Skip to main content

करियरचे फ्लोटर्स घालून मी

करियरचे फ्लोटर्स घालून
मी लॉंग ड्राईव्हला तर निघालो
तू जे जे म्हणून निषिध्द आहे
ते ते झोळीत टाकत असताना
ज्या एका भव्य रस्त्यावर
मी तुझे इफ्स ऍण्ड बट्स
सोडवत होतो त्या त्या
ठिकाणी तुझ्या अंड्यांचे
अनिवासी पिंग सोडलेले.
एक कॅरेक्टर म्हणून
सोपवलेल्या भूमिकेत वठून झाल्यावर
कातडीला चिकटून निथळलेले
काही थेंब जर
असतील तू आणि मी
तर असंही निदान
करवत नाही की
मी होतो एक कन्यू
आणि वल्हवून वल्हवून
दिशा सापडत गेलेली
तू माझ्यात बसलेली
प्रवासी.

तुला लिहीत असतानाच
इथे पुढ्यात साचलाय
मांसल सूर्यप्रकाश
तू वळशील आणि
झरर्कन गद्याची गुर्मी
विरेल या अर्धवट आशेने .
आणि ज्या गुलाबी गुहेतून
पोखरलेत तुझ्या आत आत
उष्ण शीतल प्रवाहांचे फॉसिल्स
तिचे द्वार केवळ
एकमुखी डायाफ्रेम. नो
एक्झिट. नो. नो.

क्रेमर Sat, 29/10/2011 - 00:52

कवितेचे नाव 'करियरचे फ्लोटर्स घालून मी' असेच आहे की काही वेगळे आहे?

... Sat, 29/10/2011 - 03:14

शपथ सांगते पहिल्या पाचसहा ओळीशिवाय पुढे काही अर्थच लागला नाही
तुम्ही कवितेबरोबर जरा तिचा भावार्थ द्याना म्हंजे माझ्यासारख्याची सोय होईल
गुर्जी जरा रसग्रहण करा हो

प्रियाली Sat, 29/10/2011 - 07:15

कवितेपेक्षा प्रतिसाद आवडले. आत्तापर्यंत मला वाटायचं मीच कवितेत ढ. ;-)

तरीही, हिम्मत करून एक प्रश्न विचारते

वरील रचनेस कविता का म्हणायचे? आय मीन, बाकीचे सर्व म्हणतात म्हणून मीही म्हणेनच, पण तरीही...

(प्रश्न गंभीर आहे आणि गांभीर्याने विचारला आहे. एखाद्या रचनेस कविता म्हणण्यासाठी कोणते निकष पूर्ण करावे लागतात?)

वंकू कुमार Sat, 29/10/2011 - 09:38

In reply to by प्रियाली

कवितेने काव्य या कॅटॅगरीत असण्यासाठी काही निकष पूर्ण करावेत अशी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. मीटर, यमक, छंदोबध्दता इ. काही 'काव्यगुण' असलेले लेखन म्हणजे कविता असे सरसकट लेबलिंग करावे का ? माझ्या मते एखादी लघुकादंबरी देखील कविता असू शकते. मुळात काव्य मला जीवन ज्या मॅड ऍंगलने दाखवतं त्यातच त्याच्या काव्य असण्याचे गुण मला दिसतात. ते सर्वांना मान्य असण्याची गरज नाही. पण नेहमीच्याच गोष्टी डिफॅमिलियराईझ करुन दाखवणे हा साहित्याचा गुण थोडा वास्तव चौकटीच्या बाहेर जाऊन काव्य भाषेच्या मदतीनं अधोरेखित करतं. मला वाटतं त्यासाठी यमक, शब्द्खेळ(शब्दच्छल) या साधनांची गरज नाही. संपूर्ण इंपॅक्ट देखील काव्यमय असू शकतो.

श्रावण मोडक Sat, 29/10/2011 - 11:34

In reply to by वंकू कुमार

एखादी लघुकादंबरी देखील कविता असू शकते.

हो. एखादी कविताही कादंबरी असू शकते. पण नुसती कादंबरीच का, ती एकाचवेळी कविता असेल, कादंबरी असेल, कथा असेल, दीर्घकथाही असेल. तीच गोष्ट उलट्या क्रमानेही लागू होते. आणि हे फक्त कवितेला नाही लागू होत. हे चित्राला लागू होतं, चित्रपटाला होतं, संगीताला होतं... जवळपास सर्वच कलांना लागू होतं. म्हणजे एखादा चित्रपट हा कवितेसारखा असू शकतो. किंवा एखादी कविता ख्याल गाण्यासारखी मनात घुसून नांदू शकते.
हा आकृतीबंधाचा घोळ उगाचच माणसांनी निर्माण करून ठेवला आहे. आकृतीबंध आला की, घाट आले, घट आले, आकार आले, रेषा आल्या, वळणं आली, टोकं आली, बाक आले, गोलाई आली, चौथाईही आलीच आणि आणखी असंच बरंच कायकाय आलं. किती ती गुंतागुंत!
हा प्रतिसाद या कवितेवर नाही. म्हणजे, कविता मानावीच का? नाही. ती बोधकथा आहे, तिला लागू नाही हा प्रतिसाद. नाही... पण ती बोधकथाच आहे असं नाही. मला तर त्या कवितेत एक कादंबरी दिसते आहे...
असो. ;)

प्रियाली Sat, 29/10/2011 - 14:33

In reply to by श्रावण मोडक

हा आकृतीबंधाचा घोळ उगाचच माणसांनी निर्माण करून ठेवला आहे. आकृतीबंध आला की, घाट आले, घट आले, आकार आले, रेषा आल्या, वळणं आली, टोकं आली, बाक आले, गोलाई आली, चौथाईही आलीच आणि आणखी असंच बरंच कायकाय आलं. किती ती गुंतागुंत!

गुंतागुंत आहे खरी. शब्दांची आणि शब्दच्छलाची. बाईला बाई म्हणावं का? कारण प्रत्येक बाईत एखादा पुरुष दडलेला असतो. बाई म्हटली की घाट आले, बाक आला, गोलाईही आली. प्रत्येक पुरुषातही बाई दडलेली असते. गोलाई नसली म्हणून काय झालं? मोठ्या माणसात लहान मूल दडलेलं असतं आणि लहान मुलात मोठा माणूस. डोंगरात एखाद्याला समुद्र दिसेल आणि समुद्राला डोंगराची प्रतीमा देता येईल. माणसाने कॅटेगर्‍या पाडून गोंधळ घातला आहे खरा.

एकंदरीत काय मला कविता कळत नाहीत यात मी सुखी राहावं असं म्हणते. ;-)

स्मिता. Sat, 29/10/2011 - 15:17

In reply to by प्रियाली

श्रामो आणि प्रियाली यांच्यावर कवितेचा परिणाम झालेला दिसतोय ;-)

प्रियाली Sat, 29/10/2011 - 16:07

In reply to by स्मिता.

माझ्यावर परिणाम झाला आहे का ते नक्की माहित नाही पण माझा वरचा प्रतिसाद कवितेसारखा भासू लागला आहे. स्वतंत्र प्रकाशित करावा म्हणते. ;-)

स्मिता. Sat, 29/10/2011 - 16:20

In reply to by प्रियाली

तुमचा वरचा प्रतिसाद (आणि श्रामोंचासुद्धा) मूळ कवितेपेक्षा कुठेच कमी नाहिये. त्याचे ३-३ शब्दांचे तुकडे करून एकाखाली एक लिहून कविताच तयार होईल.
यशस्वीरित्या कविता करायला लागल्याबद्दल अभिनंदन ;-)

श्रावण मोडक Sat, 29/10/2011 - 17:38

In reply to by प्रियाली

चिंतू आणि घासू यांची समीक्षणं आली आहेत. मी वर म्हटलंय तेच बरोबर आहे, असं आता मला वाटू लागलंय. कवितेचाच परिणाम हा! ;)

वंकू कुमार Sat, 29/10/2011 - 14:33

In reply to by श्रावण मोडक

:)

वंकू कुमार Tue, 01/11/2011 - 13:23

In reply to by श्रावण मोडक

मराठीमध्ये काही ठरावीक पध्दतीने व काही ठरावीक लयीत बसणार्‍या कवितांचे वय झाले आहे हे आता मान्य करायला हवे. त्यासाठी नवीन भाषा जी आज बोलली जात आहे तिच्यामधील ताल, लय व ध्वनीतत्वे आजच्या मराठी कवितेमध्ये यायला हवीत. ही एक जनरल भूमिका आहे. वरच्या कवितच्या बाबतीत बोलायचे झाले तर ही कविता लिहिताना -

em>''करियरचे फ्लोटर्स घालून मी लॉंग ड्राईव्हला तर निघालो तू जे जे म्हणून निषिध्द आहे ते ते झोळीत टाकत असताना
ज्या एका भव्य रस्त्यावर मी तुझे इफ्स ऍण्ड बट्स सोडवत होतो त्या त्या ठिकाणी तुझ्या अंड्यांचे अनिवासी पिंग सोडलेले.
एक कॅरेक्टर म्हणून सोपवलेल्या भूमिकेत वठून झाल्यावर कातडीला चिकटून निथळलेले काही थेंब जर असतील तू आणि मी
तर असंही निदान करवत नाही की मी होतो एक कन्यू आणि वल्हवून वल्हवून दिशा सापडत गेलेली तू माझ्यात बसलेली प्रवासी.

तुला लिहीत असतानाच इथे पुढ्यात साचलाय मांसल सूर्यप्रकाश तू वळशील आणि झरर्कन गद्याची गुर्मी विरेल या अर्धवट आशेने .
आणि ज्या गुलाबी गुहेतून पोखरलेत तुझ्या आत आत उष्ण शीतल प्रवाहांचे फॉसिल्स तिचे द्वार केवळ एकमुखी डायाफ्रेम. नो एक्झिट. नो. नो.''

अशी लिहिली असता तिला गद्याचे रुप तर आले असते पण वाक्यांमधली लयीमुळे मात्र त्यातील काव्याचे तत्व यांमधील विरोधाभास ठळक दिसला असता.

अर्धवट Sat, 29/10/2011 - 07:33

माझा धीर सुटत चाललाय
तरीही मनाला समजावतोय,
नाही व्हायचं निराश,
अशानं कसं होणार तुला काव्यज्ञान,
कवितेची अंडी अलगद उमलून
अर्थाचा सोहळा, इवल्या चोचीतून
डोकावताना कसा दिसेल.
काव्याच्या काळ्या कर्दमातून
मांसल लाल अर्थाचा गोळा
क्षितीजावर उगवताना,
छंदवृताचं अर्ध्य देऊन
पवित्र होतोय का मी,

अनंत ढवळे Sat, 29/10/2011 - 10:01

कविता आवडली आणि कवितेतली गती देखील.

प्रकाश घाटपांडे Sat, 29/10/2011 - 10:17

अशा कवितांच एक बर असतं कि काही अर्थ काढायला वाचक मोकळा असतो. तसेही संकेतस्थळाचे ऐसी अक्षरे रसिके लोळविन हे बोध वाक्य आहेच.

श्रावण मोडक Sat, 29/10/2011 - 12:45

In reply to by प्रकाश घाटपांडे

ऐसी अक्षरे रसिके लोळविन

हाहाहाहा... लय भारी. सध्याच्या काही धाग्यांकडे पाहता आम्ही मुळातच हसता हसता लोळतो आहोतच. ;)

Nile Sat, 29/10/2011 - 10:21

प्रेरणादायी कविता आवडली. हा प्रतिसाद कवीला कदाचित क्रूर वाटेल, पण तो नाही याची ग्वाही आमची कृतीच देईल.

घंटासूर Sat, 29/10/2011 - 11:55

सुमार कवितांची कडवी लिहून मी
खुप असंबद्ध लिहितो,
जे जे म्हणून टुकार आहे,
ते धाग्यावर टाकताना,
दुसर्‍यांच्या मात्र
चांगल्याच प्रतिसादांची
अपेक्षा ठेवतो.

चिंतातुर जंतू Sat, 29/10/2011 - 13:56

पुन्हा एकदा माझ्या अल्पमतीनुसार अर्थबोधनाचा एक प्रयत्न...

एखाद्या क्षेत्रात करियर करायचं म्हटलं की अनेकजणांकडून आणि अनेक दिशांनी आपल्याला उपदेशाचे डोस पाजले जातात. जर कवितेत करियर करायचं असेल तर आपल्याकडची 'लोकप्रियता आणि पैसा म्हणजेच यश' असं मानणारी मंडळी (कारण अशी मंडळीच डोस पाजण्यात पुढे असतात) कसले डोस पाजतील? बहुतेक संदीप-सलीलच्या कविता कशा प्रसवाव्या याचे. पण मला जी कविता प्रसवायची आहे तिची अंडी या असल्या बीजांनी फळणार्‍यांतली नाहीत. म्हणून मग मला असले सर्व उद्बोधक डोस फाट्यावर मारावे लागतात आणि निषिद्ध गोष्टींच्या मागे लागावं लागतं. बर्‍याच गोष्टी करताना मी त्यात माझ्या स्वत्वानुसार वागण्यापेक्षा लोकांच्या माझ्याबाबतच्या अपेक्षा काय आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना मी जसा हवा आहे तसा वागतो. पण कविता करताना मला ते सगळं सोडून देऊन निखळ मी काय आहे त्याकडे जावं लागतं. तिथे कसं जायचं ते माहीत नाही. 'कविता अंतःस्फूर्तीतून जिथे नेईल तिथे मी जाईन' असं म्हणण्याइतपत मी बावळटसुद्धा नाही (म्हणजे मला हवं तिथे तिला नेणं हे कवी म्हणून माझंच काम आहे हे मला कळतंय.) तिथे गेलो की मिळणारं सुख हे संभोगाच्या अत्युच्च क्षणासारखं काहीतरी मांसल पण मस्त असेल असं मला वाटतंय आणि म्हणून मला त्याचं आकर्षण आहे. ते मिळावं यासाठी मी माझ्यातलं तेज वाया न घालवता ते साचवून बसलोय, पण मला हेदेखील माहीत आहे की एखाद्या बाईकडून मिळणार्‍या सुखाची एकदा चटक लागली की त्यातून जशी कधीच सुटका नसते तसंच हे कवितेचं वेडदेखील आहे. पण माझी ड्राईव्ह लाँग आहे आणि तीही कदाचित कधीच संपणार्‍यातली नाही. त्यामुळे एकंदरीत आम्ही दोघं एकमेकांना परस्परपूरकच आहोत.

राजेश घासकडवी Sat, 29/10/2011 - 17:35

ही कविता प्रत्यक्ष कवितेलाच उद्देशून आहे हे उघड आहे. कवीला ती मादक स्त्रीसारखी वाटते. तिच्याविषयी एक अनाम, सोडून न देता येण्यासारखं, लैंगिक आकर्षण वाटतं. शेवटच्या ओळींत उल्लेख केलेली 'गद्याची गुर्मी' कवीला चढलेली आहे खरी, पण ती इतकी तकलादू आहे की त्याच्या कवितेने नुसतं वळूनदेखील त्याच्याकडे बघितलं तर तिच्या गर्तेत तो खोल खोल ओढला जाईल. ही गद्याची गुर्मी म्हणजे नक्की काय? एका पातळीवर असं म्हणता येतं की करीअर करायची असेल तर कवीला आपल्या स्वप्नातल्य कविता करण्याऐवजी गद्य लिहीत रहावं लागतं. दुसऱ्या जास्त व्यापक पातळीवर असं म्हणता येतं की पद्य म्हणजे आंतरिक ऊर्मींना भूरळ घालणाऱ्या रसरशीत आकर्षक सायरेन, तर गद्य म्हणजे काव्यहीन रूक्ष रूटीन जीवन.
सर्वसामान्य आयुष्य हे एखाद्या लॉंग ड्राइव्हसारखं. कवी म्हणतो की मी या रस्त्यावरून करीयर वगैरे करत चाललोय खरा, पण रस्त्याच्या कोपऱ्याकोपऱ्यावर तुझी अंडी माझ्या बीजांना हाका मारत आहेत. त्यांना फळवण्यासाठी, त्यांच्यातून होणाऱ्या सृजनासाठी. या हाका आणि त्यांना दिलेली उत्तरं नक्की काय आहेत? एखाद्या भूमिकेचं ओझं दोघेही वठवताहेत का? तसं असलं तर माझ्या संगतीने येऊन कवितेला दिशा सापडली असं म्हणण्यात काय अर्थ आहे?
पण पुढच्याच ओळींत कवी या भूमिकांच्या प्रश्नाला झटकून टाकतो. कारण हे आकर्षण एवढं तीव्र आहे की तिथून सुटका नाही हे माहीत असूनही कवी तिथे खेचला जातो. एवढी प्रचंड शक्ती ज्यात आहे त्याला भूमिका वगैरे म्हणणं याला काही अर्थ रहात नाही.

चिंजंश्रामो Sat, 29/10/2011 - 21:58

मी आणि माझी प्रतिभा यांचा अव्याहत समागम असे काहीसे दिसते. आवडली.

Nile Sun, 30/10/2011 - 04:14

चिंजं गूर्जी आणी घासू गूर्जी, दोघांचे प्रतिसाद आवडले.

आडकित्ता Sun, 30/10/2011 - 11:31

देवनागरीतून इंग्रजी लिहिल्याने वाचणार्‍याचा जरा लोचा होतो:

नो
एक्झिट. नो. नो.

हे Know exit.. know.. know.. असं आहे,
की NO ENTRY सारखं NO EXIT आहे?

(KNOW EXIT हे काहीसं चक्रव्यूहात घुसलेल्या अभिमन्युला आधीच बाहेरचा रस्ता कुठे ते समजावून घे असा काहीसा उपदेश वै असावे काय?)

चिंतातुर जंतू Sun, 30/10/2011 - 14:23

In reply to by आडकित्ता

>>हे Know exit.. know.. know.. असं आहे,
की NO ENTRY सारखं NO EXIT आहे?

'नो एक्झिट' हे जाँ-पॉल सार्त्रलिखित एका नाटकाचं शीर्षक आहे. हे नाटक पाश्चात्य साहित्यात तसं सुप्रसिद्ध आहे. नाटकाशी परिचित असल्यामुळे आणि त्याचा कवितेशी संबंध जाणवल्यामुळे मला हा प्रश्न पडला नाही. नाटकाविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

धनंजय Sun, 30/10/2011 - 20:30

हं. कौशल्य आहे. विषयही भारदस्त आहे.

परंतु गद्याची गुर्मी न-उतरल्याबाबत अर्धवट निराशा कवितेच्या आकृतीत दाखवली आहे, ते हेतुतः की चुकून? हे स्पष्ट कळत नाही.

सुबोध साने Tue, 01/11/2011 - 21:10

चांगली. मांसल सूर्यप्रकाश आणि गद्याची गुर्मी शब्दप्रयोग अत्यंत आवडले. कवितेवरील कविता जास्त झाल्या की कंटाळा येतो.

अक्षय पूर्णपात्रे Tue, 01/11/2011 - 23:44

In reply to by वंकू कुमार

गद्याची गुर्मीच अशी असते की सरधोपटपणा, तारे तोडता येणे सगळेच शक्य होते.

धनंजय Wed, 02/11/2011 - 02:09

In reply to by सुबोध साने

(चिंतातुर जंतु यांचा "मी का लिहितो" धागा बघावा. लेखन करण्यात एका प्रकारचा निखळ अहंभाव असतो, ही बाब सर्वांचीच.)
लिखाणात पुष्कळच आत्मकेंद्रिता आपोआप येते. त्यामुळे नाभीनिरीक्षक लेखन हे सहज आणि प्रामाणिकपणे लिहिले जाते. त्यामुळे कित्येक कवी कविता लिहिण्याबाबत कविता लिहितात.

("कविता कवितेबाबत आहे" असे सरसकट म्हणण्याबाबत कवीने आक्षेप घेतला आहे. परंतु तो भावनेच्या भरात घेतलेला असावा. वर श्री. घासकडवी यांनी देखील "कविता कवितेला उद्देशून आहे" असे काहीसे म्हटले आहे. त्याबाबत कवीने स्मित व्यक्त केलेले आहे. वस्तुतः श्री. घासकडवी यांचे वाक्यही तितकेच सरसकट आहे. श्री. साने यांच्या वाक्याशी जवळजवळ समांतरही आहे. मर्यादित काळात काही व्यक्त करायचे म्हणजे थोडासा सरसकटपणा येणारच.)

कवितेबाबत कविता बक्कळ असल्यामुळे त्या गर्दीत उठून दिसायला कवितेचा दर्जा असामान्य असावा लागतो. यावरून माझ्या कॉलेजातील इंग्रजी प्राध्यापकाचे एक वक्तव्य आठवले. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत निबंधासाठी त्याने काही गुंतागुंतीचे "प्रौढ" विषय दिले होते, पण त्यासोबत "पावसाळा" असा बाळबोध विषयही दिला होता. त्याने खुलासा केला, की अनेक विद्यार्थी बिगर-इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत, त्यांना सोप्या भाषेत लिहिण्याजोगे काही असावे. मात्र इंग्रजी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांना त्याने तंबी दिली - "तुम्ही वाटल्यास हा "सोपा" विषय निवडू शकता, खरा. पण निबंध नाविन्यपूर्ण आणि विलक्षण दर्जाचा असल्याशिवाय त्याला चांगले गुण मिळणार नाहीत. कारण आजवर वाचलेल्या शेकडो "पावसाळ्यां"च्या त्याच त्या वर्णनांपेक्षा काहीतरी वेगळे आणि चांगले परीक्षकाला जाणवायला पाहिजे. सरासरी दर्जाचा निबंध परीक्षकाने वाचावा असे वाटत असेल, तर हा विषय निवडू नका!

कवीने विषयात काही नाविन्य आणले आहे, मांडणीत काही नाविन्य आणलेले आहे. पण यात रसिकाच्या डोळ्यांना दिपवणारा झगमगाट किती आणि रसिकाला नवी दृष्टी देणारा आशय किती, याबाबत विचार करावा लागतो. रसिकाने या विषयाबाबतच्या कविता फार वाचल्यामुळे "थोडीशी नवी दृष्टी" पुरत नाही. अन्य अनवट विषयांच्या बाबत कवीने थोडासा वेगळा पैलू रसिकाला अनुभववला, तरी पुरते.

अक्षय पूर्णपात्रे Wed, 02/11/2011 - 02:42

In reply to by धनंजय

सगळ्या वाचकांमध्ये ही कविता नेमकी कशासंबंधी आहे? याबाबत एकमत नसणे शक्य आहे. श्री वंकू यांचा आक्षेप 'कविता कवितेविषयीच आहे' अशा सरसकटीकरणास आहे असे वाटते. वाचकासाठी कवितेच्या आशयाचे अवकाश बंदीस्त करणे कवीला (येथे श्री वंकू यांना) खटकणे समजण्यासारखे आहे. 'गद्याची गुर्मी' किंवा 'तुला लिहीत असताना' असे सूचक शब्दप्रयोग असले तरीही कविता प्रत्येक वाचकाला कवितेविषयीच आहे असे जाणवणार नाही. 'गद्याची गुर्मी' वगैरे हे रेषीय जीवनाविषयीही असू शकेल. मला ही कविता कवितेविषयी आहे असे प्रतिसाद वाचेपर्यंत वाटले नव्हते. प्रतिसाद वाचल्यानंतर असाही अर्थ असू शकेल एवढेच वाटले.

इतर प्रतिसादाशी सहमत आहे.

धनंजय Wed, 02/11/2011 - 02:48

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

आता कविता कवितेविषयी आहे, असे श्री. साने यांनी लिहिलेले नाही, की श्री. घासकडवी यांनी लिहिलेले नाही.

त्या दोघांनीही कविता कवितेविषयी आहे, किंवा कवितेला उद्देशून आहे, असे काही लिहिलेले आहे. त्या दोहोंच्या वाक्यांत "च" अध्याहृत आहे, की नाही, हे ठरवताना समसमान न्याय वापरायला पाहिजे. "च" मानला किंवा नाही मानला तरी दोन्ही प्रतिसादकांकडून सरसकटीकरण आहे. कुठलेही मर्यादित वाक्य सरसकटीकरण करणारे असते. (कदाचित "हे ठळक ठशातील वाक्य सरसकटीकरण नाही." असे कुठलेसे कृत्रिम वाक्य बिगरसरसकटीकरणाचे असू शकेल. पण अशी वाक्ये क्वचित वापरात आहेत.)

मात्र एकास कवीने स्मित करून प्रतिसाद दिला आहे, दुसर्‍याबाबत तक्रार केलेली आहे.
- - -

तुमच्या वाक्याबाबत कुतूहल वाटते आहे : "मला ही कविता कवितेविषयी आहे असे सुरूवातीला वाटले नव्हते". म्हणजे शेवटी असे वाटले का - की कविता कवितेविषयी आहे?

मलासुद्धा पहिल्या कडव्यात "तू" म्हणजे कोण ते नीट कळले नव्हते. "तू"ची निर्मिती कवीने केली आहे, असे अंधुक जाणवत होते. पण मग दुसर्‍या कडव्यात या ओळी वाचल्या

"तुला लिहीत असतानाच
..
तू वळशील आणि
झरर्कन गद्याची गुर्मी
विरेल ..."

मध्ये "तू" ही कृती लिहिलेली आहे, आणि गद्य नाही यामुळे "कविता" हाच प्राथमिक अर्थ मला जाणवतो.
मी मुद्दामून "कविता" ही नुसती उपमा आहे, खरे तर मनुष्यव्यक्तीला उद्देशून "तू" म्हटलेले आहे, असा अर्थ लावूनही बघितला. पण तो अर्थ इतका पिळून काढावा लागला, की कविता कुरूप झाली. त्यामुळे मला तरी "तू=कविता", आणि बोलू-ऐकू शकणारी व्यक्ती असणे ही उपमा (पर्सॉनिफिकेशन) असे मानण्याशिवाय कुठलाच पर्याय जाणवत नाही.
श्री. घासकडवी यांनी "तू=कविता" हाच अर्थ स्पष्टपणे लावून दाखवला आहे. श्री. घासकडवी यांनी कविता काळजीपूर्वक वाचल्याचे प्रशस्तिपत्र कवीनेच दिलेले आहे.

अर्थात "तू=कविता" यापेक्षा वेगळा, पिळून-कुरूप-न-झालेला असा अर्थ असेल, तर तो कळायला मला आवडेलच.

अक्षय पूर्णपात्रे Wed, 02/11/2011 - 04:04

In reply to by धनंजय

आता कविता कवितेविषयीच आहे, असे श्री. साने यांनी लिहिलेले नाही, की श्री. घासकडवी यांनी लिहिलेले नाही.

यापैकी 'च' कोणी लिहिला आहे यावर प्रतिसादात माझे काही मत नाही. कवीचा तसा समज झाला असावा असे स्पेक्युलेशन जरूर आहे. दोन्ही प्रतिसादांत सुसंगती का आढळत नाही याविषयी माझे कुतूहल मर्यादीत आहे. मी श्री घासकडवींचा प्रतिसाद पूर्ण वाचलेला नाही. आत्ताच प्रशस्तीपत्र वाचले. 'बारकाईने वाचल्याबद्दल आभार मानलेले आहेत. या संकेतस्थळावर प्रस्तुत कवीच्या कवितांचे ज्याप्रकारे स्वागत झाले आहे ते पाहून बारकाईने वाचल्यासाठी प्रशस्तीपत्र देण्याचे आश्चर्य वाटले नाही. इतरांना (ज्यांनी कविता काळजीपूर्वक किवा बारकाईने वाचलेली आहे) तसे प्रशस्तीपत्र न देण्यामागे दिसणार्‍या विसंगतीविषयी अर्थातच मला फारसे कुतूहल नाही.

म्हणजे शेवटी असे वाटले का - की कविता कवितेविषयी आहे?

शेवटी कवितेविषयीही असू शकेल असे वाटले.

मध्ये "तू" ही कृती लिहिलेली आहे, आणि गद्य नाही यामुळे "कविता" हाच प्राथमिक अर्थ मला जाणवतो.

गद्य किंवा लिहिणे असे सूचक शब्द आहेत असे प्रतिसादात म्हटलेलेच आहे. तरीही माझे सुरूवातीचे निरीक्षण देतो. तुलाच (स्वतःला किंवा स्वत:तील एखाद्या ऊर्मीला) गद्य (रेषिय, किंकी, योजनाबद्ध उदा. नवीन नोकरी मिळवीन वगैरे) लिहित असतांना (विचार करत असतांना, संवाद साधत असतांना) मध्येच हा संवाद, विचार, योजना गळून पडेल' असे मला सुरूवातीला वाचतांना जाणवले. या अर्थाकरता मला विशेष ओढाताण करावी लागली नाही. हा अर्थ 'पिळून-कुरूप-न-झालेला' आहे का? माझ्याकरता नाही. तुमच्याकरता नसावाच असा आग्रहही नाही.

वाचकांसाठी एकाच कवितेचे अर्थ निराळे असू शकतात. एखाद्याला कदाचित कवितेशीच सुरू असलेला संवाद वाटेल, कुणाला मोघमपणे आतल्या क्रिएटिव ऊर्मीविषयी वाटेल.

धनंजय Wed, 02/11/2011 - 05:13

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

:-)
अर्थात प्रत्येक गोष्ट सामान्यीकृत+रूपकात्मक करता येते.
"लिहिणे" म्हणजे सामान्यीकरण करून "निर्मिती" म्हणजे सामान्यीकरण करून "संस्कृती" म्हणजे सामान्यीकरण करून "ऊर्जा"
"गद्य" म्हणजे सामान्यीकरण करून "एकरेषीय" म्हणजे सामान्यीकरण करून "असंस्कृत प्रकृती" म्हणजे सामान्यीकरण करून "जडवस्तू"
"मी" म्हणजे सामान्यीकरण करून "निर्माता" म्हणजे सामान्यीकरण करून "अवघी मानवजात" म्हणजे सामान्यीकरण करून "आत्मा/परमात्मा"

तुम्ही सांगितलेला अर्थ "कविता" या अर्थाला डावलून घेता येत नाही. "कविता" अर्थाचे सामान्यीकरण आहे.

माझ्या मते "गद्य" शब्दाचा "गद्य" या विशेष-अर्थ पायरीवरून गेल्याशिवाय "एकरेषीय" या रूपकात्मक/सामान्यीकृत अर्थाकडे जाता येत नाही. म्हणजे मराठी भाषेतून तरी जाता येत नाही. "गद्य" शब्दाचा व्यावहारिक अर्थ माहीत नसताना "एकरेषीय" अर्थापर्यंत पोचता येतही असेल कदाचित.

"गद्य नसलेले लिहिणे" म्हणजे "काव्यात्मक लिहिणे" या पायरीवरून गेल्याशिवाय "अवघी निर्मिती" या सामान्यीकरणापर्यंत पोचताच येत नाही. पण "लिहिणे" शब्दाचा व्यावहारिक अर्थ मनात आल्याशिवाय "निर्मिती"पर्यंत पोचणे म्हणजे मराठी भाषेसाठी असामान्य असे अर्थग्रहण करावे लागेल. (म्हणजे अर्थ पिळून काढावा लागेल.)

(वेगळ्या कुठल्यातरी भाषेत "लिहितो" ही चिन्हे म्हणजे [मराठीतले] "मोटारगाडी दुरुस्त करतो"असू शकेल. त्या भाषेत वरील चिह्नांचा काहीतरी वेगळाच अर्थ लागत असेल, हे मान्य आहे. आणि त्या वेगळ्या अर्थातून "निर्मिती" पर्यंत कोणी पोचत असेल. पण बहुधा तसे काही आपल्या दोघांच्या संवादाच्या क्षेत्राबाहेर आहे.)

म्हणजे माझ्या मते आपणा दोघांत या बाबतीत असहमती नसावी : वरील कविता मराठी भाषेत आहे; त्यातील अर्थ मराठी भाषेतील शब्दकोशातले अर्थ आहेत, किंवा शब्दकोशातील अर्थ बर्‍यापैकी सुसंगत* उपमा [metaphorical] म्हणून लागतात किंवा बर्‍यापैकी सुसंगत* विशेष-सामान्य [synecdoche] संबंधाने लागतात. या बाबतीत असहमती असल्यास माझे म्हणणे चालणार नाही.
*"बर्‍यापैकी सुसंगत" म्हणजे त्या उपमान-उपमेयाची उपमासंगती लागण्यासाठी संकेत सांस्कृतिक परंपरेमध्ये मिळतात, किंवा विशेष-सामान्य संबंधांचे संकेत सांस्कृतिक परंपरेमध्ये मिळतात. म्हणजे "बाळ गोड आहे" याचा रूपकात्मक अर्थ "गोड पदार्थ आवडतात तसा बाळ आवडणारा आहे" असा प्राथमिक म्हणून ग्राह्य, "गोड पदार्थ लठ्ठ करतात, तसा बाळ लठ्ठ करतो" हा अर्थ कमी ग्राह्य. दुय्यम अर्थ ध्वनित करायचा असेल, तर बोलणार्‍याला आणखी संकेत द्यावे लागतात, अशी रास्त अपेक्षा श्रोता ठेवू शकतो.

जर वरील तिरप्या ठशातील चौकट अमान्य असेल, तर मग तुम्ही तुमच्या गृहीतकांची मांडणी करा.

अक्षय पूर्णपात्रे Wed, 02/11/2011 - 06:37

In reply to by धनंजय

निरंकुश सामान्यीकरणाने तुम्ही सांगता तेथपर्यंत पोचण्यास काही प्रत्यवाय नाही. सामान्यीकरणातून प्रत्येक कविता कवितेविषयी आहे असेही दाखवून देता येणे कदाचित शक्य असावे. ;) तुम्ही 'प्राथमिक अर्थ' असे ज्याचे वर्णन करता त्यास 'प्रथमदर्शनी जाणवणारा अर्थ' असे म्हणण्यास माझा आक्षेप नाही.

कवितेचा आस्वाद हा प्रत्येक वाचकाचा वैयक्तिक अनुभव आहे. प्रथमदर्शनी कोणास 'कवितेविषयी' हाच अर्थ लागावा असे गरजेचे आहे काय? तर नाही. वाचक/आस्वादक यांचे स्वतंत्र अनुभविश्व मान्य केल्यास प्रथमदर्शनी (तुमच्या गृहीतकांत बसणार्‍या) प्रत्येकास वेगळे अर्थ जाणवू शकतील. आपण चर्चा करत असलेल्या ओळी कवितेत नंतर येतात. कवितेत त्याआधी असलेल्या ओळींनीही वाचक/ आस्वादक एखाद्या ताणलेल्या सामान्यीकरणाकडे वळू शकतो. तुम्ही दिलेली उदाहरणे स्वतंत्र वाक्यांची आहेत. त्या वाक्यांत काही व्यक्तिसापेक्षता अपेक्षित नाही.

*तुमच्या प्रतिसादांत वारंवार उपरोध डोकावू लागल्याने या संवादातून फारसे काही साध्य होईल ही अपेक्षा मावळू लागली आहे. तसेच ही चर्चा संवेदनशील कवीला प्रस्तुत ठिकाणी अतिक्रमणही वाटू शकेल.सबब हा माझा या चर्चेतील या ठिकाणी शेवटचा प्रतिसाद समजावा. खरडवहीतून ही चर्चा सुरू ठेवणे अर्थातच मला आवडेल.*

अवांतर: पिळणे म्हणजे स्पिन किंवा ट्विस्ट करणे असे असल्यास सामान्यीकरण पिळणे नाही तर ताणणे आहे. 'लठ्ठ' या शब्दावरून आणखी काही आठवले.

१. विंदा करंदीकरांची बालकविता - एक रसग्रहण

धनंजय Wed, 02/11/2011 - 21:32

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

मला "सब-कुछ-माया-है", "बघणार्‍याला काहीही बघायचे स्वातंत्र्य आहे, अमुक विषयात वस्तुनिष्ठ असे काहीच नाही" वगैरे प्रकारचे प्रतिसाद आवडत नाहीत. या सामान्य तत्त्वाखाली बोलणेच खुंटते. दोन्ही वाक्ये सत्य असलीत, तरी निरर्थक आहेत. कारण मानवी व्यवहारात मानवावर मुळीच अवलंबून नाही, अशी निरपेक्ष वस्तुनिष्ठता कोणी प्रतिपादितच करत नाही. त्यामुळे त्या प्रकारच्या वस्तुनिष्ठतेचे खंडन सामान्यपणे अशा कुठल्याही संवादात अवांतर आहे.

अमुक परिस्थितीत स्वातंत्र्य किती आणि मर्यादा किती याबाबत मात्र सफल चर्चा होऊ शकते.

- - -

पण चर्चेत कोणी सर्वसामान्य-सत्य-असलेला-अवांतर मुद्दा उचलला तर मला तरी तो फाऊल धरावा, असे वाटते. कोणी म्हणाले "तुमच्या अमुकतमुक वक्तव्यात एक 'च' अध्याहृत आहे, मात्र खरे तर प्रेक्षकाला मुक्त स्वातंत्र्य आहे" तर संवादक त्याचे खंडन तर करूच शकत नाही. (उदाहरणार्थ : "तुम्ही म्हणता की कविता कवितेबाबत आहे, तेव्हा तुमचा मथितार्थ आहे की कविता कवितेबद्दलच आहे.") 'अमुकतमुक' हा शब्द वाक्यात असल्यामुळे अवांतर नसल्यामुळे पटकन "हे अवांतर आहे" असे पटकन म्हणता येत नाही.

शिवाय कुठल्याही वाक्यात कोणीही मर्यादा घालतच असतो, म्हणजे "ही कविता कवितेबाबत आहे" असे म्हणताना मी असेच म्हणत असतो "ही कविता 'कविता', 'कविता-उपमा-असलेल्या मर्यादित-गोष्टी' आणि 'कविता-हे-सामान्यीकरण-असलेल्या-मर्यादित-गोष्टी' यांच्याबाबत आहे. 'कविता-हा-संबंध-कळूनच-येत-नाही-अशा-अमर्याद-गोष्टीं'बाबत नाही." म्हणजे माझ्या वाक्यात कुठेतरी 'च' अध्याहृत आहे, हे मान्य केलेच पाहिजे. पण भाषेच्या सर्व वाक्यांत मर्यादा अध्याहृत असतात, हे जाणून "अमुक वाक्यात मर्यादा आहे" हे मान्य करताना चिडचिड होते - समोरील व्यक्ती याच वाक्यात मर्यादा आहेत ते सांगतो, म्हणजे या वाक्यात तो दोष आहे, असे ध्वनित करतो, पण दोष काय, ते मात्र स्पष्ट करत नाही. मी "या वाक्यात मर्यादा आहेत" असे मान्य करवून, तर "या मर्यादा दोषयुक्त आहेत" हे ध्वनित मान्य करवून घेण्याची युक्ती जाणवून चिडचिड होते. "तुम्ही 'च' घातलेला आहे" हे वाक्य सोपे-सुटसुटीत असते, पण "या विषयाच्या संदर्भात 'च' घातलेला नाही" असे समजावणे महाकठिण असते. त्यामुळे सापेक्षवाद्याला छोट्या खटकेबाज वाक्याचे esthetic फायदे फुकटात मिळतात, आणि "तसे नाही" समजावून सांगणार्‍याला त्याच्या बाजूचा ध्वनित वाद आधी सांगून मग त्या ध्वनित वादाचे खंडन करावे लागते. यामुळे चिडचिड होते. कारण हे सगळे करून "माझ्या सुटसुटीत वाक्याचे स्पष्टीकरण चुकलेले आहे" असे खटकेबाज-थोडक्यात म्हटले, म्हणजे आदला दीर्घ युक्तिवाद तोंडघशी पडतो.

खरे तर "या विषयाच्या संदर्भात मर्यादा घातलेली आहे ती अमुक प्रकारे अयोग्य आहे, हे समजावून सांगण्याची जबाबदारी सापेक्षवाद्याची असते." मगच विवादापेक्षा संवाद होऊ शकतो.
सर्वसामान्य सापेक्षतावाद कोणी उठवला, तर "मग सांगा तरी, तुमच्या सापेक्षतावादाची या संदर्भात चौकट आहे तरी काय?" असा प्रतिप्रश्न अपरिहार्य असते. हा प्रश्न जवळजवळ नेहमीच औपरोधिक भासतो. म्हणजे "ही मराठी भाषा आहे, ही चौकट तरी मान्य करता येईल का?" वगैरे. जर औपरोधिक करायचा नसेल, तर खूपच किचकट विस्तार होतो. म्हणजे या प्रतिसादासारखा.

मला वाटते, की सापेक्षवाद्याने (म्हणजे मीसुद्धा) जेव्हा म्हणावे की "येथे सापेक्षता आहे" तेव्हा त्या ठिकाणी "या संदर्भात, या संवादापुरते अमुक-अमुक सापेक्ष नाही, परस्पर-मान्य आहे. पण तमुक-तमुक सापेक्ष आहे. तमुक-तमुक सापेक्ष न-मानल्यामुळे ढमुक-ढमुक तोटे होतात.

वंकू कुमार Wed, 02/11/2011 - 08:53

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

या कवितेच्या बाबतीत दोघाजणांनी 'ही कवितेविषयीची कविता आहे' असे प्रथम म्हटले त्यापैकी श्री घासकडवी यांनी तसा अर्थ लावून सोदाहरण कविता उलगडण्याचा प्रयत्न केला तो आपणा सर्वांसमोर आहेच. श्री साने यांनी मात्र घासकडवींचे मत वाचून तसा अभिप्राय लिहिला का असा प्रश्न पडला. कारण त्यांचे मत घासकडवींनंतर इथे पडले. नो प्रॉब्लेम.
पण कविता कवितेवर आहे असे म्हणून नंतर अशा कविता वाचताना त्या 'जास्त झाल्यावर कंटाळा येतो' या त्यांच्या वाक्यावर माझा आक्षेप आहे. मुख्यतः असे अर्थाला मर्यादा लावून घेतल्याने तुम्ही (अक्षय) म्हणता त्याप्रमाणे 'कवितेच्या आशयाचे अवकाश बंदीस्त करण्याची' क्रिया होते. येथे इतर अनेक सुजाण वाचक आहेत त्यांनी कविता बारकाईने वाचल्या असे प्रशस्तीपत्र मी दिले नाही असे वाचले. (असे प्रशस्तीपत्र वगैरे देण्याचा हेतूही नाही व तसे घडूही नये असे वाटते. घासकडवींच्या सविस्तर टिपणाआधीच्या माझ्या कवितांवरील प्रतिक्रिया निव्वळ उथळ वाटल्या म्हणून त्यांचे अभिनंदन केले एवढेच!)
श्री साने यांच्या इतर काही प्रतिक्रिया वाचल्या असता 'आवडली पण कच्ची', किंवा 'अनावश्यक इंप्रेशनमारु' असे काही शब्द्प्रयोग आढळतील. असे लिहिण्यास हरकत नाही. पण मग पक्की म्हणजे काय किंवा कविता प्रामाणिक असते म्हणजे नक्की काय असते याच्या खुलाश्याची अपेक्षा आम्ही ठेवली तर हरकत नसावी.

सुबोध साने Wed, 02/11/2011 - 20:00

In reply to by वंकू कुमार

श्री साने यांनी मात्र घासकडवींचे मत वाचून तसा अभिप्राय लिहिला का असा प्रश्न पडला. कारण त्यांचे मत घासकडवींनंतर इथे पडले. नो प्रॉब्लेम.

घासकडवींचे मत वाचूनही मत प्रभावित झाले असणे साहजिक आहेच. त्यात गैर असे काही नाही. घासकडवींना कवितेवरची कविता वाटते म्हणून दुसऱ्या कोणाला तशी वाटायला नको का?

अर्थात तुम्हालाही 'नो प्रॉब्लेम' आहे. मलाही त्यामुळे अर्थात 'नो प्रॉब्लेम' आहे.

श्री साने यांच्या इतर काही प्रतिक्रिया वाचल्या असता 'आवडली पण कच्ची', किंवा 'अनावश्यक इंप्रेशनमारु' असे काही शब्द्प्रयोग आढळतील. असे लिहिण्यास हरकत नाही. पण मग पक्की म्हणजे काय किंवा कविता प्रामाणिक असते म्हणजे नक्की काय असते याच्या खुलाश्याची अपेक्षा आम्ही ठेवली तर हरकत नसावी.

वाचकांनी आपल्या कवितांना कुरवाळले पाहिजे अशी अपेक्षा कवींनी ठेवायला माझीही हरकत नाही. पण वाचकापाशी तेवढा वेळ असतोच असे नाही. एखाद्याने छान, आवडली असा प्रतिसाद दिल्यावर आपण खुलाश्याची अपेक्षा ठेवतो का?

माझ्यामते कवितेचा फ्लो आणि ट्रान्झिशनचा विचार करता मला ती कविता कच्ची वाटली. याच संकेतस्थळावरील पक्के उदाहरण घेतल्यास श्री. अनंत ढवळे यांची गोष्ट ही कविता लक्षणीय वाटली.

मी अनावश्यक इम्प्रेशनमारूपणाबद्दलचे दाखले कवितेच्या कॉन्टेक्स्टमध्ये माझ्यामते पुरेसे सुस्पष्ट आहेत. माझ्यामतेमी दिलेला उतारा , जो मला फारच आवडला, संपल्यावर कविता शेवटी कर्कशत क्लीशेडत (And ask myself/of a future that will/have mobile oxygen vending machines/on highways, schools and crematoria. ऑर्डिनरी होत जाते.

राजेश घासकडवी Thu, 03/11/2011 - 04:04

In reply to by सुबोध साने

वाचकांनी आपल्या कवितांना कुरवाळलेच पाहिजे अशी अपेक्षा कवींनी ठेवायला माझीही हरकत नाही. पण वाचकापाशी तेवढा वेळ असतोच असे नाही. एखाद्याने छान, आवडली असा प्रतिसाद दिल्यावर आपण खुलाश्याची अपेक्षा ठेवतो का?

माझ्या मते खुलाशाची अपेक्षा ठेवायला हवी. निव्वळ छान छान अशी प्रतिक्रिया आली तर नुकतंच नाटक करून झाल्यावर स्टेजवर भेटायला येणारे 'यांनी बिचाऱ्यांनी एवढे कष्ट घेतले तर आपण चांगलं म्हटलं पाहिजे' अशा कनवाळूपणे प्रतिसाद देत आहेत की नाही हे कळत नाहीत.

तुमचे प्रतिसाद त्रोटक असले तरी विचार करून आलेले आहेत हे कळतं. पण तरीही काही कथांना टोक येत नाही, त्याप्रमाणे तुमच्या प्रतिसादात फक्त टोकच दिसतं, खालचा हिमनग दिसत नाही. (यात टोक म्हणजे टोचणारे प्रतिसाद असं म्हणायचं नाही) प्रत्येकाने कवितेचा कृतक कुरवाळ करण्यापेक्षा विस्तृत चिरफाड केलेली केव्हाही जास्त चांगली असं मला वाटतं.

अर्थात, हे करण्यासाठी सगळ्यांनाच नेहमीच वेळ नसतो हा तुमचा मुद्दा पटतो.

या कवितेच्या निमित्ताने मेटाचर्चा चालू आहे हे चांगलं आहे.