आता परमेश्वराचे काय करायचे? - 2

(स्टीव्हन वाइनबर्ग याच्या What about God? या लेखाचा स्वैर अनुवाद)

मागील भागावरून (1) पुढे

कॅलिफोर्निया विद्यापीठातील विधीमहाविद्यालयात कार्य करणारे प्राध्यापक फिलिप जॉन्सन हे डार्विनच्या उत्क्रान्तिवादाचे एक प्रमुख विरोधक म्हणून ओळखले जातात. पृथ्वीतलावरील सजीवांमध्ये घडून आलेली उत्क्रान्तिची प्रक्रिया आणि काही ठिकाणी नैसर्गिक निवड हे त्या उत्क्रान्तिचे असलेले प्रमुख कारण, या दोन्ही गोष्टी जरी जॉन्सन मान्य करत असले तरी ते म्हणतात की या उत्क्रान्तिमागे परमेश्वराचा हात नाहीच असा कोणताही निर्विवाद प्रायोगिक दाखला आपण देऊ शकत नाही. अर्थात सजीवांच्या एका गटामधील फक्त काही सजीवांच्या डीएनए श्रुंखलेमध्ये बदल होणे आणि त्याच गटातील इतरांच्या डीएनए श्रुंखलेमध्ये कोणतेच बदल न होणे हे कोणत्याही दैवी शक्तीच्या इच्छेने घडून आलेले नाही हे आपण दाखल्यानिशी कधीच सिद्ध करून दाखवू शकणार नाही. पण तसे बघायला गेले तर हाच युक्तिवाद आपल्याला कोणत्याही शास्त्रीय सिद्धांताच्या बाबतीत करता येईल. आपल्या सूर्यमालेतील ग्रह, धूमकेतू वगैरेंची भ्रमणे, न्युटन किंवा आइनस्टाईन यांनी शोधलेल्या गतीच्या नियमानुसार होतात असे जरी आपण मानत असलो तरी एखाद्या कधीतरी अवतीर्ण होणार्‍या धूमकेतूची भ्रमणकक्षा त्याला परमेश्वराकडून मिळालेल्या छोट्याश्या धक्क्यामुळे ठरली होती असे जर कोणी सांगितले तर ते तसे नव्हते हे सांगण्यासाठी हे नियम नक्कीच असमर्थ आहेत. मला असे वाटते की फिलिप जॉन्सन यांनी स्वतःची ही भूमिका निष्पक्षपणे आणि खुल्या मनाने घेतलेली नसून स्वतःच्या जीवनात ते सजीव आणि त्यांची उत्क्रान्ती किंवा धूमकेतूंची भ्रमणकक्षा यांच्यापेक्षा धर्माला जास्त महत्व देत असल्याने घेतलेली आहे. या बाबतीत मी एवढेच म्हणू शकतो की कोणताही शास्त्रीय सिद्धान्त सिद्ध करताना त्या ठिकाणी कोणताही हस्तक्षेप परमेश्वर करत नाही असे धरूनच तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि मगच तो सिद्ध होतो का हे बघावे लागते.

जॉन्सन सजीवांच्या उत्क्रान्तिबद्दल म्हणतो की “जिच्या मागे सृष्टीच्या बाहेर असणार्‍या निर्मात्याचा हात नाही अशी नैसर्गिक उत्क्रान्ती एखाद्या जाती-प्रजातिचे मूळ कशात होते याचे संपूर्ण विवरण करू शकत नाही”. प्रत्यक्ष निरिक्षणामध्ये आढळून आलेल्या बाबी, शास्त्रीय सिद्धान्ताच्या चौकटीत बसवताना किती अडचणी येऊ शकतात याची जाणीव नसल्याने जॉन्सन हे चुकीचे विधान करतो आहे असे मला वाटते. शास्त्रज्ञ जेंव्हा अशी प्रत्यक्ष केलेली निरिक्षणे, ते मांडत असलेल्या नव्या शास्त्रीय सिद्धान्ताच्या पुष्टीसाठी म्हणून देतात तेंव्हा मानवी चुका तर होतातच पण त्या शिवाय ही निरिक्षणे किंवा गणिते ज्या गृहितांच्या आधारावर केली जातात त्या गृहितांची वैधता त्या शास्त्रीय सिद्धांताच्या वैधतेच्या मर्यादेपेक्षा व्यापक असण्याचीही शक्यता असते. उदाहरणार्थ न्यूटनने त्याचे गुरुत्वाकर्षणाचे नियम जेंव्हा मांडले तेंव्हा त्याने किंवा इतरांनी केलेली निरिक्षणे ही 100% न्यूटनच्या नियमांनुसार होती असे काही म्हणता येणार नाही. न्यूटनसारख्या भौतिकी शास्त्रज्ञांना एके काळी भेडसावणार्‍या या अशा प्रकारच्या अडचणी, नैसर्गिक उत्क्रान्तिवादाचा वापर आपल्या संशोधनात करू इच्छिणार्‍या जीवाश्मशास्त्रज्ञांना आणि उत्क्रान्तिवादी जीवशास्त्रज्ञांना आज भेडसावत आहेत असे त्यांच्या अलीकडच्या लेखनांवरून दिसते आहे. निर्विवादपणे, नैसर्गिक उत्क्रान्तिवादाचा सिद्धांत हा आज जरी अत्यंत यशस्वी म्हणून गणला जात असला तरी या सिद्धान्तान्वये जीवशास्त्र किंवा जीवाश्मशास्त्र यांतील प्रत्येक निरिक्षणाचे स्पष्टीकरण देण्याचे कार्य अजून पूर्ण झालेले नाही असेच म्हणावे लागते. माझे तर असे स्पष्ट मत आहे की परमेश्वरी हस्तक्षेपाचा विचार सुद्द्धा न करता भौतिकी आणि जीवशास्त्र यांच्या चष्म्यातून दिसणार्‍या जगाचे स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टीने नैसर्गिक उत्क्रान्तिवाद हा अत्यंत महत्वाचा म्हणून गणला पाहिजे.

असे जरी असले तरी एका बाबतीत जॉन्सनचे म्हणणे मला ग्राह्य वाटते. तो म्हणतो की सर्वसाधारणपणे लोकांना समजलेले-उमजलेले धार्मिक विचार आणि नैसर्गिक उत्क्रान्तिवाद यांमधे एक निश्चित विसंगति आहे आणि यामुळेच ही विसंगति नाकारणार्‍या शास्त्रज्ञांना आणि शिक्षणतज्ञांना तो (जॉन्सन) चांगलेच फैलावर घेताना दिसतो. नैसर्गिक उत्क्रांति परमेश्वरी हस्तक्षेपामुळे होते या आपल्या सिद्धान्तामध्ये त्याला एकच उणीव भासते त त्याबद्दल तक्रारीवजा सुरात तो म्हणतो की नैसर्गिक उत्क्रान्ती आणि परमेश्वराचे अस्तित्व या दोन्ही गोष्टी पूर्णपणे सुसंगत दिसण्यासाठी असे मानणे आवश्यक वाटते की, परमेश्वराचे कार्य सुरूवातीस सृष्टीचे नियम घालून देणे आणि त्यांचे पालन घडवून आणेल अशी नैसर्गिक निसर्गरचना निर्माण करणे या पर्यन्तच मर्यादित किंवा सीमित होते व त्यानंतर परमेश्वर तेथून निवृत्त झाला असावा.

ऊत्क्रान्तिचा आधुनिक सिद्धान्त आणि विश्वात रुची असलेल्या परमेश्वराच्या अस्तित्वावर निष्ठा या दोन गोष्टी काही परिस्थितींमध्ये सुसंगत असू शकतात हे जॉन्सनचे विधान मला तर्कशुद्ध वाटत नाही. मी ही कल्पना करू शकतो की परमेश्वराने सुरूवातीस सृष्टीचे नियम घालून दिले आणि त्यांचे पालन घडवून आणेल अशी नैसर्गिक निसर्गरचना निर्माण केली. यामागे परमेश्वराची कदाचित अशी इच्छा असावी की जेणेकरून एक दिवस नैसर्गिक निवडीच्या द्वारे तुम्ही-आम्ही या जगात अवतीर्ण होऊ. पण हे लक्षात घेतले पाहिजे की परमेश्वराच्या अस्तित्वाची किंवा धर्माची आपली संकल्पना, विश्वात सजीव कसे अवतीर्ण झाले असावेत? व त्यांच्यापासून आपण कसे निर्माण झालो असलो पाहिजे? या प्रश्नांची उत्तरे शोधणार्‍या भविष्यवेत्त्यांच्या मनात निर्माण न होता विश्वात ढवळाढवळ करणार्‍या परमेश्वराचे अस्तित्व त्यात सतत असलेच पाहिजे अशी प्रबळ भावना असलेल्या लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळेच कोणत्याही धर्माच्या संकल्पनेत परमेश्वर विश्वरचना केल्यावर निवृत्त झाला असावा हा विचार मान्य होण्यासारखा नाही.

शाळांमध्ये देणार्‍या शिक्षणात उत्क्रान्ती हा विषय असावा की नसावा या वादावर अमेरिकेतील ‘टेक्सास’ राज्यात, 1980च्या दशकात बराच उहापोह झाल्यावर अखेरीस या विषयाचा शालेय क्रमिक पुस्तकात अंतर्भाव करण्यात आला. परंतु जगाच्या पाठीवर असे अनेक देश अजुनही आहेत (मुख्यत्वे इस्लामिक देश) जेथे उत्क्रान्तिवादाचा शालेय पुस्तकात समावेश केला जात नाही आणि भविष्यात तो केला जाईल अशी कोणतीच खात्री देता येत नाही.

काही लोक असे मानतात की शास्त्रीय विचारसरणी आणि धार्मिक विचार यांच्यात संघर्ष असण्याचे कोणतेच कारण नाही. स्टीफन गुड हा टीकाकार जॉन्सनच्या लेखनावर टीका करताना म्हणतो की शास्त्राचा संबंध तथ्य असलेल्या सत्यतेशी असतो तर धर्म हा मानवी नीतीशी संबंधित असतो. मला गुड्चे हे विधान फारसे पटत नाही कारण एकतर धर्माचा अर्थ त्यावर विश्वास ठेवणार्‍या लोकांनीच लावलेला असतो आणि या लोकांना आपण ज्यावर विश्वास ठेवतो तीच तथ्य असलेली सत्यता आहे असे मनापासून वाटत असते. गुडचे विचार आज अनेक शास्त्रज्ञ आणि कर्मठ नसलेले धार्मिक लोक मान्य करताना दिसतात. याचा एक फायदा तरी नक्की झालेला दिसतो. एके काळी प्रकृतिचे कार्य कसे चालते याचा खुलासा, नदी-नाले, पर्वत आणि वृक्ष यांना दैवी गुण किंवा देवाचे रूप दिल्याशिवाय करणे शक्य नव्हते. अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत वनस्पती आणि प्राणी यांची शरीररचना हा विश्वनिर्माता परमेश्वराच्या अस्तित्वाचा सर्वात महत्वाचा पुरावा म्हणून गणला जात होता. सृष्टीमध्ये आजही अगणित अशा गोष्टी किंवा घडामोडी आहेत ज्यांचा खुलासा आपल्याला करणे शक्य होत नाही. परंतु एवढे म्हणणे मात्र नक्की शक्य आहे की जी तत्वे या गोष्टी कशा कार्य करतात किंवा या घडामोडी कशा घडतात याच्या नियंत्रणामागे आहेत ती आपल्याला ज्ञात झालेली आहेत. आज सर्वात गूढ किंवा अनाकलनीय जर काही असेल तर ते आपल्याला विश्वउत्पत्तिशास्त्र किंवा मूलकणभौतिकी यांसारख्या विषयांसंबंधी गोष्टी किंवा घडामोडी यांतच आढळूनच येते. वर म्हटल्याप्रमाणे, शास्त्रीय विचारसरणी आणि धार्मिक विचार यांच्यात संघर्ष असण्याचे कोणतेच कारण नाही असे मानणार्‍या लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की विश्वउत्पत्तिशास्त्र किंवा मूलकणभौतिकी यांसारखे काही थोडे विषय सोडले तर बाकी विषयांमध्ये, शास्त्रीय विचारसरणीने धार्मिक समजुतींना हद्दपार केव्हांच केलेले आहे.

गेल्या दोन शतकांमधील आपल्या अनुभवावरून माझी अशी खात्री आहे की भविष्यात जेंव्हा केंव्हा आपल्याला सृष्टीचे किंवा प्रकृतिचे नियंत्रण करणारे अंतिम नियम सापडतील तेंव्हा त्या नियमात आपल्याला कदाचित विचार-सौंदर्य दिसेलही परंतु त्यांत सजीवता आणि बुद्धीमता यांना कोणतेही विशेष स्थान दिलेले आढळणार नाही. किंवा जास्त स्पष्टपणे सांगावयाचे ठरवल्यास या नियमात आपल्याला मूल्य आणि नीती यांची कोणतीही मानके आढळणार नाहीत आणि म्हणूनच या गोष्टींना महत्व देणार्‍या परमेश्वराचे उल्लेखही मिळणार नाहीत. या दोन गोष्टी आणि त्यांवरून येणारे परमेश्वराचे उल्लेख हे कदाचित आपल्याला इतरत्र मिळतील पण सृष्टीचे नियंत्रण करणार्‍या अंतिम नियमात ते खचितच आढळणार नाहीत.

हे मला मान्य केलेच पाहिजे की सृष्टी किंवा निसर्ग काही वेळा आवश्यकतेपेक्षा जास्त सौंदर्यपूर्ण दिसतो. घरातील माझ्या कचेरीच्या खिडकीमधून एक हॅकबेरीचे झाड दिसते. या झाडाला निळे “जेस’, पिवळ्या-कंठाचे “ व्हिरिओ” आणि सर्वात सुंदर दिसणारे लाल-चुटुक “कार्डिनल” पक्षांचे थवे भेट देत असतात. मला हे पूर्ण माहिती आहे की उत्क्रान्तिवादाप्रमाणे या पक्षांची रंगी-बेरंगी दिसणारी सुंदर पिसे ही सहचराला आकर्षित करण्याच्या स्पर्धेतून त्याला प्राप्त झालेली आहेत. असे असले तरी हे सर्व सौंदर्य माझ्या डोळ्यांना सुख व्हावे या हेतुनेच परमेश्वराने निर्माण केले असले पाहिजे असा विचार करण्याचा मोह मला टाळता येत नाही. असा मोह मला झाला की मी माझ्या मनाला समजावतो की जर पक्षी किंवा वृक्षवल्ली यांच्यावर नियंत्रण करणार्‍या कोण्या देवाने या सुंदर पक्षांची निर्मिती केली असली तर तोच देव जन्मजात आढळणारा अधुपणा आणि कर्करोगासारखे रोग़ यांनाही जबाबदार असला पाहिजे.

धर्मावर निष्ठा ठेवणारे लोक, गेली हजार वर्षे तरी, विश्वाचे भले व्हावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या परमेश्वराचे नियंत्रण असलेल्या या जगात दुखः, व्यथा किंवा हालअपेष्टा सहन करणार्‍या व्यक्ती का जन्माला येतात? व आयुष्य कालक्रमण करताना का दिसतात? यासारख्या प्रश्नांची, अजून तरी न मिळालेली, उत्तरे शोधत आहेत. अर्थात त्यातल्या काही लोकांनी, दैवी कृपा किंवा अवकृपेच्या स्वरूपातली या प्रश्नांची चलाख भासणारी आणि ऐकणारा निरुत्तर होईल अशी उत्तरे सुद्धा शोधून काढली आहेत. या लोकांशी वाद-विवाद करण्याची किंवा आणखी एखादे असे चलाख उत्तर शोधून काढण्याची माझी सुतराम इच्छा नाही. दुसर्‍या महायुद्धात यहुदी धर्मपंथीयांचे जे शिरकाण करण्यात आले होते त्याची आठवण जरी झाली तरी परमेश्वर मानवाच्या भल्यासाठी सतत प्रयत्नशील असतो यासारख्या तत्वज्ञानाला माझ्या मनात जर काही सहानभुती निर्माण झालेलीच असली तरी ती त्वरित नष्ट होते. मला असे वाटते की या जगात मानवाच्या कल्याणासाठी झगडणारा जर कोणी परमेश्वर असलाच तर त्याने मानवाचे भले करण्यासाठी ज्या कोणत्या योजना बनवल्या असतील त्या त्याने अत्यंत कौशल्यपूर्ण रितीने मानवापासून लपवून ठेवलेल्या आहेत. अशा परमेश्वराची प्रार्थना करून त्याला त्रास द्यावा हे मला, अधार्मिक वाटले नाही तरी किमान पक्षी, उद्धटपणा किंवा असभ्यपणा वाटतो.

सृष्टीच्या नियंत्रणाच्या अंतिम नियमांबद्दलची माझी निरुत्साही किंवा उदास भासणारी मते अनेक शास्त्रज्ञांना पटत नाहीत. परमेश्वराच्या अस्तित्वाचा उघड किंवा अप्रच्छन्न पुरावा ज्याच्याकडे आहे अशी कोणतीही व्यक्ती मला ज्ञात नाही परंतु बुद्धीप्रामाण्य सजीवतेला प्रकृतिमध्ये काहीतरी विशेष स्थान आहे असे मत असणारे अनेक शास्त्रज्ञ मला माहित आहेत. एक व्यावहारिक बाब असल्याने जीवशास्त्र आणि मानसशास्त्र (किंवा रसायनशास्त्र आणि द्रवचलनशास्त्र) यांसारखे विषय त्या विषयांच्या गृहितांच्या संदर्भातच अभ्यासायचे असतात; तेथे मूलकण भौतिकीची गृहिते संदर्भ म्हणून चालणार नाहीत हे मला मान्य आहे पण याचा अर्थ असा होत नाही की जीवशास्त्रज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञ मानतात म्हणून सजीवता किंवा बुद्धीमता यांना प्रकृतिने काही विशेष स्थान बहाल केलेले आहे. प्रकृतिचे अंतिम नियम जेंव्हा केंव्हा आपल्याला सापडतील तेंव्हा जर आपल्याला आढळून आले की या नियमांचे जेथे एकत्रिकरण होत असेल त्या ठिकाणी बुद्धीप्रामाण्य सजीवतेला काहीतरी विशेष भूमिका आहे तर आणि फक्त तरच असे म्हणता येईल की ज्याने हे विश्व निर्माण केले त्या परमेश्वराला आपल्यात (बुद्धीप्रामाण्य सजीवतेत) काही विशेष रुची आहे किंवा होती.

क्वान्टम किंवा पुंज यांत्रिकीमध्ये असे मानले जाते की कोणत्याही भौतिक प्रणालीमध्ये स्थान, अंगभूत उर्जा किंवा गतीशीलता या सारख्या गुणविशेषांना, त्यांचे निरिक्षण एखाद्या निरिक्षकाच्या निरिक्षणसंचाद्वारे केले जाईपर्यंत, कोणतेही विशिष्ट मूल्य नसते. जॉन व्हीलर (1911-2008, एक सुप्रसिद्ध अमेरिकन सैद्धान्तिक भौतिकी शास्त्रज्ञ, आण्विक विघटन, सर्वसाधारण सापेक्षतावाद या विषयात संशोधन) असे मानतो की क्वान्टम किंवा पुंज यांत्रिकीला काहीतरी अर्थ प्राप्त करून देण्यासाठी बुद्धीप्रामाण्य सजीवतेची आवश्यकता आहे. मागील शतकाच्या शेवटच्या दशकात व्हीलरने याच्या पुढे जाऊन असे प्रतिपादन केले आहे की जर आपल्याला विश्वाच्या कानाकोपर्‍यांपर्यंत अस्तित्वात असलेल्या भौतिक स्थितीचे इत्यंभूत निरिक्षण करावयाचे असेल तर विश्वाच्या कानाकोपर्‍यांपर्यंत बुद्धीप्रामाण्य सजीवतेने फक्त पोचून उपयोग नाही. त्या सर्व ठिकाणी या सजीवतेचे स्वामित्व असले पाहिजे. तत्वज्ञानात एक समजूत आहे. या समजुतीप्रमाणे कोणतीही प्रणाली अस्तिवात आहे असे समजण्यासाठी त्या प्रणालीचे शास्त्रीय पद्धतीने निरिक्षण करणे आवश्यक असते (Doctrine of Positivism). मला असे वाटते की व्हीलर, तत्वज्ञानातील ही समजूत फारच गांभीर्याने घेत असला पाहिजे. मी आणि इतर काही शास्त्रज्ञ असा व्यावहारिक दृष्टीकोन घेतो की विश्वाकडे क्वान्टम किंवा पुंज यांत्रिकीच्या तत्वांप्रमाणे न बघता तरंग सिद्धांताच्या तत्वांप्रमाणे बघावे. तरंग सिद्धांतानुसार अणू किंवा मोलेक्यूल यांपासून ते त्यांचे निरिक्षण करणारे शास्त्रज्ञ, हे सर्व भौतिकीमधील ज्या नियमांच्या नियंत्रणाखाली असतात त्या नियमांच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही भौतिक प्रणालीतील गुणविशेष, त्यांचे निरिक्षण केले जाते आहे किंवा नाही यावर अवलंबून नसतात.

क्रमशः

19 मार्च 2018

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हम्म. काही मुद्दे पटले नाहीत पण लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला काखमांजऱ्या आठवल्या. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुविचारांचा डिओड्रन्ट वापरा, काखमांजर्‍या पळून जातील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोठ्याने विचार करत आहे.

तुम्हाला जर समजले की तुमचा विश्वासाचा डॉक्टर हा उत्क्रांतीविरोधी मताचा आहे तर तुम्ही काय कराल ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डॉक्टर बदलेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असल्या निर्गुण निराकार परमेश्वराचा आम्हाला काय उपयोग. तो असला काय अन नसला काय? म्हणून आम्ही त्याला सगुण साकार केला. मग जरा जवळचा वाटू लागला. तरीपण उपयोगी पडायला अडचण व्हायला लागली मग आम्ही त्याला भक्तवत्सल व करुणाघन केला. आता कसं! त्याल साकडं घालता येतं. शिव्याही देता येतात. सौदाही करता येतो. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ll
ll त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ll सगळी मानवी नाती चिकटवून आम्ही मोकळे झालो आहोत. आता तो तुमच्या आमच्यासारखाच आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कदाचित तुमच्या मनातले परमेश्वराचे रूप आणि त्याची उपयोगी पडण्यास होणारी अडचण हे बघूनच वाइनबर्गला या परमेश्वराचे आता करायचे तरी काय? असा प्रश्न पडला असावा. प्रतिक्रिया आवडली.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय सखोल विचार असलेला लेख मराठीतून इथे उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद. तसेच अावर्जून मराठी शब्द वापरलेले अावडले. अजून थोडा सोपा करून एक एक विचार समजावता अाला, तर बरे होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद . मूळ इंग्रजीमधला हा लेख बराच विस्तीर्ण आहे. म्हणूनच अनुवाद करताना त्याचे भाग मला करावे लागले आहेत. आता त्यातील एक एक विचार सोपा करून समजावयाचा असे ठरवले तर ते कार्य फारच मोठे होईल व त्या मानाने किती वाचकांना त्यात रस वाटेल हे सांगणे कठीण आहे. एखादा विशिष्ट मुद्दा जर कोणाला खुलासा करून हवा असला तर मी तसा प्रयत्न करू शकेन. मागच्या भागात अशा एका दुर्बोध मुद्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न मी केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0