ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट: अर्थात आपल्या परसातील पक्ष्यांची मोजणी
येत्या १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या दरम्यान जगभरात 'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट' होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही थोर करायचं नाहिये तर या चार दिवसांत तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला जे जे पक्षी दिसले त्या त्या पक्षांची नोंद करून ती तुम्ही www.ebird.org वर करायची आहे.
कोणताही पक्षी असो, कुठेही दिसला असो. या दिवशी तुम्ही घरी असा, ग्यालरीत असा नाहितर बागेत नाहितर जंगलात, पक्षी हे हमखास दिसणारच (कै नै तरी कावळा/चिमणी आहेतच). तुम्हाला लगेच दुर्मिळ पक्षी दिसेल असे नाही पण असं ठरवून पक्षी बघायचा प्रयत्न केल्यावर तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आपण कुठेही असलो तरी सभोवताली किती प्रकारचे जीव/पक्षी असतात.
यासाठी आपल्याला ऐसीअक्षरेवर असं करता येईल:
१. या चार दिवसांत तुम्हाला दिवसाच्या १२-१४ तासांपैकी (तुम्ही जंगलात/झाडेअसणार्या जागी असाल तर रात्रीचे तासही आहेत) कोणतीही १५-२० मिनीटे निरिक्षण करायचे आहे आणि त्या दरम्यान तुम्हाला कोणते पक्षी दिसताहेत याचा अंदाज घ्या.
२. पैकी जे पक्षी माहितीतले आहेत, त्यांचे नाव लिहून ठेवा, साधारण किती संख्येने दिसले ते लिहा व ढोबळ वेळ लिहून घ्या
३. पैकी जे पक्षी कोणते ते माहिती नाही, त्यांचा शक्य असल्यास पक्ष्याचा फोटो काढा. नाहितर त्यांचे वर्णन लिहून घ्या (मुख्यतः आकार, स्वरूप/फ्यामिली, रंग [अंगाचा/चोचीचा, पंखांचा, पोटाचा, पंखाखालचा - जितके नोटीस कराल तितके सोपे], ऐकु आल्यास आवाज, दिसल्यास घरट्याचा आकार वगैरे)
४. मग ऐसीअक्षरेवर पक्षाचा फोटो किंवा वर्णन टाका आपण सगळे मिळून त्या पक्षाचं नाव शोधायचा प्रयत्न करूयात.
५. त्या व्यतिरिक्त जे पक्षी तुम्ही ओळखले आहेत त्यांच्याबद्दलही ऐसीवर लिहा.
चला तर तयार रहा, १४ तारीख दूर नाही!
टिपः
१. १४ फेब्रुवारीला सर्रास दिसणार्या लव्हबर्डस ना या गणनेतून वगळले आहे ;)
२. यात जगभरतून कोणालाही सहभागी होता येईल. भारतात असायची पूर्वअट नाही.
मी कबुतर खाल्लंय लहानपणी. पण
मी कबुतर खाल्लंय लहानपणी. पण ते गावठी पद्धतीने परसातल्या शेकोटीवर भाजलेले असल्याने एक छान धुरकट वास आला होता.
अर्थात काहिसे वातड होते. मला टर्की, कबुतरे दोन्ही वातड लागली आहेत.
त्यामनाने बदके, कोंबड्या वगैरे अधिक छान शिजतात.
मात्र या धाग्यात विषयांतर होईल म्हणून मी थांबतो.
जाता जाता: यापैकी कोणते पक्षी येत्या चार दिवसांत मारण्यापुरते जरी बघणार असाल तरी या धाग्यावर नोंद करायला हरकत नाही ;)
ना...
आजच लंचला टर्की-अवोकाडो सँडविच खाल्लं. या एकदा इकडे, फ्रेश अवोकाडोची तरी चव चाखाल!
अवोकाडो वगैरे ठीकच आहे१, २, पण टर्की? नको रे बाबा!
हं, आता रोस्ट बीफ (शक्यतो पंपरनिकलवर, नाहीतर मग रायवर) नाहीतर पस्ट्रामी (रायवर) नाहीतर रूबेन३ असे काहीतरी (तेही जमल्यास पिकलचा तुकडा बाजूला टाकून वगैरे) म्हणाला असतात४, तर कदाचित विचार करता आला असता. पण टर्की??? नॉट वर्थ द ट्रबल.
असो.
--------------------------------------------------------------------------------------------
१ "कारण शेवटी आम्ही भटेंच! त्याला काय करणार?" - पु.ल.१अ
१अ आता खूष?
२ पण तसल्या त्या स्याण्डविचातल्या अवोकाडोपेक्षा ग्वाकामोले२अतला अवोकाडोच आम्हाला बरा वाटतो.
२अ आमच्यात ग्वाकामोलेच म्हणतात.
३ पुन्हा, हम्मावाले रूबेन; टर्कीवाले नव्हे. ("कारण शेवटी आम्ही..." इ.इ.)
४ कोणीतरी आमचीच ट्रिक आमच्यावरच उलटवण्याअगोदर स्पष्ट केलेले बरे: पिकलचा तुकडा बाजूला टाकायचा तो स्याण्डविचाबरोबर. म्हणताना नव्हे.
अस्मि तू कबुतर आणि तोही
अस्मि तू कबुतर आणि तोही त्रासदायक कबुतर म्हणतेस तेव्हा तू नेमकं खालच्या चित्रातील पक्ष्याला उद्देशून बोलते आहेस का?
(केवळ महितीसाठी फोटो आंतरजालावरुन साभार)
जर तसं असेल तर त्याचं नेमकं नाव पारवा (columba livia) आहे आणि हा पक्षी नक्कीच त्रासदायक आहे, कारण तो मुख्यतः माणसांच्या वस्तीत राहतो आणि त्याचा तो घर्र घर्र सारखा अवाज नकोसा होतो, त्यात तो घाण करतो ती वेगळीच व्यथा (शक्यतो खिडक्यांच्या आजूबाजूला).
पण कबुतर हा मात्र तितकासा त्रासदायक पक्षी नाही(नसावा) किंवा तो पारव्या इतका माणसांच्या वस्तीत राहणारा पक्षी नाही. पण कबुतरांच्या बहुतांश जाती ह्या पारवा ह्या मूळ पक्ष्याच्याच पोट-जाती आहेत.
अधिक माहितीसाठी हा आंतरजालीय दुवा :
पारवा : http://www.marathivishwakosh.in/khandas/khand9/index.php?option=com_con…
कबुतर : http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=artic…
मला वाटते ओरियोल (हळद्या ऊर्फ
मला वाटते ओरियोल (हळद्या ऊर्फ गोल्डन ओरिओल) याच्यात आणि हरियलमधे तुझा गोंधळ झाला असावा. ग्रीन पिजन (हरियल) हा खूप दुर्मिळ पक्षी आहे आणि खूप कमी ठराविक जंगलपट्ट्यांत तो दिसतो. अगदी अनकॉमन.
ओरियोल खाली: हा पुण्या मुंबई ठाण्यात वस्त्यांमधे भरपूर दिसतो. अगदी आत्ताही हपीसच्या खिडकीतून पाहायला गेलो तरी दिसेल.
न राहवून हरितालक (किंवा हिंदी
न राहवून हरितालक (किंवा हिंदी हरीयल) ची माहिती शोधली.
विकीनुसार हा LC अर्थात लीस्ट कंसर्न्ड अर्थात मुबलक आढळणारा पक्षी आहे. विशेषतः महाराष्ट्रात तर खुप कॉमन आहे.
कबूतरांच्या अनेक जाती आहेत. त्यांपैकी हिरवे कबूतर हे दिसायला फारच गोजिरवाणे असते. याला संस्कृत भाषेत हरितालक आणि हिंदी भाषेत हरियल म्हणतात. याचे शास्त्रीय नाव ट्रेरॉन फीनिकॉप्टेरा असे आहे. इतर कबूतरांइतकेच हे मोठे असून गुबगुबीत असते; शरीराचे मुख्य रंग हिरवट-पिवळा आणि राखी-करडा हे असतात;डोके, मान आणि छातीचा वरचा भाग हिरवट-पिवळा; मानेच्या बुडाभोवती राखी-करड्या रंगाचे कडे; खांद्यावर निळसर चकंदळ (वर्तुळकार खवला); पंख काळसर आणि त्यांवर पिवळा पट्टा; पाय पिवळे. यांचे झाडीमध्ये थवे असतात.
हे पक्षी पूर्णपणे वृक्षवासी असून संघचारी आहेत. रस्त्याच्या बाजूच्या झाडांवर ते बहुधा आढळतात. गावांच्या आणि खेड्यांच्या आसपासच्या बागा आणि झाडी यांतही ते आढळतात. पिंपळ, वड आणि उंबर यांची फळे हे खातात. पिंपळाची आणि वडाची फळे खाण्याकरिता यांचे मोठाले थवे त्या झाडांवर जमतात; त्यांच्या शरीराचा रंग या झाडांच्या पानांच्या रंगाशी मिळताजुळता असल्यामुळे ते मुळीच दिसून येत नाहीत. यांचा आवाज मंजूळ शीळ घातल्यासारखा असतो. यांची वीण मार्चपासून जूनपर्यंत होते. घरटे इतर कबूतरांच्या घरट्याप्रमाणेच असून झाडावर सु. सहा मी. उंचीवर असते. ते पानांमध्ये दडविलेले असते. मादी दोन पांढरी अंडी घालते.
माहितीकरिता
माहितीकरिता धन्यवाद्स..
माझ्या प्रतिसादात अस्तित्वाच्या दृष्टीने दुर्मिळ असे म्हणायचे नसून दिसण्यास दुर्मिळ (खेडेगावे आणि त्यातही भरपूर झाडे असलेली जंगलातली गावे यात सापडत असल्याने..आणि हिरव्या रंगामुळे विजेच्या तारेखेरीज अन्यत्र समरुप होऊन जवळजवळ अदृष्य होत असल्याने.
मुंबई पुणे ठाणे अशा शहरी वस्तीत हा दिसत नसल्याचा माझा अंदाज आहे. बाकी महाराष्ट्रात अस्तित्व बरेच आहे, आणि तो महाराष्ट्राचा अधिकृत स्टेट बर्ड असण्यामागेही महाराष्ट्रातले त्याचे जास्त अस्तित्वच असणार.
एक दुरुस्ती
गविंनी दिलेला फोटो 'पोंपाडोर पिजन'चा आहे, हरियलचा नव्हे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी 'हरियल' म्हणजे 'यलो फूटेड ग्रीन पिजन' हा आहे. पिवळे पाय हे याची ओळख पटवण्यास उपयोगी आहेत. विश्वकोशातील माहितीतही पिवळ्या पायांचा उल्लेख आहेच.
'यलो फूटेड ग्रीन पिजन' (विकीपीडिया वरून हे चित्र.)
संपादकः width="" height="" काढले आहे
धन्यवाद..महाराष्ट्राचा
धन्यवाद..
महाराष्ट्राचा राज्यीय पक्षी नेमक्या कोणत्या जातीचा आहे हे माहीत नव्हतं. आता कळलं.
मला ग्रे फ्रंटेड ग्रीन पिजन (मी पाहिलेल्या सह्याद्रीच्या भागात दिसणारं) याचा उल्लेख करायचा होता. तोही पोंपाडोर पिजनचाच एक प्रकार आहे आणि त्यावरुन पोंपडोर पिजनचा फोटो दिला. पण यलो फूटेड ग्रीन पिजन ही उपजात महाराष्ट्राची स्टेट बर्ड आहे हे पहिल्यांदाच कळल्याने आता लक्षात ठेवेन.
अर्थात तो "हरियल" नव्हे असं म्हणता येणार नाही, कारण हरियल हे जनरली ग्रीन पिजनला दिलेलं देशी नाव आहे. कोणत्याही उपप्रकाराला हरियलच म्हटले जाणार. त्यामुळे तो "हरियल" नव्हे पेक्षा तो "महाराष्ट्राचा स्टेट बर्ड" नव्हे असं म्हटलेलं जास्त अचूक होईल.
यावरुन मला आपली सृष्टी - आपले धनच्या एका खंडातला एक उल्लेख आठवला. हे अवांतरच आहे..
पॅरटला तुम्ही मराठीत काय म्हणाल ?
पोपट
पोपट म्हणजे पॅरट तर मग पॅरट भारतात सापडतच नाही..
इथे असलेले पॅराकीट्स असतात.
तेव्हा एक सर म्हणाले: " माझ्या अंगणातल्या झाडावर जो रोज येऊन बसतो तो पोपट.. मग इंग्रजीत तुम्ही त्याला पॅरट म्हणा किंवा पॅराकीट.. :)
तस्मात.. हे दोन्ही हरियलच.. पण मी दिलेला फोटो हा एक्झॅक्टली स्टेट बर्ड नव्हे हे कळले.
हो...प्रचलित असलेली स्थानिक
हो...प्रचलित असलेली स्थानिक नावे कधी कधी अगदी अचूक एका स्पिशीची असतील असे नसते. पण असाही अनुभव आहे की खेडोपाडी/जंगलात जिथे हे पक्षी तसे रोज दिसू शकतात तिथे प्रत्येक स्पिशीची स्थानिक नावे बर्याच वेळा असतात- ती त्या स्थानिकांच्या पलिकडे प्रचलित नसतात.
भारतात 'वर्नल हँगिंग पॅरट' सापडतो.
धन्यवाद
मागे एकदा कोण्या जंगल मार्गदर्शकाने चुकीची माहिती सांगितली होती ती आता मनातल्या मनात सुधारून घेतली - (कान्हा अभयारण्यातल्या एका मार्गदर्शकाने धनेश दाखवून महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून सांगितले होते. धनेशच दाखवला ते छानच केले त्याने, पण केरळचा राज्यपक्षी म्हणून सांगायला हवे होते!)
आमच्या घरामागे हे पक्षी
आमच्या घरामागे हे पक्षी दिसतात. फोटू नाहीत. स्वारी.
१. चिमणी. वर्णनाची गरज नाही.
२. कावळा. वर्णनाची गरज नाही.
३. पोपट. वर्णनाची गरज नाही.
४. साळुंकी. वर्णनाची गरज नाही.
५. काळ्या-कबर्या रंगाचा एक पक्षी. चिमणीहून मोठा आणि साळुंकीहून लहान. याची शेपूट मोठी आणि उंच व नाचरी असते. सहसा हे जोडीनं दिसतात. एकमेकांशी वेगानं खेळत / भांडत / गिरक्या घेत असतात. हे बुलबुल तर नाहीत?
५. वेडे राघू. चिमणीहून थोडेसेच मोठे. यांची शेपटी थोडी फाटल्यासारखी दिसते. हेही एका जागी बसत नाहीत. सतत वेड्यासारखे नाचत, गिरक्या घेत असतात. कायम दोघे वा तिघे-चौघे असतात. यांचा रंग पोपटासारखाच हिरवा, पण पंखात तांबूस झाक असते. उन्हात उडाले, की ती तांबूस झाक झळझळून उठते आणि फारच भारी दिसते.
६. खंड्या उर्फ किंगफिशर. वर्णनाची गरज नाही, नै का?
७. बगळा. वर्णनाची गरज नाही.
अजून काही दिसल्यास सांगीनच.
५. काळ्या-कबर्या रंगाचा एक
५. काळ्या-कबर्या रंगाचा एक पक्षी. चिमणीहून मोठा आणि साळुंकीहून लहान. याची शेपूट मोठी आणि उंच व नाचरी असते. सहसा हे जोडीनं दिसतात. एकमेकांशी वेगानं खेळत / भांडत / गिरक्या घेत असतात. हे बुलबुल तर नाहीत
शेवटी फुलवून नाचतात का?
असल्यास नाचण असण्याची शक्यता खूप. घरटे कॉकटेल ग्लासासारखे असते. २-३ लहान अंडी घालतो. तो असला की कावळे दूर असतात, तो मागे लागून त्यांना जीवाच्या आकांताने हाकलतो.
तू म्हटलेले कबरे पक्षी
तू म्हटलेले कबरे पक्षी यांपैकी एक असण्याची दाट शक्यता आहे:
१. फॅनटेल फ्लायकॅचरः
फोटो: www.indianaturewatch.net वरुन
२. मॅग्पाय रॉबिनः
फोटो: www.birdforum.net वरुन
शिवाय
आयोरा हाही एक पक्षी दिसेल. लक्ष ठेवणे.
फोटो: http://www.kolkatabirds.com/ वेबसाईटवरुन
उपक्रम आवडला.
आहा! किती गोजीरवाणा आहे हा आयोरा!
सध्या वाईट हवामानामुळे पक्षीदर्शन शक्य नाही, पण धागा वाचते आहे.
या धाग्याच्या निमित्ताने ३ वर्षांपूर्वी घराबाहेरच्या एका वळचणीखाली एका पक्षिणीने सलग दोन वर्ष उन्हाळ्यात घरटं बांधलं होतं, त्याची आठवण झाली. जागा अडचणीची असल्यामुळे चित्रं काढणं जरा अवघड होतं, पण प्रयत्न केला होता. रोज पिल्लं मोठी होताना, त्यांना भरवताना पाहणं हा माझा आवडता छंद होता. हा कोणता पक्षी होता माहिती नाही.
काकाकुवा = वेडा राघू ?
मला तर काकाकुवा / काकाटुवा म्हणजे पुढील पक्षी माहीत आहे -
(जालावरून साभार)
म्हणजे तोच तो पुलंच्या 'माझा शत्रुपक्ष' (की 'पाळीव प्राणी' ?) मधला बोलता पोपट. ( म्हणजे 'गन्नम स्टाईल' गाणारा बरं का ! 'गुरुगुलाबखत्रीचा नव्हे. :) )
कोतवाल
आपल्या इथे (म्हणजे पुण्या-मुंबईकडे) कोतवालही बरेच दिसतात. इंग्रजीत त्याला ड्राँगो की कायतरी म्हणतात बहुतेक. हा पक्षी आपल्या घरट्याजवळ आलेल्या शत्रूला आक्रमकपणे हैराण करकरून पळवून लावतो. याकरता इतर पक्षी त्याच्या घरट्याजवळ आपली घरटी बांधतात आणि म्हणून त्याला कोतवाल म्हणतात असे मी ऐकले आहे. याचे मुख्य लक्षण म्हणजे शेपूट ट्विन सायलेंसर असावा तद्वत टोकाला दुभंगलेली असते.
बरोबर. अगदीच सहज दिसेल शिवाय
बरोबर. अगदीच सहज दिसेल
शिवाय एखाद्या नदी किनारी/जवळ रहात असाल तर धोबी पक्षीही दिसेल. जवाळ सोनमोहोराचे वगैरे झाड असेल तर राखीधनेश दिसण्याचीही शक्यता आहे.
शिवाय निकेलचा फुलटोच्याही दिसेल
[पुण्यात तर माझ्या ग्यालरीत मुलीचे/बाळाचे कपडे वाळत घालायची गोल चिमट्यांची रिंग असते ना त्यावर पाच-पाच मिनिटे बसून शीळ घालत असतो]
पक्ष्यांची इंग्रजीतली नावे
पक्ष्यांची इंग्रजीतली नावे अपिअरन्स दृष्ट्या वर्णन करणारी (आणि कधीकधी त्याच्या जोडीला सवयीवरुनही) अशी असतात.
मराठी नावे मुख्यतः सवयीवरुन आणि अन्य प्रतीकांशी साधर्म्यावरुन असतात.
उदा. इंग्रजीत रंग, आकार, डोळ्याभोवती/मानेभोवती रिंगसारखे डिझाईन इत्यादि यांचा संदर्भ असतो.
-पाईड क्रेस्टेड ककू (पाईड = काळेपांढरे पट्टे असलेले, क्रेस्टेड = तुरावाले)
- गोल्डन ओरिओल (सोनेरी रंग)
- फॅनटेल फ्लायकॅचर (शेपटीचा पंख्यासारखा आकार - पण इथे माशी पकडण्याचाही उल्लेख आहे.)
- व्हाईट आय
- ब्लॅकबर्ड
- वार्ब्लर (आवाजावरुन)
-बॅबलर (आवाजावरुन)
-वॅगटेल (शेपूट हलवणे)
मराठीत पक्ष्याच्या रंग / आकार यांवरुन कमी नावे असतात. जास्त नावे बर्ड बिहेवियर आणि त्याच्या लाईफस्टाईलच्या निरीक्षणातून असतात आणि साम्य असलेल्या इतर वस्तूवरुन नाव दिलेले असते.
- धोबी. (वरील वॅगटेल- कपडे बडवल्याप्रमाणे शेपूट आपटत राहणे आणि नदी / पाणवठ्यानजीक वास्तव्य)
- हळद्या (वरील ओरिओल- मराठीत केवळ पिवळा पक्षी असे नव्हे.. तर हळद या व्यवहारातल्या वस्तूशी साम्य)
- कोतवाल (वरील ब्लॅक ड्रोंगो- अंमलदारी -पोलीसी लुक अॅन्ड फील आणि मुख्यतः स्वभाव)
- खाटीक - ( भक्ष्याला काटेरी फांदीवर टांगून त्याचे मांस खाटकाच्या दुकानात लटकण्याशी साम्य. इंग्रजीत मात्र त्याच्या दृश्य रंगांवरुन बे बॅक्ड श्राईक, रुफस बॅक्ड श्राईक अशी नावं आहेत)
- चष्मेवाला (वरील व्हाईट आय)
- सातभाई - (वरील बॅबलर) साताच्या संख्येने राहण्यावरुन, गटप्रियतेवरुन.
- नाचण (वरील फॅनटेल- नाचरेपणाच्या सवयीमुळे)
अर्थात वरील निरीक्षण केवळ ढोबळमानानेच आहे. इंग्रजीतही काही स्वभावदर्शी नावे असतात..
फक्त याचा एक इफेक्ट असा की इंग्रजी नावामुळे पक्षी एका दृष्टिक्षेपात पाहून त्याचे वैशिष्ट्य ताडता येते (रंग, आकार वगैरे)- उदा. ग्रेट इंडियन बस्टर्ड..या नावात हा पक्षी आकाराने मोठा असल्याचा दाखला येतो. माळढोक यामधे तसा येत नाही.
व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशरमधे त्याची छाती शुभ्र असल्याचे पाहताना ताडले जाते. खंड्या या नावाने ते कळत नाही. इ इ.
मराठी नावे अधिक पारंपरिक असतात पण त्या नावात असलेल्या वैशिष्ट्याचे प्रत्यंतर येण्यासाठी त्या पक्ष्याच्या सवयी जास्त वेळ नीट पहायला लागतात किंवा नावाचा अर्थ लावणारी लकब शोधावी लागते.
चांगले वाईट असे काही नव्हे..
खरंय. खरंतर मला बहुतांश
खरंय.
खरंतर मला बहुतांश पक्ष्यांची ओळख ही ट्रेकच्या वेळी गावकर्यांकडून, स्थानिकांकडून, आधीच्या पिढीच्या मंडळींकडून झाली असल्याने (व शिवाय माझा हा अभ्यासविषय किंवा वाचनविषय किंवा एकूणच व्यवस्थितपणा नसल्याने) बहुतांश पक्षांची इंग्रजी नावे अनेकदा माहितीच नाहियेत. त्यामुळे तुमचे प्रतिसाद माझ्यासाठी बरेच उपयुक्त आहेत.
मात्र हल्ली बघितलेले - जसे भुतानला अगदी जवळून अनेकदा बघितलेला हुलाहुप वगैरे - अनेकदा इंग्रजी नावांसकट भेटतात.
अशी स्थानिकांकडून कळलेली
अशी स्थानिकांकडून कळलेली मराठी नावे खूप रोचक असतात. त्यातून खेड्यातल्या स्थानिकांचे निसर्गनिरीक्षण हे केवळ स्नॅपशॉट टाईप लुक टाकणे नसून नावे ही खोलवर आणि बराच काळ सलग पाहण्यातून एस्टॅब्लिश झालेली असतात हे जाणवतं. बर्याचदा हे नाव कसं पडलं त्याची एखादी रोचक कहाणी किंवा दुवाही असतो (आंतरजालीय दुवा नव्हे).
इनफॅक्ट मराठी नावांचं मला जाणवलेलं हे वैशिष्ट्य हे जिथे ती नावं पडली तिथल्या लोकांच्या निरीक्षणशक्तीचं कौतुक वाटायला लावणारं आहे.
मस्त इशय. मिरजेत घरामागच्या
मस्त इशय.
मिरजेत घरामागच्या बागेत अनेक पक्ष्यांचे आवाज ऐकू येत. चिमणी, कावळा, घार, कोकिळा-कोकीळ, साळुंकी, भारद्वाज अन रक्तश्रोणी बुलबुल हे नेहमीचे यशस्वी कलाकार.
त्यानंतर नेहमीच्या चिमणीपेक्षा जरा लहान असणार्या अन पंखबिंख तपकिरीपेक्षा हिर्वट/पिवळट असणार्या चिमण्या.
क्वचित एक चिमणीच्या साईझचा पक्षी-त्याला माझ्यापुरते नाव मी काकाकुवा ठेवले होते पण काय की. अतिशय रंगीबेरंगी. केशरट-हिरव्या रंगाचे मिश्रण होते त्याचा कलर म्हणजे.
तो मॅग्पाय रॉबिनही पाहिला होता.
बाहेर, अन्यत्र कुणाच्या बागेत किंवा ट्रेक इ. करताना किंगफिशर ऊर्फ खंड्या(नक्की ना?) हाही दिसला होता. घारींतही ब्राह्मणी घार-आम्रविकेच्या गरुडागत वाटणारी-पाहिली होती. क्वचित उंचच्या उंच माडावर एकुलते एक गिधाड बसलेले पाहिलेय. घुबडही क्वचित पाहिलेय. लहानपणी एकदा विहिरीवर गेलो असताना दगडाच्या खबदाडीत त्याचे पिल्लू अन त्याचे मोठे डोळे पाहिलेले अजून लक्षात आहेत. पेरवाच्या किंवा अन्य झाडांवरचे पोपटही कैकदा दिसतात.
पण एक पक्षी अजूनही पाहिला नै. भौतेक कुठलीतरी चिमणीच असणारे. अतिशय सुरेल आवाजात, एक अतिशय विशिष्ट सुरावट तो काढतो.
"टीटी टीटी टँअॅटिटिटि टिटी" अशी काहीशी. एक ही अन दुसरी जरा वेगळी पण जवळपास सारखी अशा सुरावटी तो काढत असतो.
कोकिळेचे सुरेल सूर, तिला चिडवले की तिने अजून जोरात ओरडून स्वतःचा घसा बसवून घेणे हेही कैकदा केलेय. पुढेपुढे तिची दया येऊन बंद केले ते.
कावळ्यांचे सूरही एकदम वैविध्यपूर्ण असतात. विशेष खुषीत असले तर येणारा कावकाव अन नॉर्मल कावकाव यांत फरक असतो तो सरावाने नक्की ओळखू येतो. शिळी पोळी जेव्हा पाण्यात बुडवून अगदी मऊ करून खातात, ते पाहणे हा अतुलनीय आनंदाचा अण्भव असतो.
कोकिळा, चिमणी, कावळा अन भारद्वाज यांचे आवाज लै मजेशीर असतात. भारद्वाजाचा गळ्याच्या एकदम आतून येणारा "कुहुकुहुकुहु" तोही जबरी असतो.
अन वरती प्रतिसादांतल्या चर्चेला अनुलक्षून एक प्रश्न: ते जे कबुतर दिसतेय त्याला पारवा/पारवळ या नावाने कोणी ओळखत नै का? मिरजेत तरी त्याला पारवा अन पांढरे असते त्याला कबुतर असे म्हणण्याची पद्धत आहे.
शेवटी पोपटाने केलेली मोझार्टच्या ऑपेर्याची नक्कल पहा:
अन वरती प्रतिसादांतल्या
अन वरती प्रतिसादांतल्या चर्चेला अनुलक्षून एक प्रश्न: ते जे कबुतर दिसतेय त्याला पारवा/पारवळ या नावाने कोणी ओळखत नै का? मिरजेत तरी त्याला पारवा अन पांढरे असते त्याला कबुतर असे म्हणण्याची पद्धत आहे. >>>
हो नाशिकमधे देखील तसाच फरक केला जातो आणि त्या फरकानुसार पक्ष्याला संबोधलं जातं...
क्वचित एक चिमणीच्या साईझचा
क्वचित एक चिमणीच्या साईझचा पक्षी-त्याला माझ्यापुरते नाव मी काकाकुवा ठेवले होते पण काय की. अतिशय रंगीबेरंगी. केशरट-हिरव्या रंगाचे मिश्रण होते त्याचा कलर म्हणजे.
हा का ?
फोटो: http://ibc.lynxeds.com येथून
बाकी बॅट्या.. ब्राह्मणी घार हा प्रत्यक्षात गरुडच आहे.
नै. हा पक्षी पहिल्यांदाच
नै. हा पक्षी पहिल्यांदाच पाहतो आहे. मला वेडा राघू अपेक्षित होता. वर्णन अंमळ चुकले असले तरी मला तोच अपेक्षित होता असे ऋषिकेशने दिलेल्या फटूवरून स्पष्ट झाले.
बाकी घार अन गरुडात नक्की फरक काय असतो हा प्रश्न फारा दिवसांपासून पडलेला आहे. तसेच एखादी घार पाळावी अशी फार दिवसांपासूनची इच्छा आहे.
आमच्या घराजवळ २-४ प्रकारचे
आमच्या घराजवळ २-४ प्रकारचे तरी पक्षी दिसतात. त्यातला एक कार्डिनल तेवढा मला ओळखता येतो. पण आता बाहेर तापमान १६ फॅर. / -९ सेल्सि. आहे. ह्या कडाक्याच्या थंडीत ते कुठले दिसायला? जरा उबदार हवेतली तारीख दिली असती तर सोपे झाले असते.
पुण्यातल्या आमच्या घरी बरेच पक्षी दिसतात. कावळा, चिमणी, कबूतर ( की पारवे? घाणेरडे आणि अत्यंत उपद्रवी, लोचट, वास मारणारे पक्षी आहेत ), घार, पोपट, साळुंकी, कोकिळा, भारद्वाज, कोंबडी.
(अवांतर)
कावळा, चिमणी, कबूतर ( की पारवे? घाणेरडे आणि अत्यंत उपद्रवी, लोचट, वास मारणारे पक्षी आहेत ), घार, पोपट, साळुंकी, कोकिळा, भारद्वाज, कोंबडी.
कबुतरांबाबत येथे इतक्या जणांनी (जणींनी?) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या; मात्र, कावळे हे (आश्चर्यकारकरीत्या) तत्सम व्हिट्रिओल१पासून वाचले आहेत, असे लक्षात येते.
येथे कोणास मुकाट आपल्या वाटेने जात असता मध्येच भर रस्त्यात एखाद्या कावळ्याने उगाच वरून येऊन टप्पल मारलेली नाही काय?२
====================================================================================================================================================
१ हा शब्द श्री. ब्याटम्यान यांजकडून साभार.
२ याच कारणास्तव, येथे इतक्या जणां(जणीं)नी इतक्या गोग्गोड (तेवढे एक कबूतर वगळता) पक्ष्यांचे फोटो डकवले, पण आमचा लाडका पक्षी मात्र कावळा. एक नंबरचा टग्या! 'क्यारेक्टर' आहे बेट्याला.
कावळ्याने एकदा अशी हल्कीशी
कावळ्याने एकदा अशी हल्कीशी टप्पल मारल्याचे स्मरते. पण घरी दररोज येऊन हक्काने ताजी पोळी खाताना, विशिष्ट ठिकाणी पोळी ठेवली नसेल तर ओरडून ओरडून अख्खी बाग डोक्यावर घेताना, तसेच मस्ती आली तर पाण्याचे भांडे लाथाडून देताना पाहून यांजबद्दल तितके व्हिट्रिओल मनात उरत नाही.
पण बागेत काही गरीब बिचार्या खारीही पोळीभाजी खावयास येत असत त्यांजवर दादागिरी करून त्यांचे येणे बंद केल्याबद्दल कावळ्यांचा राग आला होता खरा.
येस्स्स!!! कावळ्यांचा अजून एक
येस्स्स!!!
कावळ्यांचा अजून एक पराक्रम क्वचित बघावयास मिळे. घरी मर्कटांची मोठी टोळी टाईमपासला म्हणून येत असे. अजूनही कधी कधी येते. अंगणातल्या झाडावर एक हुप्प्या बसला. दोन स्वाभिमानी कावळ्यांना ते सहन झाले नाही आणि त्या मर्कटपुंगवाला आरडा ओरडा करून हाकलण्याचा प्रयत्न केला, पण मर्कट कसचा ऐकतोय! तो ऐकत नै म्हटल्यावर दोघांनी त्याला आलटूनपालटून चोचींनी टोचायचा सपाटा लावला- डिस्पाईट द ऑड्स ऑफ अ टेरिबल डेथ. त्याने वैतागून मर्कट निघून गेला. गनिमी काव्याचे असे लाईव्ह उदाहरण पाहिल्यावर 'रोमहर्षश्च जायते' अशी स्थिती झाली होती.
...
घरी मर्कटांची मोठी टोळी टाईमपासला म्हणून येत असे.
हेही श्वापद (खरे तर मर्कट नव्हे, वानर) आमच्या लहानपणी नारायण पेठेत (आमच्या काळच्या - गेले ते दिवस!) क्वचित भेट देताना पाहिलेले आहे. (क्वचित शिष्टमंडळासहितसुद्धा.)
गनिमी काव्याचे असे लाईव्ह उदाहरण पाहिल्यावर 'रोमहर्षश्च जायते' अशी स्थिती झाली होती.
युद्धातील दोन्ही पक्षांबद्दल आत्मीयता (अधिक ममत्व) असल्याकारणाने आमच्या सिंपथीज़ मात्र तूर्तास कन्फ्यूज़्डावस्थेत आहेत. ('ड्युअल लॉयल्टीज़ नेव्हर वर्क'चे उत्कृष्ट उदाहरण.)
(बाकी, कावळे, मर्कट, खारी... काँटॅक्ट्स जबरदस्त दिसताहेत.)
हेही श्वापद (खरे तर मर्कट
हेही श्वापद (खरे तर मर्कट नव्हे, वानर) आमच्या लहानपणी नारायण पेठेत (आमच्या काळच्या - गेले ते दिवस!) क्वचित भेट देताना पाहिलेले आहे. (क्वचित शिष्टमंडळासहितसुद्धा.)
मर्कट अन वानर नक्की भेद काय? लालतोंडे ते मर्कट अन काळतोंडे ते वानर? आमच्या घरी तरी आजवर काळतोंड्यांचीच ग्यांग आलेली आहे. शिष्टमंडळही बहुतेकदा असतेच. त्यातील लहान सदस्यांनी एकदोनदा घरात प्रवेश करून छोटासा धुमाकूळही घातल्याचे आठवते.
अन पेठेसारख्या परिसरास माकडे असण्याइतपत निसर्ग इ. कधीकाळी जवळ होता अन तोही इतक्या अलीकडपर्यंत ही कल्पनाच सध्या करवत नाही.
युद्धातील दोन्ही पक्षांबद्दल आत्मीयता (अधिक ममत्व) असल्याकारणाने आमच्या सिंपथीज़ मात्र तूर्तास कन्फ्यूज़्डावस्थेत आहेत. ('ड्युअल लॉयल्टीज़ नेव्हर वर्क'चे उत्कृष्ट उदाहरण.)
उभयपक्षी ममत्व आम्हांसही आहेच. पण मर्कट अथवा वानर हे 'बिचारे' आजिबात नसतात. सबब त्यांना कोणी असे भारी पडल्याचे पाहून डेव्हिड-गोलियाथ इ.इ. आठवले इतकेच.
वरंधा घाट, बदामी, गगनगड, इ. ठिकाणी यांचे प्रताप भोगल्याने सिंपथी अंमळ कमी आहे, बाकी काही नाही.
(बाकी, कावळे, मर्कट, खारी... काँटॅक्ट्स जबरदस्त दिसताहेत.)
हो, त्या बाबतीत अंमळ भाग्यवान आहोत खरे. झालंच तर एका खोलीत एक पाकोळीही रोज भेटीस यायची, तिच्या आठवणीनेही अंमळ भडभडून आले. पण लहानपणी टारझनच्या एका झाडावरून दुसर्या झाडावर पळत जाण्यावर इतके फिदा होतो तरी तसे कधीही न करता आल्याचा सल उरात अजूनही दाटून आहे. आंबे, नारळ, रामफळ, चिंच, इ. झाडांचे आरोहण झाले असले तरी एकावेळी एकच झाड असे होते. टार्झनछाप पळापळी करता आली असती तर...च्या विचाराने अजूनही अं.ह. व्हायला होते.
...
मर्कट अन वानर नक्की भेद काय? लालतोंडे ते मर्कट अन काळतोंडे ते वानर?
हा प्राथमिक भेद झाला. (आम्हांस इतकाच माहीत आहे.) इतरही काही जीवशास्त्रीय भेद असावेत बहुधा - मंकी विरुद्ध एप असा काही भेद करतात बुवा, काय की - परंतु त्याबद्दल आम्हांस कल्पना नाही. (मानव हे मर्कटांपेक्षा वानरांच्या अधिक जवळ येतात, असेही कळते.) तज्ज्ञ खुलासा करतीलच.
अन पेठेसारख्या परिसरास माकडे असण्याइतपत निसर्ग इ. कधीकाळी जवळ होता अन तोही इतक्या अलीकडपर्यंत ही कल्पनाच सध्या करवत नाही.
'इतक्या अलीकडे' म्हणणार नाही. १९७०च्या दशकापर्यंत. (म्हणजे, १९७० साली सुरू झालेल्या दशकाच्या अखेरीपर्यंत. यानी कि 'सेव्हन्टीज़'. बोले तो 'आमच्या जमान्यात'.) त्या दशकाच्या अखेरीकडे झाडी उठू१ लागली, बिल्डिंगी उठू२ लागल्या, पुण्याचे हवामान तापू लागले, वगैरे अनेक उत्पात होऊ लागल्याचे आठवते.
('माकडे असण्याइतपत'ही म्हणणार नाही. म्हणजे, माकडे - रादर, वानरे - ही नारायण पेठेची स्थायी, रजिष्टर्ड निवासी तेव्हाही नसावीत बहुधा. मात्र, कधी एखादे वानर तर कधी वानरांचे एखादे शिष्टमंडळ सदिच्छाभेटी जरूर देत असे. कोठून येत, कोणास ठाऊक. पाहिलेली आहेत, एवढे खरे.)
पण मर्कट अथवा वानर हे 'बिचारे' आजिबात नसतात.
काय म्हणून असावेत? (तुम्हांस 'बिचारे' व्हावयास आवडेल काय?)
=====================================================================================================================
१, २ 'उठणे' हे क्रियापद तसे बहुआयामी आहे. येथेच पहा ना, 'नष्ट होणे' आणि 'अस्तित्वात येणे' अशा दोन संपूर्ण विरुद्धार्थांनी वापरता आले. इतरही अनेक अर्थ या क्रियापदाच्या झाकल्या मुठीत दडलेले आहेत; अधिक काय वदावे?
ओह अच्छा. माहितीकरिता बहुत
ओह अच्छा. माहितीकरिता बहुत धन्यवाद!
अन ही मंडळी कोठून येत याचे अपार कुतूहल अजून मनात आहे. उत्तर नै मिळालेले.
बाकी माकडे बिचारी नसली तरी सरळही नसतात.त्यांचा त्रास थोडासा का होईना ज्यांना सहन करावा लागतो त्यांचे मत अनुकूल होण्याची शक्यता अंमळ कमीच. हां अर्थात मत्कुण-मशक-पल्लिकादि मंडळींइतका तिरस्कारही नाही म्हणा.
...
अन ही मंडळी कोठून येत याचे अपार कुतूहल अजून मनात आहे.
याचे कुतूहल आम्हांसही आहे.
(बाकी, नारायणपेठेत अधूनमधून पुष्कळ झाडी त्या काळी असली, तरी तो वानरांचा स्रोत असण्याबाबत आम्ही साशंक आहोत.)
हां अर्थात मत्कुण-मशक-पल्लिकादि मंडळींइतका तिरस्कारही नाही म्हणा.
पल्लिकांचा उल्लेख तिरस्कृतांच्या यादीत पाहून अपार दु:ख झाले. माझ्या लहानपणी हे श्वापद कौटुंबिक पातळीवर आमच्या घरी कायम वास्तव्यास असे. म्हणजे, अधिकृतरीत्या आम्ही पाळलेले नसले, तरी एखाद्या पाळीव प्राण्याच्याच इतमामाने त्या आख्ख्या कुटुंबाचा घरात संचार असे. (किंबहुना, 'पाळीव प्राणी'/'पाळणे' या शब्दांचा उगम पालींपासूनच - पाली भाषेपासून नव्हे! - आहे, असा आमचा दृढ समज आहे.) पल्लिकांच्या आणि आमच्या ऋणानुबंधांची घट्ट वीण ही तेव्हापासूनची आहे.
इतक्या वर्षांत या श्वापदाने कधी उपद्रव दिल्याचे मात्र स्मरत नाही. घरातील किडूकमिडूक मटकावून त्यांचा उपद्रव कमी करण्यास मात्र मदत होत असे.
असो.
कबुतरांबाबत येथे इतक्या
कबुतरांबाबत येथे इतक्या जणांनी (जणींनी?) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या; मात्र, कावळे हे (आश्चर्यकारकरीत्या) तत्सम व्हिट्रिओल१पासून वाचले आहेत, असे लक्षात येते.
त्यात आश्चर्य ते काय? कावळा हा त्रास देणारा पक्षी नाहीच मुळी. एक तर कावळे कबुतराप्रमाणे माणसांच्या घरात घुसून संसार थाटत नाहीत. फार तर ग्यालरीत किंवा गच्चीवर वाळत घातलेल्या खाण्याच्या गोष्टी पळवतात. घराच्या आसपास मरून पडलेली घूस, उंदीर इ खाऊन संपवतात. घरात शिरत नसल्याने त्यांचा वास येत नाही की घरात घाण होत नाही. आमच्या मुंबई आणि पुण्याच्या घरांमध्य अनेक वर्षे कावळे खायला येत आहेत. खायला हवे असले की कावकाव करतात. नुसता 'क्राव क्राव' आवाजाशिवाय 'कॉकुक', 'क्वॉक' असे अनेक आवाज हे कावळे काढत असतात. मुंबईचे नेहमीचे कावळे वेगवेगळ्या खिडक्यांमधून माणूस कुठे आहे ते शोधून तिथे कावकाव करत असत. रोज येणारे दोन तर हातातून खाणे घेत असत. कधी काही चमचमीत वास आला तर नेहमीचा शिळा तुकडा हातातून घेऊन सरळ खाली टाकून देत. पुण्याचे जरा जादा धीट आहेत, जेवणाच्या टेबलावरचे पदार्थ पळवतात. पण कबुतरांपेक्षा खूपच बरे. कबुतरे (पारवे? )घरात शिरून जागोजागी शिटून ठेवतात. त्यांची पिसे गळतात. कितीदा काढली तरी त्यांची घरटी घरात कुठेही करतात. जरा दारे- खिडक्या उघड्या ठेवायची सोय नाही. वैतागून घराला कायमची बारीक जाळी बसवावी लागते. कधी कधी तर घरात शिरण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारातून आलेली आहेत. पंखांचा आवाक न करता हळूहळू चालत चालत येतात आणि कोणी बाहेर जायला / यायला दार उघड्ले की आत घुसतात. मुंबईच्या आमच्या घरापासून अगदी जवळ मोठा कबुतरखाना आहे. आमच्या खालची दोन कुटुंबे तिथे अन्नदान करून पुण्य मिळवत असतात. तिथे ह्यांची अन्न आणि निवार्याची सोय आहे. पण बाळंतपणासाठी हे तापदायक पक्षी आमच्या घराच्या माळ्याचा आणि संडासाचा आश्रय घेत असतात.
कावळा
कबुतरांबाबत येथे इतक्या जणांनी (जणींनी?) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या; मात्र, कावळे हे (आश्चर्यकारकरीत्या) तत्सम व्हिट्रिओल१पासून वाचले आहेत, असे लक्षात येते.
येथे कोणास मुकाट आपल्या वाटेने जात असता मध्येच भर रस्त्यात एखाद्या कावळ्याने उगाच वरून येऊन टप्पल मारलेली नाही काय?२
आम्ही अर्थातच व्हिट्रिओल व्यक्त केलेले नाही, पण..
मद्रासला असताना भर पहाटे कोणत्यातरी विषयाच्या परिक्षेकरता (नेहमीप्रमाणे अभ्यास न करता) आयाअयटीमद्रासच्या आवारातून चालत असताना एका निर्दय कावळ्याने येऊन जोरदार चोच मारलेली आहे ते चांगलेच आठवते (तोपर्यंत 'कावळा शिवणे' हा वाकप्रचार अगदीच निरर्थक वाटायचा).
तरीही कावळा हा पक्षी मला आवडतो. अत्यंत हुशार पक्षी.
होय कावळा हा पक्षी मलाही
होय कावळा हा पक्षी मलाही आवडतो. इन जनरलच पक्षी खूप आवडतात.
_____________
अमेरीकेतील कावळ्यांचा आवाज काव काव च असतो पण जरासा नाजूक काव काव असतो.
आणि एकमेकांना ते विशिष्ठ प्रकारे अभिवादन करतात, पंख पसरुन, मान खाली वर खाली वर करुन.
________________
चिकडी एक गोड पक्षी दिसतो इथे बरेचदा. हिवाळ्यात जास्त करुन पाहीला आहे. म्हणजे सुरुवातीला.
पक्ष्यांची
'पक्ष्यांची' असे म्हणावे, नाही का?