Skip to main content

चराति चरतो भग:


 

ऋग्वेदातल्या 'ऐतरेय ब्राह्मण' शाखेत राजकुमार रोहितला इंद्र 'चरैवेति' – चालत राहा – असा सल्ला देताना सांगतो : 

 

आस्ते भग आसीनस्य। उर्ध्वस्तिष्ठति तिष्ठतः।

शेते निपद्यमानस्य। चराति चरतो भग:।

चरैवेति चरैवेति।

 

शांत बसलेल्या माणसाचं भाग्यही शांत बसतं. जो उठून उभा राहतो त्याचं भाग्यही तसंच उभं राहतं. 

जो आडवा पडतो किंवा झोपतो त्याचं भाग्यही झोपतं आणि जो चालत राहतो त्याचं भाग्य त्याच्या बरोबरीनं चालतं,

म्हणून चालत राहा, चालत राहा!

 

आजकालच्या जगाच्या मूलभूत जीवनावश्यक वस्तू : हवा, पाणी, अन्न… आणि इंटरनेट! आता सतत चालायचा ध्यास घेतला, तर पहिल्या तिन्ही तर मिळतीलही; पण इंटरनेटचं काय? तर त्यासाठी मोबाइलचं जाळं आणि मोबाइलची सोय. 

 

आपल्यापैकी किती जणांनी आकड्यांची तबकडी कटर्रर्रर्रकट फिरवत डायल-फोन वापरला आहे? मुंबईत ६ किंवा ७ आकडी क्रमांक असायचे, काळ्या कुळकुळीत अंगाचा, चमकती डायल असलेला फोन घरी दर्शनी भागात विराजमान असायचा. दसऱ्याच्या आधी आयुधपूजेला त्याची विधिवत पूजा व्हायची. असा फोन घरात असणं हे प्रतिष्ठेचं, नशिबाचं लक्षण समजलं जायचा तो काळ होता. नवीन फोन घरी अवतरण्यापूर्वी आधी काही वर्षं प्रतीक्षायादीत कंठावी लागायची! आपल्याकडे फोन नसेल, तर कॉल शेजारी यायचा. मग त्यांची हाक, तो घ्यायला जायची धावपळ! आपण केलेल्या फोनवर दर दहा सेकंदाबरोबर वाढणाऱ्या बिलाची मनातल्या मनात धास्ती असायची. किमान शब्दांत कमाल संवाद! शिवाय बिलं भरायच्या लांबच लांब रांगा (कित्येकांची लग्नं जुळली म्हणे त्या रांगांत)! छ्या:! सगळंच गेल्या पंचवीस वर्षांत गायब झालं की राव! 

 

डायल फोन
'आकडे फिरवण्या'चा फोन (चित्रस्रोत)

कुणाचा तरी फोन येईल म्हणून माणसं घरात चिकटायची, तो फोनच भ्रमणशील होऊन आपल्यापैकी प्रत्येकाला कायमचा चिकटला. बंधनं तुटली! आपणच चल – मोबाइल झालो! जो फोन फक्त दुसऱ्यांशी बोलायला वापरता यायचा तो इंटरनेट ब्राउजिंग, चॅटिंग, मेसेजिंग, गेमिंग, आणि आता तर GenAIमुळे हक्काचा स्वीय साहाय्यक, गुरू किंवा कधी धनी होत आपल्या आयुष्यात स्थिरावला. 'टाटा स्टील'चं ब्रीदवाक्य होतं 'We Also Make Steel'. मथितार्थ असा, की आम्ही राष्ट्रनिर्मिती करतो; स्टील तर फक्त एक निमित्त आहे. अगदी तसं आजचा फोन म्हणू शकतो – 'I also let people communicate' – मी तुमचं आयुष्य चालवतो, संवाद तर एक निमित्त आहे! 

 

हा इतका मोठा पल्ला गाठण्यात फोनचं उपकरण / हाताळयंत्र (हँडसेट) आणि फोनचं जाळं (नेटवर्क) ह्या दोन्हींत झालेली पाच पिढ्यांची उत्क्रांती कारणीभूत आहे. 

 

हे नेटवर्क चालतं कसं? वेगवेगळे फोन एकमेकांशी कसे जोडले जातात? आपण प्रवास करता करता कॉलवर कसे काय बोलत राहू शकतो? आपण दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात आपला फोन कसा वापरू शकतो? अशा अनेक गोष्टींची थोडक्यात ओळख करून घेऊ या. 

 

आपल्या सर्वांना रेडिओ माहीत आहे. त्यात आवाज विद्युतचुंबकीय लहरींच्या सांकेतिक रूपातून पाठवला जातो. ह्या लहरी प्रकाशाच्या लहरींसारख्याच पण त्यांची तरंगलांबी (Wavelength) आणि तरंग-वारंवारता (Frequency) वेगळी असल्यानं आपल्यासाठी अदृश्य. रेडिओ-टॉवरवरून अर्थात रेडिओ-मनोऱ्यावरून प्रसारित केलेले संदेश काही किलोमीटर (FM रेडिओसाठी) तर काहीशे किलोमीटर (AM रेडिओसाठी) अंतरापर्यंत योग्य प्रकारे पकडले, तर उकलता येतात. अर्थात ते तोवर क्षीण झालेले असतात आणि त्यांच्यात वातावरणातल्या इतर लहरींचा गोंगाटसुद्धा मिसळलेला असतो. रेडीओलहरी-ग्राहक हे संदेश साफसूफ करतो, वधारतो (amplification), आणि परत मूळ आवाजात रूपांतरित करतो. दूरचित्रवाणीतही (Television/टीव्ही) अशीच प्रणाली असते. फरक इतकाच, की टीव्हीचा संदेश अधिक माहितीचा असतो – त्यात दृश्य आणि ध्वनी दोन्ही असतात त्यामुळे तो हवेतून पाठवायला वारंवारतेचा जास्त मोठा समूह वा आवाका (frequency spectrum) लागतो. 

 

रेडिओ आणि टीव्ही ह्या दोन्ही एकतर्फी संदेशवहन यंत्रणा आहेत – प्रसारक ते ग्राहक किंवा मनोरा ते रिसिव्हर (रेडिओ / टीव्ही). पण मोबाइलचं जाळं मात्र दुतर्फा संदेशवहन यंत्रणा आहे – मनोरा ते फोन आणि फोन ते मनोरा – दोन्ही बाजूंकडून संदेश आणि दृश्य-आवाज पाठवले जातात. ह्या नेटवर्कचे मनोरे (BTS - Base Transceiver Station) जागोजागी थोड्या अंतरावर साधारणतः उंच जागी आपल्याला दिसतात. एकेका मनोऱ्याकडून पाठवलेले संदेश जमिनीवर जिथपर्यंत पोहोचतात त्या क्षेत्राला 'सेल' (Cell) म्हणतात. ह्या षट्‌कोनी 'सेल'ची रचना मधमाशांच्या पोळ्यातल्या खणांप्रमाणे असते. अर्थात आपला फोन ज्या खणामध्ये असेल तिथे ज्या मनोऱ्याचा संदेश सगळ्यात जोरकस असतो नि त्या मनोऱ्याला आपला फोन नोंदवला जातो. असे अनेक मनोरा गटागटांनी एकेका 'गट-नियंत्रका'ला (BSC : Base Station Controller) जोडलेले असतात आणि असे अनेक BSC एकेका 'मोबाइल दळणवळण केंद्रा'ला (MSC : Mobile Switching Center) जोडलेले असतात. साधारणतः एक MSC एका छोट्या शहराला किंवा मुंबईसारख्या ठिकाणी काही म्युनिसिपल वॉर्डांना सेवा पुरवू शकतो. म्हणजे त्याच्या प्रभावक्षेत्रातल्या सगळ्या लोकांची नोंदणी, त्यांचे सगळे कॉल जोडण्याचं, सगळे निरोप (SMS : Short Message Service : लघुसंदेश सेवा) पोहोचवण्याचं काम तो करतो. हे MSC एकमेकांशी जोडलेले असतात. आपण ज्या टेलिकॉम कंपनीचे ग्राहक असू त्यांचे MSC एकमेकांशी जोडलेले असतातच पण त्याच प्रदेशातल्या इतर कंपन्यांच्या MSCशी आणि जगातल्या सगळ्या इतर टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कशीसुद्धा ते IPX यंत्रणेनं जोडलेले असतात. ह्यात जुनं लँडलाइन फोन नेटवर्कही आलं. 

जीएसएम प्रणालीसाठीची जोडणी
जीएसएम प्रणालीसाठीची जोडणी

पण नुसतीच जोडणी उपयोगाची नाही. ह्या सगळ्या संदेश-उपकरणांना एकमेकांशी एकाच भाषेत बोलता यायला हवं. ते कशासाठी? तर कोणी आपला फोन चालू किंवा बंद केला, कोणी एका ठिकाणावरून दुसरीकडे प्रवास करून मनोरा किंवा BSC किंवा अजून लांब जाऊन MSC बदलला, कोणीही कोणालाही कॉल केला किंवा कोणाला कॉल आला, कोणी SMS केला वा कोणाला SMS आला, कोणी इंटरनेट वापरणं चालू वा बंद केलं... अशा प्रत्येक कृतीसाठी आपल्या हातातल्या हँडसेटवरून नेटवर्कवर, आणि नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कवर, आणि तिथून पुन्हा परत असे संदेश जातात. प्रत्येक कृतीसाठी वेगळा संदेश. तुम्ही कल्पना करू शकता किती प्रकारचे संदेश असतील! म्हणून प्रत्येक प्रकारच्या संदेशाचा आराखडा ठरलेला असतो. जगातल्या कुठल्याही नेटवर्कचा MSC त्याच आराखड्यात प्रत्येक संदेश पाठवतो फक्त प्रत्येक संदेशात त्यातला मजकूर बदलतो.

 

सिमकार्डाची उत्क्रांती
सिमकार्डाची उत्क्रांती

ह्या सगळ्या संदेशांचे संकेत-मानक (Protocol Specifications) ठरवणाऱ्या जागतिक संस्था आहेत – ETSI (European Telecommunications Standards Institute), ITU-T (International Telecommunication Union – Telecommunication Standardization Sector), 3GPP (Third Generation Partnership Project), आणि सगळ्या टेलिकॉम चालकांना (ऑपरेटर) मार्गदर्शक तत्त्वं पुरवणारी संस्था आहे GSMA (Global System for Mobile Communications Association). ही टेलिकॉम नेटवर्क आपल्या आंतरजालापेक्षा वेगळी, समांतर असतात. आणि तरीही प्रत्येक नेटवर्क एका दरवाज्यानं आंतरजालाशी जोडलेलं असतं. शिवाय, एखाद्या मोठ्या देशात सर्वत्र एकच मोठं जाळं विणण्याऐवजी व्यवस्थापनाच्या सोयीसाठी ते अनेक छोट्या उप-जाळ्यांत विभागतात, ज्यांना 'सर्कल' (Circle) म्हणतात. भारतात साधारणत: एक राज्य म्हणजे एक 'सर्कल' आहे. 

 

आता ह्या नेटवर्कचा सदस्य होण्यासाठी आपल्याकडे प्रथम एक फोन हवा. फोनसोबत येतो एक क्रमांक : IMEI - International Mobile Equipment Identifier. हा तुमच्या हँडसेटचा जगभरात अद्वितीय (unique) असणारा क्रमांक. त्यानंतर आपण ज्या टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या कंपनीचं गिऱ्हाईक असू तिनं दिलेलं सिम कार्ड आपण हँडसेटमध्ये घालतो. ह्या कार्डाबरोबर येतो एक क्रमांक IMSI (International Mobile Subscriber Identifier). हाही अद्वितीयच. तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा आपला फोन क्रमांक : MSISDN (Mobile Station International Subscriber Directory Number). हासुद्धा आपल्याला आपला टेलिकॉम चालक पुरवतो. पण हा क्रमांक आपण सगळ्यांना देतो आणि तो आपला मालकी हक्काचा आहे असं समजतो. आता तर बँक, आधार कार्ड अशा अनेक ठिकाणी तो नोंदला गेल्यानं त्या क्रमांकावरचा आपला हक्क ही एक गरज झाली आहे. काही काळापूर्वी आपण चालक बदलला तर हा क्रमांक सोडून द्यायला लागायचा. पण सरकारनं (Telecom Regulatory Authority of India - TRAI) सर्व चालकांना सक्ती केली, की ग्राहकानं चालक बदलला, तरी त्याला त्याचा फोन क्रमांक तोच ठेवण्याची सोय पुरवलीच पाहिजे. ही सोय म्हणजे MNP (Mobile Number Portability). ही वापरून आपण आपला फोन क्रमांक देशातल्या कुठल्याही चालकाच्या टेलिकॉम-नेटवर्कसहित चालवू शकतो आणि त्याची मालकी आपल्याकडेच राहते. 

 

ह्या फोन क्रमांकाचे अजून भाग आहेत. 

१. प्रत्येक देशासाठी नेमलेला एक आकडा - CC (Country Code). भारताचा +९१ आहे. 

२. त्यानंतर येतो त्यातल्या विभागाचा आकडा - NDC (National Destination Code). आधीचे STD कोड किंवा आता चालकांना दिलेल्या क्रमांकांच्या मालिका. जसं '+९१ २२'नं मुंबईतले सगळे लँडलाइन क्रमांक चालू होतात, तर वोडाफोन-मुंबईचे '+९१ ९८२०'ने. 

३. सर्वांत शेवटी असलेला भाग हा त्या त्या ग्राहकाचा वैयक्तिक क्रमांक – उदाहरणार्थ +९१ ९८२० ०१२३४५. 

भारतात हा क्रमांक १० आकडी आहे. आता हा दहा आकडीच का? आपली लोकसंख्या १२५ कोटी आहे. हा क्रमांक १० आकडी असल्यानं जास्तीत जास्त १०१० = १००० कोटी अद्वितीय क्रमांक उपलब्ध आहेत. जे सध्यातरी पुरत आहेत – पण कदाचित भविष्यात एका माणसाकडे अनेक फोन आणि अनेक स्मार्ट उपकरणं असण्याच्या काळात आपल्याला हे आकडे वाढवायला लागू शकतील. 

IMSI क्रमांक काय असतो?
IMSI क्रमांक काय असतो?

आपण सुरुवातीला पाहिलं, की संदेशांची नेटवर्कवरली देवाणघेवाण ही विशिष्ट वारंवारता समूह (frequency spectrum) वापरून होते. एखाद्या देशात ही नेटवर्क सुरू करायला कुठल्याही टेलिकॉम चालकाला सरकारकडून स्पेक्ट्रम वापरायची परवानगी लागते. सरकार तो स्पेक्ट्रम वापरू द्यायचं परवानाशुल्क आकारतं. नेटवर्कच्या प्रत्येक नव्या आवृत्तीसाठी नवी वारंवारता (फ्रिक्वेन्सी) वापरली जाते. सगळ्या देशांत सगळ्या फ्रिक्वेन्सी उपलब्ध नसतात – काही ज्या आधीच संरक्षण खात्याला किंवा इतर नागरी सुविधांसाठी वापरायला दिलेल्या असतात, त्या टेलिकॉम चालकाला मिळत नाहीत. तसंच प्रत्येक 'सर्कल'मध्ये वेगवेगळ्या चालकांना त्यांचा स्वतःचा वेगळा स्पेक्ट्रम लागतो, वगैरे वगैरे. हँडसेट मात्र असे बनवलेले असतात, की बहुतांश नेटवर्क आणि फ्रिक्वेन्सी त्यांसोबत सुरळीत चालू शकतील. ह्यात फक्त देशांतर्गतच नव्हे तर इतर कुठल्याही देशातल्या फ्रीक्वेन्सीसुद्धा आल्या. जर असं आहे, तर मग आपल्याला 'रोमिंग' मुद्दामून चालू का करायला लागतं? ते एवढं महाग का असतं? ह्याची कारणं तंत्रज्ञानात नसून केवळ व्यावसायिक आहेत. आपलं आर्थिक नातं असतं ते टेलिकॉम चालकाशी. आपण देश सोडून इतर कुठे गेलो आणि दुसरं कुठलं नेटवर्क आपल्याला वापरायचं असेल, तर त्या नेटवर्कच्या चालकाचं आपल्या नेहमीच्या टेलिकॉम चालकाशी आर्थिक नातं हवं! इतकंच नाही, तर आपण त्या नेटवर्कवर वापरलेल्या सगळ्या सोयी (केलेले कॉल/SMS, वापरलेला डेटा), ह्या सगळ्याची नोंद त्या-त्या चालकांनी आपल्याकडल्या चालकाला पाठवून आर्थिक ताळेबंद करणं जरुरीचं होतं. आणि ह्या नोंदींच्या अदलाबदलीसाठी प्रमाणित संकेतांचे आराखडे म्हणजेच मानकं आधीच ठरवलेली असल्यानेच हे शक्य होतं. 

 

काय होती ही मानकं? ती कोणी तयार केली? 

 

GSM - युरोपातील CEPT ह्या संस्थेनं १९८२ साली 'Groupe Spécial Mobile' (GSM) संकल्पनेची निर्मिती केली. पुढे १९८७ साली तेरा युरोपीय देशांनी एका कराराद्वारे ही पद्धती स्वीकारली आणि त्याच्या विकासाची जबाबदारी ETSI ह्या संस्थेकडे सोपवली. ह्या मानकाचा पहिला मसुदा १९९० साली तयार झाला. याच मसुद्याप्रमाणे १९९१ साली पहिलं जीएसएम नेटवर्क हे फिनलंड देशात नोकिया आणि सिमेन्स ह्या दोन कंपन्यांनी विकसित केलं. ह्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिकेत CDMA ही समांतर प्रणालीही विकसित झाली. पण GSM ही प्रणाली जास्त यशस्वी ठरली. त्याची मुख्य कारणं म्हणजे – फोन व सिम कार्ड हे एकमेकांशी निगडीत न ठेवल्यानं टेलिकॉम चालक आणि हँडसेट मनाप्रमाणे बदलण्याची सोय होती, तर ह्याउलट CDMA प्रणालीमध्ये चालकानं आपल्याला ग्राहकत्वाबरोबरच हँडसेटसुद्धा पुरवणं भाग होतं! शिवाय GSMचे तपशील हे प्रमाणित आणि सर्वांना खुले होते. अर्थातच जगातल्या जास्त देशांनी (युरोप आणि आशिया) ती स्वीकारली.

 

आता तुम्ही जे 'थ्री-जी', 'फोर-जी', 'फाय-जी' ऐकता ते म्हणजे ह्या GSM प्रणालीतले गरजेनुसार फोफावत गेलेले बदल आहेत. 

जी (G) = जनरेशन; पिढी. 

 

पहिल्या पिढीच्या प्रणाली ह्या ॲनालॉग (Analog) होत्या – म्हणजे फक्त फिरताफिरता बिनतारी फोनवर बोलणं इतकंच शक्य होतं.

 

दुसऱ्या पिढीची २जी ही पहिली प्रणाली संगणकीय (Digital) होती. २जी फोनमध्ये बोलणं, SMS, आणि फिरत-सेवेची (Roaming Service) सोय ह्या तीन मुख्य गोष्टी होत्या. SMSच्या सोयीची गोष्ट तर फार मजेशीर आहे. टेलिकॉम-नेटवर्कवर एसएमएस उपलब्ध होणं हे खरं तर हेतुपूर्वक न होता अपघातानंच झालं! ह्या नेटवर्कमध्ये संदेशांच्या दळणवळणासाठी दोन मार्ग असतात. एकामार्गे कॉल नोंदवणं आणि तो दोन टोकांना व्यवस्थित जोडला जाणं ह्यांसाठीच्या नियंत्रणाचे संदेश जातात. दुसरा असतो आपल्या बोलण्याचं, म्हणजे ध्वनीचं सांकेतिक रूप धाडण्यासाठी. सुरुवातीच्या काळात ह्या नियंत्रक-संदेशांच्या देवाणघेवाणीला पूरक म्हणून काही अक्षरसमूह सोबत पाठवले जात. अक्षरं पाठवण्यासाठी निराळी सोय नसल्यानं त्यांवर संख्येची मर्यादा होती. नंतर हेच तंत्र ग्राहकांच्या निरोपानिरोपीसाठी खुलं केलं गेलं नि जास्तीत जास्त १६० अक्षरांचे संदेश पाठवण्याची सोय उपलब्ध करून दिली गेली ज्याला आपण SMS सेवा म्हणतो!

 

ह्या अक्षरमर्यादेमुळे संदेश पाठवताना निरनिराळी लघुरूपं वापरात आली. lol, btw, asap वगैरे हे आत्ताच्या इमोजींचे पूर्वज. हे म्हणजे पूर्वी आपण तार वा टेलिग्राम धाडायचो तसं थोडंफार म्हणता येईल! तिथेही लघुरूपं होतीच. एका तथाकथित टेलिग्रामची गोष्ट प्रसिद्ध आहे. व्हिक्टर ह्यूगोनं की ऑस्कर वाइल्डनं त्याच्या नवीन पुस्तकाच्या खपाबद्दल चौकशी करण्यासाठी प्रकाशकाला टेलिग्राम पाठवला - '?'. प्रकाशकही खमका; त्याचं उत्तर - '!'. उत्तम खप आहे हे त्यानं सगळ्यात सबळ होकारार्थी उद्गारवाचक खूण वापरून सांगितलं! असा हुशार 'आळशीपणा' अजूनही सुरूच आहे. आत्ताच्या फोनमार्फत कितीही मोठा संदेश पाठवता येत असला, तरी सध्याच्या मुलांचं बहुतेक सगळं संभाषण फक्त लघुरूपं, इमोजी, आणि रंग वापरूनच होतं! 

 

२जीच्या पुढच्या पिढीत, म्हणजे २.५जी ते ३जीमध्ये प्रथमच डेटासाठी स्वत:चं असं, समांतर जाळं खुलं झालं आणि सोबत जास्तीच्या फ्रिक्वेन्सीही (बॅन्डविड्थ). डेस्कटॉप किंवा लॅपटॉप संगणकांपर्यंत मर्यादित असणारं आंतरजालाचं जग आता मोबाइलसाठीही खुलं झालं. ह्याबरोबरच व्हिडीओ-कॉल करता यायला लागला. कॅमेरा, दर्शनी पडदा, आणि की-बोर्ड ह्या सगळ्यांवर खूप मर्यादा असताना, केवळ बिनतारी असल्यानं फोनवर आंतरजाल वापरता येणं हे प्रचंड लोकप्रिय झालं. 

 

४जीमध्ये खरं तर मोबाइल नेटवर्क आणि मानकं संपूर्ण बदलली. GSM आणि CDMA ह्या दोन्ही प्रणाली एकत्र येऊन सगळीच नेटवर्क समान प्रणाली – LTE – वापरायला लागली. ह्या बदलांचा मुख्य उद्देश होता डेटा बॅन्डविड्थ वाढवणे. तो साध्य झाल्यानं इंटरनेटवर YouTubeवरून चित्रफिती वा चित्रपट बघणं, ऑनलाइन गेमिंग (ज्यात अनेकांसोबत एकत्र खेळताना मिलिसेकंदांचाही उशीर चालत नाही), समाजमाध्यमं अशा अनेक बॅन्डविड्थ (नेटवर्कची आणि माणसांचीही!) खाणाऱ्या सोयी मिळाल्या. 

 

५जी पिढीत आता पुन्हा नेटवर्क आणि मानकं पूर्ण बदलून पुढच्या सोयींचा पाया घातला जातोय. अधिक वारंवारता समूह, अधिक बॅन्डविड्थ, अधिक वेग ह्यांसोबत संदेशांचं सांकेतिकीकरणही अधिक कार्यक्षम होत आहे. त्यामुळे 'इंटरनेट ऑफ थिंग्स', स्मार्ट मोटारी, त्यापुढं जाऊन स्वयंचलित वाहनं, परिधान करण्याजोगी उपकरणं, स्मार्ट शहरं (ज्यात स्मार्ट मीटर, रस्त्यांवरचे स्मार्ट दिवे, सिग्नल, स्मार्ट एनर्जी नेटवर्क इ. येतात), इस्पितळातली दूरस्थ शस्त्रक्रिया अशा सगळ्या गोष्टी असलेल्या अलीबाबाच्या गुहेचा दरवाजा उघडेल! 

मोबाईल दळणवळाची उत्क्रांती
मोबाइल दळणवळणातली उत्क्रांती

ह्या पिढ्यांच्या प्रगतीला पूरक आशा तांत्रिक सोयी हँडसेटमध्ये असणंही भाग होतं. तेही सोबतीनं उत्क्रांत होत गेले.

 

सगळ्यांत जुने हँडसेट आठवत असतील, तर ते फळा पुसायच्या डस्टरएवढे ठोकळे असायचे. वजनानंही दणदणीत. वीट किंवा Brickच म्हणायचे त्यांना! मग त्यांचा आकार हळूहळू छोटा झाला. 'ब्लॅकबेरी'मध्ये आकड्यांसाठीच्या की-पॅडऐवजी चक्क की-बोर्ड होता, आणि इ-मेल पाठवता यायचं ही मुख्य सोय होती. मग बाकी कंपन्या त्या प्रकारच्या फोनमध्ये थोड्याफार सुधारणा करत असतानाच स्टीव्ह जॉब्सच्या 'अ‍ॅपल' (Apple) कंपनीनं २००७ साली पहिला 'आयफोन' (iphone) बाजारात आणला आणि हँडसेटच्या जगात क्रांती घडली! त्यापूर्वीच्या फोनमध्ये कुठल्या उपयोजित प्रणाली वा 'अ‍ॅप' (Application) असाव्यात हे फोन देणाऱ्या कंपनीच्या हाती असे. पण आयफोनचा आत्मा असलेल्या त्या वेळच्या 'iPhone OS' (आता iOS) कार्यप्रणालीनं बाजारातल्या फोनसाठीच्या कुठल्याही त्रयस्थ अ‍ॅप उतरवून घेण्याचा ताबा थेट ग्राहकाकडे दिला. हाच स्मार्टफोन वापरण्यातला अभूतपूर्व फायदा होता! नंतर 'गूगल'च्या 'अ‍ॅन्ड्रॉइड' प्रणालीनंही त्यांचीच री ओढत एकूणच जगातल्या अ‍ॅपसंबंधित व्यवसायांना प्रचंड चालना दिली. दुसऱ्या बाजूला नेटवर्कवरही दळणावळणाचा वेग नि बॅन्डविड्थ वाढून अ‍ॅपसाठींचा डेटा सहजासहजी उतरवणं-चढवणं शक्य झालं. आणि तिसरी बाजू : डेटाचे दर ग्राहकाला परवडण्यासारखे होऊ लागले होते. तेव्हापासून स्मार्टफोनची लाट आली ती अजून भरातच आहे. 

मोबाइल हाताळयंत्राच्या उत्क्रांतीतले उल्लेखनीय टप्पे  (सगळी चित्र-माहितीची पीडीएफ ह्या दुव्यावर पाहू शकता.)
मोबाइल हाताळयंत्राच्या उत्क्रांतीतले उल्लेखनीय टप्पे 
(सगळी चित्र-माहितीची पीडीएफ ह्या दुव्यावर पाहू शकता.)

आपण कुणाशी मोबाइल वापरून बोलतो तेव्हा ते नेमकं कसं साधलं जातं हे समजून घेण्याआधी त्यातला 'भ्रमणा'संबंधीचा तांत्रिक भाग समजून घेऊ. 

 

मोबाइल वापरण्यासाठीच्या पायऱ्या  

 

१. पडताळणी (Authentication) : तुमच्या फोनची, खरं म्हणजे सिम कार्डाची नेटवर्कवर पडताळणी केली जाते. म्हणजे तुम्ही ज्या टेलिकॉम कंपनीचे गिऱ्हाईक असाल (होम-नेटवर्क) तिच्या मूळ जालठिकाणा हुडकण्याच्या यंत्रणेनं (HLR : Home Location Register) तुम्हाला आपलं म्हणायला हवं. ह्या पडताळणीसाठी तुम्ही कुठेही असलात, तरी कायम तुमच्या होम-नेटवर्कशीच संपर्क होतो. तुमचा फोन जर चोरीचा असेल, तर IMEIतर्फे केलेल्या सिम कार्डाच्या पडताळणीत तुम्ही नापास होता. किंवा तुम्ही तुमचे पडताळणीचे तपशील (KYC : Know Your Client) अद्ययावत ठेवले नसतील, तरीही पडताळणीत तुमची विकेट उडते.

 

२. नोंदणी (Registration) : तुम्ही ज्या ठिकाणी असाल (व्हिजिटेड नेटवर्क) तिथला मनोरा आणि तात्पुरता ठावठिकाणा हुडकणारी यंत्रणा (VLR : Visited Location Register, जे MSCशी संलग्न असतं) तुमच्या होम-नेटवर्कच्या HLRशी बोलून तुमची ठिकाणनोंद जमा करून ठेवतो. तुम्ही फिरतीची सेवा (Roaming) वापरत असाल, तर मनोरा आणि रेडिओ नेटवर्क कुठल्याही दुसऱ्या चालकाचं असू शकतं. ह्या ठिकाणनोंदीमध्ये तुमचा फोन क्रमांक असतो पण इतर कुठलीही वैयक्तिक माहिती (नाव, वय, पॅन/आधार क्रमांक) नसते. माहिती असते ती फक्त फोनवापराशी संबंधित, म्हणजे स्थानिक कॉल, आंतरराष्ट्रीय कॉल, डेटा वापर, SMS इत्यादी सेवा वापरण्यातली मुभा, आणि डेटा उतरवण्या-चढवण्याची वेगमर्यादा, इत्यादी तुम्ही आहात तिथेच थांबलात, तर ही ठिकाणनोंद दर थोड्या तासांनी पुन्हा अद्ययावत केली जाते. थोडक्यात, तू जहाँ जहाँ चलेगा... साथ होगा तिथला मनोरा, तुमची पडताळणी, आणि नोंदणी. 

 

३. वापर : आता जमा झालेल्या ठिकाणनोंदीनुसार परवानगी असलेली कुठलीही सेवा तुम्ही वापरू शकता. तुम्ही जर 'पोस्टपेड' ग्राहक असाल, तर सेवा वापरताना तत्क्षणी सेवामूल्य आकारणी होणार नाही; पण तुम्ही वापरलेल्या सेवेची सगळी माहिती (कॉल कुणाला किती वेळ केला, डेटावापर किती, किती माहिती उतरवली-चढवली वगैरे) नोंदली जाते. काही तासांनी वा दिवसांनी ह्या नोंदी एकत्र करून तुमच्या टेलिकॉम चालकाला पाठवल्या जातात. त्यानुसार ते चालक तुमच्यासाठीची आकारणी तयार करतात. जर तुम्ही 'प्रीपेड' ग्राहक असाल तर मात्र जसजशी सेवा तुम्ही वापरत जाता तसतशी तुमच्या चालकाकडे असलेली शिल्लक तत्क्षणी कमी होत जाते. शिल्लक संपली, तर रीचार्ज करेपर्यंत पडताळणी-नोंदणी होते, पण वापराच्या वेळेस तुम्हाला ज्या सेवेसाठी पैसे लागतात ती सेवा मिळत नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल, की तुम्ही फिरतीची सेवा वापरत नसताना येणारे कॉल आणि SMS ह्या सेवा निःशुल्क असल्यानं चालू राहतात पण केलेले कॉल, SMS, आणि डेटा सेवा बंद होतात. 

 

आता एखादा कॉल कसा जोडला जातो, SMS कसा पाठवला जातो, आणि फोनवर इंटरनेट वापरणं शक्य कसं होतं हे आपण थोडक्यात पाहू.

 

१. मोबाइल क्रमांक वापरून वापरून केलेला कॉल : तुमची आधीच नोंदणी झालेली आहे आणि तुमच्या ठिकाणनोंदीनुसार तुम्हाला कॉल करण्याची मुभा आहे. आता ह्या कॉलसाठी हॅन्डसेट आणि जवळचा रेडिओ मनोरा ह्यांत दोन समांतर जोडण्या व्हाव्या लागतात. एक संदेशांसाठी (Signaling) आणि एक आवाज वाहून नेण्यासाठी (Media). दोन जोडण्या का? तर आवाज वाहून नेणाऱ्या जोडणीला अधिक बॅन्डविड्थ लागते, तर संदेशांच्या जोडणीला कमी. ह्यांची नेटवर्क वेगवेगळी ठेवली, की गरजेनुसार दोघांची क्षमता हवी तशी वाढवता किंवा कमी करता येते, दुरुस्ती सोपी होते वगैरे. कॉल करण्यापूर्वी तुमचा फोन कुठलीच रेडिओ वाहिनी वापरत नाही. एखाद्या मनोऱ्याकडे नोंदलेले सगळे ग्राहक एकाच वेळेस कॉल करत किंवा घेत नसल्यामुळे ग्राहकाला गरज पडेल तेव्हाच वाहिनी वापरात येते. अशा प्रकारे कमी वाहिन्या वापरून एकाच वेळी अनेक ग्राहकांना सेवा देता येते. 

 

आता कॉल करताना संदेशवाहिनी मिळाली, की फोनचा संदेश मनोऱ्यापर्यंत (BTS) जातो. तिथून BSC आणि मग पुढे MSCकडे. MSCमध्ये ह्या संदेशावर बरंच काम होतं. उदाहरणार्थ, लावलेला क्रमांक कुठला आहे – आपल्याच नेटवर्कच्या दुसऱ्या ग्राहकाचा की एखाद्या दुसऱ्या नेटवर्कच्या ग्राहकाचा की लँडलाइन? स्थानिक की आंतरराष्ट्रीय? की एखादा विशेष क्रमांक (पोलीस १००, अग्निशमन दल १०१, वगैरे)? ह्या लावलेल्या आकड्यांच्या पृथक्करणातून MSC हे कॉल पुढे कुठच्या मार्गाला लावायचे ते ठरवतो (Routing). ह्यात अर्थात वेगवेगळ्या जोडण्या MSCशी आधीच असतात आणि कॉल पुढे कुठे पाठवावा ह्यानुसार ह्यांपैकी एका जोडणीवर पुढचे संदेश पाठवले जातात. वेगवेगळ्या चालकांची जाळी एकमेकांशी IPX (IP Packet Exchanges) प्रक्रियेनी जोडलेली असतात. 

 

कॉल प्रीपेड असेल, तर MSCमध्येच प्रीपेड आकारणीच्या यंत्रणेशी अजून एक जोडणी होते. कॉल घेणाराही मोबाइलवर असेल तर हा 'मोबाइल ते मोबाइल' असा कॉल मानला जातो. तो ग्राहक सध्या ज्या MSCच्या प्रभावक्षेत्रात असेल तिथे तो पोहोचेल. मग त्या ग्राहकाला शोधणं आलं. त्याकरता तो MSC – Paging Request ही एक प्रकारची नेटवर्कवरची हाक मारतो. त्या हाकेला ओ मिळाला की कॉल जोडला जातो आणि जोडलेल्या टोकाशी मोबाइल वाजू / थरथरू लागतो. हे सगळं होईपर्यंत ह्याच्या समांतर mediaसाठी जोडणीसुद्धा पूर्ण होत आलेली असते आणि समोरच्या व्यक्तीनं कॉल घेतला, की अखेरीस दोघांना एकमेकांचा आवाज ऐकू येतो! कुणी एकानं कॉल संपवला, की पुन्हा संदेशांची देवाणघेवाण होऊन त्या कॉलसाठी वापरलेल्या सगळ्या वाहिन्या आणि मार्ग इतर कॉलच्या वापरासाठी खुले केले जातात. 

 

२. लघुसंदेश सेवा : आधी म्हटल्याप्रमाणे SMS सेवा फक्त संदेशवाहिनी वापरून दिली जाते. तुम्ही तुमच्या फोनवर जास्तीत जास्त १६० अक्षरांचा संदेश टंकून पाठवून द्यायचा. ही सेवा 'साठवा आणि पाठवा' ह्या तत्त्वावर चालते. का? तर तुम्ही ज्या क्षणी संदेश पाठवला त्या क्षणी समोरची व्यक्ती मनोऱ्याच्या प्रभावक्षेत्राबाहेर असू शकते किंवा तिच्या हँडसेटची SMS स्वीकारण्याची क्षमता संपलेली असू शकते. त्यामुळे तुमचे चालक तुमचा संदेश तात्पुरता सांभाळून ठेवतात आणि एका कालावधीपर्यंत तो पुन्हा पुन्हा अपेक्षित ग्राहकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात.

 

३. डेटा किंवा इंटरनेट : २.५जी / ३जीपासून खऱ्या अर्थानं मोबाइलला आंतरजालाचं विश्व खुलं झालं. तेव्हा कॉल नि SMSसाठी एक नेटवर्क तर आंतरजालासाठी दुसरं, सर्वस्वी वेगळं नेटवर्क होतं. ४जीमध्ये VoLTE (Voice over LTE) आल्यापासून कॉल आणि SMSसुद्धा सगळे डेटा नेटवर्कवरच आले. ४जीपासून डेटावापर 'कायम चालू' स्थितीत असतं. आंतरजालापर्यंत पोहोचायचं असेल तर तुमच्या हँडसेटला एक IP Address मिळायला हवा. हा देण्याचं काम चालकाच्या नेटवर्कमधील संगणक करतो. ह्या संगणकाशी एकदा जोडणी झाली, की आंतरजालाचे सगळे प्रोटोकॉल हँडसेटवरील सगळ्या ॲप वापरू शकतात. शिवाय तुम्ही जिथे जाल तिथे इंटरनेट मिळत राहतं - एवढंच नाही तर तुम्ही जे काम करत असता ते अखंडित चालू ठेवू शकता! पूर्वी राजेरजवाडे चालताना जसजसे डुलत पुढं जायचे, तसतसे त्यांचे सेवक लगबगीनं मखमली पायघड्या घालत, पुष्पवृष्टी करत त्यांच्या पुढ्यात पळायचे, तसं नेटवर्क आपण एका संपर्कक्षेत्रातून दुसरीकडे जाण्याआधीच आपला डेटावापर नवीन ठिकाणी जोडतं आणि संभाषण तिकडं वळवतं. म्हणून आपलं कॉलवर बोलणं वा YouTube पाहणं अव्याहत राहतं. 

 

ह्या टेलिकॉमचा आजवरचा अद्भुत प्रवास आपण पाहिला. ह्यातून साहजिकच ठाकणारा प्रश्न : ह्या सर्वव्यापी मायाजालात इथून पुढे काय काय वाढून ठेवलंय? 

 

अंगाखांद्यावर खेळवता येतील, परिधान करता येतील असे स्मार्ट डिव्हाइस आपल्या आयुष्यात येत आहेत : स्मार्ट चश्मा, स्मार्ट घड्याळ, स्मार्ट ग्लुकोमीटर, स्मार्ट हार्टबीटमीटर ह्यांसारखी वैद्यकीय उपकरणं. आपली घरगुती बहुतेक यंत्रं नि उपकरणं स्मार्ट होतील – दिवे, वातानुकूलन यंत्र, धुलाई यंत्र, दरवाजे – एकमेकांशी आणि आपल्याशी संवाद साधतील. हे सगळं मोबाइल नेटवर्कशीच जोडलेलं असेल. त्यापुढे जाऊन मोबाइल आणि स्मार्ट डिव्हाइसवर असेल आभासी सत्य (Virtual Reality) आणि संवर्धित सत्य (Augmented Reality) : तिथं तुम्ही तुमची खरी ओळख पुसून अगदी वेगळं आयुष्य वेगळ्या व्यक्तिमत्त्वामार्फत जगू शकाल! दृष्टी आणि श्रुती ह्यांबरोबरच, स्पर्श, गंध, आणि चवीचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचावेत ह्यावर संशोधन होतंय! आणि मुख्य म्हणजे हे सारं अविश्वसनीय झपाट्यानं घडतंय. आपण आज स्वस्थ राहिलो, तर उद्या जुने होऊन जाऊ इतक्या वेगात!

 

स्वस्थ बसे तोचि फसे, नव भूमी दावीन मी 

या नगराला लागूनीया, सुंदर ती दुसरी दुनिया 

 

.. मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा 

 

भा. रा. तांब्यांना आधीच दिसलं असेल का हे सारं?

 

पण ह्या नाण्याची दुसरी बाजू काय आहे? ह्या मायाजालात आपण इतके फसत चाललोय, की सत्य आणि आभास ह्यातली सीमारेषाच धूसर होतेय. फसवणुकीच्या अनंत तऱ्हा : व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंका, खोटे निरोप, डिजिटल अरेस्ट, असली वाटाव्यात अशा नकली चित्रफिती, ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजातले पण खोटे फोन हे सारं आपण अनुभवतो आहोत. त्याहून भयंकर म्हणजे प्रत्येकापर्यंत खरी, सगळ्या बाजू दाखवणारी माहिती पोहोचण्याऐवजी त्या व्यक्तीला आवडेल अशीच माहिती – जरी ती खोटी असली तरी – पोहोचतेय. कित्येक देशांतल्या निवडणूक प्रक्रियांत ही कळीची बाब ढवळाढवळ करतेय. माणसं मोकळी, सहनशील, मोठ्या मनाची होण्याऐवजी कोती, घाबरलेली, एकटी, वैषम्य बाळगणारी, झुंडीत सुरक्षितता शोधणारी बनत आहेत.

 

नेमकं जेव्हा 'चरैवेति'च्या मार्गावर चालण्याची नितांत गरज आहे तेव्हाच पुन्हा आपण घराला बांधले जातोय. आपण पुढे किती इतर माणसांशी बोलू आणि किती संगणकांशी हे सांगणं कठीण आहे! सगळेच अनुभव आपल्यापर्यंत आले आणि फक्त हवे तेच अनुभव निवडता यायला लागले, की कशाला हवाय दुसऱ्या कुणा माणसाशी वा सजीव प्राण्याशी संवाद? त्या अर्थानं चिंतनासाठी एकान्त निवडणारे साधक आणि स्वसुखासाठी एकलकोंडे झालेले ग्राहक ह्यांत काही फरक असेल का? की दोन्ही मोक्षपद प्राप्त करायचे मार्ग असतील?

 

स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे

स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे

स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा.. 

 

असो. इति अलम्. 

 

 

 

टीप १ : ह्या माहितीपर लेखात वापरलेली मोबाइल हँडसेटची चित्रं आंतरजालावरल्या संबंधित अनेक पानांवरून उतरवून घेऊन त्यांवर संस्करण करून निखळ प्रबोधनासाठी वापरली आहेत. सगळ्या मूळ चित्रांचे प्रताधिकार व श्रेय त्या स्रोतांकडेच आहे. लेखक त्यातून कोणताही आर्थिक लाभ इच्छित नाही. काही छायाचित्रांसाठी आणि संबंधित माहितीच्या संकलनासाठी मुख्यत: वापरलेले संदर्भदुवे पुढीलप्रमाणे : 

 

१. https://www.mobilephonemuseum.com/

२. https://www.tigermobiles.com/evolution/ 

३. https://www.gsmarena.com/

४. https://www.mobilephonehistory.co.uk/

५. https://prc.chapters.comsoc.org/2019/04/01/5g-evolution-wireless-commun…

६. विकीपीडिया

 

टीप २ : 

लेखकाची ओळख : 

लेखक शिक्षणानं संगणक अभियंता असून त्यांच्याकडे आजवर ४ टेलिकॉम-सॅाफ्टवेअर कंपन्यांत सॅाफ्टवेअर आरेखन आणि विकसन, अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि नेतृत्व अशा कामांचा २६ वर्षांचा अनुभव आहे.

 

'अमुक' ह्यांनी लेखाच्या मसुद्यात काही ठिकाणी भर घालत त्याला एकूण ओघ आणि आकार दिला आहे. लेखातली चित्रं त्यांनी लेखकाच्या सहमतीने, अनेक जालीय स्रोतांच्या संदर्भांनी तयार केली आहेत.

 

'न'वी बाजू Sun, 19/10/2025 - 23:33

लेख (अद्याप जरी संपूर्ण वाचला नसला, तरी) अत्यंत माहितीपूर्ण (किंबहुना, माहितीने संपृक्त) असून, अतिशय उत्तम वठला आहे. (दिवाळी अंकाचे सार्थक झाले!)

बाकी, लेखात आतापावेतो जे वाचले, त्या अनुषंगाने काही शंका, निरीक्षणे, तथा टिप्पण्या आहेत. त्या जशा जमतील तशा एकएक करून यथावकाश मांडत जाईन. तूर्तास ही केवळ पोच.