मराठी विनोदी साहित्याची सफर

संकल्पना

मराठी विनोदी साहित्याची सफर

- प्रदीप कुलकर्णी

आधुनिक मराठी वाङ्‌मयातल्या विनोदी लेखनाचा कालखंड श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१८७१-१९३४) यांच्या लेखनानं विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाला. कोल्हटकरांच्या आधीच्या काळातल्या मराठी वाङ्‌मयात विनोद मुबलक प्रमाणात नसला, तरी विनोदाचा अगदीच अभाव नव्हता. त्या काळातल्या साहित्यात विनोदाचा वापर हा मुख्यत: गंभीर कथानकाचा ताण कमी करण्यासाठी केला जायचा. त्यामुळे विनोदाला साहित्यामध्ये दुय्यम स्थान होतं. १९व्या शतकातल्या मराठी वाङ्‌मयातला विनोद प्रामुख्याने किस्से, चुटके, आख्यायिका अशा फुटकळ स्वरूपात होता. तमाशा आणि फार्स या कलाप्रकारांतूनही तो व्यक्त होऊ लागला होता.

इंग्रजांच्या राजवटीत अनेक नियतकालिकं आणि पुस्तकं भारतात आली. त्यामुळेच भारतीयांना पाश्चात्त्य वाङ्‌मयातल्या विनोदाची ओळख झाली. त्यातूनच उपहास, उपरोध, कोटी या विनोदाच्या प्रकारांचा आणि विनोदनिर्मितीच्या विविध तंत्रांचा परिचय झाला. हे वाङ्‌मय वाचून कोल्हटकरांना विनोदी लेखनाची प्रेरणा मिळाली. पाश्चात्त्य लेखकांच्या विनोदनिर्मितीची तंत्रं वापरून कोल्हटकरांनी आपल्या देशातील अनेक सामाजिक समस्यांवर लेखन करायला सुरुवात केली.

कोल्हटकरांनी १९०२ साली 'साक्षीदार' हा निबंध लिहिला. तो आधुनिक मराठी वाङ्‌मयातला पहिला विनोदी निबंध मानला जातो. कोल्हटकरांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात हिंदू धर्मातल्या अनेक अनिष्ट, निरर्थक आणि खुळचट प्रथा हास्यास्पद ठरवण्यासाठी विनोदी निबंध लिहिले. या प्रथा नष्ट व्हाव्यात आणि विवेकी समाज निर्माण व्हावा, याची तळमळ त्यांना लागून राहिली होती. या रूढींवर सरळसरळ कोरडे ओढण्याऐवजी कोल्हटकरांनी हसतखेळत त्यांचा उपहास केला. व्रतवैकल्यं, पाप-पुण्य, सणवार, सोवळंओवळं या विषयांसंबंधीचे सामाजिक आचारविचार किती प्रतिगामी आणि हास्यास्पद आहेत याची जाणीव कोल्हटकरांनी आपल्या विनोदी लेखनातून करून दिली.

एखाद्या धार्मिक प्रथेवर टीका करताना आपण प्रत्यक्षात त्या प्रथेच्या बाजूचेच आहोत असं भासवून, या प्रथा किती फोल, विसंगत आणि हास्यास्पद आहेत हे दाखवण्याची पद्धत कोल्हटकरांनी त्यांच्या बऱ्याच निबंधांमध्ये वापरली आहे. आपल्याला जे म्हणायचं आहे, त्याच्या विरुद्ध बोलून अपेक्षित परिणाम साधणारी शैली कोल्हटकरांनी विकसित केली होती. या शैलीचा नमुना पाहण्यासाठी शिमगा या त्यांच्या निबंधाचं उदाहरण घेता येईल. (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, 'सुदाम्याचे पोहे', पृ.२०-२२)

आमच्या गावात इतर सणांप्रमाणे शिमग्याबद्दलही गावकऱ्यांध्ये पूज्य बुद्धी असल्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. या सणापूर्वी एक महिन्यापासून लहान मुलांना अचकटविचकट लावण्यांची व अभद्र शब्दांची तालीम देण्यात येते. त्याचप्रमाणे शेणाचे गोळे अचूक कसे मारावे, पांचजन्याचे (बोंब मारण्याचे) प्रकार किती आहेत, याचेही आस्थापूर्वक शिक्षण दिले जाते.

…शंभर-दोनशे माणसांची टोळी बंडूनानांच्या घरापासून निघून गावातील राजमार्गाने, अनेक चेष्टा करीत कूच करू लागते. अशा वेळी गावातील कोणाही संभावित स्त्रीला त्या मार्गाने जाण्याचे धैर्य होत नाही. इतकेच नाही तर, एखादीने अशा प्रसंगी खिडकीतून तोंड जरी बाहेर काढले, तरी तिच्या नावाने पांचजन्य करून व शिव्या देऊन आम्ही तिला मर्यादशीलपणाचा असा धडा शिकवतो की, तिला जन्मभर त्याची आठवण राहावी!

होळीसाठी लाकडं मिळवण्याकरता आमची आधीपासूनच खटपट सुरू असते. गावकऱ्यांच्या घरातील लाकडे चोरण्यासाठी आमचे हेर अहोरात्र फिरत असतात. लाकडे न मिळाल्यास वाटेल ती लाकडी वस्तू - फाटक, दार, खुर्ची, टेबल, पोळपाट, लाटणे, मुसळ, भोवरा, चाक, रहाट, चौरंग, कठडा, खुंटी चोरून आणण्यास बंडूनानांचा वटहुकूम सुटलेला असतो. एकदा तर एका संन्याशाच्या खडावा आणि एका गृहस्थाचा बुद्धिबळाचा डाव अग्नये स्वाहा करण्यात आला!

कोल्हटकरांचं बरंचसं विनोदी लेखन हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथांना हास्यास्पद करणारं असलं, तरी त्यांनी इतर अनेक विषयांवरसुद्धा विनोदी लेखन केलं आहे. त्यामध्ये 'बैठे खेळ', 'म्हातारपणाचे फायदे' इत्यादी निबंधांचा समावेश करावा लागेल. या निबंधांमधला कोल्हटकरांचा विनोद वेगळ्या प्रकारचा आहे. त्यात उपहास आणि उपरोधाचा लवलेशही नसल्यामुळे तो निखळ आनंद देणारा आहे. कोल्हटकरांनी विविध विषयांवर वेळोवेळी लिहिलेल्या अठरा विनोदी निबंधांचा संग्रह सुदाम्याचे पोहे या नावाने १९१० साली प्रसिद्ध झाला. या पुस्तकामुळे एक उत्तम विनोदी लेखक म्हणून कोल्हटकरांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली.

'म्हातारपणाचे फायदे' निबंधातल्या विनोदाला कारुण्याची किनार आहे. निसर्गनियमाप्रमाणे सर्वांनाच म्हातारपण येतं. ते क्लेशकारक असलं, तरी अटळ असल्यामुळे त्याविषयी दु:ख करत बसण्यापेक्षा त्याकडे खेळकरपणाने पाहण्यातच शहाणपण आहे हे कोल्हटकरांनी ओळखलं होतं. म्हणूनच म्हातारपणाचे फायदे सांगताना ते म्हणतात - (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, 'सुदाम्याचे पोहे', पृ.१७३-१७६)

''म्हातारपणाचा पहिला मोठा फायदा म्हटला म्हणजे त्याची दात घासण्याची दगदग नाहीशी होते आणि त्यामुळे राखुंडीचा व दंतमंजनाचा खर्च वाचतो. ठेच लागून पडल्यास दात पडण्याची म्हाताऱ्यास मुळीच भीती नसते. शिवाय म्हाताऱ्यावर 'दात कोरून पोट भरण्याचा' कोणी आरोप ठेवीत नाही. त्याने कोणाची कितीही आगळीक केली, तरी त्याला त्याजकडून 'बत्तिशी रंगवण्या'ची धमकी मिळत नाही. त्याने कोणाचा कितीही उपहास केला, तरी त्याला 'दात का विचकतोस?' असे म्हणण्याची त्याची छाती होत नाही. तसेच, त्याने सांगितलेली गप्प केवळ 'दंतकथा' आहे, असे त्याच्या तोंडावर कोणासही सांगता येत नाही.

म्हातारा ठेंगण्या दरवाजातून जाताना त्याच्या कपाळास कधी टेंगूळ येत नाही व जमिनीवरचा पदार्थ उचलताना त्याला कधीही मुद्दाम वाकावे लागत नाही. तसेच, त्याला कधी राग आल्यास कपाळाला मुद्दाम आठ्या घालाव्या लागत नाहीत व पसंती अगर नकार दर्शवताना मान मुद्दाम हलवण्याची तसदी घ्यावयास नको. डोक्यास टक्कल पडले असल्यास त्याचा हजामतीचा खर्च वाचतो, तो निराळाच! अंगात रक्त नसल्याने ढेकूण आणि डास त्याच्या कधी वाटेला जात नाहीत.

म्हातारपणीच्या विस्मृतीमुळे पुष्कळदा आदल्या दिवशी वाचलेली गोष्ट दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्याच्या लक्षात राहात नाही; त्यामुळे तेच ते पुस्तक त्याला दरखेपेस तितकेच मनोरंजक वाटू लागते व या रीतीने नवी नवी पुस्तके घेण्याचा उपद्व्याप व खर्च वाचतो.

म्हातारपणापासून सर्वांत मोठा फायदा तो हा की, म्हाताऱ्यांशी तरुण मुली अगदी मोकळ्या व निष्कपट मनाने वागतात.''

या निबंधाचा विषय सार्वत्रिक आणि स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून जाणारा असल्यामुळे, त्याचं भाषांतर जगातल्या कुठल्याही भाषेत केलं, तरी त्यातला विनोद त्या-त्या भाषकांना हसवेल आणि त्याच वेळी त्यांच्या अंत:करणाला भिडेल यात काही शंका नाही.

कोल्हटकरांचं मोठेपण अनेक कारणांसाठी मान्य केलं पाहिजे. समाजसुधारणा करण्याची विलक्षण ताकद विनोदाच्या अंगी आहे, हे कोल्हटकरांनी प्रथम ओळखलं आणि त्या दृष्टीने विनोदी लेखन केलं. सामाजिक विसंगतींवर टीका करण्यासाठी मानसपुत्र निर्माण करून त्यांच्याकरवी शरसंधान करायचं, ही अभिनव कल्पना कोल्हटकरांनीच मराठी वाङ्‌मयात प्रथम आणली. समाजातल्या अनेक अनिष्ट रूढी हास्यास्पद करण्यासाठी कोल्हटकरांनी विनोदाचा वापर शस्त्रासारखा केला. त्यासाठी त्यांनी उपहास, उपरोध आणि कोटी या विनोदाच्या प्रकारांचा आणि अतिशयोक्ती या विनोदनिर्मितीच्या तंत्राचा वापर प्रामुख्याने केला.

कोल्हटकरांच्या विनोदी लेखनाचं गुणगान करताना त्यांच्या विनोदपद्धतीमध्ये काही दोष होते, हेदेखील सांगितलं पाहिजे. त्यातला मुख्य दोष हा की, कल्पनाचमत्कृतीचा आणि शब्दचमत्कृतीचा अतिरेक केल्यामुळे कोल्हटकरांचा विनोद काही ठिकाणी नीरस, कृत्रिम आणि क्लिष्ट झाला आहे. असे काही दोष मान्य केले, तरी कोल्हटकरांच्या विनोदानं मराठी माणसाला जीवनाकडे खेळकरपणे पाहायला शिकवलं, आणि विनोदाकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिली, हे विसरता कामा नये. गांभीर्य म्हणजे प्रौढत्व, प्रगल्भता आणि विद्वत्ता, तर विनोद म्हणजे पोरकटपणा, बालिशपणा आणि विदूषकी चाळे अशी समजूत प्रदीर्घ काळ प्रचलित असलेल्या समाजात कोल्हटकर आणि त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी या दोघांनी मराठी विनोदाची प्रतिष्ठा वाढवली. कोल्हटकरांच्या आधीच्या काळातल्या मराठी वाङ्‌मयात विनोदी वाङ्‌मयाला स्वतंत्र दालन नव्हतं. कोल्हटकरांच्या विनोदी लेखनामुळे ते प्राप्त झालं. त्यांची ही कामगिरी अभूतपूर्व म्हणली पाहिजे.

'गोविंदाग्रज' नावानं कविता लिहिणारे, 'बाळकराम' नावानं विनोदी निबंध लिहिणारे आणि स्वत:च्या नावानं नाटकं लिहिणारे राम गणेश गडकरी हे महाराष्ट्रातले अलौकिक प्रतिभेचे लेखक होते. त्यांच्या कवितांनी, नाटकांनी आणि विनोदांनी महाराष्ट्राला एके काळी वेड लावलं होतं. सर्वसामान्यपणे कवी हा विनोदकार असत नाही आणि विनोदकार हा कवी असत नाही. पण गडकऱ्यांची प्रतिभा काव्य आणि विनोद या दोन्ही क्षेत्रांत सारख्याच तेजाने तळपली.

१९१०-११च्या सुमारास गडकऱ्यांनी 'बाळकराम' या टोपणनावानं 'मासिक मनोरंजन'मधून विनोदी लेख लिहायला सुरुवात केली. कोल्हटकरांनी ज्याप्रमाणे 'सुदामा', 'पांडूतात्या' आणि 'बंडूनाना' ही तीन पात्रं विनोदनिर्मितीसाठी निर्माण केली, त्याचप्रमाणे गडकऱ्यांनी 'तिंबूनाना', 'आबाभटजी' आणि 'बाळकराम' या तीन पात्रांची योजना केली. 'बाळकराम' या टोपणनावाने त्यांनी फक्त पाच विनोदी लेख लिहिले. ते 'रिकामपणची कामगिरी' या मथळ्याखाली प्रथम प्रसिद्ध झाले होते. त्यांपैकी 'वरसंशोधन', 'लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी' आणि 'लग्न मोडण्याची कारणे' या तीन लेखांत मुलीचं लग्न जमवताना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडथळ्यांचं हास्यकारक वर्णन आहे. या तिन्ही लेखांत 'ठकी' हे मध्यवर्ती पात्र आहे. या तीन लेखांव्यतिरिक्त त्यांनी 'स्वयंपाकघरातील गोष्टी' आणि 'कवींचा कारखाना' हे आणखी दोन लेख लिहिले. 'बाळकराम' या टोपणनावानं केलेल्या लेखनामुळे एक विनोदी लेखक म्हणून गडकऱ्यांची ओळख महाराष्ट्राला झाली.

गडकऱ्यांनी एकूण सात नाटकं लिहिली. त्यांपैकी 'गर्वनिर्वाण', 'वेड्यांचा बाजार' आणि 'राजसंन्यास' ही तीन अपूर्ण नाटकं, तर 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', 'एकच प्याला' आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटकं! खटकेबाज संवाद, कल्पनाचमत्कृती आणि शाब्दिक कोट्या ही त्यांच्या नाटकातील विनोदाची ठळक वैशिष्ट्यं होती. त्याचं एक उदाहरण म्हणून 'एकच प्याला' या नाटकातील एका संवादाचा दाखला देता येईल.

दारूच्या व्यसनामुळे तळीराम जेव्हा मरायला टेकलेला असतो, तेव्हा त्याची प्रकृती तपासण्यासाठी डॉक्टर आणि वैद्य एकाच वेळी येतात. त्यावेळी ते एकमेकांच्या उपचारपद्धतीवर कशी टीका करतात हे दाखवणाऱ्या गडकऱ्यांच्या खटकेबाज आणि कोटीबाज संवादाचा नमुना पाहा (अत्रे आचार्य, 'गडकरी सर्वस्व', पृ.१३०) -
तळीराम : काय हो डॉक्टर, वैद्यावर नाही का औषध?
वैद्य : असं म्हणू नये. वैद्य हाच रोग्याचा खरा जिवलग मित्र.
तळीराम : एरवी रोग्याच्या जिवाशी इतकी लगट कोण करणार?
डॉक्टर : वैद्यांच्या औषधाने कुठे रोग बरे होतात? बापाने औषध घ्यावं, तेव्हा मुलाच्या पिढीला गुण!
वैद्य : तरी पुष्कळ आहे. वैद्याच्या औषधाने मुलगा जिवंत तरी राहतो. डॉक्टराच्या बाबतीत बाप औषधाने मरायचा अन मुलगा बिलांच्या हप्त्यांनी.
डॉक्टर : राहू द्या. आमच्या औषधानं अवघ्या तीन दिवसांत रोग्याच्या स्थितीत जमीनअस्मानाचं अंतर पडतं.
वैद्य : म्हणजे जो रोगी जमिनीवर असतो, तो तीन दिवसांत अस्मानात जातो असंच ना?

एखादा शब्द किंवा विषय घेतला, की त्यावर जास्तीत जास्त कोट्या किंवा विनोद करण्याचा गडकऱ्यांना विलक्षण हव्यास होता. त्यांच्या 'प्रेमसंन्यास' नाटकात अशा तऱ्हेच्या कोट्यांची अनेक उदाहरणं सापडतात. उदाहरणार्थ, 'तोंड' हा शब्द घेतला की 'तोंडसुख घेणे', 'इकडचं तोंड तिकडे करून टाकणे', 'तोंड देणे', 'तोंडी लागणे', 'तोंड काळे करणे', 'तोंडापुरते बोलणे', 'तोंडसुद्धा बघू नये असे वाटणे'.

गडकऱ्यांच्या विनोदावर कोल्हटकरांच्या विनोदपद्धतीचा खूपच प्रभाव होता हे जरी खरं असलं, तरी दोघांच्या विनोदात एक महत्त्वाचा फरक आहे. तो हा की, गडकऱ्यांच्या विनोदाला कारुण्याचा स्पर्श आहे. अशा प्रकारचा विनोद कोल्हटकरांच्या वाङ्‌मयात आढळत नाही. ठकीच्या लग्नावर आधारलेली गडकऱ्यांची लेखमाला आणि त्यांची इतर नाटकं वाचताना अशा प्रकारच्या विनोदाचा प्रत्यय येतो. हास्य आणि कारुण्य यांचा एकत्र अनुभव देण्याचा प्रयत्न मराठी वाङ्‌मयात गडकऱ्यांनीच प्रथम केला असावा.

गडकऱ्यांची विनोदबुद्धी किती तल्लख होती आणि ते किती कोटीबाज आणि हजरजबाबी होते याची अनेक उदाहरणं आचार्य अत्र्यांनी 'गडकरीसर्वस्व' या पुस्तकात दिली आहेत. त्यातलं एक उदाहरण पाहा -

एके काळी जेव्हा पुण्यामध्ये वीज नव्हती, तेव्हा रस्त्यावर उजेड पडावा यासाठी शहरात ठिकठिकाणी गॅसच्या बत्त्या लावत. पुण्याच्या लकडी पुलावर अशीच एक गॅसची बत्ती होती. ही बत्ती लावण्यासाठी रोज संध्याकाळी म्युनिसिपालिटीचा माणूस यायचा. बऱ्याचदा बत्ती पेटायची नाही किंवा पेटलीच तर अंधूक पेटायची. या बत्तीशेजारी एक कंदील लावलेला असायचा. एक दिवस गडकरी आपल्या मित्राबरोबर लकडी पुलावरून चालले होते. त्या वेळी मित्रानी गडकऱ्यांना सहज विचारलं, ''मास्तर, गॅसच्या बत्तीशेजारी हा कंदील कशाकरता लावलाय?'' तेव्हा गडकरी क्षणार्धात म्हणाले, ''गॅसची बत्ती पेटली आहे की नाही ते पाहायला!''

ज्या काळात कोल्हटकर आणि गडकरी यांच्या नावाचा आणि त्यांच्या विनोदाचा बोलबाला महाराष्ट्रात होता, त्या काळात एखाद्यानं विनोदी साहित्याच्या क्षेत्रात प्रवेश करून आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण ही किमया एका व्यक्तीनं करून दाखवली. त्या किमयागाराचं नाव चिंतामण विनायक (चिं. वि.) जोशी. चिं. विं. नी त्यांच्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या कथांमधला विनोद उपहासात्मक होता, पण लवकरच ते परिहासात्मक विनोदाकडे वळले.

परिहास म्हणजे चेष्टा किंवा थट्टा. उपहास आणि परिहास या विनोदाच्या दोन्ही प्रकारांमध्ये कोणाची तरी थट्टा करणं हा समान भाग असला, तरी उपहासामध्ये जसा इतरांचे दोष दाखवण्याचा, डंख मारण्याचा किंवा रेवडी उडवण्याचा उद्देश असतो, तसा परिहासामध्ये नसतो. त्यामुळेच अशा प्रकारचा विनोद निखळ आनंद देतो.

चिं. वि. जोशींच्या विनोदी कथांचा विषय निघाला की, चिमणराव आणि गुंड्याभाऊ या जोडगोळीची आठवण प्रथम येते. चिमणरावाच्या कथांनी मराठी वाङ्‌मयात धमाल उडवून दिली. चिमणराव हा पुण्यात राहणारा एक मध्यमवर्गीय गृहस्थ आहे. त्याचं आत्मवृत्त सांगण्याच्या निमित्तानं चिं. विं.नी १९२० ते १९४० या काळातल्या पुण्यातल्या कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या जीवनाचं चित्रण केलं आहे. चिमणराव 'मिलिटरी अकाउंट्स'मध्ये महिना साठ रुपये पगारावर कारकुनाची नोकरी करतो. तो वरून गंभीर वाटला, तरी प्रत्यक्षात खट्याळ आणि मिश्कील आहे.

चिमणराव आणि त्याच्या कुटुंबाच्या कथा सांगताना चिं. विं.नी मध्यमवर्गीयांचा दुबळेपणा, त्यांची अगतिकता, पापभीरूता, हतबलता, अनेक बाबतींमधलं त्यांचं अज्ञान आणि त्यांचा न्यूनगंड, साहस करण्याची इच्छा असूनही ते करण्याची शारीरिक आणि मानसिक कुवत नसल्यामुळे पोकळ शौर्याच्या गप्पा मारण्याचा त्यांचा स्वभाव यांसारख्या स्वभाववैशिष्ट्यांमधून बराचसा विनोद निर्माण केला आहे. चिमणरावाच्या सत्य बोलण्यातून लोकांच्या दांभिकपणावर प्रकाश पडतो आणि त्यामुळे आपल्याला हसू येतं. सत्य बोलण्यातून विनोदनिर्मिती करण्याचं तंत्र चिं. विं.नी बऱ्याच कथांमध्ये वापरलं आहे.

चिं. विं.ना शाब्दिक कोट्यांची आवड होती, पण त्याचा सोस नव्हता. त्यामुळे त्यांच्या साहित्यात कोट्यांचा अतिरेक आढळत नाही. खासगी संभाषणात किंवा अनौपचारिक गप्पा मारताना चिं. वि. क्वचितच कोट्या करायचे. घरगुती संभाषणात त्यांनी उत्स्फूर्तपणे केलेली एक कोटी आठवते. ती अशी :

एकदा चिं.विं.च्या घरापुढे टांगा थांबल्याचा आवाज आला. कोण पाहुणे आले आहेत हे पाहण्यासाठी चिं. वि. जेव्हा बाहेर डोकावले, तेव्हा त्यांना त्यांची मामेबहीण शकुंतला (शकू) आणि मामा टांग्यातून उतरताना दिसले.
तेवढ्यात चिं.विं.च्या पत्नीने विचारलं, ''कोण पाहुणे आले आहेत?''
त्यावर चिं.वि. क्षणार्धात म्हणाले, ''शकु नि मामा.''

चिं. विं.च्या साहित्यात काही शाब्दिक कोट्या असल्या, तरी त्यांचा भर शाब्दिक कोट्यांपेक्षा प्रसंगनिष्ठ आणि स्वभावनिष्ठ विनोदावर अधिक आहे, हे त्यांच्या कथा वाचताना लक्षात येतं. म्हणूनच आचार्य अत्र्यांनी असं म्हटलं आहे की, इंग्रजीमधे ज्याला 'wit' (कोटी) म्हणतात, ती मराठी साहित्यात कोल्हटकर-गडकऱ्यांनी निर्माण केली. पण ज्याला 'humour' (विनोद) म्हणतात, तो मात्र महाराष्ट्रात प्रथम चिंतामणरावांनीच आणला. (चिं. वि. जोशी, 'चौथे चिमणराव', पृ.१९)

चिं. विं.ची कुठलीही कथा वाचली, तरी एक गोष्ट ठळकपणे आपल्या लक्षात येते. ती म्हणजे, त्यांनी कोणाला बोचणारा आणि ओरखडे काढणारा विनोद कधीही केला नाही. त्यांचा विनोद मार्मिकतेने, मिश्कीलपणे, सहजपणे आणि हळुवारपणे मानवी स्वभावातले दोष दाखवून देतो. अशा तऱ्हेचा विनोद इतर मराठी लेखकांच्या साहित्यात फार कमी प्रमाणात आढळतो. म्हणूनच, चिं. विं. जोशी हे मराठी साहित्यातले सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक मानले जातात.

एखादी गोष्ट गेल्या दहा हजार वर्षांत झाली नाही आणि पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही, असं अतिशयोक्तीने बोलणाऱ्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी साहित्य, नाट्य, चित्रपट, विडंबनकाव्य आणि वक्तृत्व या माध्यमांतून आपल्या विनोदबुद्धीचे विविध आविष्कार दाखवले. सूक्ष्म निरीक्षणांनी विसंगती टिपण्याचं, त्यावर मिश्कील भाष्य करण्याचं आणि ते काव्यातून व्यक्त करण्याचं कौशल्य अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वात लहानपणापासून होतं. एका डोळ्याने अधू असलेल्या सीताबाई नावाच्या स्वयंपाकिणीवर अत्र्यांनी वयाच्या नवव्या वर्षी एक कविता लिहिली होती. ती अशी -
सीताबाई, वर्णूं किती तव गुण।
डोळा काणा, नाक वाकडे, बधिर असति तव कर्ण!
एकादशीला उपास करूनी खाई कांदा लसूण!
सीताबाई, वर्णूं किती तव गुण।

ही कविता लिहिणाऱ्या अत्र्यांनी पुढील काळात विडंबनकाव्याच्या क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवला. 'रविकिरण मंडळा'तल्या कवींच्या काव्यातले दोष हसतखेळत दाखवण्यासाठी अत्र्यांनी १९२२च्या सुमारास अनेक दर्जेदार विडंबनात्मक कविता लिहिल्या. या कवितांचा संग्रह 'झेंडूची फुले' या नावानं १९२५ साली प्रसिद्ध झाला. विडंबनकाव्याच्या प्रसिद्धीसाठी अत्र्यांनी 'केशवकुमार' हे टोपणनाव घेतलं होतं. गेल्या नव्वद वर्षांच्या काळात अत्र्यांइतकी सुंदर विडंबनकाव्यंं क्वचितच कोणी लिहिली असतील. या संग्रहातल्या कविता वाचल्यावर अत्र्यांची विनोदबुद्धी किती तल्लख होती, काव्यरचनेतील बारीकसारीक दोषांची त्यांना किती उत्तम जाण होती आणि काव्यरचनेवर त्यांचं किती जबरदस्त प्रभुत्व होतं, हे लक्षात येत. 'झेंडूची फुले'मुळे विडंबनकाव्याला मराठी वाङ्‌मयात स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा प्राप्त झाला. म्हणूनच या काव्यसंग्रहाला मराठी साहित्यात ऐतिहासिक महत्व आहे. अत्र्यांनी केवळ विडंबनकाव्य लिहिलं नाही, तर 'मी विडंबनकार कसा झालो' हा लेख लिहून त्यांनी विडंबनकाव्याचं मर्मसुद्धा समजावून सांगितलं. हा लेख आपल्याला विडंबनकाव्याकडे पाहण्याची प्रगल्भ दृष्टी देतो.

'साष्टांग नमस्कार' हे अत्र्यांचं पहिलं नाटक १९३३ सालच्या मे महिन्यात रंगभूमीवर आलं. १९३३ ते १९६९ या काळात अत्र्यांनी सुमारे बावीस नाटकं लिहिली. त्यांतली काही विनोदी तर काही गंभीर आहेत. साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी, भ्रमाचा भोपळा, कवडीचुंबक, मोरूची मावशी, बुवा तिथे बाया, मी मंत्री झालो इत्यादी विनोदी नाटकांमधून अत्र्यांनी वैशिष्ट्यपूर्ण स्वभावांची अनेक पात्रं निर्माण केली. या पात्रांच्या माध्यमातून त्यांनी मानवी स्वभावातल्या विविध प्रकारच्या विसंगतींचं दर्शन घडवताना प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अत्र्यांच्या बहुसंख्य नाटकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या नाटकांमधून कुठली-ना-कुठली सामाजिक समस्या मांडली. अत्र्यांनी विनोदी नाटकं लिहून प्रेक्षकांना हसवलं हे जरी खरं असलं, तरी त्या हसवण्यामागे त्यांना सामाजिक परिवर्तनाची ओढ होती हे लक्षात घेतलं पाहिजे. खटकेबाज संवाद, शाब्दिक कोट्या, अतिशयोक्ती, विनोदी सुभाषितं, तसंच स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोद ही अत्र्यांच्या नाटकांमधल्या विनोदाची ठळक वैशिष्ट्यं आहेत.

अत्र्यांनी जशी विनोदी नाटकं लिहिली, तशाच काही विनोदी कथाही लिहिल्या. त्या संख्येनं कमी असल्या, तरी त्यांना मराठी वाङ्‌मयात एक विशिष्ट स्थान आहे. 'जांबुवंत दंतमंजन', 'बाजारात तुरी', 'गुत्त्यात नारद', 'पिलंभट स्वर्गाला जातो', 'सिंधूचा बाप' यांसारख्या त्यांच्या विनोदी कथा खूप लोकप्रिय झाल्या.

अज्ञान, मूर्खपणा आणि ढोंग यांवर अत्र्यांनी बराच विनोद केला आहे. माणसाच्या अज्ञानाला हास्यास्पद करणाऱ्या अत्र्यांच्या कोटीचं एक उदाहरण पाहा -

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कन्नमवार एका सभेत भाषण करताना 'कॉपर'च्या खाणीबद्दल बोलत होते. समोर बसलेल्या श्रोत्यांना 'कॉपर' या शब्दाचा अर्थ कळणार नाही असं वाटल्यामुळे ते म्हणाले, "श्रोतेहो, कॉपर म्हणजे पितळ." दुसऱ्या दिवशीच्या 'मराठा'मध्ये "कन्नमवारांचे पितळ उघडे पडले" असा मथळा देऊन अत्र्यांनी कन्नमवारांचं अज्ञान उघडं पाडलं आणि त्यांना हास्यास्पद केलं.

हजारो श्रोत्यांच्या सभेला आपल्या वक्तृत्वातून दोन-दोन तास खदाखदा हसवत ठेवण्याचं प्रचंड सामर्थ्य अत्र्यांच्या विनोदात होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात अत्र्यांनी 'नवयुग' आणि 'मराठा' यांतून केलेल्या लेखनातून आणि वक्तृत्वातून आपल्या विनोदाचे विविध आविष्कार दाखवले. अत्र्यांच्या वाङ्‌मयातला विनोद आल्हाददायक असला, तरी त्यांचा राजकारणातला बराचसा विनोद मात्र आक्रमक, बोचरा आणि कमरेखाली वार करणारा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात अत्र्यांनी बऱ्याचदा विनोदाचा वापर शस्त्र म्हणून केला. 'बोचत नाही तो विनोद कसला?' या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात त्यांनी बोचऱ्या विनोदाचं समर्थन केलं आहे.

संयुक्त महाराष्ट्राला ज्यांनी ज्यांनी विरोध केला ते मोरारजी देसाई, शंकरराव देव, स. का. पाटील, काकासाहेब गाडगीळ असे अनेक जण अत्र्यांचे राजकीय विरोधक होते. अत्र्यांनी त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन केलेला बराचसा विनोद आक्रमक आणि बोचरा आहे. स. का. पाटील यांच्यांवर अत्र्यांनी केलेल्या अशा प्रकारच्या विनोदाचं एक उदाहरण पाहा.

एका सभेत बोलताना अत्रे म्हणाले, ''१३ ऑगस्टला माझा वाढदिवस असतो आणि १५ ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन असतो. या दोन चांगल्या घटनांमध्ये एक वाईट घटना घडली. ती म्हणजे १४ ऑगस्टला स. का. पाटलांचा जन्म झाला!''

अत्र्यांनी अनेकदा प्रवृत्तीवरही उत्कृष्ट विनोद केला आहे. त्याचं एक उदाहरण देता येईल.

आचार्य अत्रे रोज सकाळी फिरायला जायचे. एकदा ते पुण्यात असताना सकाळी फिरायला गेले होते. पावसाळ्याचे दिवस होते. आदल्या दिवशी मुसळधार पाऊस पडून गेल्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांवर चिखल झाला होता. या रस्त्यानं जात असताना अत्र्यांना त्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले. ते अत्र्यांना म्हणाले, ''अत्रेसाहेब, तुमच्या पॅन्टवर मागच्या बाजूने चिखलाचे शिंतोडे उडले आहेत.'' त्यावर अत्रे म्हणाले, ''पुण्यातला चिखल पुणेकरांसारखाच आहे. लेकाचा मागून निंदा करतो!''

हसणं म्हणजे पोरकटपणा आणि थिल्लरपणा अशी खुळचट समजूत असलेल्या काळात अत्र्यांनी मराठी माणसाला मोकळेपणानं हसायला शिकवलं आणि आयुष्याकडे खेळकरपणे पाहण्याची दृष्टी दिली. अत्र्यांनी केवळ विनोदी साहित्यच लिहिलं नाही, तर विनोदाचं अतिशय सोप्या आणि चटकदार भाषेत विश्लेषणदेखील केलं. 'तुम्ही आम्ही का हसतो?', 'विनोदाचं व्याकरण' इत्यादी लेखांतून त्यांनी विनोदाची केलेली मीमांसा वाचनीय आणि माहितीपूर्ण आहे.

'हास्यकथा' भाग १-२, 'कशी आहे गंमत'', 'अशा गोष्टी अशा गमती', 'मूर्खांचा बाजार' यांसारखी त्यांची विनोदी पुस्तकं नुसतीच करमणूक करत नाहीत, तर मानवी स्वभावातल्या आणि समाजातल्या अनेक प्रकारच्या विसंगतींचं दर्शन घडवत असतानाच, वाचकांची विनोदाबद्दलची जाण प्रगल्भ करण्यातही हातभार लावतात. मराठी आणि पाश्चात्त्य विनोदकारांच्या विनोदाचा परामर्श घेणारा 'विनोदगाथा' हा त्यांचा ग्रंथ वाचल्यानंतर अत्र्यांची विनोदाबद्दलची आस्था आणि जिज्ञासा दिसून येते. तसेच, एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन तो समजून घेण्याची आणि सोप्या, ओघवत्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची तळमळदेखील दिसून येते.

दत्तू बांदेकर नावाचे एक प्रतिभाशाली विनोदी लेखक महाराष्ट्रात होऊन गेले याची कल्पनाही आजच्या काळातल्या तरुण पिढीला नसेल. बांदेकरांची सर्वच सदरं लोकप्रिय झाली असली, तरी 'सख्याहरी' हे सदर वाचकांना इतकं आवडलं की, बांदेकर म्हणजे 'सख्याहरी' हे समीकरण रूढ झालं. विनोद आणि शृंगार हे या सदराचं वैशिष्ट्य होतं. दत्तू बांदेकरांनी लिहिलेल्या एका विनोदी लघुकथेचा नमुना पाहा-

तो आणि ती
ती दोघेही नुकतीच प्रेमात पडली होती
तो अत्यंत प्रेमळ आणि देखणा होता,
तीही अत्यंत प्रेमळ आणि देखणी होती
तो रात्री दहा वाजता आपल्या खोलीत आला,
आणि कोट काढून त्याने खुंटीला लावला
ती रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी खोलीत आली,
आणि लुगडे बदलून तिने ते खुंटीला लावलं
तो एक पुस्तक घेऊन पलंगाच्या
एका टोकाला वाचीत बसला,
तीही एक पुस्तक घेऊन पलंगाच्या
एका टोकाला वाचीत बसली
काही वेळाने त्याने पुस्तक फेकून दिले
आणि तो पलंगावर आडवा झाला
तिने दिवा मालवला
आणि तीही पलंगावर आडवी झाली
तो उजव्या कुशीवर झोपला
ती डाव्या कुशीवर झोपली
तो मुंबईत एका बोर्डिंग अ‍ॅण्ड
लॉजिंग हाऊसमध्ये होता
ती पुण्यात आपल्या घरी होती

बांदेकरांनी 'सख्याहरी'मध्ये शृंगारिक लेखन केलं असलं, तरी त्यांचं सर्वच लेखन काही शृंगारिक नाही. बांदेकरांनी आपल्या लेखनातून मुख्यत: तळागाळातल्या लोकांच्या आयुष्यातील समस्यांचं दर्शन घडवताना आपल्या उपहासात्मक विनोदाने त्यावर मर्मभेदक भाष्य केलं आहे.
बांदेकरांच्या विनोदबुद्धीचा आणखी एक आविष्कार म्हणजे त्यांनी लिहिलेला एक आगळावेगळा शब्दकोश. मूळ शब्दकोश मोठा आहे. त्यातल्या काही निवडक शब्दांच्या व्याख्या अशा (दत्तू बांदेकर, 'कारुण्याचा विनोदी शाहीर', पृ.२१६-२१९) -
भूक : जी श्रीमंतांना लागत नाही आणि गरिबांची भागत नाही.
सण : कर्ज काढण्याचा दिवस.
कर्ज : परत न करण्यासाठी घेतलेली रक्कम.
पगार : वेळेवर न मिळणारी वस्तू.
रस्ता : मोटारीखाली मरण्याची जागा.
हुंडा : ज्यामुळे कुरूप मुलींची लग्ने होतात.
घर : बायकोला मधूनमधून भेटण्याचे स्थळ.
विद्या : भिकेचं लक्षण.
चहा : दुसऱ्याकडून उकळण्याची गोष्ट.

या व्याख्या वरवर गमतीशीर वाटल्या, तरी त्यांतला विदारक विनोद आपल्या काळजाला चिमटे घेतो.

'संयुक्त महाराष्ट्र आंदोलना'च्या काळात बांदेकरांच्या विनोदाला एक वेगळंच तेज प्राप्त झालं होतं. 'नवयुग'मधलं 'रविवारचा मोरावळा' हे त्यांचं सदर त्या काळात खूप लोकप्रिय झालं होतं. बांदेकरांची हुकमत गद्याप्रमाणे पद्यावरही होती हे त्यांनी लिहिलेल्या विडंबनगीतांतून लक्षात येतं. संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या सत्ताधारी पुढाऱ्यांची, पत्रकारांची आणि विविध नेत्यांची खिल्ली उडवण्यासाठी बांदेकरांनी त्या काळात आरत्या, पोवाडे, शिशुगीतं, ओव्या, मनाचे श्लोक, सुनीतं, असे विविध काव्यप्रकार वापरून विडंबनगीतं लिहिली आणि विरोधकांना सळो की पळो करून सोडलं. या काळातला बांदेकरांचा बराचसा विनोद राजकीय स्वरूपाचा असल्यामुळे प्रचारकी थाटाचा, आक्रमक आणि बोचकारे काढणारा असला, तरी सामाजिक समस्यांवर भाष्य करणारा त्यांचा विनोद मात्र मार्मिक, मिश्कील आणि हृदयस्पर्शी होता.

मराठी मनावर अर्धशतकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारं, महाराष्ट्राचं सांस्कृतिक नेतृत्व करणारं, विनोदाला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणारं, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे! आयुष्याकडे पाहण्याची प्रसन्न दृष्टी, मनाचा उमदेपणा, रसिकता, संवेदनशीलता, दुसऱ्याला न दुखवता हसवणारी विनोदबुद्धी आणि कुठल्याही गोष्टीतून हास्य निर्माण करण्याचा स्वभाव या गुणांमुळे पु. ल. मराठी माणसांचे लाडके झाले. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशी उपाधी स्वयंस्फूर्तीने बहाल केली. (पु. ल. त्याला लाडावलेलं व्यक्तिमत्त्व असं गमतीनं म्हणत.)

पु. लं.ना तल्लख विनोदबुद्धीचं वरदान लाभल्यामुळे आणि कुठलीही विसंगती त्यांच्या नजरेत चटकन भरत असल्यामुळे त्यांनी आपल्या वाङ्‌मयीन कारकिर्दीची सुरुवात विडंबनं लिहून करावी हे स्वाभाविकच होतं. पु. लं.ना व्यंगचित्रकाराची दृष्टी लाभल्यामुळे विडंबन हा त्यांचा लाडका विषय होता. गद्यविडंबन हे पु. लं.च्या विनोदाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं पाहिजे. 'खोगीरभरती', 'मराठी वाङ्‌मयाचा (गाळीव) इतिहास', 'खिल्ली' या पुस्तकांत त्यांची विविध विषयांवरची उत्कृष्ट गद्यविडंबनं वाचायला मिळतात.

पु. लं.च्या गद्यविडंबनांना मराठीतल्या विनोदी साहित्यात जसं मानाचं स्थान आहे, तसंच त्यांच्या प्रवासवर्णनांनाही आहे. पु. लं.च्या आधी अनेक जणांनी प्रवासवर्णनं लिहिली, पण त्यांतली बरीचशी रूक्ष होती. पु. लं.नी लिहिलेली प्रवासवर्णनं मनोरंजक आणि चटकदार तर आहेतच, पण उद्बोधकही आहेत. एका विशिष्ट सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या पु. लं.नी जेव्हा परदेशप्रवास केला, तेव्हा त्यांनी त्या देशांतली संस्कृती आणि आपली संस्कृती यांची तुलना केली आणि त्यामध्ये त्यांना जाणवलेल्या विसंगतींचं दर्शन घडवलं. ह्या विसंगतींवर पु. लं.नी केलेल्या मार्मिक आणि मिश्कील भाष्यामुळेच त्यांची प्रवासवर्णनं हास्यकारक आणि मनोरंजक झाली आहेत. त्यांच्या इतर साहित्यप्रकारांतल्या विनोदाप्रमाणेच प्रवासवर्णनांमधला विनोदही आपल्याला हसवता हसवता अंतर्मुख करतो.

प्रवासवर्णनांप्रमाणे व्यक्तिचित्रंसुद्धा विनोदी अंगानी लिहिता येतात, हे पु.लं.नी दाखवून दिलं. त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांनी मराठीतल्या विनोदी साहित्यात मोलाची भर टाकली आहे. 'व्यक्ती आणि वल्ली' या १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातली व्यक्तिचित्रं रंगवताना पु. लं.नी ती विशिष्ट व्यक्ती (किंवा वल्ली) ज्या भौगोलिक प्रदेशात राहणारी असेल, तिथल्या प्रादेशिक भाषेचा वापर केला आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखा त्यांच्या भाषिक वैशिष्ट्यांसह आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. 'रावसाहेब', 'पेस्तनकाका', 'अंतू बर्वा' या व्यक्ती मराठी बोलत असल्या, तरी त्यांच्या मातृबोलींची वैशिष्ट्यं आणि त्या-त्या बोलीचा लहेजा आणि बाज यांमुळे या व्यक्तिचित्रांमधल्या विनोदाला उठाव आला आहे.

पु. लं.नी लिहिलेल्या बऱ्याच व्यक्तिचित्रांत हास्य आणि कारुण्य इतकं एकजीव झालं आहे की, ते वेगळं काढता येत नाही. चार्ली चॅप्लिन हे पु. लं.चं दैवत होतं. चॅप्लिननं आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना हास्य आणि कारुण्य यांचा एकत्रित प्रत्यय दिला. पु. लं.नीही आपल्या विनोदी लेखनातून तोच प्रयत्न केलेला दिसतो.
पु. ल. जसे श्रेष्ठ विनोदी लेखक होते तसेच ते उत्कृष्ट 'परफॉर्मर'देखील होते. पु. लं.च्या व्यक्तिमत्त्वातल्या या उपजत कौशल्याला सूक्ष्म निरीक्षणाची, उत्तम स्मरणशक्तीची, मिश्कील स्वभावाची, तल्लख विनोदबुद्धीची आणि अभिनयकौशल्याची जोड लाभली होती. याच गुणांच्या आधारावर पु. लं.नी पुढच्या काळात 'बटाट्याची चाळ', 'असा मी असामी', 'वाऱ्यावरची वरात' इत्यादी समूहचित्रांच्या सादरीकरणातून आपल्या अभिनय, संगीत आणि विनोदांनी महाराष्ट्राचं मनोरंजन केलं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

पु. लं.चा विनोद प्रामुख्यानं उपहासात्मक आहे. तो मानवी स्वभावातले आणि समाजातले अनेक दोष हसतखेळत दाखवतो. त्यांच्या उपहासाचं वैशिष्ट्य हे की, त्यात रागाचा किंवा तिरस्काराचा लवलेशही आढळत नाही. उलट, त्यांचा प्रसन्न आणि खेळकर दृष्टीकोन जाणवतो. पु. लं.च्या विनोदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ते स्वत:ला अनेकदा थट्टेचा विषय बनवायचे. त्यामुळे निखळ आणि निर्मळ आनंद देणारा परिहासात्मक विनोददेखील त्यांच्या साहित्यात आढळतो.

शाब्दिक कोट्या हे पु. लं.च्या विनोदाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य! शाब्दिक कोटी साधताना ते केवळ शब्दांचा खेळ करत नाहीत, तर त्यापलीकडे जाऊन विविध प्रकारच्या विसंगतींवर मिश्किल भाष्य करतात. अशाच एका शाब्दिक कोटीचं उदाहरण पाहा.

एकदा ना. ग. गोरे आणि पु. ल. एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. ना. ग. गोरे आपल्या भाषणात म्हणाले, ''भारतात भ्रष्टाचार बोकाळला आहे. खरं तर पोलिसांनी त्याला आळा घातला पाहिजे, पण पोलीसच लाच घेऊ लागल्यानंतर भ्रष्टाचार कसा जाणार?'' ना. ग. गोरेंचं हे वाक्य पूर्ण होताच व्यासपीठावर बसलेले पु. ल. तत्काळ म्हणाले, ''भ्रष्टाचार एकदम जाणार नाही. तो हप्त्याहप्त्याने जाईल.''

विनोद हे दुसऱ्यावर हल्ला करण्यासाठी हत्यार म्हणून वापरण्याची काही लेखकांची प्रवृत्ती असते. त्यामुळे त्यांचा विनोद आक्रमक आणि बोचरा होतो. पण पु.लं.ची विनोदाबाबतची भूमिका वेगळी होती. ते म्हणतात -
''वस्तऱ्याने गुळगुळीत हजामत केली पाहिजे, पण त्याने जखम मात्र होता कामा नये.''

हे तत्त्व आयुष्यभर कसोशीनं पाळल्यामुळेच पु. लं.च्या विनोदांनी कोणीही घायाळ झाल्याचं ऐकिवात नाही.

गंगाधर गाडगीळांनी ज्या काळात लेखनाला सुरुवात केली त्या काळात श्री. कृ. कोल्हटकरांच्या परंपरेतल्या लेखकांच्या विनोदाचा महाराष्ट्रात बराच प्रभाव होता. कल्पनाचमत्कृती, शाब्दिक कोट्या आणि अतिशयोक्ती ही वैशिष्ट्यं असलेला कोल्हटकरी परंपरेतल्या लेखकांचा विनोद गाडगीळांना कधी रुचला नाही. विनोदनिर्मितीच्या रूढ पद्धती न वापरता गाडगीळांनी स्वतंत्र धाटणीचा विनोद निर्माण केला. कोटिबाजपणापासून अलिप्त राहणाऱ्या, केवळ व्यंगदर्शनावर भर न देणाऱ्या आणि मराठीतल्या विनोदाच्या परंपरेला अपरिचित असलेल्या अवखळ, उन्मुक्त, स्वैर आणि उच्छृंखल विनोदाची निर्मिती गाडगीळांनी केली. आपल्या विनोदाविषयीच्या कल्पना कथेच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी त्यांनी बंडू या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखेची निर्मिती केली. गाडगीळांच्या विनोदी साहित्यात 'बंडूकथां'ना खास स्थान आहे.

'बंडूकथां'पेक्षा वेगळ्या प्रकारचं विनोदी लेखन करण्यासाठी गाडगीळांनी 'फिरक्या' हे सदर लिहिलं. वैयक्तिक निंदानालस्ती न करतादेखील विनोद करता येतो हे त्यांनी या सदरात दाखवून दिलं. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या विविध प्रकारच्या विसंगतींचं दर्शन घडवण्यासाठी गाडगीळांनी लिहिलेलं हे सदर मार्मिक, मिष्कील आणि खुसखुशीत होतं. 'फिरक्यां'चा पहिला संग्रह १९७६ साली प्रसिद्ध झाला.

गाडगीळांनी विनोदाच्या अंगानी लिहिलेलं 'सातासमुद्रापलीकडे' हे पाश्चात्त्य देशांचं प्रवासवर्णन मनोरंजक आहे. पाश्चात्य देशांतल्या अनेक रीतीरिवाजांचं वर्णन करताना आणि वेगवेगळे अनुभव घेत असताना, काही वेळा आपली फजिती कशी झाली हे सांगण्याच्या निमित्ताने गाडगीळांनीही स्वत:लाच थट्टेचा विषय बनवलं आहे.

गाडगीळांच्या विनोदी साहित्याची चर्चा करताना त्यांनी लिहिलेल्या 'आर्थिक नवलकथा' या विनोदी सदराचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. गाडगीळ अर्थतज्ज्ञ होते आणि अर्थव्यवस्थेतल्या धोरणांविषयी त्यांची काही मतं होती. समाजवादाच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेच्या उद्योगांची झालेली दुरवस्था हा त्यांचा नेहमीचा टीकेचा आणि थट्टेचा विषय होता. अर्थव्यवस्थेतल्या अनेक धोरणांवर उपरोधपूर्ण भाषेत केलेली टीका हे या सदराचं वैशिष्ट्य आहे. गंगाधर गाडगीळांनी काही विनोदी फॅन्टसी लिहिल्या, याचीही नोंद आपण घेतली पाहिजे.

जयवंत दळवी यांनी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारचं साहित्य लिहिलं असलं, तरी दळवींचा विषय निघाला, की 'ठणठणपाळ' या टोपणनावाने त्यांनी 'ललित' मासिकातून केलेलं लेखन प्रथम आठवतं. पण त्याव्यतिरिक्त त्यांनी बरंच विनोदी लेखन केलं आहे याची फार कमी जणांना कल्पना असते. 'अलाणे फलाणे' या टोपणनावाने 'ललित' मासिकात लिहिलेलं सदर, 'लोक आणि लौकिक' हे 'अमेरिकेचं प्रवासवर्णन', 'कशासाठी पोटासाठी', 'गमतीच्या गोष्टी', 'उपहासकथा' आणि 'विक्षिप्तकथा' हे कथासंग्रह; असं विपुल विनोदी लेखन त्यांनी केलं आहे. दळवींनी काही उत्तम विनोदी फॅन्टसीही लिहिल्या आहेत.

'ठणठणपाळ' या सदरामध्ये त्या काळातल्या मराठी साहित्यविश्वातले लेखक, प्रकाशक, संपादक, समीक्षक, ग्रंथपाल आणि ग्रंथविक्रेते यांची भरपूर चेष्टामस्करी केली आहे. त्यांच्या सर्व लकबी दळवींनी आपल्या सूक्ष्म निरीक्षणातून टिपल्या होत्या. साहित्यक्षेत्रातल्या घडामोडींकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असल्यामुळे त्यांना बारीकसारीक तपशीलसुद्धा ठाऊक असायचे. त्यामध्ये विसंगती किंवा वैचित्र्य दिसलं रे दिसलं की, हा ठणठणपाळ कोणाचाही मुलाहिजा न ठेवता त्यावर मार्मिक आणि खुसखुशीत भाष्य करायचा. आपण वाचकांशी दिलखुलास गप्पा मारत आहोत अशा पद्धतीनी हे सदर लिहिलं आहे.

वाचकांशी संवाद साधणारी 'ठणठणपाळ'ची शैली, त्यातला खोचक आणि मार्मिक विनोद, त्यातल्या कोपरखळ्या यांमुळे हे सदर मनोरंजक आणि कमालीचं लोकप्रिय झालं. चार मित्रमंडळी एकत्र जमली, की ज्या मोकळेपणानं एकमेकांची थट्टामस्करी करतात, तसं दळवींच्या विनोदाचं स्वरूप वाटतं. त्यांचा विनोद ढोंगाच्या आवरणाखाली दडलेल्या सत्याचं आणि मानवी स्वभावातल्या इतर विसंगतींचं दर्शन घडवणारा होता. त्यामुळेच तो मोकळाढाकळा होता.

ग्रामीण जीवनावर विनोदी आणि गंभीर कथा लिहिणारे लेखक म्हणून आपण शंकर पाटील यांना ओळखतो. शंकर पाटील यांना तरल विनोदबुद्धीचं वरदान लाभल्यामुळे मनुष्यस्वभावातल्या अनेक प्रकारच्या विसंगती त्यांना चटकन जाणवायच्या. आपल्या सूक्ष्म निरीक्षणानी टिपलेल्या सामाजिक विसंगतींचं दर्शन घडवणाऱ्या अनेक विनोदी कथा त्यांनी लिहिल्या. 'धिंड', 'नाटक', 'नेमानेमी', 'हिशेब', 'मीटिंग', 'ताजमहालमध्ये सरपंच', 'चक्का' या त्यांच्या विनोदी कथा अतिशय लोकप्रिय झाल्या.

कुठल्याही हास्यकथेचं यश हे जसं तिच्या आशयात असतं तसंच - किंबहुना जरा जास्तच - ते तिच्या सादरीकरणात असतं. वाचकांची उत्सुकता ताणली जाईल अशा तऱ्हेची कथेची रचना, माणसांच्या वागण्याबोलण्यातून निर्माण होणारा प्रसंगनिष्ठ आणि स्वभावनिष्ठ विनोद, तसंच रसाळ निवेदन या गुणांमुळे पाटलांच्या विनोदी कथा लोकप्रिय झाल्या. पाटलांच्या कथांमध्ये शाब्दिक कोट्या जवळपास नाहीत म्हटलं तरी चालेल. याचं कारण त्यांच्या कथांमध्ये जी पात्रं आहेत, त्यांची शैक्षणिक आणि सामाजिक पार्श्‍वभूमी लक्षात घेतली, तर ही पात्रं शाब्दिक कोट्या करतील अशी शक्यता अजिबात वाटत नाही. किंबहुना, ही पात्रं शाब्दिक कोट्या करतात असं दाखवलं असतं, तर ते विसंगत वाटलं असतं.

ग्रामीण भागाचं परिवर्तन व्हावं आणि आमूलाग्र सुधारणा होऊन लोकांचं जीवन सुखकर व्हावं याची तळमळ पाटलांना होती. दारिद्र्य, अज्ञान, निरक्षरता, बेरोजगारी, कुपोषण हे ग्रामीण भागातलं भीषण वास्तव सहजासहजी बदलणार नाही याची जाणीव त्यांना असल्यामुळे या प्रश्नांकडे खेळकरपणे पाहण्यातच शहाणपण आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणूनच, ग्रामीण भागातल्या विविध प्रकारच्या समस्यांचं दर्शन घडवणाऱ्या विनोदी कथा त्यांनी लिहिल्या.

वाचकांना हसवता हसवता ग्रामीण भागातल्या प्रश्नांची जाणीव करून देणं, हेच शंकर पाटील यांच्या विनोदी लेखनाचं वैशिष्ट्य आहे, आणि कारुण्यातून जन्माला आलेला विनोद हे त्यांच्या विनोदाचं मर्म आहे. वाचकांचं मनोरंजन करत असताना त्यांना अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य पाटलांच्या विनोदात आहे.

ग्रामीण जीवनावर विनोदी कथा लिहिणाऱ्या लेखकांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे द. मा. मिरासदार! मिरासदारांनी विनोदनिर्मितीसाठी जी वेगवेगळी तंत्रं वापरली, त्यांतलं एक तंत्र म्हणजे सत्यकथन! लहान मुलं निरागस असल्यामुळे सत्य बोलतात. त्यामुळे मिरासदारांनी आपल्या काही कथांमध्ये लहान मुलांना निवेदक बनवलं आहे. त्यांच्या चौकस वृत्तीमुळे आणि सत्य बोलण्यामुळे मोठ्यांचा दांभिकपणा कसा उघडकीला येतो याचं अत्यंत हास्यकारक वर्णन 'ड्रॉइंग मास्तरांचा तास' या कथेत केलं आहे.

मिरासदारांच्या कथांविषयी बोलताना त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमांचा उल्लेख केलाच पाहिजे. मिरासदारांनी शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यासह एके काळी महाराष्ट्रात गावोगावी फिरून कथाकथनाचे अनेक कार्यक्रम केले. रसाळ निवेदनामुळे आणि कथा सांगण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे त्यांच्या आणि शंकर पाटलांच्या कथांमधला विनोद छोट्याछोट्या गावांत पोहोचला.

मिरासदारांनी सुमारे तीनशे कथा लिहिल्या असून त्या तीसेक कथासंग्रहांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. 'माझ्या बापाची पेंड', 'माझी पहिली चोरी', 'व्यंकूची शिकवणी', 'नव्व्याण्णवबादची एक सफर', 'शाळेतील समारंभ', 'आजारी पडण्याचा प्रयोग', 'धडपडणारी मुले', 'ड्रॉइंग मास्तरांचा तास', 'बाबू शेलाराचं धाडस' यांसारख्या त्यांच्या कथांनी मराठी साहित्यातल्या विनोदी कथेची समृद्धी वाढवली आणि विनोदी कथेला वेगळं वळण दिलं.

मिरासदारांनी आपल्या कथांमधून वैचित्र्यपूर्ण माणसांचे अनेक नमुने मांडताना, माणसाचा मूर्खपणा, दांभिकपणा, लबाडी, स्वार्थीपणा, आत्मप्रौढी, इत्यादी स्वभावदोषांचं चित्रण केलं आहे. अतिशयोक्तीमुळे कुठलीही विसंगती ठळकपणे नजरेला येत असल्यामुळे आणि त्यातून हास्यनिर्मिती होत असल्यामुळे, मिरासदारांनी आपले अनुभव अतिशयोक्त पद्धतीने सांगितले आहेत. मिरासदारांच्या कथा वाचताना हे लक्षात येतं की, ते शाब्दिक कोट्या करण्याच्या फंदात न पडता, किंवा ओढूनताणून विनोद न करता, आपल्याला जो अनुभव मांडायचा आहे तो ठसठशीतपणे मांडण्याला महत्त्व देतात. काही वेळा कथेमधला मूळ विषय बाजूला राहून विनोदाला आणि कोट्यांना प्राधान्य मिळण्याचा धोका असतो, पण मिरासदारांचं वैशिष्ट्य हे की, विनोदनिर्मितीचं एक साधन म्हणून त्यांनी कथेचा उपयोग कधीही केला नाही.

आजच्या काळातले विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे यांनी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही स्वरूपांचं लेखन केलं आहे. उपजत विनोदबुद्धी, सूक्ष्म निरीक्षण आणि सामाजिक समस्यांचं भान असणाऱ्या टाकसाळ्यांनी समाजातल्या तत्कालीन प्रश्नांवर वर्तमानपत्रांतून जेव्हा विनोदी लेखन करायला सुरुवात केली, तेव्हा वाचकांनी त्याचं मनापासून स्वागत केलं. टाकसाळे यांचं कुठलंही पुस्तक वाचायला घेतलं, की आपल्याला एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे त्यांची सोपी, ओघवती आणि वाचकांशी संवाद साधणारी भाषा! अनौपचारिक शैलीमुळे त्यांचं साहित्य ही जणू काही खुसखुशीत गप्पांची मैफील आहे असं वाटतं. या मैफिलीत स्मितहास्यापासून खदाखदा हसवणाऱ्या विनोदाचं दर्शन घडतं. वाचकांना हसवत असताना विचारप्रवृत्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखनात आहे.

उपहास, उपरोध, शाब्दिक कोट्या, अतिशयोक्ती आणि विडंबन ही टाकसाळे यांच्या विनोदाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. त्यांना शाब्दिक कोट्यांची आवड असली तरी एखादी कोटी साधण्यासाठी किंवा जुळवण्यासाठी ते अट्टहास करताना दिसत नाहीत. त्यामुळेच त्यांचा विनोद कुठेही क्लिष्ट आणि कृत्रिम न वाटता सहज आणि स्वाभाविक वाटतो. टाकसाळ्यांच्या विनोदाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी कधीही स्त्रियांना विनोदाचा विषय बनवलं नाही, तसंच विनोदासाठी अश्लीलतेचा आधार घेतला नाही. समाज अधिक प्रगल्भ आणि सुसंस्कृत व्हावा, समाजातला दांभिकपणा नाहीसा व्हावा हा हेतू त्यांच्या सर्वच विनोदामागे दिसतो.

स्त्रियांना विनोदबुद्धी नसते हा अनेक पुरुषांचा लाडका सिद्धांत आहे. स्त्रियांच्या विनोदबुद्धीबद्दल असं सरसकट विधान करणं हे चुकीचंच नव्हे तर स्त्रियांवर अन्याय करणारंही आहे. स्त्रियांना उत्तम विनोदबुद्धी असते याचे अनेक दाखले देता येतील. त्यातील काही निवडक दाखले पाहा.

लक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी या विनोदी लेखिका म्हणून प्रसिद्ध नसल्या, तरी त्यांना उत्तम विनोदबुद्धी होती आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन खेळकर होता. लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्रे (भाग १ ते ४) हे आत्मचरित्र १९३४ ते १९३६ या काळात प्रथम प्रसिद्ध झालं. त्यानंतरच्या काळात ह्या आत्मचरित्राचे चारही भाग एकत्र प्रसिद्ध झाले. या आत्मचरित्रात लक्ष्मीबाईंनी आपल्या संसारातल्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. त्या वाचत असताना लक्ष्मीबाईंच्या विनोदबुद्धीचा, रसाळ भाषेचा, दिलखुलास वृत्तीचा आणि थट्टामस्करी करण्याच्या त्यांच्या स्वभावाचा वारंवार प्रत्यय येतो. लक्ष्मीबाईंनी आपल्या आयुष्यात घडलेले अनेक क्लेशदायक आणि हास्यकारक प्रसंग, प्रत्यक्षात जसे घडले तसे प्रांजळपणे सांगितलेले आहेत. आपण वाचकांशी गप्पा मारत आहोत अशा पद्धतीनं लक्ष्मीबाईंनी त्यांच्या संसारातल्या आठवणी सांगितल्या असल्यामुळे 'स्मृतिचित्रे'मधल्या त्यांच्या कथनात आणि विनोदात सहजता आली आहे.

लक्ष्मीबाईंच्या निखळ आनंद देणाऱ्या विनोदाची चर्चा करत असताना बहिणाबाई चौधरींची आठवण येते. आयुष्याचं तत्त्वज्ञान साध्या, सोप्या आणि रसाळ भाषेत सांगणाऱ्या बहिणाबाई निरक्षर होत्या, पण त्यांची काव्यप्रतिभा आणि विनोदबुद्धी श्रेष्ठ दर्जाची होती. शेतात काम करताना, जात्यावर दळताना आणि चूल फुंकताफुंकता त्यांनी अनेक गाणी रचली. त्यांतली काही गाणी सुदैवानं कोणीतरी टिपून ठेवल्यामुळे हा अमोल ठेवा मराठी वाचकांपर्यंत पोहोचला. त्यांच्या काव्यातला विनोद आणि कोट्या आपल्याला स्तिमित करतात. शिक्षणाचा आणि विनोदबुद्धीचा काहीही संबंध नसतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बहिणाबाई चौधरी!

बहिणाबाईंच्या काही कोट्यांची आणि विनोदांची उदाहरणं आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याला लिहिलेल्या प्रस्तावनेत आढळतात. ज्यातून पीठ 'येते' त्याला 'जाते' का म्हणतात? जो जमिनीत 'उभा' आहे त्याला 'आड' का म्हणतात? किंवा ज्या दिवशी आपण गुढी 'उभारतो' त्याला 'पाडवा' का म्हणतात? यांसारख्या कोट्यांतून त्यांच्या तरल विनोदबुद्धीचा प्रत्यय येतो. माणसांना हसवून शहाणं करायचं हाच विनोदाचा मुख्य हेतू आहे, हे बहिणाबाईंसारख्या निरक्षर कवयित्रीनं ओळखलं होतं.

स्त्री-साहित्यातल्या विनोदाचा विचार करताना असं लक्षात येतं की, पद्यविडंबनांच्या क्षेत्रातदेखील अनेक कवयित्रींनी लक्षणीय कामगिरी केली आहे. त्या संदर्भात सुशीला मराठे, सुशीला बापट, अपर्णा देशपांडे आणि मधुवंती सप्रे या कवयित्रींचा विशेष उल्लेख केला पाहिजे. त्यांची पद्यविडंबनं वाचताना त्यांचं काव्यावरचं प्रभुत्व आणि त्यांची विनोदबुद्धी या दोन्हींचा प्रत्यय येतो.

ज्यांच्या विनोदी लेखनाविषयी फारसं लिहिलं गेलं नाही, अशा शकुंतला परांजपे यांनी आपल्या सोप्या, ओघवत्या आणि चटकदार भाषेत लिहिलेला 'माझी प्रेतयात्रा' हा लेखसंग्रह १९५७ साली प्रसिद्ध झाला. त्यातले लेख वाचताना त्यांच्या खेळकर दृष्टीकोनाचा आणि विनोदबुद्धीचा प्रत्यय येतो.

इंद्रायणी सावकार यांच्या कथा वाचताना असं लक्षात येतं की, त्यांचा बराचसा विनोद उपहासात्मक आहे. या उपहासामागे कोणाचा राग किंवा तिरस्कार नसल्यामुळे, त्यांच्या विनोदाचा आस्वाद मोकळ्या मनानं घेता येतो. त्यांच्या कथांमधला विनोद प्रामुख्यानं स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ असून त्यात शाब्दिक कोट्या जवळपास नाहीत, असं म्हटलं तरी चालेल. त्यांच्या बऱ्याच कथांमधे विनोदाच्या जोडीला हलकाफुलका शृंगार असतो. त्यांच्या विनोदाचा भर मुख्यत: मानवी स्वभावातल्या दोषांची आणि सामाजिक विसंगतींची थट्टा करण्यावर आहे. विनोद हे शस्त्र असलं, तरी इंद्रायणी सावकार ते कोमल हातानी वापरतात. त्यामुळे त्यांचा विनोद बोचरा होत नाही.

दीपा गोवारीकर यांनी गंभीर आणि विनोदी असं दोन्ही प्रकारचं लेखन केलं आहे. 'कहाणी गुळाच्या ढेपेची', 'माझं(पण) विश्व', 'साष्टांग धप्प', 'खसखस आणि खुसखुस' हे त्यांचे काही विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. समाजातल्या अनिष्ट गोष्टींचा उपहास करणारा, कधी स्वत:चीच थट्टा करणारा आणि आयुष्याकडे खेळकरपणे पाहायला शिकवणारा त्यांच्या लेखनातला नर्मविनोद वाचकांना हसवत असतानाच, मानवी स्वभावातल्या आणि समाजातल्या विविध प्रकारच्या विसंगतींवर प्रकाश टाकतो.

पद्मजा फाटक यांना तल्लख विनोदबुद्धीचं वरदान लाभलं होतं. खासगी संभाषणात आणि जाहीर भाषणात त्या विनोदप्रचुर बोलायच्या. त्या विनोदी लेखिका म्हणून प्रसिद्ध नसल्या तरी, हलक्याफुलक्या आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या लेखनातून त्यांच्या मिश्कील आणि खिलाडू वृत्तीचं दर्शन घडतं. 'हसरी किडनी' या गंभीर विषयावरच्या पुस्तकातदेखील त्यांची खेळकर वृत्ती, मनुष्यस्वभावातल्या विविध प्रकारच्या विसंगती हेरण्याची क्षमता आणि त्यावर मिष्कील भाष्य करण्याचं कौशल्य, या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा प्रत्यय येतो.

गेली सुमारे पस्तीस वर्षं सातत्यानं विनोदी लेखन करणाऱ्या मंगला गोडबोले ह्यांनी मराठीतल्या विनोदी साहित्याच्या क्षेत्रात मानाचं स्थान मिळवलं आहे. उपजत विनोदबुद्धी, सूक्ष्म निरीक्षण आणि आयुष्याकडे पाहण्याचा खेळकर दृष्टीकोन ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं असल्यामुळे त्यांनी अनेक प्रकारच्या सामाजिक विसंगतींमधून विनोद निर्माण केला आहे. त्यातूनच त्यांचं विनोदी साहित्य जन्माला आलं आहे. १९८०च्या दशकात त्यांनी सदरलेखनानं आपल्या विनोदी लेखनाला सुरुवात केली. 'झुळूक' नावाचं सदर त्या 'स्त्री' मासिकात लिहायच्या. सतत दहा वर्षं चाललेल्या या सदरातील लेखांचे तीन संग्रह, 'झुळूक', 'पुन्हा झुळूक' आणि 'नवी झुळूक' या नावांनी प्रसिद्ध झाले.

मराठी भाषा आणि तिचा घसरत चाललेला दर्जा हा मंगला गोडबोले यांच्या चिंतनाचा एक विषय आहे. आजची तरुण पिढी ज्या तऱ्हेचं बिघडलेलं मराठी बोलते, त्यावर हसतखेळत भाष्य करण्यासाठी त्यांनी 'फाडफाड मराठी' ही विनोदी कथा लिहिली आहे. त्यातला विनोद उपहासात्मक असून तो आजच्या मराठीची दुरवस्था दाखवतो.

मंगला गोडबोले यांनी स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर विपुल लेखन केलं आहे. स्त्रिया कितीही शिकल्या तरी त्यांना बाईपणाच्या मर्यादा कशा आड येतात, पुरुषी अहंकारामुळे आणि अनेक अन्यायकारक रूढी समाजाच्या हाडीमांसी खिळल्यामुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा संकोच कसा होतो याची जाणीव त्यांना प्रकर्षानं झाली. त्यामुळेच त्यांनी आपल्या लेखनातून प्रामुख्यानं स्त्रियांचे प्रश्‍न मांडले. हे प्रश्‍न विनोदाच्या अंगानं मांडल्यामुळे वाचकांचं मनोरंजनतर होतंच आणि मूळ प्रश्नांचं गांभीर्यही त्यांच्यापर्यंत पोहोचतं. मंगला गोडबोले यांच्या विनोदाचा एक वेगळा नमुना म्हणून 'स्वतंत्रता देवीची कहाणी' या कथेचा दाखला देता येईल. स्त्रियांना कुटुंबात दुय्यम स्थान देणाऱ्या, स्त्रीस्वातंत्र्याची बूज न राखणाऱ्या आणि स्त्रियांना काबाडकष्ट करायला लावून स्वत: ऐशआरामात रहाणाऱ्या पुरुषी वृत्तीला या कथेत हसतखेळत चिमटे घेतले आहेत.

मंगला गोडबोले यांचं विनोदी साहित्य वाचत असताना एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते. ती म्हणजे, त्या व्यक्तीवर टीका न करता वृत्तीवर टीका करतात. उपहास, अतिशयोक्ती आणि शाब्दिक कोट्या ही त्यांच्या विनोदाची महत्त्वाची वैशिष्ट्यं आहेत. सामाजिक जीवनात वावरताना त्यांना काही कटू अनुभव आले असले, तरी त्यांच्या विनोदात कुठेही कटुता जाणवत नाही. याचं कारण सामाजिक प्रश्नांकडे आणि विविध प्रकारच्या विसंगतींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन समंजस आणि खेळकर आहे. त्यांच्या निर्विष विनोदाचं हेच गमक आहे.

या लेखात जरी निवडक विनोदी लेखक-लेखिकांच्या साहित्याची चर्चा केली असली, तरी इतर अनेकांनी विनोदी साहित्याच्या क्षेत्रामध्ये मोलाची भर घातली आहे. त्यामध्ये पद्माकर डावरे, वसंत सबनीस, रमेश मंत्री, वि. आ. बुवा, सुभाष भेंडे, रा. रं. बोराडे, द. पां. खांबेटे, अनंत अंतरकर, शिरीष कणेकर, अशोक जैन ('कलंदर'), श्रीकांत बोजेवार ('तंबी दुराई'), अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, लीलाधर हेगडे, वामन होवाळ, राम नगरकर, द. ता. भोसले, बाळ गाडगीळ, शरद वर्दे, शकुंतला फडणीस, शकुंतला बोरगावकर, मंदाकिनी गोगटे, इरावती कर्वे, मोहिनी निमकर, प्रतिमा इंगोले, अनुराधा औरंगाबादकर, यमुनाबाई भट या लेखकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

एके काळी चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, गंगाधर गाडगीळ यांच्यासारखे अनेक दिग्गज विनोदी लेखक दर्जेदार विनोदी साहित्याची निर्मिती करत होते. आज त्यांच्या तोडीचा एकही विनोदी लेखक आढळत नाही. काळाच्या ओघात दर्जेदार विनोदी लेखक पुन्हा उदयाला येतील, अशी आशा करायला हरकत नाही.

१९९१ साली झालेल्या जागतिकीकरणानंतर सर्वच क्षेत्रांतलं चित्र झपाट्यानं बदलतंय. जागतिकीकरणामुळे आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगानं झालेल्या प्रगतीमुळे संवादाची अनेक साधनं निर्माण झाली आहेत आणि त्यात सातत्यानं भर पडते आहे. त्यामुळे विनोदाचे विषय, त्याचं स्वरूप आणि तो व्यक्त होण्याचं माध्यम यांत काळाच्या ओघात बदल होतील. आजकाल इंटरनेट आणि मोबाईलचा जमाना आहे. या माध्यमांचा प्रचंड प्रभाव असलेली आणि त्यांचा सतत वापर करणारी आजची पिढी पाहिल्यानंतर असं वाटतं की, यापुढच्या काळात लेख, कथा, निबंध, नाटक या स्वरूपात विनोद थोड्याफार प्रमाणात प्रसिद्ध होत राहिला, तरी तो 'ट्विटर', 'फेसबुक', 'व्हॉटस्अप' यांसारख्या समाजमाध्यमांमधून, वृत्तपत्रांमधल्या सदरांमधून, तसंच चारोळी-वात्रटिका यांसारख्या प्रकारांमधून अधिक प्रमाणात व्यक्त होण्याची शक्यता आहे.

---

हा लेख रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या प्रदीप कुलकर्णी लिखित 'यांनी केलं विनोदविश्व समृद्ध' या पुस्तकातील माहितीच्या आधारावर लिहिला आहे.
इमेल : pradeep0849@yahoo.com
फोन : 98200 16849

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet