प्रमाणलेखन - तुम्ही हा-ही-हे लिहिता का?
मराठी वर्तमानपत्रांमधल्या बातम्यांची शीर्षकं हल्ली असल्या धाटणीची असतात - 'ह्या नटीनं केला होता हा हेअरकट'. ह्याबद्दल फेसबुकवर थोडी तक्रारबाजीही बघितली. ते ठीकच.
बऱ्यापैकी गांभीर्यानं भाषा वापरणाऱ्या लोकांच्या लेखनात दोन पॅटर्न दिसले -
१. अमकी गोष्ट केली तर तुम्हाला फरक दिसेल.
हे वाक्य लिहिताना, लेखन विनोदी असेल किंवा नसेल, हे वाक्य मी बहुतेकदा जरा निराळ्या पद्धतीनं लिहेन - अमकी गोष्ट केली तर फरक दिसेल. ह्या वाक्यात कोणाला फरक दिसेल हे मराठी वाक्यांत मी लिहीत नाही. इंग्लिशमध्ये हे वाक्य लिहिताना You would find a difference if this is done, अशी वाक्यरचना दिसते. त्याचा हा परिणाम आहे का?
इंग्लिश काय किंवा मराठी काय, तत्त्व, मूल्य, किंवा सर्वसाधारण विचार म्हणून लिहिताना वाक्यात तुम्ही किंवा you असे शब्द लिहिणं मी टाळते. इथे 'जंगल में मोर नाचा किसने देखा' अशा प्रकारचा विचार असतो का?
२. उदाहरणार्थ हे वाक्य - सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती.
ह्या वाक्यात 'हे' हा शब्द नसला तरीही वाक्याचा अर्थ बदलत नाही. पहिल्या मुद्द्यात आहे तसाही काही फरक पडत नाही.
जरा गांभीर्यानं लिहिताना, कमीतकमी शब्द वापरून तेच वाक्य लिहिण्याचा प्रयत्न मी बरेचदा करते. कदाचित हे सध्याच्या ८५० शब्दांच्या 'विदा-भान' मर्यादेमुळेही होत असेल. ह्यासाठी प्रमाणलेखनाचा काही नियम आहे का? नसेल तर साधारण नियम काय वापरला जातो?
१. इंग्रजीचा मुद्दा सुसंदर्भ नसावा
You would find/notice/see a difference if this is done
आणि
There will be a difference if this is done
किंवा
A/the difference will be found/seen/noticeable if this is done
असे वेगवेगळे वाक्यप्रयोग इंग्रजीत करता येतात.
आता दिलेल्या उदाहरणाबाबत.
"अमकी गोष्ट केली तर तुम्हाला फरक दिसेल." असे लेखन (शत्रुत्वाचा दुसरा काही संदर्भ नसल्यास) मला जास्त मैत्रीपूर्ण प्रयोग वाटतो, "अमकी गोष्ट केली तर फरक दिसेल" कोरडा वाटतो.
(मराठीत "दिसेल" कर्मणि आहे. इंग्रजी "You would see"शी समांतर कर्तरिप्रयोग वापरला तर कर्ता अनुल्लेखाने लपवता येणार नाही, क्रियापदाच्या प्रत्ययात तो कळतोच.)
"अमकी गोष्ट केली तर तुम्ही फरक पाहाल" किंवा "अमकी गोष्ट केली तर फरक पाहाल" कुठल्याही वापरात पाहाणारे "तुम्ही" आहात असा निर्देश आहे.
कर्तरि बाबत माझी चूक
चूकपेक्षा नेमका नाही.
पण दिसणे/पाहाणे यांच्या कर्त्याबाबत आहे. कोणाला दिसते आहे ते अनुल्लेखाने मारता येते, कोण पाहातो आहे, त्याबाषत अनुल्लेख शक्य नाही.
अमकी गोष्ट केली तर तुम्ही फरक पाहाता.
इंग्रजीत दिसणे/पाहाणे फरक सामान्यपणे be seen/see असा होतो, आणि अनुक्रमे be seen (by whom) टाळता येते, WHO sees टाळता येत नाही.
मराठी वर्तमानपत्रांमधल्या
मराठी वर्तमानपत्रांमधल्या बातम्यांची शीर्षकं हल्ली असल्या धाटणीची असतात - 'ह्या नटीनं केला होता हा हेअरकट'.
पेपराच्या साईटवर एकाखाली एक बातम्या - बातम्यांचे त्रोटक मथळे असतात. त्यातून थोडा बोध होतो किंवा वा उत्सुकता चाळवते. ती जास्तच चाळवून संपूर्ण बातमी उघडावी यासाठीच नटीचं नाव गाळून 'ह्या नटीनं केला होता हा हेअरकट'. असं लिहिण्याचं प्रमाण वाढलं.
प्रश्न
'तुम्हाला'ऐवजी 'आपल्याला' वापरण्यातून आणखी आपुलकी?
मला बरेचदा प्रश्न पडतो - विदाविज्ञानछाप कोरड्या विषयांवर लिहिताना भाषा कशी वापरायची. हे लेखन अकादमिक छापाचं नाही; पण भावना बाजूला ठेवून तटस्थपणे बघण्याची आवश्यकता असते. तो कोरडेपणा आणला तर विषय लोकांपर्यंत पोहोचवताना मर्यादा येतात का ...
विदाविज्ञानछाप कोरड्या
विदाविज्ञानछाप कोरड्या विषयांवर लिहिताना भाषा कशी वापरायची
हा फार कळीचा मुद्दा आहे. आधिच कोरडा असलेला विषय रुक्षपणे लिहील्यास वाचकाचा लेखातील रस संपून, वाचक तो लेख अर्धवट वाचून सोडला जाउन, वाचक गमावला जाण्याची परिस्थीती येउ शकते. म्हणून वाचकाशी संवाद साधत कोरडा विषय रुक्ष न होउ देण्याकडेही लक्ष द्यायला हवं असं माझं मत आहे.
त्यामुळे, चिंजं म्हणाले तसं, ते मानसिक असावं असं मलाही वाटतं.
- (रुक्ष) सोकाजी
माझे मत
“अमकी गोष्ट केली तर फरक दिसेल”
या वाक्यात तुम्हाला हा शब्द वापरताना क्रियापद द्वितीय पुरुषी अनेकवचनात असायला हवे.
“अमकी गोष्ट केलीत तर तुम्हाला फरक दिसेल”
अन्यथा ते इंग्रजीच्या प्रभावाखालचे शब्दशः भाषांतर मानले पाहिजे.
वाचक-केंद्री संदेश मराठीत “आपण” या वक्ता-श्रोता (लेखक-वाचक) अशा दोन्ही पुरुषांचा समावेश दर्शवणाऱ्या प्रथमपुरुषी सर्वनामाचे रूप वापरून करायला पाहिजे असे माझे मत आहे.
“अमकी गोष्ट केली तर आपल्याला फरक दिसेल”
[इथे केली ऐवजी केलीत म्हटले तर ते अतिआदरयुकत द्वितीयपुरुषी "आपण" ठरेल.]
अगदीच भाषेची अडचण असली तर आपण
अगदीच भाषेची अडचण असली तर आपण ,तुम्ही, वगैरेपेक्षा खाणाखुणा करून भागवायचं.
**
तमिळ दुकानात एका पोत्यात पिवळ्या आल्यासारखे ठेवलेले दिसले. खुणेनेच 'हे' काय विचारले. त्या नोकराने खुणेनेच एक तुकडा उगाळून चेहऱ्यावर थापून सुंदर दिसणे हे दाखवले होते.
(अवांतर आणि पकाऊ)
२. प्रथमा विभक्ती सोडून, होय लांब/आदरणीय नावांकरिता वापरतो
(काही ठिकाणी अर्थछटा बदलते, ते वेगळे, नंतर)
सर्वेपल्लि राधाकृष्णन् यांना अनेक सन्मान मिळाले.
सर्वेपल्लि राधाकृष्णन् यांनी १९६२-१९६७ काळी राष्ट्रपतिपद भूषवले.
सर्वेपल्लि राधाकृष्णन् यांच्याकरिता विद्यार्थ्यांचा विकासच सर्वात महत्त्वाचा होता.
सर्वेपल्लि राधाकृष्णन् यांच्यापासून आतापर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी बघूया.
सर्वेपल्लि राधाकृष्णन् यांच्या कारकीर्दीबद्दल आपल्याला काय ठाऊक आहे?
"यांना/नी/चे" वापरल्यामुळे विशेषनामाचे सामान्य रूप करायचे टाळता येते. हे आदरार्थी बहुवचनांत वापरायची जास्त वेळ येत असली , तरी कधीकधी एकेरी वापरातही सोयीचे जाते.
महाराजांनी तानाजी मालुसऱ्याला सिंह म्हटले.
पेक्षा
महाराजांनी तानाजी मालुसरे याला सिंह म्हटले.
प्रथमेत "हे"चा वापर परिच्छेदाच्या प्रवाहानुसार होतो :
वरील परिच्छेदात पहिल्या वाक्यात मी "हे" वापरले आहे, पण तिसऱ्या वाक्यात वापरलेले नाही. यावरून "हे"च्या निदर्शक (demonstrative) उपयोगाची अर्थच्छटा माझ्या वापरात आहे. पहिल्या वाक्यात "हे" म्हणून विषय म्हणून सर्वेपल्लि राधाकृष्णन् यांच्याकडे निर्देश केला आहे. तिसऱ्या वाक्यात त्या निर्देशाची पुन्हा गरज नाही.