लघुकथा: "खड्डा"

"पिळकर, ते कंत्राट भरा लवकर. त्याच्या मंजूरीचं काय ते मी पाहून घेईन! सरकारी माणसं आपल्या खिशातआहेत!", कीटवानी आत्मविश्वासाने म्हणाले.

पिळकरांना माहिती होते की कंत्राट भरणं ही औपचारिकता आहे. अनेकांचा खिसा गरम करून कीटवानी साहेब ते कंत्राट खिशात घालणार आणि आपल्यालाही त्यातला काही मलिदा खायला मिळणार!

काही महिन्यांनी कंत्राट कीटवानीलाच मिळालं. शहरातील एका रस्त्याचे बांधकाम आता किटवानी करणार होता. गेल्या वर्षी अशाच एका उड्डाण पुलाचे कंत्राट मिळवून त्याने निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरला होता पण पावसाळ्यात पूल कोसळून अनेक वाहनांचे नुकसान होऊन दहा माणसे ठार झाली होती. ठार झालेल्यांपैकी एकजण ट्रक बाजूला लाऊन टपरीवर चहा पीत उभा असलेला निष्पाप ट्रक ड्रायव्हर सुद्धा होता. कीटवानीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पण तो "पुराव्याभावी" सुटला कारण चांगल्या वकिलांना नेहमीप्रमाणे खिशात घालून तो तेथूनही शिताफीने सुटला. पुढे त्यालाच पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश मिळाले.

नव्या रस्त्याचे बांधकाम सुरु झाले. उड्डाण पूल प्रकरणातून त्याने काहीच धडा घेतला नाही. रस्ताचं बांधकाम ठरल्या वेळेआधीच म्हणजे सहा महिन्यांतच पूर्ण झालं. लोक खुश झाले. नव्या रस्त्यावरून आवडीने आपापली वाहने नेऊ लागले. हा नवा शॉर्टकट झाल्याने लोकांचा वेळ वाचणार असल्याने लोक जाम खुश होते! नव्या रस्त्याबद्दल सगळ्यांना माहिती पडल्याने त्यावर ट्रॅफिक वाढू लागली. पावसाळा सुरु झाला. हळूहळू त्या नव्या रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली. बाईकवरून जाता येता लोक सरकारला आणि बांधकाम करणाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहू लागले.

त्या शहरात नुकतेच शाळा कॉलेज सुरु झाले होते. एका कॉलेजमध्ये कट्ट्यावर-

"मधुलीता, आता कॉलेज सुरु झाल्याने आपल्याला वरचेवर भेटणे शक्य झाले आहे. सुट्टीचा काळ मला खूप कठीण गेला!!"

"हो राकेश, बऱ्याच दिवसानंतर आपण भेटत आहोत. माझ्या घरी तर वातावरण खूप शिस्तीचं आहे. मी प्रेम वगैरे करेल हे तर माझ्या वडिलांना सहनसुद्धा होणार नाही.मी तुझ्याशी चॅट करत असतांना वडिलांना एकदा संशय आला, तसे ते बोलले नाहीत. आपण त्या पर्वतावरील झाडाखाली भेटू कारण कदाचित वडिलांनी एखादा गुप्तहेर लावला असेल आपल्यामागे! मध्यंतरी आईला कुणाशीतरी माझ्या लग्नासंदर्भात बोलतांना मी चोरून ऐकले होते!"

ते दोघे ठरल्याप्रमाणे झाडाखाली भेटले. तो म्हणाला, "मधु, आता मला वाटतं की आपण काहीतरी निर्णय घ्यावा. आपण मंदिरात जाऊन लग्न करूनच परतावं आणि मग कोर्टात जाऊन लग्न करुया. माझे काही मित्र मदत करतील मग पुढचं पुढे पाहू! त्या मित्रांनी आधी सुद्धा एका जोडप्याला अशीच पळून जायला मदत केली आहे!"

मग झाडाखाली एक योजना बनवण्यात आली...

दरम्यान एका प्रवचन केंद्रात अनेक ज्येष्ठ नागरिक बसले होते. श्री. साधकराम आपल्या अनेक समवयस्क मित्रांसह तेथे बसले होते.

"भगवंत पुढे अर्जुनाला म्हणाले की कर्म कर आणि फळाची अपेक्षा करू नकोस. कारण अर्जुन हा आपले क्षत्रिय कर्म करण्यापासून परावृत्त होत होता आणि युद्धानंतरच्या परिणामांच्या फळाची भीती त्याच्या मनात होती! प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळे मिळतात. भगवंत त्यात हस्तक्षेप करत नाहीत. या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मात कर्माची फळे भोगवीच लागतात. यासाठी कर्माचा मात्र त्याग न करता निष्काम कर्म हा मार्ग आहे!"

प्रवचन बराच वेळ चालले. मग साधकराम घरी जायला निघाले तेवढ्यात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्या केंद्राची रुग्णवाहिका तयार होती. साधकराम यांच्या मुलाला म्हणजेच बिल्डर कीटवानी याला धक्काच बसला. तोही कार घेऊन तडक हॉस्पिटलकडे निघाला. वडिलांचाच उभारलेला सगळा व्यवसाय तो पुढे चालवत होता.

नव्या बांधलेल्या रस्त्यावर पडलेल्या एका मोठ्या खड्ड्याला टाळतांना राकेश तोल जाऊन खाली पडला. डोळ्यांव्यतिरिक्त चेहऱ्यावर पूर्ण ओढणी झाकलेली मधु सुद्धा खाली पडली. मधूच्या अंगावरून वेगाने येणारा ट्रक गेला कारण ट्रक चालकाला अचानक ट्रकच्या वेगावर नियंत्रण करणे कठीण गेले. अर्थात ट्रकचालकाचा दोष आहे असे त्या गर्दीतले कुणीही म्हणत नव्हते. या सगळ्या प्रकाराने गर्दी जमली. दोघांची ओळख पटली. ट्रॅफिक जाम झाला. रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी जागाच मिळू शकली नाही त्यातच साधकराम यांचा अंत झाला.

काही वेळानंतर त्याच मार्गाने आलेल्या कीटवानीच्या कारमध्ये त्याला पिळकरचा घाबऱ्या आवाजातला कॉल आला, "साहेब, रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकल्याने साधकराम रुग्णवाहिकेतच वारले आणि ट्रॅफिक जाम झाल्याचं कारण असं आहे की खड्ड्यामुळे तुमची मुलगी मधु हिचा बाईकवरून पडून अॅक्सिडेंट आणि मृत्यू झाला आहे. ती माझ्याच मुलासोबत लग्नासाठी पळून जात होती! तो कायमचा अपंग झाला आहे". कीटवानीच्या पोटात मोठा भीतीचा खड्डा पडला.

(समाप्त)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet