर घाटे गंभीरपणे म्हणाले, "एक काम करा महाडीक, इथे आजूबाजूला असलेल्या असलेल्या सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समधून चौकशी करा. कदाचित ही मुलगी एखाद्या रिसॉर्टमध्ये उतरलेली असण्याची शक्यता आहे. प्रश्नं आहे की ही इथे कशी आली आणि कोणाबरोबर? बीचच्या या भागात सहसा कुणी येत नाही. एकतर हा सगळा भाग खडकाळ आहे आणि दुसरं म्हणजे इथे पाण्यात भोवरे आहेत. या भोवर्‍यांत सापडून अनेकजण इथे बुडाले आहेत. नेहमी फिशींगला जाणारे कोळीही हा भाग शक्यतो टाळतात. आपल्याला हिच्यापाशी पर्स, मोबाईल किंवा नया पैसाही सापडलेला नाही. आता मुंबईत अशी कोणती मुलगी असेल जी मोबाईल आणि पैसे बरोबर न घेता घराबाहेर पडेल? अर्थात नवरा बरोबर असेल तर हे अशक्यं नाही पण या मुलीचं लग्नं झाल्याची कोणतीही खूण आढळलेली नाही! ही आपल्या बॉयफ्रेंडबरोबर आली आणि तो हिला मारून पळून गेला असं क्षणभर मानलं तर तिच्या चपला किंवा बूट कुठे गेले? का खून केल्यावर पर्सच्या जोडीला तो चपला किंवा बूट तो बरोबर घेवून गेला? एक शक्यता आहे ती म्हणजे हिचा खून दुसरीकडे करुन तिची बॉडी इथे आणून टाकण्यात आली असावी. तसं असल्यास तिचा खून झाला तिथे चपला किंवा बूट पडले असतील..."

घाटे महाडीकांशी बोलत असताना हेड कॉन्स्टेबल राणे एका शिपायाला घेऊन पुढे आले.

"साहेब, हा खताळ त्या मुलीला ओळखतो म्हणतोय!"

"तू ओळखतोस?" घाटेंनी त्याच्यावर नजर रोखत विचारलं, "कसं काय?"

"साहेब, मला हिचा नाव-पत्ता वगैरे माहीत नाही, पण मी या मुलीला दोन-तीन वेळेस पाहीलं आहे. गेल्यावर्षी मी विरारजवळच्या आगाशी पोलिस स्टेशनला होतो तेव्हा तिथे अशीच एक केस झाली होती. सगळं अगदी सेम टू सेम होतं. किनार्‍यावर अशीच एका मुलीची बॉडी सापडली होती. त्या केसमध्ये या मुलीचा काहीतरी संबंध होता असं आठवतं आहे... बहुतेक दोघी मैत्रिणी होत्या. इन्स्पे. देवरेसाहेब त्या केसचा तपास करत होते."

"ठीक आहे!" घाटे मनाशी काहीतरी निर्णय घेऊन म्हणाले, "महाडीक, तुमचा पंचनामा आटपला की बॉडी पोस्टमॉर्टेमला पाठवून द्या. त्यापूर्वी हिच्या हाताचे ठसे घ्यायला विसरु नका. मी खताळबरोबर आगाशीला जाऊन इन्स्पे. देवरेंना भेटतो. हा खताळ म्हणतो तीच ही मुलगी असेल तर हिचं नाव आणि पत्ता आगाशी पोलिसांच्या रेकॉर्डला सापडेल."

"येस सर!"

घाटे आगाशी पोलिस स्टेशनला पोहोचले तेव्हा सुदैवाने इन्स्पे. देवरे आपल्या केबिनमध्येच होते. खताळला आणि त्याच्याबरोबर इन्स्पे. घाटेंना पाहून ते चकीतच झाले. घाटेंनी आपल्या येण्याचं प्रयोजन सांगून आपल्या मोबाईलमधला त्या तरुणीच्या मृतदेहाचा फोटो दाखवताच देवरेंना आश्चर्याचा धक्का बसला.

"ही तर प्रिया मल्होत्रा आहे! सुमारे वर्षभरापूर्वी.... डिसेंबरच्या २७ तारखेला आमच्या इथे नवापूर बीचवर सुनेहा त्रिवेदी नावाच्या एका मुलीची डेडबॉडी सापडली होती, त्या केसच्या संदर्भात मी हिला दोन - तीनदा भेटलो होतो. या दोघी एकाच कॉलेजमध्ये शिकल्या होत्या आणि खास मैत्रीणी होत्या. सुनेहाच्या खुनाचा आम्ही सगळ्या बाजूने तपास केला घाटेसाहेब, पण काही म्हणजे काहीही हाती लागलं नाही. त्यातच ही प्रिया न्यूज रिपोर्टर असल्याने तिच्या चॅनलने खात्याविरुद्ध आणि आगाशी पोलिसांविरुद्ध बरीच बोंबाबोंब केली होती. आता या प्रियाचाही खून झाल्याचं तुमच्याकडून कळलं. काय दुर्दैवी योगायोग आहे!"

***************************************************************************

हळूहळू ती शुद्धीवर आली....

आपण नेमके कुठे आहोत हेच तिला कळेना. क्षणभराने तिला पहिली जाणीव झाली ती म्हणजे आपलं डोकं प्रचंड जड झालं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला नक्कीच कुठेतरी खोलवर जखम झाली आहे.... जडावलेल्या डोक्यातही कळ जाईल असा ठणका जाणवत होता. एका हाताचा आधार घेत तिने उठून बसण्याचा प्रयत्नं केल, तेव्हा तिच्या कमरेतून तीव्र वेदनेची सणक डोक्यात गेली. 'आ SS...' कळवळतच तिने तिकडे नजर टाकली आणि जे काही दिसलं ते पाहून ती मुळापासून हादरली....

तिच्या देहावर एकही वस्त्रं नव्हतं!

"अबे! तेरी आयटम को होश आ गया देख!"

धडपडून उठण्याचा प्रयत्नं करत असतानाच उकळतं तेल ओतलं जावं तसे ते शब्दं तिच्या कानात शिरले. डोळे विस्फारुन तिने त्या दिशेला पाहीलं आणि तिला दुसरा जबरदस्तं धक्का बसला....

आसुरी हास्यं चेहर्‍यावर खेळवत ते सर्वजण तिच्याकडे टक लावून पाहत होते. तिला एकदम शिसारी आली. आपण नेमक्या कोणत्या अवस्थेत आहोत याची जाणीव होताच तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. प्रत्येकाची वखवखलेली नजर तिच्या अंगप्रत्यंगांवरुन फिरत होती. नजरेनेच तिच्या देहाचा ते उपभोग घेत होते जणू! आपले कपडे? त्या परिस्थितीतही तिच्या डोक्यात तो प्रश्नं आला. एका बाजूला अस्ताव्यस्तं पडलेले कपडे दिसताच ती एकदम ते घेण्यासाठी उठू लागली आणि पुन्हा तिच्या डोक्यात वेदनेचा आगडोंब उसळला....

.... आणि ते भयानक वास्तव तिच्यापुढे अचानक अवतरलं....
आपल्याला होत असलेल्या वेदनेचा उगम नेमका कुठे आहे हे आता कुठे तिच्या ध्यानात आलं होतं....
तिच्या डोळ्यांतून पाण्याची धार लागली....

"अच्छा हुवा इसको होश आ गया यार! बहोत बोअर हो रहा था! चलो, एक और राऊंड कर लेते है!"

कोणीतरी एकजण छद्मीपणे उद्गारला, तशी ती नखशिखांत हादरली. मरणप्राय वेदना सहन करत ती धडपडून उठण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांच्यापैकी दोघे तिच्यापर्यंत पोहोचले. त्यांच्या चेहर्‍यावरचे क्रूर भाव पाहताच तिचं उसनं अवसान गळालं. पुढ्यात वाढून ठेवलेल्या प्रसंगाच्या कल्पनेनेच तिच्या अंगावर काटा आला. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या दयेची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नव्हता. स्वत:च्या असहाय्यतेची तिला कीव आली. त्यांच्या अत्याचारांना मूकपणे बळी पडण्यापलिकडे तिच्या हाती काही नव्हतं!

प्रत्येकजण आळीपाळीने तिच्यावर तुटून पडत होता....
मध्येच कोणीतरी लाथा घालत खोदून खोदून काहीतरी विचारत होतं....
अधूनमधून जळती सिगारेट तिच्या हाता-पायांवर विझत होती....
तिच्या डोळ्यतलं पाणी कधीच आटलं होतं....

सुमारे दोन-अडीच तासांनी त्यांचं समाधान झालं तोपर्यंत पुन्हा तिची शुद्ध हरपली होती....

***************************************************************

डॉ. भरुचा अत्यंत गंभीरपणे आपल्या समोरच्या पॅडवरच्या नोट्स वाचत होते.

सत्तावन्न वर्षांचे डॉ. भरुचा निष्णात पोलिस सर्जन होते. कित्येक वर्षापासून ते पोलिस खात्यात कार्यरत होते. अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तपासात त्यांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट निर्णायक ठरला होता. मात्रं गेल्या वर्षा-दोन वर्षांपासून काही निवडक केसेस वगळता इतर सर्व प्रकरणं आपल्या सहाय्यकांवर सोपवून केवळ मार्गदर्शकाची भूमिका निभावत होते. मढ आयलंडवर आढळलेल्या प्रिया मल्होत्राच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम आटपून ते नुकतेच आपल्या ऑफीसमध्ये परतले होते. पोस्टमॉर्टेमचा तपशीलवार रिपोर्ट तयार करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या सहाय्यक डॉक्टरांवर सोपवली होती आणि केवळ महत्वाचे मुद्दे त्यांनी आपल्या समोरच्या पॅडवर नोट करुन ठेवले होते. एखादा बारीकसा मुद्दा आपल्या नजरेतून सुटू नये म्हणून ते पुन्हा एकवार नोट्सवरुन नजर फिरवत असतानाच त्यांच्या ऑफीसच्या दारावर 'टकटक्' झाली आणि पाठोपाठ दार उघडून एका व्यक्तीने प्रवेश केला.

"गुड मॉर्निंग डॉ. भरुचा!"

"गुड मॉर्निंग रोहित! मी तुझीच वाट पाहत होतो. टेक अ सीट."

सिनीयर इन्स्पेक्टर रोहित प्रधान!

सुमारे चाळीशीच्या आसपास वय, पावणे सहा - सहा फूट उंची आणि कुरळे केस असलेला हिरोछाप दिसणारा हा तरुण क्राईम ब्रँचचा एक अत्यंत हुशार आणि चाणाक्ष पोलिस ऑफीसर आहे हे प्रथमदर्शनी कोणाला सांगूनही खरं वाटलं नसतं. त्यातून स्वत:च्या हुद्द्याचा कोणताही रुबाब न दाखवता सर्वांशी साध्या शिपायापासून ते कमिशनर साहेबांपर्यंत सर्वांशी मिळून - मिसळून वागण्याची सवय पोलिस खात्यात विरळाच! वास्तविक पाहता एका प्रतिथयश बिझनेस फॅमिलीमध्ये सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या या माणसाला नोकरी करण्याची आणि ती देखिल पोलिसांची खरंतर काहीही आवश्यकता नव्हती. पण लहानपणी त्याला शेरलॉक होम्सने इतकं झपाटलं होतं की एमबीए झाल्यानंतरही हट्टाने तो पोलिस खात्यात भरती झाला होता आणि आपल्या कर्तृत्वाने गेल्या पाच वर्षांपासून क्राईम ब्रँचचा मुख्य तपास अधिकारी होता! मुंबईत घडलेल्या कोणत्याही आणि कितीही क्लिष्ट गुन्ह्याचा तपासा त्याच्यावर सोपवावा आणि निर्धास्तं राहवं अशी स्वतःची प्रतिमा त्याने निर्माण केली होती. संपूर्ण मुंबईभर त्याच्या खबर्‍यांचं जाळं पसरलेलं होतं. गुन्हेगारांमध्ये त्याच्या नावाचा असा दरारा होता की त्याची आपल्या एरीयात बदली झाल्याची बातमी येताच त्या भागातले सगळे गुन्हेगार अचानक सुधारल्याप्रमाणे तरी वागत होते किंवा सरळ गायब होत होते आणि ही पीडा आपल्या इथून लवकर टळावी म्हणून देव पाण्यात घालून बसत होते!

"बोला डॉक्टरसाहेब, आज सकाळी सकाळी माझी आठवण कशी काढलीत?"

"वेल! ज्या अर्थी डेडबॉडीचं पोस्टमॉर्टेम मी स्वत: करावं असा खुद्दं कमिशनर मेहेंदळेंचा फोन येतो त्या अर्थी केस तुझ्याकडे येणार आणि एकदा तुझ्याकडे केस आली की तू माझं डोकं खायला येणार हे ओघाने आलंच! म्हणून म्हटलं आपणच बोलावून घ्यावं!'

"मढ आयलंड केस?"

"देअर यू आर!" डॉ. भरुचांनी आपल्या पॅडवरच्या नोट्स पाहत बोलण्यास सुरवात केली, "मर्डर बाय स्ट्रँग्युलेशन. या मुलीचा गळा आवळून तिला मारण्यात आलेलं आहे. आय रिपीट गळा दाबून नाही तर आवळून! एखाद्या जाड रोपने तिचा गळा आवळण्यात आलेला आहे. तिच्या गळ्यावर तसे ट्रेसेस आढळलेले आहेत. खून करण्यापूर्वी तिला भरपूर टॉर्चर करण्यात आलं आहे. बरीच मारहाण करण्यात आलेली आहे. हाता-पायांवर सिगरेट बर्न्स आहेत. तिच्या सिस्टीममध्ये मला गुंगी येणार्‍या द्रव्याचे ट्रेसेस आढळले आहेत...."

"एक मिनीट डॉ. भरुचा! हातापायांवर सिगारेट बर्न्स..." रोहितने एकदम विचारलं, "हॅज शी बीन रेप्ड?"

"बॉय! यू आर ऑलरेडी ऑन राईट ट्रॅक! अ‍ॅन अ‍ॅब्सोल्यूटली ब्रूटल रेप! नॉट ओन्ली ब्रूटल, बट सॅडीस्टीक अ‍ॅन्ड सायकीक.... आणि केवळ नॉर्मल रेप नाही रोहित.... नॉर्मल रेप केला आहेच बट शी हॅड ऑल्सो बीन सब्जेक्ट टू ... अ‍ॅनल रेप! द पूअर गर्ल हॅड अ पेनफुल अ‍ॅन्ड अ हॉरीबल डेथ! फ्रँकली स्पिकींग, या सगळ्या प्रकारानंतर ही जगली असती तर जन्मभर त्या ट्रॉमामध्ये राहिली असती... कदाचित कायमची पॅरॅलिटीक होऊन अरुणा शानभागसारखं आयुष्यं भोगत राहिली असती... एका अर्थाने तिचा खून करुन त्यांनी उपकारच केलेत तिच्यावर...."

डॉ. भरुचा बोलताबोलता क्षणभर थांबले. मग म्हणाले, "रोहित, यू आर डिलींग विथ अ क्रुएल अ‍ॅन्ड सायकोपाथ किलर धिस टाईम. शक्य तितक्या लवकर हा पकडला जाणं आवश्यंक आहे, अदरवाईज देअर विल बी मोअर व्हिक्टीम्स!"

"ही ऑलरेडी दुसरी केस आहे डॉ. भरुचा! तुमचा डिटेल पोस्टमॉर्टेम रिपोर्ट मी नंतर वाचेनच, बट वन लास्ट क्वेश्चन - हिचा मृत्यू नेमका किती वाजता झाला?"

"पहाटे तीन ते चारच्या दरम्यान!"

डॉ. भरुचांचा निरोप घेऊन रोहित बाहेर पडला तेव्हा कमालीचा गंभीर झाला होता. आदल्या दिवशी संध्याकाळी कमिशनर मेहेंदळेंनी ही केस त्याच्यावर सोपवली होती. खून झालेली तरुणी - प्रिया मल्होत्रा - ही न्यूज रिपोर्टर असल्याने मिडीयावाल्यांच्या हातात आयतंच कोलीत मिळालेलं होतं. सर्व चॅनल्सवरुन शहरात वाढलेली गुन्हेगारी, पोलिसांची निष्क्रीयता वगैरे नेहमीचा ओरडाआरडा सुरु झाला होता. राजकीय पक्षांनीही त्यात आपली पोळी भाजून घेण्याची संधी सोडली नाही. विरोधी पक्षनेते थेट गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा राजिनामा मागून मोकळे झाले होते. प्रिया ज्या चॅनलमध्ये काम करत होती ते चॅनल तर दर तासाला तिचं चरित्रं दाखवत होतं! प्रियाच्या संदर्भातच वर्षाभरापूर्वी तिची मैत्रिण सुनेहाची झालेली हत्या आणि त्याचा छडा लावण्यात पोलिसांना आलेलं अपयश यावरुन पोलिसांच्या नावाने शिमगा सुरु होता. केसची फाईल देताना कमिशनर साहेबांनी या सगळ्याची कल्पना देत लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करण्याचं फर्मान सोडलं होतं.

कमिशनरसाहेबांनी केस सोपवल्यावर रोहितने इन्स्पे. घाटे आणि देवरे दोघांचीही गाठ घेऊन चर्चा केली होती. ऑफीसमध्ये परतल्यावर जवळपास अर्धी रात्रं त्याने सुनेहा त्रिवेदीच्या केसचा अभ्यास करण्यात घालवली होती. खासकरुन सुनेहाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट त्याने बारकाईने अभ्यासला होता. प्रियाप्रमाणे सुनेहाचाही गळा आवळून खून करण्यात आला होता. तिलाही मृत्यूपूर्वी मारहाण झाली असल्याचं आणि सिगारेटचे चटके देण्यात असल्याचं पोस्टमॉर्टेम मध्ये स्पष्टं झालं होतं. तिच्या सिस्टीममध्येही गुंगीच्या औषधाचे अंश सापडले होते. प्रियाप्रमाणेच तिच्यावरही बलात्कार करण्यात आल्याचं आढळलं होतं. दोन्ही केसमधला गुन्हेगार एकच आहे याबद्दल त्याच्या मनात कोणतीच शंका राहीली नव्हती.

सीआयडी ऑफीसमध्ये परत येताच कमिशनर मेहेंदळेंची गाठ घेऊन आणि त्यांना सगळ्या प्रकरणाची थोडक्यात कल्पना देऊन रोहित आपल्या केबिनमध्ये आला. आत शिरतानाच त्याने आपल्या ऑर्डर्लीला सब् इन्स्पे. संजय कदम आणि हेड कॉन्स्टेबल मधुकर नाईक यांना बोलावण्याची सूचना केली. कदम आणि नाईक दोघंही तीन वर्षांपासून त्याच्याबरोबर काम करत होते. कितीतरी केसेस त्यांनी एकत्रं तपास करुन सोडवल्या होत्या. त्याच्या तालमीत राहून ते दोघंही कोणत्याही केसचा सर्व बाजूंनी विचार करण्यास आणि प्रत्येक शक्यता आजमावून पाहण्यास शिकले होते. त्याचा निरोप मिळताच दोघं धावतंच त्याच्यासमोर हजर झाले.

"जयहिंद सर!"

"जयहिंद! बोला कदम..."

"मी प्रियाच्या सोसायटीत जाऊन आलो सर! तिच्या घरचं कोणीही काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. सोसायटीच्या वॉचमनकडून मिळालेल्या माहितीनुसार ती दोन दिवसांपूर्वी - शुक्रवारी २२ डिसेंबरला सकाळी आठ-सव्वाआठच्या सुमाराला ती बाहेर पडली आणि त्यानंतर तिला परत आलेलं त्यांनी पाहिलं नाही. तिच्यापाशी पर्स आणि एक शोल्डर बॅग होती आणि सोसायटीच्या समोरच असलेल्या स्टँडवरुन रिक्षा पकडून ती निघून गेली. त्या रिक्षाल्याच्या स्टेटमेंटनुसार प्रियाने अमर महल जंक्शनपाशी रिक्षा सोडून दिली. परंतु तिथून पुढे ती कुठे गेली याचा काही पत्ता लागलेला नाही."

"शोल्डर बॅग....एक काम करा कदम, अमर महल जंक्शनच्या आसपास चौकशी करा. शक्यं आहे की तिचा मुंबईबाहेर जाण्याचा विचार असेल. त्या दृष्टीने ट्रेस घ्या. दुसरं, आज प्रियाचं फ्यूनरल असेल. नाईक, आपल्या काही माणसांना सिव्हील ड्रेसमध्ये फ्यूनरलला पाठवून द्या. त्यांना काय सांगायचं हे तुम्हाला माहीत आहेच! तिचे नातेवाईक आणि खासकरुन तिचे मित्र-मैत्रिणी, चॅनलमधले कलिग्ज काय बोलतात, तिचं रोजचं रुटीन काय होतं, ती कुठे जात होती कोणाला भेटत होती, कॉलेजमध्ये किंवा बाहेर कुठे काही अफेयर याचा शोध घ्या! आणि सर्वात महत्वाचं, प्रियाचं मोबाईल रेकॉर्ड मागवून घ्या!"

कदम आणि नाईक निघून गेल्यावर काही क्षण विचार करुन रोहितने आपल्या बॅगमधून आयपॅड काढलं. इन्स्पे. घाटेंच्या प्राथमिक तपासाची कागदपत्रं त्याने आधीच नजरेखालून घातली होती. प्रियाच्या हाताचे ठसे पोलिसांच्या रेकॉर्डवर नव्हते, पण ते अर्थातच अपेक्षित होतं. प्रियाचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र - मैत्रिणींकडे विचारपूस करणं आवश्यक होतं, परंतु तिचा अंत्यसंस्कार आटपेपर्यंत तसं करणं त्याला प्रशस्तं वाटत नव्हतं. कदम आणि नाईकांचा रिपोर्ट येईपर्यंत विनाकारण काहीही धावपळ करण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे सुनेहाच्या केसची फाईल अभ्यासताना काढलेल्या नोट्सवर त्याने लक्षं केंद्रीत केलं.

वर्षभरापूर्वी विरारजवळच्या आगाशी पोलिसांना नवापूरच्या समुद्रकिनार्‍यावर एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं तसंच मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं. इन्स्पे. देवरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अर्नाळा - विरार परिसरात चौफेर शोध घेतला होता परंतु त्यांच्या हाती एकही धागा लागला नाही. विरार रेल्वे स्टेशन, अर्नाळा एस टी स्टँड इतकंच नव्हे तर प्रायव्हेट बसेस आणि टॅक्सीवाल्यांकडेही त्यांनी चौकशी केली, परंतु त्यातूनही काही निष्पन्न झालं नव्हतं. नवापूर समुद्रकिनार्‍यापासून काही अंतरावर असलेल्या एका रिसॉर्टच्या वॉचमनने पहाटे दोनच्या सुमाराला एक गाडी बीच्यच्या दिशेने गेल्याचं आणि अर्ध्या तासाने परत आल्याचं पोलिसांना सांगितलं. पण ती काळ्या रंगाची गाडी होती या पलिकडे तो काहीच सांगू शकला नाही. दोन दिवस उलटूनही मृतदेहाची ओळख न पटल्याने अखेर इन्स्पे. देवरेंनी मृतदेहाचं वर्णन आणि फोटो मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन्सना पाठवले होते. त्या फोटोच्या आधारेच दोन दिवसांनी घाटकोपर पोलिस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट घेऊन आलेल्या हसमुखलाल त्रिवेदींना घाटकोपर पोलिसांनी इन्स्पे. देवरेंकडे पाठवलं होतं.

त्रिवेदी घाटकोपरला गरोडीया नगरमध्ये राहत होते. त्रिवेदींची मुलगी सुनेहा नरीमन पॉईंटला मेकर्स चेंबर्समधल्या एका ऑफीसमध्ये अकौंटंट म्हणून काम करत होती. २३ डिसेंबरच्या सकाळी ती आपल्या पाच मैत्रिणी - प्रिया, रित्वी, वरदा, अ‍ॅना आणि साक्षी यांच्याबरोबर ख्रिसमससाठी आठवडाभर अ‍ॅनाच्या गावी गोव्याला जाण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडली होती. त्याच दिवशी संध्याकाळी गोव्याला पोहोचल्याचं तिने घरी फोन करुन कळवलं होतं. त्यानंतर ख्रिसमसच्या दिवशीच २५ तारखेच्या सकाळी तिचा गोव्याहून फोन आला होता. त्यानंतर त्यांचं फोनवर बोलणं झालं नव्हतं मात्रं अधूनमधून तिचे मेसेजेस मात्रं येत होते. २७ तारखेला संध्याकाळी पाचच्या सुमाराला तिचा शेवटचा मेसेज आला होता आणि त्यात तिने मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मात्रं तिचा मेसेज आला नाही. २९ तारखेला गोव्याहून परतल्यावर प्रियाने तिचं घर गाठलं होतं आणि सुनेहा चार दिवसांपूर्वी एकटीच मुंबईला आल्याचं तिच्याकडून कळताच हादरलेल्या त्रिवेदींनी पोलिसात धाव घेतली होती.

सुनेहाची मैत्रिण प्रियाच्या स्टेटमेंटनुसार सुनेहा खूप शांत आणि रिझर्व्हड् मुलगी होती. ती कोणाशीही चटकन मोकळी होत नसे. तिच्या ग्रूपमध्येही सर्वांशी ती हसूनखेळून बोलत असली तरी प्रियाशीच तिची घनिष्ट मैत्री होती. कॉलेजमध्ये किंवा ऑफीसमध्ये तिचं कोणाशीही प्रेमप्रकरण नव्हतं. मात्रं गेल्या काही महिन्यांपासून तिच्या बोलण्यात समीर नावाच्या मुलाचा वारंवार उल्लेख येत असे. ह्या समीरशी तिची फेसबुकवर ओळख झाली होती. बरेच दिवस ऑनलाईन चॅटींग केल्यावर अखेर दोघं प्रत्यक्षात भेटले होते आणि काही दिवसांतच दोघांची चांगली मैत्रीही झाली होती. हा समीर मूळचा पुण्याचा होता असा सुनेहाने एकदा उल्लेख केला होता. त्या दोघांचं अफेयर सुरु असावं असा प्रियाला संशय आला होता, पण तिने सुनेहाला तसं कधी स्पष्टं विचारलं नव्हतं. प्रिया स्वत: मात्रं कधी या समीरला भेटली नव्हती. इतकंच नव्हे तर त्याचा फोटोही तिला पाहण्यास मिळाला नव्हता. सहज चौकशी केल्यावर त्याला स्वत:चे फोटो काढलेले आवडत नाहीत असं सुनेहाकडून कळल्यावर काहीतरी गडबड असल्याची तिला शंका आली होती. सुनेहाला तिने तसं बोलूनही दाखवलं होतं, पण तिने ते उडवून लावलं होतं.

गोव्याला पोहोचल्यावर दुसर्‍या दिवशी - २४ तारखेच्या संध्याकाळी सातच्या सुमाराला सुनेहाच्या मोबाईलवर एक फोन आला होता. तो फोन कोणाचा होता किंवा काय बोलणं झालं याबद्दल प्रियाला काहीही कल्पना नव्हती पण तो फोन आल्यानंतर सुनेहा खूप नर्व्हस झाल्याचं तिला जाणवलं होतं. तिच्या अस्वस्थतेचं कारण जाणून घेण्याचा प्रियाने खूप प्रयत्नं केला, पण सुनेहाने तिला अजिबात दाद दिली नाही. फोन आल्यावर दुसर्‍या दिवशी - २५ तारखेच्या सकाळी अत्यंत घाईघाईने नेसत्या वस्त्रांनीशी ती मुंबईला निघून गेली होती. आपली बॅगही तिने बरोबर नेली नव्हती. त्याच दिवशी रात्री प्रियाच्या मोबाईलवर मुंबईत पोहोचल्याचा सुनेहाचा मेसेज आला होता. परंतु २६ तारखेला दिवसभर मात्रं तिच्याशी कोणचाही संपर्क होत नव्हता. अखेर २७ तारखेच्या संध्याकाळी आपल्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्याचं तिने प्रियाला मेसेज करुन कळवलं होतं. मुंबईला पोहोचल्यावर घरी जाण्यापूर्वी सुनेहाची बॅग परत करण्यासाठी प्रिया तिच्या घरी गेल्यावर सुनेहा गायब झाल्याचं आणि तिचा खून झाल्याचं उघडकीस आलं होतं. सुनेहाला गोव्याला असताना आलेला फोन समीरचाच असावा आणि त्यामुळेच इतक्या तातडीने ती मुंबईला निघून गेली असवी अशी शंका प्रियाने व्यक्तं केली होती.

रोहितने आयपॅड बॅगेत टाकलं आणि शांतपणे विचार करण्यास सुरवात केली....

सुनेहा २३ डिसेंबरच्या सकाळी घरातून बाहेर पडते आणि गोव्याला जाते. त्याच संध्याकाळी तिचा गोव्याहून घरी फोनही येतो. इथपर्यंत सर्व नॉर्मल आहे. दुसर्‍या दिवशी - २४ तारखेच्या संध्याकाळी सातच्या सुमाराला तिला मुंबईहून फोन येतो ज्यामुळे ती अस्वस्थं होते. तिच्या मोबाईल रेकॉर्डवरुन हा फोन अंधेरी स्टेशनच्या बाहेर असलेल्या फोनबूथवरुन आल्याचं स्पष्टं झालं होतं, पण बूथ ऑपरेटर अंध असल्याने फोन करणार्‍याबद्दल काहीही माहिती मिळाली नव्हती. सुनेहा २५ तारखेच्या सकाळी घाईघाईत मुंबईला येण्यास निघते, परंतु फोनवर बोलताना घरातील कोणालाही तशी कल्पना देत नाही. मात्रं त्याच दिवशी रात्री साडे नऊच्या सुमाराला ती मुंबईत पोहोचल्याचा प्रियाला मेसेज येतो त्यावेळेस तिचा मोबाईल ठाणे स्टेशनच्या परिसरात आहे. २६ तारखेला सकाळी आणि रात्री तिच्या मोबाईलवरुन त्रिवेदींना मेसेज जातो आणि या दोन्ही वेळेस मोबाईलचं लोकेशन आहे बदलापूर गाव! मात्रं २७ तारखेला सकाळी तिचा मृतदेह सापडतो तो अर्नाळा परिसरात नवापूर बीचजवळ. त्याच दिवशी संध्याकाळी तिच्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्याचा त्रिवेदींना आणि प्रियाला मेसेज जातो आणि यावेळेस तिचा फोन आहे पवई लेकच्या परिसरात! या मेसेजमुळे २९ तारखेला प्रिया मुंबईत परत येईपर्यंत सुनेहाचे कुटुंबिय आणि तिच्या मैत्रिणी ती सुखरुप आहे या समजुतीत राहतात.

आगाशी पोलिसांना सुनेहाचा मृतदेह सापडल्यानंतरही तिच्या मोबाईलवरुन त्रिवेदींना आणि प्रियाला मेसेज करुन फोनचा प्रॉब्लेम झाल्याची बतावणी करण्यात आली आहे. सुनेहाचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही तरी तिच्या घरच्यांनी किंवा मैत्रिणींनी लगेच तिची शोधाशोध करु नये या हेतूने हा उद्योग करण्यात आला आहे हे उघड होतं. यातून आणखीन एक गोष्टं स्पष्टं होत होती ती म्हणजे सुनेहाचा ग्रूप गोव्याला कधी जाणार आणि कधी परत येणार याची खुनी व्यक्तीस पूर्ण माहीती होती. सुनेहाच्या कुटुंबियांव्यतिरिक्त ही माहिती असण्याची शक्यता असलेली तिच्याशी संबंधीत एकमेव व्यक्ती म्हणजे समीर, परंतु सुनेहाच्या मृत्यूनंतर हा समीर गायब आहे. इतकंच नव्हे तर त्याचं फेसबुक प्रोफाईलही डिलीट करण्यात आलं आहे! इन्स्पे. देवरेंनी जंग जंग पछाडूनही तो कोण होता याचा तपास लागलेला नाही.

रोहितच्या समोर आता एकच प्रश्नं होता....

समीरचा प्रियाशी नेमका काय संबंध होता?

**********************************************************************

दुपारचे पावणेतीन वाजत आले होते. मुंबई - अहमदाबाद हायवेवरच्या मस्तान नाक्याच्या ब्रिजखाली ती कोणाची तरी वाट पाहत असतानाच तिच्या मोबाईलवर मेसेज आला -

Please carry on with...

तो मेसेज वाचून क्षणभरच तिच्या कपाळावर नापसंतीची रेषा उमटली, पण दुसर्‍याच क्षणी तिने ती झटकून टाकली. ती ज्या कामगिरीवर निघालेली होती ती इतकी महत्वपूर्ण होती, की अशा क्षुल्लक गोष्टींचा विचार करण्यात फारसा अर्थ नव्हता. सुमारे दहा - पंधरा मिनिटांतच काळ्या रंगाची एक कार तिच्यासमोर येवून थांबली. ती कारमध्ये बसताच कार अहमदाबादच्या दिशेने निघून गेली.

***************************************************************

रोहित सब् इन्स्पे. श्रद्धा देशपांडेसह चॅनलचे स्टेशन डायरेक्टर रॉयसन फर्नांडीसांच्या समोर बसला होता. फर्नांडीस सुमारे पन्नाशीचे असावेत. नुकतेच आपल्या काही सहकार्‍यांसह प्रियाच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावून ते ऑफीसमध्ये येऊन पोहोचले होते. आपल्या चॅनलवर त्यांनी अंत्यविधीचं थेट प्रक्षेपण केलं होतं आणि दर पाच मिनीटांनी स्वत:चा चेहरा दिसत राहील याची त्यांनी 'व्यवस्था केली होती. एका क्षणी तर एखादा समारंभ सुरु असल्याच्या थाटात भाषण ठोकत त्यांनी पोलिसांवर टीकेची झोड उठवली होती. अखेर हे सगळं असह्य झाल्यावर प्रियाच्या नातेवाईकांनी त्यांना फटकारुन हा प्रकार बंद करण्यास भाग पाडलं होतं. रोहित आणि श्रद्धा आल्याचं आपल्या सेक्रेटरीकडून आल्याचं कळताच पुन्हा एकदा पोलिसांवर तोंडसुख घेण्याच्या तयारीनेच ते त्यांना सामोरे आले होते.

"ऑफीसर हा काय प्रकार आहे? आताच मी प्रियाच्या फ्यूनरलहून येतो आहे. तिचा खून झाल्याला आज दोन दिवस झाले, पण अद्याप मर्डरर पकडले का गेले नाहीत? पकडले जाणं सोडा, तो कोण आहे हे तरी पोलिसांना माहीत आहे का? धिस इज नॉट अ‍ॅट ऑल अ‍ॅक्सेप्टेबल मि. ऑफीसर. एका न्यूज रिपोर्टरला मारण्यापर्यंत मजल जाते आणि पोलिस काहीही करत नाहीत. काय चाललंय काय? मुंबईतल्या क्रिमीनल्सवर पोलिसांचा काहीही कंट्रोल राहीलेला नाही? व्हाय डू यू कम्पेअर युवरसेल्फ टू स्कॉटलंड यार्ड? यू डोन्ट डिझर्व इट!" फर्नांडीस कुत्सितपणे म्हणाले.

"झालं तुमचं बोलून?" रोहितने थंड आवाजात विचारलं तसे फर्नांडीस अधिकच तडकले.

"नॉन्सेन्स ऑफीसर! मुंबईत एका तरुण मुलीचा रेप करुन मर्डर केला जातो, तो सुद्धा एका चॅनलच्या न्यूज रिपोर्टरचा आणि तिच्या खुन्याला पकडण्याचं सोडून तुम्ही बोलून झालं का म्हणून मलाच वर विचारता? हाऊ कॅन यू बी सो इनसेन्सीटीव्ह ऑफीसर? काय पोलिस आहे का तमाशा..."

"इनफ मि. फर्नांडीस!" रोहित अशा काही आवाजात गरजला की फर्नांडीसच काय पण सब् इन्स्पे. देशपांडेही एकदम दचकल्या. "तमाशा कशाला म्हणतात माहीत आहे तुम्हाला? आपल्या एका ज्युनियर कलिगच्या मृत्यूचं भांडवल करत फ्यूनरलसारख्या प्रसंगाचं गांभीर्य खुंटीवर टांगून आणि त्या दुर्दैवी मुलीच्या आई-वडीलांना आणि नातेवाईकांना सहानुभूती दाखवण्याचं सोडून तिथे त्यांचे बाईट घेत आणि दर दोन मिनीटांनी चॅनलवर स्वत:चं थोबाड दाखवत तुम्ही जे काही बरळत होतात त्याला तमाशा म्हणतात. फॉर युवर काईंड इन्फॉर्मेशन, पोलिसांनी काय करावं हे तुमच्याकडून शिकण्याची अद्याप वेळ आलेली नाही. एक न्यूज चॅनल हातात मिळालं म्हणून तुम्ही वाटेल तसं वागाल आणि वाटेल तसे आरोप कराल तर ते खपवून घेतलं जाणार नाही! अ‍ॅन्ड मि. फर्नांडीस, आता तुम्ही केवळ माझ्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठीच तोंड उघडणार आहात. अदरवाईज, तुमच्याच चॅनलवरुन लाईव्ह टेलिकास्ट सुरु असताना तुमच्या सगळ्या टीमसमोर मी तुम्हाला तमाशातल्या लावणीवर नाचायला लावेन. डू यू अंडरस्टँड?"

फर्नांडीस आ SSS वासून रोहितकडे पाहतच राहीले. आपल्याच ऑफीसमध्ये खुद्दं आपल्याला - चॅनलच्या स्टेशन डायरेक्टरला - कोणी या शब्दांत धमकी देईल ही त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. एरवी शांत असणार्‍या रोहितचा हा रुद्रावतार देशपांडेंनाही अगदीच अनपेक्षित होता. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून हा सणकी माणूस बोलल्याप्रमाणे खरोखरच आपल्याला नाचवण्यास कमी करणार नाही अशी फर्नांडीसांना भीती वाटली असावी. काहीही न बोलता त्यांनी केवळ होकारार्थी मान हलवली.

"गुड! प्रियाच्या कलिग्जना बोलवा!"

अवघ्या दोन मिनीटांत प्रियाच्या टीममधले सर्व सहकारी केबिनमध्ये हजर झाले. एक - दोघांचा अपवाद वगळता सर्व तरुण मुला-मुलींचा त्यात भरणा होता. त्यांच्यापैकी मुलींना घेऊन सब् इन्स्पे. देशपांडे दुसर्‍या केबिनमध्ये निघून गेल्या. रोहितने फर्नांडीसांच्या समोरच उरलेल्या मुलांकडे तपशीलवार चौकशी केली. प्रियाचं रोजचं रुटीन, तिच्या कामाचं स्वरुप, एखाद्या सहकार्‍याबरोबर झालेला वाद-विवाद याबद्दल त्याने सर्वांना बरेच प्रश्नं विचारले, पण फारसं आशादायक असं काही त्याच्या हाती लागलं नाही. तो शेवटच्या मुलाशी बोलत असतानाच देशपांडे दोन मुलींसह आत आल्या. त्यांना पाहताच आपली चौकशी आटपती घेत त्याने सर्वांना आपापल्या डेस्कवर परतण्याची सूचना केली. त्या दोन मुली आणि फर्नांडीस वगळता इतर सर्वजण बाहेर पडल्यावर देशपांडेंनी विचारलं,

"ही स्वप्ना देशमुख कोण आहे?"

"अं.... स्वप्ना... स्वप्ना प्रियाची ग्रूप लिडर आहे. प्रिया, रोशनी आणि कॅरोल तिच्या ग्रूपमध्ये आहेत. जनरली त्या सर्वजणी एकाच असाईनमेंटवर काम करतात." फर्नांडीस उत्तरले.

"स्वप्ना आली नाही प्रियाच्या फ्यूनरलला?"

"स्वप्ना सॅटर्डे सकाळपासूनच काही कामासाठी आऊट ऑफ टाऊन गेली आहे सर." कॅरोल म्हणाली, "आज ती ऑफीसला येणं एक्स्पेक्टेड होतं, पण ती आलेली नाही. अ‍ॅक्च्युअली, प्रियाची डेथ झाल्याचं तिला इन्फॉर्म करण्यासाठी आम्ही तिला फोन केला होता, पण तिचा फोनही लागत नाही आणि एकाही मेसेजला तिने रिप्लाय केलेला नाही!"

"सॅटर्डे सकाळपासून...." रोहित विचार करत म्हणाला, "स्वप्ना कुठे जाणार होती याची काही कल्पना आहे?"

फर्नांडीसनी नकारार्थी मान हलवली. कॅरोल आणि रोशनी यांच्यात क्षणभरच नजरानजर झाली. रोहितच्या चाणाक्षं नजरेने ते अचूक टिपलं होतं. फर्नांडीसच्या समोर दोघी बोलणार नाहीत याची कल्पना येताच तो अगदी सहजपणे पण कठोर स्वरात म्हणाला,

"मॅडम, जरा मि. फर्नांडीसांबरोबर जाऊन स्वप्नाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट कराल प्लीज?"

देशपांडेंना हा इशारा पुरेसा होता. फर्नांडीससह त्या बाहेर पडल्या. पुढचा अर्धा तास तरी दोघं परत येणार नव्हते. ते दोघं बाहेर जाताच रोशनी म्हणाली,

"सर, गेल्या दोन - तीन महिन्यांपासून स्वप्ना आणि प्रिया कोणत्यातरी स्टोरीवर काम करत होत्या. मला आणि कॅरोलला त्यांनी त्यात इन्व्हॉल्व केलं नव्हतं. मी एक - दोनदा प्रियाला त्याबद्दल विचारलंही होतं, पण तिने काहीच सांगितलं नाही. फक्तं हे एक सेन्सेशनल स्कूप आहे आणि एक खूप मोठं रॅकेट त्यामुळे एक्स्पोज होईल एवढाच तिने उल्लेख केला होता!"

"रॅकेट..." रोहित सावध झाला, "कोणतं रॅकेट? कशाबद्दल? एनी आयडीया?"

"नो सर! मात्रं हे रॅकेट एक्सपोज झालं की बाँबशेल ठरेल आणि त्याचे पॉलिटीकल रिपर्कुशन्सही होतील एवढं मात्रं ती म्हणाली होती!"

"पॉलिटीकल रिपर्कुशन्स... " तो कमालीचा गंभीर झाला. वरकरणी दिसत होतं त्यापेक्षा हे प्रकरण निश्चित गंभीर होतं याची त्याला कल्पना येऊन चुकली होती.

"सर, सॅटर्डेला सकाळी आठ वाजता स्वप्नाचा मला फोन आला होता." कॅरोल म्हणाली, "सॅटर्डेला खरंतर तिला ऑफ नव्हता, पण काही अर्जंट कारणामुळे आऊट ऑफ टाऊन जात असल्याचं आणि त्यामुळे ऑफीसला येऊ शकत नसल्याचा फर्नांडीस सरांना मेसेज देण्याचं तिने सांगितलं. त्यानंतर तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही. प्रियाची डेथ झाल्याचं कळल्यावर आम्ही दोघींनीही तिला फोन करण्याचा प्रयत्नं केला, पण तिचा फोन स्विच्ड ऑफ आहे. तिला पाठवलेल्या मेसेजेसनाही तिने रिप्लाय केलेला नाही. आय होप शी इज ऑलराईट!"

"स्वप्ना आणि प्रिया ज्या स्टोरीवर काम करत होत्या त्याबद्दल फर्नांडीसना काही माहीत आहे?"

"नो सर! इनफॅक्ट त्या असं काही करत होत्या असा संशय जरी आला असता, तरी फर्नांडीस सरांनी त्यांना सस्पेंड केलं असतं आणि त्यांच्याबरोबर हे माहित असूनही त्यांना न कळवल्याबद्दल कदाचित आम्हालाही! इथल्या प्रत्येकाने केलेली कोणतीही स्टोरी त्यांच्या नजरेखालून गेल्याशिवाय आणि त्यांना क्रेडीट दिल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही सर! आणि जर कोणी असा प्रयत्नं केलाच, तर आयदर त्याला सर्वांसमोर फर्नांडीस सरांची माफी मागावी लागते किंवा नोकरी गमवावी लागते! आम्ही हे सगळं तुम्हाला सांगितलं हे त्यांना प्लीज सांगू नका सर!"

"डोन्ट वरी!" रोहित आपलं कार्ड दोघींच्या हातात देत म्हणाला, "प्रियाबद्द्ल आणखीन काही आठवलं किंवा स्वप्नाचा काही फोन किंवा मेसेज आला तर इमिजिएटली मला कळवा!"

*********************************************************************

सिनीयर इन्स्पे. रोहित प्रधानांच्या केबिनमध्ये एक लहानशी मिटींग भरली होती. प्रियाचे वडील विक्रम मल्होत्रा आणि मामा गोवर्धनदास खिन्नपणे त्याच्यासमोर बसले होते. त्यांच्या व्यतिरिक्त सुनेहाचे वडील हसमुखलाल त्रिवेदी, भाऊ महेश आणि दोघींच्या मैत्रिणी रित्वी, वरदा, अ‍ॅना आणि साक्षी या देखिल तिथे हजर होत्या. सुनेहापाठोपाठ सहा महिन्यांतच प्रियाचाही मृत्यू झाल्याने चौघीही हादरलेल्या होत्या. सब् इन्स्पे. कदम, देशपांडे आणि हेड कॉन्स्टेबल नाईकही हजर होते.

"मि. मल्होत्रा, आय अ‍ॅम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर युवर लॉस!" रोहित शांत स्वरात म्हणाला, "प्रियाच्या अशा अचानक मृत्यूमुळे तुम्हाला किती धक्का बसला असेल याची मी कल्पनाही करु शकत नाही. 'आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत' वगैरे शाब्दीक सहानुभूतीचा कणभरही उपयोग होणार नाही हे देखिल मला माहीत आहे, त्यामुळे मी तसं काहीही बोलणार नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर या अशा प्रसंगी तुम्हाला अधिक त्रास देण्याची माझी नव्हती, पण एक पोलिस ऑफीसर म्हणून माझा नाईलाज आहे. इव्हेस्टीगेशनच्या दृष्टीने नेमकं काय झालं हे शोधून काढण्यासाठी मला थोडी इन्फॉर्मेशन हवी आहे, इफ यू डोन्ट माईंड! मे आय?"

मल्होत्रांनी काहीही न बोलता केवळ होकारार्थी मान हलवली.

"तुमची प्रियाशी शेवटची भेट कधी झाली होती?"

"शुक्रवारी सकाळी ८ वाजता तिच्या ग्रूपबरोबर ट्रीपला जाण्यासाठी म्हणून ती घरातून बाहेर पडली. महिन्यातून एखाद्या विकेंडला त्यांचा ग्रूप भटकायला किंवा ट्रेकींगला जात असतो त्यामुळे आम्हाला त्यात काही ऑड वाटलं नाही. यावेळेस लाँग विकेंड असल्यामुळे ती कोकणात कुठेतरी जाणार होती. सोमवारी संध्याकाळी किंवा फारतर रात्रीपर्यंत ती परत येईल अशी आमची अपेक्षा होती पण तिच्याऐवजी तिच्या मृत्यूची बातमी घेऊन पोलिसच...." मल्होत्रांना पुढे बोलवेना.

"आय अ‍ॅम सॉरी मि. मल्होत्रा, बट आय अ‍ॅम हेल्पलेस! शुक्रवारी सकाळी घरातून बाहेर पडल्यावर प्रियाचा काही फोन किंवा मेसेज आला होता?"

मल्होत्रांनी नकारार्थी मान हलवली, पण प्रियाच्या मैत्रिणींपैकी साक्षी मात्रं एकदम म्हणाली,

"प्रियाने मला फोन केला होता सर! पुढच्या महिन्यात माझं लग्नं आहे आणि त्यानंतर मी यूएसला जाणार असल्याने त्याचं सेलिब्रेशन म्हणून विकेंडला माझ्या गावी दिवेआगारला जाण्याचा आमचा प्लॅन होता. त्याप्रमाणे आम्ही चौघी फ्रायडेला तिची वाट पाहत होतो. पण सकाळी नऊच्या सुमाराला प्रियाने फोन करुन तिला आमच्याबरोबर येता येणार नाही असं सांगितलं. तिने आयत्यावेळी टांग दिल्यामुळे आम्ही खरंतर तिच्यावर चिडलो होतो, पण रात्री उशिरा किंवा सॅटरडेला दुपारपर्यंत नक्की येण्याचं तिने प्रॉमिस केल्यावर मग आम्ही दिवेआगरला निघून गेलो. पण ती सॅटरडेला आलीच नाही. आम्ही तिला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचा फोन ऑफ होता. प्रत्येकाने तिला मेसेजेस पाठवले, पण एकाही मेसेजला तिने रिप्लाय केला नाही. आणि काल परत आल्यावर एकदम तिची डेथ झाल्याचंच कळलं सर! सो हॉरीबल!"

"प्रियाने तुमच्याबरोबर न येण्याचं काही कारण सांगितलं?"

"नाही सर! काहीतरी अर्जंट काम आहे एवढंच बोलली ती!"

"अर्जंट काम... नाऊ टेल मी फ्रँकली, प्रियाचा कोणी बॉयफ्रेंड होता? तिचं कोणाशी अफेयर होतं?"

रोहितच्या या प्रश्नावर मल्होत्रांच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम पालटले. त्यांच्या चेहर्‍यावरच्या वेदनेचं संतापात रुपांतर झालं. खाऊ का गिळू अशा दृष्टीने ते त्याच्याकडे पाहत होते. रोहितचं मात्रं त्यांच्याकडे अजिबात लक्षं नव्हतं. त्याची नजर आळीपाळीने प्रियाच्या मैत्रिणींच्या चेहर्‍यावरुन फिरत होती. चौघींपैकी रित्वीच्या डोळ्यातली चलबिचल त्याच्या चाणाक्ष नजरेने अचूक टिपली होती. तिने मल्होत्रांकडे एक चोरटा कटाक्षं टाकल्याचं कदम आणि नाईकांच्याही लक्षात आलं. काहीही न बोलता त्याने फक्तं सब् इन्स्पे. देशपांडेंकडे पाहिलं. त्याचा इशारा ओळखून त्या चौघींसह केबिनच्या बाहेर पडल्या.

"मि. मल्होत्रा, तुमचा राग मी समजू शकतो. पण इन्व्हेस्टीगेशनमध्ये आम्हाला सर्व शक्यता विचारात घ्याव्या लागतात. खासकरुन मर्डर केसमध्ये तर फॅमिली मेंबर्स हे सर्वात आधी सस्पेक्ट्स असतात. दुसरं म्हणजे रोज कॉलेजच्या किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडणारी आपली मुलगी किंवा मुलगा बाहेर नेमके काय करतात, कोणाला भेटतात आणि कुठे फिरतात यावर पेरेंट्सचा काहीही कंट्रोल नसतो आणि बहुतेकदा पेरेंट्सना त्याबद्दल काहीही माहीत नसतं. अर्थात यात पेरेंट्सचा दोष आहे असं मी अजिबात म्हणत नाही, बट इट्स अ रिअ‍ॅलिटी. परंतु पोलिसांना मात्रं सर्व अँगल्स कन्सिडर करावे लागतात."

मल्होत्रा काहीही न बोलता गप्पं राहीले. पुढच्या अर्ध्या तासात रोहितने त्यांना बरेच प्रश्नं विचारले. प्रियाने मास जर्नालिझममध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. गेल्या दीड वर्षापासून ती चॅनलमध्ये रिपोर्टर म्हणून जॉईन झाली होती. त्याचबरोबर गेल्या तीन - चार महिन्यांपासून ती कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशनचा कोर्स देखिल करत होती. त्याने सुनेहाच्या संदर्भात त्रिवेदींकडेही बरीच विचारपूस केली, परंतु कोणतीही नवीन माहिती त्याच्या हाती लागली नाही. समीरबद्दल तर त्यांना काहीच कल्पना नव्हती. तो त्रिवेदींशी बोलत असतानाच सब् इन्स्पे. देशपांडे चौघी मुलींसह परतल्या. त्यांच्याशी नजरानजर होताच रोहित काय ते समजून गेला. आपली चौकशी आवरती घेत त्याने मल्होत्रा, त्रिवेदी आणि मुलींना घरी पाठवून दिलं.

"काय बोलल्या मुली?" सर्वजण बाहेर पडताच त्याने सब् इन्स्पे. देशपांडेंना विचारलं.

"सुनेहापाठोपाठ वर्षाभरातच प्रियाचा खून झाल्याने चौघीही शॉकमध्ये आहेत सर! रित्वी आणि साक्षी तर जास्तंच कारण त्या तिच्या शाळेपासूनच्या मैत्रिणी होत्या. कॉलेजमध्ये गेल्यावर वरदा, अ‍ॅना आणि सुनेहाची त्यांच्यात भर पडली. कदाचित या सर्व प्रकरणाचं मूळ कॉलेजमध्ये घडलेल्या एखाद्या घटनेत असेल, कळत-नकळत कोणी दुखावलं गेलं असेल, प्रेमाची भानगड असेल या दृष्टीने त्यांच्या कॉलेज लाईफही बद्द्ल मी चौकशी केली, पण तसं काही खास आढळलं नाही. कॉलेजमध्ये सुनेहाच्या मागे बरीच मुलं होती, पण तिने एकालाही लिफ्ट दिली नाही. इतरांच्या थ्रू तिच्यापर्यंत पोहोचण्याचाही बर्‍याच जणांनी प्रयत्नं केला, परंतु त्यातही कोणाला यश आलं नाही. प्रियाची मात्रं गेल्या दोन - तीन महिन्यांपासून धीरज सक्सेना नावाच्या तरुणाबरोबर जवळीक वाढली होती. ती ज्या कॉम्प्युटर इन्स्टीट्यूटमध्ये जात होती ती इन्स्टीट्यूट या धीरजचीच आहे. रित्वीच्या मते प्रियाला अ‍ॅनिमेशन शिकण्यात फारसा इंट्रेस्ट नव्हता, पण त्या निमित्ताने धीरजला भेटण्यासाठी ती तिथे जात होती."

*********************************************************************

धीरजची कॉम्प्युटर इन्स्टीट्यूट घाटकोपर स्टेशनजवळच्या एका लहानशा गल्लीत होती. कदम आणि नाईकांसह रोहित तिथे पोहोचला तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. धीरज सुमारे २७ - २८ वर्षांचा स्मार्ट तरुण होता. नुकतंच जेवण आटपून परतला होता आणि आपल्या ऑफीसमध्ये बसला होता. केबिनच्या ग्लास पार्टीशनमधून युनिफॉर्ममध्ये असलेल्या कदम आणि नाईकना पाहताच तो क्षणभर दचकलाच, पण दुसर्‍याच क्षणी स्वत:ला सावरत उसनं अवसान आणून आणि चेहर्‍यावर हसू खेळवत तो त्यांना सामोरा आला.

"मि. धीरज सक्सेना?"

"येस सर! प्लीज वेलकम! व्हॉट कॅन आय डू फॉर यू?"

"मि. सक्सेना, आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. इफ यू हॅव सम टाईम?"

"शुअर सर! आपण माझ्या केबिनमध्ये बसून बोललो तर चालेल? पण त्यापूर्वी, तुम्ही काय घेणार सर? चहा-कॉफी की काही कोल्ड्रींक किंवा ज्यूस?"

"नो थँक्स! फक्तं पाणी चालेल!"

धीरज तिघांना घेऊन आपल्या केबिनमध्ये आला. सर्वजण खुर्चीत स्थानापन्न होतात तोच त्याच्या ऑफीस बॉयने थंडगार पाण्याने भरलेले ग्लासेस टेबलवर आणून ठेवले आणि तो निघून गेला.

"येस सर!" धीरज अत्यंत नम्र सुरात आणि अस्खलित इंग्लिशमध्ये म्हणाला, "व्हॉट कॅन आय डू फॉर यू?"

"सॉरी टू बॉदर यू मि. सक्सेना, पण एका महत्वाच्या केसच्या संदर्भात आम्हाला कॉम्प्युटर फिल्डशी रिलेटेड थोडी इन्फॉर्मेशन हवी आहे. खासकरुन ग्राफीक्स अ‍ॅनिमेशन बद्दल, इफ यू डोन्ट माईंड..."

"माय प्रिव्हीलेज सर! पोलिसांना मदत करणं हे प्रत्येक जबाबदार नागरीकाचं कर्तव्यच आहे! आय विल बी हायली ओब्लाईज्ड!"

पुढची पंधरा-वीस मिनीटं रोहित ग्राफीक्स आणि अ‍ॅनिमेशनच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्यांच्याशी संबधीत सॉफ्टवेअरर्सची चौकशी करत होता. धीरजही त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न कंटाळता अगदी प्रोफेशनली मुद्देसूद उत्तर देत होता. कदम आणि नाईक युनिफॉर्ममध्ये नसते तर एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीच्या अधिकार्‍यांमध्ये चर्चा सुरु आहे अशीच कोणाचीही समजूत झाली असती. कितीही क्षुल्लक वाटणारा प्रश्न असला तरी धीरज अत्यंत उत्साहात आणि अजिबात हात आखडता न घेता तपशीलवार माहिती देत होता. रोहितच्या चेहर्‍यावरुन आपण देत असलेल्या माहितीमुळे तो खूप इंप्रेस झाल्याची त्याची खात्री पटली होती. अर्थात समोरचा माणूस आपलं बारसं जेवला आहे याची धीरजला कल्पना असणं शक्यच नव्हतं.

"मि. सक्सेना, तुम्ही प्रिया मल्होत्रा नावाच्या मुलीला ओळखता?" रोहितने अचानक प्रश्नं केला.

"अं..." अनपेक्षीतपणे आलेल्या या प्रश्नाने धीरज एकदम गांगरला, "काय... काय नाव म्हणालात सर?"

प्रियाचं नाव घेताच धीरजच्या डोळ्यात उमटलेल्या काळजीच्या छटा रोहितच्या चाणाक्षं नजरेने अचूक टिपल्या होत्या. ध्यानीमनी नसताना अचानक प्रियाचं नाव निघाल्याने धीरजला सावरण्यास वेळच मिळाला नव्हता. अनपेक्षीतपणे समोर आलेला प्रश्नं अचूक परिणाम साधून गेला होता.

"प्रिया मल्होत्रा! ओळखता तुम्ही?"

"येस सर!" स्वत:ला कसंबसं सावरत धीरज उत्तरला, "प्रिया आमच्या इथे ती अ‍ॅनिमेशनच्या कोर्सला येते... आय मिन येत होती... अनफॉर्च्युनेटली शी इज नो मोअर! शी वॉज अ व्हेरी क्लोज फ्रेंड... खूप जवळची मैत्रिण होती ती माझी. ती गेली यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही!

"जस्टं क्लोज फ्रेंड ऑर गर्लफ्रेंड?" रोहितच्या आवाजाला अचानक धार आली.

"क्लोज फ्रेंडच सर..." धीरज सावकाशपणे म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचं तर ती मला खूप आवडायची सर! आय वोन्ट डिनाय दॅट आय वॉज इंट्रेस्टेड इन हर! कदाचित तिनेही ते ओळखलं होतं. आम्ही किती तरी वेळा लंचला, डिनरला गेलो. मूव्हीज, डिस्को, पबलाही गेलो पण ना तिने कधी मला विचारलं ना माझी तिला कधी स्पष्टपणे बोलण्याची हिम्मत झाली नाही. विचारायला हवं होतं असं आता वाटतं... बट् इट्स टू लेट नाऊ!"

मि. सक्सेना, तुम्ही प्रियाला शेवटचे कधी भेटला होतात?"

"गुरवारी संध्याकाळी! त्या दिवशी संध्याकाळी ती इथे आली होती आणि त्यानंतर आम्ही एकत्रं डिनरही घेतलं होतं. दुसर्‍या दिवशी सकाळी ती तिच्या फ्रेंड्सबरोबर कुठेतरी पिकनिकला जाणार आहे असं म्हणाली होती. त्यानंतर फ्रायडेला सकाळी तिचा निघाल्याचा आणि अकराच्या सुमाराला पुन्हा एकदा फोन आला होता, पण त्यानंतर काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही."

"शुक्रवारी आणि शनिवारी तुम्ही कुठे होतात मि. सक्सेना?"

"प्रियाप्रमाणेच माझाही विकेंडचा प्लान आधीच फिक्स होता सर! त्याप्रमाणे आम्ही पाच जण कर्जतजवळ किरणच्या... माझ्या मित्राच्या फार्महाऊसवर गेलो होतो. ख्रिसमसची सुट्टी असल्याने सोमवारी इन्स्टीट्यूटही बंद होती त्यामुळे आरामात संध्याकाळी परत आलो आणि प्रिया एक्सपायर झाल्याचीच न्यूज मिळाली!"

'आय सी!" रोहित विचार करत म्हणाला, "हा तुमचा मित्रं किरण.... त्याचं पूर्ण नाव काय? आणि त्याचं फार्महाऊस नेमकं कुठे आहे?"

"किरण... किरण चव्हाण. कर्जत - मुरबाड रोडला भोईरवाडी गावात त्यांचं फार्महाऊस आहे सर. त्याचे वडील एमएलए आहेत - भरतदादा चव्हाण!"

"आमदार भरतदादा चव्हाण..." रोहित सावध झाला, "मि. सक्सेना, डू मी अ स्मॉल फेव्हर. तुमच्या मित्रांची नावं आणि नंबर देऊन ठेवा. तुमचाही नंबर द्या. कदाचित आम्हाला उपयोगी पडू शकतो. आफ्टरऑल, आमदार साहेबांची कधी मदत लागेल सांगता येत नाही!"

धीरजने एका कागदावर पाचही जणांची नावं आणि मोबाईल नंबर लिहून दिले.

"ऑलराईट मि. सक्सेना! आम्ही आता निघतो! इनकेस काही आवश्यकता भासली तर पुन्हा येऊच!"

"ऑलवेज वेलकम सर! बट् इफ यू डोन्ट माईंड मी स्वत: येईन तुम्ही बोलवाल तिथे! प्लीज डोन्ट मिसअंडरस्टँड मी सर, पण पोलिस पुन्हा पुन्हा इथे येणं हे इन्स्टीट्यूटच्या रेप्युटेशनला मारक ठरु शकतं सर. अशा संधीचा फायदा घेण्यासाठी काँपिटीटर्स टपून बसलेले असतात. आमच्या बिझनेसवर याचा परिणाम होऊ शकतो. प्लीज सर!"

रोहित काहीही न बोलता कदम आणि नाईकांसह बाहेर पडला. दोन पावलं गेल्यावर एकदम काहीतरी आठवल्यासारखं करत तो वळला.

"मि. सक्सेना, तुम्ही स्वप्ना देशमुख नावाच्या मुलीला ओळखता?"

"स्वप्ना देशमुख? नो सर!"

पोलिसांची जीप दिसेनाशी होताच धीरज आपल्या केबिनमध्ये परतला आणि त्याने एक नंबर फिरवला,

"किरण, मी धीरज बोलतो आहे...."

*********************************************************************

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुपर्ब..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भाग पण उत्कंठावर्धक झाला आहे. पुढील भागाची आतुरतेने वाट पहात आहे. पुलेशु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0