आमचं बायोमेट्रिक अस्तित्व!

संकल्पना

आमचं बायोमेट्रिक अस्तित्व!

- उसंत सखू

घड्याळाचा शोध हा काळाचा मुलाहिजा न ठेवणाऱ्या आम्हां सरकारी कर्मचाऱ्यांचा सर्वांत मोठा शत्रू आहे.

'काऽऽळ देहासी आला खाऊ ,आम्ही आनंदे नाचू गाऽऽऊ' असं सुरेश वाडकरांनी ही व्यथा अधोरेखित करताना म्हटलं आहे. म्हणजे काळानं त्रास देण्याआधीच आम्ही नाचून गाऊन त्याचं काळं हरण करू! वक्तशीरपणा फाट्यावर मारत वर्षानुवर्षं आपली सरकारी कार्यालयं सुशेगाद असतात. भारतीय प्रमाण वेळेनुसार साडेदहा वाजता याचा अर्थ, 'साडेदहा नंतर जेव्हा जमतंय तेव्हा' असाच होतो, हे सरकारी कर्मचाऱ्यांना जन्मतःच ज्ञात असतं. कार्यालयाची वेळ साडेदहा ते साडेपाच आहे हे निव्वळ इतर लोकांना तिथे किती वेळ प्रतीक्षा करण्याची दैनिक संधी उपलब्ध आहे यासाठी असते. कार्य सिद्धीस कसं आणि केव्हा जाईल याचा रहस्यभेद करणं असंभव आहे.

खरं तर काळ अनंत आहे आणि आशा अमर!

'देह देवळात आणि चित्त खेटरात' याचा उलटाच अद्भुत प्रत्यय नागपुरात ए. जी. ऑफिसात लोकांनी साक्षात अनुभवल्याचा इतिहास आहे. कोट/टोपी/छत्रीरूपी खेटरं खुर्चीला अडकवून, काही कर्मचारी सदेह जोडधंदा रूपी देवळात गुंग असल्याच्या अनेक अविश्वसनीय कथा आहेत. कार्यालयातल्या रिकाम्या खुर्च्या या चित्तपाखरूचं तरल अस्तित्व बाळगून असतात; याची रुक्ष, व्यवहारी मानवाला कल्पनाच नसते. एका महापुरुषानं तर ए. जी. ऑफिस आणि स्टेट बँक अशा दोन्ही ठिकाणी तहहयात नोकरी करून दोन्हीकडून पेन्शन मिळवून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. घरी गडगंज श्रीमंत असलेल्या एका ऑफिसरनं मुंबई एअरपोर्टवरच्या नेमणुकीत, आपल्या पगारातली अर्धी रक्कम देऊन, आयुष्यभर दुसऱ्या एका ऑफिसरकडून आपलीही ड्युटी करवून घेतली. कालांतरानं ते उघडकीस आल्यानं तो सस्पेंड झाला आणि नंतर प्रकरण मिटवून निवृत्ती घेतली.

तीनदा लेट मार्क मिळाला की एक कॅजुअल लीव्ह कापून घेण्यात येईल या नियमाचा विपुल उपयोग जुन्या कथा / कादंबऱ्यांतून आढळून येतो. या गोग्गोड कथा, कादंबऱ्यांतली नखरेल नायिका नेहेमी लेट मार्क टाळण्यासाठी बॉससमोर मोहक विभ्रम करून त्याला कर्तव्यच्युत करते आणि सहकर्मचाऱ्यांच्या असंतोषाची जनक बनते. कर्तव्यकठोर अधिकारी हा गरीब बापड्या कर्मचाऱ्याच्या जीवनातला खलनायक बनून जातो. माजोरडे कर्मचारी वठणीवर आणण्यासाठी मेमो वगैरे निरुपद्रवी हत्यारं अधिकाऱ्याकडे उपलब्ध असतात. आमची एक सहकारी मेमो मिळाला की, 'लगता है इनके पास कागज ज्यादा हो गये है' म्हणून तो फाडून कचऱ्याच्या टोपलीत भिरकावून द्यायची.

उशिरा येणं, अधिकाऱ्याशी लाडीगोडी/चमचेगिरी करत, कार्यालयीन वेळात खाजगी कामं उरकणं, सिनेमे पाहणं अशा कामात बिलंदर कर्मचारी प्रवीण असतात. ते न जमणारे लोक चरफडत बसतात. सरकारी कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर व्हावं म्हणून प्रयत्नशील असलेले तुरळक अधिकारी कालांतरानं थकून प्रवाहपतीत होतात.

ही ऐतिहासिक परंपरा खंडित करण्याचा विडा आधुनिक तंत्रज्ञानानं सहज उचलून सरकारी कर्मचाऱ्यांचं जीवन यातनामय करून टाकलं आहे. बऱ्याच ठिकाणी बायोमेट्रिक ठशांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची जबाबदारी आल्यानं संकटाची चाहूल लागली होती. तेव्हा तर अस्मादिकांना दहा एकसारख्या सह्या करणंसुद्धा जमत नसल्यानं आर्थिक कारभारांत अडचणींचा सामना करावा लागत होता. अमेरिकेचा व्हिसा काढताना ते मेलं यंत्र बोटांचे ठसेसुद्धा घ्यायला नकार द्यायचं. नैराश्यानं जेव्हा माझ्या अस्तित्वाबद्दल खात्री वाटेनाशी झाली तेव्हा एकदाचे ठसे उमटले. आधार कार्ड काढतानाही ठसे उमटेनात. तिकडे रहस्यमय कादंबऱ्या आणि पोलीस कथांमध्ये गुन्हेगार बोटांच्या ठशांनी पकडले जात होते आणि इकडे अस्मादिक ठश्याच्या यंत्रांवर बोटं चेपून हैराण! या तशा अपवादात्मक घटना असल्यानं चिंतेचं कारण नव्हतं. दैनंदिन जीवन सुखात, समाधानात चाललं होतं.

शेवटी सुखाचा अंत झालाच! आमच्या कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य होणार असल्याचं कळताच माझी बोटं घामेजून थरथरू लागली. अखेर लोएस्ट कोटेशनमधून, नियमानुसार तो छोटा बायोसैतान आला आणि माझं अस्तित्व नाकारू लागला. संबंधित तंत्रज्ञानं प्रयत्नांची पराकाष्ठा करून माझ्या बोटांना यंत्रात कैद केलंच. आता नुसतंच वेळेवर येण्याजाण्याचं संकट नव्हतं, तर माझं बायो-अस्तित्व सिद्ध करण्याचं प्राणांतिक आव्हान दिनरात मला छळू लागलं.
पहिल्या दिवशी वेळेआधीच पोचून मी यंत्रावर बोट ठेवले तर अनपेक्षितपणे माझी हजेरी लागून माझा जीव भांड्यात पडला. नंतर कधी लगेच हजेरी लागायची तर कधी कधी प्राण गेला तरी यंत्रात बायोदेह हजर व्हायचा नाही. या रोजच्या बोटचेपू संकटानं जीव झुरणीस लागला. माझ्यासारखी आणखीही काही मंडळी हतबल झालेली पाहून, त्याच तंत्रज्ञानं अतीव करुणेनं, ठसा बायपास करत कोडनंबर दाबून हजेरी लावायची सुवर्णसंधी आम्हांला दिली. त्याचा अतोनात फायदा घेऊन बिलंदर मंडळी विश्वासू सहकाऱ्याला "मेरा ढमुक नंबर दबा देना" सांगून सुशेगाद जेवून, पानबीन खाऊन ऑफिसात येऊ लागली. कधी कधी दुपारीच फरार होऊन घरी जातानाचा बायोदेह दुसऱ्याच्या हवाली करून जायचे. कधीतरी वीज नसली आणि बॅटरीही संपली तर यंत्र बंद पडून आणखी दिलासा मिळायचा.

कोणीही कोणालाही जुमानेनासे झाले. अहाहा! निर्मल आनंद!

हे निराधार बायोजीवन सुखदायक वाटू लागलं असतानाच अचानक "आधार लिंक्ड बायोमेट्रिक यंत्र" लावण्याचे त्सुनामी फतवे दिल्लीहून निघाले. सर्वत्र निराशेचे कृष्णमेघ दाटून आले. मुरलेल्या अधिकाऱ्यांनी टंगळमंगळ करत यंत्राची स्थापना शक्य तितकी पुढे ढकलली. नाईलाज झाल्यावर अखेर आधार लिंक्ड बायोमेट्रिकची स्थापना झाली. आता रोजच आधारचा आठ आकडी नंबर दाबून मग बोटाचा ठसा देऊन, थेट दिल्लीला मुख्यालयात हजेरी लागणार होती. आधी हजेरीपुस्तक अनिवार्य नसलेले अधिकारीही आता आमच्यासोबत खजील चेहेऱ्यानं त्या यंत्रापुढे रांगेत उभे राहू लागले. वायफायच्या स्पीडवर आमचा जीव टांगू लागला. लोकांना नंबर आठवायला वेळ लागला की रांगेतल्या बाकीच्यांना ऊर्ध्व लागत असे. ठसे उमटविण्यात असमर्थ मंडळींना टोमणे मारून हिंस्त्र गिधाडं रोजच त्यांचे लचके तोडू लागली. संध्याकाळी घरी जातानाही रोजचा समरप्रसंग!

एकदा संध्याकाळी एका बिलंदर माणसाची हजेरी लागल्यावर नेट स्लो झालं आणि कोणाचीही हजेरी लागेना. "जो काम करते है उन्ही की हाजरी लगती है लोगो, जिस की नही लगी वो घर जाओ और कल से काम पर मत आना बे" असे उकळ्या फुटून तो बोंबलू लागला. हजेरी लागत नसल्यानं हवालदिल झालेले सगळेच कानकोंडे झाले. मी त्याला म्हटलं, "देखो महोदय, मेरी सुबह की हाजरी लग चुकी है और अब तो मै रिटायर होने पर ही यहां से जाने कि एंट्री करुंगी, लेकिन आप रोज आने-जाने का काम जारी रखना।" मग तो हसू लागला. रोज सकाळ, संध्याकाळ किमान अर्धा तास लोकं अस्तित्वाची "आधारभूत" लढाई आशाळभूत होऊन लढू लागले. आज नेटकृपा होईल का; यंत्रासमोर किती वेळ आराधना केल्यास फलप्राप्ती होईल; याबद्दल चर्चा रंगू लागल्या. काही सेकंदांत हजेरी लागणारा मनुष्य लॉटरी लागल्यागत हरखून जाऊ लागला. बाकीचे असूयेनं त्याच्याकडे बघू लागले. या मशीनमध्ये पाणी टाकून बंदच पाडतो असं एक जण चिडून म्हणू लागला. इतरांच्या मनातही तसलेच विचार होते. आता आमच्या ऑफिसमध्ये आपलं बायोअस्तित्व सिद्ध करण्याशिवाय कुठलंच महत्त्वाचं काम उरलं नाही.

एकच छंद एकच ध्यास! अपने बायोअस्तित्व का अहसास!

टेक्नोमंद मंडळी हजेरी लागली नाही तर कासावीस होऊन कुठलीही बटनं दाबू लागली. मग प्ले स्टोअर आणि वाट्टेल त्या खिडक्या उघडून मनोरंजनाचा सुकाळू झाला. असे प्रसंग वारंवार उद्भवून एकदाचं ते यंत्र बंद पडलं आणि आनंदाची लाट उसळली. अधिकाऱ्यांची मात्र धाबी दणाणली, कारण त्यांना दिल्लीला स्पष्टीकरणं द्यावी लागणार होती. असे नाट्यमय प्रसंग उद्भवून कार्यालयात चुरस कायम राहात होती.

विस्मयाचा कडेलोट होऊन मला मात्र यावेळी कसलाच त्रास होईना!

कसा कोण जाणे पण साक्षात आधारदेव प्रसन्न होऊन, त्याच्या असीम कृपेनं माझी रोजची हजेरी बिनबोभाट सुरू झाली आणि मला आयुष्य एकदमच सुंदर वाटू लागलं. माझ्या बायोअस्तित्वाचा प्रश्न तात्पुरता तरी सुटल्यानं, पुढचं तांत्रिक संकट येईपर्यंत मी माझ्या कार्यालयात काळं हरण करीत सुखाने जगू लागले.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

मासा पाणी केव्हा पितो हे सांगण्याइतकंच सरकारी माणूस काम किती आणि केव्हा करतो सांगणं अवघड आहे.
सरकारी पद्धतशिर ढिसाळपणा लेखात नेमका आला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0