Skip to main content

मिलिन्द पदकींच्या कविता

ललित

मिलिन्द पदकींच्या कविता

- मिलिन्द

मागोवा

छोट्या कुत्र्याचा मृत्यू, गाडीचा अपघात,
आईचा कॅन्सर, गुलाबाचे फुलणे,
तलावातील लहरी हे सर्व
प्रकाशाबरोबरच येते ना?
(एक खरीदल्यास दोन मोफत?)
प्रकाशाची आस कोणाला होती? याबद्दल
दु:खी होऊन कसे काय चालेल?
बारीक तिरीप दिसत होती तिचा माग
घेत आलास , एक दिवस जाशीलही ,
त्याच तिरिपेच्या मागोव्यात! तुला दोष देत
नाही आहे मी, तुलातरी
दुसरे काय
शक्य
होते?

---

हे असले 'डिझाईन'?

काही पेशी एकत्र आल्या तर म्हणे
इतरांना सहज मारू शकतात, म्हणून
२३ अब्ज पेशी गोळा करायच्या? त्यांच्या
खाण्यापिण्याचे काय? तर म्हणे मध्यभागी
एक पंप असेल, जो ऐंशी - नव्वद वर्षे सतत
काम करेल! (वाट बघा!), त्याच्या या सतत-कामुक पेशी
म्हाताऱ्याही होणार नाहीत आणि मरणारही नाहीत
(वा! अजून काही?), सर्वांचे एक नियंत्रणकेंद्र
सर्वात वरती असेल, त्यातल्याही पेशींचे
नूतनीकरण जवळपास नसेलच! (हे म्हणजे थोरच!)
सर्व पेशींच्या वाट्याच्या प्राणवायूमधला
वीस टक्के हे दीड किलोचे 'केंद्र' एकटे खाईल ,
आणि तो पोचविण्यात जरा हयगय झाली,
चार मिनिटेही, तर बंदच पडेल.
अशा 'शरीरा'तली नव्वद टक्के जनुकेही दुसऱ्याचीच
- इतका शरीर-संभार गोळा न केलेल्या स्मार्ट "जंतूंची"
जे आपल्या मनाप्रमाणे वागणार, ठरलेली
संयुगे "मानवी" शरीराला देतीलच असे नाही,
मग 'रोग'च 'रोग'! 'स्वतः'च्या पेशींवरचे नियंत्रणही
तसे डळमळीतच! प्रत्येक पेशी चान्स मिळताच अनियंत्रित वाढणार,
म्हणून मग एक पोलीस पेशीदल अशा
नाठाळ पेशींना मारत राहण्यासाठी ठेवलेले.
'म्हातारपणा'त तेही निकामी होत जाणार!
इतरांशी संवाद साधायला म्हणे वर एक कातडी
'तोंड', त्यातून चित्रविचित्र आवाज काढायचे!
समोरच्याला काय 'कळले' आहे हे कळायला
मार्ग नाही! फक्त अपयशास आमंत्रण !

देवा रे, हे असले 'डिझाईन' जर मी तुझ्याकडे
विद्यार्थी म्हणून घेऊन आलो असतो,
तर तू मला पास केले असतेस काय?

---

"अमेरिकन" म्हणविण्याचा अर्थ

त्या रात्री आठच्या ठोक्याला न्यूयॉर्कच्या मेहेरबान पोलीस कमिशनर
साहेबांनी चंद्र ऑन केलेला मला जर्सीतल्या टेकडीवरून दिसला. कबाब
आणि मधाळ काजूंच्या त्या तरंगत्या शहराच्या गल्ल्या महातेजाने उजळल्या,
मार्टिनी ग्लासेस वर लिपस्टिक झळकू लागली,
गगनचुंबी बुटांच्या जाहिराती पेटून उठल्या,

पलीकडेच जर्सीच्या बंदिवासात तेवीस मुसलमान, दोनेकशे
मेक्सिकन्स, चाळीस पश्चिम आफ्रिकी आणि हो, दोनचार चिनीसुद्धा, त्या जादुई
शहरात झाडूवाल्याचे काम करण्याच्या स्वप्नासाठी झुरत होते

आणि मी अवघ्या बारा डॉलर्स टोलमध्ये
तो लखलखीत पूल ओलांडून शहरांतल्या पार्किंगला
शिव्या घालत फिरू शकत होतो.

---

जगासाठी 'यश' कोणते?

कवितेला दहाबारा
घराला पण 'लाईक्स' दोनशे
तेव्हा जरा विचार कर
जगासाठी 'यश' कोणते?

निम्मा पगार बँकेमध्ये
जीव खाऊन वाचवत रहा
डबा घेऊन जाच रोज
हॉटेलवरती खर्च महा!

असली म्हणजे बास झाली
एक पॅन्ट गांxवर
दुसरी धुवून वाळत घाल
पॅन्ट आपली दांडीवर!

मानेवरती खडा ठेवून
मारवाड्याची नोकरी कर
बायकोलाही बँकेत लाव
सेव्हिंग्समध्ये मोठी भर!

सोड आपला फाटकेपणा
वीण आयुष्याची सांध
आयुष्यात एकदातरी
तू छानसे घर बांध!

---

भाषेचा जन्म

मासे, लहान साप, बेडूक, कासवे
फुलपाखरे, गवत, झुडुपे, (मोठे वृक्षसुद्धा),
कोट्यवधी वर्षे आपल्या वेदना, उपासमार,
थंडी : करू शकत नव्हती कशाचेच उच्चारण.
"हे सर्व 'त्याला' सांगता आले तर
किती बरे होईल, करीलसुद्धा तो काहीतरी
आपल्यासाठी, परम दयाळू असणारेय तो,
आपल्याला घडविणारा!

भाषा घडतच नव्हती, युगानुयुगांच्या
प्रयत्नांनी जग थकून गेले होते.
अथक प्रयत्नांतून मानवाचा जन्म झाला..
साताठ वर्षांची पोरे काठीने सपासप कोवळी झुडुपे तोडू लागली,
बेडकांना यातना देऊन मारू लागली,
कुत्र्यांना दगड घालू लागली,
लवकरच ती म्हणायला शिकली
"भेंचोत, मादरचोत, तुझ्यायला... "
- भाषेचा जन्म झाला होता!

विशेषांक प्रकार