Skip to main content

पुणे फिल्म फेस्टिवल : नोंदी, समीक्षा, गमतीजमती...

९ जानेवारीपासून पुणे फिल्म फेस्टिव्हलची सुरूवात झाली. अनेक ऐसीकर चित्रपट पहायला जात आहेत. अनेक जण अर्थातच जात नाहीयेत. सगळ्यांसाठीच सामुदायिकपणे फिल्म फेस्टिवलच्या गमतीजमती नोंदवण्यासाठी हा धागा.

यात मुख्यत्वे दोन प्रकारचे प्रतिसाद येतील. एक म्हणजे सिनेमाची परीक्षणं/समीक्षा. यासाठी 'मी अमुकतमुक तीन सिनेमे पाहिले त्यातला हा असा वाटला, तो तितका आवडला नाही' असा प्रतिसाद देण्याऐवजी, त्या सिनेमाच्या नावाचा प्रतिसाद काढावा आणि तिथे सिनेमाविषयी लिहावं. आधीच जर त्या सिनेमाविषयी लिहिलं असेल तर त्याखाली आपलं मत लिहावं. म्हणजे एका सिनेमाविषयीची चर्चा एकत्र दिसेल.

दुसऱ्या प्रकारचे प्रतिसाद हे एकंदरीत व्यवस्थापन, सर्वसाधारण दर्जा, तिथे घडलेल्या गमती वगैरे. ते कसे हवे तसे लिहावेत.

राजेश घासकडवी Sat, 11/01/2014 - 23:27

थोडक्यात सांगायचं तर चित्रपट आवडला, पण प्रचंड संथ वाटला.

एक इटालियन माणूस आणि एक अरब तरुण मुलगा यांच्याभोवती ही कथा फिरते. इटलीत राहणाऱ्या अरबांविषयी या इटालियन माणसाला घृणा असते. हा परक्यांचा द्वेष जगभर सगळीकडे दिसून येतो त्याच जातीचा, आंधळा आहे. कथा घडते एका हॉस्पिटलच्या कॅन्सर वॉर्डमध्ये. इटालियन माणूस आपल्या अगदी लहान मुलाच्या किमोथेरपी/सर्जरीसाठी आपलं गाव सोडून मिलानमध्ये आलेला असतो तर अरब मुलाचा भाऊ कॅन्सरग्रस्त असतो. त्यांच्यातले संबंध कसे बदलत जातात, त्याला परिस्थिती कशी कारणीभूत ठरते याची ही कथा.

सुरूवातीला हा इटालियन माणूस अरबाला खिजगणतीतही घेत नाही, त्याच्याशी अगदी साधं जुजबी हाय हॅलो म्हणायला, आपल्या मुलाचं नाव सांगायलाही तयार नसतो. नंतर काही ना काही कारणांनी संबंध निर्माण होतात थोडे सुधारतात...

या सिनेमातली आवडलेली गोष्ट म्हणजे हे हळूवार होणारे बदल तितक्याच नाजूकपणे दाखवलेले आहेत. सुरूवातीला अरब लोक त्या इटालियन माणसाला अंधुक दिसतात, पार्श्वभूमीवर वावरतात. नंतर नंतर ते जवळ येतात, फोकसमध्ये येतात, ठसठशीत होतात. हा नात्यातला बदल चित्र, ध्वनि, शब्द, भावना या सर्वांमधूनच दाखवलेला आहे.

न आवडलेली गोष्ट म्हणजे लांबी. प्रत्येक छोट्याशा घटनेसाठी कट न करता आख्खा शॉट वापरण्याचं तंत्र वापरलेलं आहे. मात्र बरेच शॉट फार लांबलेले आहेत. मला मग ते शॉट किती लांब आहेत हे मोजायची गरज वाटायला लागली इतके. तो माणूस एका बोगद्यासारख्या जागेतून आपल्याकडे चालत येतो हे चाळीस सेकंद चालतं.

मेघना भुस्कुटे Mon, 13/01/2014 - 12:58

एके काळचे अतिडावे जर्मन क्रांतिकारक तरुण आता तरुण उरलेले नाहीत. त्यांच्यातला एक जण पकडला गेल्यावर त्यांची चळवळ विझून गेलीय. १८ वर्षांनंतर तो सुटून परत येतोय आणि त्याला भेटायला म्हणून एका वीकान्ताला हे सहकारी पुन्हा एकत्र येतायत, त्या वीकान्ताची गोष्ट. नायक सुटून आल्याबद्दलचा आनंद आहेच, पण अपयशी गोष्टींबद्दलचा कडवटपणा, गाडलेली भुतं उकरायची अनिच्छा, अशी अनिच्छा वाटल्याबद्दलचा अपराधीपणा, तो झाकायला अधिकचा उत्साह, बदललेल्या निष्ठा, शिवाय उरलीसुरली खरी स्नेहभावना... असं सगळंच आहे.

हे सगळं एस्टॅब्लिश होईपर्यंत संथ वाटला सिनेमा. पण मग नायक आणि त्याची भूतपूर्व सहकारी नि प्रेयसी यांना एक मुलगा आहे आणि तो मुलगाही तिथे येतोय या तपशिलासरशी एकदम रसरसून जिवंत झालं सगळं. कडवट, काठावरून मारलेल्या गप्पा, मग अवघडलेल्या कबुल्या, अंती स्वीकार.. अशी ही गोष्ट चालते.

मला या सिनेमात बेहद्द आवडल्या त्या कणखर स्त्रीव्यक्तिरेखा. प्रथमदर्शनी यातली नायिका, नायकाची बहीण, नायकाच्या प्रेयसीची तरुण मुलगी... या सगळ्या बायका विकल, पुरुषांवर आधारासाठी विसंबलेल्या, रडूबाई, पडखाऊ वाटतात खर्‍या. पण त्या तशा नाहीत हे हळूहळू स्पष्ट होत गेलं. त्या त्यांना हवं ते निर्धारानं घडवून आणतात, हवं ते मिळवतात, आणि ताठ मानेनं परिणामांची किंमत मोजतात. सुरुवातीला अंधारा असणारा सिनेमाचा पोत या प्रवासासह हळूहळू पण निश्चितपणे उजळत जातो आणि अखेरीस एकटीच नायिका आपल्या मर्जीनं उन्हाळलेला रस्ता चालताना पाठमोरी दिसते तिथे सिनेमा संपतो.

संथपणे पकड घेणारी गोष्ट, प्रत्यक्ष काहीच न घडताही जाणवत राहिलेला सततचा ताण, हा ताण वाढवण्याकरता आणि कमीही करण्याकरता बेडसीन्सचा केलेला चपखल वापर याही नोंदायसारख्या बाबी. मस्तच होता सिनेमा.

ऋषिकेश Mon, 13/01/2014 - 13:59

In reply to by मेघना भुस्कुटे

+१ .. सिनेमा मलाही आवडला.
अजून एक आवडलं म्हणजे आपल्या इतिहासाकडे बघायची स्वच्छ नजर! तुसती पात्रांच्या वैयक्तिक इतिहासाकडेच नाही तर एकूणात समाजाच्या म्हणा किंवा देशाच्या म्हणा, इतिहासातील चुका, अपयश, बदल वगैरे स्वीकारणं यातील सर्वात महत्त्वाची पायरी त्या इतिहासाकडे प्रामाणिकपणे बघणं असतं.. आणि दुसर्‍या एका प्रतलावर तेही होत असतं!

सुरवातीला असणारा कमी प्रकाश, चित्रपटाची संथ लय, पुढून दुसर्‍या रांगेत असल्याने ऑलमोस्ट आडव्या पोझिशनमध्ये बसणं, एकूणच वातावरणाशी एकरूप झालेलं संगीत व एसी हे काँबीनेशन मध्येच डोळे मिटायला उद्युक्त करत होतं खरं, पण तु म्हणालीत तसं नायकाचा मुलगा येतोय - आला हे कळताच चित्रपटाचा वेग व बघायचा उत्साह चांगलाच वाढला

ऋषिकेश Mon, 13/01/2014 - 14:28

आधी हे स्पष्ट करतो हा चित्रपट (IMDb | ट्रेलर )अतिशय आवडला.
स्पॉयलर अ‍ॅलर्टः पुढील ओळखीत चित्रपटाची कथा व्यवस्थित फोडलेली आहे. ज्यांना चित्रपट बघायचा आहे व मिळणे शक्य आहे त्यांनी इथेच थांबावे

चित्रपट पूर्णपणे कृष्णधवल रंगात चित्रीत केला आहे. एका युद्धाकाळात घडणारी ही कथा अतिशय मनोज्ञ आहे. एक लहान मुलगा (६-७ वर्षांचा असेल) व त्याची आई एका खच्चुन भरलेल्या डब्यातून कुठेशा चालल्या आहेत. आई झोपूनच आहे, अत्यंत आजारी आहे आणि एवढासा मुलगा तीची सुश्रुषा करतोय. आजुबाजुला त्यांच्याइतकीच व काही त्यांच्याहून गरीब जनता - बहुतांश वृद्ध/स्त्रिया वा मुले - तितक्याच शांतपणे, मलूलतेच्या सोबतीने प्रवास करत आहेत. मोजक्या संवादातून उलगडते की ते दोघे आपल्या आजोबांकडे निघाले आहेत. एका मधल्याच स्टेशनवर आईची तब्येत बिघडल्याने तिला उतरवले जाते व हॉस्पिटलात रवानगी होते. आणि मग सुरू होतो त्या मुलाचा, जबाबदार पालक होण्याचा प्रवास. मग आजोबांना तार करणे असो की बस पकडणे असो इतक्या लहान वयात, अनोळखी गावांत त्याला एकट्याला अनेक गोष्टी पार पाडाव्या लागतात. त्याही अत्यंत थंडीत. या पार्श्वभूमीवर आपल्यासा दिसत राहते ते युद्धकाळातील दैन्य.. निव्वळ दैन्य. बहुतांश गर्दी ही लढू न शकणार्‍या जनतेची. बस, रेल्वे, वीज सगळ्याच ठिकाणी रेशनींग. त्यात खुरडत जगणारी जनता. आता युद्ध संपेल या एकाच आशेवर केवळ जगायला लागेल म्हणून जगणार्‍या जनतेच्या पार्श्वभूमीवर या मुलाच्या रुपातली आशा अजूनही कार्यरत असते - प्रेक्षकाला भावतेही.

चित्रपटाच्या मध्यात मुलाची आई मरते. तो बाजुलाच उभा असतो. एकच वाक्य म्हणतो "सो.. दिस इज हाऊ इट हॅपन्ड" आणि पुढच्या क्षणाला आजोबांकडे जायचा प्रवास चालु ठेवायचा निर्णय घेतो. त्याचा तो प्रवास आणि त्यात त्याला येणारे अनुभव सगळेच पाहण्यासारखे आहे. नुसती कथा, पात्रे, संवाद किंवा अभिनयच नव्हे तर उत्तम कृष्णधवल सिनेमॅटोग्राफीचा व अशक्य नेमक्या प्रकाशयोजनेचा नमुना म्हणूनही हा चित्रपट बघायसारखा आहे. विविध ध्वनींचा वापर इतका चपखल आहे की डोळ्यांना काहीही न दिसता, समोरील एकही पात्र वेगळे काही न करताही पार्श्वभूमीवर काय होतंय हे सतत जाणवत रहातं.

या चित्रपट महोत्सवात मला सर्वात आवडलेल्या दोन चित्रपटांपैकी हा एक.

घनु Mon, 13/01/2014 - 20:07

In reply to by ऋषिकेश

सिटीप्राईड कोथरुड ला रविवारी मनुराग ह्या सिनेमाला अशक्य मोठी रांग होती... त्यात त्या अतिमुर्ख 'व्हॉलेंटीयर्स' कडून स्वतःचा विनाकारण अपमान करुन घ्यायचा नव्हता आणि त्यांच्याशी वाद घालून वेळही खराब करायचा नव्हता म्हणुन शेजारच्याच स्क्रीन वरचा 'हाऊस विथ अ टरेट' पाहिला आणि आपण खुप योग्य निर्णय घेतला ह्याचा आनंद झाला ... (मी 'टपाल' च्या वेळी असा निर्णय का नाही घेतला???? :() ...'हाऊस विथ अ टरेट' माझाही ह्या फेस्टीवल मधे आवडलेल्या निवडक सिनेमांमधला एक आहे... :) बाकी ॠषिकेशने लिहिलेच आहे आणि त्याच्याशी सहमत :)

ऋषिकेश Mon, 13/01/2014 - 20:36

In reply to by घनु

आभार.. चित्रपट पोलंडमध्ये घडतो असे कुठेतरी वाचलं होतं.
असो.

मनुराग नव्हे 'मौनराग' एलकुंचवारांचं ;) .. ते पुस्तक माझं अत्यंत आवडतं असल्याने त्याचे माध्यमांतर आवडणार नाही असा अंदाज होता म्हणून तो चित्रपट टाळला.

बाकी तिथे होतात सांगायचं तरी.. भेट झाली असती. असो १८ ला भेटूच म्हणा

मेघना भुस्कुटे Mon, 13/01/2014 - 15:05

मुंबईत एक सोडून चांगले दोनदोन इंटरन्याशनल फिल्मोत्सव होत असताना पुण्यात फिल्म फेस्टिवलला जाण्याचा किडा मला नक्की कधी नि का चावला हा एक प्रश्न मला फेस्टिवलभर पडत राहिला. (यथावकाश पुण्यातल्या स्थानिक आणि तात्पुरत्या स्थानिक ऐसीकरांशी भेट घडल्यामुळे मला या प्रश्नाला सामोरं जाण्यासाठी बळ मिळालं हे मी नाकारत नाही. पण - ) मुळात 'का, का, का???' हे उरलंच.

ही खास पुण्यातल्या फेस्टिवलच्या व्यवस्थापनाची काही क्षणचित्रं:

- सिटी प्राइड, कोथरूड हे या फिफेचं मुख्य प्रांगण (अर्थात, मेन व्हेन्यू) होतं. सहसा तिथेच पाहुण्या दिग्दर्शकांशी, निर्मात्यांशी, तंत्रज्ञांशी, अभिनेत्यांशी बोलण्यासाठी पत्रकार परिषदा घ्यायची प्रथा असते. नाव पत्रकार परिषदांचं असलं, तरी या बैठका मधल्या व्हरांडासदृश जागी, चांगली जाहिरातबिहिरात करून घेतल्या जातात. (जाहिरात म्हणजे किमान दोन दिवस आधी लावलेले काळेपांढरे प्रिंटाउट्स आणि वाटलेली पत्रकं. बास. याला फार पैसे लागत नसावेत.) परिणामी कलाकारांशी बोलायची संधी पत्रकारांबरोबरच प्रेक्षकांनाही मिळते. कोथरुडी या पत्रकारपरिषदांचं नामोनिशाणही दिसलं नाही. कुठे खोपच्यात घेतल्या देव जाणे. कुणी एक सैबेरियन दिग्दर्शक भलतंच इंट्रेष्टिंग काही बोलला... वगैरे माहिती मिळाली. परिणामी चरफडाट जाहला.

- फिफेमध्ये पास काढावा नि कुणीही कुठल्याही खेळाला जाऊन बसावं अशी पद्धत असते. पण कुठल्या खेळाला (गाजलेले / पारितोषिकप्राप्त / लोकप्रिय / फारच भारी सिनेमे) कोणत्या दिवशी (शनिवार-रविवार-सुटीचा दिवस) किती गर्दी होईल याचा काहीएक अंदाज आयोजकांना असणं अपेक्षित असतं. तरीही हे अंदाज चुकतात, माउथ पब्लिसिटीमुळे लोक वेडसरासारखे एकाच खेळाच्या मागे धावत सुटून त्या खेळाला अलोट गर्दी करतात आणि परिणामी पायर्‍यांवर बसून सिनेमा पाहायलो लागतो असंही एखाद्या खेळाला होतंच. पुण्यातल्या फिफेची गमाडीगंमत अशी की, निदान सिटीप्राइड, कोथरुडातल्या तरी जवळजवळ सगळ्याच खेळांना अशीच गोड गर्दी लाभलेली होती. बरं, अशा वेळी मुंबईबिंबईसारख्या फडतूस ठिकाणी प्रेक्षकसंख्येचा विचार करून पटकन त्याच सिनेमाचा दुसरा खेळ आयोजित केला जातो, निदान पुढच्या खेळाची वेळ तरी गर्दीच्या नजरेस पडेल अशी काळजी घेतली जाते, 'उद्या पाहाल का?' अशी "विनंती" (मला कल्पना आहे, पुण्यातल्या लोकांसाठी हा अगम्य शब्द आहे, मज पामराला (की पामरीला?) क्षमा करा.) करण्यात येते... इथे मात्र असे वाह्यात लाड नव्हते. गपगुमान दोन तास लाइन लावायची, सिनेमाच्या वेळेआधी तासभर थेटरात घुसून 'फक्त आपली' जागा बूड टेकून धरून ठेवायची आणि सिनेमा संपल्यावरच उठायचं. जमत असेल, तर बघा. नाहीतर फुटा.

- व्यवस्थापनाचं काम करणारी घोडबालकं. भलतीच गोड जमात होती ही. फिफेच्या पहिल्याच दिवशी पहिला खेळ नवाला असताना पास देण्याचा काउंटरच मुळी ११ला उघडणे, 'असं का हो?' असं विचारल्यावर 'मग? आम्ही पहाटे ४ला घरी गेल्तो' असं उत्तर थोबाडावर फेकणे, फिफेला आलेल्या प्रेक्षकांना आपण स्वखर्चाने एखाद्या शैक्षणिक सहलीला आणल्यागत वागवणे ('शुक शुक शुक, वोटिंग कीजिए... मॅडम, सिनेमे कशासाठी बघतो आपण? मत नको का मग द्यायला? अं?', 'अहं, आता नाही जायचं कुठे. जागा जाईल नाहीतर तुमची... चक्, 'तिकडे'ही नाही...', त्यातूनही कुणी बिचारा प्राणी नैसर्गिक हाकेला ओ द्यायला गेलाच, तर 'काण्ट दे पी अर्लिअर?' असं मोठ्यांदा बरळणे, थेटरात दोन-पाच खुर्च्या उरल्यावर 'सिट्स हिअर... एनी टेकर्स? एनी टेकर्स?' असा जाहीर लिलाव पुकारणे... अशी अनेक उदाहरणं आहेत. इच्छुकांनी व्यनितून संपर्क साधावा. यथास्थित भडास काढण्यात यील.), रिकामी खुर्ची दिसताच तिथे एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला दडपून बसवणे, वेळेवर सिनेमा सुरू करायचं सोडून पडद्यापाशी आपल्या टुकार निवेदनाच्या आवृत्त्या पुटपुटत पाठ करत राहणे... असो. असो.

- ऐसीच्या वाचकांत ज्येष्ठ नागरिक असल्यास आधीच क्षमस्व वगैरे. पण च्यायला कोथरुडात ज्येष्ठ नागरिक जामच उतू चालले होते. बरं, असावेत. आपली सवलतबिवलत एन्जॉय करून मस्त सिनेमे पाहावेत, कोण काय म्हणतंय? पण दर रांगेत, दर ठिकाणी, दर सोईच्या ठिकाणी यांची ज्येष्ठ नागरिक म्हणून सवलत उपटायची तयारी. पासाच्या रांगेत (पासाला एक रांग नि कॅटलॉगला निराळी. हो, पुण्यात असंच असतं!) उभी असताना १५ मिनिटांत माझ्यापुढे साडेतीन (एका आजींना मी दिलेला लुक लागला, नि त्या लाजून पुन्हा मागे गेल्या हे इथे नोंदलं पाहिजे) ज्येष्ठ नागरिक हक्कानं घुसले. शेवटी माझा नंबर आल्यावर "मी? मला? मी तरुण आहे अजून. नक्की देताय मला पास?" वगैरे उपरोधात्मक बोलण्यातलं वैय्यर्थ जाणवून मी गप पास घेतला खरा... पण माझा विश्वास बसत नव्हता. नंतर मराठी सिनेमाला अशक्य गर्दी करणे, 'आंतरराष्ट्रीय फिफे असून 'फक्त' सात मराठी सिनेमे? कधी सुधारणार हे?' अशा चर्चा रंगवणे.. अशा लीळा करणार्‍या याच ज्येष्ठ नागरिकांना 'मधेच 'जाण्या'ची अडचण होते' या कारणास्तव खाली पायर्‍यांवर लोकांना बसू न देण्याचा बूट काढला अशी वदंता होती. ही कल्पना घोडबालकांची की ज्येष्ठ नागरिकांची, हे गुलदस्त्यात.

अर्थात या सगळ्याबरोबर घासूगुर्जी, ऋ, चिंजं ही मंडळी भेटली. 'अजून व्हायला हव्यात यार...' अशी चुटपुट लावणार्‍या गप्पा नि शनवारच्या कट्ट्याचे वायदे झाले, केतकी आकडे, रमताराम, मी, अर्धवट ही आलेली पण न भेटलेली मंडळी पाहायची उत्सुकता राहून गेली....

पण ते सगळं या भडासमय प्रतिसादात नको....

मन Mon, 13/01/2014 - 15:17

In reply to by मेघना भुस्कुटे

फीडबॅक जितका फटकळ तितकाच सुधारणा करणयसाठी नेमक्या जागा हुडकून देण्यास उपयुक्त असतो.
आयोजक मंडळी सकारात्मकपणे ह्याकडे पाहतील अशी खात्री वाटते.

ऋषिकेश Mon, 13/01/2014 - 15:32

In reply to by मन

फारच बॉ आशावादी तु!
नुसती टिका न करता काही प्रश्नांवर/प्रसंगी आम्ही थेट उपाय सुचवूनही बदल घडले नाहीत, तर इव्हेंटनंतर काही पुनरावलोकन/सिंहावलोकन होईल याची अजिबात अपेक्षा नाही!

ऋषिकेश Mon, 13/01/2014 - 15:28

In reply to by मेघना भुस्कुटे

ठ्ठो!! वाटच पाहत होतो.
अधिक काय लिहिणे. नमुन्यादाखल काही उद्धृते/क्षणचित्रे देतो:

--..--
स्क्रीन वर शिरल्या शिरल्या "तुम्ही सिनेमा का बघता?" समोरचा अचानक हल्ल्याने बावचळल्यावर (किंवा आमसारखे "ते तरी आम्हाला ठरवू द्या" असं म्हणायच्या तयारीत बघुन) आपणहून "मत देण्यासाठी!" आम्ही एसीत शिरायच्या आधीच गार!!!!
--..--
"नाही हो हे शोज ऑर्गनाईज करणं इतकंही सोपं नसतं, मी गेलेय यातून!" आम्ही त्या काकूंच्या वयाकडे बघुन अज्जीच हसू दाबतोय, तोच "एकदा बसलं की तिथे जावंच का लागावं? लोकांनी अश्या फेस्टिव्हलला येताना खाण्यावर व पिण्यावर नियंत्रण नको का?" आम्ही गार होतोच म्हणा!
--..--
एक निवेदिका बाजुला गोरा, उंच प्रोड्युसर उभा होता तेव्हा त्याच्या चित्रपटाविषयी तो आता बोलणार आहे (नुसतं) हे(च) सांगताना ती बया (तीच ती एनी टेकर्सवाली) इतकी लाडीक होत होती की फक्त "आम्ही गडे नै ज्जा!" असं त्या प्रोड्युसरच्या गालावर (शिडी लाऊन - त्याची उंची हो!) चापट मारत ती कधीही म्हणायची शक्यता होती.
--..--

ये तो सिर्फ झलक है! बाकी धमाल मजा कट्ट्याला आलेल्यांना प्रत्यक्ष ऐकवल्या जातील ;)

चिंतातुर जंतू Mon, 13/01/2014 - 15:46

In reply to by मेघना भुस्कुटे

तक्रारी व्यवस्थापनापर्यंत पोहोचतील. एक किंचित तपशीलातली दुरुस्ती -

कुणी एक सैबेरियन दिग्दर्शक भलतंच इंट्रेष्टिंग काही बोलला...

दिग्दर्शक सर्बिअन होता. आजच्या वृत्तपत्रांत त्याविषयी वार्तांकन आहे.

मेघना भुस्कुटे Tue, 14/01/2014 - 10:27

In reply to by चिंतातुर जंतू

ओह! हे का ते?! यांची 'व्हेन दी डे ब्रेक्स' नावाची फिल्म पाहिली आम्ही (आत्मवाचक आदरार्थी बहुवचन नाहीये. गै.न.). साधीसुधी आणि गोड होती. यांच्याशी बोलायला आवडलं असतं. :(
असो.

मिसळपाव Tue, 14/01/2014 - 04:30

In reply to by मेघना भुस्कुटे

"...दर सोईच्या ठिकाणी यांची ज्येष्ठ नागरिक म्हणून सवलत उपटायची तयारी..." आं? "उपटायची तयारी"? म्हणजे काय सगळ्या ज्येष्ठ नागरिकानी संगनमत करून, व्यस्थापनाला फसवून सवलत द्यायला लावली असा काही प्रकार आहे का काय? का हे ज्येष्ठ नागरीक समहाउ 'लवकर म्हातारे होउन' लेकाचे आता सवलती उपटतायत अशी काहि भानगड आहे? !! "आणि मराठी सिनेमाला अशक्य गर्दि करणे" यात प्रॉब्लेम काय आहे नक्कि? अशक्य गर्दि हा की ती ज्येष्ठ नागरिकानी केली याचा? sigh........ एकंदरीत ज्येष्ठ नागरीकानी तिथे येउन तुमची बरीच (आणि खरं पंधरा मिनिटात साडेतीन घुसले ना? छे!) गैरसोय केली असं दिसतंय...

'न'वी बाजू Tue, 14/01/2014 - 05:48

In reply to by मिसळपाव

"उपटायची तयारी"? म्हणजे काय सगळ्या ज्येष्ठ नागरिकानी संगनमत करून, व्यस्थापनाला फसवून सवलत द्यायला लावली असा काही प्रकार आहे का काय? का हे ज्येष्ठ नागरीक समहाउ 'लवकर म्हातारे होउन' लेकाचे आता सवलती उपटतायत अशी काहि भानगड आहे?

जौद्याहो! नियमांचे उल्लंघन, करप्शन, भारतीय मेण्ट्यालिटी, वगैरे वगैरे. लाडावून ठेवलेले आहे एकेकांना! मुळात अशा सवलतींची गरजच का पडते, म्हणतो मी? आणि अशा सवलतींवाचून जमत नसेल, तर चित्रपटमहोत्सवास यायचे तरी कशाला?

(आणि खरं पंधरा मिनिटात साडेतीन घुसले ना? छे!)

साडेतीन??? ही साडेतीन उल्लंघने आहेत! (चुकून 'साडेतीन टक्के' म्हणणार होतो. सवय!) देहान्त प्रायश्चित्तास पात्र असलेल्या या गुन्ह्याकरिता त्या साडेतीनांचे (की साडेतिघांचे? चूभूद्याघ्या.) अगोदर स्ट्रिपटीज़ - आपले, स्ट्रिपसर्च - केले पाहिजे. नंतर, न्यायालयात खटला उभा राहो वा ना राहो, पण वर्तमानपत्रांतून, झालेच तर संकेतस्थळांवरून, बेणारे-पद्धतीने सुनावणी करून त्यांना दोषी ठरवले पाहिजे, आणि महत्तम शिक्षा ठोठावली पाहिजे.

पण छ्या:! या करप्ट देशात हे होणे नाही. (म्हणून तर आम्ही दूर, अटलांटा महानगरपालिका झुरळमारू विभागात काम करतो.)

(काय सांगता, या उल्लंघनाकरिता भादंवित तूर्तास देहान्त प्रायश्चित्ताची तरतूद नाहीये? असायला पाहिजे. म्हणूनच इण्डियन्सना या असल्या नसत्या सवयी लागतात! बंद केले पाहिजेत सगळे लाड!)

(आता या प्रतिसादाकरिता आमची नोंद एनएसएच्या डाटाबेसात - मराठीत 'डेटाबेसात' - झाली नाही, म्हणजे मिळवली. तशी व्हायचीच असती, तर एव्हाना झालीच असती म्हणा, किंवा झालीही असेल कदाचित, पण तरीही काळजी घेतलेली बरी - कसें?)

===============================================================================================================

(डिस्क्लेमर: वरील र्‍याण्टातील कशाचेही अथवा कोणाचेही कोणत्याही वास्तव घटनेशी वा घटनांशी अथवा वास्तवातील कोणत्याही एक वा एकाहून अधिक जिवंत वा मृत व्यक्तींशी वा पात्रांशी काहीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा - भलेही असो वा नसो. डिस्क्लेमर समाप्त.)

===============================================================================================================

च्यामारी, निदान या प्रतिसादाला तरी कोणीतरी 'भडकाऊ' द्या राव!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/01/2014 - 06:13

In reply to by 'न'वी बाजू

च्यामारी, निदान या प्रतिसादाला तरी कोणीतरी 'भडकाऊ' द्या राव!

हे असं सारखं हात पसरणं बरं दिसतं का ... ते ही या वयात? :प

ॲमी Mon, 13/01/2014 - 15:37

मेघना, ऋ :-D
मला एक शंका आहे. फिल्म फेस्टिवल मधले चित्रपट शक्यतो गंभीर, विचार करायला लावणारे वगैरे असतात. असे चित्रपट एकापाठोपाठ पाहिल्याने डोकं फिरत नाही का?

मेघना भुस्कुटे Mon, 13/01/2014 - 15:47

In reply to by ॲमी

फिल्म फेस्टिवल मधले चित्रपट शक्यतो गंभीर, विचार करायला लावणारे वगैरे असतात.

खूप लोकांचा असतो असा समज. पण मी खूप धमाल सिनेमे पाहिलेत फेस्टिवलमधे.

नि खाली ऋ म्हणतोय तशी धमालही भरपूर केलीय. कधीकधी तर आत लै भारी क्लासिक वगैरे सिनेमा चाललाय नि आम्हांला काहीच कळत नसल्यानं आम्ही खिंकाळ्या दाबत बाहेर पडलोय नि पुन्हा नव्या दमान दुसर्‍या थेटरात घुसलोय असंही झालंय. असं करायलापण मजा येते. इतर प्रेक्षकांना त्रास होऊ नये, इतकी काळजी घ्यायची की झालं.

३ सिनेमानंतर काही जड, अर्थ लावून बघायसाठी माझं तरी डोकं बंद होतं बाबा. मग मी निव्वळ भंकससाठी थांबते.

ऋषिकेश Mon, 13/01/2014 - 15:42

In reply to by ॲमी

फिरू शकतं.
पण आम्ही बहुतांश चित्रपट एकेकट्याने चित्रपट बघत नव्हतो. काही चित्रपटानंतर बाहेर जाऊन चहा (प्रसंगी २-२ चहा) मारून येत असूच, शिवाय चित्रपटांच्या मधल्यावेळेत, पट चालु व्हायच्या आधीच्या क्षणापर्यंत अव्याहत चाललेल्या गप्पा, विनोद यामुळे लाईट मूडची/विनोदांची कमतरता नव्हती. शिवाय चित्रपट गांभीर असले तरी इतके वेगळे होते की विषयाचे सादरीकरण व मुळातला विषय सगळॅच नवे असल्यानेही असेल पण डोके फिरले नाही.

अर्थात 'आमचे डोके फिरवायचेच' असा विडा काही आयोजक-स्वयंसेवकांनी घेतला होता खरा, पण त्यांना क्षणिक समाधान देण्यापलिकडे आम्ही यश येऊ दिलं नाही. ;)

मन Mon, 13/01/2014 - 16:47

In reply to by ऋषिकेश

संपूर्ण धाग्यावरील जॉली,मिश्किल ष्ट्यांड आवडला. (गैरसोय झाली, म्हणून त्रागा, चिडचिड काही नाही. हा पु लं च्या पोश्ट हापिसाच्या अनुभवातला मिश्किलपणा वाटतो. किम्वा द मा मिं च्या गावगाड्यातील लोकांसारखा. म्हणजे सगळं काही आदर्श्,पर्फेक्ट नाहिये, पण आहे त्यातच चेष्ट, थट्टा मस्करी करत रहायचं.)
हे असं असलं की ताण्-तणावामुळें येणारं बीपी वगैरे पासून दूर रहायला सोप्ं पडतं.
शंभर प्रॉब्लेम निर्माण होण्यापूर्वीच सुटतात.
कौन सी चक्की का आटा खाते हो?

मेघना भुस्कुटे Mon, 13/01/2014 - 15:53

हा सिनेमा बघून दिवसभर वचावचा चालून पिफला शिव्या घालणारी आमची तोंडं साफ बंद झाली.

३० वर्षं कैदेत असलेला एक कवी सुटून येऊन आपल्या पत्नीचा शोध घेतो ही एका ओळीतली गोष्ट. पण या गोष्टीवरून सिनेमाच्या ताकदीचा अंदाज येणं शक्य नाही.

राजकीय-सामाजिक भाष्यं, मानवी नात्यांचे अशक्य झोल, नजरेत रुतून राहिलेल्या प्रतिमा, स्फोटक वाटणारे ताकदवान रंग, कवितांच्या ओळी... या सगळ्याचं वर्णन करणं मला शक्य नाही.

जंतूंनी या सिनेमाबद्दल लिहिलं तर फार बरं होईल.

ऋषिकेश Mon, 13/01/2014 - 16:15

In reply to by मेघना भुस्कुटे

+१
वर मला जे दोन सिनेमे सर्वाधिक आवडले त्यातील हा दुसरा (पहिला वर दिला आहेच).

यातील कित्येक चित्रे मनावर अक्षरशः कोरली जावीत अशी चितारली आहेत. अफाट सिनेमॅटोग्राफी.. चित्रपटानंतर कोणीच कोणाशी फार काही बोललं नाही यातच त्याचं यश आहे असं वाटतं! फेस्टिव्हल वसूल करणारा चित्रपट

चिंज! यावर वेगळा लेखच लिहा ही आग्रहाची विनंती

बॅटमॅन Mon, 13/01/2014 - 16:33

In reply to by मेघना भुस्कुटे

आयला ही तर आमच्या ओडीसिअसचीच ष्टुरी वाटू राहिली की!!! दहा वर्षे ट्रॉयमध्ये अन परत दहा वर्षे भटकून अखेर हीरो घरला पोचतो तेव्हा तेच्या बायकूबरुबर (पेनेलॉप नाव तिचं) लगीन करायला १०८ लोक (उगा नाही, पुरावा आहे. होमर!) टपलेले आस्तेत त्यांना मारून मगच तिच्यालगत जातो. तरीही विश्वास बसत नै तिचा तेव्हा जुनी आठवण सांगतो-आपल्या बेडरूममधील कॉटचा एक पाय मोडका आहे, तो नंतर बसवल्याला म्हणून. मग तिची खात्री पटते.

बिपिन कार्यकर्ते Mon, 13/01/2014 - 16:48

हा ही फिफे कौटुंबिक प्राधान्यक्रमापायी वाया गेला.

अशा वेळी नं, घासुगुर्जींचं वाक्य अगदी पटतं... साली ही कुटुंबसंस्था फार माजली आहे!

:(

घनु Mon, 13/01/2014 - 20:38

टपाल हा सिनेमा अतिशय 'बोर' वाटला .. काय तो गाण्यांचा नको तिथे भडिमार आणि तेही लांबलचक गाण्यांचा... ... ते रडकं 'आभाळं फाटलं' का काय गाणं रे देवा... असं वाट्लं अभाळ जाउ द्या पण धरती फाटुन तिने आपल्याला गिळुन घ्याव ..पण नक्को-नक्को ते गाणं रे बाबा... शिवाय ती 'प्रेडीक्टेबल' कथा...आणि सिनेमा मधे प्रत्येकाचं गावंढ्ळ मराठी वेगवेगळं... सगळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातुन जसे 'स्थलांतर' करुन अश्या 'ओसाड' गावात आलेले असतात... नंदु माधव आणि विणा जामकर ह्यांचं काम अर्थात चांगलं आहे पण असं वाटलं कि त्यांना काही घेणं देणं नाही कि बाकी सिनेमा मधे कोण काय करतय... मला जो रोल दिला तो मी केला अश्या पद्धतीचं काम ते... म्हणजे 'अमीर खान' जशी लुडबुड करतो म्हणे शूटिंगच्या वेळी अगदी तशी नाही पण थोडं तरी ह्या अनुभवी लोकांनी दिग्दर्शक आणि ईतर लोकांना जरा सांगावं ना.... असो ...शेवटी आपण काय 'बघ्या' ची भुमिका करणारे !!!

अवांतर - खेडे गावात जाणारा मोकळा निर्मनुष्य रस्ता, आजुबाजुला ओसाड वाळलेलं रान आणि मग त्यातुन धुळ उडवत जाणारी लाल बस किंवा एखादी गाडी ...सिनेमाची अशी सुरुवात किंवा असा एकतरी सिन हा काय नविन ट्रेंड झाला आहे का मराठी सिनेमांचा?

राजेश घासकडवी Tue, 14/01/2014 - 06:19

आत्तापर्यंत सर्वात आवडलेल्या दोन चित्रपटांपैकी हा एक (दुसरा ऱ्हायनो सीझन). ही कथा आहे पोलंडमधल्या एका जिप्सी कवयित्रीची.

जिप्सी समाज हा पोलंडमध्ये प्रस्थापित समाजापासून दूर राहिलेला, भटक्या समाज. एका गावातून दुसरीकडे जायचं, बाहेर तळ ठोकायचा आणि गावांमधून करमणुक, श्रीमंतांघरी संगीताचे जलसे आणि चोऱ्यामाऱ्या करून पोट भरायचं. जिप्सी लोकांना त्यांच्या संगीतासाठी मागणी असे. पण सर्वसाधारण अ-भटक्या समाज त्यांच्याकडे संशयानेच पाही, आणि चार हात दूरच ठेवी.

हिटलरच्या काळात जिप्सींना ज्यूंप्रमाणेच टिपून टिपून मारण्यात आलं होतं. महायुद्धानंतरही जिप्सींविषयी असलेली हेटाळणीची, परकेपणाची भावना होतीच. त्यानंतरच्या काळात जिप्सींचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला. दोन वेगवेगळे समाज मिसळताना जे ताण निर्माण होतात त्याविषयी हा सिनेमा आहे. विशेषतः भटक्या समाजाला एका जागी सिमेंट कॉंक्रीटच्या पिंजऱ्यात बांधून राहताना जे प्रश्न येतात त्यांचं चित्रण आहे.

प्रतीक म्हणून येते पापुश्झा. जिप्सींमध्ये लिहिण्यावाचण्याला 'काळी-जादू' समजलं असलं तरी कशीतरी चार अक्षरं वाचायला शिकलेली मुलगी. सहज हवेची झुळूक यावी तसे तिला कवितेचे शब्द सुचतात.

कथानक तर ठाव घेणारं आहेच. पण हा सिनेमा बघावा तो त्यातल्या सिनेमॅटोग्राफीसाठी. प्रचंड मोठ्या मोकळ्या माळाच्या पार्श्वभूमीवर जिप्सींचा तांडा जाताना, रात्री थांबून नाचगाणी करतानाची दृश्यं अविस्मरणीय आहेत. तसंच त्यांच्या जीवनपद्धतीचे अनेक क्लोझप्सही दिसतात. त्यांच्या आधीच्या जीवनात असलेलं मोकळं अवकाश आणि नंतर चार भिंतींत येणारं कोंडलेपण एकही शब्द न बोलता चित्रांतून सांगितलेलं आहे. शक्य झाल्यास मोठ्या स्क्रीनवरच पहावा असा सिनेमा.

ऋषिकेश Tue, 14/01/2014 - 11:52

In reply to by राजेश घासकडवी

हा काल होता काय? बघायला आवडले असते.

विशेषतः भटक्या समाजाला एका जागी सिमेंट कॉंक्रीटच्या पिंजऱ्यात बांधून राहताना जे प्रश्न येतात त्यांचं चित्रण आहे.

कॉनरॅड रिक्टरचं लाईट इन द फॉरेस्ट आठवलं

चित्रपट शोधून बघायला हवा ही खूणगाठ!

ऋषिकेश Thu, 16/01/2014 - 22:16

In reply to by राजेश घासकडवी

या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपट (१० लाख रुपये) व सर्वोत्तम दिग्दर्शक (फॉरेन बॉडीजच्या दिग्दर्शकाबरोबर विभागून - ५ लाख) जिंकले आहे

घनु Wed, 15/01/2014 - 11:30

काल धावत-पळत ऑफिस नंतर आयनॉक्स ला गेलो 'The Matchmaker' पहाण्यासाठी तर त्यांनी काही कारणास्तव त्या सिनेमाऐवजी 'Love Steaks' दाखवला...अता आलोच आहे तर बघू म्हंटल पण अशक्य पांचट सिनेमा होता... स्टोरी अशी काही नाहीच ... खुप प्रयत्न करूनही पुर्ण पाहू शकलो नाही त्यामुळे कथेबद्दल सविस्तर असं लिहिण्यासारखं काही नाही...तसेही सिनेमामधे काही नव्हतेच .. अनावश्यक अश्लिलतेच्या पलिकडचे सिन आणि तसेच विनोद ... लोक त्या विनोदांवर खुप हसत होते त्यावरुन वाटले एकतर आपली विनोदबुद्धी कमकुवत आहे किंवा ह्या लोकांच्या अयुष्यात विनोदाचा अभाव आहे म्हणून कुठल्याही विनोदांवर हसत आहेत (म्हणजे अता असतात असे काही लोक जे रोहित शेट्टीच्या सिनेमातील विनोदांवर पोट धरुन धरुन हसतात तर कोणी चेतन दळवीच्या नाटकांचे फॅन असतात...चालायचंच!)... थोडक्यात सांगायचं हेच की हा सिनेमा बघू नका.. अगदी वेळ घालवायचा म्हणुनही नकोच!!!

अतिशहाणा Thu, 16/01/2014 - 23:05

In reply to by घनु

काही वर्षांपूर्वी पुफे फेष्टिवल पाहिले होते. त्यात काही चांगले चित्रपट पाहता आले यात शंका नाही. पण संमेलनाला येणारे अनेकजण 'रोशेल रोशेल' टाईपचे चित्रपट पाहायला येतात असे वाटले होते. एक चित्रपट इरॉटिक असल्याचे कुठेतरी तोंडओळखीच्या पुस्तकांमध्ये कळाल्यावर त्या स्क्रीनसमोर भल्ली मोठी रांग लागली होती.

अक्षय पूर्णपात्रे Thu, 16/01/2014 - 23:20

In reply to by घनु

आम्ही सुरूवातीला पुण्याच्या एंपायर थेटरात याच (नग्नता, कामप्रसंग वगैरे पाहण्याच्या) उद्देश्याने जात असू. पण कामप्रसंग नेमका केव्हा येईल हे माहीत नसल्याने तसेच तिकिटाचे पैसे परत मिळत नसल्याने पूर्ण चित्रपट पाहत असू. या सर्व व्यापात कधी-कधी एखादा खरोखर चांगला चित्रपटही पाहण्यास मिळत असे.

अक्षय पूर्णपात्रे Thu, 16/01/2014 - 23:30

In reply to by आदूबाळ

१५-१७ वर्षांपुर्वी अप्सरात (मार्केटयार्डापाशी?) मेन्स्ट्रिम हिंदी चित्रपट असत. अल्पना आणि पुढे भारत वगैरेलाही गेल्याचे आठवते.

ऋषिकेश Wed, 15/01/2014 - 12:08

हा चीनमध्ये प्रतिबंधित असणारा चीनी सिनेमा बघितला. पूर्वार्ध आवडला तर उत्तरार्ध निसटला - नावडला वगैरे म्हणता येऊ नये कारण झेपलाच नाही!
चीनमध्ये सामान्य व्यक्तींनी केलेल्या घृणास्पद कृतींची वाटचाल अशी साधारण थीम असणार्‍या या चित्रपटाची सुरवात मोठी रोचक आहे. एका हायवेवर एका टोमॅटोच्या ट्रकचा अपघात झाला आहे. रूक्ष पार्श्वभूमीवर रसरशीत लालबुंद टोमॅटोजचा ट्रक आडवा पडला आहे, शेजारी एक निर्विकार व्यक्ती एक टोमॅटो झेलत त्या दृश्याकडे बघतो आहे. थोड्या दूरवर एका दुसर्‍या बाईकवरील व्यक्तीला मग (मगिंग वालं मग) करायसाठी दोन पोरे चाकु काढतात. ह अ काही क्षण थबकतो आणि जाकिटातून पिस्तूल काढून दोघांनाही संपवतो! पुढे तो याच टोमॅटोच्या ट्रक समोरून जातो.

यानंतर सुरू होते त्या ट्रकच्या बाजुला बसलेल्या व्यक्तीची कहाणी. हा एका गावातील प्रसिद्ध, सर्वांशी आपणहून बोलणारा पण सिस्टिमच्या अन्याय्य वागणूकीवर सतत पेटलेला व्यक्ती. गावचा सरपंच तसेच जिल्हा प्रतिनिधींनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल उघड बोलणारा. अर्थातच सिस्टिम त्याला संपवू पाहते, विविध स्तरांवर तो झगडतो, शेवटी कोलमडतो आणि या सिस्टिमचे प्रतिक/प्रतिनिधित्त्व करणार्‍या सगळ्यांना गोळ्या घालून संपवतो.

चारही कथा अशाच शेवटी अंगावर येणार्‍या. मात्र पहिल्या दोन कथा जितक्या बेमालून वठल्या आहेत तितक्या शेवटच्या दोन अधिकाधिक क्लिष्ट होत जातात. मला बर्‍याचशा प्रतिकांचा वापरही डोक्यावरून गेला त्यामुळे असेल पण शेवट तितकासा कळला नाही. चारही कथा "तेथील प्रशासनपद्धती आणि त्याच्यामूळे नागरीकांच्या जीवनात थेट वा आडून होणारी ढवळाढवळ" या कल्पनेशी समांतर जातात. सामान्य नागरीकांना हिंसेकडे कसे ढकलले जाते वगैरे काही दाखवायचे असावे असा संशय मला आला. पण त्या पलिकडे चारही यात एक सुत्र आहे हे जाणवते आहे पण काय ते समजत नाहिये म्हणा किंवा शब्दांत मांडता येत नहिये म्हणा.

एकूणच नवी मांडणी, वेगळा दृष्टीकोन मांडणारा चित्रपट म्हणून नक्की पाहावा असे सुचवेन

राजेश घासकडवी Fri, 17/01/2014 - 12:23

फारा वर्षांनी इतका निखळ विनोदी पण तरीही उच्च दर्जाचा सिनेमा पाहिला. म्हणजे चुपके चुपके, सम लाइक इट हॉट यांच्या पंक्तीत बसणारा.

गोष्ट आहे एका विस्कळित, गोंधळलेल्या ग्रीक कुटुंबाची. सायप्रसमध्ये राहणाऱ्या ग्रीक कुटुंबाची. म्हाताऱ्याचं किंचित डोकं फिरलेलं, कजाग आई, त्यांची पैशाच्या अफरातफरीत सापडलेल्या आणि कंगाल झालेली दोन मोठी मुलं, त्यातल्या एकाची बायको, डिप्रेस झालेली एक मोठी मुलगी आणि तिचा सायप्रसमधला टर्किश प्रियकर यांची. हे सगळे एका वैराण जमिनीच्या तुकड्यावरच्या घरात आहेत. हा तुकडा म्हणजे ब्लॉक १२.

याच तुकड्याखाली महाप्रचंड तेलाचे साठे आहेत अशी बातमी मिळाल्यामुळे येन केन प्रकारेण ब्रिटिशांना त्याची मालकी हवी असते. म्हणून ते आपले लोक पाठवतात. त्याचबरोबर ब्रिटिशांना यात काय रस आहे हे जाणून घेण्यासाठी सायप्रसचा अध्यक्षही त्याचे गुप्तहेर पाठवतो. या सगळ्यांचा एकमेकांबरोबर जो काय सावळा गोंधळ चालतो तो अवर्णनीय आहे. आणि हो, त्या म्हाताऱ्याच्या एका मुलाची घरकाम करणारी देखणी भारतीय तरुणीही त्यात असते. ती सगळ्यांवर जादू करते. यापेक्षा अधिक काही सांगत नाही.

दोन तास निखळ करमणुक केल्यानंतर (थोड्या अभ्यासानंतर) लक्षात येतं की ही सायप्रसमध्ये जो ग्रीक, टर्किश, ब्रिटिश, सायप्रिअट ग्रीक आणि सायप्रियट टर्किश यांच्याबरोबर युनायटेड नेशन्सने गोंधळ घातलेला आहे त्यावर टिप्पणी आहे. पण हा भाग समजला तर सिनेमाविषयी एक वेगळाच आदर निर्माण होतो, समजला नाही, तरी सिनेमापासून जो आनंद मिळतो त्यात काही कसर येत नाही.

काहीही करून हा सिनेमा पहाच, तुम्ही दुवा द्याल याची मला खात्री आहे.

राजेश घासकडवी Fri, 17/01/2014 - 16:35

In reply to by बॅटमॅन

ही त्या सिनेमाची अधिकृत साइट. तो रीलीज होईल का हे माहीत नाही. चिंतातुर जंतूंनी आधी सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पिफमधले काही चित्रपट दाखवले जातील. त्याविषयी त्रोटक माहिती इथे.