वाङ्मयीन नियतकालिकांचे भवितव्य

vividhdnyanvistar

एकोणिसाव्या शतकातल्या सुरुवातीच्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेला मजकूर पाहिल्यास आपण चकित होतो. साहित्यातील नवनवीन रूपबंध शोधण्याचा-चाचपडण्याचा तो काळ होता. संस्कृत, इंग्रजी आणि अन्य भाषांमधून भाषांतरित होणारे साहित्य विपुल प्रमाणात होते. त्यामुळे त्या कालखंडाला सार्थपणे भाषांतरयुग असे म्हटले गेले. मराठी भाषेची अभिवृद्धी हा मुख्य प्रकल्प असल्याने शेवटच्या तीन दशकांत शेकडो पुस्तकांची भाषांतरे करवून घेण्यात आली होती. यातील प्रकाशित झालेले एकूण लेखन बघता आज आपण चकित होण्याची कारणे सापडू शकतील. अतिशय तपशीलाने, विस्ताराने, संदर्भयुक्त आणि व्यासंगपूर्ण लेखनाचे वाचन करतांना तत्कालीन परिस्थितीत आज उपलब्ध असलेल्या कोणत्याही सुविधा आणि सोयी तेव्हा नव्हत्या हे लक्षात घ्यावे लागते. दळणावळणाची साधने, टपालाची यंत्रणा, अद्यावत ग्रंथालये, अद्यावत छापखाने अशा गोष्टी नसतांना त्या काळातल्या नियतकालिकातल्या लेखकांनी केलेले काम खरोखरीच चकित होण्यासारखे आहे. आज फोन, प्रवासाची सहज उपलब्ध होणारी साधने, ग्रंथालये, विद्यापीठे, प्रगत छपाई तंत्रज्ञान, आणि मुख्य म्हणजे इंटरनेटसारख्या सोयी उपलब्ध आहेत आणि यांच्या अभावासह त्याकाळात लिहिले गेलेले साहित्य आणि नियतकालिकांचा व्यवहार पाहाता ते अतिशय स्पृहणीय कार्य झाले आहे असे वाटते. या अभावांच्या आणि सोयीसुविधांच्या निकषांवर सुरुवातीची प्रगल्भता मात्र क्षीण होत गेली की काय असे वाटू लागते. अर्थात नंतरच्या काळात प्रत्यक्ष जगण्याच्या संघर्षात वाढत गेलेले दाब आणि बदललेली सामाजिक-आर्थिक परिस्थिती हेही घटक प्रभावी ठरत असतातच.

१८३७साली मराठीत नियतकालिके प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. हिन्दी भाषेत नियतकालिकांचे प्रकाशन १८२६साली सुरू झालेले होते. मराठीत नियतकालिके प्रकाशित व्हायला सुरुवात झाल्यानंतर पावणेदोनशे वर्षांत नियतकालिकांच्या स्वरूपामध्ये, रूपामध्ये, उद्देशांमध्ये स्थित्यंतरे होत गेली आहेत. छपाईमध्ये क्रांती घडून आली. मराठी नियतकालिके ऐंशीच्या दशकात टाईपसेटिंग करून संगणकावर जुळवलेल्या सुबक अक्षरठशांमध्ये वेगाने छापली जाऊ लागली. पण छापलेल्या कागदाचे चिरकालत्व अखेर अशक्य असते. ते कुजत, ठिसूळ होत, विरत नष्ट होणार असतातच. एकोणिसाव्या शतकात छापलेली नियतकालिके मिळवत असतांना मला फार थोडी उपलब्ध होऊ शकली. १८६७ ते १९३७ या सत्तर वर्षांत प्रकाशित झालेले विविधज्ञानविस्तारचे सगळे अंक मला महाराष्ट्रात एका ठिकाणी कुठेच सापडू शकले नाहीत. बरेच अंक हरवलेलेच असत. पुण्यातल्या ख्यातकीर्त ग्रंथालयात सगळे गठ्ठे माळ्यावर ठेवलेले होते. त्यातले काही बघून वाचून झाल्यानंतर पुढच्या वेळी काही महिन्यांनी तिथे गेल्यावर मला कळले की त्यांनी ते सगळे अंक 'पल्प' करून टाकले आहेत. आणि मी खचलोच होतो. त्या खजिन्यात अजूनही काही दुर्मीळ आणि मी अद्याप न पाहिलेले अंक होते.

गेल्या १८० वर्षांतील शेकडो नियतकालिकांचा समावेश असलेली सूची पाहिली तर त्यातील निवडक नियतकालिके विशिष्ट उद्देशाने, चिकाटीने दीर्घकाळ टिकून राहिलेली होती आणि त्यांनी मराठी वाङ्मयव्यवहारात आपला वाटा उचलला आहे हे मान्य करता येईल. यात साहित्यसंस्थांची मुखपत्रे, प्रकाशनगृहांनी चालवलेली नियतकालिके आणि मोजकी स्वतंत्र प्रकाशित झालेली नियतकालिके यांचा समावेश होतो. यात नियमित लेखन करणारे अनेक लेखक मराठी साहित्यविश्वात ज्याप्रमाणे प्रस्थापित झाले त्याचप्रमाणे पन्नास वर्षांपूर्वी भरात असलेल्या लघुअनियतकालिकांच्या चळवळीतून लिहिते झालेले अनेक लेखकही पुढे प्रस्थापित झाल्याचे दिसते. अलीकडच्या काळातील निखळ वाङ्मयीन नियतकालिके पाहू गेल्यास ती फारच थोडकी सापडतील आणि त्यातही अनुष्ठुभ्, कवितारती अशी जुनी नियतकालिके आहेत. पण जी इतर लघुअनियतकालिके म्हणता येतील अशी आहेत त्यांना काही विशिष्ट भूमिका आहे असे दिसत नाही. अलीकडच्या काळात हा उद्योग करण्यामागे प्रस्थापित होण्याचा आणि करिअरिस्ट मार्ग शोधण्याचा अजेंडा कार्यरत दिसतो, या नीतीन रिंढे यांच्या मताशी (ललित, मे, १९९३) मी सहमत आहे. छपाई आणि अशा प्रकारच्या प्रकाशनांमधून मिळणाऱ्या सत्तेचा सोपान सुलभ करणे हाही हेतू यात उघड आहे. बदललेल्या तंत्रज्ञानाधारित आणि मुक्त भांडवलशाही व्यवस्थेच्या नेपथ्यात तो बऱ्याच अंशी यशस्वीही झालेला आहे. कारण सत्तेला येणारी फळे चाखायला नवे-जुने सगळेच तत्पर असतात आणि त्यातून मिळणारे कोणत्या प्रकारचे प्रोटिन्स आपल्या स्वास्थ्यासाठी उपकारक आहेत हे ज्येष्ठांपासून होतकरूंपर्यंत साऱ्यांना उपजतच माहीत असते. त्यामुळे उपटसुंभ नियतकालिकांचा सुळसुळाटही शक्य होत असतो. त्यातही गेल्या ४-५ वर्षांत वेगाने येत असलेली बारकी-बारकी अनियतकालिके पाहिल्यास ती कशासाठी प्रसिद्ध होत आहेत असा प्रश्न पडतो. प्राध्यापकांसाठी सक्तीच्या केलेल्या अकादमिक लेखनासाठीची - जे प्रामुख्याने सुमार म्हणावे असेच असते - ती तकलादू-तात्पुरती व्यासपीठं आहेत की काय असे वाटते.

भविष्यातली नियतकालिके असे आपण म्हणतो तेव्हा त्यामागे कागदावर छापल्या जाणाऱ्या नियतकालिकांचे भवितव्य काय असणार आहे असा प्रश्न अनुस्युत आहे. सध्याची मराठी लेखकांची पिढी-वाचकांची पिढी येत्या काळात कार्यरत असणार आहे हे उघड आहे. १९९०नंतर जन्मलेल्या या तरुण पिढीसाठी यादरम्यान झालेले सगळे तंत्रज्ञानात्मक बदल सहज अंगवळणी पडले आहेत. कारण ते जन्मापासून त्यांना सवयीचे असलेले आहेत. त्यांच्या जगण्याचे, संघर्षाचे अटीतटीचे प्रश्न १९९०नंतर बदललेल्या भारतीय आणि जागतिक परिस्थितीशी निगडित आहेत. त्यांच्या अनुभवविश्वाचा पैस या काळातल्या घडून गेलेल्या घटनाच्या परिघातला आहे. यात व्यासंगीपणे वाचन आणि अध्ययन करणाऱ्यांनी तो आपल्या जाणिवांनी अधिक प्रशस्त केलेला आहे हे सध्याच्या लिहित्या काही लेखकांच्या लेखनातून कळून येऊ शकते.

दाव्होसला २००८साली जागतिक सामाजिक परिषद भरली असता तिथे पॅनलमध्ये असलेला एक वक्ता - फ्युचरॉलॉजिस्ट किंवा भविष्याविषयी अधिकाराने सांगणारे लोक असतात त्यापैकी - जो कुणी हा व्यावसायिक प्रेषित होता, त्याने असे भविष्य वर्तवले होते की येत्या पंधरा वर्षात चार अभूतपूर्व असे बदल घडणार आहेत जे मानवतेला मुळातून सहजपणे बदलून टाकणारे ठरतील. म्हणजे, तेलाच्या किंमती बॅरलमागे ५०० डॉलर होतील, पाणी हे धंद्याच्या उत्पन्नाचे साधन होईल आणि त्याचे परिणाम स्टॉक मार्केटमध्ये दिसू लागतील किंवा आफ्रिका जागतिक महासत्ता बनू लागेल. पण यात त्यानं चौथी भविष्यवाणी केली होती ती ही, की जगातून छापील पुस्तकं नामशेष होतील.

पुस्तकं ही आता नामशेषच होणार आहेत याची खूप चर्चा होताना दिसते. वस्तुतः आंतरजालाने (इंटरनेट) आपल्याला पुन्हा अक्षरांकडे वळवलेले आहे हे लक्षात घ्यायला हवे. आंतरजालाची महालाट आली तेव्हा आपल्याला अनेक शंका आल्या होत्या. असे वाटू लागले होते की आता आपण केवळ एक दृकनिर्भर सभ्यता म्हणून उरणार आहोत. पण झाले असे की या घटनेने जुन्या-नव्या छापील नियतकालिकांचे, पुस्तकांचे विशाल भांडार आपल्याला सहजपणे आणि लोकशाहीवादी पद्धतीने उपलब्ध झाले. संगणक वापरायचा तर वाचावे लागेलच. किमान चिन्हे, आज्ञावल्या टंकण्यासाठी वापराव्या लागतीलच. यात दुसरी बाजू अशी आहे की हे माध्यम तंत्रे, तंत्रज्ञानावर आणि उपकरणांवर अवलंबून आहे. संगणक वापरण्यासाठी किमान गरज म्हणजे वीज लागते. संगणकावरच्या पडद्यावरच तुम्हाला वाचावे लागते. झोपून वाचता येत नाही. डिजिटल माध्यमातल्या कोणत्याही रुपात मजकूर असला तरी त्यात पुस्तकासारखेच काही तरी असणार. त्यात बदल झाले तरी गेली पाचशे वर्षं पुस्तकाची म्हणून जी वैशिष्ट्ये आहेत ती बऱ्याच अंशी तीच राहाणार आहेत. जास्तीचा फायदा म्हणजे कमी वेळेत मजकूर मांडणे, आंतरजालावर ढकलणे आणि मजकूरासोबत दृकवैशिष्ट्यांसोबतच (अक्षरठशांचे वैविध्य, रंगीत मांडणी ) श्रुतवैशिष्ट्येही त्यात आणणे शक्य होत आहे. लेखकांच्या मुलाखती, व्याख्यानांच्या चित्रफितीतले मोजके आवश्यक भाग, आवश्यक तिथे घटनांच्या चित्रफिती हे देणे शक्य झाल्यामुळे आंतरजालीय नियतकालिकांचे स्वरूप दृक-श्राव्य असे झाले आहे आणि ते वाढत राहाणार आहे. संगीतविषयक आणि चित्रपटअभ्यासविषयक नियतकालिकांमध्ये या दृकश्राव्य वैशिष्ट्यांचा पुरेपूर आणि चांगला उपयोग होऊ शकतो.

जुझे सारामागो हा नोबेल पारितोषिक विजेता असूनही थोर असा लेखक ८८व्या वर्षी अलीकडे मरण पावला. वयाच्या शेवटच्या टप्प्यावर तो टाइपरायटरवर टंकलेखन करण्याऐवजी संगणकावर लिहू लागला होता आणि त्याने स्वतःचा एक नियमित ब्लॉगही चालवला होता असे ऐकिवात आहे. त्या ब्लॉगमधील लेखनमालिकेतून त्याचे मेमरिज ऑव्ह चाईल्डहूड हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित झाले. तर, संगणकाच्या पडद्यावर लिहिता येऊ लागले. वाचण्यासाठी मजकूर उपलब्ध झाला. वाचण्याची सोय झाली. पण एक गोष्ट बदललेली नाही : कागदावर छापलेल्या ओळींमागून ओळींतून जे पुस्तक किंवा नियतकालिक नावाची वस्तू - तिची उपयोगिता आणि उद्देश तोच राहिला. त्यामुळे नियतकालिके ज्या प्राथमिक उद्देशाने पावणेदोनशे वर्षांपूर्वी प्रकाशित होती त्याच उद्देशाने नव्या स्वरूपातही ती निघत राहाणार आहेत. कागदावर छापलेल्या मजकूरातून नियतकालिक किंवा पुस्तक तयार करणे हा शोध अस्सल आणि एकमेव आणि म्हणूनच परिपूर्ण होता. त्यात फारश्या सुधारणेला वाव नाही हे आपण कबूल करून टाकलेले बरे.

AnushtubhCover
मराठीत गेल्या १०० वर्षांत वाङ्मयीन नियतकालिके मोठ्या प्रमाणात प्रकाशित होत राहिली आहेत. त्याचप्रमाणे ती आजही आहेत. विस्तृत वाचकवर्ग आणि मोठ्या आवृत्तीची नियतकालिके कधीही नव्हती. म्हणजे निखळ वाङ्मयीन नियतकालिके म्हणावी अशी नव्हती. मोठ्यात मोठी आवृत्ती म्हणजे तीन-पाच हजाराची गृहीत धरली तर अशी किती नियतकालिके असतील? बऱ्याचशा नियतकालिकांचे स्वरुप प्रादेशिक किंवा विशिष्ट गटाचे असे राहिलेले आहे. आज 'शब्द' हे नियतकालिक वाङ्मयीन म्हणावे असे आहे आणि ते नियमित प्रकाशित होत आहे. या नियतकालिकामागे आवश्यक असणारी यंत्रणा आणि मनुष्यबळ प्रकाशनसंस्थेचे असल्याने ते सुस्थित आहे आणि त्याच्या नियमिततेची खात्री देता येईल. अनुष्ठुभ् किंवा कविता-रतीसारखी नियतकालिके संस्थांमार्फत प्रकाशित होत असतात आणि त्यापाठीमागे दीर्घकाळच्या त्यांच्या प्रकाशनाचे कर्तृत्त्व असले तरी ती आर्थिक आणि इतर कारणांनी वेळेवर प्रकाशित करणे जिकिरीचे होते. अनुभवसारखी नियतकालिके कॉर्पोरेट ढाच्यात प्रकाशित होतात आणि त्यांचे स्वरूप डायजेस्ट नियतकालिकांसारखे अधिक आहे. साहित्यसंस्थांच्या प्रकाशित होणाऱ्या मुखपत्रांपैकी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या प्रकाशनात सातत्य आहे. प्रतिष्ठान, युगवाणी अशी काही साहित्यसंस्थांची मुखपत्रे प्रकाशित होत राहाणार आहेत. नुकतेच अंतर्नाद नावाचे नियतकालिक बंद करण्याची घोषणा त्याचे संपादक भानू काळे यांनी केली आणि बंद करण्यामागे "चांगले लेखन व चांगले लेखक" न मिळण्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. शब्दवेध, दर्शन, खेळ अशा काही अनियतकालिकांपैकी खेळचे अंक नियमितपणे प्रकाशित होत आहेत. अशी आणखीही अनेक अनियकालिके आहेत पण वर सांगितल्याप्रमाणे त्यांचे वितरण महाराष्ट्रभर पसरलेले आहे असे दिसत नाही.

एक बाब लक्षात घ्यायला हवी की निखळ वाङ्मयीन नियतकालिकांचा वाचकवर्ग सीमितच राहाणार आहे. तो राज्याच्या लोकसंख्येच्या दशांश पाच टक्केही साधला जाईल की नाही अशी शंका आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात छापील नियतकालिके प्रकाशित करणे हा मोठाच खटाटोप असला तरी ती याच गतीने प्रकाशित होत राहाणार. यामागील कारणे अनेक सांगता येतील. एक तर विशिष्ट वाचकगटांना येती काही वर्षे तरी छापील प्रकाशनेच आवश्यक वाटतील. दुसरे प्रादेशिक वा गटाच्या स्तरावर काही ऐहिक उद्दिष्टे ठेवून किडूक-मिडूक नियतकालिके निघत राहातीलच. परंतु, दर्जा, वाचकवर्ग, वितरण, आवृत्ती या बाबी सकारात्मकपणे पुरी करणारी नियतकालिके कमी होत जाणार आहेत अशीच चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.

याला पर्याय काय? आंतरजालीय नियतकालिकांची शक्यता किती आहे? या प्रकारच्या नियतकालिकांचा वाचकवर्ग कोणता असेल? भारतात आणि जगभर प्रकाशित होत असलेल्या आंतरजालीय नियतकालिकांची स्थिती काय आहे? ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील.

आंतरजालामुळे हजारो-हजारो पानांचा मजकूर लहानशा डिस्कमध्ये साठवून ठेवणे शक्य झाले आहे. पण यात साठेबाजीची आदिम वैषयिक प्रेरणा शमवण्यापलीकडे वापर होतो का हा प्रश्न आहे. (नीतीन रिंढे हे विख्यात, विचक्षण, व्यासंगी आणि गाढे वाचक आहेत. त्यांच्याकडे किंडल नावाचे उपकरण आहे आणि त्यावर शेकडो पुस्तके इ-बुक्स / इ-पब स्वरुपातली त्यांना उपलब्ध आहेत. त्यांच्याबाबतीत दुसरी माहिती अशी आहे की ते उत्तम संग्राहक असून जुन्या आणि नव्या पुस्तकांच्या छापील आवृत्त्या मुद्दाम प्रयत्नपूर्वक मिळवत असतात. एकाच वेळी जुन्याची ओढ आणि नव्या तंत्राचा स्वीकार त्यांनी (बहुधा) सहजपणे केलेला आहे. तरीही हा प्रश्न उरतोच की तुम्हाला समजा वॉर अँड पीस किंवा हिंदू ही कादंबरी किंडलवर वाचायची आहे. तर तुमचा उत्साह, धैर्य किती टिकेल?)

आंतरजालीय माध्यमातून प्रकाशित होणाऱ्या साहित्याबद्दल काहीही मत असले तरी गेल्या काही वर्षांत आता जगभर हे माध्यम बऱ्यापैकी स्थिरावले आहे. आशिया आणि भारतातील इंग्रजी लेखन करणाऱ्यांसाठी बरीच इ-नियतकालिके उपलब्ध आहेत. त्यापैकी प्रतिलिपी, आऊटऑफप्रिंट (संपादकः इंदिरा चंद्रशेखर), फोर क्वार्टर्स मॅगेझिन, लिटररी रिव्ह्यू, अश्वमेघ, अन्टिसिरीअस, वायव्य, म्यूज इंडिया, एशिया लिटररी रिव्ह्यू अशी काही नावे सांगता येतील. द लिटल मॅगझिन हे अंतरा देव-सेन संपादित, व्यावसायिकरित्या छापील स्वरुपात प्रकाशित होणारे दक्षिण आशियातले स्वतंत्र नियतकालिक आहे. त्यांनी भारतीय आणि अभारतीय लेखकांचे (मराठी लेखकांचेही) साहित्य प्रकाशित केलेले आहे. पण त्यांच्या वेबसाईटवर जाऊन पाहिल्यास त्यांनी निवडक साहित्य तिथे वाचकांना उपलब्ध करून दिलेले आहे असे दिसते.

हिंदी साहित्यात नियतकालिके अतिशय गांभीर्याने काढली जातात. पक्षधर, पहल, तद्भव, उद्भावना, वसुधा, कथादेश, जलसा, समयांतर अशी विविध नियतकालिके नियमितपणे गेली अनेक वर्षे सुरु आहेत. बहुतेक अंकांची रॉयल साईझच्या आकारातली पृष्ठसंख्या ५००-५००ची असते. त्यातील बरीच आता आंतरजालावरही उपलब्ध आहेत. शिवाय निव्वळ इ-नियतकालिके म्हणून सुरु झालेली नियतकालिकेही आहेत. ती मोठ्या प्रमाणात गेल्या दशकात सुरु झालेली दिसतात. या नियतकालिकांमध्ये नवे नवे प्रयोग केले जातात. सबद, कृत्या, प्रतिलिपी, समालोचन अशी काही हिंदीतील प्रमुख आंतरजालीय नियतकालिके आहेत. कविता, मुलाखती, वाङ्मयीन निबंध, देशी-विदेशी लेखक-पुस्तकांवरचे विस्तृत लेख, संस्मरणपर निबंध (मेम्वॉर्स) आणि कथात्म साहित्याबरोबरच मोठ्या प्रमाणात भारतीय आणि विदेशी भाषांमधले साहित्य हिंदीमध्ये या नियतकालिकांमधून भाषांतरित होतांना दिसते. अनेक मराठी लेखक-कवींचे साहित्यही या नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहे.

मराठीत असे जोरकस प्रयत्न अद्याप सुरु झालेले दिसत नाहीत. ऐसी अक्षरे आणि डिजिटल दिवाळी ही नियतकालिके केवळ वार्षिक म्हणूनच निघतात आणि त्यांचे स्वरूप सर्वसमावेशक असल्याने निखळ वाङ्मयीन भूमिका स्पष्ट होत नाही. कदाचित हेच स्वरूप भविष्यकाळातील नियतकालिकांचे असू शकते. एक रेघसारखे आंतरजालावरील चांगले नियतकालिक होऊ शकते, परंतु त्याचे स्वरूप अजून तरी ब्लॉगसारखे आहे. नियतकालिक असे म्हणता येईल असे हाकारा नावाने या वर्षी सुरु झालेले आहे. त्यावर कविता आणि कथात्म साहित्याशिवाय गंभीर लेख, महत्त्वाचे निवडक गद्य साहित्य, दृककला, संस्कृती, इतिहास, भाषा यांविषयीचा विलक्षण समंजसपणे संपादित केलेला मजकूर वाचता येतो. पण हे निखळ मराठी नियतकालिक नाही तर ते द्वैभाषिक आहे. त्याची एकच आवृत्ती मराठी आणि इंग्रजीत वाचता येते. माझ्या मते हे उलट चांगले आहे. उत्तम आणि सकस लेखनाचे समाधान या नियतकालिकाच्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या तिन्ही अंकांमधून मिळते. हाकारा हे नियतकालिक विशिष्ट थीम वा सूत्र घेऊन अंकाची योजना करते. याच प्रकारचे टेरिटरी नावाचे एक अमेरिकन नियतकालिक आहे. हे नकाशांचा वाङ्मयीन प्रकल्प चालवणारे इ-नियतकालिक आहे. त्यांचेही वर्षांतून तीन अंक विशिष्ट सूत्राभोवती असतात. आतापर्यंत त्यांनी युटोपिया, पर्यायी जगे, प्रवास अशा सूत्रांवर असे अंक प्रकाशित केले आहेत.
हाकाराचे पहिले दोन अंक स्मृती (मेमरी) हे सूत्र घेऊन, तर ताजा अंक 'आत, बाहेर आणि मधोमध' (इनसाईड, आऊटसाईड अँड इन बिटवीन) या सूत्रांभोवती भरगच्च मजकूरांनी योजलेले आहेत. उदाहरण म्हणून त्यांनी पहिल्या अंकात प्रकाशित केलेला लेख घेऊ. हा 'इतिहासकाराच्या नजरेतून स्मृती आणि आठवण' असा प्रा. प्राची देशपांडे यांचा विस्तृत चिकित्सक लेख आहे. आठवणी आणि स्मृती यांच्यातला फरक, त्यांच्यातील अन्योन्य संबंध आणि दोहोंची चिकित्सा करत त्यांनी एरिक हॉब्सबॉम, टेरेन्स रेंजर, पिएर नोरा यांनी केलेल्या मांडणीच्या आधारे त्यांनी अस्सल आठवणी आणि ठरवून रचलेल्या स्मृती म्हणजे हिस्टरी आणि मेमरीच्या संकल्पना विशद केल्या आहेत. त्याचप्रमाणे याच मांडणीचा विस्तार पुढे कसा सामूहिक स्मृतीत अर्थात कलेक्टिव मेमरीत होत राष्ट्रवादी स्मृतीउत्सवापर्यंत जातो आणि यांतून कृत्रिम परंपरा निर्माण केल्या जातात, त्यांच्या मुळाशी सत्तासंबंध, राष्ट्रीय मिथके आणि वर्चस्ववादी दृष्टीकोनांचा प्रसार हेच कारण असते हे प्रा. देशपांडे कॉन्फिनो याने केलेल्या चिकित्सेच्या आधारे स्पष्ट करतात. सविस्तर संदर्भसूची आणि एका विशिष्ट विषयाचा विस्तृतपणे आणि चिकित्सकपणे घेतलेला परामर्श यामुळे हा लेख अतिशय वाचनीय झाला आहे. स्वतःच्याच इंग्रजीतील लेखाचे मराठी भाषांतर करतांना त्याना जरूर कष्ट पडले असणार पण त्यांची भाषा प्रवाही आणि नेमकेपणा साधणारी आहे. त्यामुळे द्वैभाषिक वाचकांना दोन्ही भाषांमधला हा लेख वाचणे ही मौज वाटू शकते. अशा उपक्रमातून भाषेसाठीही काही उपकारक गोष्टी घडतात. या लेखातच असे अनेक मूळ इंग्रजी शब्द आणि संकल्पना आहेत, ज्या लेखिकेने समर्पक प्रतिशब्दांनी परिभाषित केल्या आहेत. उदा. न्यूरॉलजिस्ट, अब्सॉल्यूशन-रीडिम्प्शन, रेपर्त्वार आणि अनेक. याच अंकात आशुतोष पोतदार यांचा १९३६साली प्रकाशित झालेल्या 'मराठी गाईड'वरील एक लेख आहे, तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

आजच्या काळात आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि झोपलेले असतानाही असंख्य प्रकारच्या तंत्राधारित अवजारांनी-इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सनी वेढले गेलेलो आहोत. डिजिटल क्रांतीमुळे कॅमेरा हातोहात पोहोचला, फोटोंवर संगणकाद्वारे प्रक्रिया करता येते, ते साठवता येतात. सिनेमे आता करंगळीएवढ्या पेन ड्राईव्हमध्ये किंवा रुपयाच्या नाण्याएवढ्या मेमरी कार्डवर घेऊन संगणकावर किंवा टीव्हीच्या पडद्यावर पाहाता येतात. संगीतही अशाप्रकारे साठवता येते. जुनी पुस्तके, आदिवासीचे संगीत यांचे डिजिटायजेशन करता येते, पुस्तकेच्या पुस्तके अशाप्रकारे उपलब्ध होऊ शकत आहेत. वेगवेगळ्या औद्योगिक उत्पादनांशिवाय कला, साहित्य, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रमाणात तंत्रज्ञानाने आज अवकाश व्यापलेला आहे.

आंतरजालावर, सामाजिक माध्यमांवर कोट्यवधी लोक चिकटलेले असल्याचे आपल्याला दिसते. हे लोक आयतेच अनेक गोष्टींचे-कल्पनांचे-जीवनशैलींचे-उत्पादनांचे सहजपणे ग्राहक (कन्झ्युमर) आणि वाहकही होत असतात. सोशल मिडियावर कळते की अमुक देशात केवळ सोशल मिडियाद्वारे क्रांती घडली आहे. पण हे खरे तर आभासी जगातले आभास असतात. आपल्याला हे माहीत आहे की ज्या राष्ट्रांत अशी क्रांती झाली असे आपल्याला कळले, तीच राष्ट्रे नंतर ३-४ वर्षांत भयानक हुकूमशाहीच्या कचाट्यात सापडलेली आहेत. कदाचित हुकूमशाहीला समर्थन म्हणूनच असे तात्पुरते-खोटे-खोटे लढे उभारण्याची प्रेरणा देऊन लोकांना एकप्रकारे डिवचले जाते अशी शंका घ्यायला जागा आहे. सभ्यता कशाप्रकारे तंत्रज्ञानाचेच एक लहानसे अंग बनतात त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी समजून घेणे म्हणूनच महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानापासून जे काही फायदे मिळतात ते साईड इफेक्ट्स असतात. तंत्रज्ञानाचा गोड चेहरा त्या साईड इफेक्ट्सचा असतो. जास्तीत जास्त समाज त्यात गुंतत जातो. तेच व्यसन होते. तंत्रज्ञान पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते तेव्हा ते सपाटीकरण करत आणत असते. जगभर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अर्थकारणाच्या सोयीसाठी एकच भाषा असणे आवश्यक ठरते. व्यापार, उद्योग, नफ्यासाठी ते सोयीचे असते. म्हणून हजारो भाषा संपवण्याचे पद्धतशीर कारस्थान यातून रचले जाते. सुरुवातीला अंक किंवा आकडे इंग्रजीत शिकण्याचा आग्रह धरला जातो. मग स्थानिक भाषेत इंग्रजी शब्द वापरात वाढवत नेण्याच्या पद्धती अंमलात येतात. तशा जाहिराती लिहिल्या जातात. अख्ख्या वाक्यात एखाद-दुसराच स्थानिक शब्द वापरण्याची सवय लावली जाते. मग जगण्याची शैलीपण तशीच होऊन जाते. भाषेचे हे क्रिओलायझेशन हळूहळू ती भाषा नष्ट करत नेते. स्वैपाकघरातले, शेतीतले, ग्रामीण संस्कृतीतले, स्थानिक भाषेतले शब्द कमी-कमी होत जातात. संवादातले स्थानिक भाषांमधले शब्द कमी होत जातात. संवादाचा अवकाशही कमी कमी होत जातो. कारण भोगलोलुप व्यक्तिवादी समाजात टीव्ही-इलेक्ट्रॉनिक माध्यमे - चंगळीचे विविध मार्ग यांमुळे त्याचा संकोच होत गेलेलाच असतो. याला अर्थात दुसरी बाजूही आहे आणि संतुलितपणे तंत्रज्ञानाचा उपयोग व्यापक उन्नत होण्याच्या दृष्टीने करून घेणेही शक्य आहेच. पण त्या शक्यतेची वाट निसरडी आहे हे लक्षात ठेवायला हवे.

आंतरजालीय नियतकालिके सुरु होऊन बराच काळ लोटलेला असूनही आज आपण अद्याप एका बदलत्या सांध्यावर उभे आहोत असेच चित्र जगभर दिसते. याविषयी विविध लेखक लिहित आहेत. प्रिंट की डिजिटल? असा तो प्रश्न आहे. वस्तुतः छापील स्वरुपातले नियतकालिकाचे रूप सोडवत नाही आणि नवे माध्यम अटळ झालेले असूनही स्वीकारवत नाही अशी स्थिती दिसते. पेपर डार्ट्स आणि डायाग्राम या नियतकालिकांच्या संदर्भात लिहितांना टॉम मॅक्अलिस्टर यांनी हा मुद्दा मांडला आहे. संपादकीय बैठकीत बॅरलहाऊस हे नियतकालिक डिजिटल करावे असा प्रस्ताव त्यांनी मांडल्यावर सगळे खवळले आणि तो बेत हाणून पाडल्यावर आठवड्याभरानंतर सगळ्यांना छापील प्रकाशनातल्या अडचणीही लक्षात येऊ लागल्या.

परदेशातली बरीचशी वाङ्मयीन नियतकालिके विद्यापीठांतील भाषाविभागाच्या आश्रयाने प्रकाशित होत आहेत. त्यांना कार्यालये, मनुष्यबळ, सोयीसुविधांसाठी फार झगडावे लागत नाही. यात येल रिव्ह्यू, कोलोरॅडो रिव्ह्यू, मिशिगन क्वार्टर्ली रिव्ह्यू, व्हर्जिनिया क्वार्टर्ली रिव्ह्यू, आयोवा रिव्ह्यू, जॉर्जिया रिव्ह्यू अशी अनेक महत्त्वाची नियतकालिके आहेत.

आंतरजालावरील नियतकालिकांत प्रकाशित होणारे कथात्मक साहित्य, समीक्षा, लेख, कविता असे तेच साहित्य असते जे पारंपरिक छापील नियतकालिकांतून प्रकाशित होते. पण यात आता ध्वनिफिती आणि चित्रफितींचा समावेश करता येऊ लागला आहे. त्याचबरोबर ब्लॉग्ज, ट्विटर फीड इ. ची जोड असल्याने लिखित मजकुराचे दृकश्राव्य विश्लेषण करता येणे शक्य झाले आहे.

न्यूयॉर्कर आणि अटलांटिकसारखी मोठी नियतकालिके अद्यापही प्रकाशित होत आहेतच. पण पश्चिमेतल्या अनेक देशांत ऑनलाईन नियतकालिकांचा व्यवहार हा अद्यापही गुंतागुंतीचा आहे. बरीचशी नियतकालिके ऑनलाईन सुरु झालेली असली तरी ब्लॅकबर्डसारखे काही त्यांच्या ऑनलाईन प्रकाशनांचे छापील खंडही ते उपलब्ध करून देत आहेत. वार्षिक खंड असे उपलब्ध होऊ शकतात. तर टिन हाऊस, अग्नी, केन्यॉन रिव्ह्यू आणि प्लोशेअर्ससारखी अनेक विख्यात नियतकालिके जी छापील स्वरुपात उपलब्ध होतात, ती आता यशस्वीपणे इलेक्ट्रॉनिक स्वरुपातही उपलब्ध होऊ लागली आहेत. पन्नास महत्त्वाची नियतकालिके पाहिल्यास त्यातली निम्मी अद्याप ऑनलाईन उपलब्ध नाहीत. त्यात पॅरिस रिव्ह्यू, ग्रान्टा, अमेरिकन पोएट्री रिव्ह्यू, येल रिव्ह्यूसारखी नियतकालिके आहेत. ती छापील आवृत्तीतच मिळवावी लागतात आणि आपल्याला ती मिळणे सहजतेने शक्य होत नाही. ब्रिजिड ह्यूजेस या पॅरिस रिव्ह्यूच्या संपादकीय मंडळात होत्या. त्यांनी पब्लिक स्पेस नावाचे ऑनलाईन नियतकालिक २०१०साली सुरु केले आहे. हे एक महत्त्वाचे वाङ्मयीन ऑनलाईन नियतकालिक आहे.

वाचकांचा लेखनावरचा प्रतिसाद, लेखकांना दिले जाणारे मानधन आणि खर्चाची तोंडमिळवणी (ती कमी प्रमाणात असली तरी) या बाबतीतला अनुभव दोन्ही प्रकारच्या नियतकालिकांसाठी जवळपास सारखा आहे. आंतरजालावर ते सहज आणि केव्हाही उपलब्ध असणार आहेच या विचारातून वाचकांचा प्रतिसाद मंद होतो. असा अनुभव आहे. ऑनलाईन प्रकाशित साहित्याबाबतीतही माझादेखील हाच अनुभव आहे - बारा वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या कविता अद्याप आंतरजालावर सापडतात. त्यावर कुठल्या तरी विदेशी वाचकाचा नव्यानंच प्रतिसाद दिसतो. आंतरजालावरील इंग्रजी-हिंदी नियतकालिकांत माझे लेखन प्रकाशित झाले आहे आणि तो अनुभव छापील माध्यमात लेखन छापले जाण्यासारखाच आहे.

येते दशक बहुभाषिकत्त्व वाढवणारे असेल. अनेक भाषांच्या संपर्कामुळे बहुभाषिक संस्कृतीसंपर्क शक्य होत चालल्याने माहितीच्या आणि त्याद्वारे आकलनाच्या कक्षा रुंदावतील हे आहेच, परंतु छिन्नमनस्क होत चाललेल्या समाजातून येणारा वाचकही विखुरलेला असणार आहे. विविध क्षेत्रांत काम करणारा आणि वाचनाची भूक असलेला तरूणवर्ग साहित्य शोधत राहाणार आहेच आणि अमर्याद पसरलेल्या आंतरजालीय विश्वात निके, अस्सल साहित्य शोधणे हे त्याच्या वाचक म्हणून कमावलेल्या कर्तबगारीवर आणि क्षमतेवरच अवलंबून असेल.

या नव्या माध्यमातल्या स्थित्यंतरातून काय घडेल याचे उत्तर - काहीही घडू शकेल असेच आहे. वाचक-लेखक परस्परांसाठी अदृश्य राहाण्याची अधिक शक्यता आहे. आंतरजालीय माध्यमांच्या उपयोजनातच लोकशाहीकरण अनुस्युत आहे. कोणत्याही वाचकाला माहितीचे, साहित्याचे खजिने प्रवेशसुलभ झाल्याने मक्तेदारीतून येणारा माज कमी होईल पण तरीही ज्ञानाच्या क्षेत्राच्या चाव्या विशिष्ट वर्गापुरत्याच राहतील. यातून अंतिमतः नव्या वाचकांना काय हवे आहे? या प्रश्नाऐवजी साहित्याच्या भल्यासाठी चिंता वाहाणाऱ्यांनाच धुरिणत्त्व घेऊन नियतकालिकांचे भवितव्य ठरवावे लागेल.

छापील वाङ्मयीन नियतकालिकांचे भागधेय जे आहे तेच आंतरजालीय नियतकालिकांचेही असणार आहे. विविध संपादकांचे लेख, मुलाखती वाचल्यावर लक्षात येते की संपूर्ण अंक वाचले जात नाहीत. वाचकांकडून शिवाय छापील आवृत्तीचा आग्रह असतोच. गुंतवणूक कमी असल्याने स्पर्धा प्रचंड आहे. नियतकालिकांचे भवितव्य हे मुद्रणव्यवहाराशी निगडित आहे. या माध्यमातील नियतकालिकांसाठी संकल्पन-मांडणीच्या बाबतीत मात्र अपार शक्यता आहेत. त्याचा वापर वाढत जाणार आहे. भविष्यातील लेखक हे भौगोलिकदृष्ट्या विखुरलेले लोक असणार आहेत. ते आपापल्या स्थानांवरून ब्लॉग्ज-लेखन करतील आणि लोकशाहीत अपेक्षित असलेली स्वायत्तता उपभोगतील. त्यामुळे यापुढे बदलत्या काळात स्थानमाहात्म्य कालबाह्य होईल. काळ आणि अवकाशाशी सेंद्रीयरित्या जोडले जाण्यानेसुद्धा साहित्यात फरक पडत असतोच. तो धूसर होत जाण्याच्या शक्यता दिसतात.

तंत्रज्ञानाच्या सुविधा, एकविसाव्या शतकात 'दिसण्याची' प्रबळ होत गेलेली प्रेरणा, माध्यमांचे लोकशाहीकरण आणि त्यात सर्वांसाठी सहज शिरकाव करता येण्याची सोय या गोष्टी लक्षात घेतल्या तर अॅन्डी वॉरहॉल यांचे अवतरण इथे शेवटाला उदधृत करता येईल आणि ते असे आहे : इन द फ्युचर एव्हरीवन विल बी वर्ल्ड फेमस फॉर फिफ्टीन मिनिट्स.

***
(दि. ७ जानेवारी २०१७ रोजी 'अनुष्ठुभ'द्वारा आयोजित 'मराठी वाङ्मयीन नियतकालिके : सद्यस्थिती आणि भवितव्य' या परिसंवादात वाचलेल्या निबंधाचे आधारटिपण)
गणेश विसपुते

संदर्भ : १ व २ उम्बेर्तो इको, ज्यां-क्लॉद कॅरिए, धीस इज नॉट द एंड ऑव्ह द बुक, व्हिन्टेज बुक्स, लंडन, २०१२

AsoCover
field_vote: 
0
No votes yet

फारच उत्तम लेख; फक्त एक शंका (...) , या नीतीन रिंढे यांच्या मताशी (ललित, मे, १९१३) .." यात १९१३ हे चुकून झालं असावं. तुम्हाला कदाचित १९९३ म्हणायचं असावं !
हाकारा चं एकूण स्वरूप , संकल्पना आणि मांडणी नवीन काळाला अनुसरून फारच अप्रतिम आहे यात शंकाच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

नीतीन रिंढे यांच्या मताशी (ललित, मे, १९१३) .." यात १९१३ हे चुकून झालं असावं. तुम्हाला कदाचित १९९३ म्हणायचं असावं !

दुरुस्ती केली आहे. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा पुन्हा वाचावासा वाटणार लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.