Skip to main content

इंटरनेटवरच्या ट्रोलिंगला कंटाळून शेजारचे काका गणिताकडे वळले

सदाशिव पेठ, पुणे. दिनांक ९ ऑगस्ट.

आपल्या इंटरनेटवरच्या, सोशल मिडीयावरच्या, व्हॉट्सॅपवरच्या ट्रोलिंगला कुणी धूप घालत नाही हे बघून शेजारचे काका गणिताकडे वळले आहेत.

शेजारच्या काकांनी नव्वदच्या दशकाच्या शेवटीच संगणक वापरायला सुरुवात केली. आपल्या मोठ्या भावाच्या आणि बहिणीच्या दीरांनाही शेजारच्या काकांनी MS Wordची पायरेटेड प्रत आणून सॉफ्टवेअर वापरायला शिकवलं. "यात नक्की किती पानं लिहिता येतात रे," अशा प्रश्नांनाही काकांनी धीरानं उत्तरं दिली होती. मात्र काकांना खरा उत्साह आला तो सोशल मिडिया, आणि त्यातही फॉलोअर्स मिळाल्यानंतर. काका दोनेक वर्षांतच मराठी लोकांतले प्रसिद्ध ट्रोल झाले.

काकांची ख्याती आता चाळीस पैसे अशी असली तरी काका म्हणाले की ते सगळ्या लोकांनाच ट्रोल करत. कुणाचा राजकीय पक्ष कुठला, कोण पर्यावरणवादी आहेत का विकासवादी, देशीवादी आहेत का उदातमतवादी, एनाराय आहेत का देशप्रेमी, याची पर्वा काका करत नाहीत. कुणीही दिवसाला एकापेक्षा जास्त पोस्ट टाकल्या, किंवा एका पोस्टमध्ये १००पेक्षा जास्त शब्द लिहिले की काका त्यांना ट्रोल करत असत. कुणाच्याही पोस्टवर, लेखनावर शेजारच्या काकांनी ट्रोलिंग केलं नाही, तर ते पोस्ट चांगलं नाही, किंवा त्या माणसाला कुणी फॉलोइंग नाही असं समजण्याची पद्धत सुरू झाली. आणि काकांच्या ट्रोलिंगचा इथेच पराभव सुरू झाला.

आता काकांनी कितीही नेटानं ट्रोलिंग केलं तरी कुणी काकांकडे लक्ष देईनासे झाले. काकांना जवळजवळ डिप्रेशन, एंक्झायटी असे शब्द माहीत व्हायला लागले. काकांच्या ट्रोल कारकीर्दीत कधीच न वापरलेले शब्द - विस्मयजनक, सव्यापसव्य, व्यामिश्र, एकसमयावच्छेकरून, सदसद्‌विवेकबुद्धी, आधुनिकोत्तर - काकांच्या हातून सटासट सुटायला लागल्यावर काकांना वास्तवाची जाणीव झाली, आणि काका गणिताकडे वळले.

ट्रोल गणितं समीकरणं

दररोज लोकांना उलटसुलट प्रश्न विचारण्याजागी काका आता रोज सकाळी, सगळ्यांना व्हॉट्सॅपवर कूटप्रश्न पाठवतात आणि संध्याकाळी त्याची उत्तरंही पाठवतात. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमधून काका रोज हे काम करतात.

शेजारचे काका आता गणितज्ञ म्हणून संपूर्ण कॉलनीत प्रसिद्ध आहेत.

विवेक पटाईत Tue, 10/08/2021 - 09:44

बहुतेक ४० च्या जागी १ रु देण्याची तैयारी आहे, तरीही कुणी ट्रोल करत नाही. नो ट्रोल नो प्रसिद्धी. अदितीचे दुख मी समजू शकतो.

अबापट Tue, 10/08/2021 - 16:09

वा वा छान !!
तरीही काही बदल सुचवितो.

काका हल्ली सदाशिव पेठेत राहत नसणार. ते कोथरूड, कर्वेनगर किंवा सहकारनगर , अरण्येश्वर इत्यादी ठिकाणच्या १ BHK च्या प्रशस्त वास्तूत स्थलांतरित झाले असणार. हल्ली सदाशिव पेठेत मुख्यतः कापड दुकाने , होलसेल केमिष्ट दुकाने , जुन्या शाळा आणि ज्ञानप्रबोधिनी इत्यादी असते . ( गेले ते काका दिवस !!!)
माझ्या माहितीत किमान एक काका तरी नक्की असे आहेत ज्याचा प्रवास वेगाने मायक्रोसॉफ्ट वर्ड ते गुगल स्पीच टू टेक्स्ट झाला असावा. दिवसाला चार पाच मोठ्या पौष्टि तरी टाकतात. कुणाकुण्णाला सोडत नाहीत. पुरोगामी , लिब्रान्डु , पर्यावरणवादी, अलोपॅथी, टुकडे टुकडे ग्यांग , गुपकार ग्यांग , काँग्रेसचे शुंभ इत्यादी देशद्रोह्यांना जोरदार ठोकून काढत असतात. फ्यान फॉलोविंग ही मोठे आहे.

असं का करत नाही तुम्ही ? त्या काकांना तुमच्या संस्थळावर निमंत्रण का देत नाही ? तुमचाही खप वाढेल. काकांनाही नवे ग्राहक मिळतील ( विन विन का काय ते ) , विचारून बघा कदाचित घासू गुर्जींच्या यांच्या वळखीचे असतील .
इथे गेल्या काही महिन्यातच पुनर्जन्म झालेल्या काकांनाही कुंपणि मिळेल. ( अर्थात आमचे पुनर्जन्म काका अत्यंत सभ्य आहेत हो ' त्या ' काकांच्यापुढे . रेंजही छोटी त्यांची ' त्या ' काकांच्या पुढे )

तात्पर्य काका कंटाळत नसतात. गणितासारख्या निरुपद्रवी विषयाकडे वळत नसतात. काकांचं बरं चाललंय .
( हेच मुळी गंभीर आहे )
सदाशिव पेठी काकांची बदनामी थांबवा.
काका कभी कंटाळता नहीं
गणित कभी सिखता नहीं.

न बा शेठ , तुमचे काय मत यावर ?

'न'वी बाजू Tue, 10/08/2021 - 17:18

In reply to by अबापट

न बा शेठ , तुमचे काय मत यावर ?

तीराचे निशाने न समजल्यामुळे आपला पास.

----------

बाकी,

काका हल्ली सदाशिव पेठेत राहत नसणार. ते कोथरूड, कर्वेनगर किंवा सहकारनगर , अरण्येश्वर इत्यादी ठिकाणच्या १ BHK च्या प्रशस्त वास्तूत स्थलांतरित झाले असणार. हल्ली सदाशिव पेठेत मुख्यतः कापड दुकाने , होलसेल केमिष्ट दुकाने , जुन्या शाळा आणि ज्ञानप्रबोधिनी इत्यादी असते . ( गेले ते काका दिवस !!!)

१ बीएचकेची प्रशस्त वास्तू वगैरे आवडले. तेच ते, शिक्रण, मटारउसळ, 'कारण शेवटी आम्ही भटेच; त्याला काय करणार?', वगैरे वगैरे.

आणि हो, मध्यंतरी पुण्यात भली मोठी डेमोग्राफिक शिफ्ट झाली आहे खरी. बोले तो, ४११०३० हे बहुधा ४११०२९, ४११०३८ तथा ४११०५२मध्ये लॅटरली शिफ्ट झाले असावे. पेठांमध्ये आता पूर्वीच्यातले कितपत काय राहिले असावे, याबद्दल साशंक आहे.

असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/08/2021 - 20:17

In reply to by 'न'वी बाजू

४११०५६मध्ये कोण असायचं आधी, आणि हल्ली?

अस्वल Thu, 12/08/2021 - 18:37

"जाने भी दो यारों" मधला धृतराष्ट्र झाला आहे माझा.
एक अक्षर समजलं नाही, काही तरी क्लू मिळेल काय?

चिंतातुर जंतू Fri, 13/08/2021 - 12:17

In reply to by 'न'वी बाजू

Projection much?

मराठीमध्यमवर्गीयनिरुद्योगीनवसाक्षरथेरडेशाहीचे अनभिषिक्त सम्राट नबा म्हणत असतील तर मग ते खरेच असेल.

चिमणराव Mon, 13/09/2021 - 07:45

मागच्या पंधरवड्यात पुण्याला फेरी मारली ( धावती हो अबापट, ) तेव्हा बसमध्ये भेटले होते.
गणिताकडे वळण्याचे काकांचे खरे कारण आणि श्रेय त्यांच्या कल्याणच्या नातीला जाते. सध्या इतर मुलांप्रमाणेच नातही कंपुटरवर बऱ्याच गोष्टी अजमावत असते. "Your child can learn coding" या चानेलवरच्या जाहिराती आणि मोबाईल आणि कंपुटर वापरायला कोरोनासाध्य प्रोत्साहन यामुळे अगदी हुशार झालीय. आजोबा ( म्हणजे आपले काका हो) आठ दिवस कोथ्रुडातून ( पूर्वी सपेत राहायचे पण मुलामुळे इकडे शिफ्ट झालेत. मुलाच्या ब्लॉकजवळच त्यांनी प्रशस्त वनबिएचके घेतला. प्रशस्त =स्वतंत्र )कल्याणला मुलीकडे राहायला आल्यावर नातीला चांगला विद्यार्थी सापडला. एकूण घरात आनंदिआनंद वातावरण होतं.

तर बोलता बोलता म्हणाले की नातीने दिशा दाखवली. सांगोवांगी फारवर्डपेक्षा कंटेट डेटा महत्त्वाचे. काही तरी नवीन करा म्हणाली. सध्या "मेडिकल टिप्स चालतात तर त्या शोधा." तसे माझे गणित चांगले आहे त्याचा उपयोग करायचे ठरवले."
"तुम्हाला सांगतो एका अटीवर . बाहेर फोडू नका. परदेशी चार्ट्स असतात ना की किती वय,किती उंची, किती वजन पाहिजे किंवा किती व्यायाम केला पाहिजे या धर्तीवर मी म्हाताऱ्यांनी कोणती, किती वजनाची,आकाराची काठी घ्यावी याचा चार्ट करत आहे."
काकुंनी हलकेच स्मितहास्य कटाक्ष टाकला कृतकृत्य होऊन.