IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ६)

(भाग ५)

Synonyms (2019)

सिनोनिम्स

या चित्रपटात प्रेक्षकावर एकामागोमाग एक प्रसंग येऊन आदळतात. ते तुटक नसतात; म्हणजे त्यांच्यात साखळी आहे, एका पात्राचा प्रवास आहे; पण अशा प्रवासात समोर येणाऱ्या टप्प्यांमध्ये संगती हवी, अगोदरच्या स्थितीतून पुढची स्थिती उत्पन्न व्हायला हवी, समोर उलगडणारी चित्रकथा अभिनयातून किंवा आणखी कशातून सघन व्हायला हवी; ते होत नाही.

एक इस्रायली तरुण. तिथलं सैनिकी शिक्षण पूर्ण करून फ्रान्सला ‘पळून’ आला आहे. चेहरा हट्टी, आडमुठा. दरवाज्यापुढच्या जाजमाखालून चावी काढून दार उघडतो आणि एका मोठ्याशा पण पूर्ण रिकाम्या फ्लॅटमध्ये प्रवेश करतो. सगळे कपडे काढून टाकून बाथटबमध्ये शिरतो आणि त्याची कपड्यांसकट सगळी चीजवस्तू चोरीला जाते. तो टबमध्ये काकडलेल्या, बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला एक कपल बाहेर काढतं आणि अत्यंत प्रेमळ उदारपणाने सगळं पुरवतं. असं करण्यामागचा त्यांचा हेतू पूर्ण स्पष्ट होत नाही आणि एवढं केल्यावर ते त्याला पुढे मदत करतात, असंही नाही. इस्रायल पूर्णपणे त्यागण्याच्या हट्टाने तो हातात डिक्शनरी घेऊन फ्रेंच शब्द पाठ करत पॅरिसभर हिंडतो. एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी मिळवू बघताना स्वतःला ‘लोकल’ म्हणवतो.

पण त्याचा फ्रेंच होऊन जाण्याचा हट्ट लॉजिकल रस्त्याने पुढे जात नाही. त्याला इतर इस्रायली पुरुष भेटतात, तेसुद्धा फ्रान्समध्ये राहायलाच आलेले असतात; पण याच्यासारखे इस्रायलला झटकून टाकू बघत नाहीत. हा बापालादेखील दाद देत नाही. पण फ्रेंच राष्ट्रगीत गायची वेळ येते तेव्हा बिथरतो. फ्रेंच उपकारांनी दाबून जात नाही. त्याचा देश त्याच्यात जागा होतो. पोर्नो व्हिडिओ बनवताना मिळालेल्या सूचनांना अनुसरून स्वतःच्या भाषेत उद्गार काढतो. त्याचा मनस्वी हट्ट आणि त्याच्या आतला देश या दोन परस्परविरोधी शक्तींची रस्सीखेच त्याच्या भावनाहीन चेहऱ्यात व्यक्त होत राहते.

अशा सिनेमाला पूर्णपणे एन्जॉय करायचं, तर इस्रायल माहीत हवं, फ्रान्स माहीत हवा आणि या दोन देशांच्या आयडेंटिटींमधला विरोध माहीत हवा. देश त्यागाने म्हणजे संस्कृती त्यागाने आणि ते संवेदनशील मनासाठी मुळीच सोपं नसतं, हे सांगण्यासाठी केलेलं सादरीकरण ‘वस्तुनिष्ठ’ केलं आहे, असं वाटत नाही. त्यात भर पडते, ती पुरुष समोरून नग्न दाखवण्यासारख्या दृश्यांची. एका पुरुषाला दुसऱ्या एका पुरुषाविषयी आकर्षण वाटत आहे, हे आपल्या लक्षात येतं; पण हा चित्रपट एक कथा किंवा एका (वा अनेक) पात्रांच्या जगण्यातला एक तुकडा, अशा रुपात समोर येत नसल्याकारणाने असल्या तपशिलांमधून नेमका कसल्या आशयाकडे निर्देश होतो आहे, याचा पूर्ण बोध होत नाही.

कदाचित असा बोध व्हावा, असा दिग्दर्शकाचा इरादाच नसावा.

(चित्रपटाला बर्लिन महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार होता.)

---***---

Dolce Fine Giornata

Dolce Fine Giornata (2019)

एक नोबेल विजेती पोलिश कवयित्री. इटलीतल्या लहानशा गावात नवऱ्याबरोबर राहणारी. रोमला असलेली तिची मुलगी आपल्या दोन मुलांना घेऊन ‘सुट्टी घालवायला’ तिच्याकडे आली आहे. बाई कविता करते आणि मानाने मुक्त-मोकळी आहे. आजी झालेली असूनही गावातल्या एका इजिप्शियन टेम्पोवाल्याशी दोस्ती करते. ‘I have a slight crush on him’ असं मोकळ्या मनाने नवऱ्याला सांगते. पण नातू हरवला असताना सगळे काळजीत असताना त्या मित्राचा फोन घेत नाही. भरपूर सिगारेटी ओढते आणि सिगारेटमधून गांजा ओढायलाही तिची हरकत नसते.

त्या लहानशा गावाला ‘नोबेलविजेती’विषयी प्रेम असतंच. पण सत्कार समारंभात जेव्हा ती दहशतवादी हल्ल्याला 'कला’ म्हणते आणि the other ची भीती घालणे, हे फॅसिस्ट शक्तींची पद्धत आहे म्हणते आणि वैविध्य हा युरोपच्या संस्कृतीचा प्राण आहे म्हणते आणि एवढं पुरेसं नाही म्हणून की काय, नोबेल नाकारते; तेव्हा गावातले बहुसंख्य लोक नाराज होतात. ‘तू आम्हाला खडसावलंस हे बरं केलंस,’ असं सांगायला येणाऱ्यांकडे तर ती दुर्लक्षच करते.

तिच्या इजिप्शियन मित्राचं दुकान जाळलं जातं. ‘मला माझं जगणं सांभाळण्याला इलाज नाही,’ असं म्हणून मुलगी निघून जाते. आणि ‘मनाला येईल ते बोलण्याची किंमत चुकवावी लागणार नाही, असं कसं धरून चालता तुम्ही?’ या प्रश्नाला तिला तोंड द्यावं लागतं. ‘मी एक म्हातारी कवयित्री आहे, कुणाच्या नैतिक अधिष्ठानाची जबाबदारी माझ्यावर टाकू नका,’ असं स्पष्ट म्हणूनही उपयोग होत नाही. अखेरीस तिला पिंजऱ्यात बंद केली तरी गावाच्या व्यवहारात जराही खळबळ निर्माण होत नाही.

समाजाच्या रूढ विचारप्रवाहापेक्षा वेगळं असणे, स्वतंत्र, बंडखोर वृत्ती बाळगणे आणि समाजाला न चुचकारणे, याची किंमत देण्याची वेळ येते, हे हा चित्रपट बजावतो. सुंदर निसर्गचित्रं, गावातलं बिनघाईचं वातावरण, इटालियन मोकळेपणा या सगळ्याचं यथास्थित दर्शन कॅमेरा देतो. कुटुंबातले भावबंध समोर येतात. दहशतवादी हल्ल्यानंतर मुसलमान इजिप्शियन माणसाचं दुकान जरी जळलं तरी तिला कोणीही भीती घालत नाही. पण समाजमनाला दुखावणाऱ्या नोबेलविजेतीकडे पूर्ण दुर्लक्ष करून गावगाडा चालू राहतो!

हा धडा समाजासाठी नसून संवेदनशील कलावंतासाठी आहे, हे अगदी नीट व्यक्त होतं!

---***---

समर इज द कोल्डेस्ट सीझन

हीसुद्धा एक गोष्टच. पण चीनमध्ये, म्हणजे आशियात, पूर्वेत घडणारी. गोष्टीतले तिढे आणि त्यांची उकल परिचित. युरोपच्या तुलनेत इथे तरलता कमी. पात्रांच्या ओळखीत गुंतागुंत कमी.

एक शाळकरी मुलगी. दर्शनीच दुःखी, उदास. गरीब. वर्गमित्र-मैत्रिणींकडून छळली जाणारी. तिचा ट्रक चालवणारा बाप. घरासाठी साठवलेले पैसे त्याला धंद्यासाठी देणारी त्यागी आई. आईचा अपघाती मृत्यू आणि अपघाताला कारण होणाऱ्याला शिक्षा करण्यासाठी मुलीची धडपड. गैरसमज होणे, ते दूर होणे, लहान मुलीने मोठं होणे, वगैरे.

कथानकात फार काही वेगळेपणा, वैशिष्ट्य नाही. पण गोष्ट घडत असताना आपल्याला चीनमधलं शहरी वातावरण दिसतं! एक मध्यमवयीन गरीब पुरुष दारू प्यायला कुठे जातो, हे दिसतं. तरुणांचे अड्डे दिसतात, त्याचं आपापसातलं वागणं समोर येतं. एक बाप आणि त्याची वयात येऊ घातलेली मुलगी, यांच्या कुटुंबातलं जगणं दिसतं. चीनमधली गरीब वस्ती कशी असते, याची एक चुणूक दिसते.

हे सगळं अगदी वास्तवाबरहुकूम असेलच असं नाही. (आपला सिनेमा किती प्रमाणात वास्तव दाखवतो? पण हा फेस्टिवलला निवडलेला चित्रपट; म्हणजे ... असो.) पण झलक मिळतेच. घरं, रस्ते, दुकानं हे तर खऱ्याच्या जवळ असेलच! गोष्टीबद्दल म्हणायचं, तर पात्रांच्या ओळखीतच गोष्ट सांगून होते!

---***---

फॅमिली रोमान्स

Family Romance LLC (2019)

हा डोक्यात शिरून मुक्काम टाकणारा सिनेमा. जपानमध्ये नात्यातली माणसं भाड्याने देणाऱ्या व्यवस्थेकडे चौकस नजर टाकणारा. खूप वर्षांपासून न दिसलेल्या वडिलांची जागा घेऊन शाळेतल्या मुलीला भेटणे, तिला वेळोवेळी सोबत करणे. दारुड्या बापाच्या जागी येऊन मुलीचं लग्न लावणे. याबरोबर भलीमोठी लॉटरी लागल्याच्या आनंदाचा अनुभव दुसऱ्यांदा देणे आणि पापाराझींनी एखाद्या लोकप्रिय नटीच्या मागे मागे जावं, तसा अनुभव मिळवून देणे.

वरवर पाहता हे ‘वरवरचं’ असावंसं वाटतं. पण नाही. या ‘सेवे’चे विविध पैलू दिग्दर्शकाने तपासले आहेत. असं लुटुपुटुचं नातं एखाद्या प्रसंगापुरतं निभावणं वेगळं आणि पुन्हा पुन्हा भेटून खरंच भावबंध निर्माण होऊ देणं वेगळं. अशा भेटींमधून ‘अशिला’ला मनःशांती, सुख मिळू लागल्यावर समोर येणारे मोह; हे काम करणाऱ्याला स्वतःच्या खऱ्याखुऱ्या नात्यांविषयी येऊ लागलेल्या शंका आणि अशा कृत्रिम नात्यांसाठी रोबोंचा उपयोग होऊ शकतो का, हा प्रश्न! रोबो रिसेप्शनिस्टच्या समोर असलेल्या फिश टँकमध्ये एक रोबो मासा पोहत असतो, ते पाहून अनामिक दडपण येतं!

चित्रपटाचा प्रवास संथ लयीत होतो. पार्श्वभूमीवर वाजणारं संगीतही हलका मेकअप दिल्यासारखं वाजतं. सुरुवात संथ होते, पुरुष नटाच्या चेहऱ्यावरचे भाव बेगडी वाटतात आणि प्रसंग चालू राहिल्यावर कंटाळा येऊ लागतो. पण चित्रपटात आपण हळूहळू गुंतत जातो आणि जे चाललंय ते सगळं बरोबर वाटू लागतं. सगळ्यात भारी म्हणजे अशा, एक प्रकारे स्फोटक विषयावरच्या सिनेमात दिग्दर्शकाने स्वतःचं मत मांडावं, प्रेक्षकाला थोडंतरी ‘मार्गदर्शन’ करावं, अशी अपेक्षा असते. हा दिग्दर्शक ती अजिबात पुरी करत नाही. यातले नैतिक आणि व्यावहारिक प्रश्न प्रत्येकाने आपले आपण तपासावेत आणि आपापली उत्तरं काढावीत, असा त्याचा अविर्भाव आहे. शेवटी थोडा संभ्रम जरूर निर्माण झालेला दिसतो; पण निर्णय प्रेक्षकावरच सोपवलेला आहे.

आणखी एक. जपान्यांच्यात स्पर्शसहजता नाही का? मुलीला भेटणारा बाप तिला जवळ घेत नाही, एकत्र फोटो काढून घेतानाही ते अवघडून दूरच राहतात. पुढे ‘मी तुम्हाला मिठी मारू?’ असं बापाला विचारते, तेव्हा (मला वाटतं) असंच सुचवलं जातं की उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी मिठी मारली जाते आणि त्यासाठीच स्पर्श केला जातो.

जपानला जाताना किंवा इथेच जपानी कोणी भेटणार असतील, तर काळजी घ्यायला हवी!

(भाग ७)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा पोलिश-इतालियन सिनेमा मिळवून बघायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यातली प्रमुख अभिनेत्री म्हणजे क्रिस्तिना यांदा - पोलंडमधली सुपरस्टार आणि वायदा, किस्लोव्स्की झाबो आणि झानुसी माझ्या चार आवडत्या दिग्दर्शकांच्या फिल्म्समध्ये तिला पाहिलं आहे. वरच्या चित्रपटातल्या तिच्या भूमिकेत एक हलकट डेव्हिल-मे-केअर खवचटपणा आहे, तो तुला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तिचा एक सिनेमा लायब्ररीत दिसतोय - The decalogue. तो आणते.

हा सिनेमा इंटरनेटवरून सध्या खरेदीसाठी कुठे सापडत नाहीये. लायब्ररीत आणायला सुचवलं आहे, आता येईल तेव्हा येईल. तोवर आणखी कुणाला तरी 'हलकट डेव्हिल-मे-केअर खवचटपणा'ची हौस आहे, हे वाचून समाधान मानून घेते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.