Skip to main content

भारतीय पुरुषांचा कुरूपपणा - मुकुल केसवन

संकल्पना

भारतीय पुरुषांचा कुरूपपणा : केस, कळकटपणा आणि इतर रोचक बाबी.

मूळ लेखक - मुकुल केसवन

भाषांतर - मुक्तसुनीत

मूळ लेखाचा दुवा

काही वर्षांपूर्वीच मला अचानक लक्षात आलं, की हिंदी सिनेमातल्या नायिकांचं सुरेख दिसणं आणि नायकांचं कुरूप दिसणं यांत केवढा प्रचंड विरोधाभास जाणवतोय. मग याबद्दल थोडं संशोधन केल्यावर मी असा निष्कर्ष काढला, की हे असं असण्याचं मूळ कारण अगदी साधंसरळ आहे : हिंदी सिनेमातले पुरुष घाण दिसतात कारण ते मूलतः भारतीय पुरुष आहेत आणि भारतीय पुरुष अगदी ढळढळीतपणे भारतीय स्त्रियांपेक्षा कुरूप असतात. निव्वळ माझ्या सांगण्यावर जाऊ नका : भारतीय संदर्भांत जोडप्यांवर किंवा अगदी मोर्चे, शाळा, कॉलेजं, कचेर्‍या आणि घरोघरी वरवर नजर टाकली तरी हे अगदी सहज दिसेल.

माझं हे एकंदर निरीक्षण कितीही बरोबर असलं आणि त्याकरता मी केलेलं सर्वेक्षण कितीही अचूक असलं, तरी माझी एक चूक होत होतीच, आणि ती म्हणजे भारतीय पुरुषांच्या कुरूपपणाचं कारण नैसर्गिक आहे असं मी मानत होतो. नंतर माझ्या लक्षात आलं, की भारतीय पुरुष जन्मतः कुरूप नसतात; आपला कुरूपपणा त्यांनी प्रयत्नपूर्वक कमावलेला असतो. त्यांच्या दैनंदिन सवयींमुळे ते क्रमाक्रमाने कुरूप बनतात. अगदी अचूकपणे बोलायचं, तर केस, कळकटपणा आणि भयानक सवयी मिळून ही सामुदायिक कुरूपता बनलेली आहे.

आपण सुरुवात करू सगळ्यांत टोकाच्या गोष्टींनी. कुठल्याही भारतीय पुरुषाची नखं तपासा : नखांच्या मुळाशी हळदीचे डाग असतील आणि कुरतडलेल्या नखांच्या टोकांच्या आतल्या बाजूला साठलेली घाण दिसेल. ते आपली नखं कुठेकुठे घालतात हे लक्षात घेतलं, तर या बाबीबद्दल आश्चर्य वाटायला नको. भल्याभल्या असामींना बोलताबोलता आपली तर्जनी नाकात घालून हमसून हमसून खोदकाम करताना मी जवळून पाहिलेलं आहे. एखाद्या देसी इसमाला तुम्ही त्याच्या तर्जनीच्या टोकाला अंगठ्याच्या सपाटीवर हलकेच चोळताना पाहिलं तर सावधान व्हा! जवळ जाणं टाळा : कारण नुकतंच खोदकाम करून बाहेर काढलेल्या मालाच्या छोट्याछोट्या गोळ्या बनवण्याचं काम तिथे सुरू आहे.

... आणि मग उघड्यावर सर्वांसमोर स्वतःच्या कमरेखालच्या ऐवजाची सारवासारव करण्याकरता याच बोटांचा वापर केला जातो. प्रत्येक भारतीय पुरुष अगदी न चुकता हे करत असतो. त्यातल्या त्यात जे सभ्य असतात ते कुणाला कळणार नाही अशा बेतानं करतात, पण बहुतांश पुरुष अगदी कुठलीही लाजशरम न बाळगता करत असतात. एक सुप्रसिद्ध भारतीय फलंदाज आपल्या बॅटच्या दांडक्याने हजारो प्रेक्षकांसमोर हे खुशाल करतो. तुम्ही हे असं करत असलात, तर तुम्ही देखणे दिसूच शकत नाही. अगदी तुम्ही जॉन अब्राहमइतके देखणे असलात (या सर्व कुरूपपणाच्या संदर्भातला एक सन्माननीय अपवाद), तरी हे करताकरता तुमच्या देखणेपणाला बाधा येतेच. मग जो प्रकार आठवतो तो म्हणजे, तर्जनी किंवा अंगठा किंवा अगदीच नाही तर करंगळी कानात घालून मग ती अंगात संचारल्यागत जोरजोरात हलवायची. आणि हे करत असताना डोळे फिरवायचे आणि कधी हलक्या आवाजात चीत्कारसुद्धा काढायचे. हे असं करताना भारतीय स्त्रिया कधी दिसणार नाहीत: फक्त पुरुषच असे महान प्रकार करताना आढळतात. कुरूपतेच्या ध्येयाकडे पोचण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

भारतीय पुरुषांनी विविध प्रसंगी काढलेले वेगवेगळे आवाज हा त्यांच्या कुरूपतेचा एक महत्त्वाचा पैलू आहे. उदाहरणार्थ, एखाद्या भारतीय पुरुषाला सर्दी झालेली असली, तर चारचौघांसमोर तो घशातला खाकरा खरवडून काढेल आणि गिळून टाकेल. तो हे परतपरत करत राहील - कुणाला किती घाण वाटत असेल याची यत्किंचितही चिंता न करता! जेवत असताना घास गिळताना आपलं तोंड बंद करण्याची पद्धत मुळातच नसल्यानं जे आवाज निघतात त्याबद्दल म्यां पामरें काय बोलावें!
आणि ज्यांना 'आपण हे असलं काही करत नाही' असं वाटतं तेदखील ते करतातच. घास गिळताना शेवटचे कण टिपताना ते भुरका मारल्याचा आवाज करतातच. हे तपासून बघायचं असेल तर ते द्राक्षं खाताना निरखून पाहा. सर्वांत जास्त आवाज माझ्या मते द्राक्षांचा होतो.

पण या सर्व गोष्टींपेक्षा भारतीय पुरुषांच्या कुरूपतेमधे सर्वाधिक मोलाचा वाटा असेल, तर तो त्यांच्या केसांबद्दलच्या सवयींचा. भारतीय उपखंडातले सरासरी नव्वद टक्के पुरुष मिशा राखतात - जणू त्यांचा सगळा पुरुषार्थ त्या मिशीतच एकवटला आहे. दाढी आणि मिशीसकट केस राखण्याचा, त्यांची निगा राखण्याचा जो योग्य प्रकार आहे त्याबद्दल मी इथे बोलत नाही. फक्त मिशी उगवण्याबद्दल बोलतोय. इथेसुद्धा बर्‍यापैकी केसाळ, झपाटास्टाईल मिशाही एकवेळ परवडल्या. पण भारतीय पुरुषांना एकतर झुबकेदार मिशा तरी आवडतात, नाहीतर कातरलेल्या. पहिल्या प्रकारात मिशीवाला यडपट दिसतो तर दुसर्‍यामधे काडेचिराईत - किंवा त्याही अगदीच कोरलेल्या असतील तर लैंगिक विकृती असल्यासारखा.

...आणि मग मध्यमवयीन पुरुष यावर काहीतरी मल्लिनाथी म्हणून मिशांना काळी चमक येईस्तोवर रंगवतात मात्र त्या मुळापाशी तशाच अर्धवट सोडल्यामुळे विचित्र दिसतात. किंवा मग, जनरल मुशर्रफ करतात तसं डोक्यावरचे केस काळे रंगवतात पण कल्ले तसेच करडे ठेवतात. असं केल्यामुळे त्यांना असं वाटतं, की आपण काहीतरी अमीर-उमराव दिसत असणार. तसं न होता, उलट ते बेगडी मोटारविक्यासारखे दिसायला लागतात.

भारतीय पुरुषांची रया अगदीच वाईट तर्‍हेने जाते कारण बहुधा त्यांच्याकडे असे जादूचे आरसे असावेत, की ज्यांत पाहिलं असतां प्रौढत्वाचे परिणाम दिसत नसावेत. उदाहरणार्थ, नाकपुड्यांमधून बाहेर येत चाललेलं केसांचं तण त्यांना दिसत नाही आणि म्हणून ते कधी सफाचाट केलं जात नाही. त्याहूनही वाईट म्हणजे कानातून फ्लॉवरपॉटसारखे वाढलेले केस त्यांना दिसत नाहीत. स्वतःच्या रूपड्याला आंजारण्यागोंजारण्याची त्यांची प्रवृत्ती इतकी पूर्णत्वाला गेलेली आणि वास्तवापासून इतकी विलग झालेली असते, की बहुधा आरशात त्यांना स्वतःचं वर्तमानकाळातलं प्रतिबिंब न दिसता, वीस वर्षं आणि वीस किलोंपूर्वीचं दिसत असतं.

बप्पी लाहिरी श्रेया घोषाल

वैयक्तिकदृष्ट्या मला भारतीय पुरुषांची कुठली गोष्ट सर्वाधिक विचित्र वाटते, तर ती म्हणजे, ते परिधान करत असलेल्या गोष्टी. इथे मी त्यांच्या वस्त्रांबद्दल बोलायला लागलो, तर एखादा जाडजूड ग्रंथच लिहावा लागेल. आपण अगदी बारक्याबारक्या गोष्टी जरी पाहिल्या तरी पुरे. उदाहरणार्थ, विशेषतः उत्तर भारताकडचे पुरुष मनगटांभोवती कुजत चाललेलं जाडसरसं गुलाबी रंगाच्या धाग्यांचं बंडल बांधतात ते पाहा. त्या धाग्यांचा रंग विटून ते पुरते विरतविरत गळून पडेपर्यंत वागवायला नक्कीच काहीतरी धार्मिक कारण असणार. मग या न्यायाने, जर का, आपल्या त्वचेचा सगळा मळ आणि घाम लागणारं असं काही इतकं मिरवत असू, तर मग आपण रोज घालायचे कपडे तरी कशाला बदलायचे? तेही तसेच ठेवायचे ना! असो.

आणि मग आठवतात त्यांनी गळ्याभोवती घातलेले विविध अलंकार. एक नव्हे, तर कित्येक माळा.. एकाचवेळी. आणि हे करून जणू समाधान नाही म्हणून, शर्टाची बटणं उघडी ठेवायची; जेणेकरून केसाळ छातीमधले गुंतवळ मोठमोठ्या पुंजक्यांसमवेत त्यांच्या त्या लॉकेटांमधे नि चेनींमधे अडकून शोभा वाढवतात. क्रिकेटपटू श्रीसंत आणि गांगुली हे त्या इतक्या प्रमाणात घालताना दिसतात, की जणू ते बेगडी दागिन्यांचे फिरते विक्रेते असावेत.

आणि भारतीय पुरुषांच्या कुरूपपणाचा कुठलाही आढावा त्यांनी बोटांत घातलेल्या अंगठ्यांच्या उल्लेखाशिवाय अपुरा ठरेल. परत इथेही, एखादीच, चांगल्या दर्जाची, साखरपुड्याची अंगठी असावी.. तर ते नाही. वेगवेगळे 'खडे' चढवलेले आणि त्या खड्यांभोवती डागडाग असलेलं चांदीचं पाणी चढवलेलं कोंदण अशा अत्यंत सस्त्या. आणि मग दोन्ही हातांच्या सर्व बोटांवर त्या चढवायच्या - कधीकधी अंगठ्यावरसुद्धा. आणि अर्थातच सर्वसामान्य भारतीय पुरुषांची बोटं निमुळती आणि बारीक नसल्यामुळे सॉसेजेसवर बेड्या चढवल्यासारखं हे एकंदर दिसत राहतं.

का वागतात असं भारतीय पुरुष? आपण कसे दिसत असू, समोरच्याला काय वाटत असेल याबद्दलचा त्यांचा बेदरकारपणा अगदी बुलेट्प्रूफ वाटावा असा कसा असतो? आणि त्यामुळे अगदी भीषण प्रमाणात घाणेरडं कायतरी दिसावं हे ते नेमकं कसं साधतात? थोडा विचार केला, तर असं लक्षात येतं, की अगदी लहानपणापासून भारतीय घरात वाढणार्‍या मुलांच्या मनांवर कळतनकळत आपण कोणीतरी स्पेशल असल्याची भावना बिंबवली जात असते. आणि अर्थात राहता राहिलेली एक बाब : जातीच्या सुंदर असलेल्या भारतीय स्त्रियांबरोबर बिचार्‍यांना नेहमी उभं राहावं लागतं. हे विसरून कसं चालेल?

विशेषांक प्रकार

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 04/11/2018 - 20:27

हा लेख एक नंबर आवडलेला आहे. मूळ लेखही आवडला होताच; भाषांतर वाचून पुन्हा मजा आली.

अस्वल Sun, 04/11/2018 - 23:16

अंकल लोकांसाठी हे कदाचित खरं असेल. पण -

हे गृहितक २००० नंतर प्रचंड बदललेलं आहे, असं निरीक्षण आहे.
metrosexual वगैरे लेबलांनी वर्णन केलेला पुरूष असल्या गोष्टी कदापि सहन करणार नाही.

राजन बापट Sun, 04/11/2018 - 23:44

In reply to by अस्वल

मूळ लेख २००७ सालचा आहे. लेखातली वापरलेली काही उदाहरणं - ज्यांमधे गांगुली प्रभृतींचा समावेश होतो - त्यांचा सार्वजनिक वावर २००० सालानंतरचा आहे.

अर्थात, लेखकाची निरीक्षणं आणि अन्य लोकांची निरीक्षणं यात फरक असणं शक्य आहे इतकंच नव्हे तर अपरिहार्यच. तो वादाचा मुद्दा नाही.

metrosexual पुरुषांची संख्या - विशेष करून भारतीय संदर्भात - पुरुषजमातीचं क्रिटिकल मास मोजलं जावं इतपत इतपत आहे असं म्हणणं असल्यास त्याबद्दल सहमत होण्याशी असहमती नोंदवता येईल.

चिंतातुर जंतू Wed, 07/11/2018 - 13:29

In reply to by अस्वल

metrosexual वगैरे लेबलांनी वर्णन केलेला पुरूष असल्या गोष्टी कदापि सहन करणार नाही.

मेट्रोसेक्शुअल पुरुषांच्यादेखील गचाळपणाच्या गंमती असतात; फक्त त्या बघायला नजर आणि नाक वगैरे अवयव तयार पाहिजेत. मुळात, आजदेखील भारतीय पुरुषांमध्ये खरे मेट्रोसेक्शुअल म्हणावेत असे पुरुष अगदीच अल्पसंख्य आहेत. वरवर पाहता तसे वाटणारे मुंबई-दिल्लीतले कॉर्पोरेट जगात वगैरे वावरणारे बरेचसे पुरुष वृत्तीत गचाळ असतात. एक साधं उदाहरण सांगतो - यांतल्या कित्येकांना मसालेदार तिखट जेवण करायला आवडतं आणि ते केल्यावर चारचौघांसमोर ते दातकोरणं वापरतात; किंवा हात स्वच्छ साबणानं धूत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या पेडिक्युअर्ड नखांखाली हळदीचा पिवळा रंग दिसतो आणि त्यांच्या बोटांना ओशट मसाल्यांचा वास येतो. किंवा, दुपारच्या जेवणात कच्चा कांदा-लसूण खाल्ला आणि नंतर मीटिंगला गेलं तर बंद एसी खोलीत तुमच्या तोंडाचा दुर्गंध दरवळतो हे त्यांच्या ध्यानीमनी नसतं.

१४टॅन Wed, 07/11/2018 - 13:49

In reply to by चिंतातुर जंतू

उगीच नस्त्या ठिकाणी एम्सीपी होण्यात अर्थ नाही.
चिंजंनी लिहीलेल्या गोष्टींबरोबरच: पार्किंगचा काऽहीही सेन्स न बाळगणे, रस्त्यावर पान/तंबाखू/गुटखा थुंकणे, मोबाईलवर मोठ्ठ्याने बोलणे, कचरा टाकणे आदी गोष्टी सर्रास केल्या जातात. अर्थात, मुंबईत गरजेच्या हिशोबात साधारण १०% पार्किंग स्पेस आणि कचरापेट्या आहेत हाही एक मुद्दा आहेच.

अतिशहाणा Wed, 07/11/2018 - 18:41

In reply to by अस्वल

हा लेख म्हणजे अमेरिकेत ढुंगणावरून खाली सरकणारी प्यांट (अंडरप्याण्ट दाखवणारे काळे किंवा थेट ढुङगण दाखवणारे गोरे)चे उदाहरण घेऊन समस्त अमेरिकजनांचे सरसकटीकरण केल्यासारखा आहे.

फारएण्ड Wed, 07/11/2018 - 21:19

धमाल आहे हे! मजा आली.

बेगडी मोटारविक्या - हे समजले नाही. इंग्लिश मधे यूज्ड कार सेल्समन ही टर्म अनेकदा वापरली जाते, तसे काही आहे का?

तो क्रिकेटपटू कोणता ते पटकन आठवले नाही. मात्र खांद्यावर सगळ्या टीम चे ओझे, देशाच्या अपेक्शांचे ओझे आणि ते "व्यवस्थित खाली डिस्ट्रिब्यूट होत नसेल" तर होणारी अवघडलेली अवस्था, आउट व्हायचे नसल्याने बराच काळ प्रायव्हसी नसणे, या कारणांमुळे तो जो कोणी असेल त्याला माफ करायला हवे :) बाय द वे, ती सारवासारव "ॲब्डोमेन गार्ड" ची असावी - एकतर गरजेमुळे केलेली, किंवा एक क्रीजवरची रिच्युअल म्हणून.

अस्वल Wed, 07/11/2018 - 22:52

In reply to by फारएण्ड

एक सुप्रसिद्ध भारतीय फलंदाज आपल्या बॅटच्या दांडक्याने हजारो प्रेक्षकांसमोर हे खुशाल करतो

हे सचिनबद्दल आहे असं वाटत नाही.
एकतर तो बॅटने हे उद्योग करीत नसे, सरळ हातानेच गार्ड ॲड्जस्ट करायचा ना?
>> बाय द वे, ती सारवासारव "ॲब्डोमेन गार्ड" ची असावी - एकतर गरजेमुळे केलेली, किंवा एक क्रीजवरची रिच्युअल म्हणून
+१

केसवन क्रिकेटबद्दल लिहिणारे लेखक आहेत, त्यांच्याकडून इतकी बेसिक चूक होईल असं वाटत नाही.

अनुप ढेरे Thu, 08/11/2018 - 11:21

In reply to by फारएण्ड

लेखकाने नदालचं चड्डी ठिकठाक करणं पाहिलं नसावं. रॉबिन सोडरलिंगने भर कोर्टवर त्या कृतीची नक्कलदेखील केलेली.

मारवा Thu, 08/11/2018 - 18:26

लेख प्रचंड विनोदी आही. पुर्वी एकदा याहुन अधिक विनोदी लेख सुधीर गाडगीळांचा वाचलेला आहे.
हा गाडगीळांचा विनोदी लेख मुकुल केसवन यांना धाडावा अशी विनंती आहे.
दोन्ही लेख आजु बाजुला ठेवल्यावर कुरुपपणा चा उगम आणि प्रेरणा लक्षात येते.
"जातीच्या सुंदर असलेल्या भारतीय स्त्रियांबरोबर बिचार्‍यांना नेहमी उभं राहावं लागतं." सारख्या झकास धाडसी विनोदी वाक्यांवर तर अजुन मजा आली.
सुधीर गाडगीळचा लेख
http://www.adwaitjoshi.com/articles/ck1.php

या लेखावरुन अनेक विनोदी लेख लिहीण्याची प्रेरणा मिळत आहे.
उदा. भारतीय भाजीबाजारांतला कुरुपपणा
किंवा भारतीय मासळी चे जातिवंत सौंदर्य

चिंतातुर जंतू Fri, 09/11/2018 - 10:15

In reply to by मारवा

पुर्वी एकदा याहुन अधिक विनोदी लेख सुधीर गाडगीळांचा वाचलेला आहे.

गाडगिळांचा लेख आत्मस्तुतीनं इतका बरबटलेला आहे की त्यात काही गंमत असलीच तर ती अनवधानानं झालेली आहे. उदा. बायका कधी भडक रंगाच्या साड्या नेसणार नाहीत, ह्यात काहीच अर्थ नाही. उलट 'गौरवर्णालाच भडक रंग शोभतात; बाकी जातींनी भडक रंग वापरूच नयेत.' टाइप आढ्यताखोर संवाद मी स्वतः ऐकलेले आहेत. आणि भर रस्त्यात वेगवेगळे अवयव खाजवत चालणारे किंवा भोकाचे पिवळट वगैरे बनियन घातलेले कोंकणस्थ पूर्वी ४११०३०मध्ये पुष्कळच पाहिलेले आहेत. बाकी अधाशासारखं न जेवणं वगैरे आरोप पाहता पेशवाईतले रमणे आणि त्यातले आकंठ जेवण्याचे किस्से ह्यांनी कानाआड केले होते एवढंच दर्शवतात. (जाणकार सोडून इतरांसाठी - आकंठ = आज काय जेवलात? अशा प्रश्नावर कंठात बोट घालून श्रीखंडाचा घास दाखवता येईल इतके जेवणे, वगैरे) इतकंच नव्हे, तर आपल्याच लिखाणातला 'पैजा लावून परातभर जिलब्या' वगैरे भाग ह्यांनी नजरेआड केला आहे.

अस्वल Sat, 10/11/2018 - 00:25

In reply to by चिमणराव

उदा. गाऊन ह्या नावाने सुपरिचित असणारं वस्त्र घालून स्वत:च्या बेडरूमपासून गेटवेऑफ ईंडियापर्यंत फिरणे - हा भारतीय स्त्रियांचा फार वरचा नंबर पटकावणारा कळकटपणा आहे.

भारतीय पुर्शांचा कळकटपणा अंगभूत बाणवल्याने पुढल्या वेळी जर मी रेस्टॉरंटात बसून कानातला मळ काढत असेन तर मला हे आठवून तितकसं वाईट वाटणार नाही.

अमुक Sat, 10/11/2018 - 02:20

In reply to by अस्वल

उदा. गाऊन ह्या नावाने सुपरिचित असणारं वस्त्र घालून स्वत:च्या बेडरूमपासून गेटवेऑफ ईंडियापर्यंत फिरणे - हा भारतीय स्त्रियांचा फार वरचा नंबर पटकावणारा कळकटपणा आहे.
..... रे भालवा, कहाँ फेडोगे यह पाsप?!!? हे गाऊनगुणगान नाही वाचलं का?

अस्वल Sat, 10/11/2018 - 03:11

In reply to by अमुक

डॅम इट

गाऊनलाच खरं तर "महावस्त्र" म्हणायला हवं हे पटवून देण्यात लेखिका कमालीची यशस्वी झाली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/11/2018 - 21:51

In reply to by चिंतातुर जंतू

मला वाटलं, मारवा यांचा संपूर्ण प्रतिसाद खवचट-विनोदी आहे. एरवी कोब्रांकडून 'आपणच गोरे म्हणून आपणच सुंदर' अशा कॉमेंटा, अगदी घाऱ्या-गोऱ्या (म्हणून पंडुरोगी वाटणाऱ्या) काडीपैलवान पुरुषांच्या तोंडीही ऐकल्या आहेत. एकच मिलिंद सोमण, बाकीचे, ह्यँ ह्यँ ह्यँ.

त्यातून संघस्थापना केली असेल वैदर्भी लोकांनी. ठाण्यात, आमच्या परिचयाचे बरेचसे संघवाले लोक कोकणस्थ. संघाच्या हापचड्ड्या घालणाऱ्या कोणत्याही इसमावर सौंदर्यदृष्टी असण्याचा आरोप मी करू शकत नाही.

कोकणस्थ लोकांची सौंदर्य'बुद्धी' म्हणजे, व्यक्ती गोरी असेल तर सुंदर आणि चित्रात काटकोनातल्या रेषा = सुंदर. अक्कल आल्यापासून 'मी सुंदर दिसते का काय' याची भीती वाटायची (यात भीती वाटण्यासारखं काय आहे, हा निराळाच विषय आहे). समस्त परिचित-कोकणस्थ जंता मला आणखी भिववायची; कारण गोरा वर्ण. त्यात निदान वडील कोकणस्थ नाहीत, आणि त्यांचा वर्णही अजिबातच गोरागोमटा नव्हता, याचा दिलासा (मला) होता. दोन-तीन वर्षांपूर्वी एका ओळखीच्या कोकणस्थ काकांनी, "तू पूर्वीसारखी सुंदर राहिली नाहीस, रापलीस फार", असं साटल्यानं ऐकवलं. भय-वेड पार सारे, रापण्यासवे उडाले।

चिमणराव Thu, 08/11/2018 - 18:37

टेस्ट साम्पलस चुकले की अनुमानही चुकतात.
ज्या बायांना चांगले पुरुष हवेत त्या चांगले निवडतात, श्रीमंत हवेत त्या श्रीमंत निवडतात.
इतरांची फिकिर कशाला करा?

चिमणराव Thu, 08/11/2018 - 18:42

केसांना, डोक्यावर बचकभर खोबऱ्याचं तेल घालतात, परंपरा म्हणून?
तेल अल्ट्रावाइलट किरण शोषतं. दक्षिण भारतात लावतातच. खूप खाद्यतेल वापरलं की खवटपणा,खाज येणारच.

प्रकाश घाटपांडे Fri, 09/11/2018 - 10:55

ही तर अकृत्रिम निसर्गसुलभ प्रेरणा! सहज प्रतिक्षिप्त क्रिया! शी बुवा तुम्ही कशालाही कळ्कट्पना म्हण्ता! येटिकेट म्यानर्स खाली आत्मदमन करताय!

प्रकाश घाटपांडे Fri, 09/11/2018 - 13:52

गदिमांच गाण आठवल
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 10/11/2018 - 05:04

केसवन आणि मुक्तसुनीत यांनी आपण स्वतःला काय म्हणून ओळखतो, त्या जमातीची टिंगल केली आहे. एका भारतीय पुरुषानं सुरुवात केली, दुसऱ्यानं भाषांतर केलं. त्यावर अन्य 'संवेदनशील' भारतीय पुरुषांच्या निषेधसम प्रतिक्रियाही रंजक आहेत. हिंदूंच्या अंधश्रद्धांवर (सांस्कृतिक) हिंदूंनी टीका केली की "त्यांच्यावर टीका करायची हिंमत आहे का" म्हणणारे, मोठ्या संख्येत याच - भारतीय पुरुष - समूहाचे घटक असतात. त्यामुळे खरं तर त्यात नावीन्य नाही; 'संवेदनशील' हिंदू गटात न दिसणारे पुरुष या कुरूप-भारतीय-पुरुषांबद्दल संवेदनशील होताना बघून गंमत वाटली खरी. (माझा निरागसपणा थोडाफार टिकून आहे तर!)

पुरुषांनी स्त्रियांची टिंगल करणं यात काही नवीन नाही; शिवाय इतिहास आणि सामाजिक परिस्थितीमुळे त्यात दुष्टपणाही येतो.

अस्वल Sat, 10/11/2018 - 05:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तसं नाय.
टिंगल कुणीही कुणाचीही कशीही कुठेही करावी.
अर्थात "कुर्यात सदा टिंगलम्".

नखं खाल्ली म्हणून पुरूषांची करा
नखं रंगवली म्हणून स्त्रियांची करा,
नखं मारली म्हणून मांजरांची करा
नखं खुपसली म्हणून शिवाजीची करा
आणि नखं खुपसून घेतली म्हणून अफजुलखानाचीपण करा.

असं आहे ते.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 10/11/2018 - 07:20

In reply to by अस्वल

माझ्या आजूबाजूला फेसबुकवर कालपासून गाजणारा लेख कोणता? पुलंच्या साहित्यात स्त्रियांचं चित्रण कसं आहे? (दुवा)
पुलंच्या साहित्यातली, जरा नोकरी-बिकरी करणारी सरोज खरे ओठांना ओठ न लावता बोलते; मध्यमवयीन स्त्रिया कोणाच्या ना कोणाच्या कजाग बायका असतात, किंवा स्वयंपाकघरात गांजलेल्या.

पुलं आज असते तर ९९ वर्षांचे असते.

विचार करताना मला स्वतःच्या नखांकडे बघण्याची किंवा नखं कुरतडण्याची सवय आहे. बरा अर्धा त्या सवयीची टिंगल करतो. त्याला विचार करताना स्वतःचे केस आणखी कुरळे करण्याची सवय आहे; मी त्यावरून टिंगल करते.