Skip to main content

पवड्या आणि पतुकाकू - प्रसाद कुमठेकर


पवड्यानं पतुकाकूला म्हटलं "तुझ्या डोक्यात धोंडा घालीन" आणि पठ्ठ्यानं खरंच तिच्या डोक्यात धोंडा घातलासुद्धा. हो! 

रक्तबंबाळ लालमलाल साडीत पतुकाकू, शंकरअण्णा आणि पवड्याबरोबर दवाखाना करायला उदगीरला आली होती. मी वाड्यासमोरच्या नालीवर चड्डी डोक्याला लावून शौचकर्म करायला बसलो होतो. तेव्हा हे तिघं डोळ्यासमोरून घरात गेले. पवड्यानं मला पाहिलं. आणि लगेच पतुकाकुचा हात सोडला. खांद्याचं जानवं कानाला आणि कमरेची चड्डी डोक्याला लावली. आणि बसला माझ्या बाजूला कुंथत. 

पवड्या पतुकाकू

इतक्यात फद्दकन काहीतरी 'जडशीळ' पडल्याचा आवाज आला. आम्ही दोघांनी पटदिशी अबाउट टर्न केला. पवड्याची पकानी 'गोटी' नालीत पडली होती. डुकरांनी आजूबाजूची साफसफाई लगेच केली असली तरी शेवटी नाली ती नालीच नं! 

पण पवड्याला असल्या गोष्टींनी फरक पडतच नाही. मी "नको, अबे अबे नको" म्हणेपर्यंत त्यानं फच्चकन गट्टरघाणीत हात घातला. त्याची फेवरेट पकानी गोटी बाहेर काढली. माझ्या समोरचा टमरेल उचलून स्वतःचा हात आणि गोटी मातीत घुसळून धुतलीसुद्धा. 

'मी माझी धुणार कशी?' या विचारानं मी रडकुंडीला आलो. तर म्हणाला, 

"आशुदादा टमरेलमधलं अर्धंच पाणी घेतलंय. माझ्या माझ्या हिश्श्याचं." 

आणि डोक्यावरची चड्डी काढून कमरेवर चढवलीसुद्धा. ढुंगणाला पाणी न लावताच. 'शिव शिव शिव!' मी फक्त 'आ' वासून बघत होतो. तर मलाच म्हणाला 

"माझी खरकटी नव्हती बे. पण तुझी वाळतीय बघ!"

मी मुकाट टमरेल हातात घेतला. उरलेलं पाणी निगुतीनं वापरून स्वच्छ धुतली. तर हा वरून सांगत होता, 

"आशुदादा थोडं पाणी उरव. आपण भूत्त्या भूत करू" 

पवड्या असाच आहे. गोपूकाका म्हणतो तशी गॉन केस. पूजेतला शाळीग्राम. 

हात-पाय धुताधुता एकमेकांवर खूळ खूळ चुळा भरून झाल्यावर घरात गेलो. तेव्हा आई सुरूच झाली, 

"पवड्या घुबडा माणूस आहेस का कोण आहेस रे तू? जिनं जीव दिला तिचाच जीव घ्यायला निघालास तू?" 

"तुला भाड्या मानशी पाच पाच लाथा घालायला पाहिजेत!" आईबरोबर बाबांनीसुद्धा शर्टाच्या बाह्या फोल्ड करताकरता पुस्ती जोडली. 

पतुकाकूच्या डोक्यात मोठीच्या मोठी भेगच दिसत होती. डोक्यात भरलेल्या हळदीचं लालभडक कुंकू झालं होतं. ते बघून आईचे डोळे वल्लेकच्च झाले होते. पवड्याला स्वच्छ धुवून काढण्यासाठी गोपूकाकाचे हात शिवशिवत होते. पण कुणीच पवड्याला टचसुद्धा केलं नाही. कारण एकच पतुकाकूची 'वेडी माया.' 

मी पाहिलं. पतुकाकूनं साडी बदलून आईची घातली होती. आईनं ओल्या कपड्यानं तिचं तोंड पुसून घेतलं होतं. पतुकाकुचं तोंड धोधारल्यासारखं दिसत होतं. बघूनच माझा जीव तळमळला. मी पवड्याकडे पाहिलं तर तो पतुकाकूला त्याची पकानी गोटी दाखवत होता आणि तीसुद्धा कौतुकाने बघत होती. 

"शंकरनी रिक्षा आणला असंल चल लवकर," बाबांनी घड्याळ बघत म्हटलं. 

आणि तिघे जायला निघणार. एवढ्यात पतुकाकू म्हणाली,

"पऊ सकाळच्या ग्लासभर दुधावरच आहे हो." 

आईनं डोक्याला हात मारत गोपूकाकाला सांगितलं. 

"गोपूभावजी दुधपोहे द्या यांना. आल्यावर सैपाक करते." 

दुधपोह्याचं नाव ऐकून मला गुदगुल्याच झाल्या. पण काही म्हणालो नाही. पण पवड्या म्हणाला, 

"गोपूकाकाला सांग. साखरेत चेन्गुटी करू नको म्हणून." 

गोपूकाकाचे डोळे तांबारले. 

आणि पतुकाकू म्हणाली, 

"पऊ गोडघाशाय… चार-सहा चमचे साखर घाला त्याच्या वाटीत." 

"काय म्हणावं या बाईला," म्हणत आईनं आधार देत देत तिला दरवाजापर्यत नेलं. तेवढ्यातसुद्धा पतुकाकू पवड्याकडे वळू वळू पाहत होती. अन हा गोटीबरोबर नेम नेम खेळत होता. मी गोपूकाकाकडे पाहिलं. तो माझ्याकडे बघत म्हणला, 

"या कडूला उगुच शाळीग्राम म्हणतनी मी.. कशाचं तरी काही वाटतंय का याला!" 

गोपूकाकाचंच नाही घरच्या दारच्या सगळ्यांचंच म्हणणं होतं की पवड्याला स्वतःपुढे कुणीच दिसत नाही. होतं पण तसंच. त्याला स्वतःच्या पलीकडं दुसरं काही पाहताच यायचं नाही. सदानकदा आपल्याच नादात असलेला येडापीर. 

पतुकाकूला आणायला उशीर लागला म्हणून मी आणि पवड्या दुपारी मुंगीकरांच्या दवाखाण्यात गेलो. पतुकाकूची ड्रेसिंग झाली होती. तिच्या डोक्याला बांधलेली जाड पट्टी, तिचं ते गोबाडं झालेलं तोंड बघून कसंसंच वाटत होतं पण पवड्या… 

तो पतुकाकूला औषध म्हणून दिलेल्या 'शाबुदाण्याच्या गोळ्या' खायला मागत होता. पतुकाकू त्याला सांगत होती, 

"पऊ मुंगीकर डॉक्टर कडूकडू औषधं देतेत रे… शाबुदाण्याच्या गोड गोळ्या नाही."

तर तिला 'तू असल्या दवाखाण्यात आलीसच का' म्हणून चिमट्या काढायला लागला. माझ्या आईनं लगेच त्याचा कान धरत, 

'ए घुबडा, आईला चिमट्या काढलास तर डॉक्टरांना दाखवीन'ची धमकी दिली. तर घाबरून गप होण्याऐवजी - 

"काकूय मला दाखव नं गं डॉक्टरला," म्हणून रडत बोंबलत जमिनीवर लोळी लोळी केली. मी असं केलं असतं तर माझ्या आईनं मला कुटलाच असता. पण पतुकाकूचं तसं नव्हतं. ती पवड्याला 'पऊ रडू नये माय! कायय ते नीट सांगावं.' असं समजवायला लागली. आईला त्याचा भयंकर राग येत होता. ती पवड्याकडं खाऊ का गिळू नजरेनं बघत होती. तिचे हात पवड्याच्या पाठीवर 'धा तीन धा धा' करायला शिवशिवत असणार, पण तिला पक्कं माहीत होतं पवड्याला एक धपाटा जरी घातला असता तर पतुकाकूनं तापच काढून घेतला असता. गोपूकाका म्हणतोय तसं ती म्हणजे टोटलमधी 'येड्या आईची येडी गं मायाच' होती. शेवटी बाबांनी पऊला 'चल डॉक्टरला दाखवू' म्हणत बाहेर नेलं. मेडिकलमधून विक्सच्या, जेलुसिलच्या गोळ्या घेऊन दिल्या तवा पठठ्या आवरला सगळ्यांना. 

घरी येताना त्याला रिक्षातच बसायचं होतं. शेवटी बाबा रिक्षातून उतरले. आणि आई, पतुकाकू आणि पवड्या तिघंच रिक्षातून घरी आले. मला त्या रिक्षाच्या मागे पळताना वाटत होतं 'साला पवड्यासारखं वागायला आलं पाहिजे. फायदा होतो.' रिक्षात बसून विक्सच्या गोळ्या खात 'मामा मला घंटी वाजवू द्या' म्हणत रिक्षाची घंटी वाजवत पवड्या एन्जॉयमध्येच घरी येत होता. आणि सुजून गाडगं झालेल्या मुखाने पतुकाकू पवड्याकडे लोभाने बघत होती. त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत होती. आणि माझी आई मला वसकत म्हणत होती, 

"आशा पळता पळता पडलास तर कुटीन आं मी तुला!" 

मी पळायचा थांबलो. रिक्षातून जाणाऱ्या पप्प्याचा 'टाटा' दिसेपर्यत बघत चालत चालत घरी आलो. 

घरी सगळा वाडा आमच्या वसरीवर जमला होता. आई पतुकाकूला डोक्याच्या शिरा ताणू ताणू सांगत होती,

"तुझ्या अशा येड्या लाडानं डोक्यावर बसलंय हे पोरगं… भाड्यामुळं बारा टाके पडलेत तुला बारा!" आणि पवड्या एक हात साखरेच्या डब्यात आणि दुसरा पोह्याच्या वाटीत घालून चारचा नाष्टा करत होता. मला पाहिलं तसं खुशावत म्हणाला, 

"आशुदादा ये दुधपोहे खावू." 

मी द्रुतगतीनं हातपाय धुवत त्या पोह्याच्या वाटीजवळ पोहोचलो. आई पतुकाकूला लगेच सांगू लागली, 

"बघ माझं पोरगं… हात पाय धुवूनच घरात आलं… आईनं शिस्त लावली पाहिजे पोरांना." 

पतुकाकूनं मन लावून मुंडी हलवली. माझ्याकडे कौतुकानं पाहिलं. मी उगीच संस्कारी बाळाचा चेहरा करत पवड्याच्या वाटीतले पोहे खावू लागलो. पवड्या मला विचारत होता, 

"आशुदादा शर्टाच्या बटनाला टाके घालतेत तशेच डोक्याला टाके घालतेत का रे?" 

मी पक्कं माहीत नसतानासुद्धा होची मान हलवली. 

"मग त्यासाठी दवाखाण्यात जायची काय गरज होती. काकूनं टाकलं असतं की घरीच." 

"दवाखाण्यातला सुईदोरा वेगळा असतोय," मी त्याला अंदाजपंचेच पण कॉन्फिडेन्सनं सांगितलं. तसा तो पोह्याची वाटी माझ्याकडे सोपवून पतुकाकूकडे गेला, 

"आई मला तुझे टाके दाखीव… किती पडलेत मोजून बघू दे" म्हणून हट्ट करायला लागला. 

बाबा, गोपूकाका, अगदी आईसुद्धा त्याला समजावत होते की ड्रेसिंग केलंय, औषध लावलंय, आता पट्ट्या उघडून ते दाखवता येणार नाही. पण ऐकेल तो पवड्या कसला? त्यानं बेंबटत बेंबटत वसरीवर 'मला टाके बघायचेत' म्हणून रिंगण घालायला सुरुवात केली. आता सगळ्यांचा धीर सुटायला लागला. समजावणीचा स्वर धमकीकडे सरकायला लागला. वातावरण टाईट झालेलं पण असल्या गोष्टीनं फरक पडेल तो 'पवड्या कसला'. 

तो सरळ पतुकाकूसमोर थांबला. आणि म्हणाला, 

"आई, तू पट्ट्या उघड मला टाके बघायचेत."

प्रसंग बाका होता. ती अजिजीनं म्हणाली, 

"पऊ दोन दिवसांनी ड्रेसिंग बदलायला नेणार आहेत तेव्हा बघ." 

तिचं समजावणं सुरुच होतं. इतक्यात आई तिरमिरीत समोर आली. तिनं फटाफट पवड्याच्या मुस्काटात दोनतीन दिल्या. चापट्यांचा आवाज सगळ्या वसरीनं घुमला. आता पवड्या रडूरडू सगळा वाडा डोक्यावर घेणार असंच चित्र दिसत होतं. पण पवड्यानं रडू दाबलं. डोळ्यातलं पाणी, गळ्यातला आवंढा आतल्या आत थांबवला. आणि पुन्हा पतुकाकूसमोर जावून म्हणाला, 

"आई, मला टाके बघायचेत." 

आई पुन्हा तिरमिरीत त्याच्याकडे गेली. गोपूकाकाचंपण सुरू झालं –

"या नालायकाला मानशी पाच पाच लाथा घालायला पाहिजेत!" 

आता पवड्याला हाग्या मार बसणार हे कन्फर्म झालं होतं. 

पण पतुकाकू...

तिनं काका, आईसमोर हातच जोडले. डोळ्यात डबडबून पाणी. आई काका जागच्या जागी थांबले. मग ती पवड्याकडे वळली, नेहमीपेक्षा वरच्या पट्टीतच त्याला म्हणली –

"दोन दिवस थांब की रे… ड्रेसिंग बदलणारच आहेत." 

पवड्या फक्त डोळे फाडून बघत होता. जागच्या जागी थरथरत होता. त्याच्या डोळ्यातलं पाणी आणि कंठातला आवाज 'इश्टॉप' म्हणल्यासारखा जागच्या जागी थांबला. पवड्या एकदम 'गुड बुवाय!' सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. आई, काका हुशारले. फुशारले. पतुकाकूला सांगू लागले. बरं केलंस तू. थोडा कंट्रोल ठेवलाच पाहिजे पोरांवर. असला येडा लाड काही कामाचा नाही. वगैरे वगैरे. आता सगळेच बोलत होते. आईच्या रागानं आता टिंगलीची जागा घेतली होती. या सगळ्या हसनीखुसनीत फक्त तीन माणसं गप्प होती. पतुकाकू, पवड्या आणि त्यांना बघणारा मी. धपानधुपीच्या खेळात रप्पदिशी चेंडू पाठीवर बसतो आणि हुक भरते अगदी तसा दिसत होता पवड्या. काही वेळ तसाच गेला. आई सैपाकाच्या तयारीला लागली. पवड्या आणि पतुकाकू एकमेकांसमोर बसून होते. कुणी काही बोलत नव्हतं. शेवटी तिनंच त्याला 'पऊमाय'ची हाक मारली. जवळ बोलावलं. तो आला नाही. खाली मान घालून बसला. शेवटी तीच उठली त्याच्याजवळ गेली. माय-लेकरात काय बोलणं झालं माहीत नाही. तिने त्याला पोटाला धरलं. मग त्याच्याच आधारानं उठली. ढाळजंत ट्युशनच्या पोरांना गणित शिकवत बसलेल्या बाबांना हळूच हाक मारली. बाबा आले. दोघं काय बोलले माहीत नाही. पण मग त्यांनी ट्युशनच्या पोरांना सुट्टी दिली. बाहेर गेले. रिक्षा घेऊन आले. मी जवळ थांबून सगळं बघण्यावरच होतो. ते तिघं रिक्षात बसले. पतुकाकूनं मला पण बोलावलं. मी सुद्धा रिक्षात बसलो. रिक्षा मुंगीकरांच्या बंद दवाखाण्याजवळ थांबली. बाबांनी त्यांना घरी जावून बोलावून आणलं. ते रागारागातच आले. त्यांनी हलक्या हातांनी पतुकाकूचं ड्रेसिंग उकललं. कापसाखाली झाकलेलं अगदी एमरॉडरी केल्यासारखे ते बारा टाके पवड्या आणि मी डोळे फाडून बघत होतो. 

पतुकाकूनंच विचारलं "हे दोरे कसले असतात हो?"

"वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कॅटगट, व्हीक्रील, मोनोक्रिल, पी.डी.एस… तुला वापरलाय तो पॉलीप्रॉपीलीन, नॉन अब्सॉर्बेल दोराय. आठवड्याभरानं जखम भरलीय का बघून काढू." 

पवड्या काही न बोलता पतुकाकूचे टाके बघत होता. आतासुद्धा त्याच्या छातीत हुक भरलीय असंच वाटत होतं. डॉक्टरांनी पुन्हा ड्रेसिंग बांधलं. आम्ही दवाखाण्याबाहेर आलो. रिक्षात बसलो. पवड्या पतुकाकूच्या पोटात शिरून मुसमुसत होता. पतुकाकू त्याला 'पऊमाय! पऊमाय!' म्हणून थापटत होती. 

घरी आलो. दारात गोपूकाका उभाच होता. तो आईला हाक मारीत म्हणला, 

"वैनी येडी माय अन तिचा नर्मदेतला गोटा शाळीग्राम आले हो!" 

सगळा वाडा पवड्या आणि पतुकाकूकडे विचित्र टिंगलीच्या नजरेनं पाहत होता. 

पतुकाकू आणि पवड्याला त्याच्यानं झिरो फरक पडत होता. ते आपल्याच धुनकीत एकमेकांचा हात धरून ढाळज वलांडत होते. मध्येच 'ए नर्मदेतला गोटा शाळीग्राम' म्हणत गोपूकाकाने पवड्याला टपली मारली. तेव्हा बाबा म्हणाले, 

"गोप्या दीडशहान्या नर्मदेत मिळतोय तो बाणलिंग. शाळीग्राम नेपाळमधल्या काली गंडकी नदीत मिळतोय." 

"मग हा गंडकीनंदन तर." 

हा हा हु हु सुरू झालं. 

"पवड्या घुबडा तुझ्यामुळं सगळा सैपाक थंड झाला माझा," म्हणून आई रागवत होती. 

"प्रतिमे, एवढा लाड बरा नव्हे," म्हणून पतुकाकूला सांगत होती. 

आणि पतुकाकू 'होय हो! होय हो!' म्हणत, पवड्याकडे मायेनं बघत मान हलवत होती. 

आणि माझ्या नजरेसमोर ती गोंडेवाली रिक्षा येत होती जिच्यात बसून आम्ही दवाखाण्याला गेलो होतो. त्याच्या मागे लिहलं होतं, 

"आई तुझा आशीर्वाद" 

येडे आई की येडी ही माया. पवड्या आई के टाके देखके आया.

anant_yaatree Fri, 24/10/2025 - 15:42

लहानपणी दिवाळीच्या सुट्टीत पुण्यातल्या शनिवारपेठेत एका वाड्यात राहणाऱ्या मावशीकडे गेलो होतो तेव्हा तिचा अशक्य वांड असलेला मुलगा व त्याच्या बाललीलांवर सतत मायेचं पांघरूण घालणारी मावशी बघून हैराण झालो होतो ते आठवले .

चिमणराव Fri, 24/10/2025 - 17:28

पात्रांची ओळख आणि वयं अगोदर दिली असती तर बरं झालं असतं. शिवाय गावचं चित्रंही डोळ्यासमोर येत नाहीये. रिक्षाचा उल्लेख आहे म्हणजे नव्वदच्या दशकानंतरचा काळ असावा.

'न'वी बाजू Fri, 24/10/2025 - 18:37

In reply to by चिमणराव

रिक्षाचा उल्लेख आहे म्हणजे नव्वदच्या दशकानंतरचा काळ असावा.

माझ्या लहानपणापासून पुण्यात रिक्षा आहेत. (कदाचित त्याहीअगोदरपासून असतील. (चूभूद्याघ्या.))

माझा जन्म १९६६चा. (पुण्यातला नव्हे. मुंबईतला. परंतु, त्यानंतर बहुधा जेमतेम वर्षभरातच आम्ही पुण्यास स्थलांतरित झालो असू. (पुन्हा, चूभूद्याघ्या.)) त्यानंतर, समजू लागून ‘रिक्षा आहेत’ अशी जाणीव येण्याइतपत अक्कल येईपर्यंत चारपाच वर्षे गेली, असे जरी मानले, तरीसुद्धा, १९७०-७१च्या सुमारास पुण्यात रिक्षा होत्या, एवढे निश्चित. (आधी म्हटल्याप्रमाणे, कदाचित त्याहीअगोदरपासून असू शकतील.)

(अतिरिक्त माहिती: तेव्हा (पुण्यातील) रिक्षाचे किमान भाडे ५० पैसे असल्याचे आठवते.)

(आणि, हो! ‘रिक्षा’ बोले तो, ऑटोरिक्षा. सायकलरिक्षा अथवा माणसाने ओढण्याच्या रिक्षा नव्हेत. तसली श्वापदे पुण्यात कधी पाहिल्याचे आठवत नाही.)

असो चालायचेच.

चिमणराव Sun, 26/10/2025 - 04:49

In reply to by 'न'वी बाजू

हं.

मी अगोदर सत्तरच्या दशकात लिहिले होते ते खोडून नव्वद केले. शहरांत रिक्षा असल्या तरी गावात पोहोचल्या नसाव्यात.

तिरशिंगराव Sun, 26/10/2025 - 20:04

In reply to by 'न'वी बाजू

मी पुण्यात १९६० सालापासुन रिक्षा बघितल्या आहेत आणि बसलोही आहे. त्या जुन्या रिक्षांत, फक्त पॅसेंजर्सच्या डोक्यावरच छत असायचं आणि रिक्षावाला पुढच्या उघड्या स्कुटर सदृश्य सीटवर बसुन रिक्षा चालवायचा. त्यानंतर काही वर्षांनी, पुढुन कांच असलेल्या, ड्रायव्हरलाही आंत सामावुन घेतलेल्या रिक्षा आल्या. त्यावेळी मला असं वाटायचं की, जुन्या रिक्षा म्हणजे साध्या रिक्षा. आणि पुढुन बंद असलेल्या ऑटोरिक्षा! पुढे इंग्रजी शिकल्यावर हा गैरसमज दूर झाला.

'न'वी बाजू Sat, 25/10/2025 - 07:58

आणि माझ्या नजरेसमोर ती गोंडेवाली रिक्षा येत होती जिच्यात बसून आम्ही दवाखाण्याला गेलो होतो. त्याच्या मागे लिहलं होतं, 

"आई तुझा आशीर्वाद"

रिक्षावाल्याने ही लाईन ट्रकवाल्यांकडून ढापली असावी. कारण, महाराष्ट्रातील ट्रकवाल्यांमध्ये ट्रकच्या मागे (“हॉर्न ओके प्लीज”बरोबरच, किंवा -ऐवजी) हे वाक्य लिहिण्याची परंपरा खूप जुनी आहे. (इतर प्रांतांच्या परंपरा वेगळ्या असाव्यात. हिंदी प्रांतांत “बुरी नजरवाले तेरा मू काला”. दिल्लीच्या बाजूस (शक्यतो रिक्षाच्या मागे, परंतु कधीकधी ट्रकमागेसुद्धा) “सोनू ते गुड्डू दे पप्पा दी गड्डी”. किंवा, असेच काहीतरी. वगैरे.)

असो. मुद्दा तो नव्हता. रिक्षावाल्याने ही लाईन ट्रकवाल्यांकडून ढापली ती ढापली, परंतु, ढापलेली लाईन निदान नीट लिहायला नको? तिथेसुद्धा शुद्धलेखनाच्या अक्षम्य चुका करायच्या, म्हणजे काय आहे हे!

(तो तिसरा शब्द “आर्शिवाद” असाच लिहिण्याची पद्धत आहे. परंपरा आहे. हजारो, लाखो ट्रकवाले ती इमानेइतबारे पाळतात. आणि, अशी परंपरा मोडलीत! कुठे फेडाल ही पापे? स्वतःला काय हजारो, लाखो ट्रकवाल्यांपेक्षा शहाणे समजता काय?)

असो चालायचेच. “मोदी है, तो (साला कुछ भी) मुमकिन है”, म्हणून सोडून द्यायचे, झाले.

कालाय तस्मै नमः।

'न'वी बाजू Sat, 25/10/2025 - 09:04

In reply to by पुंबा

खुदा गारद करे इन ट्रक के बनाने वालों को
जिन्हों ने घर से बेघर बना दिया ट्रक के चलाने वालों को

anant_yaatree Sat, 25/10/2025 - 09:48

In reply to by 'न'वी बाजू

'आई "तूझा" आर्शिवाद' हा पाठभेद नबांच्या काकदृष्टीतून सुटलाच कसा?

"बगतोस काय रागानं
वरटेक केलंय वाघानं"

'न'वी बाजू Sat, 25/10/2025 - 18:13

In reply to by anant_yaatree

वस्तुतः, (ट्रकलिपीतील) शुद्धलेखनाच्या नियमांनुसार, “तूझा” हे रूप अधिक “शुद्ध” आहे. (याला समर्थ रामदास साक्षी आहेत. (पाहा: “सदा सर्वदा योग तूझा घडावा”.) आणि, साक्षात समर्थांना वक्र पाहण्याची हिंमत निदान आपल्या तरी पार्श्वभागात नाही बुवा!) परंतु, “तुझा” हे रूप चालवून घेतले जाऊ शकते. (म्हणूनच: “पाठभेद”.)

परंतु, चालवून घेण्यालायक पाठभेद असल्यामुळेच त्यातून शुद्धलेखनाच्या नियमांचे कोठल्याही प्रकारे उल्लंघन होत नाही. त्यामुळे, दोन्ही विकल्पांचा उल्लेख करणे आवश्यक वाटले नाही.

“आर्शिवाद”चे तसे नाही. “आर्शिवाद” हेच बरोबर असून “आशीर्वाद” हे केवळ चूकच नव्हे, तर परंपरेच्या विरुद्ध (परंपराघातकी/परंपरालंड) आहे, म्हणून त्याचा निषेध करण्याचे प्रयोजन, इतकेच.

असो.


आयुष्यात कधीतरी असा काही शब्द बनवून तो एखाद्या सार्वजनिक मंचावर वाजवून पाहण्याची जुनी खुमखुमी होतीच, ती आज या निमित्ताने पुरी झाली. आता, यापुढे आयुष्यात आवर्जून इच्छा करण्यासारखे विशेष काही१अ उरले नाही.

१अ नाही म्हणायला, एकदा कधीतरी उंटाच्या१अ१ पाठीवर बसून सफ़र१अ२ करण्याची जबरदस्त तमन्ना आहे. (अशा इतरही अनेक बारक्यासारक्या इच्छा, शोधल्या, तर निश्चित सापडतील. त्या सर्व पुऱ्या झाल्याशिवाय आमच्या पिंडास शिवण्याची जुर्रत कोठलाही कावळा worth his name करणार नाही; काळजी नसावी.)

१अ१ नाही! गां*चा मुका नव्हे! लागले लगेच ‘त’वरून ताकभात-तपेले नि उंटावरून मुका ओळखायला!

१अ२ Suffer नव्हे. ते केवळ आनुषंगिक झाले. सफ़र बोले तो, यात्रा. प्रवास. गेला बाजार एखादी फेरी तरी.

'न'वी बाजू Sat, 25/10/2025 - 18:16

In reply to by anant_yaatree

नबांच्या काकदृष्टीतून

मला कावळा म्हटल्याबद्दल आभार, अभिनंदन, वाढदिवसाच्या शुभेच्छा, and all that good stuff.

'न'वी बाजू Sat, 25/10/2025 - 20:27

In reply to by anant_yaatree

मला कावळा म्हटल्याने कावळ्यांची बदनामी होते खरी. (खरे तर मला हे अगोदर लक्षात यायला पाहिजे होते, परंतु नाही आले खरे. Mea culpa. माय ब्याड!)

आणि, हो. या नव्या सेटअपमध्ये, मोठा फाँट कसा टाकायचा, याची मलाही कल्पना नाही. (किंबहुना, मीसुद्धा त्याच शोधात आहे.)

चिमणराव Sat, 01/11/2025 - 06:01

In reply to by 'न'वी बाजू

हो. इतर शेजारी संस्थळांनीही( मायबोली, मिसळपाव) बरेच एचटीएमेल टॅग्ज आणि सीएसएस इलिमेंट काढून टाकले आहेत/ वर्ज्य केलेत. Underline, strike, del, insert तरी ठेवायला हवेत. लेखन फार भडक न होता कामाचा मुद्दा पटवता येईल. h1.h2..h6 इत्यादी हेडर खरंच कामाचे आहेत का?

anant_yaatree Sat, 25/10/2025 - 10:08

ऐसीत (व त्यातही विशेषांकात)प्रकाशित झालेली असूनही कथा कळली व आवडली.
टवाळखोरी करण्यात हे प्रतिसादायचे राहून गेले होते.

'न'वी बाजू Sat, 25/10/2025 - 18:30

In reply to by anant_yaatree

इथे मात्र तुमच्याशी किञ्चित असहमती दर्शविणे मला प्राप्त आहे.

बोले तो, मला ही कथा कळली. (असे वाटते. चूभूद्याघ्या.) (आणि, हो! ‘ऐसी’त (नि त्यातही, विशेषांकात) प्रसिद्ध झालेली असूनसुद्धा!) मात्र, ‘कथा आवडली’, असे म्हणवत नाही. (निदान माझ्याच्याने तरी.)

अर्थात, ते महत्त्वाचे नाही. टवाळक्या करण्यासाठी (आणखी) एक जागा मिळाली, हा मुद्दा आहे.

असो चालायचेच.

तिरशिंगराव Sun, 26/10/2025 - 19:53

अश्या कार्ट्यांना लाडावुन ठेवणार्‍या आया बघितल्या की ' कळकीचं बाळ' आहे अगदी, असं आपसुक मनांत यायचं. मतकरींच्या कथेचा मनावर झालेला परिणाम होता तो!

पुंबा Sun, 26/10/2025 - 23:22

आमच्या मातोश्री कुणाच्या घरी जायच्या आधी दोन थोतरीत ठिउन द्यायच्या.. हा अ‍ॅडव्हान्स.. तिथे नखरे केलेत तर आल्यावर आणखी चार!

बाकी, अशी मुले आणि त्यांच्या मम्म्या दोघांचीही दया येते.