एका क्राईम रिपोर्टरची सुरस आणि चमत्कारिक मुलूखगिरी : भाग ७
आम्ही आमच्या निवासी संपादक रवी श्रीनिवासनला श्रीनी म्हणत असू. मी इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्रेस टॉवर्समधील कार्यालयात पोहोचलो आणि सरळ श्रीनीच्या केबिनकडे गेलो. मी काचेच्या पॅनलमधून डोकावून पाहिलं पण तो दिसला नाही.
मी मागे वळून पाहिलं तर तो सहकाऱ्यांसोबत गप्पा मारताना दिसला. वार्ताहर आणि काही लवकर आलेले उपसंपादक. मी कार्यालयाच्या दुसऱ्या टोकाकडे चालत गेलो, आणि त्याला नजरेच्या इशाऱ्याने सांगितलं की मला त्याच्याशी बोलायचं आहे.
“बोल.”
“नाही, इथे नको. खासगी आहे.”
श्रीनीने त्याच्या केबिनकडे इशारा केला. तो आत गेला आणि आपल्या जागेवर बसला. मी त्याच्या मागे गेलो आणि त्याच्यासमोर बसलो.
“काय आहे?”
“मला एका व्यक्तीकडून कॉल आला, तो म्हणत होता की तो दाऊद इब्राहिमच्या वतीने बोलत आहे.”
श्रीनीचे डोळे विस्फारले. त्याने माझ्याकडे एक मिनिट आ वासून माझ्या डोळ्यांत पाहिलं.
“तुला खात्री आहे का, की…?”
“हो, अन्यथा मी तुम्हाला सांगितलं नसतं.”
“कशी काय खात्री आहे?”
“मला गेल्या काही दिवसांपासून हे कॉल येत आहेत. जेव्हा घरी माझ्या मित्रांनी फोन उचलला, तेव्हा कुणीतरी विचारलं की मी आहे का. मी घरी नव्हतो. म्हणून, जेव्हा सांगितलं की मी नाही आहे, तेव्हा नाव न सांगता, निरोप ना ठेवता कॉल कट झाला.”
“हे कॉल कधी सुरू झाले?” श्रीनीने विचारलं.
“पहिली बातमी प्रकाशित झाल्यानंतर.”
मग त्याला सर्व तपशील हवे होते. मी ते त्याला दिले.
श्रीनीने माझ्याकडे काही मिनिटे तोंड वासून पाहिलं, मग म्हणाला.
“ठीक आहे. गंभीर आहे हे.”
मी त्याच्या केबिनमधून बाहेर पडलो पण पुढे काय होते ते पाहण्यासाठी कार्यालयात थोडा वेळ थांबलो. काही मिनिटांत मी श्रीनीला त्याच्या केबिनमधून बाहेर पडताना आणि तीन-चार केबिनपलीकडच्या डी. के. रायकरच्या केबिनकडे जाताना पाहिलं. मी सिगरेट ओढण्यासाठी खाली गेलो.
श्रीनी सर्वप्रथम रायकरकडे गेला, कारण तेव्हा तो महाराष्ट्रातील एक प्रमुख पत्रकार होता. रायकरने इंडियन एक्सप्रेसमध्ये टेलिप्रिंटर ऑपरेटर म्हणून सुरुवात केली होती आणि त्या घडीला तो एक्सप्रेस ग्रुपच्या दैनिक लोकसत्ताचा संपादक होता. त्याची फोन डायरी त्या काळातील पत्रकारितेच्या जगातली सर्वात मौल्यवान वस्तू होती. रायकरची राज्य प्रशासनातील आणि राजकीय पक्षांतील प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीशी ओळख होती. जेव्हा त्याचा फोन येत असे, तेव्हा समोरची व्यक्ती कोणीही असो – मुख्यमंत्री, गृहमंत्री, किंवा मुख्य सचिव – लगेच फोन घेत असत. अगदी आपत्कालीन बैठकीत असले तरीही.
शिवाय, श्रीनी पत्रकारितेत आगंतुक उपटसुंभ होता. तसे आमच्यातील अनेकजण त्या काळात तसेच होते. त्याने दिल्लीतून एमबीए केलेलं होतं आणि अपोलो टायर्ससाठी ऑटोमोटिव्ह टायर्स विकण्याच्या कामापासून व्यावसायिक जीवनाला सुरूवात केली होती. नंतर तो टाइम्स ऑफ इंडियात रिस्पॉन्स विभागासाठी ‘स्पेस सेलर’ म्हणून नोकरीला लागला. कालांतराने पत्रकारितेत आला. त्याने सुचेता दलालसोबत १९९२च्या हर्षद मेहता शेअर घोटाळ्याचा तपास केला आणि अनेक बायलाइन्स दिल्या. या पार्श्वभूमीमुळे त्याला टोळ्या किंवा संघटित गुन्हेगारीचा फारसा अनुभव नव्हता.
या अनुभवांपैकी कशानेही त्याला देशातील सर्वात भयानक संघटित गुन्हेगारी टोळीच्या प्रमुख गुन्हेगाराकडून मृत्यूची धमकी आल्यावर काय करावं यासाठी तयार केलं नव्हतं.
नंतर मी रायकरला विचारलं त्याच्या केबिनमध्ये काय झालं. त्याने मला सांगितलं की त्याने पोलीस आयुक्ताला फोन केला आणि परिस्थिती सांगितली. माझ्या आठवणीप्रमाणे ते कदाचित (दिवंगत) आर. डी. त्यागी असावेत.
“ते काय म्हणाले?”
“म्हणाले, चिंता करू नका. तुमच्या मुलाला काही होणार नाही.”
“अच्छा.”
रायकरने मला सांगितलं की पोलीस आयुक्ताने ईस्ट वेस्ट एअरलाइन्सच्या कार्यालयात फोन केला आणि ‘तक्की’शी बोलले.
“तक्की, जर हे पोरगं पुढच्या काही महिन्यांत जिन्यावरूनही पडलं तर मी तुझ्या कार्यालयात येईन. तुला कुत्र्यागत तुडवीन, कपडे फाडीन, आणि नागडा बाजारातून फिरवून जीपमध्ये बसवीन. इतके फटके खाशील की तू जिवंत आहेस की मेला आहेस हे तूच विसरून जाशील.”
आयुक्ताच्या चित्रदर्शी भाषेने माझे डोळेच बाहेर आले. ते अर्थातच मला चांगलं ओळखत होते.
मग रायकर म्हणाला, “आजपासून तुझा फोन टॅप केला आहे. तो काही काळ टॅपच राहील. प्रत्येक फोन कॉल – येणारा आणि जाणारा – पोलीस ऐकत आहेत.”
“रायकर, ते स्वस्त पडेल त्यांना. एमटीएनएलने आधीच माझे बाहेर जाणारे कॉल थांबवले आहेत कारण आंम्ही या महिन्याचे टेलिफोन बिल भरू शकलेलो नाही.”
****
माझी वैयक्तिक समस्याच अधिकृतपणे माझ्या वृत्तपत्राच्या माथी थापून मी घरी परतलो. गुरुवार होता. त्या रात्री आम्ही अनेक मित्र एकत्र बसलो होतो. मला अंदाज आला की बातमी पसरली होती आणि अनेकजण चिंतेत पडले होते. आम्ही काही बिअर आणि ओल्ड मंक रमच्या दोन क्वार्टर्स विकत घेतल्या. त्या रात्री आमचा मित्र सिद्धार्थ नायडू तिथे नव्हता.
अशा तणावपूर्ण संकटात विशीतल्या तरुणांच्या बैठकीत नेहमी होतं तसे ‘पुढे काय घडणार’ याबद्दल अनेक भव्यदिव्य तर्ककुतर्क केले गेले. प्रत्येकाने मला ‘गंभीर धोका’ या विषयावर आपापल्या परीने प्रवचन दिलं. मुलींना धोक्यांबद्दल खरोखरच काळजी होती. प्रणव गांभीर्याने बोलला पण माझ्या रक्तरंजित भविष्यकाळाचं फार वर्णन करणं त्याने टाळलं.
ललित मात्र कळपापेक्षा वेगळा होता. सर्व प्रकारच्या भयानक परिणामांची जंत्री त्या रात्री वाचली गेली. मद्यप्रभावाने शेवटी आम्हाला जोजवलं, आणि दुसऱ्या दिवशी नेहमीच्या कामांवर आम्ही परतलो.
ललित एफटीआयआयचा जाहिरात चित्रपट निर्माता रवी देशपांडेसोबत काम करत होता. प्रणव ‘महानगर’च्या – म्हणजे निखिल वागळेच्या ज्वलंत टॅब्लॉइडच्या – कार्यालयात गेला. माझी पावलं इंडियन एक्सप्रेसकडे वळली.
संध्याकाळी मी घरी परतलो आणि आश्चर्यचकित झालो. आमच्या फ्लॅटच्या दरवाजाला बाहेरून कुलूप घातलेलं होतं. मी कुलूप लावलेल्या घराची डोअरबेल वाजवली नाही. हे एक नवंच कुलूप हँडलवर लटकलेलं होतं. सवयीप्रमाणे मी एक ऑटो घेतली आणि एका मैत्रिणीच्या घरी चेंबूरला गेलो. मी मैत्रीण आणि तिच्या आईला नव्या कुलुपाबद्दल सांगत होतो, तेव्हा ललित घराच्या अंतर्भागातून प्रकटला आणि म्हणाला,
“मीच घातलंय ते कुलूप.”
मग संपूर्ण कथा उघड झाली. ललित माझ्यापूर्वी घरी पोहोचला होता. दरवाजाला आतून कुलूप लावलेलं होतं. त्याने बेल वाजवली. प्रतिसाद नाही. तो बेल वाजवत राहिला, पण घरात जणू कुणीही नसल्यासारखी शांतता होती.
मग त्याची चित्रपट पाहून तयार झालेली कल्पनाशक्ती दाऊद इब्राहिम टोळीने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर निसटली. तो खाली गेला, एक कुलूप विकत घेतलं, ते बाहेर ठोकलं, आणि तडक आमच्या चेंबूरकर मैत्रिणीच्या घरी धाव घेतली.
“हं! पण आत कोण असेल?”
“मला वाटते की टोळीतला कुणी घरात घुसला असेल, तुझी वाट पाहत.”
“हं…”
“किंवा आमच्यापैकी कुणाचीही. आम्ही सगळेच धोक्यात आहोत.” ललितने त्याचा मुद्दा नाट्यमयपणे मांडला.
आम्ही शुक्रवारची रात्र ‘नेमकं काय घडलं असेल’ या चर्चेत घालवली. आम्ही आमच्या तक्षशिला फ्लॅटवर सतत फोन करत राहिलो. पण कुणीही फोन उचलला नाही.
शेवटी, मी सर्वांना फ्लॅटवर जाऊन प्रत्यक्ष तपासण्यासाठी पटवलं. जरी फ्लॅटमध्ये माझा मारेकरी अडकला असला तरी तो दोन दिवस तिथे राहणं शक्य नव्हतं. आम्ही चौघे फ्लॅटवर पोहोचलो. खात्री करण्यासाठी बेल वाजवली.
पुन्हा एकदा वाजवली. मग आणखी १७ सेकंदांत पुन्हा एकदा. मग आम्हाला आतून दरवाजावर काही खसबस ऐकू आली.
“कोण आहे?” आमच्यापैकी एकाने विचारलं.
“मी सिद्धू. मी आहे इथे,” सिद्धार्थने दरवाजाच्या दुसऱ्या बाजूने सांगितलं.
आम्ही लगेच दरवाजा उघडला आणि सिद्धार्थला दिसला. सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला, आणि हसू लागलो. पण सिद्धार्थ रडकुंडीला आला होता.
“आम्हाला वाटलं तू दाऊदचा माणूस आहेस.”
“काय?!”
आम्ही सिद्धार्थला विचारलं की ललितने डोअरबेल वाजवली तेव्हा त्याने दरवाजा का उघडला नाही? तेव्हा रहस्य उघड झालं.
असं झालं की सिद्धार्थने मला आलेल्या धमकीबद्दल उडत उडत ऐकलं होतं आणि ‘डी’ कंपनीच्या धमकीच्या कथेबद्दल समक्ष जाणून घेण्यासाठी साहेब तक्षशिलाला पोहोचले होते. त्याच्याकडे (अर्थातच) सात इतर मित्रांसारखी स्वतःची चावी होती. आत कोणीच नव्हतं. आमच्या गुरुवारच्या पिण्यात घरातील सर्व मद्य संपलं नव्हतं. ओल्ड मंकची एक क्वार्टर उरली होती. कोणीतरी घरी येईपर्यंत आलेला कंटाळा घालवण्यासाठी सिद्धार्थने ती पिऊन टाकली. ललित आणि प्रणवसारखा तो स्वयंपाक करू शकत नव्हता. मोकळ्या पोटावर मद्यपान केल्याने ललित येऊन डोअरबेल वाजवेपर्यंत सिद्धू बेहोश झाला होता. त्याला ललितची डोअरबेल ऐकूच आली नाही!

आमच्या गरिबीने त्या दिवशी आणखी एक रंग दाखवला. बिल भरतच नाही हे पाहून एमटीएनएलने शेवटी येणाऱ्या कॉलची सुविधाही कापली. आम्ही चेंबूरहून केलेले फोन त्याच्यापर्यंत पोचलेच नाहीत. सिद्धार्थ दोन दिवस आमच्या घरी उपाशी पडून राहिला. रेकॉर्डशिवाय तुरुंगवास भोगणारा तो भारतातला पहिला कैदी नव्हता. पण या तुरुंगवासाला पोलीस जबाबदार नव्हते.
***
(समाप्त)
हरीश नांबियार २०१६पासून इकाॅनाॅमिक टाइम्समध्ये पुनर्लेखन विभागात कार्यरत आहेत. त्यांचे २००२मधल्या गुजरात दंगलीच्या आगेमागे ‘बुलेट’वरून केलेल्या भारतभ्रमणातील अनुभवांवर आधारित Defragmenting India: Riding a bullet through the gathering storm हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकाचा ॲमेझॉनवरील दुवा.