आपले वाङमयवृत्त – मे २०१२

एप्रिल अंकाचा परिचय – http://aisiakshare.com/node/814

या महिन्याच्या अंकाच्या मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर Jacob Epstein या शिल्पकाराची शिल्पं आहेत. ती अर्थातच अंकातल्या दीपक घारे यांच्या जेकब एप्स्टीनविषयीच्या लेखाच्या अनुषंगानं आहेत. यावेळच्या मुखपृष्ठाचं वैशिष्ट्य म्हणजे ते एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शिल्पाची भारतातली प्रतिकृती आहे. एप्स्टीननं आईनस्टाईनचं केलेलं हे शिल्प होमी भाभा यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चसाठी १९५५मध्ये विकत घेतलं. बहुधा ते आजही तिथे पाहायला मिळतं.

त्या शिल्पाच्या दुसऱ्या एका प्रतिकृतीचा हा फोटो :

लहान मुलांची खेळणी आणि त्यांत कालानुरूप झालेले बदल यांचं सामाजिक-राजकीय विश्लेषण करणारा वसंत आबाजी डहाके यांचा लेख या अंकात आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं प्रकाशित केलेल्या ‘The Clockwork Muse: A Practical Guide to Writing Theses, Dissertations, and Books’ या पुस्तकाचा उद्धव कांबळेकृत अनुवाद (‘कालबद्ध निर्मिती : दिशा आणि तंत्र’) नुकताच लोकवाङमय गृहातर्फे प्रकाशित करण्यात आला. अंकात या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणातला संपादित अंश दिला आहे. काही दिवसांपूर्वी रफिक सूरज यांनी संकलन केलेली 'मराठी लघुनियतकालिकांची वर्णनात्मक सूची' लोकवाङमय गृहानं प्रकाशित केली आहे. आशुतोष पोतदार यांनी अन्यत्र प्रकाशित केलेला त्याचा परिचय या अंकात पुनर्प्रकाशित केलेला आहे. ‘आमचं जगणं आमचं लिहिणं’ हे लोकवाङमय गृहाचं आणखी एक नवं आणि रोचक प्रकाशन आहे. भारतातल्या अठरा भाषांतल्या महत्त्वाच्या लेखिकांच्या सविस्तर मुलाखती ‘Just Between Us - Women Speak About Their Writing’ या इंग्रजी पुस्तकात समाविष्ट आहेत. ‘आमचं जगणं आमचं लिहिणं’ हा लीना चांदोरकर यांनी केलेला त्या पुस्तकाचा अनुवाद आहे. ह्या पुस्तकात समाविष्ट असलेल्या शशी देशपांडे, जीलानी बानो आणि गौरी देशपांडे यांच्या मुलाखतींतला निवडक मजकूर या अंकात आहे.

याशिवाय सुरेश कदम आणि सुनीता झाडे यांच्या कविता अंकात आहेत. ‘उत्खनन’ या सदरात १८५५मधला एक उतारा आहे. पूना कॉलेजचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामबागवाड्यात महात्मा फुल्यांचा सत्कार झाला होता. फुल्यांच्या शाळेत शिकणाऱ्या मुक्ता साळवे या मातंग समाजातल्या १४ वर्षाच्या मुलीनं तीन हजार लोकांच्या उपस्थितीत तेव्हा आपला निबंध वाचला होता. मेजर कँडी यांनी त्यावेळी तिचं कौतुक करून तिला चॉकलेट देऊ केलं. ते नाकारून ‘चॉकलेट नको, वाचनालयाची सोय करून द्या’ अशी बाणेदार मागणी तेव्हा तिनं केली होती. ‘मांगमहारांच्या दु:खाविषयी निबंध’ या शीर्षकाचा हा उतारा २३ एप्रिल या जागतिक ग्रंथदिनाच्या निमित्तानं या अंकात छापला आहे.

आधीचे अंक http://www.lokvangmaygriha.com/avv.html इथे वाचता येतील.

field_vote: 
0
No votes yet