महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने - अरुण खोपकर

मी जपानमध्ये क्योटोला असतानाची एक घटना. शोगुनच्या राजवाड्यात काही प्रवाशांच्या जथ्याबरोबर मी तिथल्या मार्गदर्शकाचे बोलणे ऐकत होतो. राजाच्या शयनगृहातल्या बांबूंच्या जमिनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर पाय पडला की बांबू एकमेकांवर घासून आणि बांबूंतली हवा बाहेर पडून त्यातून वाद्यासारखा सूर निघत असे. राजावर अपरात्री हल्ला झाला तर राजा जागा व्हावा म्हणून ही व्यवस्था. तो जागा तर व्हावाच पण त्याची झोपमोड करणारा ध्वनी हा स्वरबद्ध असावा. जपानी सौंदर्यदृष्टीच्या अनेक सूक्ष्म पैलूंतला हा एक.

एकीकडे मी बोलणे ऐकत होतो खरा. पण माझे डोळे तिथे सफाईचे काम करणाऱ्या मध्यमवयीन स्त्रीवर खिळले होते. पॉलिशलेल्या बांबूवर जमलेला प्रत्येक धुळीचा कण ती आपल्या हातातल्या सफाईवस्त्राने पुसत होती. मग जरा दूर जाऊन बदलत्या प्रकाशकोनात दुसरा एकादा कण दिसतो का ते बघत होती. दिसल्यास तो टिपत होती. एकाद्या धनुर्धारीच्या चेहऱ्यावर लक्ष्यवेध करण्यापूर्वी जी एकाग्रता दिसते तशीच एकाग्रता तिच्या चेहऱ्यावर होती.

ती प्रौढा काम बरोबर करते की नाही हे पहाणारा ‘मुकादम’ नव्हता. जपानी संस्कृतीत मुकादमाची आवश्यकता नाही. प्रत्येकाची सदसद्विवेकबुद्धी हाच प्रत्येकाचा मुकादम. बाहेरून होणाऱ्या टीकेपेक्षा आत्मपरीक्षणातून येणारी टीका ही तीक्ष्ण असते. ती इतकी तीक्ष्ण असते की आत्ममूल्य गमावलेली व्यक्ती अगदी विसाव्या शतकातही आपल्या हाताने आपले पोट चिरून आत्महत्या करीत असे.

महाराष्ट्रात अस्मितेची फॅशन आली. स्वाभिमानाची आली. पण त्याबरोबर आत्मपरीक्षणाचे कठोर व्रत आले नाही. मराठी भाषेच्या ‘अभिमाना’च्या छद्मरोमांचकारी ऐतिहासिक नाटकछाप अभिमानावर कोट्यावधी रूपये कमावल्यावर आपल्या नातवंडांना इंग्रजी माध्यमाच्या शाळात पाठवताना अस्मिता आड आली नाही. आत्मपरीक्षण हे महाराष्ट्रात रूजले नाही. आधुनिक भारताला जमले नाही. हिंदुत्वाला पचले नाही. कारण ‘तेव्हा तुम्ही कुठे होतात?’ हा लाडका खेळ रोजरोज खेळत तळ्यामळ्यात करता आले नसते.

दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची सक्ती करताना “बाबांनो, निदान आपल्या पक्षाच्या फलकांवर लिहिलेल्या भाषेतून मराठीच्या अंगावरची फाटकी साडी फेडू नका.” असे सांगायची गरज वाटली नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ सूक्ष्मदर्शकाखाली मोठे करताना स्वतःच्या अनुयायांच्या आंधळ्या डोळ्यातली मुसळे अदृश्य करण्याची जादू करायला लागली नसती.

आमच्या इतिहासाची तीच दुर्दशा. या महाराष्ट्रात मुकुंदराजापासून भाऊ पाध्ये, अरूण कोलटकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळपर्यंत किती महान साहित्यिक झालेत. आज हरी नारायण आपट्यांच्या कादंबऱ्यांचा संच मिळू शकत नाही कारण तो अस्तित्वातच नाही. बंगाल सरकारने प्रकाशित केलेला बंकिमबाबूंच्या समग्र वाङ्मयाचा उत्तम कागदावर छापलेला शिवलेल्या बांधणीचा ग्रंथ शंभर रूपयात मिळतो.

Bengali Etymology Dictionary

भाषेसाठी स्वत:चे प्राण गमावलेल्या दरिद्री बांगला देशातला विवर्तनमूलक (etymological) शब्दकोश इतका देखणा आहे की त्याच्या रंगांतूनच शोनार बांगला जाणवतो. पहिल्या भागाला मातीचा रंग आहे, दुसऱ्याला नद्यांच्या पाण्याचा आणि निरभ्र आकाशाचा आणि तिसऱ्याला तरूलतातृणपल्लवांच्या अंगकांतीचा हिरवा रंग आहे. भाषेवरचे प्रेम निःशब्द रंगांतही तरंगते आहे.

आमच्या अस्मितावाल्या, स्वाभिमानवाल्या महाराष्ट्राच्या वाङ्मयाचा सर्वोत्कृष्ट इतिहास म्हणजे वि. ल. भावे लिखित ‘महाराष्ट्र सारस्वत’. त्याची आज उत्तम स्थितीतली एक प्रत जो विकत मिळवील त्याला राज्यसरकार भालाशेलापागोटेही बहाल करू शकेल. कारण हे बक्षीस घेण्याकरता कोणी माईचा लाल येणारच नाही.

अस्मितेच्या आणि स्वाभिमानाच्या कागदी डरकाळ्या फोडून छप्पन्न इंची पोकळ छाती ठोकता येते. पण त्या पडघमाच्या धडाडधुममधून ‘बकुलफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा’सारखे शब्द निघणार नाहीत. कारण त्या पिंजऱ्यातल्या करुणाविरहित दगडी हृदयाचे भावदारिद्र्य हीच आमची स्वाभिमानसंपत्ती.

गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राला ज्या शब्दमाळा वाहिल्या आहेत त्यात त्याला ‘अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा’ म्हटलेच आहे. पण त्यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात काही नवीन गुण निर्माण झाले आहेत. स्वभाषेचे आणि आपल्या भावेतिहासाविषयीचे अज्ञान आणि त्याची लाज हे ते नवे कोरेकरकरीत गुण.

‘अस्मितेच्या, स्वाभिमानाच्या निलाजऱ्या दगडांच्या देशा’

- अरुण खोपकर

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

बोचरे सत्य.
पुस्तकांच्या उपलब्धतेच्या मुद्याबद्दल दोन बाबी - आर्यभूषण छापखाना बंद झाला तेव्हा त्यांनी सगळी पुस्तकं विकायला काढली. तेव्हा माझ्या वडिलांनी (मराठीचे प्राध्यापक कै. डॉ. गं. ना. जोगळेकर) बरीच पुस्तकं घेतली होती, त्यात ह.ना. आपटे यांची 32 पुस्तकंही होती (संकीर्ण, संक्षिप्त, सर्व प्रकारची). असणार अजून भावाच्या घरी.
दुसरं म्हणजे अलीकडे 200-250 किंवा कमी संख्येने प्रसिद्ध होणा-या आवृत्त्या लुप्त होतात, अनेकदा ती पुस्तकं दखलपात्र होती की नाही हे ठरवण्यासाठीही ती उपलब्ध नसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक3
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुरितांचे तिमिर जावो

खरं तर, ह. ना. आपटेंचं साहित्य आता प्रताधिकारमुक्त आहे. म्हणजे कुणीही प्रकाशक ते पुनर्प्रकाशित करू शकतो. इतकंच नव्हे, तर आता मराठी विकिपीडियाच्या विकिबुक्स प्रकल्पातही त्यांचा समावेश केला जाऊ शकतो. गूगलतर्फे आता मराठी मजकुरासाठी ओसीआर तंत्रज्ञानही उपलब्ध आहे. म्हणजे छापील पुस्तकाची पानं स्कॅन करून त्यापासून त्याची युनिकोड आवृत्ती करणं साध्य झालं आहे. तरीही हे होत नाही, ही खेदाची बाब आहे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

खरच बोचरा लेख. फेसबुकवर आमच्या मराठी मंडळाबरोबर शेअर करते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त मराठीच नव्हे, एकूणात आपण भारतीयांनाच हे लागू होतं.

महाराष्ट्रात अस्मितेची फॅशन आली. स्वाभिमानाची आली. पण त्याबरोबर आत्मपरीक्षणाचे कठोर व्रत आले नाही. मराठी भाषेच्या ‘अभिमाना’च्या छद्मरोमांचकारी ऐतिहासिक नाटकछाप अभिमानावर कोट्यावधी रूपये कमावल्यावर आपल्या नातवंडांना इंग्रजी माध्यमाच्या शाळात पाठवताना अस्मिता आड आली नाही. आत्मपरीक्षण हे महाराष्ट्रात रूजले नाही. आधुनिक भारताला जमले नाही. हिंदुत्वाला पचले नाही. कारण ‘तेव्हा तुम्ही कुठे होतात?’ हा लाडका खेळ रोजरोज खेळत तळ्यामळ्यात करता आले नसते.

शतश: सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

बिनबुडाचा लेख

उचलली लेखणी अन उगाच आत्मताडन करत असल्याचा आव आणत आपण कसे कपाळ करंटे आहोत अशा रडक्या मनोवृत्तीचा सुमार लेख

हनाआपटे काय किंवा इतर विसाव्या शतकातीच्या सुरवातीचे ब्राह्मणी लेखक केवळ सुमार असल्याचे काळाच्या ओघात सिद्ध झालेले आहेच आता त्यांचे साहित्य संपले , कुणी वाचले नाही, त्यामुळे काहीही हानी होणे संभव नाही.

जी गत संस्कृत साहित्याची झाली, तीच यांची झाली

जग पुढे जात रहाते... रद्दीत फार काळ रमू नये

बाकी ही भुमिका की तुम्ही तेव्हा कुठे होता हा खेळ खेळायचा नाही याला फारसा अर्थ नाही कारण मग मजाच काय रहाणार?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक3
 • पकाऊ1

आज ह. ना. आपट्यांचं साहित्य सहज उपलब्ध नाही; आणखी ६६ वर्षांनी ढसाळांचं साहित्यही असं उपलब्ध असणार नाही, अशी भीती वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ढसाळ तसेही आज फारसे कुणी वाचत नाही. आंबेडकरी चळवळीतील त्यांच्या अनुयायांपैकी असलेच तर काही आणि विद्यापीठात पर्याय नसल्यामुळे बीएयेमेचे इद्यार्थी.... अभिजन, आणि बहुतांशी बहुजन १०० कादंब-यांच्या संचापलिकडे वाचत असल्याची शंकाच आहे,

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

असे रडके लेख खरं तर मला आवडत नाहीत (त्यातील मेसेजशी सहमत असून सुद्धा).

लेखाच्या शेवटी परिस्थिती सुधारण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल काहीतरी लिहिले असते तर लेखाचा काही उपयोग झाला असता.
जसे की ..
* इतर लोक करत असलेले प्रयत्न, त्यात त्यांना कितपत यश मिळाले आहे
* स्वतः ला सुचलेल्या काही प्रॅक्टिकल कल्पना

उदाहरण - आपल्या कडे असलेली खूप जुनी पुस्तके (जी आता बाजारात उपलब्ध नाहीत), ती स्कॅन करून archive.org किंवा https://openlibrary.org वर टाकणे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्राजक्ताच्या दळदारी देशा

हे वाचताना प्रथम दळदारी च्या ऐवजी 'दळभद्री" असेच वाचले गेले. काय करणार, वर्षानुवर्षे, दसऱ्याला वैचारिक सोने लुटल्यामुळे असे होत असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती