Cold Blooded - ४

रोहित सिमल्याला पोहोचला तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. सिमल्याला पोहोचल्यावर त्याने ताबडतोब रोशनीचं कॉलेज गाठलं. जीन्स - टी-शर्ट आणि पाठीवर मोठी सॅक अशा अवतारात असलेला हा तरुण पोलीस अधिकारी असेल यावर कॉलेजच्या स्टाफचा आधी विश्वासच बसेना. रोहितने आपलं आयकार्ड त्यांच्यासमोर ठेवल्यावर अखेर त्यांची खात्री पटली! रोशनी द्विवेदीबद्दल त्याने चौकशी करताच तिचं सर्व रेकॉर्ड त्यांनी त्याच्या पुढ्यात ठेवलं. द्विवेदींच्या घरी मिळालेल्या सर्टीफिकेट्सप्रमाणे रोशनीने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं, पण तिचं कॉलेजमधलं रेकॉर्ड काही वेगळंच सूचित करत होतं. कॉलेजच्या रेकॉर्डप्रमाणे रोशनीने केमिस्ट्रीमध्ये बॅचलर्स आणि मास्टर्सची डिग्री मिळवली होती! आपल्याला मिळालेली ती सर्टीफिकेट्स नकली होती याबद्दल आता रोहितला कोणतीच शंका उरली नव्हती. त्याने कॉलेजच्या स्टाफसमोर ही नकली सर्टीफिकेट्स ठेवताच त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला! कॉलेजच्या रेकॉर्डवर असलेला रोशनीचा फोटो पाहिल्यावर तो कमालीचा गंभीर झाला. आपला अंदाज अचूक असल्याची त्याची खात्री पटली होती....

महेंद्रप्रताप द्विवेदींबरोबर त्यांची मुलगी रोशनी म्हणून मुंबईला गेलेल्या श्वेताचा त्यांच्याशी काहिही संबंध नव्हता!

रोशनीच्या रेकॉर्डवर तिचा सिमल्यातला आणि दिल्लीतला पत्ता नोंदवलेला होता. ती कॉलेजपासून जेमतेम दहा मिनिटांवर असलेल्या हॉस्टेलमध्ये राहत होती. कॉलेजमधून बाहेर पडून रोहितने ते हॉस्टेल गाठलं आणि तिथल्या रेक्टरची गाठ घेतली. रेक्टर कोणी मिसेस बहुगुणा म्हणून होत्या. त्या साठीच्या आसपास असाव्यात. चेहर्‍यावरुन त्या भलत्याच कठोर आणि करारी दिसत होत्या. रोहित एक पोलीस अधिकारी आहे हे कळल्यावर त्या अधिकच गंभीर झाल्या, पण त्याने रोशनीचा फोटो काढून त्यांच्यासमोर ठेवताच एकदम ट्रान्स्फर सीन व्हावा तसे त्यांच्या चेहर्‍यावरचे कठोर भाव लुप्त झाले.

"ही रोशनी आहे मि. प्रधान! रोशनी द्विवेदी!" बहुगुणाबाई स्मितं करत म्हणाल्या, "खूप गोड मुलगी होती ती! गेल्या सात वर्षांपासून ती आमच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. सगळ्यांशी मिळून-मिसळून राहणारी, कोणाशीही चटकन मैत्री जोडणारी आणि कोणाच्याही मदतीला कायम तत्पर असणारी! आपला अभ्यास सांभाळून हॉस्टेलच्या कामातही ती मला खूप मदत करत असे. गेल्या तीस वर्षांत इथे इतक्या मुली आल्या आणि गेल्या, पण त्यातल्या एकाही मुलीला तिची सर नव्हती!"

बहुगुणाबाई रोशनीच्या आठवणीत हरवून गेल्या होत्या. मग एकदम भानावर येत काळजीच्या सुरात त्यांनी विचारलं,

"मि. प्रधान, तुम्ही रोशनीची चौकशी का करत आहात? इज शी ऑलराईट?"

"आय होप सो मॅडम! बरं, रोशनीच्या फॅमिलीबद्दल काय सांगू शकाल?"

"फॅमिली.... " बहुगुणाबाई खिन्नपणे हसून म्हणाल्या, "अनफॉर्च्युनेटली मि. प्रधान, रोशनीच्या नशिबात फॅमिली आणि फॅमिली लाईफ नावाचा प्रकारच नव्हता! वर्षातून एकदा तिची आई तिला भेटण्यास इथे येत असे तेवढंच! ते दहा - पंधरा दिवस सोडले तर इतर वर्षभर, हॉस्टेलमधल्या आपल्या रुममध्येच तिचा मुक्काम असे! सुट्टीच्या दिवसांत सगळ्या मुली आपापल्या गावी जात असत, पण रोशनी मात्रं तेव्हाही हॉस्टेलवरच असे! सुट्टीच्या काळातही हॉस्टेलवर राहणारी ती एकमेव स्टुडंट होती. रात्री हॉस्टेलवर तिला एकटीला झोपावं लागू नये म्हणून मग मी तिला माझ्या घरी बोलावत असे!"

"रोशनीच्या आईबद्दल - मिसेस द्विवेदींबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? तुम्ही कधी भेटलात त्यांना?"

"मिसेस द्विवेदी....." बहुगुणाबाईंच्या कपाळाला आठ्या पडल्या, "आपल्या सोन्यासारख्या मुलीला अगदी सुटीतही घरी न नेता हॉस्टेलमध्ये राहण्यास भाग पाडणार्‍या बाईबद्दल मी फारसं चांगलं बोलू शकणार नाही मि. प्रधान! तिच्या डोळ्यांवरुन ती एक नंबरची दारुडी बाई होती हे मी शपथेवर सांगू शकते. त्या दृष्टीने विचार केल्यास रोशनी तिच्याबरोबर राहत नव्हती हे बरंच होतं असं म्हणावसं वाटतं! दरवर्षी ती न चुकता रोशनीला भेटायला येत होती हे खरं असलं तरी रोशनीशी तिची वागणूक काहिशी आलिप्तपणाची होती. ती दिल्लीला परत निघाली की रोशनी खूप रडत असे. एकदा न राहवून रोशनीला घरी घेवून जाण्याविषयी मी तिला सुचवलं होतं, पण तिला घरी नेणं शक्य होणार नाही एवढंच बोलून ती निघून गेली. कदाचित तिचीही काहीतरी मजबूरी असेल... आय डोन्ट नो!"

"आणि मिस्टर द्विवेदी?"

"मि. द्विवेदी इथे कधीच आले नाहीत. मिसेस द्विवेदी नेहमी एकट्याच येत असत! त्या दोघांचा डिव्होर्स झाला होता असं रोशनीकडूनच समजलं होतं. डिव्होर्सनंतर मिसेस द्विवेदींनी मि. कौलबरोबर राहत होत्या. ते देखिल इथे कधीच आले नाहीत. कदाचित त्यांना रोशनीबद्दल फारशी काही अ‍ॅटॅचमेंट नसावी असं मला वाटतं. कदाचित म्हणूनच मिसेस द्विवेदी तिला घरी नेत नसतील... व्हू नोज?"

"आय सी! मे बी... मि. कौल इथे हॉस्टेलवर आले नसले तरी मिसेस द्विवेदींबरोबर सिमल्याला आले असतील आणि रोशनीला बाहेर भेटले असतील तर?"

"मला तसं वाटत नाही मि. प्रधान! रोशनी मला मुलीसारखी होती. मिसेस द्विवेदी तिला भेटून परत गेल्यावर त्यांच्या भेटीतला शब्दन् शब्दं ती माझ्यापाशी बोलायची. मि. कौल जर तिला भेटले असते तर तिच्या बोलण्यात तसा नक्कीच उल्लेख आला असता!"

"इंट्रेस्टींग! नाऊ टेल मी, रोशनीची एखाद्या मुलाशी खास मैत्री वगैरे होती? एनी अफेयर?"

बहुगुणाबाईंच्या कपाळाला एकदम आठ्या पडल्या.

"आय डोन्ट थिंक सो मि. प्रधान! रोशनी सगळ्यांशी मिळून - मिसळून वागणारी मुलगी असली तरी एका मर्यादेपलिकडे ती कोणालाही स्वत:जवळ येवू देत नसे. कॉलेजमध्ये बर्‍याच मुलांना तिच्यात इंट्रेस्ट होता. चार - पाच मुलांनी तिला प्रपोजही केलं होतं. अगदी डेटसाठीही विचारलं होतं, पण तिने मात्रं त्यांच्यापैकी एकालाही प्रतिसाद दिलेला नव्हता. ती खूप करीअर ओरिएंटेड होती. आपल्या पुढच्या लाईफबद्दल, पुढच्या प्लॅन्सबद्दल अनेकदा माझ्याशी गप्पा मारायची, पण त्यात प्रेम या गोष्टीला मात्रं थारा नव्हता!"

"आणि तिचे मित्रं-मैत्रिणी?"

"तिच्या ज्या काही मैत्रिणी किंवा मित्रं होते ते कॉलेजमधलेच होते. ती चटकन कोणावरही विश्वास न ठेवणारी मुलगी होती त्यामुळे बाहेर कोणाशी तिची मैत्री असेल असं मला वाटत नाही! इनफॅक्ट कोणत्याही सोशल मिडीया साईटवरही तिचा अकाऊंट नव्हता. स्वत:च्या पर्सनल लाईफबद्दल ती खूप रिझर्व्ह्ड होती. कदाचित फॅमिली प्रॉब्लेम्समुळे तसं झालं असावं!"

"ऑलराईट! रोशनी ग्रॅज्युएशननंतर हॉस्टेल सोडून कुठे गेली याबद्दल तुम्हाला काही माहित आहे? तिने काही अ‍ॅड्रेस किंवा फोन नंबर दिला होता? नंतर काही कॉन्टॅक्ट?"

"सॉरी मि. प्रधान! माझ्याजवळ तिचा अ‍ॅड्रेस किंवा नंबर नाही. हॉस्टेल सोडल्यावर तिने एकदाही कॉन्टॅक्ट केलेला नाही. ती सध्या कुठे आहे, काय करते याबद्दल तिचा कझिन आणि त्याची बायकोच सांगू शकतील!"

"रोशनीचा कझिन आणि त्याची बायको?" रोहितने आश्चर्याने विचारलं, "त्यांचा अ‍ॅड्रेस किंवा फोन नंबर आहे?"

"लेट मी चेक....." बहुगुणाबाईंनी एक रजिस्टर काढलं. दोन - तीन मिनिटं शोधाशोध केल्यावर एका पानावर बोट ठेवत त्या म्हणाल्या, "मार्चच्या ५ तारखेला शेखर द्विवेदी आणि त्याची बायको प्रेरणा रोशनीला भेटायला इथे आले होते. रोशनीने त्यांना अजिबात ओळखलं नाही. तिला त्यांच्याबद्दल काहिही माहित नव्हतं. लहानपणापासून तिने कधी शेखरला पाहिलेलंही नव्हतं, पण शेखरने मात्रं तिच्या लहानपणीच्या अनेक आठवणी सांगितल्या. रोशनीच्या लहानपणीचे अनेक फोटोही त्याच्याकडे होते. ते फोटो पाहिल्यावर रोशनीचा त्याच्यावर विश्वास बसला असावा. अर्थात तरीही आमची पूर्ण खात्री पटविण्यासाठी त्याने मिसेस द्विवेदींच्या घरी - दिल्लीला फोन लावला. मिसेस द्विवेदींना अतिशय खोकला झाला होता, त्यामुळे डॉक्टरनी त्यांना बोलण्यास सक्तं मनाई केलेली होती. त्यांच्याशी प्रत्यक्षं बोलणं झालं नाही तरी आम्ही मि. कौलकडे चौकशी केली. मिसेस द्विवेदींना शेखर नावाचा पुतण्या आहे हे त्यांना माहित होतं. शेखरला त्यांनी लहानपणी पाहिलेलंही होतं. शेखरचे वडील आणि मि. कौल एकेकाळी खूप जवळचे मित्रं होते हे देखिल त्यांनी कबूल केलं. हे सगळं ऐकल्यावर तो खरोखरच रोशनीचा कझिन शेखर द्विवेदी आहे याबद्दल आमची खात्री पटली. एवढंच नव्हे शेखर आणि प्रेरणा दोघांकडे त्यांचं पॅन कार्ड आणि शेखरकडे ड्रायव्हिंग लायसन्सही होतं!"

"आय सी.... " रोहित आता कमालीचा गंभीर झाला होता, "रोशनी हॉस्टेल सोडून कधी गेली? त्याच दिवशी?"

"नाही! रोशनीचा शेवटचा पेपर २४ मार्चला होता. त्यानंतर दोन दिवसांनी २६ मार्चच्या सकाळी शेखर आणि प्रेरणा तिला घेण्यासाठी आले होते. हॉस्टेल सोडून जाताना रोशनी खूप इमोशनल झाली होती. माझ्या गळ्यात पडून खूप रडली. ती सोडून जाणार म्हणून मलाही खूप वाईट वाटत होतं.सात वर्षांत खूप जीव लावला होता पोरीने. पण अखेर तिला तिचं स्वत:चं घर मिळालं, फॅमिली मिळाली म्हणून समाधानही वाटत होतं!" बहुगुणाबाई रोशनीच्या आठवणींनी काहिशा भावानावश झाल्या.

"आय रिस्पेक्ट युवर फिलींग्ज मॅम! शेखरचा अ‍ॅड्रेस किंवा फोन नंबर आहे तुमच्याकडे?"

बहुगुणाबाईंनी शेखरचा पत्ता आणि फोन नंबर लिहून दिला. शेखरचा पत्ता मध्य प्रदेशात जबलपूरचा होता. हा पत्ता बोगस असणार याची त्याला पक्की खात्री होती.

"रोशनी गेल्या सात वर्षांपासून तुमच्या हॉस्टेलवर राहत होती, करेक्ट? पण इथे येण्यापूर्वी ती नेमकी कुठे राहत होती याबद्दल तुम्हाला काही माहित आहे?"

"ऑफकोर्स! आमच्या कॉलेजमध्ये येण्यापूर्वी ती इथल्याच एका बोर्डींग स्कूलमध्ये होती. स्कूलमधून पासआऊट झाल्यावर तिचं फक्तं हॉस्टेल बदललं एवढंच!"

रोहितने त्या शाळेचं नाव आणि पत्ता लिहून घेतला आणि बहुगुणाबाईंचे आभार मानून तो दरवाजाच्या दिशेने निघाला. अचानक काहीतरी आठवल्यासारखा तो मागे वळला. आपल्या जीन्सच्या खिशातून काही फोटो काढून त्याने त्यांच्यासमोर धरले.

"वन लास्ट क्वेश्चन, या फोटोपैकी तुम्ही कोणाला ओळखता?"

"ऑफकोर्स! हा शेखर आहे आणि ही प्रेरणा! मि. प्रधान, हे सगळं नक्की काय सुरु आहे? तुम्ही रोशनी आणि तिच्या रिलेटीव्हजबद्दल इतकी चौकशी का करत आहात? रोशनी... " त्यांनी काळजीच्या सुरात विचारलं, "रोशनीला काही झालं तर नाही?"

"अ‍ॅज ऑफ नाऊ, आय कान्ट से एनिथिंग मॅम! थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन!"

रोहित जाण्यासाठी वळला तोच बहुगुणाबाईंना काहीतरी आठवलं.

"एक मिनिट मि. प्रधान! शेखर आणि त्याची बायको इथे आले त्याच्या तीन - चार दिवस आधी एक माणूस रोशनीचा शोध घेत सिमल्याला आला होता! इथे येण्यापूर्वी त्याने रोशनीला कॉलेजमध्ये गाठलं होतं. आपण मिसेस द्विवेदींचा भाऊ असल्याचा त्याचा दावा होता! रोशनीला तो आपल्याबरोबर दिल्लीला चलण्याचा आग्रह करत होता, परंतु त्याच्याबद्दल काहीच माहित नसल्याने तिने त्याच्याबरोबर जाण्यास साफ नकार दिला. त्याबरोबर तो एकदम भडकला आणि तिला अद्वातद्वा बोलू लागला! प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वीच रोशनीच्या मैत्रिणींनी कॉलेजच्या सिक्युरिटीला बोलवून आणलं आणि सिक्युरिटीवाल्यांनी त्याला कँपसच्या बाहेर काढलं! त्यानंतर तो तिच्यापाठी इथेही येवून पोहोचला! रोशनीने त्याच्याबरोबर जाण्यास पुन्हा नकार दिला तेव्हा 'तुझ्या बापाला बघून घेईन' अशी धमकी देत तो निघून गेला! या सगळ्या प्रकारामुळे रोशनी खूप घाबरली होती. एकतर तिला आपले वडील अजिबात आठवत नव्हते आणि त्यात हा प्रकार! सुदैवाने तो माणूस परत कधीच इथे आला नाही!"

"मिसेस द्विवेदींचा भाऊ?" रोहित चकीत झाला, "काय नाव होतं त्याचं? काही आयडी वगैरे?"

"नाव आठवत नाही मि. प्रधान, पण आडनाव वर्मा होतं! आयडी वगैरे मात्रं नाही!"

"वर्मा...." काहीसा विचार करुन रोहितने एक फोटो खिशातून काढून बहुगुणाबाईंसमोर धरला, "हा माणूस होता का?"

"नाही!" बहुगुणाबाई नकारार्थी मान हलवत म्हणाल्या, "हा माणूस नक्कीच नव्हता!"

"त्याचं वर्णन करु शकाल?"

"सॉरी मि. प्रधान!" बहुगुणाबाई दिलगीरीच्या स्वरात म्हणाल्या, "मी पुन्हा त्याला समोर पाहिलं तर कदाचित ओळखू शकेन, पण त्याचं वर्णन मात्रं करु शकणार नाही! एकतर तो सगळाच प्रकार इतका अनपेक्षित होता की मी गोंधळून गेले होते आणि त्या माणसापेक्षाही माझं रोशनीकडे लक्षं होतं!"

"नेव्हर माईंड! त्याच्याबद्दल काही आठवलं, किंवा पुन्हा कधी तो इथे आला तर मला फोन करा!"

रोहितने आपलं कार्ड बहुगुणाबाईंच्या हातात दिलं आणि हॉस्टेलमधून बाहेर पडला. एक बर्‍यापैकी हॉटेल गाठून त्याने चेक इन केलं आणि फ्रेश होऊन तो बाहेर पडला. हवेत चांगलाच गारवा होता. ऑक्टोबरचा महिना असूनही भारतात सर्वत्रं जाणवणार्‍या ऑक्टोबर हीटचा सिमल्याला मागमूस नव्हता. सकाळी दिल्लीहून निघाल्यापासून त्याने फारसं काही खाल्लेलं नव्हतं त्यामुळे त्याला चांगलीच भूक लागलेली होती. केसचे सगळे विचार बाजूला सारून त्याने आधी एक रेस्टॉरंट गाठून भरपेट जेवण उरकलं आणि वर गरमागरम कॉफी रिचवून साडेनऊच्या सुमाराला आरामात रमतगमत तो आपल्या हॉटेलवर परतला. आपली रुम गाठून त्याने आयपॅड उघडलं आणि सकाळपासून मिळालेल्या माहितीची नोंद करण्यास सुरवात केली. कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही याची खात्री पटल्यावर त्याने पुन्हा एकदा त्यावरुन नजर फिरवली.

वरळी सी फेसवर जिचा मृतदेह सापडला होता त्या श्वेता सिंगचा महेंद्रप्रताप द्विवेदींशी काहिही संबंध नव्हता!
रोशनीला सात वर्षांपासून ओळखणार्‍या रेक्टर बहुगुणांनी तिचा फोटो ओळखला नव्हता.
मेघना २५ फेब्रुवारीला मरण पावली होती, पण ही बातमी रोशनीपासून लपवण्यात आली होती.
मेघनाचा भाऊ असल्याचा दावा करणारा एक माणूस सिमल्याला आला होता, पण रोशनी त्याच्याबरोबर गेली नव्हती.
तो माणूस जवाहर कौल नव्हता कारण बहुगुणाबाईंनी फोटोवरुन त्याला ओळखलं नव्हतं!
मेघना मरण पावल्यावर सात - आठ दिवसांत - ५ मार्चला शेखर आणि प्रेरणा रोशनीला भेटायला सिमल्याला आले होते.
२६ मार्चच्या सकाळी रोशनी त्यांच्याबरोबर हॉस्टेल सोडून निघून गेली होती.
तिने हॉस्टेल सोडल्यावर पाच दिवसांनी - ३१ मार्चला महेंद्रप्रताप द्विवेदी सिमल्याला आले होते.
द्विवेदींना सिमल्याचा पत्ता जवाहर कौलने दिला होता पण तो रोशनीच्या हॉस्टेलचा पत्ता नसून वेगळाच पत्ता होता!
कौलने दिलेल्या पत्त्यावर रोशनी म्हणून द्विवेदींना श्वेता भेटली होती आणि दुसर्‍या दिवशी ते तिच्यासह मुंबईला गेले होते!

२६ ते ३१ मार्च या चार दिवसांत रोशनी सिमल्यातून गायब झाली होती आणि तिची जागा श्वेताने घेतली होती.

इतक्या वर्षांच्या अनुभवाने त्या चार दिवसांत रोशनीचं नेमकं काय झालं असावं याचा अंदाज बांधणं रोहितला अजिबात कठीण नव्हतं. श्वेता महेंद्रप्रताप द्विवेदींबरोबर मुंबईला गेली होती आणि इतक्या आत्मविश्वासाने आणि बिनधास्तपणे रोशनी म्हणून मुंबईत वावरत होती यावरुन एक गोष्टं उघड होती ती म्हणजे खरी रोशनी कधीच मुंबईला येवू शकणार नाही याबद्दल तिला पक्की खात्री होती!

याचा अर्थ सरळ होता.....

रोशनी मरण पावली होती!
तिची हत्या करण्यात आली होती!

रोशनीच्या खुनात अखिलेश आणि श्वेता हे दोघंही सामिल होते हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्टं होतं. रोशनीचा चुलतभाऊ शेखर आणि त्याची बायको प्रेरणा म्हणून रेक्टर बहुगुणांनी त्या दोघांनाही फोटोवरुन ओळखलं होतं. या दोघांप्रमाणेच जवाहर कौलही यात सामिल आहे याबद्दलही कोणतीच शंका नव्हती. पण आपण कधीच सिमल्याला गेलो नाही असा त्याचा दावा होता आणि तो कधीच हॉस्टेलमध्ये न आल्याचं बहुगुणाबाईंनीही मान्यं केलं होतं. केवळ त्याने द्विवेदींना दिलेल्या पत्त्यावर श्वेता भेटली म्हणून तो रोशनीच्या हत्येत सहभागी आहे हे सिद्धं करणं अशक्यं आहे याची रोहितला कल्पना होती. रोशनीच्या हत्येचं पाप अखिलेश आणि श्वेता या दोघांच्या माथी मारुन जवाहर सहजपणे सुटू शकत होता! त्यातच श्वेताचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचू शकणारा एक मार्ग आपोआपच बंद झाला होता!

रोहितसमोर आता दोन प्रश्नं होते....

मेघनाचा भाऊ म्हणवणारा तो माणूस कोण?
आणि
रोशनीची हत्या नेमकी कधी आणि कुठे करण्यात आली?

********

भल्या सकाळी रोहितला जाग आली तेव्हा आपण नेमके कुठे आहोत हेच क्षणभर त्याच्या ध्यानात येईना! खिडकीतून बाहेर नजर टाकल्यावर फर आणि पाईन्सची वनराजी दृष्टीस पडल्यावर आपण सिमल्यात असल्याचं त्याला एकदम आठवलं. रुम सर्विसला चहा आणि ब्रेकफास्टची ऑर्डर देवून त्याने आपली सकाळची आन्हिकं आटपली. ब्रेकफास्ट करुन बाहेर पडण्यापूर्वी त्याने मुंबईला कमिशनर मेहेंदळेंना फोन करुन थोडक्यात आपल्या तपासकामाची कल्पना दिली. कमिशनरसाहेबांशी बोलणं झाल्यावर त्याने कदमना फोन करुन डीएनए रिपोर्टची चौकशी केली, पण अद्यापही टेस्टचा रिपोर्ट आलेला नव्हता. पाठक अ‍ॅन्ड सन्स या नावाने स्टोरेज रुम बुक करणारी कंपनी, भगवतीनंदन चौबे आणि ती सूटकेस नेणारा माणूस यांच्यापैकी कोणाचाही पत्ता लागलेला नव्हता. रोहितने सिमल्याला केलेल्या तपासाची त्यांना थोडक्यात कल्पना दिल्यावर कदमनी जवाहर कौलला ताब्यात घेवून त्याच्याकडे कसून चौकशी करण्याचा मार्ग सुचवला, पण त्याचा काही उपयोग होणार नाही याची रोहितला कल्पना होती. रोशनीचा खून करण्यात आलेला असावा आणि श्वेताने तिची जागा घेतली असावी असा आपला संशयही त्याने कदमना बोलून दाखवला, परंतु निश्चित काही पुरावा सापडेपर्यंत याबद्दल कोणाकडेही वाच्यता न करण्याचं त्यांना बजावण्यास तो विसरला नाही. त्याचा हिशोब अगदी सरळ होता. यदाकदाचित खरी रोशनी जिवंत सापडली असती तर भलत्याच प्रसंगाला सामोरं जाण्याची पाळी त्यांच्यावर येणार होती!

कदमांशी बोलणं झाल्यावर रोहितने कोहलींना फोन लावला. दिल्ली पोलीसांनी जंगजंग पछाडूनही अखिलेशचा काहिही पत्ता लागत नव्हता. कोहलींनी अखिलेशच्या गावी मधुबनीला पाठवलेल्या मेसेजचाही काही उपयोग झालेला नव्हता. त्याने सिमल्याला केलेल्या तपासाची कोहलींना थोडक्यात माहिती दिली. कोहलींनीही कदमांप्रमाणेच जवाहर कौलकडे विचारपूस करण्याचा आग्रह धरला, परंतु केवळ संशयावरुन त्याला ताब्यात घेण्यात काही अर्थ नाही याची त्यांनाही तशी कल्पना होती.

"त्या कौलचा काल संध्याकाळी फोन आला होता सरजी! आपण मिसेस द्विवेदींची डायरी घरभर शोधली, पण ती आपल्याला सापडली नाही, बहुतेक त्यांचं सामान डोनेट केलं तेव्हा त्याबरोबर ती डायरीपण गेली असावी असा त्याचा दावा आहे!"

"तशी काही डायरी अस्तित्वात असेल तर ती सापडेल ना कोहली! एनी वे, जवाहरला आपण कधीही उचलू शकतो, पण त्याला उचलण्यापूर्वी आपल्याकडे त्याच्याविरुद्ध काँक्रीट केस हवी, अदरवाईज शक्य त्या सगळ्या उचापती करुन आणि आपली पॉलिटीकल कनेक्शन्स वापरुन तो आरामात निसटून जाईल! आय डोन्ट वॉन्ट टू गिव्ह हिम दॅट चान्स! एक काम करा.... या जवाहरवर राऊंड द क्लॉक वॉच ठेवा! सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो कुठे जातो, काय करतो हे आपल्याला समजलं पाहिजे. तुमचा एक माणूस त्याच्या मागावर राहू दे! आय डोन्ट थिंक तो पळून जाण्याचा प्रयत्नं करेल, पण इन केस त्याने तसा प्रयत्नं केलाच, तर मात्रं त्याला सरळ उचला!"

"ओके सरजी!"

"आणखीन एक काम करा कोहली, या जवाहर कौलच्या ऑफीसचा आणि घरचा फोन आणि मोबाईल या तिन्हीची कॉल रेकॉर्ड्स मागवून घ्या. आय हॅव अ फिलींग, अखिलेश आणि श्वेता त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार, त्यांच्यातली लिंक एस्टॅब्लिश करण्यासाठी ही कॉल रेकॉर्ड्स क्रिटीकल आहेत!"

तासभर फोनाफोनीत गेल्यावर रोहित बाहेर पडला आणि त्याने रेक्टर बहुगुणांकडून ज्या शाळेचा पत्ता मिळाला होता ती शाळा गाठली. ऑफीसमधल्या स्टाफला आपली ओळख देऊन त्याने रोशनी द्विवेदी या नावाची चौकशी केली. रोशनी पाचव्या वर्गात असतानापासून या शाळेत शिकायला आली होती आणि शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. शाळेत असताना ती एक हुशार विद्द्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. शाळेतली चौकशी आटपल्यावर रोहितने शाळेचं हॉस्टेल गाठलं. रोशनी ६ वर्ष हॉस्टेलमध्ये राहत होती अशी माहिती तिथल्या रेक्टरनी दिली. मात्रं ती कधीही दिल्लीला आपल्या घरी गेलेली नव्हती. दरवर्षी तिची आईच तिला भेटण्यासाठी सिमल्याला येवून राहत असे! रोहितने द्विवेदी किंवा कौल कधी सिमल्याला आले होते का याबद्दलही चौकशी केली, पण त्या दोघांपैकी कोणीच हॉस्टेलवर आलं नसल्याचं त्यांनी स्पष्टं केलं. या शाळेत येण्यापूर्वी दोन वर्ष ती सिमल्यातच दुसर्‍या एका शाळेत २ वर्ष शिकत होती आणि हॉस्टेलवर राहत होती अशीही त्याला माहिती मिळाली! रोहितने ती शाळा गाठून तिथेही चौकशी केली, पण तिथेही रोशनीची आईच दरवर्षी येत होती आणि द्विवेदी किंवा कौल या दोघांपैकी कोणीही कधी तिथे आलेलं नव्हतं असं त्याला सांगण्यात आलं!

रोशनीच्या शाळेच्या हॉस्टेलमधून बाहेर पडल्यावर रोहित जवाहरकडून मिळालेला तिचा पत्ता शोधून काढण्याच्या मोहिमेवर निघाला. जवाहरकडून तो पत्ता मिळाल्यावर दिल्ली सोडण्यापूर्वीच द्विवेदींकडून मिळालेल्या पत्त्याशी तो ताडून पाहण्याची त्याने खबरदारी घेतली होती. अर्थात द्विवेदींना तो पत्ता जवाहरनेच दिलेला असल्याने तो एकच पत्ता असणार यात त्याला शंका नव्हती, पण तरीही स्वत:च्या खात्रीसाठी त्याने दोन्ही पत्ते पुन्हा एकदा जुळवून पाहिलेले होते.

थोडीफार शोधाशोध केल्यावर अखेर रोहितला तो पत्ता सापडला. ते एक दुमजली चाळवजा घर होतं. तो तिथे पोहोचला तेव्हा सुमारे पंचावन्न वर्षांचा एक धिप्पाड पहाडी माणूस त्याला सामोरा आला. रोहितने त्याच्याकडे चौकशी केली असता आपलं नाव बिपिनचंद्र खेत्रपाल असून हे घर आपल्या मालकीचं असल्याचं त्याने रोहितला सांगितलं. त्या प्रशस्तं घराच्या वरच्या मजल्यावर तो आपल्या कुटुंबियांसह राहत होता. तळमजल्यावर असलेल्या चार खोल्या त्याने कॉलेजला शिकणार्‍या मुलींना भाड्याने दिलेल्या होत्या. प्रत्येक खोलीत दोन मुलींची राहण्याची सोय होती.

"खेत्रपाल, या मुलीला तुम्ही ओळखता?" रोहितने रोशनीच्या कॉलेजमध्ये मिळालेला तिचा फोटो खेत्रपालच्या समोर धरला, "ही मुलगी कधी तुमच्या घरी राहण्यासाठी आली होती?"

खेत्रपालनी तो फोटो पाहिला, पण त्यांच्या नजरेत अनोळखी भाव होते. नकारार्थी मान हलवत ते म्हणाले,

"फोटोवरुन तरी ओळखीची वाटत नाही साब! नाव सांगितलंत तर मी रजिस्टरमध्ये चेक करुन सांगतो."

रोहितने नाव सांगताच खेत्रपालनी आपल्या समोरचं रजिस्टर उघडून चाळण्यास सुरवात केली.

"नाही! या नावाची मुलगी गेल्या दोन वर्षांत तरी माझाकडे आलेली नाही!"

"अच्छा? आणि ही मुलगी?" रोहितने दुसरा फोटो खेत्रपालसमोर धरला.

"हां साब.... ही मुलगी आली होती इथे!" फोटो पाहताच खेत्रपालचा चेहरा उजळला. आपल्या रजिस्टरचं एक पान त्याने रोहितसमोर धरत ते म्हणाले, " हिचं नाव.... हिचं नाव रोशनी द्विवेदी आहे! मार्च महिन्याच्या ४ तारखेला ती माझ्याकडे खोलीची चौकशी करण्यासाठी आली होती. त्यावेळेस माझ्याकडे एकही जागा शिल्लक नव्हती, पण १५ मार्चला माझ्या इथल्या एकाच खोलीतल्या दोन मुली खोली खाली करुन जाणार होत्या, त्यामुळे मी तिला १५ तारखेला बोलावलं. त्याप्रमाणे १५ तारखेला ती आली आणि दोन महिन्यांचं भाडं अ‍ॅडव्हान्समध्ये देत तिने खोली ताब्यात घेतली. तिला तिच्या खोलीत पार्टनर नको होता, त्यामुळे तिने डबल भाडं दिलं होतं!"

"इंट्रेस्टींग! ही रोशनी कोणत्या कॉलेजमध्ये होती काही बोलली?"

"ती कॉलेजची स्टुडंट नव्हती! ती कसला तरी रिसर्च करत होती आणि त्यानिमित्ताने सिमल्याला आली होती. १५ मार्चला रुमची किल्ली घेतल्यावर ती जी गायब झाली ती एकदम २४ मार्चच्या संध्याकाळी परत आली! मी सहजच तिच्याकडे चौकशी केली तेव्हा आपण आपल्या रिसर्चच्या कामानिमित्तं धरमशाला आणि कुलू इथे गेल्याचं तिने सांगितलं."

"तिच्याबरोबर इथे आणखीन कोणी आलं होतं?"

"नाही! त्या दिवशी परत आल्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारनंतर ती पुन्हा बाहेर पडली ती एकदम चार दिवसांनी संध्याकाळी सहाच्या सुमाराला परत आली. ती आली तेव्हा मी बाहेरच बसलेलो होतो त्यामुळे माझ्या ते चांगलं लक्षात राहिलं."

"आय सी! बरं तिला इथे कोणी भेटायला आलं होतं?"

"हां! त्या दिवशी संध्याकाळी ती परत आल्यानंतर दोन दिवसांनी दुपारी एक वयस्कर माणूस तिचा पत्ता शोधत आला होता. त्याच्या कपड्यांवरुन आणि वागण्या-बोलण्यावरुन तो कोणी श्रीमंत माणूस असावा असा मी अंदाज केला. तिला आपल्यासोबत घेवून जाण्यासाठी तो आला होता, पण ती मात्रं त्याच्याबरोबर जाण्यास तयार नव्हती. मी चौकशी केली असता तो तिचा बाप असल्याचं त्याने मला सांगितलं. संध्याकाळी आणि रात्री उशीरापर्यंत तो तिला समजावण्याचा प्रयत्नं करत होता, पण ती अजिबात ऐकायला तयार नव्हती. तो निराश होत निघून गेला, पण दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा माझ्या दारात आला! दिवसभर त्याने तिची बरीच मनधारणी केल्यावर अखेर तिची समजूत पटली आणि संध्याकाळी ती त्याच्याबरोबर निघून गेली. एप्रिल महिन्याचं डबल भाडंही तिने परत मागितलं नाही!"

खेत्रपाल ही माहिती देत असताना रोहितचं विचारचक्रं वेगाने धावत होतं. खेत्रपालनी श्वेताचा फोटो रोशनी द्विवेदी म्हणून ओळखला होता! रोशनीला भेटण्याच्या निमित्ताने ५ मार्चला अखिलेश आणि श्वेता सिमल्याला आले तेव्हाच श्वेताने खेत्रपालकडे रुमची चौकशी केली होती हे उघड होतं. १५ मार्चला खेत्रपालच्या रुमचा ताबा घेतल्यावर ती दिल्लीला परतली असणार आणि २४ तारखेला अखिलेशबरोबर पुन्हा सिमल्याला आली असणार हा त्याचा अंदाज होता. २६ मार्चला सकाळी अखिलेश आणि श्वेताबरोबर रोशनीने हॉस्टेल सोडलं आहे आणि त्यानंतर २९ मार्चच्या संध्याकाळी श्वेता पुन्हा खेत्रपालच्या रुमवर परतली आहे. याचा अर्थ....

२७ किंवा २८ मार्चला रोशनीचा खून करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती!

खेत्रपालनी दिलेल्या माहितीबद्दल त्यांचे आभार मानून रोहित बाहेर पडला. पुढे काय करायचं हे त्याने आधीच ठरवलं होतं. हिमाचल प्रदेश सीआयडींचं ऑफीस गाठून त्याने कमिशनर रावत यांची भेट घेतली. ज्या अर्थी तो खास मुंबईहून आला आहे त्या अर्थी सिमल्याशी संबंधीत काहितरी गंभीर गुन्हा घडला असावा हे त्यांच्या लगेच ध्यानात आलं. रोहितने वरळी सी फेसवर श्वेताचा मृतदेह मिळाल्यापासूनचं सारं प्रकरण मोजक्याच शब्दांत त्यांच्या कानी घातलं आणि आपल्याला मदत करण्याची विनंती केली.

"गेल्या सहा-सात महिन्यांत, विशेषत: २५ मार्चनंतरच्या महिन्याभरात सिमला आणि आजूबाजूच्या एरीयात डिटेक्ट न झालेल्या प्रत्येक केसची मला इन्फॉर्मेशन हवी आहे सर. स्पेसिफीकली स्पिकींग, जर एखाद्या तरुण मुलीची बॉडी किंवा स्केलेटन सापडला असेल तर! अगदी हाडांचे तुकडे मिळाले तरीही चालतील. आय हॅव अ गट फिलींग, रोशनीचा खून झालेला असावा आणि सिमल्यापासून जास्तीत जास्तं दोनशे ते अडीचशे किलोमीटर्सच्या रेडीयसमध्ये तिची बॉडी डिस्पोज ऑफ केली असावी!"

रोहित इतक्या ठामपणे म्हणाला की रावत आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहीले.

"रोशनीने अखिलेश आणि श्वेता या दोघांबरोबर २६ मार्चच्या सकाळी हॉस्टेल सोडलं आहे." स्पष्टीकरण देत तो म्हणाला, "ती कॉलेजची ७ वर्ष आणि त्याआधी शाळेची ८ वर्ष अशी एकूण १५ वर्ष सिमल्यात राहत होती. साहजिकच तिला ओळखणारे बरेच लोक इथे होते. त्यामुळे सिमल्यात तिचं काही बरवाईट झालं तर ते अखिलेश आणि श्वेताच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकलं असतं. दुसरं म्हणजे रोशनीला कोणताही संशय येण्यापूर्वीच तिला संपवणं त्यांच्यादृष्टीने आवश्यक होतं. तिला पिकअप केल्यावर त्याच दिवशी त्यांनी तिला सिमल्यातून बाहेर काढली असणार! २६ किंवा २७ मार्चच्या रात्री तिचा खून करण्यात आला असावा. भर दिवसा तिची बॉडी डिस्पोज ऑफ करणं अशक्यंच आहे, त्यामुळे २७ किंवा २८ च्या रात्री तिची बॉडी ठिकाणी लावून २९ च्या संध्याकाळी अखिलेश आणि श्वेता सिमल्याला परतले असावेत! त्या खेत्रपालनीही श्वेताला २९ तारखेच्या संध्याकाळी श्वेताला परत आलेलं पाहिलं आहे. अर्थात हा केवळ माझा तर्क आहे आणि तो शंभर टक्के चुकीचाही असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण टाईम एलीमेंटचा विचार केला तर रोशनीची डेडबॉडी सापडलीच तर ती सिमल्यापासून जास्तीत जास्तं दोन - अडीचशे किलोमीटर्सच्या रेडीयसमध्येच सापडेल असा माझा अंदाज आहे!"

"यू हॅव अ फेअर पॉईंट प्रधान!" रावत मान डोलवत म्हणाले, "हिमाचलमधल्या सगळ्या अनडिटेक्टेड केसेसची माहिती तुला आमच्या रेकॉर्डरुममध्ये मिळेलच, पण त्यात काही सापडलं नाही तर पंजाब, हरियाणा आणि उत्तरांचलमध्येही तुला तपास करावा लागेल हे लक्षात ठेव!"

रोहितने काही न बोलता फक्तं स्मितं केलं. कमिशनर रावतनी त्याच्याबरोबर एक कॉन्स्टेबल दिला आणि त्याची रेकॉर्डरुममध्ये रवानगी केली. रेकॉर्ड रुममधल्या अधिकार्‍यांनी निकालात न निघालेल्या केसेसच्या फाईल्स त्याच्यासमोर ठेवल्या. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस त्यात होत्या. साध्या चोरीपासून घरफोडी, बेकायदेशीर शस्त्रं बाळगणे, गाडी पळवून नेणे, अपहरण ते अगदी शस्त्राचा धाक दाखवून लुटमारीपर्यंत! हिमाचलसारख्या शांत राज्यात न उलगडलेल्या इतक्या भानगडींची रोहितला अजिबात अपेक्षा नव्हती. या केसेसची नीट वर्गवारीही केलेली दिसत नव्हती, त्यामुळे प्रत्येक केसची किमान एफआयआर वाचण्यापलिकडे पर्याय नव्हता! अखेर दोन - तीन तासांनी त्याला अपेक्षित अशा दोन केसेस आढळून आल्या!

एप्रिल महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात - १६ एप्रिलच्या संध्याकाळी - सिमल्याच्या पूर्वेला सुमारे १०० किमी अंतरावर रोहरु गावच्या दिशेने जाणार्‍या हायवेलगत दरीत उतरणार्‍या उतारावर असलेल्या दाट झाडीत एका अज्ञात तरुणीचा सडलेला मृतदेह आढळून आला होता. रोहरु पोलिसांनी प्राथमिक तपास करुन संपूर्ण हिमाचल प्रदेश आणि नजीकच्या उत्तरांचलमध्ये मेसेज पाठवला होता. त्या तरुणीचा चेहार पूर्णपणे सडलेला असल्याने तिची ओळख पटवणं अशक्यं झालं होतं. पोस्ट मॉर्टेम करणार्‍या डॉक्टरांच्या मते ती सुमारे २२ ते २३ वर्षांची असावी. कोणत्या तरी जड वस्तूचा आघात तिच्या डोक्यावर करण्यात आलेला होता. तिची कवटी फुटून मेंदूला मार बसल्याने तिचा मृत्यू झालेला होता!

दुसरी केस जून महिन्यातली होती. जून महिन्यातल्या २२ तारखेला सिमला - मनाली हायवेवर सिमल्यापासून सुमारे १३० किमीवर मंडी गावाच्या आधी हायवेपासून सुमारे ७० - ८० फूट खाली बियास नदीच्या पात्राच्या दिशेने जाणार्‍या उतारावर एका लहानशा घळीत हाडांचा केवळ सापळा पडलेला आढळून आला होता! रोहरु इथे सापडलेल्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करणार्‍या डॉक्टरांनीच या सापळ्याचीही तपासणी केली होती. तो सापळा २३ ते २४ वर्षांच्या तरुणीचा आहे आणि ती सुमारे एक ते दीड महिन्यांपूर्वी मरण पावली असावी या व्यतिरिक्त आणखीन काहिही सांगण्यास डॉक्टर असमर्थ ठरले होते. तिच्या मानेतली हाडं तुटलेली आढळलेली असल्याने गळा दाबून तिचा खून करण्यात आला असावा असा डॉक्टरांचा अंदाज होता. मंडी पोलीसांनी आणि हिमाचल सीआयडीनी आकाशपाताळ एक करुनही तो सापळा कोणाचा आहे यावर काहीच प्रकाश न पडल्याने अखेर केस फाईल करण्यात आली होती.

दोन्ही केसच्या फाईल्स बारकाईने वाचून झाल्यावर रोहितने आपल्या समोरचा हिमाचल प्रदेशचा नकाशा पाहण्यास सुरवात केली. देशभरांतील इतर हायवे प्रमाणे सिमला - मनाली हायवे अगदी २४ तास ट्रॅफीकने भरलेला नसला तरी बर्‍यापैकी वर्दळीचा होता. खासकरुन मार्च - एप्रिल या काळात पर्यटकांचा या मार्गावर राबता होता त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नं करणं तसं धोकादायक होतं. त्याच्या तुलनेत रोहरू गावाच्या दिशेने जाणारा रस्ता तसा आडबाजूचा होता. रात्रीच्या वेळेस तर या मार्ग जवळपास सुनसानच असतो असं रोहरू पोलिस स्टेशनमध्ये ड्यूटी केलेल्या एका अधिकार्‍याचं मत होतं.

रोहितने आपल्या रिस्टवॉचवर नजर टाकली. संध्याकाळचे पाच वाजत आले होते. त्याच्या डोक्यात पुढची योजना भराभर तयार होत होती. दोन्ही केसेसची आवश्यक ती माहिती आपल्या आयपॅडवर नोंदवून घेतल्यावर तो रेकॉर्डरुममधून बाहेर पडला आणि हॉटेलची रूम चेक-आऊट करुन त्याने सिमल्याचा टॅक्सी स्टँड गाठला. जेमतेम सव्वाशे किमी अंतर असूनही रोहरू गावी पोहोचण्यास तीन तास लागले होते! त्यातल्या त्यात एका बर्‍यापैकी हॉटेलमध्ये मुक्काम टाकून रात्रीच त्याने पोलीस स्टेशन गाठलं आणि ड्यूटीवर असलेल्या सब् इन्स्पे. पांडव यांची भेट घेत केसची चौकशी केली.

पांडवनी सहा महिन्यांपूर्वीच्या त्या केसची फाईल त्याच्या समोर ठेवली. रोहरू गावापासून सुमारे ७ किमी अंतरावर एका गुराख्याला निव्वळ योगायोगानेच मृतदेहाचा पत्ता लागला होता. पोलिसांना ही बातमी कळताच पांडव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरवात केली होती. त्या अज्ञात तरुणीचा मृतदेह झाडीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत होता. मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने तिचा चेहरा असा फारसा शिल्लकच राहिलेला नव्हता. मृतदेहावर जंगली जनावराच्या तीक्ष्ण नख्यांच्या आणि दातांच्या खुणा आढळल्या होत्या. रात्रीच्या अंधारात तरस किंवा कोल्ह्यासारख्या जनावरांना वास लागल्याने त्यांनी तो मृतदेह उकरुन मांस ओरबाडलं असावं असा पांडव यांचा अंदाज होता. त्या मुलीच्या मृतदेहावर किंवा आसपास तिची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू किंवा कागद आढळून आलेला नव्हता. जंगली प्राण्यांनी ओरबाडल्यामुळे तिच्या देहावर असलेल्या कपड्यांच्या चिरफाळ्या उडालेल्या होत्या.

"तिचे कपडे तुम्हाला मिळाले ना पांडव? ते कपडे कसे होते? कोणत्या प्रकारचे?"

"लाल रंगाचा पहाडी बायका घालतात तसाच ड्रेस होता सरजी! पण मी आधीच म्हटल्याप्रमाणे पार चिंध्या झालेल्या होत्या."

"पहाडी बायकांचा ड्रेस?" रोह्तिच्या कपाळाला आठ्या पडल्या, "आर यू शुअर पांडव? सिमल्याच्या तुमच्या हेडक्वार्टर्समध्ये असलेल्या फाईलमध्ये बॉडीवरच्या कपड्यांचा काहीच उल्लेख कसा नाही?"

"सॉरी सरजी!"

"या मुलीची मिसिंग कंप्लंट नोंदवलेली आहे?"

"नाही सरजी! आम्ही सगळ्या मिसिंग कंप्लेंट्स तपासून पाहिल्या, पण या मुलीच्या वर्णनाची एकही कंप्लेंट नाही!"

"हं.... एनी वे! एक काम करा पांडव.... रोहरू आणि आजूबाजूच्या दहा किमीच्या परिसरात जितकी म्हणून हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस किंवा रिसॉर्ट्स आहेत ती सगळी चेक करण्याची व्यवस्था करा. स्पेसिफीकली २६ ते २९ मार्चच्या दरम्यान शेखर द्विवेदी, प्रेरणा दिवेदी आणि रोशनी द्विवेदी यांच्यापैकी कोणी एखाद्या हॉटेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये उतरलं होतं का याची चौकशी करण्याची तुमच्या माणसांना सूचना द्या. दुसरं म्हणजे तुम्हाला डेडबॉडीची वर्दी देणारा तो गुराखी, त्याला उद्या सकाळी इथे बोलावून घेण्याची व्यवस्था करा."

रोहित आपल्या हॉटेलवर परतला तेव्हा काहीसा वैतागलेलाच होता. रोहरू गावच्या आजूबाजूची हॉटेल्स चेक करण्याची त्याने व्यवस्था केली होती खरी, पण त्याचा काही उपयोग होणार नाही असं त्याची मनोदेवता त्याला सांगत होती. त्या मुलीची मिसिंग कंप्लेंट नोंदवण्यात आलेली नव्हती, त्यामुळे तिच्या कुटुंबियांचाच तिच्या हत्येत हात असण्याची शक्यता होती. ज्या अर्थी तिच्या मृतदेहावर पहाडी कपडे होते त्या अर्थी एकतर ती रोहरू गावापासून दूर एखाद्या दुर्गम खेड्यात राहणारी असावी किंवा नजिकच्या उत्तरांचल राज्यातली असावी असा रोहितचा अंदाज होता. परंतु एकूण परिस्थितीचा विचार केला तरी ती रोशनी नाही हे उघड होतं. हिमाचल पोलिसांच्या हेडक्वार्टर्समध्ये मिळालेल्या अर्धवट माहितीमुळे त्याचा अर्था - एक दिवस फुकट गेला होताच, पण निष्कारण रोहरू गावची खेप पडली होती! दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत काही धागा हाती लागला नाही तर सिमल्याला परतून मंडी गाठावं आणि त्या दुसर्‍या केसच्या बाबतीत नशिब आजमावून पाहावं या विचारातच तो बेडवर पडला.

********

अल्ताफ कुरेशी चाळीतल्या आपल्या खोलीत कुरीयरने आलेल्या त्या पॅकेटमधल्या वस्तूंचं निरीक्षण करत होता.

अल्ताफ मूळचा उत्तर प्रदेशातल्या आझमगड जिल्ह्यातला होता. त्याचा मुख्य धंदा होता तो म्हणजे खुनाच्या सुपार्‍या घेणे! आतापर्यंत त्याने सहा खून केले होते! अनेकदा पोलीसांनी अटक करुनही त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा आढळून आलेला नव्हता! अर्थात याचं कारण म्हणजे आझमगडच्याच अत्तार जफर या राजकारण्याचा त्याच्या डोक्यावर असलेला वरदहस्तं! अत्तारच्या प्रभावमुळे आणि दहशतीमुळे पोलीसांना अल्ताफविरुद्ध एकही साक्षीदारच मिळत नव्हता आणि एखादा मिळालाच तर तो कोर्टात आपली साक्षं फिरवत होता किंवा केस उभी राहण्यापूर्वीच गायब होत होता! अल्ताफने केलेल्या सहा खुनांपैकी दोन खून अत्तारच्या राजकीय प्रतिस्पर्ध्याचेच होते! आझमगड परिसरात कोणताही गंभीर गुन्हा घडला किंवा एखादा खून पडला तर पोलीस सर्वप्रथम अल्ताफला उचलत होते. पोलीसांच्या या नेहमीच्या कटकटीला वैतागून गेल्या वर्षभरापासून अल्ताफने दिल्लीतल्या शकूरबस्ती परिसरात आपला मुक्काम हलवला होता. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच त्याने दिल्लीतल्या एका मुलीला गटवून आपला तिसरा निकाह उरकून घेतला होता! ही त्याची तिसरी बायको रुक्साना वझीरपूर इथे राहत होती.

दोन दिवसांपूर्वीच त्याच्या मोबाईलवर एक फोन आला होता. फोनवर बोलणार्‍या माणसाने आपलं नाव - गाव सांगण्याचं टाळलं होतं. एका खास कामगिरीसाठी त्याने अल्ताफशी संपर्क साधला होता. मात्रं ही कामगिरी आपण सांगू त्या प्रकारेच पार पाडली जावी असा त्याचा आग्रह होता! त्याच्या कामाचं स्वरुप कळल्यावर अल्ताफने होकार दिला होता आणि या कामासाठी दहा लाखांची मागणी केली होती! त्या माणसाने कोणतीही खळखळ न करता ही मागणी मान्यं केली होती. दोन लाख अ‍ॅडव्हान्स दोन्ही खून झाल्यानंतर उरलेले आठ लाख अशा बोलीवर सौदा पक्का झाला होता!

अवघ्या अर्ध्या तासापूर्वीच ते पॅकेट कुरीयरने अल्ताफच्या चाळीतल्या पत्त्यावर आलं होतं. त्या पॅकेटमध्ये एक बॉक्स आणि एक एन्व्हलप होतं. त्या एन्व्हलपमध्ये दोन फोटो आणि हिंदीत मजकूर टाईप केलेला एक कागद होता. अल्ताफने त्या मजकुरावरुन नजर फिरवली तेव्हा तो थक्कंच झाला! आपण समजत होतो त्यापेक्षा हे काही निराळंच प्रकरण आहे याची त्याला कल्पना आली. कागद बाजूला ठेवत त्याने अत्यंत काळजीपूर्वक तो बॉक्स उघडला. त्यात असलेल्या त्या दोन वस्तू पाहून अल्ताफसारख्या निर्ढावलेल्या बदमाषाचेही डोळे क्षणभर विस्फारले. ते नेमकं काय आहे हे त्याला कोणी समजावण्याची जरुर नव्हती! सावधपणे त्याने त्यापैकी एक वस्तू उचलली आणि त्याचं नीट निरीक्षण करण्यास सुरवात केली. ज्याने कोणी ही वस्तू बनवली होती त्याला अल्ताफने मनातल्या मनात दाद दिली.

बारकाईने आणि अत्यंत काळजीपूर्वक त्या दोन्ही वस्तू तपासल्यावर त्याने पुन्हा त्या बॉक्समध्ये ठेवल्या आणि त्या एन्व्हलपमधल्या दोन फोटोंवर नजर टाकली. पहिल्या फोटोतला माणूस कोणी मोठा श्रीमंत माणूस असावा असा त्याचा अंदाज होता. फोटोच्या मागे त्या माणसाचं नाव आणि त्याचा पूर्ण पत्ता लिहीलेला होता. दुसरा फोटो पाहिल्यावर मात्रं तो काहीसा चकीतच झाला! या फोटोतल्या माणसाला आपण नक्कीच कुठेतरी पाहिलं आहे असं त्याला वाटत होतं, पण स्मरणशक्तीला ताण देवूनही तो नेमका कोण आहे हे त्याच्या ध्यानात येत नव्हतं! दोन्ही फोटो पाहिल्यावर त्याने ते पुन्हा एन्व्हलपमध्ये ठेवले आणि एन्व्हलप आणि तो बॉक्स खोलीतल्या कपाटात कपड्यांच्या मागे लपवून ठेवला आणि तो खाटेवर आडवा झाला....

दोन लाखाचा अ‍ॅडव्हान्स हातात पडल्याखेरीज तो कोणतीही हालचाल करणार नव्हता!

जेमतेम तासाभरानेच खोलीचं दार वाजवल्याच्या आवाजाने त्याला एकदम जाग आली. कुरीयरवाला आला होता. पहिल्या पॅकेटप्रमाणेच त्याच्या नावावर आणखीन एक पॅकेट आलं होतं. पॅकेट ताब्यात घेत दार बंद करुन त्याने कडी सरकवली. पॅकेट उघडून पाहिलं असता त्यात एक लहानसा बॉक्स असल्याचं त्याला आढळलं. बॉक्समध्ये दोन लाखाच्या कोर्‍या करकरीत नोटा होत्या!

अल्ताफने दीर्घ नि:श्वास सोडला आणि कपाटातून तो बॉक्स आणि फोटो असलेलं एन्व्हलप बाहेर काढलं. दोन फोटोंपैकी ज्या फोटोवर नाव-पत्ता लिहीलेला होता तो फोटो त्याने एन्व्हलपमध्ये तसाच ठेवला. त्याला तो कधीही गाठू शकत होता! दुसर्‍या फोटोतला माणूस कोण आहे हे प्रयत्नं करुनही त्याला आठवत नव्हतं. फोटोंचं एन्व्हलप, पैसे आणि तो बॉक्स त्याने पुन्हा कपाटात लपवून ठेवला आणि पुन्हा तो खाटेवर आडवा झाला. निवांत झोप काढून संध्याकाळी त्या दुसर्‍या माणसाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडण्याचा त्याचा इरादा होता, पण आज सलग झोप त्याच्या नशिबात नव्हतीच बहुतेक! खाटेवर पडल्यापासून जेमतेम अर्ध्या - पाऊण तासाने त्याचा मोबाईल वाजला.

"सलाम आलेकुम! अल्ताफ बात करता हूं...."

"अल्ताफ, पैसे, फोटो और सामान तुम्हें मिल गया है!" त्याला सुपारी देणार्‍या माणसाचाच फोन होता, "जल्द से जल्द काम हो जाना चाहिए! और एक बात याद रखो, अगर धोका देने की कोशिश की तो सबसे पहले तुम मारे जाओगे!"

फोन कट् झाला!

अल्ताफ खरंतर काहीसा भडकलाच होता....
सहा खून पचवलेल्या आपल्यासारख्या माणसाला कोणी खलास करण्याची धमकी देईल ही त्याने कल्पनाही केली नव्हती!
या सगळ्या भानगडीतून आपलं अंग काढून घ्यावं असंही क्षणभर त्याला वाटून गेलं पण ....
एकरकमी आठ लाखांचा मोहही सोडवत नव्हता!
एक गोष्टं मात्रं विचार करुनही त्याच्या लक्षात येत नव्हती....

आपल्याला पैसे आणि फोटो मिळाले आहेत हे त्याला कसं कळलं?

********

सकाळी सब् इन्स्पे पांडवबरोबर रोहितने त्या तरुणीचा मृतदेह सापडलेली जागा नजरेखालून घातली. हायवेपासून नदीपात्राच्या दिशेने जाणार्‍या उतारावर मध्येच उगवलेल्या झुडूपांमध्ये त्या तरुणीचा अर्धवट पुरलेला मृतदेह त्या गुराख्याला आढळून आला होता. पांडवनी त्या गुराख्यालाही त्याच्यासमोर उभं केलं, पण त्याच्याकडून आशादायक अशी कोणतीच माहिती मिळली नाही. रोहरूच्या आसपास असलेल्या हॉटेलमध्ये केलेली चौकशीही अशीच निष्फळ ठरली होती. मार्चचया शेवटच्या आठवड्यात शेखर, प्रेरणा किंवा रोशनी यांच्यापैकी कोणी तिथे आल्याची एखाही हॉटेलमध्ये नोंद आढळली नव्हती. अर्थात हे फारसं अनपेक्षित नव्हतंच. केवळ कोणताही दुवा सुटा सोडायचा नाही या आपल्या तत्वाला अनुसरून त्याने पांडवना हॉटेल्स चेक करण्याची सूचना दिली होती खरी, परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही याची त्याला कल्पना होती. दुपारी बाराच्या सुमाराला त्याने आपला तपास आवरता घेत रोहरू सोडलं.

रोहित मंडीला पोहोचला तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते. सिमल्याहून जेमतेम सव्वाशे किमीचं अंतर असूनही वाटेत लागलेल्या ट्रॅफीकमुळे मंडी गाठण्यास पाच तास लागले होते. त्याची टॅक्सी गावात शिरली तेव्हा खरंतर तो कमालीचा दमलेला होता, पण तरीही त्याने थेट मंडी पोलीस स्टेशन गाठलं आणि ड्यूटीवर असलेल्या सब् इन्स्पे मदान यांची भेट घेतली. तो मुंबई सीआयडीचा ऑफीसर आहे हे कळल्यावर मदान थोडेसे गडबडलेच, पण झटकन सावरत त्यांनी ताबडतोब आपले वरिष्ठ अधिकारी इन्स्पे. खत्रींना फोन लावला. रोहित केसची फाईल पाहत असतानाच खत्री घाईघाईने पोलीस स्टेशनवर पोहोचले.

"खत्री, मी हेडक्वार्ट्समध्ये असलेली या केसची माहिती आणि इथली फाईल पाहिली आहे, तरीपण तुम्ही पुन्हा एकदा केसचे डिटेल्स सांगितलेत, तर दॅड विल बी हेल्पफुल! तुम्ही सुरवातीपासून केसची इन्क्वायरी केली आहे त्यामुळे त्यातले बारीकसारीक डिटेल्स तुम्हीच सांगू शकता!"

"जी सरजी!"

खत्रींनी त्या हाडांच्या सापळ्याची वर्दी मिळाल्यापासून आपण कसाकसा तपास केला ते रोहितला सविस्तरपणे उलगडून सांगितलं. केसच्या तपासात त्यांनी कोणतीही हयगय केलेली नव्हती. शक्य त्या सगळ्या मार्गांनी शोध घेत त्यांनी त्या सापळ्याची ओळख पटवण्याचा निकराने प्रयत्नं केला होता. खत्रीच नव्हे, हिमाचल प्रदेशच्या सीआयडींनी आपल्या परीने या प्रकरणाचा तपास केला होता. पोस्टमॉर्टेम करणार्‍या डॉक्टरांनी ती २३ ते २४ वर्षांची असावी असा अंदाज व्यक्तं केला होता. ती एखादी पर्यटक असण्याची शक्यता गृहीत धरुन त्यांनी देशभरातील प्रमुख शहरांमध्येही मेसेजेस पाठवण्याची व्यवस्था केली होती. त्या तरुणीच्या वयाच्या एका मुलीची दिल्ली इथे मिसिंग कंप्लेंट नोंदवण्यात आली होती, त्यावरुन खत्रींनी दिल्ली गाठूनही चौकशी केली होती, परंतु ते दिल्लीला पोहोचण्याच्या आदल्या दिवशीच ती तरुणी आपल्या घरी परतली होती. त्या सापळ्याच्या मानेतली हाडं तुटलेली असल्याचं डॉक्टरना आढळलं होतं. त्यावरुन गळा आवळून तिची हत्या करण्यात आली असावी असा त्यांचा संशय होता. खत्रींचं सारं बोलणं ऐकून घेतल्यावर रोहितने विचारलं,

"खत्री, तुम्हाला त्या स्केलेटनवर कपडे मिळाले?"

"नाही सरजी! आम्ही ती सगळी जागा चाळून काढली, पण काहीही सापडलं नाही. साधा सुताचा धागाही नाही! फक्तं त्या सापळ्याच्या खोपडीला काही केस चिकटलेले तेवढे सापडले. फाईलमधल्या प्लास्टीकच्या बॅगेत केसाचं सँपल आहे."

रोहित फाईलमधल्या प्लॅस्टीकच्या बॅगेत जपून ठेवलेल्या केसांकडे पाहून समाधानाने श्वास सोडला. त्याचं विचारचक्रं वेगाने धावत होतं. भराभर तो आपले पुढचे बेत आखत होता. दुसर्‍या दिवशी सकाळी त्याने त्या फाईलमधल्या केसांचा नमुना मुंबईला डॉ. भरुचांकडे पाठविण्याची व्यवस्था केली. त्याबरोबर भरुचांना पाठवलेल्या चिठ्ठीत त्याने आपल्याला वाटलेली शंका बोलून दाखवली होती आणि त्यांना आवश्यक त्या टेस्ट्स करण्याची विनंतीही केली होती. हे काम मार्गी लागल्यावर खत्रींसह तो सापळा सापडलेली जागा पाहण्यास बाहेर पडला.

मंडी गावाच्या पुढे सुमारे ८ - ९ किमी अंतरावर मनालीला जाणार्‍या हायवेपासून सुमारे ३० फूट उतारावर एक घळ होती. त्या घळीपासून आणखीन ३० - ४० फूट खाली दरीत बियास नदीचं पात्रं होतं. घळीच्या चारही बाजूंनी मोठे-मोठे खडक असल्याने प्रत्यक्षं घळीच्या तोंडाशी पोहोचेपर्यंत तिथे एखादी घळ असेल अशी कल्पनाही येत नव्हती. घळीच्या तोंडाशी पोहोचल्यावर रोहितने सहजच वरच्या दिशेने नजर टाकली. रस्त्यापासून घळीच्या पलीकडे नदीपात्रापर्यंत झुडुपांची दाटी झालेली होती, त्यामुळे भरदिवसा देखिल रस्त्यावरुन ही घळ अजिबात दृष्टीपथात येत नव्हती. रात्रीच्या अंधारात तर काहीच दिसण्याचा संभव नव्हता.

"बॉडी टाकण्यासाठी जागा अगदी पर्फेक्ट शोधली आहे!" रोहित आजूबाजूचं निरीक्षण करत म्हणाला.

"बिलकूल ठीक सरजी! इथे जवळपास एखादं घर नाही आणि या भागात किंवा पलीकडल्या तीरावर कोणी गाई-गुरंही चरायला आणण्याची शक्यता नाही! इथे सालभर एखादा मुडदा पडून राहिला तरी कोणाला काही कळणारही नाही. त्या दिवशी तो अ‍ॅक्सिडेंट झाला नसताना सरजी, तर आम्हालाही पत्ता लागला नसता!"

"अ‍ॅक्सिडेंट?"

"हां सरजी! त्या दिवशी मनालीकडून येणार्‍या एका बाइकवाल्याचा इथे अ‍ॅक्सिडेंट झाला होता. बाईकवरचा त्याचा ताबा सुटून तो हायवेवरुन इथे खाली झाडीत फेकला गेला होता. आम्हाला खबर मिळताच सब् इन्स्पे. देवप्रकाश ताबडतोब इथे पोहोचले. तो बाईकवाला पोरगा चांगलाच जखमी झाला होता. त्याला जीपने हॉस्पिटलला पाठवल्यावर देवप्रकाश इथे पंचनामा करत असतानाच एका हवालदाराला एक नंबरला लागली. सगळेच झाडीत असल्याने जरा आडबाजूला जावं म्हणून तो या घळीच्या दगडांपाशी आला आणि नेमकी ती खोपडी त्याच्या नजरेस पडली! अ‍ॅक्सिडेंटचा पंचनामा राहिला बाजूला आणि त्या सापळ्याचा शोध घेण्याचं काम आमच्या गळ्यात पडलं!"

रोहितने ती घळ काळजीपूर्वक तपासली. मंडी पोलीसांना तो सापळा सापडला तेव्हा पोलीस फोटोग्राफरने काढलेले फोटो फाईलमध्ये होते. त्यावरुन त्या दुर्दैवी तरुणीच्या मृतदेहाची घळीतली नेमकी जागा कोणती असावी याचा त्याला अंदाज आला होता. अर्थात स्वत: खत्रीच बरोबर असल्याने ती जागा ओळखण्यात अजिबात अडचण येणार नव्हतीच! त्या सापळ्यावर कोणत्याही कपड्याचा धागादोरा मिळालेला नव्हता. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मृतदेह घळीत टाकण्यापूर्वी त्यावरचे कपडे काढून घेण्यात आले असावे असा रोहितने अंदाज केला. घळीचं निरीक्षण आटपून चढण चढून सर्वजण रस्त्यावर परतले. एव्हाना अकरा वाजत आले होते.

"खत्री, आपल्याला मंडी गावातली आणि आजूबाजूच्या गावांतली सगळी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चेक करावी लागतील."

खत्रींनी एकदम विचित्रं मुद्रेने त्याच्याकडे पाहिलं. हा माणूस वेडाबिडा तर नाही?

"सरजी, एकट्या मंडी गावातच हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस मिळून निदान सत्तर ते पंचाहत्तर तरी जागा असतील. त्याशिवाय हायवेला असलेली रिसॉर्ट्स वगैरे पकडली तर सहज शंभरावर आकडा जाईल! या प्रत्येक ठिकाणी चेक करायचं म्हणजे...."

"आय नो धिस इज अ टिडीयस जॉब खत्री!" त्यांचं वाक्यं अर्ध्यातच तोडत रोहित म्हणाला, "बट वी हॅव टू डू धिस! एक काम करा, तुमच्या टीमपैकी आवश्यक तेवढेच लोक पोलीस स्टेशनमध्ये ठेवा आणि इतर प्रत्येकाला आठ - दहा हॉटेल्सची लिस्ट द्या! एका लिस्टमधली हॉटेल्स आपण दोघं चेक करु! प्रत्येकाने आपल्या वाट्याच्या हॉटेल्समध्ये एकाच गोष्टीची चौकशी करायची आहे ती म्हणजे २६ ते २९ मार्च या दरम्यान शेखर द्विवेदी, प्रेरणा द्विवेदी किंवा रोशनी द्विवेदी यांच्यापैकी कोणी हॉटेलमध्ये उतरलं होतं का? जर एखाद्या हॉटेलमध्ये यांच्यापैकी कोणाच्याही नावाची एंट्री सापडली तर ताबडतोब तुम्हाला फोन करुन कळवण्याची त्यांना सूचना द्या! सगळा दिवस लागला तरी चालेल, पण एकूण एक हॉटेल, गेस्ट हाऊस आणि रिसॉर्ट्स चेक झाली पाहिजेत. नील रिपोर्ट इज ऑल्सो नेसेसरी!"

पोलीस स्टेशनमध्ये परत येताच खत्रींनी रोहितच्या सूचनेप्रमाणे आपल्या सहकार्‍यांना बोलावून घेतलं आणि त्यांना मंडी गावातला एकेक विभाग नेमून देत कामगिरीवर पिटाळलं. सब् इन्स्पे देवप्रकाशनी सिमल्याच्या दिशेने जाणार्‍या हायवेवरची हॉटेल्स तपासण्याची जबाबदारी उचलली होती तर खत्री आणि रोहित मनालीच्या दिशेन हायवेला लागून असलेल्या हॉटेल्सच्या दिशेने निघाले. एकेक हॉटेल तपासत दुपारचे चार वाजून गेले तरी काहीच आशादायक बातमी आलेली नव्हती. मंडी गावात असलेल्या हॉटेल्समधून तर खत्रींच्या सहकार्‍यांना नकारघंटाच ऐकायला मिळालेली होती. रोहित आनि खत्रींनीही मनालीच्या दिशेला असलेल्या जवळपास बारा हॉटेल्समध्ये केलेली चौकशीही निष्फळच ठरली होती.

'आपला अंदाच चुकला तर नाही? कदाचित तो सांगाडा वेगळ्याच एखाद्या तरुणीचा असेल. अखिलेश आणि श्वेता यांनी रोशनीला वेगळ्याच कोणत्यातरी ठिकाणी तर नेलं नसेल? कदाचित कमिशनर रावत म्हणाले त्याप्रमाणे बाकीच्या राज्यांमध्येही तपास करावा लागेल....'

रोहितच्या डोक्यात हे विचार येत असतानाच खत्रींचा मोबाईल वाजला.

"हॅलो... बोला देवप्रकाश... व्हेरी गुड... आम्ही येतो तिथे!"

खत्रींचं फोनवरचं बोलणं ऐकून आणि त्यांचा चेहरा पाहूनच रोहितने काय ते ओळखलं.

"चला खत्री! कुठे सापडले?"

"चंदन पॅलेस!" खत्री रुंद हास्यं करत उत्तरले.

चंदन पॅलेस मंडी गावापासून सुमारे पाच किमीवर हायवेला लागूनच असलेलं रिसॉर्ट होतं. रोहित आणि खत्रींना घेवून पोलीसांची जीप हॉटेलच्या आवारात शिरताच मॅनेजर धावतच जीपपाशी आला. तो खत्रींना ओळखत होता. सब् इन्स्पे देवप्रकाश आणि एक हवालदार गेल्या अर्ध्या तासापासून हॉटेलमध्येच होते. आता खत्री आलेले पाहताच तो चांगलाच नर्व्हस झाला होता. आपल्या हॉटेलवर वारंवार पोलीस येणं धंद्याच्या दृष्टीने मारक आहे हे समजण्याइतकं शहाणपण त्याच्यापाशी नक्कीच होतं.

"खत्रीसाब ये क्या माजरा है? अर्ध्या तासापासून देवप्रकाशसाहेब हॉटेलमध्ये बसलेले आहेत. त्यांनी विचारलेली सगळी इन्फॉर्मेशन मी आधीच त्यांना दिली आहे. तरीपण त्यांनी फोन करुन तुम्हाला बोलावलं! आता आणखीन काय बाकी राहिलं आहे? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड खत्रीसाहेब, हा आमच्या हॉटेलच्या रेप्युटेशनचा सवाल आहे!" मॅनेजर तक्रारीच्या सुरात म्हणाला.

"तुम्ही कोण?" रोहितने थंडपणे विचारलं.

मॅनेजरने रोहितकडे रोखून पाहिलं. साधी जीन्स आणि टी-शर्ट घातलेला हा तरूण आपल्याला प्रश्नं विचारणारा कोण असे भाव त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट उमटलेले दिसत होते.

"मी या हॉटेलचा मॅनेजर आहे! इथल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी माझी आहे!" मॅनेजर ताठ्यातच उत्तरला आणि खत्रींकडे वळला, "खत्रीसाब आणखीन किती वेळ लागणार आहे तुमच्या इन्क्वायरीला?"

"मॅनेजर, ही मर्डर केसची इन्क्वायरी सुरु आहे! सो प्लीज कोऑपरेट विथ अस! आणि राहिला प्रश्नं तुमच्या हॉटेलच्या रेप्युटेशनचा.... आमच्या इन्व्हेस्टीगेशनच्या दृष्टीने गरज पडली तर तुमचं सगळं हॉटेल सील करायला मी अजिबात मागेपुढे पाहणार नाही! सो, लेट अस डू अवर जॉब अ‍ॅन्ड यू माईन्ड युवर ओन बिझनेस! अ‍ॅज ऑफ नाऊ यू मे कंटीन्यू विथ युवर रुटीन!"

रोहितचा अशा काही सुरात म्हणाला की देवप्रकाश आणि खत्रीही दचकले. मॅनेजरची हवा तर पार टाईट झाली होती. हा माणूस आताच हॉटेल सील करतो की काय या कल्पनेने त्याला घाम फुटला होता! रोहित शांतपणे रिसेप्शनकडे वळला. त्याने मॅनेजरला दिलेला दम पाहून रिसेप्शनिस्टला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या! रोहितने चौकशी करताच त्याने अगदी उत्साहाने सर्व माहिती दिली.

"मिस्टर - मिसेस द्विवेदी आणि मिस द्विवेदींनी २७ मार्चच्या संध्याकाळी ५ वाजता चेक इन केलं होतं सर. हायवेवरुन जाणार्‍या गाड्यांच्या आवाजामुळे डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्यांनी चेक इन करताना मागच्या बाजूची कॉर्नरची रुम मागितली होती. त्यांच्या रिक्वेस्टप्रमाणे अ‍ॅव्हेलेबल असलेली रुम नं २१९ मी त्यांना दिली. त्यांना मनालीला जायचं होतं, पण अंधार पडल्यावर ड्रायव्हिंग करणं सेफ नाही असं मि. द्विवेदींना वाटत असल्यामुळे त्यांनी इथे मुक्काम केला होता. त्यांच्या ओरीजनल प्लॅनप्रमाणे ते दुसर्‍या दिवशी सकाळी मनालीला जाणार होते, पण मिसेस द्विवेदींची तब्येत थोडी बिघडली होती म्हणून ते दुसर्‍या दिवशी - २८ तारखेलाही इथेच राहिले होते."

"आय सी! मग त्या तिघांनी चेक-आऊट कधी केलं? दुसर्‍या दिवशी?

"तिघं नाही सर, मिस्टर - मिसेस द्विवेदींनी २९ मार्चच्या सकाळी सहा वाजता रुम चेक-आऊट केली आहे! त्यावेळी मिस द्विवेदी त्यांच्याबरोबर नव्हती!"

"आर यू शुअर? रोशनी नक्की त्यांच्याबरोबर नव्हती?"

"येस सर! इफ आय रिमेंबर करेक्टली सर, त्यांनी रुम चेक-आऊट करताना मी सहजच मिस् द्विवेदीची त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा अत्यंत अर्जंट काम निघाल्यामुळे तिला दिल्लीला जावं लागलं होतं आणि ते दोघं तिला रात्री उशिरा कुल्लू एअरपोर्टवर सोडायला गेले होते असं मि. द्विवेदींनी सांगितलं!"

"तुम्ही नक्की रोशनीला परत हॉटेलमध्ये आलेलं पाहिलं नाही? नीट आठवून सांगा! इट्स व्हेरी इमॉर्टंट."

"नाही सर! मिस द्विवेदी रिटर्न आलीच नाही! मिस्टर आणि मिसेस द्विवेदींनीच चेक-आऊट केलं!"

"आय सी! टेल मी वन थिंग, २८ मार्चच्या दिवसभरात जेव्हा ते तिघं इथे राहिले होते, त्यांच्यापैकी कोणी बाहेर गेलं होतं?"

"आय डोन्ट रिमेंबर एक्झॅक्टली सर, पण मि. द्विवेदी गेले असावेत!"

रोहितने आपल्या खिशातून काही फोटो काढून मॅनेजर, रिसेप्शनिस्ट आणि हॉटेलच्या इतर कर्मचार्‍यांसमोर ठेवले. रिसेप्शनीस्टने अखिलेश, श्वेता आणि रोशनीचे फोटो अचूक ओळखले होते. ते दोघंच शेखर आणि प्रेरणा द्विवेदी म्हणून रोशनीसह हॉटेलमध्ये राहिले होते याबद्दल आता कोणतीच शंका उरली नव्हती. रोहितने हॉटेलच्या स्टाफकडेही बारकाईने चौकशी केली, पण त्यातून फारसं काही हाती लागलं नाही. त्याने २१९ नंबरची ती रुमही तपासून पाहिली, पण गेल्या सहा - सात महिन्यांत अनेक लोक त्या रुममध्ये राहिलेले असल्याने त्यात काहीच अर्थ नव्हता.

रोहितने दीर्घ नि:श्वास सोडला. त्याचे विचार वेगाने धावत होते. रिसेप्शनिस्टचं म्हणणं बरोबर असेल तर २८ मार्चच्या रात्री रोशनीची हत्या करुन तिचा मृतदेह त्या घळीत टाकण्यात आला हा त्याचा अंदाज होता. त्या रात्री जेवण घेताना रोशनीला कोणता तरी अंमली पदार्थ खायला घालण्यात आला असावा आणि त्याचा परिणाम होताच गळा आवळून तिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह त्या घळीत टाकून अखिलेश आणि श्वेता रात्री चंदन पॅलेसला परतले असावे! रात्रीच्या अंधारातही ती घळ शोधण्यात अखिलेश आणि श्वेताला यश आलं होतं, त्या अर्थी त्यांनी ती जागा आधीच पाहून ठेवलेली होती हे उघड होतं. बहुधा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने जागा शोधण्यासाठीच एक दिवस तिथे मुक्काम वाढवण्यासाठी निमित्त म्हणून श्वेताने आपली तब्येत बिघडल्याचं नाटक केलं असावं!

"वन लास्ट क्वेश्चन, रात्रीचं ड्रायव्हिंग करायला लागू नये म्हणून द्विवेदी इथे राहिले होते राईट? ते कोणत्या गाडीने आले होते? त्यांच्या कारचा मेक, मॉडेल, लायसन्स प्लेट नंबर काही आहे?"

"त्यांची कार...." रिसेप्शनिस्टने पुन्हा रजिस्टर उघडलं, "त्यांच्याकडे काळ्या रंगाची इंडीगो होती! कारचा नंबर मात्रं आमच्याकडे नाही सर!"

"काळ्या रंगाची इंडीगो.... इथून येताना आणि जाताना मि. द्विवेदी स्वत:च ड्राईव्ह करत होते? का कोणी ड्रायव्हर होता?"

"ड्रायव्हर नाही सर! मि. द्विवेदी स्वत:च ड्राईव्ह करत होते."

हॉटेलमधली इन्क्वायरी आटपून रोहित आणि खत्री मंडी पोलीस स्टेशनमध्ये परतण्याच्या मार्गावर असतानाच रोहितचा मोबाईल वाजला. कदमांचं नाव दिसताच त्याने लगेच फोन उचलला.

"बोला कदम...."

"सर, डॉ. भरुचांचा फोन आला होता! डीएनए टेस्टचा रिपोर्ट आला आहे. वरळी सी फेसवर सापडलेल्या डेडबॉडीचा डीएनए महेंद्रप्रताप द्विवेदींच्या डेडबॉडीशी मॅच झालेला नाही! ती डेडबॉडी द्विवेदींच्या मुलीची नाही सर!"

"दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट आय एक्स्पपेक्टेड कदम! मी आत्ता हिमाचल प्रदेशात मंडी इथे आहे. अखिलेश आणि श्वेता यांनी रोशनीला सिमल्याहून इथे आणून तिचा खून केला हे इथल्या इन्क्वायरीतून समोर आलं आहे! रोशनीचा स्केलेटनही इथे सापडला आहे! आज सकाळीच त्या स्केलेटनवर सापडलेले केस मी डीएनए टेस्ट्ससाठी मुंबईला पाठवलेले आहेत. त्याचा डीएनए रिपोर्ट आला की मला ताबडतोब इन्फॉर्म करा!"

रात्री दहाच्या सुमाराला रोहित आपल्या हॉटेलवर परतला तेव्हा तो कमालीचा गंभीर झाला होता. रोशनीची हत्या करुन आणि तिचा मृतदेह त्या घळीत टाकून अखिलेश आणि श्वेता पसार झाले होते हे उघड होतं. २९ मार्चला श्वेता बिपिनचंद्र खेत्रपालच्या हॉस्टेलवर परतली तेव्हा ती मंडीहूनच आलेली असणार हा अंदाज सहजपणे करता येत होता. श्वेता सिमल्याला परतल्यावर दोन दिवसांनी महेंद्रप्रताप द्विवेदी रोशनीला मुंबईला नेण्यासाठी सिमल्याला पोहोचले होते. याचा अर्थ रोशनीचा खून होईपर्यंत जवाहर कौलने त्यांना सिमल्याचा पत्ता दिलेला नव्हता! जवाहरच या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे हे देखिल स्पष्टं होतं. त्यानेच अखिलेश आणि श्वेताकरवी रोशनीचा खून करवला होता आणि तिच्याजागी श्वेताला द्विवेदींबरोबर मुंबईला पाठवलं होतं याबद्दल रोहितची पक्की खात्री झाली होती. श्वेताच्या जोडीला तिचा कॉलेजमधला मित्रं म्हणून अखिलेशही मुंबईत आला होता. पण....

जवाहरविरुद्ध एकही पुरावा सापडत नव्हता....
सिमला किंवा मंडी इथे त्याला पाहणारा एकही माणूस पुढे आलेला नव्हता....
उलट तो कधीही सिमल्याला आलेला नाही हे हॉस्टेलच्या रेक्टर बहुगुणांनी ठामपणे सांगितलं होतं.

सर्वात महत्वाचा प्रश्नं होता तो म्हणजे श्वेताच्या मृत्यूला जबाबदार कोण?

जवाहर कौलने द्विवेदींकडून आधीच त्याने साठ लाख रुपये उकळले होते. रोशनीचा खून करुन तिच्याजागी जवाहरने श्वेताला प्लान्ट करण्यामागे तिच्यामार्फत त्यांचा पैसा आणि प्रॉपर्टी लाटण्याचा त्याचा प्लॅन असावा असं मानण्यास जागा होती. मुंबईला गेल्यावर आणि द्विवेदींच्या संपन्नतेची कल्पना आल्यावर श्वेताने जवाहरला झटकून एकटीनेच सगळ्या संपत्तीवर डल्ला मारण्याचा बेत केला, आणि म्हणून जवाहरनेच तिचा काटा काढला ही शक्यता नाकारता येत नव्हती.

जवाहरप्रमाणेच अखिलेशलाही टांग देण्याचा श्वेताचा बेत असावा आणि अखिलेशला हे कळल्यानंतर त्याने तिला संपवलं असणंही शक्यं होतं! पोस्टमॉर्टेम रिपोर्टप्रमाणे श्वेता प्रेग्नंट होती. हे मूल अखिलेशचंच असण्याची शक्यता होती. श्वेताला उडवल्यास अखिलेशला एक दगडात दोन पक्षी मारणं शक्यं होतं.

रेशमी आणि शेखर - चारु यांचाही श्वेताचा मृत्यू होण्यात फायदा होता. त्यांच्यापैकी कोणीही ती रोशनीच आहे हे समजून तिचा पत्ता साफ करणंही अशक्यं नव्हतं! रोशनीच्या मृत्यूबरोबरच द्विवेदींच्या प्रॉपर्टीतला एक हिस्सेदार कमी होणार होता.

रोशनीचा मृत्यू घडवून आणण्यामागे स्वत: महेंद्रप्रताप द्विवेदींचा काहीच हेतू नव्हता असं आतापर्यंत मानण्यास जागा होती, पण ती रोशनी नसून श्वेता होती हे डीएनए रिपोर्टमुळे निर्विवादपणे सिद्धं झाल्यावर स्वत: द्विवेदीही संशयापासून मुक्तं राहत नव्हते! ज्या मुलीला आपली मुलगी रोशनी समजून आपण गेल्या सहा महिन्यांपासून घरी ठेवलं होतं, ती प्रत्यक्षात आपल्या मुलीची खुनी आहे हे द्विवेदींना कळलं असलं तर? इन दॅट केस, द्विवेदींकडेही श्वेताचा जीव घेण्यास मोटीव्ह होता. सूड! स्वत:च्या मुलीच्या मृत्यूचा सूड!

या चौघांपैकीच कोणी श्वेताचा मृत्यू घडवून आणला होता का आणखीन कोणी वेगळीच व्यक्ती या सगळ्यामागे होती?

********

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet