'कामसूत्रा'मधून दिसणारा वात्स्यायनकालीन भारतीय सुखवस्तु समाज

संकीर्ण कामसूत्र

'कामसूत्रा'मधून दिसणारा वात्स्यायनकालीन भारतीय सुखवस्तु समाज

लेखक - अरविंद कोल्हटकर

प्रस्तावना

वात्स्यायनाच्या - ज्याचे मल्लनाग वात्स्यायन असेहि नाव पाहण्यात येते - 'कामसूत्र' ग्रंथाचा विषय काय आहे असा प्रश्न जर सर्वसामान्य जाणकार व्यक्तीला केला तर शंभरापैकी नव्वद वेळा असे उत्तर मिळेल की स्त्रीपुरुषांमधील संभोगक्रीडेची तन्त्रे सांगणारा हा ग्रंथ आहे. उत्तर देणाऱ्याच्या मनात त्यावेळी खजुराहो, कोणार्क इत्यादि मंदिरातील ह्या क्रीडेच्या नाना पद्धती दाखविणारी चित्रे तरळत असतात. कामक्रीडेची चौसष्ट आसने वगैरे त्याने बहुधा ऐकलेले असते. योनिमार्गाच्या लांबीनुसार स्त्रियांचे मृगी, वडवा (घोडी) आणि हस्तिनी, तसेच मेहनाच्या म्हणजेच लिंगाच्या लांबीनुसार पुरुषांचे शश (ससा), वृष (बैल) आणि अश्व (घोडा) असे तीन प्रकार असतात. त्यांच्या जोड्या जमवून केलेल्या काही कोष्टकांची अडगळहि त्याच्या डोक्यामध्ये भरलेली असते. (एकंदरीतच संस्कृत शास्त्रकारांच्या प्रघाताप्रमाणे वात्स्यायनाने ठिकठिकाणी वेगवेगळी कोष्टके दिलेली आहेत.) अशा प्रकारच्या सामान्यज्ञानावरून 'कामसूत्र' ग्रंथ हा काही प्रकारचे sex manual असावा असे त्याला वाटत असते. '६४ आसने' अथवा असे काही सूचक शब्द गूगलच्या शोधपेटीमध्ये घालून पाहिले तर ह्या विधानाची पडताळणी करता येईल.

'६४ आसने' ह्या समजुतीबद्दल येथेच थोडे स्पष्ट करावे असे वाटते. स्वत: वात्स्यायनाने ६४ आसने मोजून कोठेच दाखविलेली नाहीत. संभोगक्रियेचे वर्णन 'कामसूत्रा'च्या 'सांप्रयोगिक' ह्या दुसऱ्या अधिकरणामध्ये येते. त्यातील दुसऱ्या अध्यायामध्ये ह्या 'सांप्रयोगिक' नावाच्या अधिकरणाला 'चतु:षष्टि' म्हणजे 'चौसष्ठी' असे पूर्वाचार्य म्हणतात हे त्याने लिहिले आहे - शास्त्रमेवेदं चतु:षष्टिरिति आचार्यवाद: - आणि त्या नावाचा उगम काय ह्याबाबतहि विवरण दिले आहे. त्यानुसार वात्स्यायनाचा पूर्वसूरि बाभ्रव्य ह्याने सांप्रदायिक प्रकरणाच्या चुम्बन, नखक्षत, दन्तव्रण अशा एकूण आठ भागांचे प्रत्येकी पुन: आठ प्रकारांमध्ये विभाजन होते म्हणून ह्या प्रकरणाचे नाव 'चतु:षष्टि' असे विधान केले आहे. त्याचा उल्लेख करून वात्स्यायन म्हणतो की ते चुकीचे आहे कारण 'सांप्रयोगिक' प्रकरणाचे आठाहून अधिक, एकूण दहा, भाग पडतात. अजून एक मत वात्स्यायन उद्धृत करतो. त्यानुसार ऋग्वेदामधील एकूण १०२८ सूक्ते १० मण्डलांमध्ये विभागली आहेत. एकूण ऋग्वेदाचे भाग करण्याची दुसरीहि एक पद्धत आहे ती म्हणजे प्रत्येकी ८ अध्यायांच्या ८ अष्टकांमध्ये तीच सूक्ते बसवायची. ह्या साम्यामुळे ऋग्वेदावरूनच 'सांप्रयोगिक' प्रकरणाला 'चतु:षष्टि' हे नाव मिळाले आहे. वात्स्यायनाला तेहि मान्य नाही. तो अखेर सांगतो की 'चतु:षष्टि' हे नाव वाच्यार्थाने घ्यायची आवश्यकता नाही. जसे सप्तपर्णी वृक्षाला सातच पाने असतात असे नाही, त्याला 'सप्तपर्णी' हे नाव रूढीने चिकटले आहे. तद्वत् 'सांप्रयोगिक' प्रकरणाचे 'चतु:षष्टि' हे नाव रूढीचाच भाग आहे, अधिक काही नाही.

वात्स्यायनाचे जरी असे स्पष्ट सांगणे असले तरी 'चतु:षष्टि' प्रकरणामध्ये चौसष्ट आसने वर्णिली आहेत ह्या विचाराचा जनमानसावरील पगडा कमी होत नाही. 'कामसूत्र' हे sex manual आहे अशा प्रचाराने त्याची विक्री करणारे लेखक प्रत्यक्ष चौसष्ट चित्रे वा जुन्या मंदिरांमधील शिल्पांची छायाचित्रे छापून ह्या भोळ्या कल्पनेला खतपाणीच घालतात.)

कामसूत्र हे sex manual आहे काय?

'कामसूत्र' हे एक sex manual आहे ही समजूत पूर्णत: असत्यहि नाही. 'कामसूत्रा'चा काही भाग निश्चितपणे अशा तन्त्रांची माहिती देण्यासाठी लिहिला गेला आहे. मात्र अशी माहिती देणे हा त्याचा प्रमुख उद्देश नाही आणि शरीरसुख हे एकच लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून हे लेखन वात्स्यायनाने केलेले नाही. त्या पलीकडे जाऊन अर्थ आणि काम हे भारतीय विचारातील दोन पुरुषार्थ आयुष्यामध्ये योग्य वेळी आणि योग्य प्रकाराने प्राप्त केल्याने धर्माचीहि प्राप्ति होते हे तत्त्व सांगण्याचे कार्य 'कामसूत्र' करते. त्यातहि 'काम' ह्यावर विशेष ध्यान देऊन त्याच्या प्राप्तीच्या मार्गातील टप्पे कोणते आणि ते कसे पार करायचे ह्याचे वस्तुनिष्ठ मार्गदर्शन 'कामसूत्रा'कडून मिळते. 'काम' परिपूर्ण जीवनाला आवश्यक आहे - necessary - पण जीवनाचे तेच एक ध्येय - sufficient - होऊ शकत नाही ही त्याची शिकवण आहे. मनुष्याचे आचरण नेहमी नैतिक आणि नियमांना धरून असावे हा सूर सर्व लेखनात जाणवतो. मद्य कसे बनवावे ही कृति सांगणारे लेखन ज्याप्रमाणे अतिरिक्त मद्यपानाला उत्तेजन देत नाही आणि तसेच शरीरसुख कसे भोगावयाचे हे सांगणारे हे लेखन ते सुख कोठल्या मर्यादेपर्यंत उपभोगावे आणि त्यापलीकडे जीवनाची काय ध्येये आहेत हेहि सांगते. 'काम' हा पुरुषार्थ साधण्याची योग्य वेळ ही ब्रह्मचर्य पाळून विद्याभ्यास पूर्ण केल्यानंतरच येते, आधी नाही असे तो स्पष्टपणे म्हणतो. ह्या बाबतीत त्याचे आणि कालिदासाचे एकमत आहे. कालिदासानेहि रघुकुलातील राजांचे वर्णन करतांना 'शैशवेऽभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्' (बालपणामध्ये त्यांनी विद्या मिळविल्या आणि यौवनामध्ये विषयोपभोग केला) असे त्यांचे वर्णन केले आहे.

भारताच्या प्राचीन परंपरेतील ग्रंथ हे बहुश: धर्माचे पालन करावे कारण त्यातूनच मोक्ष मिळतो अशी शिकवण देतात. स्त्री हे सर्व अध:पाताचे मूळ आहे, काम हा षड्रिपूंपैकी एक आहे, इन्द्रियांचे लाड न पुरवता त्यांचे दमन केल्यानेच मोक्ष मिळतो अशा प्रकारची शिकवण देतात. हे ग्रंथ धर्म आणि अर्थ एका बाजूला तर काम त्यांच्या विरुद्ध पक्षात अशी भूमिका मांडतात. वात्स्यायन असे करीत नाही तर कामभावनेला आयुष्यात स्वत:चे स्थान आहे, तिचे योग्य मार्गाने शमन करण्यात काहीहि अयोग्य नाही अशी स्पष्ट भूमिका तो घेतो. प्राचीन पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. वात्स्यायन मात्र अनेक ठिकाणी स्त्रियांना समजून घेण्याची उदार भूमिका घेतांना दिसतो.

'कामसूत्र' कोणासाठी?

हा ग्रंथ लिहिला गेला आहे तो मोठया नगरामध्ये राहणाऱ्या समृद्ध 'नागरका'ला समोर ठेवून. 'कामसूत्र'कालीन दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील भारतीय समाज हा समृद्ध समाज होता. अशा समाजाचा घटक असलेल्या समृद्ध नागरकाची राहणी कशी असावी, त्याने आपले जीवन कसे जगावे अशी दृष्टि हा ग्रंथ देतो. ह्या ग्रंथाच्या शिकवणुकीचा रोख असलेल्या तरुण स्त्रियाहि समाजाच्या अशाच वरच्या थरातील आहेत. राजा, त्याचे महामात्र आणि मन्त्री, राजाच्या चाकरीमधल्या उच्च स्थानावरच्या सेवकांच्या कन्या आणि पत्नी ह्यांना समोर ठेवून वात्स्यायनाने ग्रंथ लिहिला आहे हे जाणवते. ह्या वरच्या समाजामध्ये नागरकाच्या पत्नीचे स्थान काय, तिने कसे आचरण ठेवावे हे हा ग्रंथ सांगतो. ह्या समाजामध्ये 'गणिका' ह्या वर्गाला स्वत:चे स्थान होते. 'मृच्छकटिक' नाटकातील वसन्तसेना, बौद्ध संप्रदायातील आम्रपाली, 'कुट्टनीमत' काव्यातील मालती, अशा गणिकांच्या वर्तनावरून त्यांच्या सांस्कृतिक पातळीची, शिक्षणाची आणि सामाजिक स्थानाची कल्पना येते. गणिकावृत्ति हा विषयहि विस्ताराने 'कामसूत्रा'मध्ये दाखविला आहे. दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील नागरकांचे आणि त्यांच्या समपातळीच्या लोकांचे भौतिक जीवन कसे होते, त्यांचा दिनक्रम काय होता, त्यांचे छंद आणि विरंगुळ्याचे मार्ग काय होते ह्याचे दुर्मिळ दर्शन ह्या ग्रंथामधून होते.

वात्स्यायनाची ओळख

हा ग्रंथ लिहिणारा वात्स्यायन कोण होता, तो कोठल्या भागातला आणि त्याने ग्रंथ कोणत्या काळात लिहिला ह्याबाबत निश्चित अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. अन्तर्गत पुरावा, अन्य ग्रंथांशी तुलना, वात्स्यायनाचा स्पष्ट उल्लेख अन्य लेखनामध्ये मिळणे अशा मार्गाने काही तर्क बांधता येतात, ते असे:

आपस्तंबाच्या गृह्यसूत्रांतील काही शब्दरचना 'कामसूत्रा'मध्ये तशाच्या तशा किंवा फार थोड्या फरकाने आलेल्या आहेत. आपले काही पूर्वसूरि म्हणजे पांचाल देशात होऊन गेलेला बाभ्रव्य, पाटलिपुत्रातील गणिकांच्या विनन्तीवरून लेखन करणारा दत्तक, काश्मीरवासी गोनर्दीय आणि गोणिकापुत्र, सुवर्णनाभ, चारायण, घोटकमुख आणि कुचुमार ह्यांच्या लेखनाचे उल्लेख 'कामसूत्रा'त अनेक जागी मिळतात. पैकी गोनर्दीय आणि गोणिकापुत्र ही दोन्ही नावे पाणिनीच्या महाभाष्यात दिसतात. गोणिकापुत्र हे पाणिनीचेच एक नाव आहे असे एक मत आहे. वात्स्यायनाची काही सूत्रांची शब्दरचना पाणिनीच्या महाभाष्यामधून घेतल्यासारखे जाणवते. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचीहि छाया 'कामसूत्रा'मध्ये कोठेकोठे जाणवते. किंबहुना वात्स्यायन आणि अर्थशास्त्राचा लेखक विष्णुगुप्त हे एकच व्यक्ति होते असेहि एक मत आहे. ह्या सर्वावरून असे म्हणता येईल की वात्स्यायन हा पाणिनि आणि कौटिल्य ह्यांचा उत्तरकालीन आहे आणि इसवी सनपूर्व चौथे शतक ही वात्स्यायनाच्या कालाची वरची सीमा आहे.

वात्स्यायनाच्या कालाची खालची सीमा म्हणजे तो कालिदासाला पूर्वकालीन दिसतो. कालिदासाला 'कामसूत्र' ग्रंथ माहीत असावा कारण शाकुन्तल नाटकामध्ये वात्स्यायनाचेच शब्द एका जागी वापरलेले दिसतात. नाटकाच्या चौथ्या अंकात काश्यप मुनि आश्रम सोडून पतिगृही निघालेल्या शकुन्तलेला जो उपदेश करतात त्यामध्ये हा पुढील प्रख्यात श्लोक आहे:

शुश्रूषस्व गुरून् कुरु प्रियसखीवृत्तिं सपत्नीजने
भर्तुर्विप्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीपं गमः।
भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी
यान्त्येवं गृहिणीपदं युवतयो वामाः कुलस्याधयः॥

(शाकुन्तल ४.१८)

(काश्यपमुनि शकुन्तलेस उद्देशून) मोठयांची सेवा कर, अन्य सवतींशी मैत्रिणींप्रमाणे वाग, पतीने राग केला तरी रुष्ट होऊ नकोस, सेवकांशी प्रेमाची वर्तणूक ठेव आणि स्वभाग्यामुळे गर्व बाळगू नकोस. असे करणाऱ्या स्त्रिया गृहिणी म्हणून आदरास पात्र होतात, ह्याउलट वागणाऱ्या कुटुंबाला खाली नेतात.

ह्या श्लोकाच्या तिसऱ्या चरणामध्ये 'भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी' ह्याऐवजी 'भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भोगेष्वनुत्सेकिनी' असा पाठ बंगाल भागामध्ये सापडतो. ह्या पाठातील शब्द आणि संकल्पना 'कामसूत्रा'मध्ये 'भार्याधिकारिक' ह्या क्र. ४ च्या अधिकरणामध्ये १ल्या अध्यायात भेटतात. पत्नीने आपली वर्तणूक कशी ठेवावी हे सांगताना 'भोगेष्वनुत्सेक:। परिजने दाक्षिण्यम्' अशी तेथील शब्दरचना आहे आणि तिचेच प्रतिबिंब वरील श्लोकामध्ये आहे. रघुवंश काव्यातील ७व्या सर्गात इन्दुमतीने राजपुत्र अज ह्याला स्वयंवरामध्ये वरल्यावर अज जेव्हा इंदुमतीचे पाणिग्रहण करतो - तिचा हात आपल्या हाताने धरतो - तेव्हा कालिदास त्या प्रसंगाचे वर्णन करतांना सांगतो:

आसीद्वर: कण्टकितप्रकोष्ठ: स्विन्नाङ्गुलि: संववृते कुमारी। (७.२२.१)
(वराचे मनगट रोमांचित झाले, कुमारीच्या बोटांना घाम सुटला.)

ह्यावर टीकाकार मल्लिनाथ लिहितो: अत्र वात्स्यायन: - कन्या तु प्रथमसमागमे स्विन्नाङ्गुलि: स्विन्नमुखी च भवति। पुरुषस्तु रोमाञ्चितो भवति। एभिरनयोर्भावं परीक्षेत।
(येथे वात्स्यायन लिहितो - पहिल्या भेटीत कन्येच्या बोटांना आणि मुखाला घाम येतो तर पुरुष रोमांचित होतो. ह्यावरून त्यांच्या भावना समजतात.) अशी अन्यहि साम्यस्थळे आहेत ज्यावरून असे म्हणता यावे की वात्स्यायनाच्या 'कामसूत्रा'शी कालिदास परिचित होता. सुबन्धु ह्या कवीने 'वासवदत्ता' नावाचे गद्यकाव्य रचले आहे. त्यामध्ये विन्ध्य पर्वताच्या वर्णनामध्ये जी विशेषणांची मालिका आहे त्यामध्ये 'कामसूत्रविन्यास इव मल्लनागघटित: कान्तारसामोदय:' ह्या वर्णनामध्ये वात्स्यायनाने रचलेल्या कामसूत्राचा प्रत्यक्ष उल्लेख आहे. कालिदास आणि सुबन्धु इसवी सनाच्या पाचव्या शतकात होऊन गेले असे मानले तर वात्स्यायन त्याआधीचा असे म्हणावे लागते.

वात्स्यायनाच्या कालनिर्णयासाठी 'कामसूत्रा'मधील काही उल्लेख मार्गदर्शक आहेत. दुसऱ्या अधिकरणाच्या ७ व्या अध्यायामध्ये सुरतक्रीडेमध्ये प्रतिपक्षाला दिलेल्या वेदना आणि दु:ख हेहि सुखकारक असतात असे वात्स्यायन सांगतो. मात्र हे टोकाला जाता कामा नये - आत्यन्तिकं तु परिहरेत् - असेहि तो बजावतो. तेथे अशा अतिरेकाचे उदाहरण म्हणून तो पुढील संदर्भ देतो: कर्तर्या कुन्तल: शातकर्णि: शातवाहनो महादेवीं मलयवतीम् (जघान)। (शातवाहनकुलातील कुन्तल शातकर्णीने महाराणी मलयवतीला कात्रीने मारून टाकले.) वात्स्यायनाच्या आठवणीत किंवा ऐकण्यात ही घटना आहे असे दिसते. अर्थात् वात्स्यायनाचा काल कुन्तल शातकर्णीनंतरचा असणार. हा राजा इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये होऊन गेला. त्याचप्रमाणे आभीरांचे उल्लेख ग्रन्थामध्ये काही ठिकाणी आलेले आहेत. 'परिष्वङ्गचुम्बननखदन्तचूषणप्रधाना: क्षतवर्जिता: प्रहणनसाध्या मालव्य आभीर्यश्च' - मालव आणि आभीर प्रान्तातील स्त्रियांना आलिंगन, चुंबन, नखव्रण, दन्तव्रण आणि चोषण आवडते, व्रण न करता केलेल्या प्रहारांनी त्या वश होतात.आभीरं हि कोट्टराजं परभवनगतं भ्रातृप्रयुक्तो रजको जघान - ह्या मागची कथा यशोधर सांगतो: श्रेष्ठी वसुमित्राच्या घरात त्याच्या भार्येच्या अभिलाषाने शिरलेल्या आभीर कोट्टराजाचा त्याचे राज्य हवे असलेल्या त्याच्या भावाने परटाकरवी घात केला. आभीर राजांची लहानलहान राज्ये माळवा प्रान्तात सन २२५ च्या पुढेमागे होती असे मानले जाते. ह्यावरून वास्यायनाचा काल इ.स. २५० ते इ.स. ४०० ह्या काळात पडतो असे म्हणता येते.

वात्स्यायन प्राचीन भारताच्या कोणत्या भागात राहात असावा ह्याबाबत मात्र पुराव्याच्या अभावी काहीच सांगता येत नाही. पश्चिमोत्तर भागातील बाह्लीकांच्या (बॅक्ट्रिया) प्रदेशापासून ते दक्षिणापथापर्यंत आणि पश्चिम किनाऱ्यावरील अपरान्तापासून (कोकण) ते पूर्वेकडील वंग-कलिंग-कामरूपापर्यंत अनेक प्रदेशांचे आणि तेथे राहणाऱ्या लोकांच्या सवयींचे वर्णन वात्स्यायन करतो. ह्या सर्व प्रदेशांबद्दल त्याला कमीअधिक माहिती होती असे दिसते. कालिदास विदिशा-उज्जयिनी भागाचे वर्णन रंगून करतो त्यावरून तो तेथलाच असावा असा तर्क बांधता येतो. अशी कोठलीच खूण वात्स्यायन मागे ठेवत नाही. अपरान्त, लाट (गुजराथ), सौराष्ट्र, महाराष्ट्र, विदर्भ, वत्सगुल्मक - वाशीम - अशा उल्लेखांची तुलनेने अधिक संख्या पाहता त्यावरून असे वाटते की तो भारताच्या पश्चिम प्रदेशाचा रहिवासी असावा. दाक्षिणात्य हे मामाच्या मुलीशी विवाह करणे पसंत करतात ह्या त्याच्या नापसंतीदर्शक विधानावरून त्याचा दक्षिणेशी परिचय चांगला होता पण तो तेथला राहणारा नसावा असे म्हणता येते. आजहि कर्नाटकाच्या ग्रामीण भागात ही चाल दिसते असे ऐकले आहे.

कामसूत्राचा अलीकडचा प्रसार

संपूर्णतया ऐहिक अशा विषयाला वाहिलेला हा ग्रंथ १९व्या शतकाचा अखेरीपर्यंत सर्वसामान्य वाचकाला माहीतच नव्हता. तो जगापुढे कसा आला ह्याचा इतिहास मनोरंजक आहे. १९व्या शतकामध्ये हिंदुस्तानातील ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये सर रिचर्ड बर्टन (१८२१-१८९०) हे रंगतदार व्यक्तिमत्त्व उठून दिसते. मूळचे बॉंबे आर्मीतील बर्टन हे पौर्वात्य भाषांचे जाणकार, आणि धाडसी प्रवासी म्हणून आपल्या माहितीचे आहेत. दरवेशाच्या वेषामध्ये मक्का-मदिना ह्या अन्य धर्मीयांना बंदी असलेल्या स्थळांचा प्रवास, नाइल नदीच्या उगमाचा आणि टांगानिका सरोवराचा शोध अशासाठींचे त्यांचे प्रवास ह्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. अरेबियन नाइट्स् हे पुस्तकहि त्यांनी जगापुढे आणले. १८८० च्या सुमारास बर्टन आणि त्यांचे एक सहकारी आय.सी.एस. सेवेमधील सेवानिवृत्त अधिकारी फॉस्टर फिट्झजेराल्ड अर्बथनॉट (१८३३-१९०१) हे कामशास्त्राला वाहिलेल्या 'अनंगरंग' ह्या कल्याणमल्लाने १६व्या शतकामध्ये लिहिलेल्या संस्कृत ग्रंथाच्या भाषान्तरामध्ये गढलेले होते. त्यावेळी अशा ग्रंथांमध्ये वात्स्यायनकृत 'कामशास्त्र' हा ग्रंथ सर्वात जुना आहे असे त्यांच्या लक्षात आले. त्याची बिनचूक आणि पूर्ण प्रत मिळणे दुरापास्त होते म्हणून मुंबई, कलकत्ता, जयपूर आणि वाराणसी येथे शोध घेऊन चार प्रती आणि ग्रंथावर १३व्या शतकामध्ये लिहिली गेलेली यशोधराची 'जयमंगला' ही टीका ही हस्तलिखिते उपलब्ध झाली. त्यांची एकमेकांशी तुलना करून एक शुद्ध प्रत बनविण्याचे काम पंडितांनी केले आणि १९व्या शतकातील प्रख्यात पुरातत्त्व अभ्यासक भगवानलाल इन्द्राजी आणि मुंबई विद्यापीठात तेव्हा शिक्षण घेत असलेले शिवराम परशुराम भिडे ह्या दोघांनी त्याचे इंग्लिश भाषान्तर तयार केले. हे भाषान्तर लंडनमधील 'The Hindoo Kama Shastra Society' मार्फत १८८३ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. विक्टोरिअन समाजाच्या नैतिक वर्तणुकीच्या बंदिस्त नियमांपासून आणि Obscene Publications Act, 1857 सारख्या तत्कालीन अश्लीलताविरोधी कायद्यांपासून सुटका मिळविण्यासाठी पुस्तकाचे खाजगी वाटप केवळ सोसायटीच्या सदस्यांपुरते मर्यादित ठेवण्यात आले आणि पुस्तकाच्या केवळ २५० प्रती छापून सदस्यांना वाटण्यात आल्या. त्यामध्ये भाषान्तरकर्त्यांची नावे देण्यात आली नाहीत तसेच बर्टन आणि अर्बथनॉट ह्यांचीहि नावे कोठे दिसत नाहीत. अजून एक गमतीची बाब अशी की अश्लीलता कायद्यापासून आणखी सुरक्षा मिळविण्यासाठी ब्रिटनमधल्या वाचकास सहज समजतील असे penis आणि vagina हे शब्द पूर्णपणे टाळून त्यांच्या जागी संस्कृतमधून उचललेल्या lingam आणि yoni ह्या शब्दांचा वापर केला आहे. (ह्याच The Hindoo Kama Shastra Society कडून नंतर बर्टनच्या 'अरेबियन नाइट्स्' ह्या पुस्तकाचे वितरण झाले. 'कामशास्त्र' पुस्तकाला बर्टन ह्यांची प्रस्तावना सहीशिवायची आहे. अशा रीतीने १९व्या शतकाच्या अखेरीच्या दिवसांमध्ये हे पुस्तक प्रथम जगापुढे आले. ह्या पुस्तकात छापलेले भाषान्तर बर्टनचे आहे अशी समज सर्वत्र रूढ होती, पण बर्टन ह्यांना स्वत:ला संस्कृत वाचता येत नसे.

मर्यादित वर्तुळामध्ये पुस्तकाचा चांगला बोलबाला झाला. बंदिस्त वातावरणात ताज्या वाऱ्याची झुळुक यावी असे वाचकांना वाटले. तत्कालीन विक्टोरियन समाजात 'काम' ह्या भावनेचे जीवनातील महत्त्व मानण्याची प्रथा नव्हती. स्त्रियांना कामवासनाच नसते असल्या वेडगळ विचारांचा पगडा लोकांच्या मनावर होता. विवाहसंबंध म्हणजे आपल्याला हवे ते सुख नवऱ्याने ओरबाडून घ्यायचे इतकेच बहुतेकजण मानत असत. अशा वातावरणात कामभावना पुरुष आणि स्त्री दोघांच्याहि मनात नैसर्गिक असते आणि तिचे योग्य रीतीने शमन हा सुखी जीवनाचा पाया आहे, असा नवा विचार ह्या पुस्तकाने विक्टोरियन समाजापुढे मांडला.

अश्लीलता विरोधी कायद्यांच्या भीतीने बर्टन आणि फिट्झजेराल्ड पुस्तकाच्या उपयुक्ततेविषयी फार उघडपणे बोलायला चाचरत असावेत तरीहि आपल्या सहीशिवायच्या प्रस्तावनेमध्ये ते असे म्हणतात:

After a perusal of the Hindoo work, and of the English books above mentioned, the reader will understand the sub­ject, at all events from a materialistic, realistic, and practical point of view. If all science is founded more or less on a stratum of facts, there can be no harm in making known to mankind generally certain matters intimately connected with their private, domestic, and social life.

Alas! Complete ignorance of them has unfortunately wrecked many a man and many a woman, while a little knowledge of a subject generally ignored by the masses would have enabled numbers of people to have understood many things which they believed to be quite incomprehensible, or which were not thought worthy of their consideration.

ब्रिटनमध्ये हे पुस्तक छापले गेले ह्यापासून प्रेरणा घेऊन जयपूर दरबारातील विद्वान महामहोपाध्याय दुर्गाप्रसाद ह्यांनी यशोधराच्या 'जयमंगला' टीकेसह देवनागरीमध्ये मूळ ग्रंथ १८९१ साली हिंदुस्तानात पहिल्यांदा प्रकाशित केला. असा ग्रंथ प्रकाशित होणे आवश्यक आहे हे त्यांना स्वत:ला पटलेले असूनहि तकालीन रीतिरिवाजांना हे पुस्तक रुचणार नाही ह्याचीहि त्यांना जाणीव होती. म्हणून पुस्तक कोठेच विक्रीस न ठेवता लेखकाकडून प्रत पोस्टाने मागवून घेणे हा एकच विक्रीचा मार्ग त्यांनी खुला ठेवला होता. ह्या विषयी आपल्या प्रस्तावनेमध्ये ते लिहितात: 'यद्यपि पण्डितमात्रगम्यप्रौढसंस्कृतनिबद्धस्यास्य ग्रन्थस्य प्रकटतयापि कृते प्रचारे न कापि साधारणजनक्षतिशङ्का किंतु वर्तमानव्यवहारानुरोधेन गुप्ततयैव विद्वत्स्वेवास्य प्रचारं चिकीर्षामि।' (पंडितांनाच समजेल अशा प्रौढ संस्कृतात लिहिलेल्या ह्या ग्रंथाचा उघड प्रचार केला तरी सर्वसामान्य जनांस त्यापासून काही नुकसानी नाही हे जरी खरे असले तरी वर्तमानव्यवहाराला धरून गुप्ततेने विद्वानांमध्येच त्याचा प्रचार व्हावा अशी माझी इच्छा आहे.)

तदनंतर १९२९ मध्ये वाराणसीच्या 'चौखंबा संस्कृत सीरीज्' मध्ये गोस्वामी दामोदर शास्त्री ह्यांनी संपादिलेली अशी ह्या ग्रंथाची नवी आवृत्ति निघाली. तदनंतर अनेकांनी आपपल्या आवृत्त्या वा भाषान्तरे प्रकाशात आणली आहेत आणि ह्या ग्रंथाविषयीचे गूढतेचे, गैरसमजांचे आणि अज्ञानाचे वलय बऱ्याच प्रमाणात आता दूर झाले आहे असे वाटते.

कामसूत्रातील विषय

ह्या प्रस्तावनेनंतर ग्रंथाच्या अन्तर्भागामध्ये काय आहे ह्यावर ओझरती दृष्टि टाकू. एकूण ग्रंथ गद्यामध्ये सूत्ररूपाने लिहिला आहे आणि मधूनमधून काही श्लोक भेटतात. श्लोकांपैकी काही वात्स्यायनाचे स्वरचित दिसतात तर काही वात्स्यायनाने अन्य पूर्वसूरींचे वापरले आहेत. ग्रंथाचे सात भाग केले आहेत आणि त्या प्रत्येक भागास 'अधिकरण' असे नाव आहे. प्रत्येक अधिकरणात काही अध्याय आणि प्रत्येक अध्यायात एक वा अधिक प्रकरणे आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये क्रमांकाने गद्यरूप सूत्रे दिली आहेत आणि मधूनमधून अधिक स्पष्टीकरणासाठी अज्ञात कवींचे श्लोक उद्धृत केले आहेत. प्रत्येक प्रकरणात एक विशिष्ट प्रश्न घेऊन त्याचा विचार केलेला आहे. असे ६४ प्रश्न ६४ प्रकरणात विवेचिले आहेत. सात अधिकरणे अशी:

१. साधारण - (अधिकरण १, अध्याय ५, प्रकरणे ५). ह्या अधिकरणाच्या पहिल्या प्रकरणात कामशास्त्रामध्यें कोणते विषय आहेत, त्यांची अनुक्रमणिका दिली आहे. त्यालाच ग्रंथकाराने 'शास्त्रसंग्रह' असे नाव दिले आहे. दुसऱ्या प्रकरणात धर्म, अर्थ व कामरूपी त्रिवर्गाची आवश्यकता मनुष्यास कितपत पाहिजे याची सोपपत्तिक माहिती दिली आहे. ह्याला 'त्रिवर्गप्रतिपत्ति' असे नाव ग्रंथकाराने दिले आहे. 'विद्यासमुद्देश' नांवाच्या तिसऱ्या प्रकरणात कामशास्त्र शिकण्याला अधिकारी कोण, व्यावहारिक किंवा शास्त्रीय ज्ञान ह्यांपैकी स्त्रियांना कोणत्या प्रकारच्या ज्ञानाची विशेष जरूरी आहे, ह्याचा विचार केला आहे. शिष्ट समाजातील स्त्रिया, पुरुष आणि गणिका ह्यांना माहीत असाव्यात अशा चौसष्ट कलांची यादी येथे आहे. विशेषत: स्त्रियांनी हे कलाज्ञान स्वत:च्या दाईची आपल्याबरोबर लहानाची मोठी झालेली मुलगी, विश्वासातील मैत्रीण, समवयस्क मावशी, जुनी सेविका, भिक्षुणी झालेली स्त्री अथवा विश्वासातील बहीण ह्यांच्याकडून एकान्तात मिळवायचे आहे. (दीपा मेहतांच्या 'कामसूत्र' ह्या चित्रपटामध्ये सिनेतारका रेखा अशाच एका व्यवसायनिवृत्त गणिकेच्या भूमिकेमध्ये गणिकाव्यवसायामध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या तरुणींना असे शिक्षण देते हा प्रसंग आठवतो.)

नागरकाने कसे वागावे, त्याचा रोजचा व्यवहार कसा असावा, त्याचे मित्र कोणत्या जातीचे किंवा दर्जाचे असावेत ह्याचा विचार पुढच्या 'नागरकवृत्त' ह्या चौथ्या प्रकरणात केला आहे. त्यापुढील पाचव्या प्रकरणात नायकाला साहाय्य करणारे दूत वा दूती कसे असावेत, त्यांची कार्ये कोणती असा विचार असून त्याला 'नायकसहायदूतीकर्मविमर्श' असे नांव दिले आहे.

२. सांप्रयोगिक - (अधिकरण २, अध्याय १०, प्रकरणे १७):- 'संप्रयोग' ह्याचा शब्दश: मूळ अर्थ म्हणजे 'जोडले जाण्याची स्थिति'. स्त्री-पुरुषमैथुनालाहि लक्षणेने हे वर्णन लावता येते आणि येथे तोच अर्थ अभिप्रेत आहे. सांप्रयोगिक अधिकरण म्हणजे ज्यामध्ये संप्रयोगाची चर्चा आहे असे अधिकरण. पुरुषांचे तीन विभागामध्ये आणि स्त्रियांचे तीन विभागात विभाजन होऊ शकते असे प्रारम्भी म्हटलेच आहे. त्यातील समान स्त्री-पुरुषांचा व्यवहार म्हणजे समरत. वीर्यस्खलनामुळे समसमान स्त्री-पुरुषांपैकी कोणास प्रारंभी आणि कोणास नंतर वीर्यपतनामुळे सुख होते ह्याचा बऱ्याच तपशीलाने विचार त्यापुढील 'प्रीतिविशेष' प्रकरणामध्ये केलेला आहे. प्रीतिविशेषाला वाढविणारी अन्य कारणे त्यानंतरच्या प्रकरणांमध्ये दिली आहेत. चुंबन, नखदंतप्रहरण, निरनिराळ्या देशांतील चुंबनादिकांचे रीतिरिवाज, नायिकेकडून नायकाप्रमाणे कृति केली जाणे (पुरुषायित), षंढसमागमवर्तन, प्रणयकलह, पशुपक्ष्यांचे अनुकरण करून निरनिराळ्या प्रकारांनी करता येऊ शकणाऱ्या रतिक्रीडा (चित्रयोग) अशी ही दुसऱ्या अधिकरणामधील अन्य प्रकरणे आहेत.

३. कन्यासंप्रयुक्तक - (अधिकरण ३, अध्याय ५, प्रकरणे ९) :- तिसऱ्या अधिकरणामध्ये नक्षत्रे व लक्षणे या दृष्टीने विवाह करण्यास योग्य म्हणजे भावी कल्याण सुचविणारी कन्या कशी असावी, वधूवरांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थाची भूमिका काय, उपवर कन्येच्या घरातील वडीलधाऱ्यांनी वरसंशोधन कसे करावे, विवाह झाल्यावर नूतनपतीने नवोढा पत्नीशी शारीरिक स्पर्शांमधून ओळख कशी वाढवावी जेणेकरून दोघांमध्ये प्रेम उत्पन्न होईल अशा गोष्टींचा विचार या अधिकरणामध्ये केला आहे. म्हणून ह्याला 'कन्यासंप्रयुक्तक' असे नाव आहे.

४. भार्याधिकारिक - (अधिकरण ४, अध्याय २, प्रकरणे ८):- भार्या, पुनर्भू व वेश्या या त्रिविध नायिकांनी घरामध्ये कसे वागावे, याचा येथे विचार केला असल्यामुळे अधिकरणास 'भार्याधिकारिक' म्हटले आहे. या अधिकरणात आदर्श भार्येचे वर्तन, भार्येने करावयाची कामे, गृहकृत्यांविषयी दक्षता आणि बहुपत्निक घरामध्ये भार्येने अन्य सपत्नींशी कसे वर्तन ठेवावे ह्याचे मार्गदर्शन आहे. अक्षतयोनि विधवेचा (जिचा विवाह झाल्यावर पतीशी संबंध येण्यापूर्वीच पति वारला अशी स्त्री) पुनर्विवाह होऊ शकत होता असे दिसते. तसेच पति मृत झाल्यानंतरहि शारीरिक भूक भागविण्याची इच्छा असलेल्या स्त्रीला दुसऱ्या पुरुषाबरोबर राहण्याची संमति होती असे दिसते, मात्र तिला विधिवत् पुनर्विवाह करता येत नव्हता. अशा दोन्ही प्रकारच्या पत्नींना 'पुनर्भू' असे म्हटले आहे. (ह्या बाबतीत वात्स्यायन मनूपेक्षा अशा स्त्रियांना अधिक स्वातन्त्र्य देणारा दिसतो. मनूला कोठल्याहि विधवेचा पुनर्विवाह अमान्य आहे. मनुस्मृति अध्याय ९ मध्ये केवळ निपुत्रिका विधवेला एका पुत्राची प्राप्ति करण्यासाठी 'नियोग' पद्धति वापरण्याची मुभा तो देतो.) 'पुनर्भू' पत्नीने वर्तन कसे ठेवावे हे ह्या अधिकरणामध्ये सांगितले आहे. पतीच्या प्रेमाला पूर्णत: पारख्या झालेल्या पत्नीने कसे वर्तन करावे हे त्यापुढे सांगितले आहे. राजाच्या अन्त:पुरातील स्त्रियांचे व्यवहार उपरोक्त पद्धतीने होतात कारण तेथेहि विवाहित राण्या, पुनर्भू, वेश्या आणि नाटकशाला अशा चार पातळ्यांवरील स्त्रिया असत. अधिकरणाच्या अखेरीस राजाने आपल्या अन्त:पुरातील स्त्रियांशी कसे वागावे ह्याचे मार्गदर्शन आहे. असे दिसते की दुपारच्या निद्रेनंतर राजाने अन्त:पुरामध्ये जाऊन सर्व राण्या आणि अन्य स्त्रियांशी त्यांच्या त्यांच्या स्थानानुसार वार्तालाप करावा. ह्या सर्व राण्यांमध्ये राजाच्या शयनगृहामध्ये जाण्याच्या पाळ्या असत आणि ह्या पाळ्यांची देखरेख करणासाठी कंचुकी आणि महत्तरिका नावाच्या सेविका असत. जिची पाळी आहे ती आणि ज्यांच्या पाळ्या पूर्वी काही प्रकाराने चुकल्या असतील अशा अन्त:पुरातील स्त्रिया आपापल्या सेविकांच्या हस्ते राजासाठी आलेपने आणि आपल्या आपल्या अंगठया कंचुकीकडे पाठवीत आणि कंचुकी त्या सर्व गोष्टी राजापुढे ठेवीत. राजा त्यापैकी जिचे आलेपन आणि अंगठी उचलेल तिची त्या रात्री पाळी असा नियम दिसतो.

५. पारदारिक - (अधिकरण ५, अध्याय ६, प्रकरणे १०):- परस्त्रीला आपल्या नादी लावण्यासाठी पुरुषामध्ये काय गुण पाहिजेत, अशी नादी लागू शकणारी स्त्री कशी ओळखावी, मनात भरलेल्या स्त्रीला वश करून घेण्यासाठी कशा प्रकारची व्यक्ति दूतकर्म करू शकते. अशा दूत किंवा दूतीने हे कार्य पार पाडण्यासाठी काय केले पाहिजे असे विषय ह्या अधिकरणाच्या पहिल्या ५ प्रकरणांमध्ये वर्णन केले आहेत. त्यानंतरची प्रकरणे अन्त:पुरात राहणाऱ्या स्त्रियांविषयी आहेत. अन्त:पुरात राहणाऱ्या अनेक स्त्रियांमध्ये एकच पति असतो. त्यामुळे काहीजणी शरीरसुखापासून वंचित राहतात. अशा स्त्रियांनी कृत्रिम साधने वापरून - उदा. केळ्यासारखे फळ, लिंगधारी पुरुषाकृति इ. - सखी अथवा दासीच्या मदतीने स्वत:चे रंजन करावे, स्त्री न मिळवू शकणाऱ्या पुरुषाने हस्तमैथुन करावे, अन्त:पुरातील स्त्रियांच्या दासी आणि परिचारिकांनी बाहेरील नागरकांना आशा दाखवून आत आणावे, मात्र अशा नागरकांनी ह्या करण्यातील धोके ध्यानात ठेवून अशा आकर्षणांपासून दूर राहावे, अन्त:पुरामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या पुरुषाने काय काळजी घेतली पाहिजे आणि कशापासून सुरक्षित राहायला पाहिजे अशा प्रकारचे उपदेश वात्स्यायन देतो.

६. वैशिक - (अधिकरण ६, अध्याय ६, प्रकरणे ६):- गणिका - वेश्या ह्या विषयाच्या सन्दर्भातील माहिती ह्या अधिकरणामध्ये दिलेली आहे म्हणून या प्रकरणाला 'वैशिक' अधिकरण असे नाव आहे. यामध्ये वेश्येने वागण्याचे नियम, वेश्येस मदतनिसांची आवश्यकता, संबंध ठेवण्यास योग्य आणि अयोग्य पुरुष विचार, लक्ष्य केलेल्या पुरुषाकडून द्रव्य मिळविण्याचे मार्ग, विरक्त पुरुषास अनुरक्त करण्याचे उपाय, द्रव्यरहित पुरुषास घालवून देण्याचा मार्ग, इत्यादि प्रकरणे या अधिकरणामध्ये आहेत.

७. औपनिषदिक - (अधिकरण ७, अध्याय २, प्रकरणे ६):- वशीकरण, लिंगवृद्धि वगैरेसाठीचे तोडगे आणि उपाय या अधिकरणामध्ये सांगितलेले आहेत म्हणून याला औपनिषदिक (गुप्‍त उपाय अधिकरण) असे नाव आहे.

वात्स्यायनाच्या ग्रन्थाचा हा विस्तृत आवाका पाहता असे दिसते की ज्या वाचकाला केवळ एक sex manual हवे आहे त्याने आपला वेळ ह्या ग्रन्थामध्ये न दवडता 'अनंगरंग' कल्याणमल्लाने १६व्या शतकामध्ये लिहिलेल्या ग्रन्थाकडे जावे हे उचित, कारण तेथे वात्स्यायनाच्या ग्रन्थातील दुसरे अधिकरण (संभोगक्रियांचे वैविध्य) आणि सातवे अधिकरण (वशीकरण, आकार वाढविण्यासाठीचे जादूटोणे) इतकेच दिले आहे.

हे झाले 'कामसूत्रा'तील विषयांचे ओझरते दर्शन. आता ग्रंथामध्ये प्राचीन भारतीय नागर जीवनाचे काय दर्शन घडते ते पाहू.

नागरक

वात्स्यायनाचा ग्रंथ म्हणजे समृद्ध नागरकाचा मार्गदर्शक आहे. अशा नागरकाने आपले ब्रह्मचर्यवृत्तीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि नागरकाचे जीवन जगण्यासाठी पुरेसे धन आणि फावला वेळ त्याच्यापाशी उपलब्ध आहे. तो वरच्या तीन वर्णांपैकी एका वर्णाचा आहे. त्याचे धन धर्मशास्त्राला मान्य अशा मार्गाने त्याने जमविले आहे. हे मार्ग म्हणजे ब्राह्मणाच्या बाबतीत त्याला यज्ञकार्य, अध्यापन अशातून मिळणारी दक्षिणा, क्षत्रियाच्या बाबतीत सैनिकी व्यवसायाचे धन आणि वैश्याच्या बाबतीत व्यापार, सावकारी इत्यादि. वारसाने आलेला पैसाहि ह्या कामाला उपयोगी येतो. एखाद्या तरुणाचा पिता मोठा राजपुरुष आणि राजाचा विश्वासू असेल तर अशा पित्याचे धन त्याच्या मुलाच्या नागरकवृत्तीने राहण्याच्या कामी येऊ शकते. 'कुट्टनीमतम्' (कुंटिणीचा उपदेश) ह्या काश्मीरच्या राजाचा मन्त्री दामोदरगुप्त ह्याने आठव्या शतकामध्ये रचलेल्या काव्यात 'राजपुरुषाचा पुत्र चिन्तामणि हा तुला योग्य सावज आहे' असा सल्ला विकराला नावाची कुंटीण मालती ह्या तरुण गणिकेला देतांना दिसते. एखाद्याजवळ चौसष्ट कलांचे ज्ञान असेल पण पैशाचा अभाव असेल तर असा मनुष्य 'पीठमर्द' किंवा 'विट' असा दुसऱ्या नागरकाचा मित्र बनून त्याच्या साहाय्याने नागरक जीवनाचा लाभ घेऊ शकतो. ह्यांपैकी विशेषत: विट अनेक संस्कृत नाटकांमधून भेटतो. ('Libertine' आणि 'pander' हे अनुक्रमे पीठमर्द आणि विट ह्यांचे चांगले समानार्थी शब्द आहेत.)

अशा नागरकाने आपल्या निवासासाठी एखादे पत्तन, नगर, किवा लहानमोठे खर्वट, असे निवडून तेथे राहावे. त्यामध्ये अन्यहि प्रतिष्ठित लोक राहतात, तसेच नागरकाला आपला व्यवसायहि चालवता येतो. (नगरांच्या ह्या प्रकारांचे यशोधराने दिलेले स्पष्टीकरण असे आहे. पत्तन म्हणजे राजधानीची जागा, नगर म्हणजे ८०० गावांचे केन्द्र असलेले मोठे गाव, मोठे खर्वट - ह्याला 'द्रोणमुखी' असेहि म्हणतात - म्हणजे ४०० गावांचे केन्द्र आणि खर्वट म्हणजे २०० गावांचे केन्द्र.) प्राचीन भारतामध्ये वात्स्यायनाच्या वेळी अनेक लहानमोठी राज्ये सर्वत्र विखुरली होती आणि त्या प्रत्येक राज्याचे लहानमोठे राजधानीचे नगर होते. अशा अनेक नगरांची नावे आणि वर्णने आपल्याला तत्कालीन वाङ्मयामध्ये दिसतात. आजच्या तुलनेने खूपच कमी लोकसंख्या आणि मुबलक जमीन ह्यामुळे शेती आणि शेतीवर अवलंबून असलेले व्यवसाय चालू होते. पश्चिमेकडचे देश आणि पूर्वेकडचे चीनसारखे देश ह्यांच्या मधोमध असल्याने भारतदेशाचा व्यापारहि जोरात होता आणि ही सर्व संपत्ति अशा लहानमोठया नगरांमध्ये केन्द्रित होत होती. असे एखादे समृद्ध नगर निवडून नागरकाने तेथे आपले वसतिस्थान निश्चित करावे असा उपदेश वात्स्यायन नागरकाला देतो.

नागरकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या व्यक्तीने अशा नगरामध्ये आपले सुंदर घर - वासगृह - बांधून ते सुबक वस्तूंनी सजवावे. अशा घराजवळ मुबलक पाण्याचा साठा असावा. घरामध्ये सेवकांसाठी वसतीची वेगळी जागा असावी. घराचे दोन भाग असावेत. एक आतला भाग घरातील स्त्रियांसाठी आणि दुसरा बाहेरचा भाग नागरकाच्या स्वत:च्या व्यवसायासाठी आणि मनोरंजनासाठी. घरामध्ये घरच्या उपयोगासाठी लागणारी फळे, फुले, धान्य देणारी एक बाग (पुष्पवाटिका) असावी. असे घर पुरेसे मोठे असले तर त्याला 'हर्म्य' किंवा 'प्रासाद' म्हणत असत. अशा प्रासादाच्या गच्चीवर बसून नागरक चन्द्रप्रकाशाचा आनंद घेऊ शके. अशा प्रासादांमध्ये थंडाव्यासाठी कारंजी आणि फवारे असलेले धारागृह - ज्यास समुद्रगृह असे म्हणत असत - बांधले जाई.

नागरकाच्या स्वत:च्या वापराच्या भागात कशी व्यवस्था असावी? सारवून गुळगुळीत जमीन केलेल्या ह्या भागामध्ये एक शय्या असावी आणि तिच्यावर पांढरेशुभ्र अस्तरण आणि शिरोभागासाठी आणि पायांसाठी उशा असाव्यात. तशीच अजून एक शय्या - प्रतिशय्यिका - असावी. दोन शय्यांचे कारण 'जयमंगला' टीका लिहिणारा यशोधर ह्याने दिले आहे ते असे. पहिली शय्या ही नागरकाच्या झोपण्यासाठी आणि प्रतिशय्या पत्नीसह करण्याच्या शृंगारासाठी. यशोधर असे सांगतो की ज्या शय्येवर नागरक आपल्या पत्नीबरोबर शृंगार करतो त्या वापरलेल्या शय्येवर न झोपणे हा शिष्टाचार. ह्यासाठी दोन शय्यांची ही सोय. गणिकेबरोबरचा शृंगार झोपण्याच्याच शय्येवेर केलेला चालत असे. शय्येच्या मागे नागरकाच्या देवांच्या मूर्ति आणि रात्री वापरून उरलेला चंदनलेप, फुलांच्या माळा, मेण ठेवण्याचा करंडा, घामाचा वास येऊ नये म्हणून वापरायची सुगन्धी द्रव्ये, तमालपत्रे, तोंडाला वास येऊ नये ह्यासाठी मातुलुंग ह्या लिंबाच्या जातीच्या फळाची साले आणि खाण्यासाठी ताम्बूल - पानांचे विडे - ठेवण्यासाठी जडावाचे लहान मेज असावे. जमिनीवर मुखरस सोडण्यासाठी तस्त - पतत्ग्रह - असावे. भिंतीवर हत्तीच्या दाताच्या खुंटीवर - नागदन्त - गवसणीमध्ये घातलेली वीणा, चित्र काढण्याचा फलक, रंगांच्या कांडयांची गुंडाळी, एखादे पुस्तक आणि कुरण्टकाच्या फुलांच्या (Amaranth) माळा असाव्यात. कुरण्टकाची फुले शय्येवर वापरण्याचे कारण यशोधर देतो ते असे की ही फुले लवकर कोमेजत नाहीत. शय्येपासून फार दूर नाही असे अस्तरण जमिनीवर असावे आणि तेथे डोके टेकायला तक्के असावेत. फाशांनी खेळायचे आणि सोंगट्यांनी खेळायचे फलक असावेत. एका बाजूस विणण्याची आणि लाकडावर कोरीव काम करण्याची उपकरणे असावीत. बाहेरच्या बाजूस पोपट-मैना-सारिका अशा क्रीडापक्ष्यांचे पिंजरे असावेत. वृक्षवाटिकेमध्ये दाट सावलीच्या जागी अस्तरण घातलेला झोपाळा असावा.

नागरकाचा नित्याचा दिनक्रम ह्यानंतर सांगितला आहे. त्याने पहाटे उठून आह्निके आवरावीत, दन्तधावन वापरावे, सुवासिक धूर दिलेली वस्त्रे आणि शिरोभूषण परिधान करावीत. अल्प प्रमाणात चन्दनलेप आणि माळा लेऊन अळत्याच्या आणि मेणाच्या वापराने ओठ लाल करावेत, आरशामध्ये बघावे, मुखवासासाठी तांबूल खावा आणि आपल्या नित्याच्या कामासाठी बाहेर पडावे. वर उल्लेखिलेल्या चौसष्ट कलांपैकी पाच कला ह्या प्रसाधनाशी संबंधित आहेत. त्या म्हणजे माल्यग्रन्थन (माळा गुंफणे), शेखरकापीडयोजन (शेखरक आणि आपीडक अशा प्रकारची शिरोभूषणे - diadems and chaplets - तयार करणे), नेपथ्यप्रयोग (वस्त्रपरिधान), कर्णपत्रभंग (कानाचे अलंकार बनविणे), गन्धयुक्ति (सुवासिक द्रव्ये मिसळणे) आणि भूषणयोजन (दागिने घालणे). ह्या कलांचे ज्ञान येथे कामास येते.

नागरकाची वेषभूषा कशी असावी ह्याचे वात्स्यायनाने दिलेले विवरण काहीसे त्रोटक आहे. ह्याचेच अधिक तपशीलातील वर्णन दामोदरगुप्ताच्या वर उल्लेखिलेल्या 'कुट्टनीमत' काव्यात आहे. मालती नावाचा गणिकेला 'चिन्तामणि हा तुला उत्तम सावज आहे' असे सल्ला देतांना विकराला नावाची कुंटीण त्याचे जे वर्णन करते ते वात्स्यायनाच्या नागरकाला तंतोतंत लागू होते आणि त्यावरून दुसऱ्या-तिसऱ्या शतकातला सुखवस्तु नागरक कसा असेल हे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. ह्या चिन्तामणीचा पिता हा एक महत्त्वाचा राजपुरुष आहे आणि तो नेहमी कोठल्यातरी राजकार्यावर बाहेरगावीच असतो. परिणामत: चिन्तामणि हाच जणू गावाचा मुखिया असल्यासारखा वागतो. त्याने पाच बोटे लांबीचे केस राखले आहेत. त्याच्या एका कानात 'दलवीटक' आणि दुसऱ्यात 'सीसपत्रक' फुलांच्या आकाराची कुंडले आहेत. बोटात आंगठया आणि गळ्याभोवती सोन्याचे हार आहेत. त्याने अंगावर केशराचे विलेपन लावले आहे. त्याच्या अंगावर सोनसळी वस्त्रे आहेत. त्याच्या मागोमाग त्याचा ताम्बूलकरंडक घेऊन एक सेवक चालत असतो. त्याच्या पायात मेण लावून नरम केलेली आणि तुरुष्क - तुर्की - पद्धतीचा नाल लावलेली पादत्राणे आहेत.

कामे करून परतल्यावर नित्यस्नान करावे. त्यामध्ये प्रत्येक दुसऱ्या दिवशी अंगमर्दन, तिसऱ्या दिवशी फेस निर्माण करणाऱ्या गोष्टींचा उपयोग, - रिठे, शिकेकाई इत्यादि, साबण भारतात अरबांबरोबर आला - चौथ्या दिवशी डोके आणि चेहरा ह्यांची श्मश्रू करावी. शरीराच्या अन्य भागांतील केस दर पाचव्या आणि १० व्या दिवशी काढून टाकावेत. काखेतील घाम नियमितपणे स्वच्छ करावा. सकाळी आणि दुपारी भोजन करावे. भोजनानंतर पोपट, सारिका अशा पक्ष्यांचे बोलणे ऐकावे. लावा पक्षी, कोंबडे आणि एडक्यांच्या झुंजी पाहाव्यात. पीठमर्द, विट आणि विदूषक ह्या मित्रांबरोबर कलाविनोदात वेळ काढावा. नंतर निद्रा घ्यावी. उठल्यावर पुन: प्रसाधन करून बाहेर पडावे आणि समशील नागरक मित्रांबरोबर गप्पागोष्टी कराव्या. सायंकाळी गायन ऐकावे. त्यानंतर धूपाने सुगन्धित केलेल्या आणि फुलांनी सजविलेल्या वासगृहामध्ये आधी ठरलेल्या गणिकेची पीठमर्द, विट आणि विदूषक ह्या मित्रांबरोबर वाट पहावी, तिच्याकडे दूती पाठवावी अथवा स्वत: जावे. आलेल्या गणिकेला तिचे प्रसाधन नीट करायला मदत करावी. ही नित्याची दिनचर्या. वात्स्यायन येथे थांबतो. यशोधराने दिलेले कारण असे की ह्यानंतरची कामक्रीडा 'सांप्रयोगिक' ह्या दुसऱ्या अधिकरणामध्ये वर्णिली आहे.

दुसऱ्या अधिकरणातील दहाव्या अध्यायामध्ये ह्यापुढील वर्णन आहे. आलेल्या गणिकेसह मद्यप्राशन झाल्यावर पीठमर्द, विट आणि अन्य उपस्थितांना फुले, गन्धद्रव्ये, ताम्बूल देऊन निरोप द्यावा. तदनंतर एकान्तात रतिक्रीडा करावी. रतिक्रीडेनंतर दोघांनीहि एकमेकांकडे न पाहता वेगवेगळे स्नानगृहाकडे जावे. तेथून परतल्यावर ताम्बूलसेवन करावे, चन्दनाची उटी एकमेकांस लावावी आणि काही अल्पोपहार करावा. त्यामध्ये फळांचा रस, तळलेले पदार्थ, आंबवलेली तांदुळाची कांजी, मांसाच्या तुकडयांसह सूप, सुके मांस, साखरेसह संत्र्यासारखी फळे, इत्यादींचा समावेश असावा. नायकाने सहचरीसह सौधावर बसून चन्द्रप्रकाशाचा आनंद घ्यावा आणि ध्रुव, अरुन्धती, सप्तर्षि इत्यादि तारे ओळखावेत.

हे पीठमर्द, विट आणि विदूषक नावाचे नागरकाचे मित्र कोण आहेत? पीठमर्द आणि विट हे दोघेहि अकिंचन आहेत आणि तरीहि चौसष्ट कलांचे ज्ञान त्यांच्यापाशी आहे. संपत्ति सोडली तर नागरक होण्याची अन्य सर्व पात्रता त्यांच्यापाशी आहे. तिचा उपयोग करून आपले पोट भरण्याच्या हेतूने देश सोडून दुसऱ्या देशात कोणा नागरकाचा सहायक बनतो तो पीठमर्द. विटहि तसाच पण पीठमर्दाला पत्नी नाही, मात्र विटाला आहे आणि तो त्याच देशाचा रहिवासी आहे. विदूषक म्हणजे हसूनखेळून असणारा आणि गमत्या असा नागरकाचा विश्वासू मित्र. नागरकाची गुप्ततेने करायची कामे तो आनंदाने करतो. विट आणि विदूषक ही पात्रे संस्कृत नाटकांमध्ये नेहमी भेटतात. टीकाकार यशोधर ह्यांना 'उपनागरक' असे म्हणतो. हीच कार्ये कलाचतुर अशी भिक्षुकपत्नी, दासीपुत्री, विधवा स्त्री आणि म्हातारी कुट्टनी (कुंटीण) ह्याहि करू शकतात.

नित्याच्या दिनचर्येपलीकडे नागरकाची नैमित्तिक म्हणजे कारणाने उद्भवणारी कार्येहि असतात. आवश्यकतेनुसार देवळांचे - आयतन - प्रबन्धन म्हणजे व्यवस्थापन, नागरकांच्या काव्यशास्त्रविनोदनासाठी गोष्ठींचे आयोजन, मद्यप्राशनासाठी एकत्र येणे, उद्यानविहाराच्या भेटी, समस्यापूर्तीसारख्या खेळांसाठी एकत्र जमणे ह्यातहि नागरक वेळोवेळी भाग घेत असतो.

प्रतिमास पंचमीचा दिवस हा सरस्वतीचा दिवस. त्या दिवशी सरस्वतीच्या आयतनामध्ये नागरकांनी एकत्र जमावे आणि नेमलेले गायक आणि नर्तक, तसेच बाहेरून आलेले कलाकार ह्यांनी देवीची सेवा करावी. अशा बैठकीला 'समाज' म्हणतात. दुसऱ्या दिवशी बाहेरच्या कलाकारांना योग्य ती पारितोषिके देऊन निरोप द्यावा. (सध्या सरस्वतीची अशी वेगळी देवळे कोठेच दिसत नाहीत. त्या काळात ती गावोगावी असावीत असे दिसते.) हे करण्यासाठी नागरक ज्या व्यावसायिक 'गणा'चा सदस्य आहे त्या गणाने एकोप्याने असावे आणि येणाऱ्या-जाणाऱ्याचे आदरातिथ्य करावे. अन्य देवतांच्या विशेष दिवशी असाच समारंभ करावा. येथे 'गण' म्हणजे त्या त्या व्यवसायातील लोकांचा संघ किंवा guild. मृच्छकटिक नाटकात कामदेवाच्या आयतनाचा उल्लेख आहे ते येथे स्मरते.

गणिकेच्या घरी, मंडपामध्ये वा एखाद्या नागरकाच्या मोकळ्या घरामध्ये विद्या, बुद्धि, शील, वित्त आणि वयाने समान असलेल्या नागरकांचे गप्पागोष्टी करण्यासाठी जमणे ह्याला गोष्ठीसमवाय म्हणतात. तेथे कलाविषयक चर्चा, समस्यापूरण असे केले जावे. अशा गोष्ठींमध्ये यशस्वी ठरण्यासाठी आवश्यक असलेले गुण वात्स्यायन सांगतो ते असे - केवळ संस्कृतमध्ये नाही आणि केवळ देशभाषेमध्ये नाही, तर दोन्ही प्रकारांनी बोलू शकणाऱ्याला गोष्ठीमध्ये बहुमान मिळतो. तेथे सुज्ञ व्यक्तीने द्वेषपूर्ण, अतिस्वैर आणि हिंसक असे काही बोलू नये. लोकांना काय आवडते ह्याचा कल पाहून आणि त्यांचे रंजन हेच डोळ्यापुढे ठेवून गोष्ठीमध्ये भाग घेणारा यश पावतो. संस्कृत आणि देशभाषा ह्या दोन्हींवर वात्स्यायनाने दिलेला भर पाहून असे वाटते की त्याच्या काळात संस्कृत आणि देशीभाषा अशा दोन्ही प्रकारच्या भाषांचे मिश्रण शिष्ट समाजाच्या बोलण्यात असावे.

येथे थोडे विषयान्तर. वेदांमधील प्राचीन आर्ष भाषेनंतर जी पाणिनीने संस्कारित केलेली भाषा आहे ती आपल्याला अभिजात काव्य, नाटक, शास्त्रचर्चा अशा प्रकारच्या ग्रन्थांमध्ये आढळते. कालिदासासारख्या कवींनी हीच भाषा वापरली आहे. ह्या भाषेला आपण आज 'संस्कृत' भाषा म्हणतो. अशी ही संस्कृत म्हणजे संस्कार केली गेलेली भाषा हि कोणा समाजगटाची बोलण्याची भाषाहि होती का ती केवळ शिष्ट लोकांची ग्रान्थिक भाषाच होती हा एक वादाचा मुद्दा आहे. एका मतानुसार ही भाषा केवळ ग्रान्थिकच होती आणि समाजातील सर्व दैनिक व्यवहार निरनिराळ्या देशी भाषांमधूनच केला जात असे. संस्कृत भाषेला 'संस्कृत' हे नाव केव्हा पडले हाहि असाच एक वादाचा प्रश्न आहे.

ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कामसूत्रातील दोन उल्लेख उपयुक्त ठरू शकतील. गोष्ठीसमवायामध्ये यशस्वी होण्यासाठी संस्कृत आणि देशीभाषा अशा दोहोंचाहि उपयोग केल्यास बहुमान मिळतो अशा अर्थाचा एक श्लोक गोष्ठीसन्दर्भामध्ये वात्स्यायन देतो. नात्यन्तं संस्कृतेनैव नात्यन्तं देशभाषया। कथां गोष्ठीषु कथयॅंल्लोके बहुमतो भवेत्॥ (संपूर्ण संस्कृत नाही आणि संपूर्ण देशी भाषेत नाही अशी कथा सांगणारा गोष्ठीमध्ये बहुमान मिळवतो.) चौसष्ट कलांच्या यादीमध्ये 'देशभाषाविज्ञान' ही कला शेहेचाळिसाव्या क्रमांकावर आहे. ५ (१.४.१६) ह्यावरून असे म्हणता येईल की शिष्ट लोकांची नेहमीची परस्परांमध्ये वापरायची भाषा संस्कृत असावी आणि म्हणूनच 'देशभाषाविज्ञान' ह्याला कलेचा दर्जा मिळालेला आहे.

एकमेकाच्या घरांमध्ये 'आपानक' म्हणजे मद्यपानाच्या बैठका व्हाव्यात. तेथे मधु, मैरेय, आसव अशी मद्ये, तसेच नाना क्षार, फळे, भाज्या घातलेल्या, कडू, तिखट, आंबट अशा चवींच्या खाद्यपदार्थांचे सेवन गणिकांनी सर्वांना घडवावे आणि स्वत: करावे. हे 'आपानक' उद्यानातहि घडवून आणले जाऊ शकते. प्राचीन ग्रीसमधील hetaera तेथील नागरकांबरोबर symposium मध्ये (शब्दश: अर्थ मद्यप्राशनाची बैठक) भाग घेत असत तो 'आपानका'चाच ग्रीक अवतार दिसतो. यजुर्वेदातील रुद्रसूक्तामध्ये चमक भागात सूक्तकर्ता रुद्रदेवतेकडून ज्या अनेक भौतिक जीवन आनंदी करणाऱ्या गोष्टी मागतो त्यामध्ये 'सपीतिश्च मे' अशी एक मागणी आहे. 'सपीति' म्हणजे एकत्र बसून मित्रांसह मद्यपान. 'आपानका'चा हा एक आणखी जुना अवतार दिसतो.

प्राचीन भारतामध्ये मध, नाना धान्ये, उसाचा रस आणि त्याच्यातून निघणाऱ्या गुळासारख्या गोष्टी, फळाचे रस अशांपासून आंबवण्याच्या प्रक्रियेने नाना नावांची मादक द्रव्ये करून प्यायची पद्धत होती. ह्याच्या अनेक याद्या निरनिराळ्या जागी दिसतात. त्यातील ही एक पहा: माध्वीक मधापासून, खार्जूर खजुरापासून, गौडी गुळापासून, शीधु उसाच्या रसापासून, सुरा तांदुळापासून, कोहल यवापासून, मधुलिका गव्हापासून, पैष्टी नाना धान्यांपासून, मधूकपुष्पोत्थ मोहाच्या फुलांपासून, जाम्बव जांभळापासून, कादम्बरी कदंबाच्या फुलांपासून, वारुणी ताड, माड आणि खजुराच्या झाडाच्या रसापासून (sap), वल्कलि बेहडा आणि गूळ ह्यांच्या मिश्रणापासून. अशा प्रकारची पेये एकत्र बसून पिऊन काव्यशास्त्रविनोदात काळ घालविणे म्हणजे 'आपानक'. येथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. वात्स्यायनाच्या काळापर्यंत 'मनुस्मृति' लिहून झाली असणार. तिच्यामध्ये त्रैवर्णिकांना कोणतेहि मद्यपान निषिद्ध आहे. मनु म्हणतो - सुरा अन्नाचा मल आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांनी सुरा पिऊ नये. गौडी, पैष्टी आणि माध्वी हे सुरेचे तीन प्रकार. ब्राह्मणांनी ते पिऊ नयेत. मद्य, मांस, सुरा, आसव हे यक्ष, राक्षस, पिशाचांचे अन्न आहे. देवाला दिलेला हवि खाणाऱ्या ब्राह्मणाने ते खाऊपिऊ नयेत. काय प्यावे हेहि मनु सांगतो - अग्निवर्ण गोमूत्र, पाणी, दूध, घृत, गोमयाचा रस हे आमरणान्त प्यावे. मनूच्या तुलनेमध्ये वात्स्यायन बऱ्याच सवलती देत आहे.

आपानकाबरोबरच खाणे येणारच. येथेहि वात्स्यायन शाकाहार आणि मांसाहार दोन्हींना संमति दर्शवितो. चौसष्ट कलांच्या यादीत 'विचित्रशाकयूषभक्ष्यविकारक्रिया' ही कला दाखविली आहे. यशोधराने तिचा अर्थ वेगवेगळ्या भाज्या, यूष (soup) इत्यादि बनविणे असा दिला असून 'यूष' ह्याचे मुगासारख्या डाळींपासून बनविलेले आणि मांसापासून बनविलेले असे दोन अर्थ दाखविले आहेत. खाद्यपदार्थांमध्ये भाताची कांजी, तळलेले आणि भाजलेले मांस अशा गोष्टींचा समावेश आहे.१०

कधीकधी सकाळी उठल्यानंतर सजवलेल्या घोडयावर बसून गणिकांसह आणि परिचारकांना बरोबर घेऊन उद्यानात जावे. तेथे कोंबडे, लावा पक्षी, एडके ह्यांच्या प्रेक्षणीय झुंजींमध्ये काळ घालवून उद्यानात गेल्याच्या खुणा अंगावर धारण करून संध्याकाळी स्वगृही परतावे. हा झाला उद्यानविहार. असाच जलविहार. तो मगरी, मोठे मासे इत्यादि काढून टाकलेल्या पाण्याच्या आणि चारी बाजूंनी बांधलेल्या जलाशयामध्ये करावा.

ह्यानंतर काही सणांची नावे आणि वर्णने येतात.११ त्यामध्ये यक्षरात्रि, कौमुदीजागर, सुवसन्तक अशा सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या, तसेच स्थानिक महत्त्वाच्या सहकारभंजिका, अभ्यूषखादिका, बिसखादिका, नवपत्रिका, उदकक्ष्वेडिका, पांचालानुयान, एकशाल्मली, यवचतुर्थी, आलोलचतुर्थी, मदनोत्सव, दमनभंजिका, होलाका, अशोकोत्तंसिका, पुष्पावचायिका, चूतलतिका, इक्षुभंजिका, कदम्बयुद्ध असे उल्लेख आहेत. यशोधराच्या टीकेवरून ह्या सणांचे स्वरूप आणि चालू नाव काय असावे ह्याबद्दल थोडा तर्क करता येतो. यक्षरात्रि म्हणजे दिवाळीचा सण असावा कारण त्या दिवशी लोक द्यूत खेळतात असा उल्लेख यशोधराने केला आहे. कौमुदीजागर अश्विनाच्या पौर्णिमेला होतो. चन्द्रकिरणांखाली लोक रात्र जागून काढतात. हीच सध्याची कोजागिरी पौर्णिमा. सुवसन्तक म्हणजे वसन्तपंचमी असावी. ह्या दिवशी सुंदर स्त्रीने मद्याची चूळ अशोक वृक्षाच्या बुंध्यावर टाकली तर तो चांगला फुलतो असा संस्कृत काव्यांमधील संकेत आहे. स्थानिक सणांमध्ये सहकारभंजिका म्हणजे आंबे खाण्याचा उत्सव दिसतो. नंतर अभ्यूषखादिका म्हणजे पहाटे ताजी धान्ये विस्तवावर भाजून खाणे असा उत्सव दाखविला आहे. ह्यालाच आपण हुरडा म्हणतो. आलोलचतुर्थी म्हणजे चतुर्थीला झोपाळ्यांवर बसण्याचा सण. सध्या हीच क्रीडा नागपंचमीला होते. होलाका म्हणजे होळी. ह्या दिवशी किंशुकपुष्पांचा रंग काढून तो एकमेकांवर टाकतात. बाकीचे खेळ त्यांच्या नावावरून तर्काने जाणावे लागतात. बिसखादिका म्हणजे कमळाचे तन्तु खाणे. उदकक्ष्वेडिका म्हणजे एकमेकांवर पाणी मारणे. अशोकोत्तंसिका आणि चूतलतिका म्हणजे मस्तकावर अशोकाची नवी पालवी आणि आंब्याचा मोहोर तुऱ्यासारखा लावणे. इक्षुभंजिका म्हणजे ऊस खाण्याचा किंवा सध्या केला जातो तसा रसपानाचा कार्यक्रम असावा.

आतापर्यंत वर्णन केलेले सर्व आचरण नगरात राहणाऱ्या सुसंस्कृत नागरकाचे आहे. लहान खेड्यातील ग्रामीण प्रजा त्यापासून दूर असे पण त्यांनीही आपली पातळी उंचावण्याचा प्रयत्न करावा असा उपदेश वात्स्यायन देतो. नागरी जीवनाचे दर्शन झालेल्या ग्रामीणाने आपल्या विचार करू शकणाऱ्या - विचक्षण - बान्धवांसमोर त्याचे वर्णन करावे. त्यांनीहि तसे वागण्याचा, गोष्ठी इत्यादींचे आयोजन करण्याचा आग्रह धरावा.

अंतर्गृह

वात्स्यायनाच्या नागरकाचे दिवस अनेकविध आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये जातो. त्याच्या भार्येबाबत मात्र वात्स्यायन तिच्या वर्तनावरचे नानाविध निर्बंधच प्रामुख्याने सांगतांना दिसतो. तत्कालीन स्मृतिकारांच्या पुरुषप्रधान परंपरेला हे धरूनच आहे. पुरुषाप्रमाणेच स्त्रीमध्येहि कामभावना असते हे तो अमान्य करीत नाही. मात्र पुरुषाने आपली कामभावना शमविण्यासाठी काय करावे हे तो जितक्या तपशीलाने सांगतो तितक्या तपशीलात स्त्रीच्या बाबतीत तो जात नाही. गणिकेच्या गणिकावृत्ति धारण करण्यामागे कामेच्छा असते असे तो मोकळेपणे लिहितो, पण विवाहित भार्येच्या बाबतीत तो तिची घरातील कर्तव्येच सांगतांना दिसतो.

वात्स्यायनाच्या डोळ्यासमोरचे कुटुंब हे आजच्यासारखे 'हम दो हमारे दो' असे केन्द्रित नाही. ते एकत्र कुटुंब आहे आणि सध्याच्या समाजात बहुश: स्मृतिरूपाने उरलेल्या समृद्ध एकत्र कुटुंबात पत्नीकडून जी अपेक्षा ठेवली जात असे तीच वात्स्यायनाच्या लेखनात दिसते. तिने वडीलधाऱ्यांच्या आज्ञेत राहावे, देवधर्माची आणि कुलाचारांची काळजी घ्यावी, पतीच्या संमतीशिवाय उंबरठा ओलांडू नये, पतीला भोजनात काय आवडते आणि काय नाही ह्यावर ध्यान ठेवावे, पतीकडून काही दुर्वर्तन किंवा अनावश्यक खर्च झाला तरी त्यावर वाद न करता त्याला एकान्तात नम्रपणे ते सांगावे अशा अपेक्षा तो ठेवतो. मात्र ही पत्नी अगदी निरक्षर अणि परावलंबी नाही. तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. तिने वर्षाचे उत्पन्न आणि व्यय ह्यांचा ताळमेळ ठेवावा, परिचारकांचे वेतन द्यावे, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तु बाजारावर नजर ठेवून स्वस्त असतील तेव्हा घेऊन ठेवून साठवाव्या, स्वयंपाकात लागणाऱ्या भाज्या वेळच्यावेळी पेरून तयार ठेवाव्यात, कापसाचे सूत काढून त्याची वस्त्रे बनवावी, मोहरीचे तेल तसेच उसापासून गूळ वेळच्यावेळी काढून तयार ठेवावेत, तांदूळ कांडून घ्यावेत, घराच्या वापरासाठी दोर वळून ठेवावेत, शेतीच्या कामाचे प्राणी तसेच मनोरंजनासाठी ठेवलेले शुक-सारिका-कोकिला-मयूर-वानर-मृग ह्यांची देखभाल करावी, जुनी वस्त्रे सांभाळून ठेऊन, परिचारकांना चांगल्या कामासाठी बक्षीस म्हणून ती वेळोवेळी देत जावे अशा अनेक सूचना वात्स्यायन देतो. ह्यावरून स्त्रीलाहि कामापुरते लिहिणे-वाचणे होते हे जाणवते आणि त्याचबरोबर घर कसे चालत असे ह्याचीहि कल्पना येते. राजा, त्याचे मन्त्री, महामात्र, वेगवेगळ्या दर्जाचे कार्याध्यक्ष, नगरप्रमुख अशा उच्चपदस्थांच्या कन्या पुरुषांइतक्याच शिक्षित असत असा उल्लेख वात्स्यायनाने एका जागी केला आहे.

नागरकाच्या अन्तर्गृहामध्ये एकाहून अधिक पत्नी असणे ही सर्वांच्या अंगवळणी पडलेली समाजमान्य गोष्ट होती. लहान वयात विवाह झाल्यानंतर पति वारल्यामुळे विधवा झालेल्या कुमारिका कन्येस पुनर्विवाह करता येत असे आणि अशा पत्नीस 'पुनर्भू' असे म्हणत असत. पुनर्भूचा दर्जा अन्तर्गृहामधील अन्य स्त्रियांहून खालचा असे. काही गणिका कायमच्या एका पुरुषाला अंगीकारून त्याच्या अन्तर्गृहाचा भाग होत असत. त्यांचा दर्जा पुनर्भूच्याहि खालचा असे. पुरुषाशिवाय राहणे जिला अशक्य आहे अशा विधवेलाहि एखाद्या पुरुषाच्या अन्तर्गृहामध्ये जागा मिळे. ह्या सर्व स्त्रियांनी एकमेकींशी खेळीमेळीने कसे राहावे ह्याचे धडे वात्स्यायन देतो.

स्त्रियांच्या संदर्भात 'चौसष्ट विद्यां'चा उल्लेख अनेक जागी भेटतो. त्यांचे ज्ञान नागरकाला तसेच स्त्रियांनाहि असावे अशी अपेक्षा होती. विवाहापूर्वी पितृगृहीच कन्या ह्या विद्या शिकून घेत असत. अशा विद्यांची यादी पहिल्या अधिकरणामध्ये दिलेली आहे.१२ त्यामध्ये लेखन, वाचन, गायन, वीणा-तन्त्री-डमरु-जलतरंग अशा वाद्यांचे वादन, नर्तन, भिंतीवर आणि फलकावर चित्रकला अशा सहज जाणवणाऱ्या कलांबरोबर प्रहेलिका (उखाणे), पुस्तकवाचन, नाटकाख्यायिकादर्शन, काव्यसमस्यापूरण, छन्दोज्ञान (वृत्तांचे ज्ञान) अशा लेखन-वाचनाशी परिचय दाखविणाऱ्या कला आहेत. ह्याशिवाय पाककला, लाकडावर कोरीव काम, वेताच्या विणलेल्या गोष्टी करणे, सुईने विणणे-शिवणे-रफू करणे, सोने-रुपे-रत्ने ह्यांची परीक्षा, मुलांची खेळणी बनविणे अशा उपयुक्त कला आहेत. चित्रकलेमध्ये कोणते रंग प्रामुख्याने वापरले जात आणि ते कसे मिळवले जात हे एका ठिकाणी सांगितले आहे. हे रंग ठेवण्याच्या पेटीला 'पटोलिका' म्हणत असत. पटोलिका बहुधा शिंपल्यांनी मढविलेली असावी करण 'पटोलक' म्हणजे शिंपला असा अर्थ कोशकार देतात. अशा पटोलिकेमध्ये 'अलक्तक' हा लाखेपासून बनलेला तांबडा रंग, 'मन:शिला' हा तांबडया आर्सेनिकपासून बनलेला रंग, 'हरिताल' म्हणजे yellow orphiment, 'हिंगुल' म्हणजे शेंदरी रंग आणि श्यामवर्ण म्हणजे निळा, काळा आणि हिरवा हे रंग असत.

मुले-मुली कोणते खेळ खेळत ह्याचा मनोरंजक उल्लेख एका ठिकाणी आहे.१३ त्यामध्ये गृहक (भातुकली), भक्तपाककरण (लुटुपुटीचा स्वयंपाक करणे), दुहितृका (बाहुली), आकर्षक्रीडा (सोंगट्यांनी खेळणे), मध्यमाङ्गुलिग्रहण (मधले बोट ओळखणे), षट्पाषाणक (सहा खडे वापरून सागरगोट्यांचा खेळ), सुनिमीलितिका (आंधळी कोशिंबीर), आरब्धिका, लवणवीथिका (आट्यापाट्या?), गोधूमपुञ्जिका (गव्हाच्या आतमध्ये लपवलेली गोष्ट शोधणे) अशा काही खेळांचा उल्लेख आहे.

गणिका

'गणिका' ह्या वर्गाची चर्चा वात्स्यायनाने 'वैशिक' ह्या सहाव्या अधिकरणामध्ये केली आहे. गणिकांना वात्स्यायनकालीन समाजामध्ये महत्त्वाचे स्थान होते. सर्वसामान्य देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांहून त्यांचा दर्जा वरचा होता कारण त्या नागरकाइतक्या शिकलेल्या आणि चौसष्ट कलांमध्ये पारंगत असत. अन्य व्यवसायांप्रमाणे त्यांचाहि 'गण' (guild) असे. सभ्य समाजाच्या चालीरीतींचे ज्ञान तिच्याजवळ असे. काळवेळ जाणण्याची पाचपोच, दुर्गुणांचा अभाव अशांमुळे नागरकांचे 'आपानक', गोष्ठी, उद्यानविहार अशा स्थानी तिलाहि प्रवेश होता. वात्स्यायन सांगतो की अशा कलांच्या ज्ञानामुळे त्यांचा दर्जा उंचावला जाऊन लोकांच्या आणि राजसत्तेच्या मनात त्यांना गणिका म्हणून प्रतिष्ठा मिळते.१४

ह्या कलांमुळे शीलरूपगुणांनी युक्त अशी वेश्या 'गणिका' ह्या पदवीस पोहोचते आणि जनसमुदायामध्ये स्थान मिळवते. राजा आणि गुणवान् लोक तिला मानतात, कलोपदेश करण्यामुळे लोक तिच्या अवतीभवती असतात, विदग्ध लोकांना तिचा सहवास हवाहवासा वाटतो आणि लोक तिला उदाहरणासारखे मानतात.

गणिका स्वत:जवळ चांगला पैसा बाळगून असत आणि आपल्या स्थानानुरूप त्याचा व्यय करीत असत. देवायतने, तलाव, विश्रामगृहे इत्यादि बांधणे अशा कामांत त्या आपला पैसा वापरीत असत असे वात्स्यायनाच्या लिहिण्यावरून दिसते.१५ त्या प्रासादतुल्य घरांमध्ये राहू शकत कारण मृच्छकटिकाच्या चौथ्या अंकात वसन्तसेनेचे घर पाहून हे गणिकेचे घर आहे का कुबेराचे असा प्रश्न विदूषक मैत्रेयाला पडला आहे. (किं तावद्गणिकागारमथवा कुबेरभवनपरिच्छेद: मृच्छकटिक अंक ४) वात्स्यायनाची गणिका ही व्यवहारज्ञानीहि आहे. तिने दर्शविलेले प्रेम आणि आस्था ही कृत्रिम असावयाला हवी, कारण तिचे प्रमुख ध्येय हे गणिकाव्यवसायातून धन मिळविणे हेच आहे हे वात्स्यायनाने स्पष्ट केले आहे. कोणते नागरक सहज फशी पडतात, कोणाच्या मागे लागण्यात वेळ घालवू नये, स्वसंरक्षणासाठी कोणाशी चांगले संबंध ठेवावेत, प्रियकराजवळचे धन संपले की त्याला कसे टाळावे अशा सर्व चलाख्या वात्स्यायन मोकळेपणे सांगतो. गणिका आपल्या आईच्या वा अन्य अनुभवी कुट्टनीच्या आश्रयाने राहते, आणि ह्या सर्व खेळामध्ये तिचा ढालीसारखा उपयोग करते.

आजच्या वाचकाच्या दृष्टीतून ह्या ग्रन्थाची उपयुक्तता कितपत आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर वाचकाला त्यापासून काय हवे आहे त्यावर अवलंबून आहे असे म्हणता येईल. रतिसुख कसे घ्यायचे ह्याचे ज्ञान चित्रपट-विडिओ-यूट्यूब च्या जमान्यात आता कोणासहि अपरिचित असायचे काही कारण नाही. तसेच विवाहयोग्य कन्येचा शोध कसा करावा, विवाहानंतर पत्नीने घरामध्ये कसे राहावे, एका पतीच्या एकाहून अधिक पत्नी असल्यास त्यांनी एकमेकींशी कसे वर्तन ठेवावे अशा प्रकारचे वात्स्यायनाचे उपदेश सामाजिक स्थिति दोन हजार वर्षांमध्ये पूर्ण बदलल्याने आता कालबाह्यच म्हणायला हवेत. 'गणिका' ह्या विषयावर वात्स्यायनाने बरेच काही लिहिले आहे. तो वर्ग आता समाजात अधिकृतरीत्या आता उरलाच नाही. आवडलेल्या स्त्रीला वश करून घेण्याचे उपाय आणि तोडगे, लैंगिक शक्ति वाढवण्यासाठी वात्स्यायनाने सांगितलेले जादूटोणा प्रकारचे उपाय आता कोणालाही पटणार नाहीत. मला हा ग्रन्थ आता अभ्यसनीय वाटतो तो अशा कारणाने की दोन सहस्रकांपूर्वीच्या भारतातील नागर समाज कसा राहात होता ह्याचे अन्यत्र कोठे सहजी न दिसणारे दर्शन येथे मिळते.

प्राचीन भारतातील सुवर्णकाल म्हणतात त्या भारताचे वात्स्यायनाच्या 'कामसूत्रा'मध्ये दिसणारे हे ओझरते दर्शन.

टीपा

१. वाम एव सुरतेष्वपि काम:। किरातार्जुनीय ९.४९
२. कामसूत्र २.७.२८, कामसूत्रातील ह्या पुढील संदर्भ असे दाखविले आहेत: अधिकरण, नंतर त्यातील अध्याय आणि त्यानंतर सूत्राचा क्रमांक. २.७.२८ म्हणजे अधिकरण २, अध्याय ७ आणि सूत्र २८.
३. कामसूत्र २.५.२४.
४. कामसूत्र ५.५.२८.
५. कामसूत्र १.३.१६.
६ कामसूत्र १.४.५०.
७. उदय चन्द्र दत्त लिखित 'Materia Medica of the Hindus', पृ. २७२.
८. सुरा वै मलमन्नानां पाप्मा च मलमश्नुते।
तस्माद्ब्राह्मणराजन्यौ वैश्यश्च न सुरां पिबेत्॥
गौडी पैष्टी च माध्वी च विज्ञेया त्रिविधा सुरा।
यथैवैका तथा सर्वा न पातव्या द्विजोत्तमै:॥
यक्षरक्ष:पिशाचान्नं मद्यं मांसं सुरासवम्।
तद्ब्राह्मणेन नात्तव्यं देवानामश्नता हवि:॥ मनुस्मृति ९.९४-९६.
९. गोमूत्रमग्निवर्णं वा पिबेदुदकमेव वा।
पयो घृतं वाऽऽमरणाद्गोशकृद्रसमेव वा॥ मनुस्मृति ९.९२.
१०. अच्छरसकयूषमम्लयवागूं भृष्टमांसोपदंशानि पानकानि चूतफलानि शुष्कमांसं मातुलुङ्गचक्राणि सशर्कराणि च यथादेशसात्म्यं च। कामसूत्र २.१०.१७.
११. कामसूत्र १.४.४२.
१२. कामसूत्र १.३.१६.
१३. कामसूत्र ३.३.५-७.
१४. आभिरभ्युच्छ्रिता वेश्या शीलरूपगुणान्विता।
लभते गणिकाशब्दं स्थानं च जनसंसदि॥
पूजिता सा सदा राज्ञा गुणवद्भिश्च संस्तुता।
प्रार्थनीयाऽभिगम्या च लक्ष्यभूता च जायते॥ कामसूत्र १.३.२०-२१.
१५. देवकुलतडागानां करणं, स्थलीनामग्निचैत्यानां निबन्धनं,
गोसहस्राणां पात्रान्तरितं दानं, देवतानां पूजोपहारप्रवर्तनम्। कामसूत्र ६.५.२५.

❈ ❈ ❈

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

अतिशय रोचक लेख आहे. संपूर्णच ऐसीवरती, हा लेख आतापर्यंत सर्वाधिक आवडलेला आहे. या लेखामध्ये त्या काळचे जीवन विविध अंगांनी प्रकट झालेले आहे. किती मोकळा (फुर्सतीचा) वेळ होता व किती दर्जात्मक रीत्या तो व्यतित करता येई हे फार चांगल्या रीतीने समजले.

तेथून परतल्यावर ताम्बूलसेवन करावे, चन्दनाची उटी एकमेकांस लावावी आणि काही अल्पोपहार करावा. त्यामध्ये फळांचा रस, तळलेले पदार्थ, आंबवलेली तांदुळाची कांजी, मांसाच्या तुकडयांसह सूप, सुके मांस, साखरेसह संत्र्यासारखी फळे, इत्यादींचा समावेश असावा. नायकाने सहचरीसह सौधावर बसून चन्द्रप्रकाशाचा आनंद घ्यावा आणि ध्रुव, अरुन्धती, सप्तर्षि इत्यादि तारे ओळखावेत.

अतिशय मनोहारी वर्णन आहे. म्हणजे अ‍ॅक्च्युअल आसने कामविषयक अमकं न टमकं यापेक्षा हे जे जीवनशैलीचे चित्रण आहे ते फार म्हणजे फारच रोचक आहे.
.

प्राचीन भारतामध्ये मध, नाना धान्ये, उसाचा रस आणि त्याच्यातून निघणाऱ्या गुळासारख्या गोष्टी, फळाचे रस अशांपासून आंबवण्याच्या प्रक्रियेने नाना नावांची मादक द्रव्ये करून प्यायची पद्धत होती. ह्याच्या अनेक याद्या निरनिराळ्या जागी दिसतात. त्यातील ही एक पहा७: माध्वीक मधापासून, खार्जूर खजुरापासून, गौडी गुळापासून, शीधु उसाच्या रसापासून, सुरा तांदुळापासून, कोहल यवापासून, मधुलिका गव्हापासून, पैष्टी नाना धान्यांपासून, मधूकपुष्पोत्थ मोहाच्या फुलांपासून, जाम्बव जांभळापासून, कादम्बरी कदंबाच्या फुलांपासून, वारुणी ताड, माड आणि खजुराच्या झाडाच्या रसापासून (sap), वल्कलि बेहडा आणि गूळ ह्यांच्या मिश्रणापासून. अशा प्रकारची पेये एकत्र बसून पिऊन काव्यशास्त्रविनोदात काळ घालविणे म्हणजे 'आपानक'.

.
इतक्या मेहनतीने, सविस्तर, रसाळ भाषेत वर्णन केल्याबद्द, कोल्हटकर यांचे खूप आभार. लेख फारच आवडला.

स्त्रियांच्या संदर्भात 'चौसष्ट विद्यां'चा उल्लेख अनेक जागी भेटतो. त्यांचे ज्ञान नागरकाला तसेच स्त्रियांनाहि असावे अशी अपेक्षा होती. विवाहापूर्वी पितृगृहीच कन्या ह्या विद्या शिकून घेत असत. अशा विद्यांची यादी पहिल्या अधिकरणामध्ये दिलेली आहे.१२ त्यामध्ये लेखन, वाचन, गायन, वीणा-तन्त्री-डमरु-जलतरंग अशा वाद्यांचे वादन, नर्तन, भिंतीवर आणि फलकावर चित्रकला अशा सहज जाणवणाऱ्या कलांबरोबर प्रहेलिका (उखाणे), पुस्तकवाचन, नाटकाख्यायिकादर्शन, काव्यसमस्यापूरण, छन्दोज्ञान (वृत्तांचे ज्ञान) अशा लेखन-वाचनाशी परिचय दाखविणाऱ्या कला आहेत. ह्याशिवाय पाककला, लाकडावर कोरीव काम, वेताच्या विणलेल्या गोष्टी करणे, सुईने विणणे-शिवणे-रफू करणे, सोने-रुपे-रत्ने ह्यांची परीक्षा, मुलांची खेळणी बनविणे अशा उपयुक्त कला आहेत. चित्रकलेमध्ये कोणते रंग प्रामुख्याने वापरले जात आणि ते कसे मिळवले जात हे एका ठिकाणी सांगितले आहे. हे रंग ठेवण्याच्या पेटीला 'पटोलिका' म्हणत असत. पटोलिका बहुधा शिंपल्यांनी मढविलेली असावी करण 'पटोलक' म्हणजे शिंपला असा अर्थ कोशकार देतात. अशा पटोलिकेमध्ये 'अलक्तक' हा लाखेपासून बनलेला तांबडा रंग, 'मन:शिला' हा तांबडया आर्सेनिकपासून बनलेला रंग, 'हरिताल' म्हणजे yellow orphiment, 'हिंगुल' म्हणजे शेंदरी रंग आणि श्यामवर्ण म्हणजे निळा, काळा आणि हिरवा हे रंग असत.
मुले-मुली कोणते खेळ खेळत ह्याचा मनोरंजक उल्लेख एका ठिकाणी आहे.१३ त्यामध्ये गृहक (भातुकली), भक्तपाककरण (लुटुपुटीचा स्वयंपाक करणे), दुहितृका (बाहुली), आकर्षक्रीडा (सोंगट्यांनी खेळणे), मध्यमाङ्गुलिग्रहण (मधले बोट ओळखणे), षट्पाषाणक (सहा खडे वापरून सागरगोट्यांचा खेळ), सुनिमीलितिका (आंधळी कोशिंबीर), आरब्धिका, लवणवीथिका (आट्यापाट्या?), गोधूमपुञ्जिका (गव्हाच्या आतमध्ये लपवलेली गोष्ट शोधणे) अशा काही खेळांचा उल्लेख आहे.

किती डिटेल्ड व मोहक वर्णन आहे.
लवण = मीठ ना मग लवणवीथीका = आट्यापाट्या कसे?
.
काय काय आवडले हे उधृत करत बसायचे झाले तर पूर्ण लेखच कॉपी-पेस्ट करावा लागेल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्धा वाचला, आवडला पण माहितीने दमून गेलो.
बाकीचा वाचल्यावर प्रतिक्रिया देतो. तुर्तात फक्त पोच! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'कामसूत्रा'मधून दिसणारा वात्स्यायनकालीन भारतीय सुखवस्तु समाज

टायटलमध्ये 'दिसणारा' अशा शब्द वाचून मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला आणि निराशा झाली!!
देवा, दारी आलो होतो...
नाही, म्हणजे लेख विद्वत्ताप्रचूर आहे पण ते टायटल जरा बदलून 'कामसूत्रात वर्णिलेला वात्सायनकालीन भारतीय सुखवस्तू समाज' असं करा हो!
म्हणजे आमच्यासारख्या प्लेबॉयमार्गी (आनंदमार्गी चाच एक उपप्रकार!)ऐसीकरांचा अपेक्षाभंग होणार नाही!!
Smile
आणि ते,

स्त्रियांचे मृगी, वडवा (घोडी) आणि हस्तिनी,

ते खरेतर पद्मिनी, चित्रिणी, शंखिनी आणि हस्तिनी असे स्त्रियांचे त्यांच्या शारीरलक्षणांवरून पाडलेले प्रकार आहेत ना?
आमीपुन वात्सायन फाडलाय, टराटरा,
-पिवळा डांबिस
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> म्हणजे आमच्यासारख्या प्लेबॉयमार्गी
आता पूर्वीचा प्लेबॉय नाही, आणि तो मार्गही नाही. हा हन्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता पूर्वीचा प्लेबॉय नाही, आणि तो मार्गही नाही. हा हन्त!

खरंय!
..पॅसि"फिक काठी ढुंगण आता,
पहिले उरले नाही!!!"

असंच म्हंटलं पाहिजे
Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नायिकांचे वर्गीकरण वेगवेगळ्या ग्रन्थांमधून वेगवेगळे दिसते. पद्मिनी, चित्रिणी, शंखिनी आणि हस्तिनी हे वर्गीकरण 'कोक्कोक' ह्या काश्मीरी लेखकाच्या 'रतिरहस्य' ग्रन्थामधील आहे. वात्स्यायनाने केलेले वर्गीकरण पुढील शब्दांमधून दिसते:

शशो वृषोऽश्व इति लिङ्गतो नायकविशेषा:। २.१.१
(नायकांचे ससा, बैल, अश्व असे भेद लिंगाच्या आकारावरून होतात.)
नायिका पुनर्मृगी वडवा हस्तिनी चेति। २.१.२
(नायिकांचे भेद हरिणी, घोडी, हत्तीण असे.)

(कोक्कोकाच्या 'रतिरहस्य' पुस्तकाचे हिंदीमध्ये रूपान्तर होताना लेखकाचे नाव 'कोक' असे बदलले गेले. त्यामुळे 'कामशास्त्र' ह्याला 'कोकशास्त्र' हा समानार्थी शब्द मानला जाऊ लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही म्हणताय तसंही असू शकेल.
ती नांवं (आणि त्यांची लक्षणं!)मात्र डोक्यात फिट्ट बसलीयेत!!
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडलाच.

कोल्हटकरांचा लेख म्हणजे चित्रं, नकाशे आणि माहितीने भरलेला अशी अपेक्षा असते. निदान 'कामसूत्रा'चं मुखपृष्ठतरी पाहिजे होतं या लेखासोबत. (एरवी वाट्टेल त्या, वाट्टेल तशा, अगदी फोटोशॉपकृपेने तीन हात, सात बोटं अशा) कशाही प्रतिमा जालावर सापडतातच. पण जुन्या ग्रंथांचे फोटो अजूनही मिळालेले चालतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आवडला लेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ग्रंथाचे अंतरंग, दोन हजार वर्षांपूर्वीचा भारतातील नागर समाज, सर रिचर्ड बर्टन आणि तत्कालीन पंडितांनी या ग्रंथाच्या पुन:निर्मितीसाठी घेतलेले श्रम आणि विशेष म्हणजे विक्टोरियन समाजाला या ग्रंथाने दिलेला नवा विचार या सगळ्या गोष्टी नव्याने माहीत झाल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. इतर सामान्य माणसांप्रमाणेच माझेही गैरसमज दूर झाले. त्यावेळच्या एकंदर वातावरणावरुन तेंव्हा आक्रमणे, युद्धजन्य परिस्थिती नसावी असे वाटते. भरल्यापोटी निवांत वातावरणातच अशी कलाकृती निर्माण होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम लेख.

यंदाच्या दिवाळी अंकातील एकूण लेखांमध्ये हा लेख वेगळा उठून दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेख आवडला. कामसूत्राची जी प्रतिमा जगभर झाली आहे तिच्यापेक्षा आणखी बरंच काही त्यात आहे हे या लेखात फार सुरेखपणे मांडलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय सुंदर काटेकोर सुव्यवस्थित मांडणी. या लेखामागचा सुक्ष्म अभ्यास व घेतलेले परीश्रम जाणवतात.
संयत शैलीत लिहील्याने भडकपणाचा लवलेशही नाही.
या दिवाळी अंकातला संदर्भ संपन्न युनिक लेख.
या सुंदर मेजवानीसाठी धन्यवाद कोल्हटकरजी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम माहितीपूर्ण लेख.

या दिवाळी अंकातला संदर्भ संपन्न युनिक लेख.

याच्याशी पूर्णतः सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

कामसूत्राचे समाजशास्त्रीय विश्लेषण या आधी वाचनात आले नव्हते.
योग्य ठिकाणी थांबून मुद्दा बदलल्यामुळे सवंगपणा टळून अभ्यासपूर्ण भारदस्तपणा आला आहे आणि हा अवजडपणा अथवा बोजडपणा नव्हे हे आवर्जून लिहावेसे वाटते.
इतर प्रतिसादांपैकी नितिन थत्ते यांच्याशी अगदी सहमत. हा लेख या अंकाचा शिरपेच ठरला आहे आणि कदाचित बाहेरच्या अन्य दिवाळीलेखनातही उठून दिसावा. ( अन्य दिवाळी अंक अद्याप वाचलेले नाहीत आणि ऐसी दिवाळीही पूर्ण वाचलेला नाही..)
मुग्धा कर्णिक यांचे निमंत्रण आपण मान्य करावेच. निदान आमच्यासारख्या मुंबईकरांनातरी त्याचा लाभ घेता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कामशास्त्र सोसायटीकडून वात्स्यायनाचे ’कामसूत्र’ लंडनमध्ये प्रथम प्रकाशित होण्यामागचा इतिहास मला अलीकडेच वीरचंद धरमसीलिखित ’The First Indian Archaelogist’ ह्या पुस्तकामध्ये वाचायला मिळाला. सारांशरूपाने तो येथे देत आहे.)

भगवानलाल इन्द्राजी हे नाव प्राचीन भारतीय शिलालेख आणि नाण्यांच्या वाचनाच्या संदर्भात फार महत्त्वाचे हे आपण जाणतोच. जुनागढ संस्थानात त्यांचे लहानपण आणि तरुणपणाचे काही दिवस गेले. त्यांचे तेथील शिक्षण पारंपारिक गुजराथी आणि थोडेफार संस्कृत ह्यापलीकडे गेले नव्हते. विशेषेकरून इंग्लिश भाषेचे त्यांना काहीच ज्ञान प्रारम्भी नव्हते. गिरनार पर्वताच्या पायथ्याशीच जुनागढ वसलेले आहे आणि भगवानलाल ह्यांना तेथील पायथ्याजवळच्या आता महाक्षत्रप रुद्रदामन् ह्याच्या नावाने प्रख्यात असलेल्या शिलालेखाबद्दल कुतूहल होते. ह्याचा पाठपुरावा करतांना त्या शिलालेखाचे चे काही अंशी वाचन त्यांनी केले आणि मुंबईतील प्रख्यात संशोधक आणि डॉक्टर डॉ. भाऊ दाजी ह्यांच्याकडे पाठवले. त्या कामामुळे प्रभावित होऊन भाऊ दाजींनी भगवानलाल ह्यांना मुंबईस बोलावून घेतले आणि भाऊ दाजींच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी जाऊन शिलालेखांचे ठसे मिळवायचे आणि त्यांचे वाचन करायचे ह्यासाठी त्यांना आपल्याकडेच नोकरी दिली. (सुरवातीला त्यांची राहण्याची सोयहि भाऊ दाजींनी आपल्याच घराच्या बागेत एक तंबू बांधून त्यात केली होती. भाऊ दाजी हे सारस्वत आणि भगवानलाल हे कर्मठ ब्राह्मण, अशामुळे ही व्यवस्था निर्माण केली गेली असावी असे वाटते. नंतरच्या काळात भगवानलालनी वाळकेश्वरला आपले बिर्‍हाड केले. सध्याच्या स.का.पाटील उद्यानाच्या परिसरात भाऊ दाजींचे घर होते असे माझ्या वाचनात आहे.) अशा रीतीने भगवानलाल ह्यांचा पुरातत्त्वक्षेत्रामध्ये प्रवेश झाला. तदनंतर सततोद्योग, हिंदुस्थानभर शिलालेख वाचनासाठी प्रवास आणि विषयाचा अभ्यास ह्यातून त्यांना विद्वन्मान्यता आणि अनेक मान मिळाले. चांगले इंग्रजी येत नाही ह्याची खंत अखेरपर्यंत वाटत राहिली आणि थोडेफार इंग्रजी त्यांनी शिकूनहि घेतले होते पण ते आपले सर्व लेखन गुजराथीमधून करीत असत आणि त्यांचे हितचिंतक त्याचे इंग्रजी रूपान्तर करून देत.

प्रख्यात जर्मन पुरातत्त्वविद् डॉ जॉर्ज बुह्लर गुजराथमध्ये १८७० ते १८८० ह्या काळात शिक्षणखात्यात उच्च अधिकारी होते आणि ते स्वत: गुजराथी जाणणारे होते. भाऊ दाजींमुळे भगवानलाल ह्यांचा त्यांच्याशी परिचय झाला आणि तेव्हापासून भगवानलाल ह्यांना त्यांचे अनेक प्रकारचे साहाय्य मिळत गेले. भगवानलाल ह्यांच्या लेखांची भाषान्तरेहि ते करून देत असत. कामशास्त्र सोसायटीचे अर्बथनॉट ह्यांचा उल्लेख लेखात आलाच आहे. डॉ बुह्लर ह्यांच्या मध्यस्थीतून अर्बथनॉट ह्यांचा भगवानलाल ह्यांच्याशी परिचय झाला. अर्बथनॉट लिहितात:

On my return to India in 1874, I made inquiries about Vatsyayana and his works. The Pundits informed me that the Kama-Sutra of Vatsyayana was now the standard work on love in Sanskrit literature, and that no Sanskrit library was supposed to be complete without a copy of it. They added that the work was now very rare, and that the versions of the text differed considerably in different manuscripts, and the language in many of them was obscure and difficult.

The Pundit (भगवानलाल) himself was unable to speak English fluently but understood sufficiently, and after an interview I set him to work to compile a complete copy of the Kama-Sutra of Vatsyayana in Sanskrit. The copy of the text he had procured in Bombay being incomplete, the Pundit wrote for other copies from Calcutta, Benaras, and Jeypoor, and from these prepared a complete copy of the work.

ह्या उतार्‍यात उल्लेखिलेली कामसूत्राची यशोधराच्या जयमंगला टीकेसह प्रत भगवानलाल ह्यांनाच जुनागढमध्ये सापडली होती आणि तिच्यावरून त्यांनी अजून एक प्रत १८७७ मध्ये करून घेतली होती. त्याविषयी भगवानलाल लिहितात:

"This Granth began on Aswin Sud 5th Sunday and was completed on Chaitra Vad 10 Sunday in V.S. 1933, Shaka year 1799 at Nawa Nagar in the reign of Jam Vibhaji while Karabhari was Prabhu Narayan. It has in all 5611 slokas. The amount charged is for 5550 slokas at the rate of 1 kori for 100 slokas, which comes to 55 ½ kories and the paper cost 11¾ kories that makes a total of 67 ¼ kories whose value in Rupees is 19 and 8 annas."

अशा रीतीने अनेक प्रतींची तुलना करून भगवानलाल ह्यांनी एक शुद्ध प्रत तयार केली आणि तिचे गुजराथीमध्ये भाषान्तर केले. अर्बथनॉट आणि बर्टन दोघेहि गुजराथीचे जाणकार होते. बर्टन ह्यांच्या सेवेचा काही काळ बडोद्यामध्येच गेला होता. अर्बथनॉट ह्यांनी गुजराथीवरून इंग्रजी भाषान्तर केले. ते भाषान्तर शिवराम परशुराम भिडे ह्याच्याकडून अधिक साफसूफ करून घेतले. शिवराम परशुराम भिडे तेव्हा डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत विषय घेऊन एम.ए. चा अभ्यास करीत होते. (१८७३-७४ साली मुंबई विद्यापीठाचे भगवानदास पुरुषोत्तमदास पारितोषिकहि त्यांना मिळाले होते.) त्याच्यावर शेवटचा हात फिरवून अखेर कामशास्त्र सोसायटीकडून ते भाषान्तर लंडनमध्ये प्रसिद्ध करण्यात आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. अर्थातच, ग्रंथ कशाबद्दल आहे याबद्दल असलेला गैर्समज दूर झाला. त्या वेळचे सामाजिक विश्लेषण म्हणून त्यात दिलेली माहिती खचितच उत्तम.

अगदीच अवांतर नाही पण-
१. उत्सव चित्रपटात वात्स्यायन हा गणिकांच्या खोल्यांमध्ये डोकावून तिथले वर्णन सहायक-लेखनिकास सांगताना दाखवला आहे. त्या सिनेमातच वा अन्यत्र कुठेतरी तो ब्रह्मचारी होता आणि तरीही त्याने कामशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला आहे असे वाचल्याचे स्मरते.
२. अगदी कर्नाटकातच नाही, परंतु पश्चिम महाराष्ट्रातही मामासोबत किंवा त्याच्या मुलासोबत लग्न करण्याची प्रथा अजून आहे. तसेच आत्याच्या मुलीसोबतदेखील लग्न केले जाते. सर्वसाधारण लग्नांमध्येही मुलीकडून सासू-सासर्‍यांना आत्या-मामा तर मुलाकडून मामा-मामी म्हटले जाते.आताशा नव्या पद्धतीप्रमाणे आई-बाबाही म्हटलं जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

Very nice ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

DarshanSP.