आचार्य बोधीधर्म आणि झेन तत्वज्ञान

आचार्य बोधीधर्म-

झेन पंथाचा पहिला उद्गाता " आचार्य बोधीधर्म " होय. चीन मधून ह्यू एन त्संग भारतात आला तर पाचव्या शतकात आचार्य बोधिधर्म चीन मध्ये गेले. दक्षिण भारतातील ब्राह्मण कुटुंबातील प्रख्यात राजाच्या पोटी जन्म घेऊन देखील त्यांनी बुद्ध तत्वज्ञानात रुची घेतली आणि पाचव्या शतकात चीनमध्ये " झेन " तत्वज्ञान विकसित केला. त्यासाठी शाओलीन मंदिरे प्रस्थापित करून शिष्यांना कुंग फू युद्धकला शिकवली. झेन महायान बौद्ध पंथाचा एक उपपंथ आहे, आणि चीन आणि जपान देशांतील प्रचलित बौद्ध संप्रदाय आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकात चीनमध्ये त्याचा उदय झाला. 'संस्कृत ध्यान', आणि 'पाली ज्झान', या उच्चारांचे 'झेन'शी साम्य आहे. समाधी, मनन किंवा चिंतन हा झेनचा मूलभूत अर्थ असून विश्व व मानवी जीवन यांचे वास्तव स्वरूप जाणण्यासाठी विचार
केंद्रित करण्याची ती एक पद्धत आहे. बुद्धत्वाच्या प्राप्तीवर झेनचा भर आहे. सूत्रे आणि सिद्धांतांच्या केवळ ज्ञानास झेन महत्त्व देत नाही तर अनुभवी गुरूच्या मार्गदर्शनाखाली थेट आकलनास हा पंथ महत्त्व देतो.

झेनमताचा उपदेश महायान पंथातील योगाचार आणि तथागत गर्भसूत्र या स्रोतांवर आधारलेला आहे. विमलकीर्ती या ग्रंथाचा झेन विचारांवर मोठा प्रभाव आहे. झेन हा शब्द 'ध्यान' या शब्दावरून पुढे आला. बुद्धाने ध्यान साधनेची रहस्ये महाकश्यप या आपल्या शिष्याला शिकवली. महाकश्यपाने त्यांचा उपदेश आनंद या शिष्याला केला. या परंपरेतील बोधिधर्म हे शेवटचे म्हणजे २८ वे आचार्य होत. चीन व जपान या देशात बोधिधर्माने झेनचा प्रसार केला.

बोधि धर्मांच्या गुरूंचे नाव प्रज्ञातर असे होते. जपानी शब्द 'झेन', चिनीमधील 'चान' शब्द आणि भारतीय संस्कृतीमधील 'ध्यान' शब्द या सगळ्यांचा अर्थ चिंतन असा होतो. बुद्धाला जे कळले ते जाणणे आणि स्वत:च्या मनाची मुक्तता ध्यान- चिंतनामधून करून घेणे हे झेनचे ध्येय असते. झेनमध्ये ताओ, वेदांत आणि योगातील सारगर्भता आहे. झेनला गुरु आणि शिष्य असतात. काही नियमांशी बांधिलकी असते, पण प्रत्येकाला मोकळीक असते. साटोरी व कोआन ह्या झेन परंपरेतील दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. साटोरा म्हणजे साक्षात्कार व कोआन म्हणजे कूटप्रश्न किंवा सूत्र होय. गुरु शिष्य परंपरेला झेनमध्ये महत्वाचे स्थान आहे. साक्षात्कार हे झेन चे इप्सित असते. सर्व शिष्यांना ध्यान विहाराचे नियम गुरुकुलाप्रमाणे पाळावे लागतात. विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी काही प्रश्न दिले जातात, त्यांना कोआन म्हणतात.

झेन पंथामध्ये चहा आणि चहापानाच्या विधीला आणि कलेलाही महत्व आहे. एकदा आचार्य बोधिधर्म ध्यान करीत असताना झोपी गेले व त्यामुळे नंतर ते स्वत:वरच इतके चिडले की त्यांनी स्वत:च्या पापण्याच कापून टाकल्या. त्या जमिनीवर पडल्या आणि त्यातून चहाचे पहिले रोपटे उगवले असे म्हणतात. चहापानाच्या विधीला झेनमध्ये एक स्वतंत्र स्थान आहे. चहा अतिशय समारंभपूर्वक बनवला जातो आणि शिष्यांना दिला जा तो. प्रत्येक शिष्याला हा चहापानाचा विधी शिकावा लागतो. या चहापानाच्या विधीशिवाय इतर कुठलेही कर्मकांड झेन मध्ये नाही. तिबेट मधील भिक्षुक असा समारंभपूर्वक चहा बनवण्यात तरबेज आहेत.

आचार्य बोधिधर्म यांच्याकडून बौद्ध धर्माचे सार इ.स. ५२० मध्ये भारतातून चीनमध्ये नेले गेले. शांत अशा (ध्यान) स्थितीतील साक्षात्काराचे ज्ञान हे उत्तराधिकाऱ्यांना दिले गेले आणि त्याच
पद्धतीने ते पुढच्या पिढ्यांना मिळत राहिले. अशा प्रकारे झेनचा चीनमध्ये प्रसार झाला, तेथे तो रुजला आणि चीनमधून यथावकाश जपानमध्ये पसरला. इसवी सनाच्या सातव्या शतकाच्या शेवटी शेवटी जपानमध्ये झेनचा प्रसार होऊ लागला. येईसाई नावाचा जपानी भिक्खू चीनमध्ये जाऊन झेनचे शिक्षण घेऊन आला. त्याने इ.स. ११९१ मध्ये क्योतो शहरात एका ध्यान विहाराची स्थापना केली. जपानचे जीवन, कला, साहित्य, आचरण, नीतीतत्वे या साऱ्यांवर झेनचा प्रभाव पडलेला आढळतो. याचे मूळ श्रेय आचार्य बोधीकडे जाते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet