Skip to main content

सरकारी काम: गूगल ट्रेंड्सची गंमत (भाग १)

गूगल ट्रेंड्सच्या मर्यादा ध्यानात घेऊन ही लेखमाला वाचणे.

सरकारनं नक्की काय केलं, त्याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे; कुठून मिळत आहे; ह्याचे इतर काही आकडे मिळतात का, वगैरे शोधायचा प्रयत्न ह्या लेखमालेतून करणार आहे. ह्यात विदा मिळणं सोपं असेल आणि सगळ्यांना ती सहज उपलब्ध होईल ह्याचाही विचार केला आहे. विदेवर काय सोपस्कार केले, हे मात्र टाळून इथे लिहिणार आहे. त्याचे तपशील मराठीत लिहिणं कठीण वाटतं.

सरकारी योजना, कायदे, महत्त्वाचे निर्णय, काय केलं वगैरेंची यादी मी फेसबुकवरून मागवली. इथे ज्या योजनांबद्दल लिहिलं आहे, त्यांतल्या बहुतेक फेसबुकवरूनच सापडल्या. काही गूगल ट्रेंड्सनं माझा कल बघून सुचवल्या. ह्या सूचनांबद्दल कोणी, किती गूगल केलं ह्यानुसार तीन गट केले. त्या सगळ्या योजनांच्या १ जानेवारी २०१८ ते १ नोव्हेंबर २०१९च्या टाईमलाईन्स इथे आहेत.

अ. खूप गूगल प्रतिसाद मिळालेल्या योजना -

  1. आयुष्यमान भारत योजना,
  2. प्रधानमंत्री आवास योजना,
  3. स्वच्छ भारत अभियान

आयुष्मान भारत योजना २३ सप्टेंबर २०१८ला सुरू झाली. खालच्या तिन्ही गटात तो दिवस मोठ्या चौकोनी ठिपक्यानं दर्शवला आहे.
मोठा प्रतिसाद

आ. मध्यम गूगल प्रतिसाद मिळालेल्या योजना -

  1. प्रधानमंत्री जन धन योजना,
  2. प्रधानमंत्री मुद्रा योजना,
  3. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

जन धन योजनेत २३ सप्टेंबरच्या आठ‌वड्याच अनेकांना रस निर्माण झालेला दिसतो. ही योजना मात्र त्या आधी चार वर्षांपूर्वी २४ ऑगस्ट २०१४ला सुरू झाली.
मध्यम गूगल प्रतिसाद

इ. कमी गूगल प्रतिसाद मिळालेल्या योजना -

  1. प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना,
  2. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर 'सौभाग्य' योजना, आणि
  3. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना

इथेही जीवन ज्योती योजनेचा चढा आकडा आयुष्यमानच्या आठवड्यात दिसतो, तिची सुरुवात झाली एप्रिल २०१५मध्ये. कदाचित सहज बिजली 'सौभाग्य' योजनेतही वाढीव रस त्याच काळात दिसत आहे. ती योजना आयुष्यमानच्या एक वर्ष आधी सुरू झाली आणि डिसेंबर २०१८मध्ये पूर्ण झाल्याचं जाहीर झालं.
कमी प्रतिसाद योजना

ह्यातून महत्त्वाचा निष्कर्ष असा काही काढता येत नाही. तरीही काही मुद्दे -

१. नोव्हे २०१८ ते मे २०१९मध्ये मध्यम गूगल प्रतिसाद योजनांचे ट्रेंड्स एकत्रितरीत्या वरखाली होताना दिसत आहेत. ह्याचे आकडे तपासले पाहिजेत.
२. एक योजना सुरू झाल्यावर इतर काही योजनांबद्दल शोधाशोध वाढली. आयुष्यमान योजना अशी महत्त्वाची का आहे?

ह्याची उत्तरं कोणाला माहीत आहेत का?

(हे इंग्लिशमध्ये वाचा इथे.)

भांबड Wed, 13/11/2019 - 22:33

योजना हा शब्द असलेले वाक्य शोधल्यामुळे इतर योजना हा शब्द असलेली वाक्ये recommend करत असावेत बहुधा. SEO चा खेळ.
नवीन ब्लाॅग चालू केल्याचही कळलं (पळा पळा)

धनाजीराव वाकडे Sat, 23/11/2019 - 20:53

याच्या तांत्रिक बाबी जाणून घ्यायला आवडतील, जसे की विदा कसा मिळवला, त्याची साफ सफाई आणि वापराच्या दृष्टीने तयारी कशी केली आणि शेवटी पायथॉन भाषेतील आज्ञावली दिलीत तर उत्तम.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 23/11/2019 - 22:26

In reply to by धनाजीराव वाकडे

आकडे मिळवताना एक-दोन पायथन मॉड्यूल्स वापरायचा प्रयत्न केला, पण त्या आकड्यांवर किती भरवसा ठेवायचा हे समजेना. मुख्य कारण - गूगल-ट्रेंड्सच्या यूआयवर टंकायला लागलं की पर्याय येतात, फक्त शब्द म्हणून शोधायचे आहेत का सरकारी योजना आहे असं शोधायचं आहे. (थोड्या वेळात त्याचा स्क्रीनशॉटही डकवते, म्हणजे आणखी नीट समजेल.) ते पर्याय त्या मॉड्यूल्समध्ये नव्हते. दोन्हींचे आकडे थोडे निराळे दिसत होते, आणि गूगलला जर आपण नक्की काय शोधतो आहोत हे समजलं - म्हणजे सरकारी योजना, किंवा राज्यसभेचे सदस्य - तर भाषांतरंसुद्धा मोजली जातात.

माझा विचार असा आहे की खूप विदा एका वेळेस गोळा करायची नाही; त्यामुळे यूआय वापरून ती मिळवायला फार त्रास होऊ नये.

एकंदरच पायथन कोडसाठी एक गिटहब रिपो बनवून सगळा कोडच तिथे चढवते. म्हणजे ज्यांना ते तपशील हवेत, सांख्यिकी आणि पायथन दोन्ही, ते तिथे मिळतील. आणि फक्त स्पष्टीकरण हवंय त्यांना तेवढंच वाचता येईल. मी सध्या तरी ज्युपिटर नोटबुकमध्ये काम करत्ये, तिथे स्पष्टीकरणं लिहिलेली गिटहबवर थेट वाचता येतात. इतर कोणाला ह्यात रस असेल तर तेही गिटहबवर सहज करता येईल.

ही सूचना आवडली. त्याबद्दल आभार. लवकरच ते काम करून लिंका देते. (सध्या ही गंमत बघत वेळ घालवत्ये. तुम्हीही त्याची मौज लुटा.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 01/12/2019 - 02:00

In reply to by धनाजीराव वाकडे

गिटहबवर कोड चढवला आहे; इथे जे आलेख दाखवले आहेत त्याचा कोड ह्या वहीत सापडेल (दुवा); ब्राउजरमध्येही कोड वाचता येईल.

त्यावर काही शंका, प्रश्न, सूचना असतील तर जरूर कळवा. ह्या संदर्भातला सगळाच कोड ह्या रीपोत चढवेन; म्हणजे शोधणंही सोपं होईल.