Skip to main content

पोलिटिंगल भाग २ : मॉडेल मुख्यमंत्री

पोलिटिंगल - भाग १



महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री (मामु) श्री. देवेन्द्रनाना फडणवीस यांच्या डायरीतील एक पान



||श्री || || 108 वेळा नमो नमः ||



पहिल्याच ओळीला नेहमीसारखी चूक झाली. सवयीप्रमाणे श्री लिहून गेलो! उद्यापासून काळजी घेईन. खरेतर ही डायरीची आयडिया पृथ्वीराजबाबांची. शपथविधीनंतर शुभेच्छा देताना त्यांनी ही युक्ती कानात सांगितली. (त्यांना ही युक्ती मनोहरपंतांनी (त्यांच्या शपथविधीच्या वेळी कानात!) सांगितली होती म्हणे!)

रिमोटने कंट्रोल होणाऱ्या सर्वांना आपले मन मोकळे करण्यासाठी अदृश्य शाईने लिहिलेली ही डायरी फार उपयोगी पडते! तरीही चुकून कोणाला वाचता आलीच तर कंबख्ती नको म्हणून 108 वेळा नमो नमः लिहून टाकले. (मित्रांची दगाबाजी आणि हितशत्रूंची जाहिरातबाजी याविरोधात हा जालीम उपाय आहे असे बाबांनी - पृथ्वीराजबाबा नाही.. हे दुसरे!- सांगितलेय . लिहायला सुरुवात केल्यापासून आमचे २५ वर्षांपासूनचे मित्र एका दिवसात सरळ झाले! आता रोज एक असे अल्टिमेटम पाठवण्याचे काम करतात! ) असो!

आजचा दिवस फारच गडबडीत गेला. प्रातःस्मरणीय ज्ञानगुणसागर नरेन्द्रजी मोदीजींशी साधर्म्य असलेलं नाव ठेवल्याबद्दल मी सर्वप्रथम नमोजींचे आणि नंतर आईवडिलांचे मनापासून आभार मानले. माझे नाव राहूल असते तर 'केंद्रात नरेन्द्र आणि राज्यात राहूल' अशी स्लोगन देता आली असती का? तो विचार करता करता प्रा.ज्ञा. नमोजींचेही स्मरण अनायासे झालेच. ते असो!

आज आदरणीय अमितजी शहाजींनी 'रिसेप्शन' ठेवले होते. ढोकळा, फाफडा, उंधियो वगैरे सगळे गुजराती पदार्थ! खाऊन मळमळायला लागले! कुठे ताक मिळतेय का याची चौकशी केली तर तिथेही फक्त गुजराती कढी! आधीच मुंबईच्या (खरेतर पश्चिम महाराष्ट्राच्या) पाण्याने अपचन होते. त्यात हे असले बेसनाचे ज्वालाग्राही पदार्थ! विदर्भाचे राज्य वेगळे करून हा पश्चिम महाराष्ट्र गुजरातेलाच देऊन टाकला की बरे होईल. म्हणजे एक महागुजरात होईल, आणि दुसरे विदर्भराष्ट्र! मग मुंबईतले उद्योग अहमदाबादेला नेण्याचे उद्योगही करावे लागणार नाहीत. सुंठीवाचून खोकला जाईल.

नितीनभौ मात्र जोरजोरात चापत होते. एकदोनदा "अबे भैताडा, बोट लावून खा ना बे!" असे माझ्याकडे पाहून ओरडले. कुठे बोट लावायचे ते काही न कळल्याने मी एकदोनदा चटणीला बोट लावून ढोकळा खायचा प्रयत्न केला! शेवटी नितीनभौंना गुजराती पदार्थ आवडतात आणि मला नाही असे इंप्रेशन पडू नये म्हणून बळेबळे काही पदार्थ तोंडात कोंबलेच.

घरी आल्यावर हिने आराम पडावा म्हणून कायम चूर्ण दिले. (खरेतर मला त्रिफळा चूर्ण लागते पण कायम चूर्ण हा गुजराती ब्रँड असल्याने तोच वापरायचे ठरवले आहे.) आता काय 'होते' (आणि होते की नाही!) ते उद्याच कळेल!

बाकी शपथविधीच्या कार्यक्रमाचे अनेकांनी केलेले कौतुक वाचून आनंद झाला. विशेषतः शिवरायांच्या राज्याभिषेकाशी केलेली तुलना पाहून नागपुरात अनेकांना गदगदून आले. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी उत्तरप्रदेशातून गागाभट्ट आले तसे माझ्या राज्याभिषेकासाठीही उत्तरप्रदेशातूनच आदरणीय अमितजी शहाजी यावे हा योगायोग जुळवून आणण्यासाठीच त्यांना गुजरातेतून तडीपार केेले आहे असे मी नागपुरशी फोनवर बोलताना सांगितले तेव्हा अनेकांना हुंदका आवरला नाही.

एकदोन संपादकांनी मी पूर्वी मॉडेलिंग करायचो तेही लिहिलेय. आता झोपण्यापूर्वी विचार करतो तर ते दिवस आठवतात. डायरेक्टरने सांगितले बस की बसायचे. ऊठ की उठायचे. मान वाकडी करुन वर बघायचे. हात पसरुन पोज द्यायची. डोक्याला फारसा ताप नसायचा.

मुख्यमंत्रीपदही फारसे वेगळे नाही. फक्त आमचे डायरेक्टर बदलले इतकेच!

असो!

टीपः चित्र जालावरुन साभार

मेघना भुस्कुटे Thu, 06/11/2014 - 10:45

शेवटची ओळ जरा उगाच आली. खाली नवनीतछाप रसग्रहणबिहण लिहिल्याबिहिल्यासारखी. नायतर मजा येत होती! हे नियमित लिहायला घेतलंत ते बाकी बेष्ट केलंत. नि ती चित्र कुणी काढलेली आहेत? श्रेयाव्हेर नाही, म्हणजे तुम्हीच काढली असं धरायचं का? इन द्याट केस, भारीच.

***

'शेळीच्या शेपटावरून' असे नाव या सदरासाठी या ठिकानी या माद्यमातून सुचवन्यात येत आहे.

अतिशहाणा Thu, 06/11/2014 - 16:23

In reply to by मेघना भुस्कुटे

चित्र माझी नाहीत. एवढं कुठं जमतंय. नाहीतर आम्हाला लोक अमुक म्हटले नसते का? ;) जालावर सापडलेली चित्रे आहेत. श्रेयअव्हेर टाकायला पाहिजे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 06/11/2014 - 23:36

In reply to by अतिशहाणा

आता कसं, सदस्यनामाला साजेसं लेखन सुरू झालं. मज्जा आली.

(जाताना इकॉनॉमी क्लास येताना प्रायव्हेट जेट याबद्दल काहीतरी येऊ द्या.)

अनुप ढेरे Thu, 06/11/2014 - 10:46

हा हा. छान लिहिलय.
बाकी सरकारं बदलल्यावर अतिशहाणा यांची लेखणी तळपायला लागली आहे. इतके दिवस आपलेच दात... :)

धर्मराजमुटके Thu, 06/11/2014 - 20:19

बाय द वे, रिसेप्शन कुठल्या "होल" मधे ठेवले होते ते लिहले असते तर ज्यादा मजा आला असता.
"स्नेक" ची यादी फारच तुटपुंजी वाटली.

धर्मराजमुटके Thu, 06/11/2014 - 21:07

खवचट श्रेणी देणार्‍यांनो जन्ता माफ करणार नाही.
बायदवे : ज्या कोणी श्रेणी दिली त्याला "हलकट" अशी श्रेणी द्यायची होती ना ? खरं खरं सांगा :)

बॅटमॅन Thu, 06/11/2014 - 21:13

In reply to by धर्मराजमुटके

मुटके साहेब ते जे कोण हरामी असतील ते असूद्यात. आम्ही आपले तुमच्या दोन्ही प्रतिसादांना मार्मिक श्रेण्या दिलेल्या आहेत याची क्रुपया करूण णोंद घेने.

धर्मराजमुटके Thu, 06/11/2014 - 21:33

In reply to by बॅटमॅन

थ्याँकू. थ्याँकू.
मला मिळालेल्या एकंदर श्रेणी पाहता मी फारच मार्मिक आणि विनोदी प्राणी आहे असे मलाच वाटायला लागले आहे.
उद्याच जाऊन मार्मिक आणि हास्यकथा मधे अर्ज देऊन येतो.

संपादक मंडळी : मला बी श्रेणीसुविधा उपलब्ध करुन द्या की राव ! तुमचं काय च्या पाणी असेल ते देउन टाकू ना ! :)

ऋषिकेश Fri, 07/11/2014 - 11:41

तुफान! =))
आता या नव्या मुख्यमंत्र्याच्या शाब्दिक डायरी(या)चे कण असेच लीक होऊ देत (आय मीन बाहेर पडत राहोत) ही कमळाचरणी प्रार्थना (आपण सेफ खेळायचं.. कमळ म्हटलं की कसं नमो येतातही नी नाहिही!)

हर हर गादी!

ओ नाम्या Fri, 07/11/2014 - 21:28

मजा आली. जागोजागी लागलेले फलक बघता आता अमितजी नि काम भागत नाही -आता अमितचंद्ररावजीसहेब .......