Skip to main content

अव्या, बाज्या आणि मी

१.अव्या
काळजात चांदणे घेऊन उन्हातानाची पर्वा न करता वाऱ्याबरोबर फिरण्याच्या वयात अविनाश म्हणजे अव्या माझ्या आयुष्यात आला. आला म्हणजे शब्दशः धाडकन दार आपटत घरात आला आणि जणू काही फारच घसटीची ओळख असल्याप्रमाणे म्हणाला, "चल, बाहेर चल."मी म्हटलं- कशाला तर म्हणे की "तुला काय करायचंय ? चल म्हणतो ना, मग चल! " मी कॉलेजचा अभ्यास, सबमिशन का असंच काहीतरी करत होतो म्हणून नाही म्हणून म्हटले ," कुठे जायचे ते सांग आधी , नाहीतर नाही येत." तर त्यावर ,"तू असाच मरणार, बस एकटाच घरात अंडी घालत " असे म्हणून फारसे मनावर न घेता आला तसा निघून गेला.

लहानपणापासून आमची फक्त तोंडओळखच होती. आम्ही राहत होतो एका वाड्यात आणि समोर एक बोळवजा छोटा रस्ता सोडून पलीकडे त्यांची दोन मजली दगडी इमारत होती. टीव्ही बघायला एखाद्या रविवारी एखादा तास वगैरे सोडला तर आमचं जास्त बोलणं चालणं होत नसेल, पण झालं काय की इंजिनिअरिंग कॉलेजला एकत्र आलो आणि त्यानिमित्ताने येणं जाणं सुरू झाल.आणि अगदी जुनी ओळख असल्यासारखं पहिल्यांदाच त्याच धाडकन घरी येणं, तू असाच मरणार हे मला म्हणून जाणं, यामुळे मला त्याच्याबद्दल काही वेगळेच आणि विशेष वाटून गेलं.म्हटलं कदाचित आपलं जुळणार !
एकुलता एक लाडाचा आणि सुदृढ बांध्याचा, स्टायलिश हेअर स्टाईल असलेला अव्या म्हणजे स्वतःचच खरं करणाऱ्यांपैकी एक होता.त्यामुळे माझ्या मनात थोडीशी साशंकताही होती.पण तो येत गेला. नित्यनेमाने. सकाळी आवरलं की आठच्या आत घरी येऊन चल बाहेर म्हणायला. हो नाही म्हणत मी कधी त्याच्याबरोबर फिरू लागलो हे मलाच समजलं नाही. फिरायचं म्हणजे काय तर सकाळी टू व्हीलर वरून जायचे आणि गावातल्या एकदोन देवळांचे दर्शन घेऊन यायचे नंतर एखाद्या मित्राकडे वगैरे इतपतच.

त्रिकोणी कुटुंबात लाडात वाढल्यामुळे असेल की काय, पण आव्याचे वागणे एककल्ली होते .त्याच्या आई-वडिलांना आम्ही काका काकू म्हणायचो. काका हे केवळ एक निमित्ताचे वडीलपण निभावयाचे, बाकी घरी कशातच हस्तक्षेप करत नसत.पण काकू म्हणजे एक सामर्थ्यशाली आणि सेल्फ मेड बाई होत्या.आणि त्यांच्या वाट्याला कोण जात नसे.त्याही कुणाचीच पर्वा करत नसत. अव्याच्या मित्रांपैकी फक्त मलाच घरात पूर्ण प्रवेश होता.घराच्या दारातच स्वयंपाकघर. मग येता जाता काकींकडून उलट तपासणी व्हायची. कधी गंभीर तर कधी हसत खेळत.मगच वरच्या मजल्यावरच्या बेडरूम कडे अव्याला भेटायला जायला मिळायचे. त्यांनी विचारलेल्या उलटतपासणीवजा प्रश्नांना मी कधी कधी गमतीने उडवा उडवीची उत्तरे द्यायचो. त्यावर त्या सगळ्यांच्या देखत ठसक्यात म्हणायच्या, "मला शिकवू नका, मी ढूंगणं धुतलीत तुमची !" पण असे म्हणायला समोरचा व्यक्ती अव्याच्या वयाच्या आसपास असला तरी त्यांना पुरे असायचे,मग त्याची तितकी ओळख असो वा नसो !

अव्याची रूम- म्हणजेच त्या सगळ्यांची बेडरूम -म्हणजे खजिनाच होता.त्यात लहानपणीच्या गोष्टींची पुस्तके -खेळणी इत्यादी जरी बासनात बांधून ठेवलेली असली तरी सध्याचा खजिना म्हणजे उत्तमोत्तम कॅसेट्स आणि टेप.

जसे आम्ही इंजिनिअरिंगच्या पुढच्या वर्षात गेलो तसे आम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मधल्या वेगवेगळ्या गोष्टी करायचा नाद लागला. "इलेक्ट्रॉनिक्स फॉर यू " नावाच्या मॅगझिनमध्ये बघून आम्ही घरच्या घरी डिस्को लाईट, चित्र विचित्र आवाज असणारी बेल, टाळी वाजवल्यावर चालू बंद होणारी लाईट (झोपताना केवळ लाईट बंद करायला कोण उठणार , त्यामुळे पुन्हा जाग येते असे आमचे मत होते) आणि त्यासाठी लागणारे प्रिंटेड सर्किट बोर्ड आम्ही घरीच तयार करायचो. म्हणजे कॉपर लेयर असणारे बोर्ड आणायचे त्यावर सर्किट लाईन ओढायच्या, ते फेरीकक्लोराइड का अशाच कुठल्यातरी ऍसिडमध्ये भिजत ठेवायचे व ट्रॅक तयार झाल्यावर कापोनंट लावण्यासाठी ड्रिल मारून, मग छोटे छोटे पार्ट घेऊन सोल्डर करायचे असा तो सगळा वेळखाऊ उद्योग होता.

एकदा हाच उद्योग करत असताना अव्या माझे सगळे काम अर्धवट टाकायला लावून जबरदस्तीने मला बाहेर घेऊन गेला. मग दिवसभर सगळ्या दुकानात फिरून पार्ट च्या किमती काढून आलो. एक रेजिस्टन्स कितीला ? मग 100 घेतले तर कसा रेट ? तसेच कपॅसिटर व ट्रांजिस्टर पण.मी म्हटले ," अव्या, अरे आपण एवढे पैसे पेट्रोलवरच घालवले त्यात कितीतरी पार्ट आले असते " त्यावर तो एकच म्हणाला ,"गाढवा , हे मार्केट आहे मार्केट ! आणि ते तुझ्या डोक्याच्याबाहेर आहे.आज आपल्याला सप्लाय कसा कसा होतो ते समजले, उद्या आपण सप्लाय करू !"

नंतर आम्ही असे छोटे छोटे पार्ट विकत घेऊन आणि काही रेडीमेड सर्किट विकत घेऊन एक छान पैकी टेप बांधला. स्पीकर डेऱ्यात लावले. आणि बास ट्रबल ॲडजस्टमेंट साठी सर्किटमध्ये वेगवेगळे कॅपॅसिटर फिल्टर लावण्यासाठी सोय केली. ते आठ पंधरा दिवस आम्हाला दुसर काही सुचतच नव्हते. शेवटी आमचे सेटअप त्याच्या बेडरूम मध्ये तयार झाले, जिथे आम्ही असताना प्रत्यक्ष काका-काकूंना यायला सुद्धा त्याने बंदी केली!!

अव्या फक्त टेक्निकल गोष्टीतच हुशार होता असं नव्हे, तर त्याला एका वेगळ्याच प्रकारे संगीताची आवड होती आणि त्याच्या डोक्यात काही आले तर ते सांगायची त्याला इतकी घाईगडबड व्हायची की सांगितल्याशिवाय त्याला रहावयाचे नाही. आणि ऐकायला माझ्यासारखा कदाचित दुसरा श्रोताही नसेल. असंच एकदा डिस्टिंक्शन चुकेल म्हणून मी इंजिनिअरिंग सेमिस्टरचे पेपर स्क्रॅच केले होते म्हणून घरातले लोक माझी हजेरी घेत असतानाच हा टपकला. आणि अंगणातून सारखा हाका मारू लागला. वडिलांचा पारा आधीच चढलेला होता. शेवटी ते रागाने म्हणाले,” जावा, काय म्हणतोय मित्र ते बघा आधी.ते जास्त महत्वाचे आहे!” तर लगेच त्याच्या घरी गेलो व माडीवर जाताच विचारले तर म्हणाला 'आनंद मोडक' ऐक. मी चिडून म्हटलं -म्हणजे काय ?.तर 'मुक्ता' पिक्चर मधील 'वळण वाटावरल्या झाडीत हिरवे छंद' हे गाणं लावून , आता ऐक म्हणाला.आपण उगीचच ए.आर. रहमानला एकमेकाद्वितीय म्हणतो ,पण मराठीतही पण एआर रहमानच्या तोडीस तोड संगीतकार आहे, हे सांगू लागला. मी पण माझे पेपर वगैरे सगळे विसरून ‘वळण वाटावरल्या ,तलम अग्नीची पात,जाइजुईचा गंध मातीला ’ या गाण्यांमध्ये गुंगून गेलो. आणि तेच गाणं लावून वेगवेगळ्या कपॅसिटरचे सिलेक्शन करून कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये बास ट्रेबल ऍडजेस्ट करून गाणं अजून जास्त खणखणीत वाजेल हे शोधूनच आमचा दिवस संपला.

तर कधी 'हम्मा हम्मा' गाण्याच्या सुरुवातीचे अगम्य शब्द ऐकून भारावून जायचा आणि ते सांगायला यायचा तर कधी चर्चा करताना 'नभ उतरू आलं' गाण्याच्या सुरुवातीला असणारी तान घ्यायला आशा भोसलेच पाहिजे, तिथे लताचा उपयोग नाही असेही सुनवायचा.

'आफरीन आफरीन' या गाण्यातील शब्द त्याला फार आवडायचे. विशेष करून डोळ्यांवरच कडवं. पण सगळ्याच कॅसेट काही विकत घ्यायला जमायच्या नाहीत आम्हाला .क्वचित लिसा रेच हे गाणं टीव्हीवर लागलं तर ( त्यावेळी नुकताच एम टीव्ही येऊ घातला होता ) तो त्याच्या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरून मला हाका मारायचा जोरजोरात. सगळ्या शेजारपाजार्यांना कळायचे की , काहीतरी विशेष लागलय टीव्हीवर ! आणि मी पण हातातले काम सोडून-त्यात अभ्यासही आलाच - पळत जायचो, तोवर निम्मे गाणे संपलेले असायचे!!

अर्थात इंग्लिश गाण्यांवरही आमचं तितकच प्रेम. 'मॉडर्न टॉकिंग्ज' ची कॅसेट आणून ऐकल्यावर, किती गाणी आपण चोरली आहेत हे कळून, जणू ती गाणी मीच चोरली आहेत असे वाटून लाज आणि आश्चर्य दोन्ही वाटायचे. 'मिस्टीरियस गर्ल' हे गाणं तर आम्ही कॅसेट मागे पुढे करून शब्दन शब्द लिहून काढलं होतं. 'माकारीना' हे गाणं आणि त्यातील बीटस अधिक इफेक्टफुल करण्याचा आमचा प्रयोग सुरू असताना अव्याच्या बिल्डिंगचा पहिला मजला अगदी दुमदुमून जायचा. याचा कधीतरी अतिरेक झाला की काकी आमच्या घरी जाऊन बसायच्या आणि 'पोरांनी फार डोकं उठवलय,माकारिना का फाकारिना करत बसलेत दिवसभर! ' अशी कौतुकमिश्रित गोड तक्रारही करायच्या. मला वाटते आम्हाला पडलेली साउंड ॲडजेस्टमेंटची भूल हे आम्हा स्वतःलाच खरोखर फसवणारे कारण होते . आम्हाला खरी भूल पडली होती- माकारिनाच्या बिट्सची -' घर से निकलते ही ' च्या हळुवारपणाची- 'ये जो थोडेसे हे पैसे' च्या नाईलाजाची- आणि 'कोई जाये लेके आये, मेरी लाख दुवाये पाए ' वाल्या ममताच्या नजरेची आणि 'मेड इन इंडिया' मधील 'एक प्यारा सोनिया' गातानाच्या आलिशाच्या अदांची!!

आम्ही डिजिटल कम्युनिकेशन शिकू लागलो. पण 'संभाला है मैंने' या गाण्यातील –
"ये जुल्फों के बादल घनेरे घनेरे –
मेरे बाजूओ मे जो तुने भी बिखेरे-
मै समझा की जैसे मेरी धडकनों को
तेरी धडकनो से पयाम आ रहा है"- या कडव्यामध्ये एक वेगळच कम्युनिकेशन आहे! केसातून डायरेक्ट हृदयाकडे व्हाया ऑप्टिकल कम्युनिकेशन !! असे उद्गार आम्ही काढले, ते जणू या कम्युनिकेशनचे प्रात्यक्षिक कधी होईल या उतावळेपणानेच! "तोच चंद्रमा नभात" या गाण्यात तोच चंद्र, तीच चैत्रातली रात्र आणि समीप असणारी कामिनी ही तीच , अशी खंत गीतकार व्यक्त करतो असे त्याचे परखड मत होते!! "तुम सामने बैठो, मुझे प्यार करने दो" हे ऐकून 'इतकं सोपं असतं तर मग कशाला?' असं विचारी चेहरा करून म्हणे. अशी एक ना हजार गाणी.अशा वेगवेगळ्या गाण्यांचं शास्त्रीय विवेचन फक्त अव्याच करू जाणे.

सगळं विसरून आयुष्याकडे पूर्णपणे मन लावून बघत असतानाच तुम्ही गाफील असता आणि त्या गाफीलपणातच एखादे इंद्रधनुष्य डोळ्यात उमटते, तसेच झाले. एकच एक व्यक्ती म्हणजे आयुष्य असते आणि ती भेटली तरच रस्त्यावर गर्दी होते एरवी सगळे गाव निर्मनुष्य होऊन जाते असा अनुभव अव्याला आला आणि आम्हाला फिरायला आणखीन एक कारण मिळाले.

अव्या बऱ्याच वेळा फिरकी घेऊन मला मूर्ख ठरवायचा प्रयत्न करायचा.त्यात त्याला एक आसुरी आनंद मिळायचा. एकदा त्यांन विचारले 'गिलामन' म्हणजे काय? मला काही समजेना, हिंट दे म्हटल तर हिन्दी गाण्यातील शब्द आहे म्हणे. मला काही समजेना. मी चक्क दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन हिंदीची डिक्शनरी सुद्धा पाहिली, पण व्यर्थ.शेवटी त्यान "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है" हे गाणे लावले आणि कशी फजिती केली म्हणून गालातल्या गालात हसू की नको असा अविर्भाव करत नुसताच बघत राहिला पण लगेच 'बाजार' आणि 'इजाजत' मधील गाणी आणि त्यासाठी आशा भोसले ला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार वगैरे यावर बोलत राहिला.
दरम्यान सकाळ पेपरमध्ये एक स्पर्धा सुरू झाली.प्रत्येक रविवारी ते एक फोटो देत आणि त्या फोटोवर चार ओळी अथवा एक शेर करून पाठवायचा, असे त्याचे स्वरूप होते, त्याला अर्थात शंभर रुपये पन्नास रुपये अशी दोन-तीन बक्षीसे होती. आम्हाला कॅसेट साठी पैसे हवेच होते. अजून बरेच सिनेमे, बरेच अल्बम आणायचे होते. मग काय, आम्ही बुंदी पाडतात तशा कविता पाडल्या! आणि चक्क आम्हाला बक्षीसे मिळत गेली . दोन-तीन आठवडे मनीऑर्डर घरी आल्यावर पुन्हा पुन्हा त्याच लोकांना नंबर देणार नाहीत म्हणून आम्ही वेगवेगळ्या जाती धर्मातील मित्रांच्या नावावर एन्ट्रया पाठवल्या आणि पुन्हा एक दोन महिने बक्षीसे घेतली.पण फक्त एकाच गावात किती बक्षिसे द्यायची असे वाटून की काय सकाळने ती स्पर्धाच बंद केली. पण आमची चांगली कमाई झाली.

एकदा रस्त्याकडेच्या कट्ट्यावर दोनजण निवांत बसलेला फोटो आला होता त्यावर आम्ही-
“कसल्याच अपेक्षा नाहीत,
कसलेच सांगणे नाही
नुसतेच थांबणे आहे,
हे वाट पाहणे नाही”
अस काहीतरी करून पाठवले. त्याच चित्रावर वेगळ्या अर्थाने पुन्हा लिहायचे. कधी ते मित्र आहेत समजून, कधी ते अनोळखी आहेत समजून किंवा आयुष्याला कंटाळून बसले आहेत अशा अर्थाने आणि वेगवेगळ्या लोकांच्या नावाने पाठवायचो.
आम्ही बऱ्याच कविता र ला र, ट ला ट लावून केल्या होत्या ,पण काही चांगल्या होत्या (असे आमचे आम्हालाच वाटत होत!) त्या आम्ही पूर्ण केल्या. उदाहरणार्थ.
"अडगळीतील कप्पा
आणि आठवणींची धुंदी
ओठावर हसू
आणि आसवांची गर्दी
तेव्हा उडालेले पक्षी
आणि अजून त्यांचे भिरभिरणं
भेटलं तर घरटं
नाही तर अजून फिरणं
काहींचं घरटं बांधणं
आणि आपल आयुष्य सावरणं
काहींचे दाराला कुलूप लावणं
आणि मांडलेल सार आवरणं"

कधी मी जास्त विचार करू लागलो की अव्या म्हणायचा, "अमिताभच्या एका सिनेमात प्राण त्याला म्हणतो –सोच गहरी हो जाये तो फैसले कमजोर पडते है - त्यावरून शिक बाबा काहीतरी.” कधी सेंटीमेंटल झाला की (फारसा व्हायचाच नाही म्हणा) म्हणायचा , "माझं एक स्वप्न आहे -एक मोठी बस करणार आणि सगळ्या मित्रांना घेऊन ट्रीपला जाणार. सगळा खर्च माझा!!". मग अशी धमाल करू तशी धमाल करू. आता तो बोलवायला आला की मी बऱ्याच वेळा जायचो, पण कधी कधी त्याच्या हट्टीपणाला वैतागून नाही म्हणायचो त्यावर कधी अचानक धीरगंभीर होऊन म्हणायचा," आत्ता आज जे आहे ते पुन्हा नाही. त्यामुळे एक लक्षात ठेव आयुष्यभर- Now or never !"

दिवस जातच होते.अव्याच्या शब्दात पृथ्वी सूर्याभोवती फेऱ्या मारतच राहणार होती आणि दिवस वाढतच जाणार होते. वेग पण सेमच असणार होता. तसंच होणार होतं आणि तसेच दिवस जात राहिले.

कॉलेज संपले तसे एक एक साक्षात्कार होत गेले .म्हणजे आधी कळत होते पण आता सोबत वळूही लागले.आता आपली काही सुटका नाही. आता आपण जबाबदार झालो.आणि पैसे मिळवलेच पाहिजेत. एक वेगळीच जबाबदारी अंगावर पडल्यासारखी झाली.गाण्यातील ताना, विशिष्ट ठिकाणी घेतलेले मूरके, अदा ,कवींचे चपखल शब्द , गजलेतील विज पडल्यासारखे अंगावर येणारे शेर, बास ट्रबल वाढवणारे रेजिस्टन्स -कॅपॅसिटर्स, निरहेतुकपणे घालवलेल्या दुपारी,सोबत फिरत होतो त्या टेकड्या, वाटा पायवाटा- सगळे सगळे सोडून वास्तवाच्या जगामध्ये डोकावून पाहायला शहरात आलो आणि मग कशा कशालाच फुरसत उरली नाही.

अजून फोन यायचे होते, जे होते ते परवडत नव्हते . त्यामुळे दोन चार महिन्यांनी घरी यायचो तेव्हा अव्याची गाठ पडायची. त्याचाही संघर्ष सुरू होता. पण स्वभावाप्रमाणेच बिनधास्त टाईप.त्यान कोणाच ओझे कधी घेतलेच नाही. लोड शेडिंग च्या सुरुवातीला इमर्जन्सी बॅटरी करून विकल्या व बऱ्यापैकी पैसे मिळवले.नंतर चक्क होजीअरी दुकानदारांबरोबर मल्टी लेवल मार्केटिंग वगैरे करून नुसते परकरच नाही तर बाहुल्याही करून विकल्या. गल्लीतल्या बेरोजगार बायकांना एकत्र करून त्यांना बाहुल्या आणि परकरचे रॉ मटेरियल वाटप करताना एकदा त्याला पाहीले अन डोक्यावरच हात मारून घेतला आणि म्हटले , “हे काय करतोस इथे? त्यापेक्षा पुण्याला जा!” त्यावर त्याने नेहमीच्या स्टाइलने ,”तुमचा उजेड तुम्ही नीट पाडा, आमच आम्ही बघतो!” असे उत्तर दिले. असे एक ना हजारो उद्योग. हे सगळं एकुलता एक असल्यामुळे गाव सोडावं लागू नये म्हणून. ते ही घरच्या दबावामुळे नाही तर स्वतःहून. काकी आणि त्याच बॉंडिंगच जबरदस्त होत. पण शेवटी त्यालाही पर्याय नव्हता. तोही शहरात आला आणि रीतसर सॉफ्टवेअर कंपनीत लागला.मुळात हुशारच होता. आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये काहीतरी बाप काम करत करत विविध शहरे फिरू लागला. त्यानंतर तर मग आमची गाठ पडणं अजूनच मुश्किलच झाल.

तब्बल सात आठ वर्षानंतर एकदा गाठ पडली. त्यावेळेला मात्र रीतसर फोन करून आला व आत्ताच्या आत्ता बाहेर चल, असे काही म्हणाला नाही. इकडच तिकडच चौकशी वजा बोलण झाल्यावर माझ्याकडून गाडी आपोआपच जुन्या आठवणीकडे आणि संगीताकडे वळली. त्यावेळी आलेले नवीन पिक्चर - कंपनी , सरकार या मूव्हीमधील वेगवेगळे डायलॉग ,नवीन अल्बम मधील गाणी ज्यात आता मीही तितकाच अपडेट नव्हतो पण तरी आठवून आठवून विचारले परंतु तरीही गडी खुलेना. ‘ये नाजणीन सुनो ना’ मधील तुझी सोनाली कुठे गेली ?, मागच्या जुन्या आठवणींचा सिक्वेल म्हणून विचारलं की बिपाशाच्या 'मोहब्बत बरसा दे' गाण्यामधील छत्रीची उघड झाप करतानाची स्टाईल बघितलीस का? आणि असंच बरंच काही.!! पण माझेच बारकाईने निरीक्षण करीत राहिला, शेवटी थोडासा हसून म्हणाला ,"आता कुठली आशा आणि आता कुठली भोसले ,आता फक्त टुकुर टुकुर आणि चल बेटा सेल्फी लेले रे!"
या विषयावर त्याला फारशी बोलायची इच्छा दिसली नाही.पण या सगळ्या गोष्टी तो खंत वाटून बोलत नव्हता.तर त्याचा सूर असा होता की असेच होणार होते, तरी शेवटी स्पष्टपणे म्हणालाच ," कोणत्याही वेळी ,वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आवडणारी गाणी मार्केटमध्ये उपलब्ध असतातच. आपली गाडी मात्र वय वाढेल तसं वेगवेगळ्या गाण्यांच्या लेन पकडून पुढे पुढे जात असते. शेवटी हल्लीची गाणी हल्लीच्या पोरांपोरींना आवडत असतीलच की."
अचानक मग एकदमच आठवून म्हणाला,"आणि आपण तरी कुठला वेगळा झेंडा लावला होता? तूमको टाडा! आठवतय का-कमरिया.. कमल सी" मग पुढच आम्ही एकदमच म्हटले-"कमरिया कमल सी-लचक है नूडलसी, दिल को पंचर जो करे, नजर है निडलसी!"

नंतर मात्र मी न राहावून विचारले की, काय झाले तुझ्या बसचे- कधी नेतोस आम्हाला. क्षणभर जुना अव्या जागा झाला. डोळ्यात चमक आली. पण आम्ही दोघेही ओशाळून हसलो, शिवाय मी तरी आता कुठे मी उरलो होतो? आम्हाला माहीत होते- आता कुठली बस आणि कुठले मित्र .दोन तासासाठी भेटलो हेच खूप झाल. जुन्या आठवणी काढून भरपूर बोलायचे होते.. आता टेप जाऊन कॉम्प्युटर आला होता. कॉम्प्युटरचे सर्व सुट्टे पार्ट तसेच नेटवर्किंग राऊटर आणि मॉडेम चे सर्किट आणि त्यांचे परफॉर्मन्स ट्युनिंग हा आता त्याचा फावल्या वेळातला उद्योग होता. एक होते- आयुष्याबद्दलची उत्सुकता तशीच होती. फक्त त्यातील उतावळेपणा गेला होता. मधला गॅप विसरून पोट भरून बोललो. मग काय तो त्याच्या गावाला आणि मी माझ्या.

नंतर क्वचित व्हाट्सअप वर बोलायचं पण तो समक्ष बोलणाराच माणूस होता. व्हाट्सअप वर त्याचे भूतच बोलायचे जणू... जीएम, ओके,? ,Hmm, गुड नाईट बर, ठीक आहे! एकदा तर फक्त . पाठवला, त्याचा अर्थ काय तर म्हणे-विषय संपला.

कोरोना मध्ये रस्ते मोकळेच असायचे. निवांत कारमधून ऑफिसला चाललो असता फोन आला की काकी गेल्या. काका आधीच गेले होते.प्रकर्षाने वाटले की, यावेळी अव्याजवळ असायला पाहिजे होते, पण चार चार वेळा फोन करूनही त्याचा फोन नॉट रिचेबल . कोरोनामुळे रस्ते ही बंद. शेवटी मनाची समजूत घातली, म्हटलं ठीक आहे, असतं एकेकाचं नशीब ,कारण काकूंच इतकं वय झालं नव्हतं. शेवटच त्यांना भेटलो होतो त्यावेळी त्या मात्र फारच थकल्यासारखे दिसत होत्या. एकेकाळी इतकी कणखर स्वभाव असणारी बाई इतकी कशी हतबल झाल्यासारखे दिसू लागली?का वयामुळेच फक्त ? त्यावेळी हातात हात घेऊन त्या म्हणाल्या होत्या की आमच्या अव्याने घर घेतलय,ये की एकदा बघायला, नाहीतर आता आमचे किती दिवस राहिले आहेत?
चार दिवसांनी पुन्हा ऑफिसला जाताना फोन आला की आता अव्याच गेला. धक्काच बसला, समोरचं सगळं धूसर झाल. तशी गाडी कडेला घेतली आणि सुन्नपणे बसून राहीलो.रडावे असे वाटले पण डोळ्यात एक थेंबही पाणी आले नाही.नंतर कळले ते दोघे एकत्रच ऍडमिट होते. पण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये.काकी गेल्यावर तोही गेला चार दिवसात. त्याला कळले होते का काकी गेल्याच? तेही समजलं नाही. शेवटी काय-जॉन लेनन म्हणतो तसं.. Life is what happens to you when you are busy making other plans हेच खरं. आपण आपल्याच नादात असताना आयुष्य असच चकवा देत.

कधी डोळ्यात अनोळखी आणि अकारण पाणी आलं की वाटतं हे त्यावेळेच तर नसेल? रडायच्या राहून गेलेल्या अशा किती किती क्षणांची मनावर कसली कसली पुट चढलीत की डोळ्यातल पाणी जणू आटून गेलंय आतल्या आत. आणि एकट असताना, सोयीने अचानक गाठतात हे क्षण आपल्याला.
अव्या, तू असतास तर "न रडणाऱ्या पण पाठ फिरवून उदास आभाळाकडे बघणाऱ्या " माणसाच्या चित्राकडे पाहून आपण एक कविता केली असती :
“कुण्या काळचे येते डोळ्यात पाणी
आठवून जुनी पण साधीच कहाणी”
नंतर बक्षिसाच्या मनीऑर्डरचा कागद हातात फडकवत मला लगबगीने सांगायला येतानाचा तू अजून डोळ्यापुढे जसाचा तसा दिसतोस.

अव्या, असं वाटतं की अचानक येशील आणि सांगशील की हे गाणे पहा- हे म्युझिक ऐक- हा डायलॉग ऐक. आणि तुला सांगू? काही वेगळे पाहिले, बोलले ऐकले तर मला वाटते की तुही हे पाहायला हवे होतेस."Dying for sex" मध्ये process of dying समजावून सांगताना डॉक्टर मरणाच्या दारात असलेल्या मॉलीला सांगतात की- मृत्यू जवळ आल्यावर शेवटच्या क्षणी जर फार त्रास झाला तर तुला सीडेटीव्ह देते म्हणजे तू बधीर होशील, त्यावर मॉली म्हणते, I want to feel everything as long as I can, त्यावेळी तिच्या आवजातला कातरपणा, डोळ्यातल्या भावना बघायला तू असायला पाहिजे होतास. त्या शेवटच्या क्षणी,’Breath out not followed by breath in’ होताना नेमकं कस वाटल तूला ? अस म्हणतात की, शेवटच्या क्षणी आयुष्याचा सगळा चित्रपट सभोवती नाचतो आपल्या. त्या शेवटच्या क्षणाच्या आधी फेर धरून नाचल्या का तुझ्याहीभोवती आजवर जमवलेल्या वस्तू -भेटलेली माणसे- साधलेले क्षण- हुकलेल्या वेळा? आणि हो, फार कमी लोकांना येते आणि मॉलीला आली होती तशी जस्ट मृत्यूच्या आधीच्या शेवटच्या क्षणाची surge of energy and mental clarity- तो भावनावेग - ती emotional rally, तुला आली होती का? आली असणारच.

अजूनही व्हाट्सअप मध्ये तुझा कॉन्टॅक्ट पाहिला की वाटते -last seen जाऊन अचानक ऑनलाईन होशील आणि विचारशील,"चल येतोस का बाहेर? घरी बसून काय करणार आहेस? चल, नायतर असाच मरणार तू". त्यावेळी मात्र मी लगेच म्हणेन, "चल, कारण मला तुझं पटलय - Now or Never".

Node read time
13 minutes
13 minutes

तिरशिंगराव Tue, 28/10/2025 - 18:25

अव्या कळला पण बाज्याचं काय? खाली कुठे क्रमशः दिसलं नाही. की हा सुद्धा एखाद्या येणार्‍या कादंबरीचा भाग ?
वर तशी सुचनाही नाही.

'न'वी बाजू Tue, 28/10/2025 - 19:31

In reply to by तिरशिंगराव

...किञ्चित वेगळा होता.

बोले तो, अव्या गचकला. ते कळले. चांगले कळले. पुढे (कालवशात्) बाज्या आणि 'मी' (पक्षी: प्रस्तुत नॅरेटर) हेसुद्धा गचकणार काय? ('इजा झाला, बिजा व्हायचाय, तिजा त्यानंतर'च्या धर्तीवर?)

नाही म्हणजे, खाली कुठे 'क्रमशः' दिसले नाही, झालेच तर, वर तशी सूचनाही नाही, म्हणून विचारतोय. (उगाच आशा लावू नये वाचकाला!)

#शुभस्यशीघ्रम् #thesoonerthebetter


बाकी, अतिशय रटाळ, तथा, कोणाला हे वाचण्यात नक्की काय म्हणून रस उत्पन्न व्हावा, असा प्रश्न पडण्यासारखे लेखन. दिवाळी अंकात समाविष्ट केले असते, तरी चालले असते.

असो चालायचेच.

स्वधर्म Tue, 04/11/2025 - 22:45

In reply to by 'न'वी बाजू

नुकत्याच कुठल्यातरी प्रतिसादात तुम्ही तुमचे बालपण पुण्यात आणि त्यातही शनिवार पेठेत गेले असे लिहिले होते. त्याच्या ठोस पुरावा मिळाला:
>>बाकी, अतिशय रटाळ, तथा, कोणाला हे वाचण्यात नक्की काय म्हणून रस उत्पन्न व्हावा, असा प्रश्न पडण्यासारखे लेखन. दिवाळी अंकात समाविष्ट केले असते, तरी चालले असते.