Skip to main content

जागतिक पुस्तक दिनानिमित्त

आज २३ एप्रिल. जगभर 'जागतिक पुस्तक दिन' म्हणून साजरा होत असलेला दिवस. यानिमित्त अस्तंगत होत चाललेल्या पुस्तक संग्रहाच्या छंदाविषयी दिवंगत. सतीश काळसेकर यांच्या खालील कवितेची आठवण झाली. म्हणून ऐसीवर शेर करत आहे. (कदाचित बहुतेकानी यापूर्वी ही कविता वाचलीही असेत. परंतु पुन्हा एकदा वाचावयास हरकत नसावी.)

पुस्तकांच्या संग्रहाविषयी

.......... सतीश काळसेकर

पुस्तके साठत जातात.
पुराणपुरुषांनी देवघरांत
ठेवलेली रेशमी बासनांत
बांधून सुरुवातीला.
नंतर येतात कुठल्याकुठल्या
स्पर्धातून बावचळल्यासारखी
एकदमच,
सिंदबाद, रणावीण स्वातंत्र्य
ते थेट सुखी संसार,
पुस्तकें पाहतात
त्यांच्या निष्पाप छपाईतून
संसारांतल्या खस्ता.
पुस्तकें तशी विक्रीस काढतां
येत नाहींत
दागिन्यांसारखी
किंवा ठेवतां येत नाहीत
गहाणवट स्थावर मालमत्तेसारखीं.

प्रथम पुस्तकें दारोदार हिंडत राहिली
माझ्या वळकटीसारखीं;
पुस्तकांना तेव्हा आपलें म्हणावें
असे छप्पर नव्हतें माथ्यावर.

पुस्तकांना साथीचे रोग
फार लवकर जडतात
म्हणून प्रथम येतात
संस्कृतीवरचे टाकाऊ ग्रंथ,
प्रेमकवितांच्या भन्नाट: पंगती
त्यांच्या जोडीनेच साजऱ्या होतात.

पुस्तकें पहात नाहींत
अंथरूण पाहून कसे पाय पसरावेत.
पुस्तकें निराश होत नाहीत
अंगावर कितीही चढली धूळ तरी.
पुस्तकांना
येतांना जाण्याची खंत नसते.

रोगांची लागण वयपरत्वे बदलावी
हैं सहजपणे पुस्तकें आपलेसें करतात.
तीं जातात अडगळीच्या जागीं,
अनाथ वाचनालयांच्या कपाटांत.
पुस्तकें सहसा रद्दीत जात नाहींत.

पुस्तकें रद्दीत विकावीं
हे, प्रेमपत्रांना दूर लोटावें
तसें क्रूर वाटतें.
पुस्तकांना वय
शहाण्यासारखें स्वीकारतां येत नाही.

आता पुस्तकें शोभेसारखी
वाटतात अधूनमधून,
तरीही पुस्तकें नव्याने येतच राहतात
बदलत्या हवामानास अनुसरून

त्यांना अधूनमधून हवाबदलासाठी
हलवावेंही लागतें
कपाटांतून माळ्यावर
माळ्यावरून ट्रंकेत
ट्रंकेतून पुन्हा कपाटांत.
तीं बिनतक्रार तुमच्या सोयीने
नांदतात.

काळोखांतही पुस्तकें
तुम्ही म्हणाल तर डोळे उघडे ठेवतात;
म्हणाल तर दिवसाढवळ्या
पुस्तकें तुम्हाला हातावर तुरी देऊन
दोस्तांसोबत निघून जातात.

पुस्तकांना कोणापाशी नांदावें
याच्या निवडीचें भान नसतें.

पुस्तकें म्हणाल तर तुमचीं असतात;
पुस्तकें म्हणाल तर दुःख देतात;
पुस्तके म्हणाल तर आधार देतात;
पण पुस्तकें कधीही नसतात
स्थावरजंगम मालमत्तेसारखीं.
तुम्ही कसेही गेलांत फरफटत
त्यांच्या डोळ्यासमोर
किंवा त्यांच्या डोळयाआड;
तरीही पुस्तकें भाकरीसाठी
विकतां येत नाहीत.

पूर्व प्रसिद्धीः सत्यकथा, डिसेंबर १९७७

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

'न'वी बाजू Sat, 23/04/2022 - 17:41

पुस्तकें तशी विक्रीस काढतां
येत नाहींत
दागिन्यांसारखी
किंवा ठेवतां येत नाहीत
गहाणवट स्थावर मालमत्तेसारखीं.

सोपा उपाय आहे. पुस्तके लोकांना वाचायला उधार द्या. ती परत तर मिळत नाहीतच, परंतु, त्या (उधार दिलेल्या) पुस्तकांचे पुढे इतक्यांदा हस्तांतरण होते, की तूर्तास ती नक्की कोणाकडे आहेत, हे तो मूळ उधार घेणारा तर सोडाच, परंतु ब्रह्मदेवसुद्धा सांगू शकत नाही.

पुस्तके कधीही विकत आणून वाचू नयेत. लोकांची ढापून वाचावीत. गोडी वाढते. मात्र, पुढे ती (ढापलेली पुस्तके) कोणाला उधार न देण्याची खबरदारी अवश्य घ्यावी. (The book stops here!)

पुस्तके विकत घेऊन वाचणारा तो येक मूर्ख!

– (महामूर्ख) 'न'वी बाजू.

anant_yaatree Sat, 23/04/2022 - 20:46

In reply to by 'न'वी बाजू

एका पुस्तकप्रदर्शनातून श्रीमद्भगवद्गीतेची काडेपेटीच्या आकाराची देखणी प्रत चोरून आणली होती. त्यावेळी त्याच्या हस्तलाघवाचे व निर्णयक्षमतेचे मला व वर्गातल्या अनेकांना कौतुक वाटले होते.

सामो Sat, 23/04/2022 - 18:24

क्या बात है!! अतिशय सुंदर कविता.
अजुन एक -
--------------------------------------------------
अगदी क्वचित लिमिटेड एडिशन्स्
लब्बाड, गोबरी पुस्तके
गोड हसत हात करता
आपण चोरणारच असतो
आणि ..... लक्षात येते
अरे यांच्या बंधूभगिनींनी
आपल्याला
'चोरी वाईट' शिकविलेले असते
अगदी बाळकडू पाजुन.
आणि मग ती गोंडस पुस्तके
तशीच खुणावत रहातात
वर्षानुवर्षे, वर्षा-नु-वर्षे
लिमिटेड एडिशन पुन:
मुद्रित होईपर्यंत

अतिशहाणा Wed, 11/05/2022 - 07:38

कविता आवडली.

(एकेकाळी पुस्तके विकत घेणारा) अतिशहाणा.